Wednesday, June 10, 2020

कॅलिफोर्नियातले टॉरेन्स -२


कॅलिफोर्नियाला पॅसिफिक महासागराचा रम्य असा किनारा लाभला आहे. टॉरेन्स हे शहरसुद्धा या किनाऱ्यावरच आहे. या शहराला लागूनच रिडोंडो बीच नावाचा एक सुंदर बीच आहे. इथे समुद्रकिनाऱ्याला समांतर असा एक रुंद रस्ता आहे, त्याच्या बाजूने चालत किंवा पळत जाणाऱ्या लोकांसाठी आणि सायकलस्वारांसाठी वेगवेगळ्या मार्गिका आहेत. हे सगळे रस्ते समुद्रसपाटीपासून चार पाच मीटर उंचावर आहे. तिथून खाली वाळूवर उतरायला जागोजागी पायऱ्या ठेवल्या आहेत. म्हणजे मुंबईतले मरीन ड्राइव्ह आणि जुहू बीच या दोन्ही जागांची मजा या रिडोंडो बीचवर एकत्र घेता येते. 

हा बीच आमच्या घरापासून तसा जवळच म्हणजे दोन अडीच किलोमीटर्स अंतरावर आहे. आमच्या घराजवळच राहणारा एक सुदृढ तरुण रोज सकाळी जॉगिंग करत तिथपर्यंत फिरून येत असे असे तो सांगायचा. पण ते माझ्या कुवतीबाहेर होते. मी कदाचित तिथपर्यंत चालत फिरत जाऊ शकलोही असतो, पण घराकडे परत कसा येणार? तिकडे आपल्या वाशी किंवा पुण्यासारख्या ऑटोरिक्शा मिळत नाहीत. त्या असत्या तर मी दर आठवड्याला एकादी चक्कर मारली असती. 


आम्ही दोन तीन वेळा या बीचवर कारमधून प्रभातफेरीसाठी गेलो. रस्त्याच्या कडेला या टोकापासून त्या टोकापर्यंत पार्किंग स्लॉट्स आहेत, पण त्यातलेही बरेचसे भरलेले असतात. तिथली एकादी रिकामी जागा बघून तिथल्या चौकोनात आपली गाडी उभी केली. तिथल्या यंत्रात एक नाणे सरकवून तिथे अर्धा तासासाठी गाडी उभी करायची परवानगी घेतली. मी विचार केला की वाशीला मी तेवढ्या पैशात रिक्शाने घरापासून तिथपर्यंत जाऊन परत आलो असतो आणि तिथे वाटेल तेवढा वेळ थांबू शकलो असतो.  

आमच्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळे आम्ही तिथल्या मरीन ड्राइव्हवरूनच एक फेरी मारली आणि वाळूत मजा करणाऱ्या मंडळींची गंमत थोडी दुरूनच पाहिली.  अमेरिकेतले लोक शौकीन असतात. मजेत फिरतांनाही एका हातातल्या बीअरचे घोट घेत आणि दुसऱ्या हातातल्या सटर फटर खायच्या वस्तूचा फराळ करत असतात. पण त्यांचे रॅपर्स किंवा कॅन्स वगैरे मात्र जागोजागी ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यातच कटाक्षाने टाकतात. शिवाय किनारा स्वच्छ ठेवणारे नोकर सारखे फिरत असतात आणि वारा किंवा लाटांबरोबर काही कचरा किनाऱ्यावर आलाच तर ते तत्परतेने गोळा करत असतात. त्यामुळे तो सगळा परिसर कमालीचा स्वच्छ ठेवला जातो.  तिथले शौकीन तोक वाळूवर बसण्यासाठीसुद्धा चांगला जामानिमा करून येतात आणि समोर समुद्राच्या लाटा पहात सूर्याच्या कोवळ्या उन्हाची मजा घेत आरामात पडून राहतात.  काही लोक लहानशा फायबरच्या होड्या घेऊन येतात आणि सरळ समुद्राच्या लाटांमध्ये घुसतात. 

टॉरेन्सजवळही आपल्या मलबार हिलसारखी श्रीमंतांचे बंगले असलेली एक टेकडी आहे. तिकडे जाणारा रस्ताही समुद्रकिनाऱ्याने आहे. एकदा आम्ही संध्याकाळच्या वेळी त्या रस्त्याने ड्राइव्ह करायला गेलो. मुंबईप्रमाणेच टॉरेन्सही त्या देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. त्या दिवशी मला पॅसिफिक महासागरात बुडी घेणाऱ्या मावळत्या दिनकराचे दर्शन घ्यायला मिळाले.   


लॉस एंजेलिस शहराजवळ अनेक बीचेस आहेत, त्यातला सँटा मोनिकाचा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी अत्यंत आवडता आहे. जगभरातून जिवाची अमेरिका करायला आलेल्या टूरिस्टांची प्रचंड गर्दी तिथे नेहमीच असते. इथे चांगला लांबलचक आणि सुंदर असा बीच तर आहेच, शिवाय बीचवरच एक मोठा अॅम्यूजमेंट पार्क आहे. तिथे अनेक प्रकारच्या राइड्स आहेत, अनेक प्रकारच्या मनपसंत खाद्यंतीसाठी भरपूर ठिकाणे आहेत. तळलेले चविष्ट खेकडे आणि मासे यांचे पदार्थ ही तिथलीही स्पेशॅलिटी आहे.  शिवाय गाणी गाणारे, वाद्ये वाजवणारे, जादूचे किंवा सर्कससारखे खेळ दाखवणारे, तिथल्या तिथे रेखाचित्र काढून देणारे वगैरे कलाकारही रस्त्याच्या कडेला आपल्या करामती दाखवत असतात. त्यामुळे एक जत्रा भरल्यासारखे मनमौजी वातावरण असते. एका ठिकाणी मासे पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म बांधून ठेवला आहे. तिथे हौशी शिकारी गळ टाकून बसलेले  किंबहुना उभे असतात, पण त्यातले बहुतेक लोक पकडलेले मासे खात नाहीत. त्याचा फोटो घेऊन त्याला गळातून मुक्त करतात आणि पुन्हा  पाण्यात सोडून देतात.

माझ्या अमेरिकेच्या या सफरीमध्ये मी जितक्या जागा बघितल्या त्यात मला समुद्रकिनाऱ्यांची अनेक निरनिराळी रूपे पहायला मिळाली.

No comments: