Thursday, January 19, 2023

तेथे कर माझे जुळती - २१ डॉ.अच्युत शंकर आपटे


माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या ज्या थोर लोकांनी माझ्या मनावर खोलवर छाप सोडली आहे अशा वीस खास लोकांच्या आठवणी मी या मालिकेत सादर केल्या होत्या. याला अपवाद म्हणून मी या लेखात एका अशा व्यक्तीबद्दल लिहिणार आहे, जिला भेटण्याची मला लहानपणापासून खूप इच्छा होती, पण तसा योगच आला नाही.  मी त्यासाठी फारसे प्रयत्नही केले नाहीत हेही तितकेच खरे आहे.

मी जमखंडी इथे शाळेत शिकत असतांना शाळेमधले मास्तर लोक आमच्यापुढे गुरुदेव रामभाऊ रानडे यांचा आदर्श ठेवत असत, पण त्या ऋषितुल्य साधुसंताचा थोरपणा त्या  लहान वयात आमच्या आकलनाच्या पलीकडचा होता. त्यामुळे आपण मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे सद्गुरु व्हावे, आश्रमात रहावे, आपला शिष्यपरिवार असावा वगैरे मला  चुकूनही कधी वाटले नाही. त्याच काळात आमच्या घरातली वडीलधारी मंडळी डॉ.अच्युतराव आपटे यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवत असत. त्यांनी नेमके काय काय पराक्रम केले हे कदाचित त्यांनाही माहीत नसेल, पण ते खूप हुषार होते आणि आपल्या हुषारीच्या जोरावर ते परदेशी जाऊन काहीतरी भव्यदिव्य असे उच्च शिक्षण घेऊन आले होते एवढी माहितीही त्या काळात खूप आकर्षक होती. आजकाल दर दोन तीन मुलांमधला एक तरी परदेशात जात येत असतो, त्यामुळे कुणाला त्याचे फारसे कौतुक वाटत नाही. पण माझ्या लहानपणी परदेशी जाणे ही अशक्यप्राय इतकी भारी गोष्ट वाटायची.  लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू वगैरे मोठमोठी पुढारी मंडळी परदेशी जाऊन आले होते हे मला माहीत होते, पण आमच्या माहितीत तरी अशी कोणती ओळखीतली व्यक्ती नव्हती.

अच्युतराव आपटे आमच्या गावातच जन्मलेले आणि आमच्या शाळेतच शिकलेले होते. ते माझ्या आत्याच्या नात्यात होते आणि त्यांचे घरही आत्याच्या घराला लागूनच होते, त्यामुळे आम्हाला जातायेतांना ते घर दिसत असे. कदाचित माझ्या लहानपणी ते तिथे अधूनमधून येतही असतील, पण त्याच काळात त्यांच्या घरी जायची संधी मला कधीच मिळाली नाही. ते वयाने माझ्याहून खूप मोठे असल्यामुळे  आमची ओळख होण्याची काही शक्यताही नव्हती. त्यांनी माझे नावसुद्धा कधी ऐकले नसेल. पण माझी आई आणि आत्या यांच्या बोलण्यात अच्युतरावांच्या कर्तृत्वाचा गौरवपूर्ण उल्लेख नेहमी येत असे, त्यामुळे  माझ्या मनात या व्यक्तीसाठी एक खूप मोठे मानाचे स्थान तयार झाले होते. आपणही त्यांच्यासारखे मन लावून अभ्यास करून भरपूर शिकावे आणि स्कॉलरशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे हे मला त्या वेळी शक्यतेच्या कोटीतले वाटत होते.  चांगले मार्क मिळवून मोठी डिग्री घेतली तर जाण्यायेण्याच्या खर्चाची सोय आपोआप होत असावी असेही तेंव्हा कदाचित वाटत असेल. पण कॉलेजात गेल्यानंतर पाहिले की ज्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे होते त्यांना त्यासाठी खूप धडपड आणि खर्चही करावा लागतो, अगदी विद्यापीठात पहिला आलेल्या मुलाचीही त्यातून सुटका नसते, तेंव्हा मी तो नाद सोडून दिला. माझ्याच वर्गातली काही मुले आपापल्या प्रयत्नाने परदेशी गेलेली पाहिली आणि मलाही नोकरीतून परदेशी जायची संधी मिळणारच याची जवळ जवळ खात्री होती. त्यामुळे मला परदेशगमनाचे वाटणारे अप्रूप कमी झाले.

माझ्या नात्यातल्या एका मुलाची आर्थिक परिस्थिति बेताची होती. पण श्री.अच्युतराव आपटे यांनी त्याच्या पुण्यात राहण्याजेवण्याची आणि शिक्षणाची सोय लावून दिली असे ऐकले तेंव्हा मला समजले की ते उच्चशिक्षित विद्वान होते तसेच बरीच समाजसेवाही करत होते. पण त्या काळी मला त्याचा जास्त तपशील समजला नाही. आमच्या घरात माझी आई आणि आत्या सोडून इतर कुणी अच्युतरावांना ओळखतही नव्हते, त्यामुळे नंतर घरातल्या कुणाच्या बोलण्यातून त्यांचा उल्लेख येईनासा झाला. मराठी वर्तमानांमध्ये कधी विद्यार्थी सहाय्यक संघाविषयी काही माहिती किंवा बातमी आली तर त्यात अच्युतराव आपटे यांचा उल्लेख येत असे, पण ती बातमी कधी कधीच माझ्या वाचनात आली असेल.

पुण्यात राहणाऱ्या जमखंडीकरांचा एक समूह तयार झाला आणि मला त्यात प्रवेश मिळाला. त्या संपर्कातून मला अलीकडेच अच्युतरावांवरील दोन लेख वाचायला मिळाले. त्यातला एक प्रा.स.पां.देशपांडे यांनी विवेक साप्ताहिकाच्या महाराष्ट्र नायक या श्रुंखलेसाठी लिहिला आहे आणि दुसरा लेख उल्का कळसकर यांनी सकाळ वर्तमानपत्राच्या सप्तरंग पुरवणीसाठी लिहिला आहे. हे लेख वाचून आतापर्यंत मला नसलेली त्यांच्या कार्याविषयी बरीच माहिती मिळाली आणि अच्युतराव आपटे यांच्या विषयी माझ्या मनात लहानपणापासून असलेला आदर अनेकपटींनी वाढला. 'दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती' या कवितेप्रमाणे मी मनोमनी दोन्ही हात जोडून त्यांना  प्रणाम केला.

श्री.अच्युतराव आपटे यांनी १९४२ सालच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना कारावास घडला होता.  तुरुंगातून सुटल्यावर ते बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेले आणि डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेसॉन फील्ड्स’ या भौतिकशास्त्रातल्या विषयावर संशोधन करू लागले. पुढे त्यांनी पीएच.डी. पदवी मिळवली. मात्र स्वतंत्र गणिती संशोधनास वाहून घेण्याची प्रज्ञा असताना, १९४९ सालापासून खडकवासला येथल्या भारत सरकारच्या केंद्रीय जलविद्युत संशोधन संस्थेच्या गणित विभागात संशोधन अधिकारीपदाची त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली, ती १९७९ साली संगणक विभागप्रमुख म्हणून पायउतार होईतो, त्यांनी समर्थपणे निभावली. तीस वर्षांच्या या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी समस्यांची उकल करण्यासाठी अथक प्रयत्न करून अच्युतरावांनी गणिती प्रतिकृतीच्या (मॅथेमॅटिकल मॉडेल्स) अनेकविध प्रणाली निर्माण केल्या. त्यांपैकी काही तर आव्हानात्मक होत्या. अशा गणिती प्रतिकृती विकसित करून संशोधनाच्या या क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रगतीचा भारत सरकारने गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

 केंद्रीय जलविद्युत संशोधन संस्था (सीडब्ल्यूपीआरएस) हे मुख्यत्वे सिव्हिल इंजिनियरिंगचे संशोधन केंद्र आहे, पण डॉ.अच्युतराव आपटे यांनी तिथे गणितामधील  ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करून गंगा, ब्रह्मपुत्रा वगैरे नद्यांमधील जलप्रवाहांच्या मोजमापांमधल्या किचकट समस्या सोडवल्या आणि महापुरांचे नियंत्रण व कोलकाता शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा असे महत्वाचे लोकोपयोगी प्रकल्प यशस्वी केले. कोयना धरणाच्या आसपास आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे मूळ आलेख मिळवून त्यांचे विश्लेषण करण्यातही त्यांनी आपले कौशल्य दाखवले.

हे शास्त्रीय काम करत असतांनाच अच्युतराव समाजकार्याकडे वळले. ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’, ‘इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन’ आणि ‘फ्रेंच मित्र मंडळ’ ही त्यांची तीन सामाजिक अपत्ये. शिक्षणाची इच्छा असूनही गरिबीमुळे ग्रमीण भागातल्या असंख्य मुलांना शहरात राहण्या-जेवण्याच्या सोयीअभावी शिक्षण सोडावे लागते. हे जाणून १९५६ साली विद्यार्थी साहाय्यक समितीची स्थापना करून अच्युतरावांनी विद्यार्थ्यांची अल्पदरात ही सोय केली. उत्तम संस्कार, व्यक्तिविकासाबरोबर श्रमशक्तीची जाणीव करून देताना समितीच्या मनात ना उपकाराची भावना ना विद्यार्थ्यांच्या लेखी लाचारीची, असे वातावरण ठेवले.  अशाच प्रकारे मनुष्यबळातली गुंतवणूक (इन्व्हेस्टमेन्ट इन मॅन) ही दुसरी सामाजिक संस्था, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील ग्रामीण परिसरात, फुगेवाडी येथे अच्युतरावांनी काढली. तेथे निराधार बालकांवर सुसंस्कार करण्यासाठी बालसदन, नरसी मोनजी तंत्रशाळा उभारण्याबरोबरच ग्रमीण भागातील तरुणांना शेती, दुग्धव्यवसाय, छपाई व इतर औद्योगिक व्यवसायांतले कसब आत्मसात करण्याचे प्रशिक्षण देण्याची ही व्यवस्था केली. त्यांतून अनेकांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध झाले. दोन्ही संस्थांत अच्युतराव निर्मळ वृत्तीने विश्वस्त राहून, संस्थांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याबद्दल दक्ष असत. त्याशिवाय संत ज्ञानेश्वरमहाराजांनी दिलेल्या ‘हे विश्वचि माझे घर’ या संदेशानुसार सन १९६७ मध्ये त्यांनी ‘फ्रान्स मित्रमंडळ’ची स्थापना केली.  या मंडळातर्फे दरवर्षी काही काळ भारतीय नागरिक फ्रान्समध्ये, तर फ्रेंच नागरिक भारतामध्ये ठेवणे अशी आखणी होऊन आजवर हजारो नागरिकांना परस्परांच्या देशांतल्या समाजजीवनाचा परिचय झालेला आहे.

अच्युतरावांची राहणी महात्मा गांधीजींप्रमाणेच साधी होती. नीतितत्त्वांचं आचरण व सेवाभाव त्यांच्या ठायी होता. ग्रामीण भागाची, तिथल्या माणसांची दुःखं तळमळीनं जाणून घेणारा समाजसेवक अशीच अच्युतरावांची ओळख होती. अनाचार, भ्रष्टाचार आदी बाबींपासून ग्रामीण भागातला विद्यार्थी मुक्त असावा, त्याला राजकारणापेक्षा विद्याव्यासंगात आनंद मिळावा, त्यानं नीतीमूल्यं मानून आपला विकास करावा, अशी तळमळ अच्युतरावांना होती. त्यांना कुणी ‘समाजवादी विचारवंत’,  कुणी ‘गांधीवादी समाजसेवक’ म्हणत असत; परंतु ते ‘समतावादी समाजशिक्षक’ होते . सर्वांबद्दल प्रेम बाळगून व काही मूल्यं उराशी बाळगून विचार करणारे ते ‘आचारवंत’ होते.

असे हे आमच्या गावाचे भूषण असलेले डॉ.अच्युतराव आपटे होऊन गेले. त्यांचे कार्यक्षेत्र पुण्यात होते आणि ते पुण्याचेच रहिवासी होते, पण त्यांना भेटण्याचा योग जुळून आला नाही किंवा मी त्यासाठी काही विशेष प्रयत्न केले नाहीत याची खंत मनात राहील.

No comments: