Tuesday, September 20, 2022

आमची सिंधूताई

 


सिंधूताई ही माझी सर्वात मोठी बहीण आणि मी तिचा सर्वात धाकटा भाऊ. सिंधूताई आमच्या आईवडिलांचे पहिले अपत्य आणि आजीआजोबांचे पहिले नातवंड. ती गोरी पान, चुणचुणित आणि  रूपाने सुरेख, स्वभावानेही गोड आणि लाघवी होती. त्यामुळे तिचे लहानपणी घरात भरपूर लाड आणि कौतुक झाले असणार. ती शाळेत शिकत असतांनाच तिला महादेवरावांनी मागणी घातली आणि ते स्थळ फारच चांगले आहे हे पाहून तिचे थाटात लग्न करून दिले गेले. तेंव्हा माझा जन्मही झाला नव्हता. मला समजायला लागल्यापासून एवढे माहीत झाले होते की त्यांचा गोकाक नावाच्या गावात मोठा वाडा होता आणि निपाणी नावाच्या गावात एक सिनेमाचे थेटर होते. ताई जेंव्हा माहेरपणाला येत असे तेंव्हा घरात खूपच उत्साहाने आणि आनंदीआनंदाने भारलेले वातावरण असायचे.

सगळे चांगले चालले असतांना एक दिवस सकाळीच तारवाला पोस्टमन एक वाईट बातमी घेऊन आला. तो दिवस मला अजून आठवतो. महादेवरावांना हार्टफेल झाला असे त्या तारेत लिहिले होते. आमची आई तर एकदम पार गळून गेली आणि घरातल्या सगळ्यांची रडारड सुरू झाली. कुणीतरी धावाधाव करून सर्व्हिसची गाडी आणली आणि आईला निपाणीला घेऊन गेले. ती परत येतांना सिंधूताई आणि तिच्या मुलांना आपल्याबरोबर जमखंडीला घेऊन आली. पण या वेळी मात्र सर्व घर शोकाकुल झाले होते.

हळूहळू ताईने स्वतःला सावरले, शाळेच्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि एक्स्टर्नल स्टूडंट म्हणून एसएससी परीक्षेचा फॉर्म भरून ती चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झा्ली. त्याबरोबर हिंदीच्या एक दोन परीक्षाही देऊन ती सर्टिफिकिटेही घेतली. त्यानंतर मिरजेला राहून एसटीसी आणि सीपीएड असे दोन कोर्स एकदम केले आणि शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली. मग ती सोडून सोलापूरला दुसरी नोकरी धरली. मी यातली कुठलीच गावे पाहिली नव्हती कारण त्या काळात अत्यावश्यक असेल तरच प्रवास केला जात असे. पण ही मंडळी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जमखंडीला येत असत तेंव्हा बोलण्यात त्या गावांची सगळी माहिती येत असे.

ताई आमच्याबरोबर असतांना सगळ्यांची खूपच प्रेमाने विचारपूस करत असे, आमच्याशी गप्पा मारत असे, आमची थट्टामस्करी करत असे, आमच्याबरोबर पत्ते खेळत असे, आम्हाला कोडी घालत असे, आमच्याकडून गाणी म्हणवून किंवा नकला वगैरे करवून घेत असे आणि त्यांचे तोंडभर कौतुक करत असे, प्रसंगी समजूत घालत असे, धीर देत असे. काही वेळा वादविवाद किंवा वितंडवादही झाले तरी ती बरीच मोठी असल्यामुळे त्यातून भांडण मात्र कधीच झाले नाही. माझ्या आईवडिलांच्या आणि माझ्या वयात जास्त अंतर असल्याने आमच्यामध्ये थोडा जास्तच जनरेशन गॅप होता. ताई मात्र मनाने माझ्या फारच जवळची झाली होती.

मी कॉलेजला मुंबईला गेलो तेंव्हा ताई सोलापूरला स्थायिक झाली होती. जमखंडीहून मुंबईला जाण्यासाठी कुडची स्टेशनपर्यंत बसने जाऊन पुढे रेल्वेने जाणे हा मुख्य मार्ग होता आणि मी पहिल्यांदा जातांना तसाच गेलो होतो, पण सुटीसाठी घरी जातांना मात्र वाट थोडी वाकडी करून आधी सोलापूरला ताईला भेटायला गेलो आणि नंतर पुढे विजापूरमार्गे जमखंडीला गेलो. त्या वेळी आईपासून पहिल्यांदाच दूर राहिल्यानंतरही ताईला भेटायची ओढ जास्त प्रबळ होती. त्यानंतरही मी बहुतेक वेळा सुटी लागल्यावर आधी ताईकडे जाऊन थोडे लाड करून घेतल्यानंतर जमखंडीला जात होतो.

ताईचे सोलापूरचे घर आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. कसबा या गजबजलेल्या भागातल्या मुख्य रस्त्यावर त्या घराचा मोठा दरवाजा होता, पण आत आल्यानंतर लांबलचक पॅसेजमधली तीन दारे पार करून गेल्यानंतर एक लहानसे अंगण होते आणि त्याच्या पलीकडे समोर ताईच्या घराची एक खोली होती. तिच्या डाव्या बाजूला लहानसे स्वयंपाकघर आणि उजव्या बाजूला एक लहानशी खोली होती ती अर्धी सामानाने भरली होती. असे आकाराने छोटे घर असले तरी ताईचे मन खूप मोठे होते. तिने आपुलकीने खूप माणसे जोडून ठेवली होती, त्यामुळे तिच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची बरीच वर्दळ असायची. 

तिच्या परिचयांमधूनच माझ्या दोन मोठ्या भावांची लग्ने जमली आणि सोलापुरात झाली. त्या लग्नाला आलेल्या सगळ्या नातलगांची रहायची सोय ताईने त्या जागेत आणि वाड्यात केली. त्या वाड्याची मालकीण आणि इतर बिऱ्हाडकरू हे सगळेजण नेहमीच ताईच्या मदतीला तयार असत इतके प्रेमाचे संबंध तिने जुळवून ठेवले होते. माझ्या त्या दोन्ही वहिनींच्या माहेरच्या लोकांशी ताईने अगदी निकटचे संबंध जोडले होते, ते पुढच्या पिढीतही टिकून राहिले आहेत. माझ्या वडिलांच्या शेवटच्या आजाराच्या वेळी त्यांना सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये ठेवले होते आणि त्यांनी आशा सोडल्यानंतर त्यांचे अखेरचे दिवस त्याच घरात गेले. तेंव्हाही बरीच नातेवाईक मंडळी तिथे गोळा झाली होती. 

मी नोकरीला लागलो तेंव्हा माझे इतर सहकारी दरवर्षी महिनाभर अर्न्ड लीव्ह घेऊन आपापल्या होमटाउनला आईवडिलांकडे जात असत आणि जिथे ते लहानाचे मोठे झाले त्या त्यांच्या घरी राहून येत असत. आमचे वडील गेल्यानंतर मला असे होमटाउन राहिले नव्हते. वीकएंडला जोडून एकादी सुटी आली की मी पटकन एका झोळ्यात दोन कपडे कोंबून निघत असे आणि सरळ सोलापूरला जाऊन थडकत असे. त्या काळात फोनची सोय नव्हती, त्यामुळे आधीपासून सांगायची किंवा विचारायची सुविधा नव्हतीच. पण वेळी अवेळी केंव्हाही गेलो तरी ताई माझे अत्यंत प्रेमाने स्वागत करत असे. मी अगांतुक गेलो असलो तरी तिच्यासाठी मी पाहुणा नव्हतो, तिने मला तेवढा हक्क दिला होता आणि मी तो  निःसंकाचपणे बजावत होतो. पुढे मी लग्न करून संसाराला लागल्यानंतर असे जाणे कमी झाले. पण मला ऑफिसच्या कामासाठी अनेक वेळा हैद्राबादला जावे लागत असे. तिथून परत येतांना वाटेत सोलापूर स्टेशन आले की मी कधीकधी उतरून जात असे आणि ताईला भेटून काही तासांनी दुसऱ्या गाडीने पुढे जात असे. 

