Friday, March 15, 2019

उत्क्रांति, उन्नति आणि अधोगति

परमेश्वर, खुदा किंवा गॉड यानेच या विश्वातली सर्व जीवसृष्टी निर्माण केली आहे, अर्थातच त्याने प्रत्येक जीवाचे सारे गुणधर्म पूर्ण विचारांती काही उद्देशाने ठरवले आहेत आणि हे सगळे मर्त्य मानवाच्या तुच्छ आकलनशक्तीच्या पलीकडे असते अशी शिकवण हिंदू, इस्लाम आणि ख्रिश्चन या प्रमुख धर्मांमध्ये दिली जाते. माणसाने फक्त त्या ईश्वरी चमत्काराकडे अचंभ्याने पहावे आणि त्या जगन्नियंत्याचे आभार मानावेत अशी अपेक्षा असते आणि बहुतेक माणसे शतकानुशतके तेच करत आली आहेत.

पण दोनशे वर्षांपूर्वी जन्मलेल्या डार्विन या शास्त्रज्ञाने यापेक्षा वेगळा विचार केला. त्याला लहानपणापासूनच निसर्गाचे निरीक्षण करण्याची प्रचंड आवड होती. त्याने आयुष्यभर जगभरातले पशुपक्षी, कीटक, वनस्पती वगैरेंचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी तो एका जहाजाबरोबर तब्बल पाच वर्षे फिरून पृथ्वीप्रदक्षिणा करून आला. ते करतांना तो निरनिराळ्या खंडांमधल्या तसेच लहानमोठ्या बेटांवरल्या घनदाट अरण्यांमध्ये जाऊन राहिला आणि त्याने तिथले पशुपक्षी, कीटक आणि रानटी माणसे यांचे अगदी बारकाईने निरीक्षण केले. इतकेच नव्हे तर मिळतील तेवढी जुनीपुराणी हाडे, सांगाडे, कवट्या वगैरे अवशेष तो गोळा करत गेला आणि त्यांच्या सहाय्याने त्याने शेकडो किंवा हजारो वर्षांपूर्वी कुठे कशा प्रकारचे प्राणी किंवा माणसे असतील याचासुद्धा विचार केला. डार्विनने स्वतः तर संशोधन केलेच, त्याने इतर शास्त्रज्ञांची पुस्तके वाचून आणि त्यांच्याशी चर्चा करूनही या विषयामधले ज्ञान मिळवले आणि त्यावर चिंतन व मनन करून स्वतः काही पुस्तके लिहिली. त्यामधून त्याने क्रांतिकारक असे काही नवे सिद्धांत जगापुढे मांडले. 

डार्विन याने दीडशे वर्षापूर्वी मांडलेल्या मुख्य सिद्धांतानुसार जगामधील जीवांची उत्क्रांति (इव्हॉल्यूशन) होत होत त्यामधून नवनवे जीव निर्माण होत गेले आणि अशाच प्रकारे अखेरीस एप या माकडाच्या प्रजातीमधून मानवाची उत्पत्ती झाली. पुढे ही माणसे सर्व दिशांनी जगभर पसरत गेली तेंव्हा त्यांच्यात बदल होत होत निग्रो, पिग्मी, मंगोल, आर्य, द्रविड वगैरे निरनिराळे मानववंश तयार होत गेले. पृथ्वीवर जीवसृष्टीचा उगम झाल्यापासून अब्जावधि वर्षे ही उत्क्रांति सुरूच आहे आणि ती अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे. ही उत्क्रांति कशा प्रकारे होत जाते याचाही एक ढोबळ विचार डार्विनने मांडला होता. त्याने असे सांगितले की प्रत्येक जीव आपल्यासारख्याच अनेक जीवांचे पुनरुत्पादन करत असतो, पण ते करतांना ते नवे जीव अगदी हुबेहूब त्याच्यासारखे न होता त्यात सूक्ष्म फरक होतात. यातले जे नवे जीव आजूबाजूच्या वातावरणाशी जास्त चांगले जमवून घेतात ते अधिक काळ टिकून राहण्याची जास्त शक्यता असते. जे जमवून घेऊ शकत नाहीत ते नष्ट होतात. डार्विनने या नियमाला 'सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट' असे नाव दिले होते.

हे सिद्धांत मांडून डार्विनने प्रत्यक्ष परमेश्वरालाच जीवसृष्टीच्या निर्मितीच्या कामापासून बाजूला केले होते, ही गोष्ट त्या काळातल्या इंग्लंडमधल्या विद्वानांना मान्य होणे शक्यच नव्हते. यामुळे "मी जे काही सांगत आहे ते सगळेसुद्धा त्या महान परमेश्वराच्या मर्जीनेच होत असते" असे सांगून त्याने आपली तात्पुरती सुटका करून घेतली. त्या काळापर्यंत युरोपातली धर्मसत्ता थोडी शिथिल झाली होती त्यामुळे डार्विनचा छळ झाला नाही. शिवाय विज्ञानयुग सुरू झालेले होते आणि अनेक शास्त्रज्ञ स्वतंत्रपणे तर्कशुद्ध विचार करून ते धीटपणे मांडायला लागले होते. त्यातल्याही काही लोकांनी डार्विनला कडाडून विरोध केला, काही लोकांनी त्याला पाठिंबा देणारे आणखी पुरावे सादर केले आणि काहींनी त्याच्या सिद्धांतामध्ये सुधारणा सुचवल्या. काही काळातच डार्विनच्या विचारांना एकंदरीतपणे मान्यता मिळाली आणि ते विचार अजूनही ढोबळ मानाने स्वीकारले जातात. एवढेच नव्हे तर जीवशास्त्राशिवाय समाजशास्त्र, राजकारण किंवा अगदी मोटारी, विमाने किंवा काँप्यूटर्स यांच्याबद्दल बोलतांनासुद्धा उत्क्रांति किंवा इव्हॉल्यूशन या शब्दांचा उपयोग केला जातो इतके हे शब्द आता नेहमीच्या भाषेत रुळले आहेत. सुरुवातीच्या काळात अरण्यात हिंडत राहणाऱ्या आदिमानवाने घरे बांधून वस्ती केली, शेती आणि पशुपालन सुरू केले, असंख्य नवे नवे शोध लावून तो आपले जीवन अधिकाधिक सोयिस्कर करत गेला आणि आजही करत आहे.

भारतात मात्र डार्विनच्या सिद्धांताबद्दल मिश्र भावना आहेत. काही लोक श्रीविष्णूच्या दशावतारातसुद्धा उत्क्रांतीची चिन्हे शोधतात, पण तो एक अपवाद झाला. हिंदू पुराणांप्रमाणे ब्रह्मदेवाने प्रथम काही सर्वज्ञ ऋषी निर्माण केले आणि त्यांनी तिथून पुढे मानवांची प्रजा वाढवत नेली. त्यामुळे पंडित लोक स्वतःला साक्षात ब्रह्मदेवाचे वंशज समजतात. माकडाच्या उत्क्रांतीमधून माणूस जन्माला आला या डार्विनच्या सिद्धांताची आपल्याकडे नेहमी थट्टाच होत असते. एकाद्याच्या माकडचेष्टा पाहून "डार्विनच्या सिद्धांताचा पुरावा पहा" असे म्हणतील किंवा "तुझे पूर्वज माकडे असतील, माझे तर क्षत्रिय होते." असे मिशीला पीळ देऊन सांगतील.

"जुने ते सोने" असे म्हणत पूर्वीचा काळ आणि त्या काळातली परिस्थिती आणि माणसे किती चांगली होती अशा गोष्टी सांगण्यात रमणारे कित्येक लोक मला नेहमी भेटत असतात. रानावनात अन्न शोधत भटकत राहणाऱ्या आदिमानवापासून ते आजच्या युगातल्या आधुनिक राहणीमानापर्यंत मानवाने निश्चितच प्रचंड प्रगति केली आहे हेच त्यांना मान्य नसते. हिंदू धर्मशास्त्रात तर असे सांगितले आहे असे सांगितले जाते की सुरुवातीला सत्ययुगामध्ये सगळे आदर्श, प्रगत आणि आलबेल होते आणि ही परिस्थिती दर युगामध्ये बिघडत जाऊन आता घोर कलीयुग आले आहे आणि पुढे प्रलय होणार हे ठरलेले आहे. या क्रमात आदिमानवाचा उल्लेखही नाही. हा धार्मिक विचार उत्क्रांतीच्या कल्पनेच्याच अगदी विरुद्ध आहे आणि तो तावातावाने मांडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

त्यांच्या मते डार्विनचा सिद्धांत बरोबर असेल तर माणसाचीसुद्धा उत्क्रांति होत असायला हवी होती. आपल्या आयुष्यात थोडी प्रगति दिसत असली तरी ही सगळी फक्त भौतिक प्रगति आहे. आदिमानवांमध्येसुद्धा टोळीयुद्धे होत असत आणि आजचे लोक तरी तेच करत नाहीत का? मग त्यांच्या वागण्यात कसली डोंबलाची उत्क्रांति झाली आहे? असे प्रश्न विचारले जातात. "पुढच्या पिढीतल्या लोकांना काही ताळतंत्र उरला नाही, ते कसेही वाहवत चालले आहेत. त्यांचे काही खरे नाही." अशी कुरकुर मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे. अशा काही शहाण्यांच्या मते तर माणसाची सतत अधोगतीच होत चालली आहे. त्यामुळे तो तर विनाशाच्या दिशेने चालला आहे. मग त्याच्या उत्क्रांतीचा प्रश्नच कुठे येतो?

मला असे वाटते की हा वाद घालणाऱ्या लोकांकडून उत्क्रांति या संकल्पनेकडून वेगळ्याच अपेक्षा केल्या जातात. त्या शब्दाचा थेट संबंध उत्कर्ष किंवा उन्नती यांच्याशी जोडला जातो. जे काही इव्हॉल्व्ह होईल ते उत्तमोत्तमच व्हायला हवे असे या लोकांना वाटते. पण प्रत्यक्षात डार्विननेही तसे सांगितले नव्हते. "सर्व सजीव पृथ्वीवर निसर्गनियमाने जन्माला येतात. ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात (जुळवून घेऊ शकतात) त्याच जाती काळाच्या ओघात टिकतात." असा त्याचा सिद्धांत आहे. दीडशे वर्षांपूर्वी त्याने सांगितलेला हा सिद्धांत अगही परिपूर्ण आहे असेही सगळे लोक मानत नाहीत. पण डार्विनला जाणवलेल्या Survival of the fittest या निसर्गाच्या तत्वानुसार टिकून राहण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमधून सर्वच जीवांची उत्क्रांती होत असते असेसुद्धा आपल्याला दिसते. उदाहरणार्थ रोगजंतूंमध्ये झालेली लक्षणीय उत्क्रांती आपल्या एका आयुष्यात आपल्याला दिसली आहे. अॅटीबायॉटिक्सना दाद न देणारे नवे बॅक्टीरिया रोज तयार होत आहेत. माणसाचे जीवनमान मोठे असल्यामुळे त्याची उत्क्रांति लक्षावधी वर्षे हळूहळू सुरू आहे. पण तिचा उद्देशसुद्धा आदर्श असा महामानव तयार करण्याच्या दृष्टीने नव्हे तर मानववंश टिकून राहण्याच्या दिशेनेच असणार. त्यासाठी संघर्ष अटळच असेल तर तो करणे आवश्यकच आहे आणि त्यात यशस्वी होण्याच्या दिशेनेच उत्क्रांति होत राहणार.

दोन माणसांमधील किंवा टोळ्यांमधील भांडणांची कारणे पहायला गेल्यास दोन प्रमुख कारणे दिसतात, आहे त्याहून अधिक काही मिळवण्याची हाव आणि आहे ते निसटून जाण्याची भीती. ही कारणे शिल्लक असेपर्यंत माणसामाणसांमधली भांडणे, मारामाऱ्या, युद्धे वगैरे अनेक प्रकारचे संघर्ष होतच राहणार. याशिवाय ईगो किंवा अहंभाव आहेच. या सगळ्या सहजप्रवृत्ती (इंन्स्टिंक्टिव्ह) आहेत. त्या प्राणिमात्रांच्या स्वसंरक्षणाचा भाग आहेत. त्या नाहीशा झाल्या तर कदाचित त्याचे अस्तित्वच धोक्यात येईल. त्यामुळे कुणाची आध्यात्मिक आणि आधिदैविक वगैरे प्रकारची उत्क्रांती झालीच तर ज्या माणसाला कसलाही संघर्ष करावाच लागत नाही अशा एकाद्या संपन्न आणि तत्वज्ञानी माणसाची होऊ शकेल, संपूर्ण मानवजातीची होऊ शकत नाही. बौद्धिक दृष्ट्या उत्क्रांत होऊन सगळे लोक सत्ययुगातल्यासारखे साधुसंत बनतील अशी अपेक्षा करता येत नाही. सत्ययुगामध्ये अशी परिस्थिती होती असे क्षणभर खरे मानले तरी त्या काळातसुद्धा दुष्ट असुर लोक होतेच आणि त्यांना कपटाने फसवून स्वतःसाठी अमृत मिळवणारे देव तरी किती सात्विक म्हणायचे? असल्या बिनबुडाच्या तर्काने उत्क्रांतीची कल्पना मोडीत निघत नाही.

यावर तुम्हाला काय वाटते?

No comments: