मला ईमेलवरून आलेल्या एका लेखाबद्दल सांगता सांगता त्याचे चार भाग झाले तरी त्या लेखात एवढे काय लिहिले होते ते कांही मी सांगितलेले नाही. याचे कारण असे आहे की त्यातील माहिती त्रोटक स्वरूपाची होती, जगप्रसिध्द पाश्चात्य शास्त्रज्ञांचे श्रेय काढून घेऊन ते आपल्या पूर्वजांना देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यात केला होता आणि त्यात दिलेली कांही माहिती मला इतर विश्वसनीय अशा श्रोतांमधून मिळालेल्या माहितीशी जुळत नव्हती. उदाहरणार्थ वराहमिहिराचा सूर्यसिध्दांत या लेखात भास्कराचार्यांना जोडला होता आणि त्यात गुरुत्वाकर्षणाचा शोध दिला आहे असे लिहिले होते. "हिणकस धातूंचे रूपांतर सोन्यात करणे किंवा एका विश्वातून दुस-या विश्वात जाणारे यान तयार करणे अशा आजच्या शास्त्रज्ञांना अजूनही न जमलेल्या करामती आमच्या या पूर्वजांनी प्रत्यक्षात आणल्या होत्या." हे विधान वाचल्यानंतर माझ्या दृष्टीने त्या लेखातील मजकुराची विश्वासार्हता संपली. त्यात अतिशय सुंदर अशी चित्रे दिलेली आहेत, पण कलाकाराचे स्वातंत्र्य लक्षात घेऊनसुध्दा विज्ञानविषयाच्या चित्रात दाखवलेले अशास्त्रीय वाटणारे बारीकसारीक तपशील मला खटकले. मी माझ्या इनबॉक्सचे दार उघडून हा चित्रमय लेख दाखवू शकत नाही, पण ते लेख मला आंतर्जालावर खालील पत्यांवर सापडले. वाचकांनी स्वतः भेट देऊन ते पहावेत.
http://www.agni.nl/cms/index.php?id=40,116,0,0,1,0
http://www.yoga-in-daily-life.org/download/Great_Indians.pdf
हा ब्लॉग लिहिता लिहिता मी आंतर्जालावर जे उत्खनन केले त्यात भरपूर चांगली माहिती मिळाली, माझे कांही पूर्वग्रह दूर झाले तर कांही अधिक बळकट झाले, पण एकंदरीत माझ्या मनात असलेला प्राचीन शास्त्रज्ञांविषयीचा आदर द्विगुणित झाला. इसवी सन ५०० ते १२०० या भारतीय खगोलशास्त्राच्या व गणितशास्त्राच्या सुवर्णकाळात आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य आदि जे महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी अगदीच एकेकट्यांनी आपले संशोधनकार्य केले नव्हते. त्यांच्या ग्रंथांवर एकमेकांनी तसेच इतरांनी भाष्य किंवा टीका लिहिल्या होत्या. त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले होते आणि हे ज्ञान अरब विद्वानांमार्फत पाश्चात्य देशात गेले होते. हस्ते परहस्ते त्यातल्या कांही संकल्पना कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन आदींपर्यंत पोचल्या असतील सुध्दा. अर्थात त्या लोकांनी त्यावर सखोल संशोधन करून ते ज्ञान पूर्णत्वाला नेल्याचे महत्व कमी होत नाही.
अंकगणित, बीजगणित, भूमिती आदी गणिताच्या शाखांमध्ये तर आपले शास्त्रज्ञ अतिशय प्रवीण होते असे त्यांच्या लेखनावरून स्पष्ट होते. हे प्राविण्य संपादन करतांना त्यांनी त्यांच्या काळापर्यंत पूर्वापार चालत आलेल्या गणितशास्त्रावर प्रभुत्व मिळवले होते की त्यातले नवनवीन प्रकार शोधून काढले होते हे समजणे अवघड आहे. शकुंतलादेवींचे प्राविण्य आपण पाहिले आहे. त्यांच्या कुशाग्र बुध्दीमत्तेचा, अचाट स्मरणशक्तीचा आणि त्यांनी केलेल्या तपश्चर्येचा हा चमत्कार आहे असे आपण म्हणू, पण त्यांनी गणितशास्त्रात नवे शोध लावले असे म्हणणार नाही कारण जी गणिते त्या चुटकीसरशी सोडवू शकतात ती जास्त वेळ लावून सोडवण्याच्या पध्दती अस्तित्वात आहेत. दशमानपध्दत, ' पाय ' चे अचूक मूल्य आदी कित्येक गोष्टी सर्वात आधी आपल्या शास्त्रज्ञांच्या ग्रंथात सापडतात म्हणून त्यांचे श्रेय त्यांना कदाचित देता येईल. त्यातही त्यांची दशमानपध्दत पूर्णांकातच मर्यादित असावी. ' . ' देऊन पुढे दशांश, शतांश, सहश्रांश वगैरे लिहिल्याची उदाहरणे सापडत नाहीत. अपूर्णांक हे अपूर्णांकातच लिहिले गेले आहेत.
या भारतीय शास्त्रज्ञांनी आपली ग्रंथरचना काव्यबध्द केली आहे. त्यामुळे ते पाठ करून लक्षात ठेवायला सोपे जात असले तरी शास्त्रीय माहिती छंदात किंवा वृत्तात बसवून यमक साधण्यात तिचा नेमकेपणा रहात नाही आणि समजायला कठीण होते. काव्य जुळवतांना एकादा जादा शब्द घातला जातो किंवा वगळला जाते. रसनिष्पत्तीसाठी उपमा, उत्प्रेक्षा आदी अलंकारांचा सढळ उपयोग होतो. त्यांच्या काळात कुठल्याही विधानाचा शास्त्रीय आधार दाखवण्याची पध्दत नसावी. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ' फॉर्म्युले' मिळतात पण त्यांचे ' डेरिव्हेशन' मिळत नाही. बहुतेक लोक फॉर्म्युला मिळाला, आपले काम झाले म्हणून खूष होतात, पण माझ्यासारख्या चिकीत्सकाचे तेवढ्यावर समाधान होत नाही.
बाराव्या शतकात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या सिध्दांतशिरोमणी या ग्रंथानंतर या शास्त्रज्ञांची परंपरा खंडित झाली ती कायमचीच. त्यानंतर अनेक शतकांच्या कालानंतर पुन्हा त्यांचे ग्रंथ उजेडात आले. याबद्दल पाश्चिमात्य देशांमधील विद्वानांनी काय काय म्हंटले आहे याचे इतके संदर्भ दिसतात की अलीकडच्या काळात कदाचित त्यांनीच आपली ओळख आपल्या या पूर्वजांबरोबर करून दिली कां असा संभ्रम मनात येतो.
माझ्या ब्लॉगवर दिलेल्या प्रतिसादात आदरणीय श्री.फडणीस यांनी "वराहमिहिर याच्या नावाने सूर्यसिद्धांत ओळखला जातो. त्याने काय सिद्धांत मांडला होता ते मला माहीत नाही. हा एक अपवादच म्हणावा लागेल. " असा तिरकस टोला मारला आहे. शक्य तेवढे मराठी शब्द वापरण्याच्या नादात मी "थिअरी" या अर्थाने "सिध्दांत" हा शब्द वापरला होता. त्यामुळे कदाचित गोंधळ झाला असावा. "थिअरी" म्हंटले की त्याची पूर्वपीठिका, परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण, सूत्रे, समीकरणे, उदाहरणे वगैरे त्याच्या अनेक अंगांनी केलेला अभ्यास डोळ्यासमोर येतो. तशा रीतीने भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले कार्य मला पहायला मिळाले नाही असे मला म्हणायचे आहे.
यासाठी पुन्हा एकदा न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे उदाहरण पाहू. झाडावरून फळ खाली पडले इथून सुरुवात झाली असे धरले तरी न्यूटनच्याच ''लॉज ऑफ मोशनप्रमाणे पाहता 'फोर्स' लावल्याशिवाय कोणतीही स्थिर वस्तू जागची हलत नाही आणि गतिमान वस्तू त्याच वेगाने सरळ रेषेत पुढे जात राहते. इथे तर झाडावरून निसटलेले फळ खाली येतांना त्याचा वेगही वाढत जातांना दिसतो. या अर्थी कोणता तरी फोर्स त्याला सारखा खाली ओढत असणार. याला त्याने 'गुरुत्वाकर्षण' असे नांव दिले. लहानशी गोटी बोटाने टिचकी मारून उडवता येते पण तोफेचा गोळा दोन्ही हातांनी ढकलावा लागतो, म्हणजेच गति मिळवण्यासाठी लागणारा फोर्स वजनाच्या प्रमाणात वाढतो. गॅलिलिओने पिसाच्या मनो-यावरून लहान मोठ्या आकाराचे दगड खाली टाकून ते एकाच वेळी खाली पडतात हे दाखवलेच होते. जर त्यांना एकच वेग मिळत असेल तर हा 'गुरुत्वाकर्षणाचा फोर्स' वस्तुमानाच्या प्रमाणात वाढतो म्हणायचा. जमीनीला समांतर दिशेने फेकलेली वस्तू सरळ रेषेत पुढे न जाता वक्र मार्गाने खाली येत जाते आणि कांही अंतरावर जमीनीवर पडते. धनुष्याने सोडलेला बाण अधिक दूर जातो आणि बंदुकीतून सुटलेली गोळी त्याहून दूर जाऊन जमीनीवर पडते. एकादी वस्तू खूप उंचावरून सरळ रेषेत समोर फेकली आणि तिला फेकण्याचा वेग वाढवत गेलात तर केंव्हा तरी ती वस्तू खाली पडण्यामुळे तिच्या मार्गाला येणारी वक्रता पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर एवढी होईल आणि त्यानंतर ती वस्तू पृथ्वीभोवती गोल फिरू लागेल असे त्याला वाटले. झाडावरील फळ खाली पडते पण झाडामागील चंद्र खाली न पडता पृथ्वीभोंवती प्रदक्षिणा कां घालतो याचे कोडे त्याला उलगडले.
त्यानंतर पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आणि पृथ्वीच्या मध्यापासून तिच्या पृष्ठभागाचे अंतर, कोणत्याही क्षणी चंद्राची सरळ रेषेतील गति आणि त्याच्या मार्गाला वक्रता आणण्यासाठी काटकोनात वळण्याची गति वगैरे सर्व गणिते मांडल्यानंतर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ती म्हणजे झाडावरून पडणा-या फळाला जे त्वरण प्राप्त होते ते चंद्राच्या त्वरणाच्या ३६०० पट असते आणि पृथ्यीपासून चंद्राचे अंतर पृथ्वीच्या मध्यापासून झाडाच्या फांदीपर्यंत जेवढे अंतर आहे त्याच्या ६० पट आहे. ६० चा वर्ग ३६०० झाला. अशा प्रकारे त्याने आपले सुप्रसिध्द समीकरण मांडले. त्याचा उपयोग करून पाण्यावर लाकूड कां तरंगते आणि लंबक आपल्याआप मागे पुढे कां होत राहतो यापासून ते ग्रह सूर्याभोवती का आणि किती वेगाने फिरतात इथपर्यंत अनेक निरीक्षणांचे स्पष्टीकरण करता आले. हे सगळे थिअरीमध्ये येते.
"सिध्दांत" हा शब्द भारतात वेगळ्या अर्थाने वापरला जात होता. "थिअरी" मध्ये जितक्या गोष्टी अपेक्षित असतात तितक्या त्यात येण्याची गरज नसते. यामुळे प्राचीन भारतातील विद्वानांनी अनेक विषयांवर असंख्य सिध्दांत सांगितलेले आहेत. वराहमिहिरानेच पंचसिध्दांत सांगितले आहेत. सूर्यसिध्दांत हा त्यातला एक महत्वाचा "सिध्दांत" आहे. त्याचे उदाहरण घेऊ. त्यावरील लेख वाचून मला जेवढे समजले त्याचा सारांश खाली दिला आहे.
अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने।समस्तजगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः।।
असे इशस्तवन करून या काव्याची सुरुवात होते. यात सुमारे पाचशे श्लोक आहेत. त्यात सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातले विषय आहेतच, ज्या कोज्या आधि त्रिकोणमितीतील संज्ञा आहेत, सांवलीवरून दिवसाचा काल, सूर्याचे आकाशातील स्थान, त्या जागेचे पृथ्वीवरील स्थान वगैरे ठरवण्याची पध्दत आहे. त्याशिवाय मनुष्यांचे आणि देवदानवांचे दिवस, वर्ष, युगे, कल्प, मनु वगैरे लक्षावधी वर्षांच्या कालखथंडाचा हिशोब सांगितला आहे. पाताल, मेरू पर्वत वगैरे पौराणिक संकल्पनांचे उल्लेख आहेत, पापनाशन आणि पुण्यसंपादन याबद्दलसुध्दा लिहिले आहे. अशा त-हेने अनेक विषयांना स्पर्श करणा-या या काव्यातले कांही श्लोक घेऊन तेवढेच वराहमिहिरांनी सांगितले असे म्हणता येणार नाही. सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातल्या गोष्टी केंव्हा घडतात हे त्यांनी सांगितले आहे. त्या काढण्याची रीतही दिलेली आहे, पंचांग बनवण्यासाठी ती उपयुक्त आहे. पण त्यामागची थिअरी दिसत नाही. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांना अंतरिक्षातील गणिते सोडवण्याची रीत माहीत असावी असे गृहीत धरावे लागेल. ज्या गोष्टी आज पटत नाहीत त्या सोडून द्याव्या लागतील.
साराशरूपाने सांगायचे झाल्यास प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांनी नेत्रदीपक अशी कामगिरी करून ठेवली आहे. ती डोळसपणाने समजून घेतल्यास नक्कीच स्फूर्तीदायक आहे. ते न करता फक्त आमचे म्हणून चांगले असे ठरवण्याने व सांगण्याने कांही साध्य होणार नाही.
No comments:
Post a Comment