Tuesday, June 23, 2020

माझ्या आदरणीय आईच्या रचना

नमस्कार.
माझ्या आईने सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी लिहिलेली कवने मी या भागामध्ये सादर करीत आहे. माझे वडील त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात मोठे असल्यामुळे त्यांचे भाऊबहिणी त्यांना 'दादा' म्हणत असत आणि माझ्या आईला 'वहिनी' असे संबोधित असत. आमच्या एकत्र कुटुंबातले सगळेचजण त्यांना दादा, वहिनी म्हणायला लागले आणि बोलताबोलतांना वहिनीचा 'वैनी' असा अपभ्रंश झाला. त्यामुळे मला बोलता यायला लागल्यापासून मी माझ्या आईला 'वैनी' असेच म्हणत आलो.

माझ्या आईचे जास्त शालेय शिक्षण झाले नसले तरी तिला वाचनाची प्रचंड आवड होती, त्यातही विशेषतः धार्मिक वाङमयाची तिला खूपच गोडी होती. वाचन करता करता तिला आपणही काही जुळवावेसे वाटायला लागले आणि आमच्याकडून जुन्या वह्यांमधले पाटकोरे कागद मागून घेऊन ती त्यावर आपल्या रचना लिहून ठेवायला लागली. यातले बरेचसे कागद हरवून गेले असतील, पण कालांतराने कुणीतरी त्याची एक वही केली आणि त्यात लिहून ठेवलेल्या रचना शिल्लक राहिल्या. तिच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी म्हणजे काँप्यूटरचा उपयोग सुरू झाल्यानंतर माझे थोरले बंधू धनंजय याने काही रचना टाइप करून 'लक्ष्मीचा विसावा' या नावाने पीडीएफ फॉर्मॅटमध्ये संग्रहित केल्या.  आज मी त्या रचना या ब्लॉगच्या माध्यमातून सर्व इच्छुक वाचकांसाठी प्रकाशित करीत आहे. सुरुवातीला वैनींची त्रोटक माहिती आणि माझ्या वहिनीने लिहिलेली प्रस्तावना दिली आहे.

आनंद घारे 












****************************************


   कै. वैनींची वैयक्तिक माहिती

जन्म : शालिवाहन शके १८३० (ख्रिशताब्द १९०८)
विवाहोत्तर नाव : लक्ष्मीबाई बाळकृष्ण घारे
विवाहपूर्व नाव : भीमाताई रानडे
टोपणनावे : सासरी : वैनी, थोरल्या वैनी, आजी, दाजी
                माहेरी : भीमाताई, बाईमावशी
विवाह : शालिवाहन शके १८४२ (ख्रिशताब्द १९२०) 
प्रथम अपत्य : कन्या रत्न (सिंधू) (ख्रिशताब्द १९२७)
अंतिम अपत्य : पुत्ररत्न (आनंद) (ख्रिशताब्द १९४५)
इतर अपत्ये : प्रभाकर (१९३१), श्रीरंग - श्रीपाद (जुळे भाऊ १९३३), भालचंद्र (१९३६), धनंजय (१९४३)
शिक्षण (शालेय) : इयत्ता ३री पर्यंत
भाषा ज्ञान (अशालेय) मोरोपंत - वामन पंडितांपासून ज्ञानेश्वरी दासबोधापर्यंत सर्व ग्रंथांचे, त्यातील काव्यपंक्तींचे संधी समास सोडवून सहजपणे अर्थ समजावून सांगत असत.
वास्तव्य : बाल्यावस्था :-खांडवा (मध्य प्रदेश) व जमखंडी (कर्नाटक)
शैशव : जमखंडी व सावळगी
तारुण्य : जमखंडी, कुन्दगोळ, शिरवडे
पोक्त व वार्धक्य : जमखंडी, बार्शी, पुणे, मुंबई, जबलपूर, बंगलोर व गोकाक येथे आळीपाळीने वा गरजेनुसार
देहावसान : बंगलोर चैत्र कृष्ण १४ शके १९०६ (२९ एप्रिल १९८४)
 
  ------------------------  =================  ---------------------
     लक्ष्मी वंदना
   
  कै.लक्ष्मी घारे  या माझ्या सासूबाई. १९७१ साली माझे लग्न झाले. तेंव्हा पासून १९८४ च्या एप्रिल पर्यन्त त्या अनेक वेळा  आमचेकडे येऊन राहिल्या.
   त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व शांत  चित्त होता.  त्यांना मराठी  संत साहित्याची वा हिन्दी अनुवाद सहित पौराणिक ग्रन्थांची आवड होती. असे आध्यात्मिक भक्ति पर वाचन वा  स्वत:ला स्फुरणारे लेखन करण्यात  त्यां खूप वेळ घालवीत असत. त्यांनी मलाहि भजन करायला  शिकवले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटशेवटच्या काळातील त्यांची वागणूक व ज्या प्रकाराने त्यांनी त्यांच्या इच्छामरणीत्वाची सिद्धी प्राप्त झाल्याचे उदाहरण आम्हाला दाखवून दिले त्यावरून त्यांच्या त्या काळातील 'आत्म'स्थितीची गणना 'मुक्तसम' प्रकारात केली तर अतिशयोक्ती होणार नाही.
  १)योग:स्थ कुरु  कर्माणि (कामावर ध्यान  देऊन, लक्ष केन्द्रित करून काम करणे ),
  २)समत्वं योग उच्चते (सिद्धि  वा असिद्धि अर्थात् यश वा अपयश  यांच्या प्राबल्यतेवर  अवलंबून आपल्या प्रयत्नांच्या कष्टात कमी जास्त  न करता सतत अत्यंत प्रामाणिकपणाने  काम करीत राहणे),
  ३) योगः कर्मसु कौशलम्  (आपल्याला प्राप्त झालेल्या कौशल्याच्या शिखरावर स्थित राहून प्रत्येक काम उत्कृष्टपणे  करण्याचा प्रयत्न करणे ) आणि
  ४) संगं त्यक्त्वा  कुरु कर्माणि (म्हणजे फक्त कुसंग टाळूनच नव्हे तर कधीही कुठलाही नेमधर्म वा सत्संग चुकला तरीहि  त्याचीहि हळहळ वा खंत मनात न बाळगता उत्साहाने  काम करीत राहणे )
  या भगवद्गीता प्रणीत कर्म योग्य प्रकारे करण्याच्या साधन चौकटीप्रमाणे प्रत्येक कर्म आपल्या हातून शक्य तेवढ्या कौशल्याने कसल्याही प्रकारच्या त्याच्या फलाबद्दल अपेक्षा न ठेवता, त्या कामात अगदी रमून जाऊन, त्यात तल्लीन होऊन करण्याची व त्याचे फल 'दैवी प्रसाद' (वा आशीर्वाद ) मानून ते कार्यफळ सर्वांशी वाटून घेऊन 'नंतर उरेल तेवढे स्वत:' समाधानाने घेण्याची वृत्ती त्यांच्यात सहज मुरलेली होती.

  संतांची जी मुख्य लक्षणे समजली जातात (उदाहरणार्थ ईश्वरभक्ती, कवित्व, सदैव  समाधानी वृत्ती, दया, क्षमा, शांती वगैरे ), ती सर्व मला  त्यांच्यात प्रामुख्याने जाणवत होती. अशा सत्पुरुषांचा संग मिळणे ही खरोखरच अमोल संधी व दुर्लभ योगायोग होय. त्याचा मला थोडा तरी लाभ झाला याबद्दल मी देवाची चिरकाल ऋणी आहे.

सौ. मंजिरी (सुनंदा) धनंजय घारे   


*******************

 
  ------------------------  =================  ---------------------
  लक्ष्मीकृत वाग् - विलास : आरत्या
------------------------------
 १ . आरती तिरुपति व्यंकटेशाची
  
  भक्त वत्सला, व्यंकटेश प्रभु, नमिते तव चरणा,
देवा,  नमिते तव चरणा,
  ओवाळीते आरति तुजला,  पद्मावति रमणा ||धृ ||

  व्यंकट गितिवरि भव्य  मंदिरी, शोभे तव मूर्ती,
देवा, शोभे तव मूर्ती
  ध्वज वज्रांकुश पद कमली तव, नूपुर रुणझुणती  |
देवा, नूपुर रुणझुणती  |
  कटीसि शोभे रत्न मेखला, पीताम्बर कसिला,
कासे, पीताम्बर कसिला,
  नवरत्नांचा मुकुट मस्तकी, कंठी वनमाला  (१)

  कर्णि कुण्डले  झळकति दण्डी, वाकि बाजुबंद 
दण्डी, वाकि बाजुबंद |
  ध्यान असे हे हृदयी  स्मरता वाटे  आनंद
मनाला,  वाटे आनंद |
  भवाब्धि मधुनी पार करी मज,  येऊ  दे करुणा |
देवा, येऊ  दे करुणा !
  त्रिविध काल-गुण-देहातीता, नमन तुझ्या चरणा (२)

  शाम सावळे  रूप मनोहर, पाहुनिया तुजला
देवा, पाहुनिया तुजला !
  भुलली पद्मावति तव कण्ठी घाली वरमाला
देवा, घाली वरमाला
  अष्टैश्वर्ये नटलासी प्रभु, काय वर्णु थाट !
तुझा प्रभु, काय वर्णु थाट !
   प्रिय भक्तास्तव  निर्मिलेस तु  गिरिवरि वैकुण्ठ (३)

  चांदीच्या समयांत तेवती  दीपहि  ते बहुत
देवा, दीपहि  ते बहुत |
  सुवर्ण शिखरांवरि सोन्याचे कळस झळकतात
सोन्याचे, कळस झळकतात |
  अपार वैभव,  अगम्य लीला  वर्णवेन कवणा 
लीला,  वर्णवेन कवणा !
  एक मुखे मी काय वर्णु तुज, शरण तुझ्या चरणा
लक्ष्मी,  नमिते  तव चरणा  (४)

भक्त वत्सला, व्यंकटेश प्रभु, नमिते तव चरणा,
देवा,  नमिते तव चरणा,
  ओवाळीते आरति तुजला,  पद्मावति रमणा !
पद्मावति रमणा !   पद्मावति रमणा !!!
 
  ------------------------  =================  ----------------------

२. आरती जिवती मातेची

जय देवी जय देवी जय जीवंतीके
आरती तुजला मी करिते अंबीके
               जय देवी, जय देवी     ।।ध्रु।।

संतति विरहित कष्टी, राजाची कांता
चोरुनि सुईणी-करवी आणवी द्विजपुत्रा
बालक विरहे व्याकुळ, बाळाची माता
सुत सुखी ठेवी म्हणुनी,  विनवीते माता  ।।१।।

पुत्रास्तव द्विजभार्या आचरि तव व्रता
बाळा पाहुनि प्रेमे  उधळी  अक्षता
तव सत्तेने पडली बाळाच्या माथा
ऐसा हा तव महिमा, न च ये वर्णीता     ।।२।।

सद् भावे निज निष्ठे, करिता तव व्रत
मातेशी सुत भेटे,  राजगृहात
अति आदरे जनकाशी, बोलावुनि आणितं
आनंदी आनंद सर्वांशी होतं                   ।। ३।।


**************************************

३. दामाजीपंत कथानक (१)

  "श्रीकृष्ण - सुदामा" या पौराणिक  आख्याना प्रमाणेच "दामाजीपंत - विठू महार" हे आख्यान संत वाङ्मयात  अत्यंत लोकप्रिय  झालेले आहे. जुलमी व सत्तेच्या नशेने  अंध झालेल्या  राजकर्त्यांच्या हाताखाली काम करणे नशीबाने  प्राप्त झाले असता, घोर दुष्काळी परिस्थितीत, दामाजीपंतांनी स्वत:च्या जीवावर खेळून, तत्कालीन  "जनता जनार्दनाचे भूकबळी वाचवण्याचा आदर्श प्रयत्न केला" तो अत्यंत स्तुत्य आहे. "झाला महार पंढरिनाथ" हे भावगीत एके काळी  अत्यंत लोकप्रिय  झाले होते.
------------------- -------------
शिवसुता करुनि वंदन, शारदेसि नमन, विठ्ठला स्मरुन,
 नमुन संतासी, नमुन संतासी 
श्रोत्यासि जोडुनी करा, गाते कवनासी 

कलियुगी, सखा श्रीहरी, बौद्ध रुप धरी, करी चाकरी
कशी हो दासांची, कशी हो दासांची
ऐका हो मनोरम कथा देव-भक्तांची  ।।ध्रु।।

मंगळवेढे गावात, दामाजीपंत, नोकरी करीत
बादशहाची, बादशहाची
अंतरी उसळे परी लाट भक्ती प्रेमाची 
पतिपत्नी, दोघे पवित्र, दिलाने ऊदार, मनाचे फार,
दयाशिल वृत्ति, दयाशिल वृत्ती 
निशिदिनी तयांच्या, ध्यान प्रभूचे चित्ती
   पर्जन्य पडेना देवऽऽ क्षोभला
  दुष्काळरूपाने काळऽऽ पातला
  कोणासि मिळेना अन्नऽऽ खावया
कळकळति, जीव तळमळति, अन्नाविण मरति
   चिंता पोटाची, चिंता पोटाची
  ऐका हो मनोरम कथा देव - भक्तांची  ।।

कोठार भरले धान्याचे, बादशहाचे, रक्षक त्याचे,
     दामाजीपंत, दामाजीपंत
     हा प्रकार बघुनीऽ, खिन्न होति चित्तात
निज मनी, करिति विचार, धान्य कोठार, लुटवावे सारे
जीव जगवावे, जीव जगवावे
निज देहावरचेऽऽ, प्रेम आज सोडावे
   मग बेत मनीचा, स्त्रियेशीऽ सांगती
   मनि भिऊ नको तू, ऐसेऽऽ  बोलती
  एक दिनी देह जायचाऽऽऽ निश्चिती
असे वदुनि, त्वरित ऊठले, धान्य लुटविले, जना सुखविले
खाण प्रेमाचि, खाण प्रेमाची
ऐका हो मनोरम कथा देव-भक्तांची ।।२।।

गांवी एक, होता दुर्जन, खलिता लिहून, दिला धाडूऽन
बादशहासि, बादशहासी 
जाहले सकलहीऽऽऽ  वृत्त कळविले त्यासी
 प्रऽऽदिप्त, अग्निमधे घृतऽऽ, घालिता बहुत,
वाढवी ज्वाला, वाढवी ज्वाला
त्यापरी राव तोऽऽऽ, क्रोधे तप्त जाहला
   दिला हुकूम सेवकाहातीऽऽऽ, सहि करून,
   दामाजीपंतांना, आणाऽऽ हो धरून
   जाति सेवक, मुजरा रावाऽऽसी  करून  
दामाजीच्या, द्वारि  दुत येती, हुकुम दाविती, पंता नाही भीती,
मूर्ति धैर्याचि, मूर्ति धैर्याची,
ऐका हो मनोरम कथा देव-भक्तांची ।।३।।

मग पंत, सेवका वदति, एक विनंति, करा मान्य ती,
    इच्छा मम  हेचि, इच्छा मम  हेचीऽऽ 
   पाहु द्या मला होऽऽऽ, माय माझि  पंढरिची
अंतःकाळ, जवळि पातला, सख्या विठ्ठला, भेटवा मला
  आंस हृदयाचि, आंस हृदयाचीऽऽ
राम रहिम एक हीऽऽऽ, वाणि ऐका कबिराचीऽऽ 
   या परी राजदूतातेऽऽऽ, सांगती
   जावया निरोपऽ  कांतेशीऽऽऽ, मागती   
   जाहली सतीची कैसीऽऽऽ, हो स्थिती
तो काऽऽऽल, रूपीऽऽऽ यवनऽऽऽ, घेइ पतिप्राण, एक प्रभूविणंऽऽऽ,
मुक्तता कैचि, मुक्तता कैची ऽऽऽ ?
ऐका हो मनोरम कथा देव-भक्तांची ।।४।।

घेउनी, प्रभूऽचे नाम, त्यजूनी धाम, पंत निष्काम 
होउनी निघति, होउनी निघतीऽऽऽ,
त्या राजदुतांच्याc, सवे पंढरिसि येती
पाहताऽऽऽ, प्रभूची मूर्ति, मनी गहिवरति, अश्रुंनीऽऽ धूति
  प्रभूऽ  पद कमला, प्रभू पद कमलाऽऽऽ,
हा दीन दास कां सख्या दूर लोटियलाऽऽ ?
     मातेसि त्यजूनीऽऽऽ. बाळ न जाई दुरी
     तैसीच जाहलीऽऽऽ,  दामाजीची परी,
     पण राजसेवका ऽऽऽ, धीर नसे पळभरी,
मग हांका, मारिती भारि, आले बाहेरी, झालि तैयारी
       पुढे जाण्याचि, पुढे जाण्याची ऽऽऽ,
ऐका हो मनोरम कथा देव-भक्तांची ।।५।।

नवनिताऽऽऽ हूनिही मृदुल, प्रभू  हृत्कमल, झाले उतांवीळ,
भक्त कैवारि, भक्त कैवारीऽऽऽ,
सोडला पितांबर, मुकुट ठेवला दुरीऽऽऽ
लंगोटि घातली बरी, घोंगडि खांद्यावरी, काठि करि धरी
वेष हा बघुनि, वेष हा बघुनीऽऽऽ,
हांसता भागल्याऽऽऽ  माता राइ - रुक्मिणीऽऽऽ
    सिंहासनि रावऽऽ, यवनांचा बैसला,
    महाराच्या वेषेऽऽऽ, प्रभु तेथे पातला,
    ब्रह्मयाचा बापंऽऽऽ,  करि मुजरा रावांला
ओतली, रुप्यांची थैलि, कारकुन मंडळी, मोजाया बसली
    भागले हो हात, भागले हो हातऽऽऽ 
    आश्चर्य वाटलेऽऽऽ, झाले सकल विस्मितऽऽऽ
बादशहा, वदति महारासि, "दामाजी तुजसि, देतो पगारासि,
    काय ? सांगावे, काय ? सांगावेऽऽऽ
    दुप्पट देइन मी तुजसि, इथे त्वां रहावे"
    श्रीहरी राजयासी त्याऽऽऽ सांगतीऽऽ
    "एक 'लक्ष' देति, दामाजीऽऽऽ मज प्रतीऽऽऽ
    मजवरी तयांचीऽ,  आहेऽऽऽ  बहु प्रीतीऽ
झालि ना, रकमं पोचतीऽऽ? द्यावि पावती, गर्दि मज अती
  असे हो कामाऽऽचि, असे हो कामाची ऽऽऽ"
ऐका हो मनोरम कथा देव-भक्तांची ।।६।।
 
शिक्का मोर्तब, पावती बरी, करुनि सत्वरी, प्रभूच्या करी
   देति लवलाहि, देति लवलाहीऽऽऽ
   पुनरपी करुन जोहार गुप्त हरि होई
बादशहा, जाहले वेडे, पाहुनि चहुकडे, चैन ना पडे
   विठूऽऽविण मजला, विठूऽऽविण मजलाऽऽऽ 
   सन्मानुनि आणा, सत्वर दामाजीऽलाऽऽऽ
     राजदूतांसंगेऽऽ,  दामाजीऽऽऽ येतसेऽ
     दर मजल, मजल  नित त्यांचीऽऽऽ होतसेऽ
     जल स्वच्छ बघुनीऽऽऽ  स्नानाते करितसेऽऽऽ
संध्या करुनि, पोथि वाचती, मिळे पावती, मुद्रा त्यावरति  
असे हो रायाऽचि, असे हो रायाचीऽऽऽ,
ऐका हो मनोरम कथा देव-भक्तांची ।।७।।

राजदूत, जवळि पातले, हात जोडिले, नमति पावले,
    बोलती वचना, बोलती वचनाऽऽऽ
    "पालखीत बसूनीऽ , यावे राज दर्शनाऽ"
तूऽमचाऽऽऽ, सर्वही पैका, पोचला निका, पावती देखा,
  घेउनि विठु गेऽऽला, घेउनि विठु गेऽऽलाऽ
  वचन हे ऐकताऽऽ, पंत मनी उमगलाऽ
     रावासि भेटले पंतऽऽऽ जेधवा,
     "विठु धेड कुठे?" वदे रावऽऽ, "दाखवाऽ"
     आले पंढरीऽ पुरीऽऽ, पाहतीऽऽ माधवाऽ,
वदे राव, "असे ही मूर्त, रमे ना चित्त, बोलवा त्वरित,
     विठू महार, विठू महाऽऽरऽऽ 
  भर दरबारात ज्यानेऽऽऽ, येउनि केला जोहारंऽऽ"
सद्गदित, दामाजीपंत, नेत्रि वाहाऽत
    धार अश्रुंचि, धार अश्रूंचीऽऽ
ऐका हो मनोरम कथा देव-भक्तांची ।।८।।
   
मग पंत,  वदति "माधवा, आता येधवा, रूऽऽप दाखवा
   दीन दयाळा, दीन दयाळाऽऽऽ
  ज्या वेषे लाविलेऽऽ, वेड बादशहाऽलाऽऽ "
   भक्ताची स्तुति ऐकता, वेष बदललाऽ
लंगोटि घालि, करि काठि, खांदा कांबळा,
ते रूऽप पाहता,  राव पदी लागलाऽऽ
दामाऽजि, ठेवि लेखणी, प्रभूच्या चरणि, बोले वंदुनीऽऽ
  काय वचनाला,  काय वचनालाऽऽऽ
"या नोकरि पायी, देव माझा शीणलाऽ"
मग काय वदति भगवंत, "करू नको खंत, भक्तिऋण बहुत,
  तुझेऽऽ मजवरति, तुझेऽऽ मजवरतीऽऽ
मजकडुनि होइना तुझ्या रे व्याजाचीऽऽ भरतीऽऽऽ"
    दामाजीशी धरितीऽ,  हृदयासी श्री हरी
    अविंध चरण कमलासीऽऽऽ  तो धरीऽऽ
    तीघांच्या नेत्री,  जल वाहेऽऽ सत्वरी ऽऽ
देव भक्त, त्रिवेणी संगमऽऽ, झाला उत्तम, हेच देइ प्रेम,
  प्रभो आम्हासि, प्रभो आम्हासीऽऽ
अशीऽ विनंति करुनीऽ, लक्ष्मीऽ धरि चरणासीऽऽ ।। ९।।  

 
  ------------------------  =================  -----------------

४. दामाजी पंत (२)


(चाल : चोखामेळ्याचा प्रसिद्ध अभंग :
  अबीऽर गुलाऽऽल उधळीऽत रंगऽऽ ।      नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंगऽऽ 
  उंबरठ्यासि कैसे शिवू ? आम्हि जातिहीन | रूप तुझे कैसे पाहु ? त्यांत आम्ही लीन 
  पायरीसि होऊ दंग, गाउनी अभंग | नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंगऽऽ
  वाळवण्टि गाऊ आम्ही, वाळवण्टि नाचू  | चन्द्रभागेच्या पाण्याने, अंग अंग ऩ्हाऊ 
  विठ्ठलाचे नाम घेऊ, होउनी नि:संग | नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंगऽऽ
  आषाढी कार्तीकी भक्तजन  येती  | पंढरीच्या वाळवंटी  संत गोळा होती 
  चोखा म्हणे नाम घेता भक्त होति दंग | नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंगऽऽ )
------------------------ ------------------------

खांदि कांबळा टाकिला, हातामध्ये काठी
पांडुरंग महार झाले,  दामाजीच्या साठी ।। ध्रु।। ***

करी चाकरी दामाजी बादशहासाठी
अंतरी सदा आळवी विठ्ठलाची मूर्ती
    बहु दुष्काळ पडलाऽ, पिकेनाच पीक
    अन्न धान्यही मिळेनाऽ, उपवासी लोक
काळ पाहुनी पंतांनीऽ, लुटविली कोठी
पांडुरंग महार झालेऽ, दामाजीच्या साठी  ।।१।।

    चडफडे मुजुमदारंऽ, आपल्या मनातऽ
    झडकरी बेदराशीऽ, पाठवीले खऽऽतऽ    
वृत्त कळताचि सारेऽ, धाडिले शिपाईऽ
बेड्या घालुनीया त्यालाऽ, आणा लवलाऽहीऽ
     कळवळे अंतरातऽ, सखा जगजेऽठीऽ 
     पांडुरंग महार झालेऽ, दामाजीच्या साठी  ।।२।।

भक्त आपुले भजनीऽ, जाणे अंतरंगी
कंठि बांधि काळा दोराऽ, घालुनी लंगोऽटी
    उभा येउनी राहीला, करीतो जोहाऽरऽ
    होन मोहरा ओतील्याऽ, दरबारी ढेरऽऽ
"क्षमा करा मायबापाऽऽ, बांधुनिया चिठ्ठीऽऽ"
पांडुरंग महार झाले, दामाजीच्या साठी  ।।२।।
  
    हुंडी पटवीली देवेऽ, मागुनी रशीऽदऽ
    झाला बादशहा चकितऽ, पाहुनी मुकुंदऽ
विठू, विठू, म्हणूनीयाऽ, धांवतसे पाठीऽ
दामाजीस म्हणे "सांगे, कोठे जगजेठी?"
    दामाजी म्हणे "विठ्ठला दे मलाहि भेटी"
    पांडुरंग महार झाले, दामाजीच्या साठी  ।।४।।

 
  ------------------------  =================  --------------

५. समर्थ रामदासांची मातृभेट

 "जय जय रघुवीर समर्थ" असा,  ध्वनीऽ  येत कानीऽ
ओळखिचा स्वर, वाटे जननिस,  नयनी ये पाणीऽ ।।ध्रु।।

कुणी तपस्वी, द्विजवर आला,  आपुल्या दारांतऽऽ
पहा गं,  आपुल्या दारांतऽऽ
सूनबाइ  गंऽ, भिक्षा त्यासी,   घाली जा त्वरितऽ 
भिक्षा  तु,   घाली जा त्वरितऽ ।।१।।
  ओंजळ भरुनी,  भिक्षा घेउनि,  सती द्वारि आलीऽऽ
वाढण्या, सती द्वारि आलीऽऽ
  त्या तेजाची,  मूर्ती बघुनी,  विस्मित मनि झालीऽ 
  सती बहु,  विस्मित मनि झालीऽ ।।२।।
समर्थ वदले, "न लगे भिक्षा,  येतो सदनांत
       वहिनि मी,  येतोऽ सदनातऽ"
बघुनि जननिसीऽ, अंतःकरणीऽ, होती  सद्गदितऽ 
समर्थहि, होती गद्गदितऽ ।।३।।

   बसुनी  जवळी, कथिती  तिजशी,  अमृतमय वाणीऽ
बोलती, अमृतमय वाणीऽऽ !
  ओळखिचा स्वर, वाटे जननिस,  नयनी ये पाणीऽ 
जननिच्या,  नयनी ये पाणीऽ ।।४।।
नारायण तो,  पुत्र तुझा गंऽऽ. वंदन करि तुजला
आइ मी, वंदन करित  तुलाऽऽ
कष्ट दिले तुज,  अपराधी मी,  क्षमा करी मजलाऽऽ 
आइ गं,  क्षमा करी मजलाऽऽऽ  ।।५।।
  शब्द मुलाचे,  ऐकुनि श्रवणी,  जननी गहिवरलीऽ
ऐकुनी,  जननी गहिवरलीऽ 
  हृदयि धरुनिया,  प्रेमाश्रूने,  स्नान तया घाली 
अश्रुंनी, ऩ्हाउ तया घाली  ।।६।।
आनंदानेऽ, उत्साहानेऽ, घर गेले भरुनीऽऽ
आनंदेऽऽ,  घर गेले भरुनीऽऽ
 स्वर ओळखुनी, अत्यानंदे,  नयनी ये पाणीऽऽ 
जननिच्याऽ,  नयनी ये पाणी ऽऽ ।।७।।
   समर्थ नमिती, वडिल बंधुसी, आशीर्वच वदलेऽ
                     बंधु ते, आशीर्वच वदलेऽऽ
रघुरायासी, भरत भेटला, ऐसे त्या गमलेऽऽ
श्रेष्ठांनी, मिठीत दृढ  धरिलेऽऽ    ।।८।।
   जननी वदली, "रूप तुझे मज, पहावेसे वाटेऽऽ
               बाळा मज, पहावेऽऽसे वाटेऽऽ
अंध नयनि या, रूप तुझे मीऽ,  पाहु कसे गोमटेऽऽ?
               बाळा तुज, पाहु कसे गोमटे?"   ।।९।।
नेत्रांवरुनी,  हात फिरवि सुत, दृष्टी ये फिरूनीऽऽ
आइला, दृष्टी ये फिरूनीऽऽ
 दृष्टि देखुनी, ओळख पटुनीऽ, जननि नयनि  पाणी 
जननिच्या,  नयनीऽऽ ये  पाणीऽऽ ।।१०।।


   
  ------------------------  =================  -----------------

६.  भूत कोणते प्रसन्न झाले ?

"भूत कोणते प्रसन्न झाले ?
     सांग मला लवलाही
दृष्टी दिधली मला जयाने,
     धन्य त्याचि  किमया ही !!!" ।। ध्रु।।

"ऐक गं जननी, या भूताची 
         अति अद्भुत करणी
  सांगतो, अति अद्भुत करणीऽऽ
ओळख त्याला तुझ्या अंतरी
         करीन वर्णन मी       
भुताची अद्भुत गं करणी   ।।१।।

 याने व्यापुन त्रैलोक्याला,
   याच्या वाचुनि ठाव न उरला,
 यासि वर्णिता शेषहि शिणला
  लागू या चरणी,
निशिदिनी,  लागू या चरणी 
  भुताची अद्भुत गं करणी    ।।२।।

दुष्टांचे गं करण्या  मर्दन,
  अयोध्येत ते, आले  ठाकुनऽ,
कोसल्येचे बाळ लहानंऽ,
  खेळे गं अंगणीऽऽ,
निशिदिनीऽ, खेळे गं अंगणीऽऽ 
  भुताची अद्भुत गं करणी    ।।३।।

याने वधियेला गं रावण,
  सर्व देव सोडवि बंदीतुन,
बंधूऽ कांते सह ये परतुन,
  अयोध्या भुवनी,
परतुनी, अयोध्या भुवनी
भुताची अद्भुत गं करणी    ।।४।।

तेच भूत गं भेटले मला,
  ही अवघी गं त्याची लीला,
तोच चुकवि गं जन्म मरणाला,
  गुण गाऊ, निशिदिनीऽऽ,
तयाचे, गुण गाऊ निशिदिनीऽऽऽ
भुताची अद्भुत गं करणी    ।।५।।

समर्थासी करू प्रार्थना,
  "शिवरायासह या हो पुनः
सुसन्मार्ग दाखवा या जना",
  हीच करी विनवणी,
निशिदिनी, हीच करी विनवणी,
लक्ष्मी, वंदुनिया चरणी
भुताची अद्भुत गं करणी    ।।६।।


   
  ------------------------  =================  -----------------------

७. अंबरीष आख्यान  - १

  पौराणिक वाङ्मयांत भगवान विष्णुंचे अनंत अवतार झालेत व पुढेही होणार असल्याचे सांकेतिक वर्णन आढळते.   यांमधील जे १०  अवतार फारच लोकप्रिय झालेत त्यांची नांवे    मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की  अशी आहेत.
   हे १० अवतार घेण्यासाठी विष्णुंना दुर्वास ऋषींचा शाप कसा कारणीभूत झाला, या बाबतची ही भक्त अंबरीष राजाची पौराणिक कथा अशी आहे. 

  गौरिनंदना नमन करोनी, वंदितसे मी गुरु  पायी ।
  श्रीहरिचे गुणगान कराया, बुद्धी द्या मज लवलाहीऽ ॥ध्रु।।

   सूर्यवंशिचा हिरा अमोलिक, अंबरीष नृप शिरोमणी ।
   न्याय नीतिने राज्य करितसे, वृत्ति लीन परि प्रभु चरणी ।।१।।
पुत्रासम नृप पाळि प्रजेसी, कांता सद्गुण गुणखाणी ।
आज्ञा पाळिति पुत्र पित्याची, शूर पराक्रमि रणांगणी      ।।२।।
    'एकादशि' व्रत करी भूपती, रात्री करि हरि जागरणां ऽS ।
     द्वादशीस नृप करी 'पारणे', द्विजांस वाढी मिष्टान्नाऽ      ।।३।।
नेम असा बहु दिवस चालला, उणिव कशाची कुणा नसेऽ ।
मेघ वर्षती वर्षा काळी, दैन्यदुःख राज्यात नसे               ।।४।।         
   सुर मुनि वर्णिति कीर्ति जयाची, भाटहि गाती स्तुतिगीते ।
    "घेइल भुप हा पदा आपुल्या", चिंता वाटे इंद्रातेऽ       ।।५।।
  दुर्वासासी सांगेऽ  शचिपति, "भूपति सदनी तुम्हि जावेऽ ।
  रायाचा व्रतभंग करा हो !, कार्य एवढे साधावेऽ!"              ॥६।।
(चाल : आर्या)
      'व्रतभंग' करायाऽसीऽ, आलेऽ   मुनि, द्वादशीस नृप सदनीऽ ।
     वंदुनि दुर्वासासीऽऽ, भूऽप वदे "भोजना, चला सदनीऽऽ"      ।।७।।
"स्नान करुनिया येतो !", वदुनि असेऽ, जाति  निघुनि  मुनिवर्यऽऽ ।
व्रतभंग समय येताऽ, नृप चित्ती घाबरेऽ गळेऽ धैर्यऽऽ  !!!           ।।८।।
      पुसता  राजगुरूऽते, ऋषि कथिती तो उपाऽय रायातेऽ ।
     " घे तीऽर्थ श्रीहरीचे, व्रतभंगाचा न दोष  ये तूते"          ।।९।।       
        चाल बदल:
   तीर्थ घेउनीऽऽ, पारणेऽ करीऽऽ! ।  
पातले मुनीऽऽ, राजमंदिरी ।
  "सोडुनीऽ मलाऽऽ, करिसि पारणेऽऽ?"।  
बोलती मुनीऽऽ, राजया उणे ।।१०।।
  कृद्ध होवुनीऽऽ,  शाप बोलतीऽऽ! ।   
"जन्म ते दहाऽऽ, भोग रे क्षिती ।
 या क्षणी नृपाऽऽ, जाळितो तुलाऽऽ !, 
कोण रक्षितोऽऽ? पाहु दे मला  !!!  ।।११।।
  चाल : आर्या
  भूवरि ताडि जटेसीऽ, 'कृत्या' ती जन्मली तदा तेथेऽऽ !! 
  हरि धाडि सुदर्शन , रक्षि नृपा, करुनि भस्म  कृत्येते        ।।१२।।
     घाबरले मुनि मानसि, येइ सुदर्शन तयावरीऽ वेगेऽ ।
    लागे मुनी पळाया, 'विधि' लोकी येइ, वृत्त त्या सांगे         ।।१३।। 
"चक्र नावरे मजसी", विधि सांगे हो "पळा मुनी त्वरितंऽ" ।
कैलासी येता ऋषि, सांब वदे "हो बसू नका येथंऽऽ            ।।१४।।
    चक्र असे श्रीहरिचे, जाळिल मम लोक हा तुम्हांसहितंऽ ।
    जावे वैकुंठीऽ तुम्हि, रक्षिल तुम्हांस लक्ष्मिचा कांतऽऽ!!! "   ।।१५।।
   चाल बदल : पद
    वैकुंठीऽऽ, येउनि मुनि, करिति प्रार्थना ।
    "रक्षि रक्षि मजसि हरी,  शरण मी तुम्हांऽऽ" ॥
     वदति हरी, "मुनि तुम्हांसि, सत्य सांगतो ।
     मार्ग जो, तुम्हास योग्य,  तोच दावितो        ।।१६।।  
          चक्र दिले, रायातेऽऽ, मज न आवरेऽ ।
         रक्षिल तो, नृप कृपाळु, जा तुम्ही त्वरेऽ ॥
         खचित करिल, नृप तुमच्याऽऽ, प्राण रक्षणाऽऽ ।
        जाउनिया, त्यासि त्वरित, करा प्रार्थनाऽऽ " ।।१७।।
  चाल बदल :
  राज मंदिरी, मुनि ते आले, अंगणि नृप तोऽ, उभा असेऽ ।
 'सुदर्शना', थांबण्यास  भूऽपति, कर जोडूनियाऽ,  प्रार्थितसेऽऽ        ।।१८।।
    'चक्र पडे ज्या स्थळी',  त्या स्थळीऽ, 'पवित्र जल' ते येइ वरी ।
    'चक्र तीर्थ' निर्माण जाहले, अघ पातक जे संहारीऽऽ  ।।१९।।
मुनि चरणांते, वंदुनि नृप तो, घेउनि येईऽऽ सदनांतऽ ।
श्रमले म्हणुनी,  चरण चुरितसे, मृदु शब्दे त्या शांतवितंऽ ।।२०।।
   मुनि वदतीऽ, "मज दिला आसरा, धन्य तुझी रे!!, अंबरिषाऽ! ।
  कृपावंत तूऽ, दयावंत तूऽ, भक्त लाडका श्रीहरिचाऽ!!"    ।।२१।।
चाल बदल : पद
प्रगटले SSऽ! श्रीहरि, नृप मंदिरी SS । 
अंबरिष,  लोळेS चरणांवरी SS !!
चरणि  ब्रीऽदाचाऽ,  गर्जे तोडर ।
कटीऽवरीऽ,  कशिला पीऽतांबर ।
कंठीऽ कौस्तुभ,  मणि तो सुंदर । 
मूर्ति दिसे गोजिरीऽ । प्रभूची SS, मूर्ति दिसे गोजिरीऽऽ!
       प्रगटलेऽऽ !, श्रीहरि, नृप मंदिरीऽ !                            ।।२२।।

नीलवर्ण तनु, सुहास्य वदनं ।
सरळ नासिकाऽ, राजीव नयन ।
मकर कुंडलेऽ, तळपति छानंऽ ।
भाळि गंध केशरी । प्रगटले SS श्रीहरि, नृप मंदिरीऽSS       ।।२३।।

    चहु हस्तांमधे,  आयुधेऽ चारंऽ ।
    कंठी तुलसि, फुलांचे हारंऽऽ ।
    श्रीऽऽवत्सलांछन हृदयांवर ।
   मुकुट शोभला शिरी । प्रगटले SS श्रीहरि, नृप मंदिरीऽ   ।।२४।।

हृदयि धरिति प्रभु,  निज भक्तांसी । 
प्रेमाश्रुंनीऽऽ, न्हाणिति त्यासी ।
मुनि दुर्वास,  धरीऽऽ चरणासीऽऽ ।
 वर्षति सुर सुम शिरी । प्रगटले SS श्रीहरि, नृप मंदिरीऽ  ।।२५।।
   चाल बदल :
   भेट देव भक्तांचीऽ झालीऽ, झाला आनंदीऽ आनंदऽ ।
    अत्यानंदे सर्व  गर्जतीऽ, "हरि गोविंदऽ!, हरि गोविंदऽ!!" ।।२६।।
 देव, भक्त, दुर्वास ऋषीसह, झाले भोजन ते छानंऽऽ ।
  प्रसाद  सेवुनि, तृप्त जाहलेऽऽ, भाग्यवंत ते!, सकल जन          ।।२७।।
 
चाल बदल : आर्या
'ऋषि-शापा'तुनि करिती, 'मुक्त' प्रभू अंबरीष रायासीऽऽ ।
  'गर्भवास दश' स्वत:, सोसुनि भक्तासि विष्णु संरक्षी  ।।२८।।
चाल बदल : पद
"माग आता वरदाऽन, सखयाऽ, माSग आता वरदाऽऽन ।।ध्रु।।
    किती तुझी ही दयाशीलता !!!
    सद्गुण तव  किति  वर्णूऽ आता !!
    प्रसन्न झालो तुजवरि भक्ता । "
वदले श्री भगवान !!,  "सखयाऽ, माSग आता वरदान"  ।।२९।।

अंबरीष नृप वदे "कृपाळा। 
रहावेS इथेS दीSनदयाळाऽ ।
तुझिया सन्निध निशिदिनि मजलाऽ ।
अढळ असावे स्थान !!!,  मागतो, एवढेच वरदान "    ।।३०।।

     भक्तास्तव प्रभु स्थीर राहिले ।   
    क्षेत्र 'बारशी' पावन झाले ।
     भक्ता सन्निध स्थानहि दिधले ।
    अंबरिषासह उभे राहिले!! 
सिंहासनि भगवान ।
    वाढवीऽऽऽ,  भक्तांचे महिमान!, ।  देउनीऽऽ, भक्तालाऽ  वरदान ।।३१।।

मुनि दुर्वाऽस 'ईश' अवतार ।
करावयास्तव  जगदोद्धार!! ।
घडवित प्रभुचे 'दश अवतारं!!' ।
नटुनी 'दश अवतारं!, । श्रीहरिS करितीS जगदोद्धारं।
मर्दुनि दुष्ट अपार!!, । श्रीहरिS करितीS जगदोद्धार  ।।३२।।
   प्रभु लीलेच्या गुंफुनि माळाऽ ।
  श्रीहरि कंठीऽ  हार घातलाऽ ।
  लक्ष्मी करुनीऽ  वंदन तुजला ।
   विनवित वारंवार!!, । ''चुकवाऽ,  जन्म मरण संसार ।
                    प्रभूSSजीS, द्या मज चरणीऽ थाऽर
  प्रभूSSजीS, द्या मज चरणीऽ थाऽर ।।३३।।       

  ------------------------  =================  ---------------------------

७. अंबरीष आख्यान (२)

देवांचा जो देव श्रीहरी, भक्ताधिन जाहलाऽऽ
बार्शी क्षेत्री अंबरिषासह भगवंत मी पाहिलाऽऽ 
पाहिलाऽऽ,  भगवंत मी पाहिलाऽऽ ।।ध्रु।।

अंबरीऽष करि, तीन दिनांचे, व्रत "साधन द्वादशीऽऽ"
एकभुक्त,  दशमीस करी नृप, "निर्जलि एकादशीऽ"
     द्वादशी तिथी, जोवरि तोवरि, भूऽप करीऽ 'पारणेऽऽ'
    मुहूर्त साधुनि, द्वादशि तिथिचा, व्रत पुरते  करणेऽ  
  पतिव्रता स्त्री, पुत्र सद्गुणी,  काही न उणेऽ!! नृपाऽ 
   सुखी नांदती सर्व प्रजाजन,  भगवंताचीऽ  कृपाऽऽ! 
पदा आपुल्या घेइल म्हणुनी, इंद्र खिन्न जाहला
        मनी बहु, इंद्र खिन्न जाहला !
  दुर्वासासी, करित प्रार्थना, "व्रत भंग करायलाऽ" 
प्रार्थनाऽ, "व्रत भंग करायलाऽ" !  ।।१।।

व्रत भंगाया मुनी पातले, तिथि द्वादशि लक्षुनीऽऽ
भोजनासि बहु उशिर लावती, भूप घाबरे मनीऽ
    तीर्थ घेउनी करी पारणे, अंबरीष भूपतीऽ
    भूपालासी, दुर्वास मुनीऽ, अति निष्ठुर बोलतीऽ

    नाना योनित, जन्म घेउनीऽऽ, जगण्याची शिक्षा  
  दिली मी  तुला, भोग, या क्षणीऽ, खाइल तुज कृत्याऽऽ
या क्षणीऽ, खाइल तुज कृत्याऽऽ!!!
निर्मुनि कृत्या, अंबरिषावरि, धाडी मुनि कोपुनीऽ
भूप न भीता, हृदयी आपुल्या, स्मरण करी श्रीहरीऽ
रक्षणार्थ हरि धाडि सुदर्शन, निज भक्ता रक्षिलेऽ
                    प्रभूने, निज भक्ता रक्षिलेऽऽ 
सिंहासनि मी अंबरिषासह भगवंता पाहिले ।।२।।

   सुदर्शनाने, वधुनी  कृत्याऽऽ!, मुनीकडे  ते वळेऽ 
  प्राण रक्षिण्या, दुर्वास मुनीऽ,  जीव घेउनी पळेऽऽ!!!  
चक्र पाठिसी, बघुनि घाबरुनि, मुनी त्रिभुवनी फिरे!!
  विधि,हर, हरिही,  न देति 'अभया', चक्र तया नावरे
   "अंबरीष नृप, चक्र थांबविल", असे सांगती हरी 
     सल्ला मानुनि, मुनी परतलेऽ , अंबरिषाच्या घरीऽऽ   
अंबरीष चक्रास थांबवी, चक्र पडे भूवरी
'चक्रतीर्थ' निर्माण जाहले, जे पातक संहारी
नृप मंदिरि हरि,  प्रगट जाहले, पीतांबर शोभला!!.
       कटीऽसीऽऽ, पीतांबर शोभलाऽ !
   शापातुनि, अंबरीऽष भक्ता, मुक्त  कराया पहाऽ!
   श्रीहरि स्वत:, नाना योनित,  जन्मा आले  दहाऽऽ! 
  देवांचा जो देव श्रीहरी, भक्ताधिन जाहलाऽऽ
अंबरिषासह बार्शी क्षेत्री भगवंत मी  पाहिलाऽ!!
पाहिलाऽऽ, भगवंत मी पाहिलाऽऽ !! ।।३।।

  मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की 

-------------------  =======  -------------------

आमच्या जमखंडी या गावाजवळच कल्हळ्ळी नावाच्या खेड्याजवळील वेदगिरी या डोंगरावर श्री व्यंकटेशाचे पुरातन देऊळ आहे. तिरुपती येथील व्यंकटेश भक्तांसाठी इथे प्रकट झाले आणि राहिले अशी भाविकांची श्रद्धा आहे. 


८. कल्लहळ्ळी  ( कल्हळ्ळी ) व्यंकटेश क्षेत्रावतार

गौरिसुताते नमन करूनी, नमिते मी श्रीगुरुपायी 
श्री हरिचे गुण गान कराया, बुद्धी द्या मज लवलाही    ।।१।।
    अंबरिषास्तव शेषशयन प्रभु, नटले की दश अवतारी 
    कलि माझारी तोच श्रीहरी, व्यंकटेश हे नाम धरी    ।।२।।
कवण्या भक्तास्तव गिरिधारी, आले व्यंकटगिरीवरी
प्रियभक्तांची कथा मनोरम, ऐका ऐका हो सारी         ।।३।।
     गिरिधारीचा एक भक्तवर, अमरगोळ त्याचे गांवऽ
     'नागण्णय्या',  नाम तयाचे, श्रीहरि चरणी दृढ भावऽ     ।।४।।
नवरात्रोत्सव पहावयास्तव, जात असे की दरसालंऽ
वृद्ध जाहला, शरीर थकले, प्रभुचरणी निष्ठा अढळऽ     ।।५।।
    वृद्धत्वामुळे गिरि चढवेना, तळमळ वाटे बहु भारी 
    'चुकेल माझा नेम' असा हा, ध्यास लागला मनांतरी ।।६।।
शयनि पहुडता,  निद्रा आली, स्वप्नी आला द्विज एकंऽऽ
काय बोलला "न करी चिंता, मद्वचनाते तू ऐकऽऽ ।।७।।
    जमखंडीहुन द्वय कोसावर, वेदगिरी हा असे पहा
    संनिध कल्हळ्ळी ग्राम असे, तिथे जाउनी स्वस्थ रहा ।।८।।    
द्वय भक्ताते देतिल दर्शन वेदगिरीवर गिरिधारी
न करी चिंता" ऐसे वदुनी, गुप्त जाहले देव तरी ।।९।।
  सोबत खाशी बघुनि भक्त तो, आला कल्हळ्ळी गांवी
  यल्लम्मा कुलस्वामिनि त्याची, पुजा तियेची नित्य करी ।।१०।।
 'त्रिमलाचारी', नामे ब्राह्मण, बेलगुप्पिचा रहिवासी
मनी वासना असे तयाच्या, जावे एकदा गिरीवरी ।।११।।
    साधारण स्थिति असे तयाची, द्रव्य नसे संचित कांही
   कसे गिरीवर घडेल जाणे ? इच्छा मनिची मनि राही ।।१२।।
हळु हळु द्विज तो द्रव्य सांठवी, करी तयारी जाण्याची
गिरिवरि  जाउनि गिरिधारीचे, रूप मनोहर पहाण्याची ।।१३।।
  सर्व तयारी करूनि निजता, स्वप्नि एक तो द्विज आला
  रूऽऽप मनोहर असे तयाचे, शेला भरजरि पांघरला ।।१४।।  
वदे "सुभक्ता, होतिल श्रम तुज, अवघड गिरि बहु चढण्याला
वेदगिरीवर जा तु त्वरेने, देतिल दर्शन प्रभु तुजला ।।१५।।
   शुरपाली हे क्षेत्र मनोरम, त्या मार्गाने त्वा जावे
   देव असे नरसिंह तिथे जो, दर्शन त्याचे त्वा घ्यावे" ।।१६।।
असे कथुनि द्विज गुप्त जाहला, जागृत झाला भक्तवरंऽऽ    
  स्वप्नाचा मनि विचार करिता, खेद वाटला मनि फारंऽऽ ।।१७।।
  "गिरिवरि येऊ नको" असे कां, वदले मजला प्रभुरावंऽ ?
  काय मजमुळे पवित्र स्थळ ते, विटाळेल हो तरि कायऽऽ? ।।१८।।
पतीतपावन नाम तुझे प्रभु, उद्धरिसी जन पापि किती?
मग कां मजला दूर लोटिशी ?  मोडवेना तव वचन परी"।।१९।।
  पत्नीसह द्विज निघे जावया, शुरपाली क्षेत्रावरुनी
  कृष्णेमध्ये स्नान करोनी, नरहरिचे दर्शन घेई ।।२०।।
वेदगिरीवर त्वरे पातला, मार्गी वृक्ष लता फुलल्या
नानापरि पशु, पक्षि क्रीडती, अवलोकित त्यांच्या लीला ।।२१।।
   गिरिवरि येता, शब्द ऐकला, "आले, आले भक्तवरंऽऽ"
  ध्वनी परिसता, विस्मित झाला, भये व्यापिले अंतरंऽ ।।२२।।
नागण्णय्या,  पूजा करुनी, बसे देउळी ध्यानस्थंऽऽ 
शब्द तयाच्या श्रवणी पडतां, आला गिरिवरि धांवतऽऽ ।।२३।।
  दंपतीस त्या नयनि पाहता, म्हणे "हेच की यदुरावंऽऽ?" 
  नागण्णाला बघुनि द्विजाला, वाटे 'आला हा देव' ।।२४।।
भक्तवरांच्या भेटि जाहल्या, सांगति आपुला वृत्तांतऽऽ 
दुग्ध शर्करा एक जाहली, ऐसे वाटे चित्तांतऽऽ       ।।२५।।
  नागण्णय्या  दंपतीस त्या, घेउनिया निज गृहि गेला
  'कमलाकर कधि देतिल दर्शन?' वेध लागला चित्ताला ।।२६।। 
बहु जन्मांची बहु पुण्याई, उदया येई एक दिनी
मंगल सुस्वर बहु वाद्यांचा, ध्वनि ये वेदगिरीवरुनी ।।२७।।
  भक्त द्वय सुस्नांत होउनी, बसले देव पुजा करुनी
  अरुणोदय तो असे जाहला, घंटा रव ऐकू येई ।।२८।।
धावति दोघे तया दिशेने, प्रकाश होईना सहनंऽऽ 
स्थीर राहिले, तोवरि पुढती, प्रगट जाहले भगवानंऽऽ ।।२९।।
  सिंहासन जे जडित हिऱ्यांचे, त्यावरि सुंदर रूऽऽप दिसे
  चहुहस्ती शोभती आयुधे, पीत पितांबर झळकतसे ।।३०।।
दंडि शोभती बाहु भूषणे, कंठी कौस्तुभ वनमाळा
वत्सलांछन हृदयि विराजे, मस्तकि रत्नमुकुट दिसला ।।३१।।
  रूऽऽप असे हे नयनि पाहता, भक्त लागती चरणाला 
  स्तुती करीती बहू परीने, हर्ष मावेना गगनाला ।।३२।।
व्यंकटेश प्रभु वदति तयासी, "मागावे हो वरदाना"
भक्त बोलती, "रहावे येथेऽ, उद्धराया येथील जना" ।।३३।।
   प्रिय भक्तांच्या वचनास्तव प्रभु, स्थीर राहिले त्या ठाया 
   कमलावर पदि कमलपुष्प हे अर्पुनि पद कमली नमुया ।।३४।।
पद्मावति पति पद्मनाभ तव, महिमा न कळे गा मजसीऽऽ
जोडुनि पाणी मागत लक्ष्मी, ठाव देइ तव चरणासीऽऽ  ।।३५।।
  
   
  ------------------------  =================  ------------------


९.सीतेची विनवणी
 (पितृ वचन पालनार्थ १४ वर्षासांठी वनवासाला निघताना)

विनविते जानकी, वंदुनिया प्रभु पायाऽ
"न्या मजसि काननीऽऽ, तुम्हां सवे रघुरायाऽ" (ध्रु)

"मम उभय कुलांतिल, आप्त स्वकिय गणगोतंऽ
बहु सौख्य संपदा, तुम्हांवाचुनी व्यर्थऽ
  होईल सौख्य मज, तुमच्या सान्निध्यांतऽ
  या चरणां वाचुनि, आंस न दुजि  हृदयांतऽ
वनि भयहि नसे मज, कालहि नमि तव पायांऽ 
"न्या मजसि काननीऽऽ, तुम्हासवे रघुरायाऽ" (१)

"मख  रक्षिता तुम्हीऽ, दैत्य मारिले बहुतंऽ
ती दुष्ट त्राटिकाऽ, वधिली घोर वनांतऽ
    ही कीर्ति आपुलीऽ, ठाउक मजला नाथंऽ
    मज भीति कुणाचीऽ, जवळी असता कांतऽ
वनि श्रमुनी येताऽ, चुरिन आऽपुल्या पायांऽ
न्या मजसि काननीऽऽ, तुम्हांसवे रघुरायाऽ " (२)

चाल बदल : श्रीरामाचे उत्तर
श्रीराम वदे सीतेसि, "किती सांगावे ?
                    वनवासि तुवा नच यावे
मम विरह होय बहु, दुःसह कौसल्येसीऽ
                  समजाविल कोण तियेसी ?
मूर्छित झाले मम तात, सत्य तू बघशीऽ
                  होईल सांग गति कैसी ?
निज जनक जननि तू, समज गं या दोघांते
                   होईल सौख्य मनि मज ते
     आहेस प्रिये तू ज्ञानीऽ
     सीऽते तू चतुर शहाणीऽ
     कां नयनि  आणिले पाणीऽ ?
      कर विचार बरवा चित्तीऽ
     का उगाच करिसी खंती ऽ?
मृदु मधुर बोलुनीऽऽ, त्यांचे दुःख हरावेऽ
        वनवासि तुवा नच यावे " (३)

"फल, मूल, जलहि कधि काली न मिळेल तिथे
                          सुखरूऽप बैस तू येथेऽ
  खडे, कंटक, रुततिल पाया
 सुकुमार तुझी ही काया
 नाहीच तिथे मृदु शय्या
मम मातृ-पितृ निज दैवत पुजुनि असावे 
                    वनवासि तुवा नच यावे "
      परिसोनि पतीची वाणी, विनयेच वचे
            "श्रीरामा मज न त्यजावे
             वनि मजला घेउनि जावे" (४)

चाल बदल :
"बहु परी मजसि तुम्हि, सांगितले सुविचारंऽ
पण विरह आपुलाऽ, मला न सोसवणारंऽ
    तडफडे जलाविण, मीन जसा तो फारंऽ
    मज त्यजुनी जाता, गति मम तशि होणारंऽ"
विनविते नयन जलि भिजवुनि प्रभुच्या पाया
"न्या मजसि काननीऽऽ, तुम्हांसवे रघुरायाऽ" (५)

चाल बदल :
श्रीवसिष्ठ गुरु, रामासि बोलले "पाही
            सीतेसि सवे तू नेई "
गुरु आज्ञा मानुनि, राम संमती देई 
            "चल वनी, वल्कले लेई
नेईन मजसवेऽ, पूस आता नयनांसीऽ
            चल शीघ्र जाउ तीघेही"
मग राम, जानकी, लक्ष्मण गुरुजन वंदी
              तीघेहि लागले   पायीऽ
"वनवास चरित या पुढिल असावे बरवे
               आम्हांस  आशिर्वच द्यावे"   (६)

चाल बदल
सौमित्र सीतेसह, वनी जाति  रघुवीरऽ
वनि चौदा वर्षे, काल क्रमुनिया थोरंऽ
जोडुनी ऋक्ष, कपि  यांचे सैन्य अपारंऽ
 बहु राक्षस वधिले, "रावण - सह परिवारं"
परततां नगरि जन, करिती "जय जय" कारंऽ
प्रभु बसति राज्यपदि, त्रिभुवनि सौख्य अपारंऽ
शत्रुघ्न भरत ते, चवऱ्या करि घेउनियाऽ
सौमित्र उभा तो, जवळी धनु घेउनियाऽ
हनुमंत बैसला, पुढे हस्त जोडुनियाऽ
हे रूऽप प्रभूंचे,  सांठवुनीया हृदया
    लक्ष्मी वंदितसे, प्रेमे नमुनी पायांऽ  (७)

   
 ------------------------  =================  --------------------


०. भोळाराम - राम - रामदास स्वामी

शिष्य जे वदति समर्थासीऽऽ
"काशी क्षेत्री चला, जाउया गंगा स्नानासी" (ध्रु)

झटपट झालि तयारी तीऽऽ,
प्रभुसेवेस्तव, बालभक्त तो, राहीऽऽ गडावरती
गुरुवर आज्ञा त्या करिती,
"प्रभात समयी, 'कांकडारती' नित्य नेमे कर ती 
"प्रेमे करि पूजाऽऽ - आरतीऽ,
घालि भोजना प्रभुरायासी", आज्ञा ही कथिती
यापरि कथुनीऽ,  सकल तयासी,
शिष्यांसह श्रीसमर्थ जाती काशी क्षेत्रासीऽ  (१)

प्रभातीऽऽ उठेऽ बाऽल भक्तंऽ,
सडा संमार्जन करुनि,  काकडा, पूजा मग करितंऽ
करुनिया पाकसिद्धि त्वरितंऽ
नैवेद्याची ताटे आणुनि, "स्वीकारा" वदतंऽ
बैसला जोडुनिया हातंऽऽ
" रुसलासी  कां देवा?" म्हणुनी  बहु समजावीतंऽ
विनवणी करीऽ, प्रेमे प्रभुसी
"जरि न जेवशिल, त्यजिन प्राण मम, तवचरणापाशी  !!!"  (२)

बघुनिया भक्ताचा भावंऽ
भक्तासह जेवले देव हो, लीला अभिनंवंऽ
भोळा सेवा करि सर्वऽ
दमला, श्रमलाऽ, कामे करुनी थकला बहु जीवऽ 
राघवा कथि मनिचा भावंऽ
"ज्वर आला मज, कशी करूऽ मी कामे ही सर्व ?"
वदे 'अज्ञान',  राघवासी,
"सर्व ही कामे करि मी एकटा, श्रम होती मजसी
विभागणि करु या कामाची,
सर्वांनी मज सहाय्य करावे, विनंति मम ऐसी !" (३)

विश्वावरि   ज्याची सत्ता !!,
तोच प्रभूऽ निज, प्रिय भक्तांच्या, पुरवीऽ मनोरथाऽऽ
भक्त आधीन प्रभू राया,
'अज्ञाना'ची मानुनि आज्ञा, करिती निज कार्या
अंजनी तनय रामभक्तंऽऽ,
सौमित्रासह, करि निजकार्या, बघुनी भावार्थऽ
सकलंऽ त्रैलोक्याची माता
पाकसिद्धि ती, त्वरित करितसे, बघुनी बालमना
जानकी पाकसिद्धि करितंऽ
अष्टसिद्धि राबती तिजसवे, काय उणे तेथंऽ
आनंदे दिन ऐसे क्रमिता,
शिळ्या भाकरी उरल्या  म्हणुनी, 'काला'  करि माता,
आले सकल भोजनासी,
परि जेवेना बालभक्त तो, अश्रू नयनासी  (४)

 जानकी कुरवाळी वदनाऽ
 "काय जाहले, सखया तुजसी ?, कां करिसी रुदनां ? " 
वदे तो "ऐका मम वचनंऽ 
समर्थासि हा आवडे काला, झाले मज स्मरणंऽ"
बघुनिया काला तो छानं
"समर्थांसि हा आवडे काला" सांगे अज्ञानंऽ
"भेटुनीऽऽ,  झाले बहुत दिन
काला त्यांसी, देउनि प्रेमे, वंदिन मी चरण"
प्रेमे विनवि मारुतीसी,
"काशी क्षेत्रीऽ, घेउनि जा मज, काला देण्यासी" (५)

भोळ्या भक्ताचेऽऽ भोळे मन
हट्ट तयाचा,  पुरवितसे तो,  वायूऽऽऽनंदन
मारुती स्कंधी 'अज्ञानं',
क्षणात आला, काशी क्षेत्री, काला घेऊनंऽ
मारुती स्कंधी बैसोनी,
काशी क्षेत्री त्वरित पातला, वंदी गुरु चरणी
वदति गुरु "कैसा आलासीऽऽ?"
"वायुसुताच्याऽ सवे पातलो", खुण दावी ऐसीऽ
करी वृत्तांत सर्व कथनंऽ
वायुसुतासह, आलो ऐसी, दाखवली खूणंऽ
समर्थ,  नमिति मारुतीऽसीऽ
"भोळ्यास्तव श्रम, तुम्हासि झाले, क्षमा करा मजसी"
समर्थ, 'काला'  स्वीकारितीऽ
 भक्ति प्रेम ते, बघुनि तयांचे, विस्मित मनि होती (६)

भोळाऽऽराम भोळाऽऽ भावंऽ
साह्य तयासी, करिति सकलही, बघुनि चित्त शुद्धंऽ 
समर्थ, नमिती मारुतिला,
भोळ्यास्तव तुम्हि, सर्वहि श्रमला, क्षमा करा मजला !!,
समर्थ मग सकलांसी वदती,
"भोळ्यास्तव मम,  शिणति दैवते, जाउ गडावरती"
गुरूऽऽ मग, स्वधामीऽऽ आले,
धन्य धन्य, त्या गुरुशिष्यांची, वंदूया पाउलेऽ
हृदयि धरू,  गुरुऽ - शिष्य - प्रेमाऽऽ
धन्य धन्य गुरु, धन्य शिष्य जो, मान्य देवतांना
स्वीकारा,  सेवा ही आमुची, 
कर जोडुनिया, लक्ष्मी प्रेमे, नमिते चरणासी (७)

----------------  ==============  --------------

११.१ श्री दत्तात्रेय अभंग

कल्पवृक्षातळी, अत्रीचा नंदनु। सवे कामधेनू शोभतसे ।।
शिरी जटाभार, रुद्राक्षांचा हार । चंद्र शिरावर शोभतसे ।।
कटीसी शोभले, भगवे वसन । चारी वेद श्वान रूपे आले ।।
शंख चक्र गदा, पद्म नी त्रिशूल । शोभतसे माळ हातामध्ये ।।
सुहास्य वदने, पाहे कृपादृष्टी । अमृताची वृष्टी भक्तांवरी ।।
ऐशा या स्वरूपी, मन रमवावे । शिर नमवावे पायी त्याच्या ।।
लक्ष्मी मनी ऐशा, ध्याउनी स्वरूपा । रमे चित्ती सदा ऐक्य भावे 
**************************

११.२ गाणगापूर दर्शन

मंदिरात जन गुरुदेवांच्या दर्शनास आतुर
        बहरले, क्षेत्र गाणगापुर   (ध्रु)

श्रीशैल्याहुन फुले परतली
प्रसाद रूपे इथे पातली
सकलांच्या हृदयात लोटला, भक्तिरसाचा पुर
        बहरले, क्षेत्र गाणगापुर  (१)
पूज्य पादुका, निर्गुण असुनी
त्यांतचि सद्गुरु गुप्त राहुनी
निजभक्ताची दुःख संकटे, सदैव करती दुर
       बहरले, क्षेत्र गाणगापुर (२)
सभामंडपी, यतिपूजेचा
समारंभ हा प्रसन्नतेचा
विप्रमुखातुनि शुभ मंत्रांचा, घुमे नाद मधुर
         बहरले, क्षेत्र गाणगापुर (३)
श्रीगुरु चरित्र येथे घडता
निश्चित होते, कार्य सफलता
नैराश्याच्या जीवनातही, फुटती आशांकुर
        बहरले, क्षेत्र गाणगापुर   (४)
कंठी माळा, मुकुट शिरावर
पालखीतुनी, निघती यतिवर
ओवाळीती ललना त्यांना, पंचारति कापुर
          बहरले, क्षेत्र गाणगापुर  (५)
रुद्र पाद या, तीर्थाकाठी
भक्तजनांची, झाली दाटी
'श्रीवदना'चे दर्शन घडता, हर्ष घुमे भरपुर
           बहरले, क्षेत्र गाणगापुर  (६)
कुणी अर्पितो, श्रीफल सुमने
कुणी प्रीतिने गातो भजने
दाहि दिशांतुन कानी पडती, संगीताचे सुर
          बहरले, क्षेत्र गाणगापुर  (७)
गोपाळांचा उत्सव काला
गुरुकृपेने अमृत झाला
सुखद सोहळा नयनी बघता, दाटुनि येई उरं
         बहरले, क्षेत्र गाणगापुर (८)

---------------

११.३ दत्तात्रेयाचे भोजन पात्र


शिरोळ ग्रामी,  सद्गुरु स्वामी, आले भोजना माध्यान्हीऽ
प्रगट होउनी,  रूऽप दाविले, पतिव्रता बहु पाहोनीऽ ।।ध्रु।।

   यतिवर येथे, दत्त दिगंबर, आलेऽ एकाऽ विप्राघरी
   "नारायण नारायण अल्लख", मंत्र मुखी हा उच्चारी ।।१।।
देखुनि नयनी, सती सुंदरी, आली वेगे बाहेरी
वंदुनि चरणा, जोडुनि पाणी, उभी राहिली ती नारी ।।२।।
   यती बोलती, सतीस "द्यावी,  'भिक्षा' आम्हा पोटभरी,
   माध्यान्ह समय, कठिण पाहुनी, आलो सति मी तव द्वारी ।।३।।
भोजन घाली, त्वरा करोनी, धीर न धरवे मज जननी"
प्रगट होउनी,  रूप दाविले, पतिव्रता बहु पाहोनीऽ  ।।४।।

   क्षुधाक्रांत, मग पाहुनि यतिला, पतिव्रता विस्मित झाली
   अन्न लेश गृहि, नाही म्हणूनी, खेदे लज्जित मनि झाली ।।५।।
अंतर्ज्ञानी, दीन दयाळू, पाहुनि द्रवले भक्ति भली
"सिद्ध असे ते वाढी माते, चिंता सोडी या वेळी" ।।६।।
    हर्षुनिया मग, चंद्र वदनि ते, अश्रू गदगदले नयनी
    प्रगट होउनी, रूप दाविले, पतिव्रता बहु पाहोनीऽ  ।।७।।

"पूर्ण पात्र गृहि नाही" म्हणता, प्रभुने अघटित जे केलेऽ
पाषाणाचे पात्र करोनी, त्यावर वाढी यति बोले ।।८।।
   पातळ कण्या, आवडी प्रीतिने, स्वस्थपणे भोजन केले
क्षुधा निवाली, आनंदाने, आशिर्वचन, तिला दिधले ।।९।।
   "स्थिर सौभाग्य, संतती, लक्ष्मी, अखंड राहो तव सदनी"
   प्रगट होउनी रूप दाविले, पतिव्रता बहु पाहोनीऽ  ।।१०।।

"या पात्राची, पूजा करुनी, भक्ती भावे भजन करा
येथे माझी, असे विभूती, हा निश्चय तुम्हि मनी धरा ।।११।।
   शूल, कुष्ठ,  इत्यादि भयंकर, रोग नष्ट होतील त्वरे "
   या परि सांगुनि, जाती स्वामी, कृष्णातीरा पलीकडे ।।१२।।
तेंव्हापासुनि प्रसिद्ध झाले, 'भोजन पात्र' शिरोळ पुरा
अनन्य भावे, पूजा करिता, भवपाशातुन करि सुटका ।।१३।।
     विनम्र   भावे, जोडुनिया कर, वंदित लक्ष्मी गुरुचरणीऽ
  प्रगट होउनी, रूप दाखवा, ही मम तुम्हां आळवणीऽ  ।।१४।। 

----------------  ==============  --------------

१२. १ श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी

स्वधर्म पालक, पतितोद्धारक, योगी निष्कामीऽ
परम कृपाळू, गुरु श्रीपाद, श्रीवल्लभ स्वामी ।।ध्रु।।

    पीठापूरीऽ, आपळ्ळराजा, सुमतीच्या पोटी
    दत्त स्वरूपीऽ, जन्म घेतला, 'वचन' पूर्तिसाठी
    तोषवुनी, उभयांस निघाले, पुण्य क्षेत्र धामी 
    परम कृपाळू, गुरु श्रीपाद, श्रीवल्लभ स्वामी ।।१।।
काशी, बद्री, तीर्थे करुनी, गोकर्णा आले
साधु संतजन, सत्संगाने, पुलकित मनि झाले 
थोर तपस्या, करुनि पातले, कुरवपूर ग्रामी
परम कृपाळू, गुरु श्रीपाद, श्रीवल्लभ स्वामी ।।२।।
     रजकाचेऽ, दारिद्र्य निवारुनि, राज्यपदा दिधले
    'वल्लभेश', द्विज जिवंत करुनी, तस्करास वधिले
    विधवा स्त्रीच्या, सुता बनवले, ज्ञानवंत नामी
    परम कृपाळू, गुरु श्रीपाद, श्रीवल्लभ स्वामी ।।३।। 
आश्विन वद्य, द्वादशी सुदिन तो, अंतर्धानाचा
आत्मानंदी, रंगुन गेला, नाथ अनाथांचा
सुरम्य सरिता, कृष्णातीरी, अखंड विश्रामी
परम कृपाळू, गुरु श्रीपाद .श्रीवल्लभ स्वामी ।।४।।
   ऐकुनि लौकिक, असंख्य भाविक, या स्थानी येती
   दिव्य पादुका, दर्शन घेउनि, स्वच्छंदे रमती
   भव भय संकट,  हरते स्मरता, नित अंतर्यामी
   परम कृपाळू, गुरु श्रीपाद, श्रीवल्लभ स्वामी ।।५।।
-------------------------------

१२.२ श्री नरसिंह सरस्वति 

दुःख हारक गुरु नाम मानवा
     दुःख हारक गुरु नाम (ध्रु)

श्री नरसिंह सरस्वति स्वामी
अवतरुनीया करंज ग्रामी
गाणगापुरी ज्यांनी केले, भक्तांचे सुखधाम  (१)
त्यांच्या निर्गुण दिव्य पादुका
साक्ष पटविती सकल भाविका
यांतच वसतो गुप्त रुपाने, सद्गुरु आत्माराम (२)
जवळ शोधतो अति हृदयंगम
भीमा आणि अमरजा संगम
गुरु गुण गातो, छेडित सरगम, रात्रंदिन निष्काम (३)
तटि औदुंबर वृक्षाखाली
असंख्य जनता संकट काळी
जप तप पूजा करुनि पावती, जीवनात विश्राम (४)
भव्य टेकडी अनंत तीर्थे
बघता बघता वृत्ति बहरते
आत्मोद्धारक पुण्यस्थळ हे, त्रिभुवनि कीर्ति महान (५)
सायंदेव नरहरी नंदी
रंगुनि गेले ब्रह्मानंदी
सिद्ध सांगती नामधारका, या नामातच राम  (६)
इथेच स्वामी चिदानंदही
गुरु महिमेची फिरवुनि ग्वाही
देह त्यागुनी अमर जहाले, स्मारक इटगी ग्राम (७)
प्राण शरीरी आहे तोंवर
अखंड भज मनि दत्त दिगंबर
जळुनी जाती पापे सारी, होत पूर्ण तव काम (८)
जो नव लीला जना दाखवी
निज शक्तीने विश्व हालवी
भाव भक्तिने हात जोडुनी, कर तू लांब प्रणाम (९)
नित्य गीत हे वदता वाचे
सार्थक होइल या जीवाचे
जन्म मृत्युचा चुकवुनि फेरा, मिळेल मोक्ष विराम (१०)
---------------------------




----------------  ==============  --------------

१३.१ करवीर अंबाबाई क्षेत्र वर्णन

कोल्हापुर करविर क्षेत्रीऽ, 
  अवचित मी गेले बाईऽ
पाहिली चतुर्भूज मूर्तीऽ, 
  साक्षातच अंबाबाईऽऽ  (ध्रु)

नेसली पीतांबर पिवळा,
  घातली भरजरी चोळीऽ
नथ नाकि, कर्णि कुंडलेऽ
  मळवऽऽट शोभला भाळीऽ 
मातुलिन्ग उजवे हाती
  शिवलिन्ग मस्तकावरती
सूर्यकिरण मुखावरि पडलेऽ
  पाहुनि मन तल्लिन होईऽऽ    ।।१।।

देउळाचि अघटित रचनाऽ
 अवलोकन केली नयनीऽ
ठाई ठाई पुराणे वदतीऽ 
  किति सभा, कीर्तने स्तविती
किति भक्त दर्शना येती
  राउळात गर्दिच गर्दीऽ 
सर्वही अंबिका स्तवितीऽ
  स्तुति स्तोत्रेऽ गीते गातीऽ    ।।२।।

कैलास हिमालय शिखरी  
  भय जनासि जाता वाटे
पशुपती सांब तो भोळा 
   अक्षय अंबा शिरि येथे
"दे मजला अक्षय चुडे"
   लक्ष्मी चरणी प्रार्थितसे
पाहुनिया अंबाबाई   
      मन माझे तल्लिन झाले   ||३||

----------------  ==============  --------------

१३.२ योगेश्वरी जगदम्बा माउली

बहुत दिनाची. आंस मनीची, आज पूर्ण जाहलीऽ
श्री जगदंबा, कुलस्वामिनी, योगेश्वरि पाहिलीऽ 
                  नयनि मीऽ, योगेश्वरि पाहिलीऽ ।।ध्रु।।
हेमपिठावरि, सुवर्णमूर्ती, रूप किती सुंदरऽ
                 जननिचे, रूप किती सुंदरऽ
भाळी कुंकुम, नेत्री अंजन, वेणीऽ पाठीवरऽ
                  देविच्या, वेणीऽ पाठीवरऽ
लाल पैठणी, हिरवि कंचुकी, जरि बुट्टे त्यावरऽ
                 झळकती, जरि बुट्टे त्यावरऽ
कंठीऽ मंगळसूत्र तन्मणी, लफ्फा चंद्रहारऽ
                  अंबेच्या, गळा चंद्रहारऽ
दंडी वाकी, बाजुबंद ते, करि कंकणे घातलीऽ
                    आइने, करि कंकणे घातलीऽ  ।।१।।
पोत तांदळी, होनांची ती, माळ गळा घातलीऽ
                 जननिनेऽ, माळ गळा घातलीऽ
रत्न मुगुट शिरि, कर्णि कुंडले, नथ नाकी शोभलीऽ
                           आइच्याऽ, नथ नाकी शोभलीऽ
पुष्पांचा संभार सभोवति, अंगी उटि लावलीऽ
                       आइच्याऽ, अंगी उटि लावलीऽ
नयनी माणिक रत्नांची ती, दिव्य प्रभा फांकलीऽ
                     चहुंकडे, दिव्य प्रभा फांकलीऽ
काय वर्णु मी, रूऽप जननिचे, मति माझी गुंगलीऽ
                      पाहुनीऽ, मति माझी गुंगलीऽ ।।२।।

सांज सकाळी, पूजे समयी, वाद्य गजर सुस्वरऽ
                        होतसे, वाद्य गजर सुस्वरऽ
सुहास्य वदना, माय भवानी, प्रसन्न भक्तांवरऽ
                       सदोदित, प्रसन्न भक्तांवरऽ
ताट चांदिचे नैवेद्यासी, चटण्या कोशिंबिरीऽ
                 भाज्या बहु, चटण्या कोशिंबिरीऽ
वरण भातावर साजुक तुप ते, पुरण पोळि साजिरीऽ
                           आइला, पुरण पोळि साजिरीऽ
सद्भावे नैवेद्य अर्पितीऽ, देति विडा दक्षिणाऽ
                  अंबेला,  देति विडा दक्षिणाऽ  ।।३।।

अनन्य भावे, नमिति भक्तजन, जोडुनि बद्धांजलीऽ
                           आइला, जोडुनि बद्धांजलीऽ
ब्राह्मण भोजन करण्या बसले, अन्नदान पंगतीऽ
                       जेविती, प्रसाद खुषिने कितीऽ
भाताची मुद, गव्हल्याची खिर, पुरण पोळि सुंदरऽ
                          वाढिती, साजुक तुप त्यावरंऽ
नाजुक बहुपरिची पक्वान्ने, केली भरपूरऽ
                      वाढिती, पुरे म्हणति  तोवरऽ
विडा दक्षिणा समर्पुनी मग, नमिती कर जोडुनी
                    भक्त ते, नमिती कर जोडुनी ।।४।।

----------------  ==============  --------------

१४.१ श्रीकृष्णजन्मकथा 


 श्रद्धा भक्ति युक्त "शरणागति" ची 'भावना' हा एक परमेश्वराशी जीवात्म्याला बांधू शकणारा बळकट असा दोरखंड आहे.   अद्भुत चमत्कारांनी भरलेली कथानके ही ("शरणागति" ची) भावना जागृत करण्याचे  काम  करतात.
  "श्रीकृष्ण जन्म कथा"  हेही  एक असेच 'अद्भुत ' रसांत डुंबलेले रसाळ कथानक आहे.

चाल :  "राऽम जन्मलाऽ,  ग सखेऽ, राम जन्मलाऽऽ !!!" या गीतासारखी

  चन्द्र वंशि, यदु कुलांऽत, कृष्ण जन्मलाऽ 
  ब्रह्मादिक, सुरवरासि, हर्ष जाहला 
ग सखेऽ!, हर्ष जाहलाऽऽ (धृ) 

  द्वापरान्ति, दुष्ट राज्ञ, माजतां अतीऽ 
  श्रावण्  मासि, कृष्ण पक्षि, अष्टमी तिथी 
  मध्य रात्रि, रोहिणीत, रोहिणीपती  
  चन्द्रोदयि, अवतरले,  श्री जगत्पती 
देवकीस, वसुदेवा, हर्ष जाहलाऽ
बहुत,  हर्ष जाहलाऽ  (१)

   सुरवरांऽदि,  आनंदुनि,  पुष्पे वर्षती 
    अप्सरादि, नृत्य करिति, वाद्ये गर्जती 
  गंधर्वहि, गीते गाति, सुस्वरे अती
  दक्ष यक्ष, किन्नरादि, मोदे गर्जती  
सप्तर्षी, मुनिवरासि, हर्ष जाहलाऽ
अतीव,  हर्ष जाहलाऽ  (२)

  नील  वर्ण, अष्ट वर्ष,  मूर्ति साजिरीऽ 
  शङ्ख, चक्र, गदा, पद्म   घेतले करीऽ 
  दंडि वाकी,  बाऽजुबंद, मुकुट  तो शिरीऽ 
  कटि कसिला,  पीऽताम्बर, मेखला वरी 
लौस्तुभ मणि, तुलसी हार, कंठि  घातलाऽ 
हाऽर, कंठि शोभलाऽऽ (३)

     दिव्य रूप, बघुनि जननि,  वदत सत्वरी 
   "मम सुत हरि, होउनि मम, आंस करि पुरीऽ "
   कृष्ण म्हणे, "घेताच मी, बाल रूप न्या 
   गोकुळांत, यशोऽदेऽच्या, कुशित झोपवाऽ
शीऽघ्र मला, नन्द मदिरांत पोचवा 
मला, शीऽघ्र पोचवाऽऽ  (४) 

  मम 'माया', अवतरली, नन्द मदिरीऽ 
    ताऩ्ही ती, नंदसुता, आणा झडकरी 
  देवकीचि, कन्या  तिला,  समजुनी झणी
  दुष्ट कंस, मारण्यास, उचलता क्षणी 
आकाशी, उडुनि वीज, लखलखेल  महान् 
उडुनि, कडकडेल  महान्! " (५)

  बाल बघुनि जननीसी हर्ष जाहलाऽ 
  धरिता  हृदि, अश्रु पूर, नयनी लोटला  
  घेता  करि, वसुदेवे, तुटति  श्रुन्खला
  निद्रित ते, द्वारपाल, 'मार्ग' मोकळा 
'वृष्टि' बघुनि, फणि पसरुनि, शेष धावलाऽऽ 
फणाऽ, शिरि धरावया   (६) 

  श्रीहरिच्या, पद स्पर्शे, यमुना दुभंगली 
   वसुदेवा, देइ मार्ग, सत्वरी ऽ नदीऽ 
   धावे त्वरित, घुसुनि त्वरे, नन्द मन्दिरीऽ 
  'निद्रा'धीन, यशोदा कुशित, ठेविला हरीऽ 
उचलुनिया, 'माया' करी, परत चालला ऽ
शीघ्र, परत चालला ऽ  (७)
     

  काराऽ गृहि, येता पदीऽ,  जडति शृन्खला ऽ
  बाल रुदन, उच्च स्वरे, जाग रक्षका! 
  वृत्त कळे कंसासी, येत सत्वरी 
   वधण्यासी,  कन्येसी, घेइ  निज  करी 
  निसटुनि ती, जाइ गगनि, करित गर्जना! 
कठोर, करित गर्जना!  (८)

  "मूर्खा, दुष्ट,  क्रूर, पापि, नीच, निर्दयीऽऽ 
    हे कंसा, तव शत्रू , वाढे 'गोकुळी' 
   उचित समयि, खचितच  तो, वध तुझा करी 
  सावध तु, हॊउनि जा, शरण त्याजलाऽ"
परिसुनि वच , भीतीनेऽ, कंस  दचकला ऽ 
भयार्त, कंस  दचकला ऽ  (९)

  यशोदांकि, खेळतसे,  सावळा 'हरीऽ'
  बाळ बघुनि,  नंदहि बहु,   हर्षे  अंतरीऽ 
  वाद्ये बहु, वाजताति,  नाद  अंबरी 
  दाने देइ,  नंद  द्विजा, 'तृप्ति' अंतरी , 
ताटि भरुनि, शर्करेसि, वाटि सकलिका
प्रजेसि,  वाटि शर्करा  (१०) 

 अंगि टॊपी, बाल लेणी,  प्रभुसि घालिती 
  रत्न जडित, पाळण्यांत,  हरिसि निजविती 
  'कृष्ण' नाम, ठेवि माय, गोपी हलविती 
  हळदि कुंकु,  ओट्या भरती, पेढे वाटिती 
गीत गात,  गोपी हरि, रूपि रंगल्या  
गोपि, हर्षे नाचल्याऽ (११)

  " 'कृष्ण' जन्म", गीत नित्य,  गाइ  रे मनाऽ 
  हरि स्मरणीऽ, रमशिल तरि. चुकति यातना
   घन श्याम, 'कृष्ण' रूपि, वृत्ति रंगल्या
  सावळ्या, गोपालकास, स्मरत मति सदा  
जय जय, गोपाल कृष्ण, कृष्ण हरि, हरी 
जय जय, राधे मुकुन्द, मुरलीधर हरी   
राधा, मुरलीधर हरी; राधा, मुरलीधर हरी  
गाता, लाभे सद्गतीऽऽऽ 
    गाऽता, लाऽभे सद्गतीऽऽऽ !!! (१२) 

---------  ============  -------------

१४.२ गौळणी


(गौळण_१ ) 

  'भागवत' आदिक अनेक पौराणिक ग्रन्थांमधून भगवान श्रीकृष्णाच्या बाल लीलांचे आध्यात्मिक दृष्ट्या सांकेतिक भाषेत वर्णन केलेले आढळते.
  लेखिकेने या गौळणीत  व्यासादिकांनी केलेल्या, त्या सांकेतिक भाषेतील सूचनांचा  लेखिकेला झालेला उलगडा व्यक्त केला आहे.

  गौळण गं मी गौळण गं 
  गोकुळची मी गौळण गं (धृ )

   ज्ञान गायिचे 'दूध' काढले,  व्यवहाराचे 'पाणि' मिसळले 
  'सुज्ञानाग्नी'ने तापविले,  सत्याचे 'विरज़ण' हि घातले, 
वैराग्याचे 'दही' विरजले, नंतरी केली घुसळण गं, 
बाई,  मी केली खुप घुसळण गं. 
गौळण गं , मी गौळण गं  (१)  

  'सत्वा'चे नवनीत निघाले,  'अमृत' मिसळुनि  स्वानुभवांचे 
    जे  जे कोणी मला भेटले,   त्या सर्वासी मी ते दिधले 
लोणी-साखर वाटप गं, करु, लोणी-साखर वाटप गं
बाई,  हेच आमचे आचरणं गं,
गौळण गं, मी गौळण गं  (२) 


  'गोकुळ' माझे विशाल जीवन,  'तनु'स्वरुप मी राधा गौळण 
    भाव भक्तिचे भरुनी रांजण,  श्रीकृष्णाचे करिते  पूजन 
जीवात्मा - परमात्मा मीलन, साधण्यस मम सतत परिश्रम
'हरि' नाम जपाचे उच्चारण, हाकां मारु श्रीकृष्णा गं
गौळण गं, मी गौळण गं  (३) 

  आपापल्या मनि 'कृष्णा' साठी, 'लोण्यां'चे गोळे सांठवुनी 
  'परमात्म्याला' अर्पण करुनी, संगे त्याच्या  'फुगडी' खेळुनि 
अमर ठेवु त्या आठवणि  गं, करु,  आठवणिन्ची  सांठवण गं 
बाइ, गौळण गं, मी गौळण गं 
गोकुळची मी, गौळण गं (४)

 
---------  ============  -------------

 (गौळण_२ ) 
 
  थंडीमध्ये गौळणीन्नो,   काय तुमची घाई ?
  निजू द्या गं काऩ्होबाला, उठवू नका शेषशायी  -- (धृ )

  कालच तुमचा बन्सीवाला,  कालीयासी मर्दुन आला 
  शीऽण त्याचा नाहीऽ गेला, अजूनही दिसतो थकलेला! 
झोपू द्या हो काऩ्होबाला ! काय तुमची घाई ? 
बायांनो!  काय तुमची घाई ? (१)

  झोपेवरती  लाथं  मारुनी,  भक्त-संकटी जातो धावुनि 
  "निद्रा सुख" तर  याच्या बाई, 'पत्रिके'त मुळि दिसतच नाही  
झोपू द्या हो काऩ्होबाला !  काय तुमची घाई ? 
बायांनो!  काय तुमची घाई ?(२)

  मेला 'पेन्द्या' बोलवाया आला, काऩ्होबा   लगबगीनं  उठला 
  बोबड्यांची आवड बहु  याला, खेळांची फार आवड त्याला 
झोपू द्या बाई ! काऩ्ह्याला, झोपू द्या बाई !
बायांनो!  काय तुमची घाई ? (३)

    एकनाथ  पन्ताची गौळण, भारुड, गारुड गूढ सुचिन्तन
    जना बाइच्या 'बंदिशाळेतुन, शिदोरीस 'नाम्या'च भांडण 
झोपेत सुटलाय या व्यापातुन,  काय तुमची घाई ?
बायांनो!  काय तुमची घाई ? (४) 
   
  सेना ऩ्हावि करि 'चंपि-बोळ' पण, नरहरि घाली कटीस बंधन !
  गरीबांच थालीपीठ, शिकरण,   पांडुरंग खाइ मनापासुन  
जरा झोपता त्या सुस्तीतुन, काय तुमची घाई ?
बायांनो!  काय तुमची घाई ?(५)


---------  ============  -------------

(गौळण_३ ) यमलार्जुनोद्धार  ( चाल : अभंग : आलिया भोगासी )
  
  'नलकुबेर' व 'मणिग्रीव' या दोघा यक्षराज कुबेराच्या मुलांना नारद ऋषीन्च्या शापामुळे मृत्युलोकी गोकुलात दोन 'अर्जुन' वृक्ष बनून रहावे लागले.
  भगवान श्रीकृष्णाने त्यांना शाप मुक्त करून पुन: स्वर्गात गंधर्व लोकी  त्यान्ची रवानगी केली.  

   परब्रह्म निष्काम, तो हरी  निर्गुण | आला रूपे सगुण,  गौळिया घरी 
    कृष्ण नवनीत, चोरी करी नित्य | नित्य ही तक्रार, गौळिणीन्ची
  म्हणोनी बांधीत, उखळासी पोरा | जे अवजड थोरा, हलविण्याला 
  दंडी जड वाक्या, पायी बांधॆ वाळे | जेणे घुंघरू निनादे, रांगताना 
  हरी खोडकर, नायके 'समजूत' | त्यावरी उपाय, यशोदेचा हा (१)

  म्हणती गौळिणी, काऩ्ह्याची पाउले | आज कशी न ये, आमुचे दारा 
  रांगत रांगत, उखळा समवेत |  हरी असे  खेळत, राजांगणी  
  दोन थोर वृक्ष, शेजारी शेजारी | मधुन घुसे हरी, उखळांसहित 
 उखळ अडकले, झाडान्च्या सान्द्रीत | लीलया रांगत, काऩ्हा जाई
 काऩ्ह्याच्या शक्तीने, वृक्ष उन्मळले | दोऩ्ही धडाडत, पडले खाली
  'अर्जुन' वृक्षांची,  जोडी  गंधर्वान्ची | 'शाप' मुक्त झाली, हरि कृपेने 
  हस्त जोडोनीया, करोनी नमन | स्वर्गाकडे गमन, केले त्यांनी 
  वृक्ष उन्मळीन्चा, शब्द घोर झाला | धावली यशोदा, काळजीने 
  वृक्षान्च्या शाखांना, धरुनि उभा ठेला | पाहुनीया बाळा, कडे घेई 
  "घोर आपत्तीत, टाकिले मी बाळा" | म्हणोनी स्वत:ला, शिव्या देई 
  दैवाने वाचला, देवाने वाचवला  | म्हणोनी हरीला, भरवी लोणी  (२)

---------  ============  -------------

  (गौळण_४ ) कालिया मर्दन ( चाल : अभंग : आलिया भोगासी )

 कश्यपाने वरिल्या, दक्षकन्या तेरा | सृजन करावया, नाना वंश 
  अदितीच्या पोटी, जन्मले आदित्य | दिती पोटी दैत्य, जन्मा आले 
  विनीताची मुले, अरुण,गरुडादिक | पक्षी वंश कुळे, जन्मा  येती 
  कद्रू तनय सारे, नव नाग कुळे | अनंत, वासुकी, तक्षकादी 
  शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल | धृतराष्ट्र, कालिया महानाग
  विनीता कद्रुंच्या, भांडणाने आले | वितुष्ट गरूड, नागांमध्ये 
  गरूडाच्या भेणे, कालिया लपलासे | कालिन्दीच्या डोही, मथुरेपाशी 
  नाग विषे झाले, डोहातील पाणी | विषपूर्ण  झणी, कालकूटे (१) 

    कृष्ण शिशू वाढे, गोपालांच्या संगे | रानी  गायी गुरे, चरवीतसे 
   गुरे चरती रानी, तोवरी श्रीहरी | संगे गोप, गोपी,  खेळ खेळे 
  एकदा चेन्डूचा, क्रिकेट सारखा | खेळ तो खेळता, यमुनेकाठी 
  चेन्डू उडवीला, हरीने गगनी   | पडला तो जाउनी, यमुना डोही 
  चेन्डू आणावया, धावला श्रीकृष्ण | डोही घाली झेप,  चेन्डू साठी 
  गोप कुमारांत, जाहला आकान्त | गेले कोणी धावत, नद गृहा 
  ऐकुनी वृत्तांत, यशोदेसह नंद | गोकुळीचे गोप, धावुनि आले 
    कृष्ण डोही बुडला, कालियाने गिळला | ऐशा रडारडीला, ऊत आला (२) 

   चेन्डू हुडकीत, डोहाच्या तळांत |  कृष्ण पाहे सर्प, नाग काळा  
  कालियाने क्रोधे, उगारिता फणा | हरी नरडीला, धरुनि आवळे 
  कासावीस झाला, प्राण कालियाचा  | सैल पडे विळखा, त्राण जाता 
  कालियाच्या स्त्रिया, जमोनिया सगळ्या | विनविती हरिला, "त्राहि, त्राहि"
  "हा घे तुझा चेन्डू, नको आता भांडू | पुसू नको कुंकू, कृपया आमुचे "
  कृष्ण  म्हणे "आता, सोडोनी हा डोह | जावे तुम्ही सर्व, समुद्रांत
  सागर 'गर' पूर्ण, तेथे तुमचे गरळ | समाविष्ट होईल,  न बाघे कोणा !" (३)

  कालिया म्हणे "देवा, गरूडाच्या भये | येथे लपलो आहे, मार्ग सांग" 
  कृष्ण  म्हणे "मला, घेउनि  फणीवरी | न्यावे तीरावरी, चेन्डू सहित 
  मीही फणीवरी, करोनीया नृत्य | 'पदचिऩ्हे' उमटवीन, तेथे  माझी 
  ती चिऩ्हे पाहोनी, गरुडासम प्राणी | मारतिल ना कोणी, तुजसी आता"
  येणे वरदाने, होऊनी निर्भय | कालियाने फणा, प्रसारीला 
  फण्यावरी  कृष्ण, करीतसे नृत्य | मुरली वाजवीत, वरती आला 
   त्या दृश्या  पाहोनी, चकित सर्व झाले | गोप आनंदाने, नाचताती 
  हरीचा निरोप, घेउनी कालिया | सागरांत गेला, रहावया (४)

  हरिला राज भुवनी, आणिला मिरवीऽत | सिहासनी नंद, बैसवी तया 
  दही दूध लोणी, मागे चक्रपाणी  | आणुनी गौळिणी, भरविताति  
 प्रेमाच्या पाऩ्ह्यांचे, दूध काऩ्होबाला | दाव्यांनी   बांधला, वात्सल्यांच्या
 शंख, चक्र, गदा, पद्म सोडुनीया | मुरली धरी हाती,  शारंगपाणी  
  मुरलीच्या नादे, गोपी गायी गुरे | मेळविली पोरे, गोपालांची
  बहुता कष्टे लाभे, जो योगी मुनी जना | तोच गोपालांना, खेळगडी 
   बहुता जन्मांतरीन्च्या, सांठलेल्या  पुण्ये | माधवा जोडिले, सुदैवाने  
  अनंत पवाडे, तुमचे  न आकळती | मावा गोड अती, मम कर्णासी   (५)

---------  ============  -------------

(गौळण_५ )  गोपाल कृष्णाची तक्रार : 
  
  गोपी, गोपिकांनी कृष्णाच्या विरुद्ध यशोदेकडे केलेल्या तक्रारी  लोकप्रिय आहेत. 
  पण इथे लेखिकेने बाल श्रीकृष्णाने  गोपी, गोपिकां आणि त्यांच्या थोराड बालकांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीन्चे मनोरंजक वर्णन केले आहे. 

  नाही  गं  आई, मी तर काही, लोणी खाल्लंच  नाही (धृ)

 "भल्या  पहाटे यमुना कांठी घेउन गेलो गाईऽ!
  दिनभर वणवण भटकुन आलो  परतुन  संध्या समयी (१)
कितीऽ उंचावर मडके टांगलेऽ,  मी तर छोटा आई !
हात हे माझे कसे पोचतिल ? तूच सांग गं बाई (२)
  गोपाळांची पोरे मोठ्ठी खट्याळ भारी बाई 
  आपण खाउन लोणी त्यांनी  फासलं माझ्याहि तोन्डी    (३)
  या गोपीही वाइट मोठ्ठ्या, छळती मजला बाई !
उचलुन नेतीऽ, पापे घेतीऽ, रागेभर यांनाही (४)
  आज चुकवुनी आलो यांना, म्हणुनी या सा-याही 
  मला बघाया येथे आल्या, सांगत कारण कांहीऽ!  (५)
ऐकुन यांचे  रागे भरशिल, मलाच तर मग मीही 
करीन 'कट्टी', तुझ्याशी कधीऽ, कधीऽच  बोलणार नाहीऽ (६)
  धर ही आपली 'काठि, कांबळी' नकोच मज ही काही" 
  हसुनि यशोदा घेउन जवळी, धरि कृष्णाला हृदयी (७)

---------  ============  -------------

१४.३  गोपाल कृष्ण ध्यान ( वर्णन ) 


  "अष्टांग योग" क्रियांमध्ये  'धारणा' आणि 'ध्यान' अशा दोन पाय-या  ओलांडुन 'समाधि' नावाच्या अंतिम स्थितिला जाता येते. 
  या  अशा दोन पाय-या साठी देवाची मुर्ती, फोतोग्राफ, नीरांजन वा मेणबत्तिची ज्योत वगैरे दृश्य (बहिर्मुख) साघने वापरली जातात.
  अथवा 'ध्यान'मंत्र वा अभंग हे अंतर्मुख साधन  वापरून (मनांतल्या मनांत म्हणत, पुटपुटत वा ऐकत ) या क्रिया केल्या जातात. 
  "सुन्दर ते ध्यान -- " हा एक असाच उपयुक्त  अभंग आहे.
  येथे अशाच  उपयुक्त वर्णनाचे एक   "गोपाल कृष्ण ध्यान" रेखाटलेले आढळते. 

  काय देवाचा वस्त्रालंकार  !
   पाहुनी  धन्य मम  नेत्र ! (धृ)

  कस्तुरी टिळक लल्लाटी,
  घातली गळ्यामधे कंठी,
 शाल पांघरली  जरतारि !,
  ब्रह्मदेवासिहि  न कळे 'सूत्र' 
पाहुनी  धन्य मम  नेत्र ! (१)

  मोर पिसारा शोभे टोपीला !
  पीताम्बर कटिला कसिला. 
  घोन्गडी काळि खान्द्याला, 
योग्य 'ध्यान', धारणेस पात्रं  
पाहुनी  धन्य मम  नेत्र !  (२)

  शिरि मुकुट  रत्न जडिताचा !
  काय डौल नन्द तनयाचा, 
  वेदांचि खुन्टली वाचा, 
  करि धरी सुदर्शन चक्र ! 
पाहुनी  धन्य मम  नेत्र !  (३)

  असा मुकुन्द सावळा येई
   भक्तास्तव 'सगुण' तो होई
  ज्याला  त्रिभुवन 'पांघरुण' पाही !
तो हृदयी माझ्या वसला !
   ध्यानी-मनि-स्वप्नी दिसला !!!
    पाहुनी  धन्य मम  नेत्र ! 
पुलकित  मम गात्रन् गात्रं ! (४)

---------  ============  -------------



-------------------------------------------------

अवांतर विषयांवरील रचना


१. अणुशक्तीनगर


अणु शक्ति नगरी (चाल: शरयू तीरावरी अयोध्या -- : (गीत रामायण) च्या अगदी जवळची) वाल्मिकी रामायणांत तत्कालीन वास्तु शास्त्रानुसार वसवलेल्या 'अयोध्या' नगरीचे सुन्दर वर्णन केलेले आहे.
  अलीकडे भारत सरकारने केन्द्रीय 'अणुशक्ति' विभागाच्या नोकर वर्गासाठी  मुंबईत चेम्बूरच्या पलीकडील देवनारच्या डोन्गराळ  प्रदेशांत एक वसाहत बांधलेली आहे.
  या "अणु शक्ति नगरी" वसाहतीत लेखिका (लक्ष्मी) अनेकदा (आपल्या मुलासुना-नातवंडां बरोबर) रहात असत. त्या त्यांच्या अनुभवाचे रसभरित वर्णन :
 
  देवनारच्या कडेकपारित "अणु शक्ती  नगरी"
  वसे ही "अणु शक्ती  नगरीऽ!"  (धृ)

  डाक्टर 'भाभा' नगरि रचयिता !
  दिपवी नेत्रा तन्त्र कुशलता !
 'थांब्या'वरती उभे ठाकता 
  सी व्ही रामन् पथ हा सांगे 
'केन्द्र' लपे डोन्गरी,
अशी  हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ,! "  (१)

  भव्य चौक अन् विशाऽल वास्तुऽ
  'इन्द्रप्रस्थ' आणि  'कपिलवस्तु' !
  केळु, शाळु, झेन्डू  सुखवस्तु
  'तक्षशिला', अन् 'पाटलि' च्यांना 
'जनता' नाही दुरीऽ  
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (२)

  प्रभात समयी निनाद 'किण किण '
  दुग्ध केन्द्र सुरु, अंधारांतुन 
  'शान्ति' दूत घुमतात घरातुन
  सोनेरी किरणे आंब्यातुन 
कोकिळ कूजन करी 
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (३)
  अस्तमानि रंगते  पश्चिमा 
  नील वर्णि सोनेरि लालिमा 
  सखीसवे फिरण्यांत मधुरिमा
  फळे-भाजिसह, स्वागत करिते
  रम्य 'हस्तिना पुरीऽ!' 
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (४) 

  विद्या पीठ प्रतिक 'नालंदा'
  वृन्दावन आणि अलकनन्दा 
  गंगोत्री तशि पावन गोदा
  श्री शिव शन्कर भवानी सवे
अभिषेका स्वीकारी 
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (५)

  संत जनांच्या पवित्र स्मरणी 
  सप्त वाद्यांच्या नामोच्चरणी
  गिरि शिखरांच्या सुखद दर्शनी 
  हिरवळीवरी विसांवताना
'वृत्ती' स्थिरता धरी 
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (६)

  जोडिस संगे दोनच बाळे
  कुटुम्ब 'छोटे', सौख्य  निराळे 
  दृष्य दिसे रेखीव आगळे 
  एल्लोरादिकांची सजीव जणु हीऽ
'शिल्प' कृतिच  गोजिरीऽ 
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (७)

  आधुनिक भूषा रंग संगती
  गर्व सुरूप, मुलायम  कान्ती 
  पप्पा-मम्मि "हौडुयुडु" शिकविती 
  चित्र मनोहर पाहुनि हुरहुर
जनता मन मन्दिरी 
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (८)

  घरा घरांतुन एक दिलासा 
  ग्राइन्डर, मिक्सर, इडली, डोसा
  'सत्य साइ' वरि पूर्ण भरोसा 
  "भारतीय संस्कृति"चाहि  'ठसा'
परकिय छन्दांवरी 
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (९)

  रंग नसे या इमारतीन्ना
  'मन्द' तेज, येथीऽल दिव्यांना 
 'जाड-जाऽड' पडदे  खिडक्यांना
  'युद्ध' आणि पर्जन्य काळिही
अति सुरक्षितता हवी  
'नगरी'ला, ध्येय हेच  अंतरी 
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (१०)

  निरव शांतता, रम्य परिसरी
  सोमवारि जा नर्मदेश्वरी 
  टीव्ही करवी  विश्व भरारी 
  लिफ्ट नेतसे क्षणांत मनुजा 
हिमशिखरान्च्यावरी 
प्रभूचा 'जयजयकार' तु करी 
अशी हीऽ, "अणु शक्ती  नगरीऽ!" (११)


---------  ============  -------------


















4 comments:

अनिल पोंक्षे said...

आपल्या आईंबद्दलची माहिती, त्यांच्या रचना, कथा, कविता आणि शेवटी अनुशक्ती केंद्रा संबंधीची रचना आवडल्या. सर्व माहिती खूपच छान पणे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जतन करून ठेवली आहे. त्यामुळे ती आप्तेष्ट व मित्रमंडळींना वाचण्यास उपलब्ध आहे. धन्यवाद🙏

Anand Ghare said...

धन्यवाद. माझ्या आईचे निधन ३८ वर्षांपूर्वी झाले त्या काळात काहीच सोयी नव्हत्या. माझे मोठे बंधू डॉ.धनंजय याने एक जुनी वही सांभाळून ठेवली होती. त्यातल्या कवनांचे त्याने १५-२० वर्षांनंतर पीडीएफ फाइलमध्ये रूपांतर करून ठेवले होते. दोन वर्षांपूर्वी मी ते सगळे वेगळी मांडणी करून ब्लॉगवर संग्रहित केले. आता ते माझ्या आप्तेष्ट आणि शुभचिंतकांना वाचण्यासाठी उपलब्ध झाले आहे.

Anonymous said...

Khup khup chan dhanyawad

Anand Ghare said...

धन्यवाद. Anonymous मित्रांनी खाली आपले नाव दिले तर हा कुणाचा प्रतिसाद आहे ते मला समजेल.