एकदा आम्ही एका बारशासाठी पुण्याला गेलो होतो आणि तो कार्यक्रम झाला की लगेच परत जाणार होतो, म्हणून काही कपडे नेले नव्हते. तिथे ताईही आली होती. तिने सांगितले की तिच्या मुलीचा साखरपुडा एक दोन दिवसांनी करायचे ठरले आहे आणि त्याला आम्ही यायलाच हवे.  मला तर ऑफिसला दांडी मारणे शक्यच नव्हते, पण पत्नी आणि मुलाला ती आपल्याबरोबर सोलापूरला घेऊन गेली.  तिथे गेल्यावर आठवडाभरात लग्नसमारंभ करून टाकायचा असे ठरले.  त्या वेळी माझ्याकडे फोनही नव्हता.  कसा तरी माझ्यापर्यंत निरोप पोचला आणि मी सर्वांचे कपडे घेऊन तिथे गेलो. 

घाईघाईत ठरलेल्या त्या लग्नासाठी कुठले मंगल कार्यालय मिळाले नव्हते. एक हॉल भाड्याने घेतला आणि आचारी, वाढपी, भटजी, वाजंत्री, भांडीकुंडी, स्वैपाकासाठी लागणारे सामान वगैरे सगळ्यांची व्यवस्था आमच्या कर्तबगार ताईने आणि तिच्या वीसबावीस वर्षाच्या मुलाने न डगमगता शांतपणे फक्त चार पाच दिवसात केली, शिवाय आलेल्या पाहुण्यांचीही सोय केली. आम्ही लोक मदतीला होतो, पण बाहेरगावाहून आलेले लोक अशी किती मदत करू शकणार होतो ? सगळ्यांसाठीच तो एक संस्मरणीय अनुभव होता.

मुलीचे शिक्षण आणि लग्न झाले आणि मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन तो डॉक्टर झाला. त्यानंतर सोलापूरला रहायचे विशेष प्रयोजन राहिले नाही म्हणून तिने नोकरी आणि ते गाव सोडले आणि ती  मुलासह गोकाकला रहायला गेली. मला कामाच्या वाढत्या व्यापामुळे वेळ मिळत नव्हता आणि मुंबईहून गोकाकला जाणे येणे एवढे सोपे नसल्यामुळे तिला वरचेवर भेटायला जाणे मला जमत नव्हते. पण परिवारातल्या कुणाकुणाच्या लग्नसमारंभांमध्ये आमच्या भेटी होत राहिल्या.  ताई आता फिरायला मोकळी असल्यामुळे कधी मुलाकडे, कधी मुलीकडे जाऊन रहात असे, तर कधी एकाद्या भावाकडे तिचा चार दिवस मुक्काम असे. 

ती एकदा माझ्याकडेही आली होती आणि दहा बारा दिवस राहिली होती.  सतत काम करत रहायची सवय असल्यामुळे तिला स्वस्थ बसून राहणे अस्वस्थ करायचे, पण आजकाल घरातली सगळी कामे सोपी करणारी यंत्रे असल्यामुळे आमच्याच हातांना जास्त काम नव्हते आणि ती यंत्रेही तिच्या ओळखीची नव्हती. फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारीपाजारी जरा दूर दूरच असतात आणि त्यात ते सगळे परभाषिक होते. त्यामुळे नवीन ओळखी करून घेणे कठीण होते. पोथ्यापुस्तके वाचत आणि टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम पहात ती वेळ घालवत होती. पण तेवढ्या दिवसात तिने माझ्या मुलांना मात्र आपला चांगला लळा लावला होता.

माझ्या मुलाचे लग्न नाशिकला झाले त्यावेळी योगायोगाने ताई नाशिकलाच तिच्या  मुलीकडे रहायला आली होती.  त्याचा आम्हाला आनंद झालाच, तेंव्हा सर्वांना भेटून तिलाही खूपच आनंद झाला. तिला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली होती म्हणून एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही तिचा नावापुरता छोटासा सत्कार केला. त्या वेळी तिची तब्येत छानच दिसत होती.  ती चांगली हिंडत फिरत होती. ही आमची शेवटची भेट असेल अशी पुसटशी कल्पनाही आली नव्हती. पण नंतर ती गोकाकला मुलाकडे गेली. तिथे असतांना एक दिवस देवासमोर बसून काही प्रार्थना करत असतांना तिने अचानक डोळे मिटले. असा विनासायास अंत होण्यासाठीसुद्धा मोठी पुण्याई लागते म्हणतात. अशा आमच्या प्रेमळ सिंधूताईच्या स्मृतीला शतशः प्रणाम.


No comments: