Monday, March 06, 2023

तत्वज्ञानाची ओळख


मी आयुष्यभर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्यामुळे ते माझे आवडते विषय आहेत. विज्ञानावर मी लिहिलेले काही लेख या ब्लॉगवर एकत्र केले आहेत. ज्ञान, विज्ञान, सायन्स आणि नॉलेज https://anandghan.blogspot.com/2021/05/blog-post.html.

अलीकडच्या काळात मी अध्यात्म या विषयाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला होता त्याबद्दल इथे लिहिले आहे.  अध्यात्माची ओळख https://anandghan.blogspot.com/2022/11/blog-post_27.html 

यासाठी वाचन करत असतांना  माझ्या असे लक्षात आले की ज्ञान, विज्ञान, अज्ञान, तत्वज्ञान वगैरे शब्दांचे जे अर्थ मी इतके दिवस समजत होतो  त्यापेक्षा त्या शब्दांचे मुळातले संस्कृत भाषेत अभिप्रेत असलेले अर्थ काहीसे वेगळे असतात. कदाचित सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, पण मराठी भाषेतला पहिला शब्दकोष जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कँडी या दोन इंग्रजांनी दीर्घकाळ प्रचंड मेहनत घेऊन तयार केला. श्री.दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण तयार केले, इंग्रजीमधली काही विरामचिन्हे मराठीत आणली  आणि मराठीच्या नव्या प्रमाणभाषेची सुरुवात झाली. पूर्वी सगळे संत आणि पंत कवी आपल्या रचना पद्यामध्ये करत असत. गद्यलेखन त्या मानाने अलीकडच्या काळात सुरू झाले. बहुधा त्याच सुमाराला मुद्रणकला भारतात आली, छापखाने निघाले आणि पुस्तके छापली जाऊ लागली.  त्याच काळात इंग्रजीमधील  Knowledge, Science, Ignorance आणि Philosophy या शब्दांना ज्ञान, विज्ञान, अज्ञान आणि तत्वज्ञान हे मराठी प्रतिशब्द दिले गेले. बहुतेक मराठी लेखकांनी इंग्रजी साहित्याचाही अभ्यास केला होता आणि त्यांच्या लेखनावर इंग्रजी पुस्तकांमधील विचारांचा प्रभाव होता. त्यामुळे या शब्दांचे इंग्रजी भाषेतले मूळ अर्थ या मराठी शब्दांना येऊन चिकटले आणि रूढ झाले. निदान मी तरी, आतापर्यंत हे मराठी शब्द त्या इंग्रजी अर्थांनी वापरत आलो आहे.

पण गीता, भागवत यासारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये हे संस्कृत शब्द वेगळ्या अर्थांनी योजले असावेत असे वाटते. कुठल्याही विषयाचे नॉलेज म्हणजे त्याचे ज्ञान असे आपल्याला वाटते. आपण अनेक विषयांची माहिती शाळाकॉलेजात किंवा घरातल्या मोठ्या लोकांकडून शिकतो, पुस्तके वाचून किंवा आजकाल इंटरनेटवरून माहिती मिळते, त्यातले जेवढे समजते, लक्षात राहते त्याला आपण ज्ञान समजतो. असे जे ज्ञान आपल्या आजूबाजूच्या खूप लोकांना असते त्याला आपण सामान्यज्ञान म्हणतो. ज्या लोकांकडे निरनिराळ्या विषयातल्या माहितीचे भांडार असते त्यांना नॉलेजेबल समजले जाते, पण ज्ञानी आणि नॉलेजेबलमध्ये फरक आहे. ज्ञानी हा शब्द बहुतेक वेळा साधू, संत, स्वामी अशा साक्षात्कार झालेल्या लोकांसाठी वापरला जातो. 

अर्जुन एका प्रख्यात राजघराण्यात जन्मला होता, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर यासारख्या मोठ्या विद्वान गुरूंकडे धनुर्विद्या, नीतीशास्त्र वगैरे शिकला होता, तरीही गीतोपदेश मिळेपर्यंत तो अज्ञानातच राहिला होता. भगवंताकडून त्याला ज्ञान मिळाले. हे पाहता ज्ञान या शब्दाचा आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान वगैरे असा वेगळा अर्थ लक्षात येतो. हे ज्ञान सरसकट सर्व लोकांना कुणाक़डून शिकून किंवा पुस्तके वाचून समजेल असे नाही. पुराणकाळातले ऋषीमुनी एकटेच अरण्यात जाऊन कठोर तपश्चर्या करत असत आणि त्यांना ज्ञान प्राप्त होत असे, काही लोकांनी पूर्वजन्मी तपश्चर्या करून प्राप्त केलेले ज्ञान  त्यांना  जन्मतःच मिळते असे म्हणतात, तर काही लोकांना योग्य गुरु भेटला तर तो ज्ञानाचा मार्ग दाखवतो. पुराणातल्या कथांमधले ऋषीमुनी ध्यान धरून बसले की त्यांना कुणीही न सांगता अनेक गोष्टी अंतर्ज्ञानाने समजत असत. त्रिकालज्ञानी मुनींना तर भूतकाळात घडून गेलेल्या, वर्तमानकाळात कुठेही घडत असलेल्या आणि भविष्यकाळात कुठे तरी घडणार असलेल्या गोष्टी, इतकेच नव्हे तर कुणाच्या अनेक पूर्वजन्मांमधले तर कुणाच्या भविष्यातल्या जन्मातले प्रसंगसुद्धा आपोआप समजत असत असे म्हणतात. अशा अविश्वसनीय गोष्टी मी शिकलेल्या विज्ञानामध्ये म्हणजे सायन्समध्ये  बसत नाहीत, पण संस्कृतमधल्या ज्ञानविज्ञानात कदाचित ते ही शक्य असावे असे वाटते.

तत्वज्ञान असा शब्द प्राचीन काळातील संस्कृत भाषेत प्रचलित होता की नाही हे मला माहीत नाही. मी जे काही थोडे संस्कृत श्लोक वगैरे वाचले आहेत त्यात मला तत्वज्ञान हा शब्द दिसला नाही. कदाचित तो मराठीतच प्रचलित झाला असेल. हिंदी भाषेत फिलॉसॉफीला दर्शन असे म्हणतात. तत्व या शब्दातला त्व हा प्रत्यय महत्व, अस्तित्व वगैरे सारखा धरला तर तत्व याचा अर्थ तत् चे असणे असा होतो. तत् म्हणजे ते. मी आणि तू सोडून ती, तो वगैरे इतर सगळे जे काही या जगात किंवा कल्पनेतही असेल ते सगळे यात आले. इंग्लिशमधल्या  principle या अर्थानेही ‌तत्व हा शब्द मराठीत वापरला जातो. हे सगळे काय आहे, कशासाठी आहे वगैरेचे ज्ञान, तत्वांचे किंवा पदार्थांचे यथार्थ स्वरूप किंवा त्याचे सार म्हणजे तत्वज्ञान. या अर्थाने तत्वज्ञान हा शब्द फिलॉसॉफीच्या जवळ येतो. पण सर्व अर्थांनी समान वाटत नाही. वेद, उपनिषद, भगवद्गीता वगैरेंमध्ये असे सांगितले आहे की या विश्वात जे काही आहे ते सगळे परब्रह्म आहे. त्यामुळे  तत्वज्ञान म्हणजेच 'त्या'चे ज्ञान याचा अर्थ ब्रह्मज्ञान असाच अर्थ शास्त्रीपंडितांकडून घेतला जातो. हिंदू तत्वज्ञान अशा प्रकारे हिंदू धर्माशी जोडले गेले आहे.

फिलॉसॉफी हा शब्द फिलिओ (प्रेम) आणि सोफिया (ज्ञान) या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे. ज्ञानाचे प्रेम असा त्याचा साधारणपणे अर्थ निघतो.  सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल वगैरे ग्रीक विचारवंत त्यांच्या काळातले अत्यंत बुद्धिमान तसेच ज्ञानी विद्वान होते. त्यांनी निरनिराळ्या विषयांवर मांडलेले सिद्धांत, विचार, मते वगैरे गोष्टी फिलॉसॉफीमध्ये गणल्या जाऊ लागल्या आणि आजही फिलॉसॉफी या विषयात त्या शिकवल्या जातात.  हे लोक येशू ख्रिस्ताच्याही आधीच्या काळात होऊन गेले होते. नंतरच्या दोन हजारवर्षांमध्ये तर युरोपात कित्येक महान फिलॉसॉफर्स होऊन गेले. माणसाला ज्ञान संपादन करण्याची निरनिराळी साधने मिळालेली आहेत. आपली पाच ज्ञानेंद्रिये मुख्य आहेत. आजूबाजूला दिसत असलेल्या गोष्टी किंवा घडत असलेल्या घटना पाहून त्यावरून बोध घेतला जातो हा पहिला राजमार्ग, पण कधीकधी दिसते तसे नसते, दिसलेले दृष्य एकादे प्रतिबिंब, मृगजळ किंवा भास असू शकते, यामुळे ते पू्र्णपणे विश्वासार्ह नसते, कानाने ऐकलेलेही खोटे असू शकते, त्यामुळे चुका होऊ शकतात. म्हणून आपल्या बुद्धीचा उपयोग करून काय बरोबर आहे हे तर्काने ठरवणे हा एक श्रेयस्कर मार्ग आहे असा दुसरा विचार आहे. शिवाय माणसाच्या मनात काय चालते, माणसे कशी वागतात, सत्य आणि असत्य, नीती आणि अनीती, न्याय आणि अन्याय अशा अनेक प्रकारच्या गोष्टी फिलॉसॉफीमध्ये येतात. मी कोण आहे आणि हे जग म्हणजे काय आहे, माझ्या आणि या जगाच्या अस्तित्वाचे काय कारण आहे असे प्रश्न सामान्य लोकांना पडत नसतील, पण तत्वज्ञांना ते रात्रंदिवस छळत असतील आणि आपापल्या मतीने ते लोक या प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधत राहिले होते. 

या प्रकारच्या तत्वज्ञानात आत्मा, परमात्मा वगैरे आणण्याची तितकीशी गरज नसते.  पण हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, जैन वगैरे सगळ्याच मुख्य धर्मांमध्ये या प्रश्नावर विचार करणारे धर्मगुरू होऊन गेल्यामुळे या धर्मांमध्ये त्यांच्या तत्वज्ञानाला महत्वाचे स्थान आहे. पण ख्रिश्चन धर्माशी  संबंधित असलेले किंवा नसलेले अशा युरोपमधील प्राचीन काळातील सगळ्याच मान्यवर विद्वानांनी सांगितलेले सगळे विचार, मते, तर्क, सिद्धांत, नियम वगैरे ज्ञान फिलॉसॉफीमध्ये येत गेले. नंतरच्या काळात त्यामधील नॅचरल फिलॉसॉफीला सायन्स असे वेगळे नाव  दिले गेले.  

भारतामधले तत्वज्ञान युरोपपेक्षाही काही हजार वर्षांनी पुरातन आहे. त्याची सुरुवात वेद आणि उपनिषदांपासून होते. अहम् ब्रह्मास्मि, तत्वमसि अशासारख्या सूत्रांमध्ये गहन अर्थ भरलेला आहे. पौराणिक काळातील ऋषीमुनी आणि इतिहासकाळातील आचार्यांनी  त्यांचे सखोल विश्लेषण करून त्यात भर घातली आहे. यामध्ये आस्तिक आणि नास्तिक अशा दोन मुख्य विचारसरणी आहेत. आस्तिक विचारसरणींमध्ये  वेदांत, सांख्य, योग, न्याय, मीमांसा, वैशेषिक अशी सहा दर्शने आहेत. त्यातून पुढे द्वैत, अद्वैत, विशिष्ट अद्वैत वगैरे प्रवाह किंवा उपप्रवाह आले आहेत. प्राचीन काळामधले विद्वान किंवा आचार्य या मतांवरून शास्त्रार्थांचा वादविवाद करत असत. वादे वादे जायते तत्वबोधः असे सुभाषित आहे. देवीच्या आरतीमध्ये "साही विवाद करता पडिले प्रवाही" या ओळीत सहा दर्शनांचा उल्लेख आहे. नास्तिक विचारसरणीमध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन ही प्रमुख तत्वज्ञाने येतात. या दोन्ही प्रकारच्या विचारसरणीमधील प्रत्येक दर्शनामध्ये अनेक तत्वे, तर्क, सिद्धांत आणि उदाहरणे दिली आहेत.  

या सगळ्यांचा विस्तार खूप मोठा आहे. मला याबद्दल काहीच माहिती नव्हती.  तत्वज्ञान या विषयाची उत्सुकतेपोटी जेवढी ओळख झाली ती थोडक्यात दिली आहे.

No comments: