माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या व्यक्तींबद्दल मला खूप आदर वाटला, ज्यांचा माझ्यावर प्रभाव पडला अशा लोकांची लहानशी व्यक्तीचित्रे मी 'तेथे कर माझे जुळती' या मथळ्याखाली माझ्या ब्लॉगवर चितारलेली आहेत आणि जी माणसे माझ्या मनाला चटका लावून हे जग सोडून गेली त्यांच्या आठवणी मी 'स्मृती सोडुनी जाती' या लेखमालेमध्ये लिहिल्या आहेत. गेला बराच काळ मी या दोन्ही विभागात नवे लेख लिहिलेच नव्हते. आता पुन्हा या मालिकांमध्ये भर घालणार आहे. मी आज ज्या व्यक्तीविषयी लिहायला घेतले आहे त्या माझ्या प्रिय मित्राबद्दल मला आदरही वाटतो, एके काळी त्याने माझ्या मनावर खूप प्रभाव टाकला होता, पण आता त्याच्या फक्त आठवणीच राहिल्या असल्यामुळे हुरहूरही वाटते. यामुळे त्याच्या आठवणींचा समावेश कोणत्या मथळ्याखाली करावा हा मलाही एक प्रश्नच पडला होता.
मी पुण्याच्या शासकीय इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेऊन त्यांच्या वसतीगृहात रहायला गेलो तेंव्हा प्रिन्सिपॉलपासून विद्यार्थ्यांपर्यत किंवा रेक्टरपासून मेसमधल्या वाढप्यापर्यंत त्या परिसरातली एकही व्यक्ती माझ्या ओळखीतली नव्हती. मी अचानक एका पूर्णपणे अनोळखी अशा जगात रहायला गेलो होतो आणि त्यामुळे मनातून थोडा भांबावलेलाच होतो. माझ्या खोलीत माझ्याच वर्गातली आणखी दोन मुले होती, त्यातला प्रदीप मुंबईहून आला होता आणि अशोक कोल्हापूरचा होता. त्या दोघांचेही पूर्वीपासूनचे काही मित्र आमच्या तसेच आधीच्या बॅचमध्ये शिकत असल्यामुळे ते दोघे नेहमी आपल्या मित्रांच्या कंपूत जाऊन बसायचे आणि मी थोडासा एकटा पडलो होतो, नवीन मित्र जोडण्याच्या प्रयत्नात होतो.
मी अशा अवस्थेत असतांना "तो काय म्हणतोय् काय की रेss, मी ते काय ऐकणार नै बsघss ..." असे काहीतरी माझ्या ओळखीचे हेल काढून मोठ्याने बोलत असल्याचे आवाज कानावर पडले. ते आवाज आजूबाजूच्या खोलीमधून येत होते म्हणून मी पहात पहात गेलो आणि मला त्या आवाजाचा मालक श्रीकांत भोजकर दिसला, मध्यम उंची पण पिळदार बांधा, तशाच पिळदार मिशा, भेदक नजर वगैरेनी युक्त असे रुबाबदार व्यक्तीमत्व असलेला मुलगा. त्याचे बोलणे झाल्यावर मी त्याला विचारले, "तू पणss बेळगावकडचा का रेss?" माझा अंदाज बरोबर होता. तो बेळगावचाच होता, पण दोन वर्षे फर्ग्युसन कॉलेजमध्ये राहिल्याने त्याच्या बोलीभाषेवर पुण्याचे संस्कार झाले होते. मी दोन वर्षे मुंबईत राहून आलो असल्यामुळे माझ्या जमखंडीच्या बोलीभाषेत बंबइया हिंदीतले धेडगुजरी शब्द घुसले होते, पण माझ्या बोलण्याची मूळची कानडी स्टाइल फारशी बदललेली नव्हती. आम्ही दोघे एकाच भागातले असल्याची खूण लगेच पटली आणि आमची अशी ओळख झाली. पुढे तिचे रूपांतर कधी गट्टीत झाले आणि 'मिस्टर भोजकर'चा 'भोज्या' होऊन गेला ते कळलेही नाही.
आमच्या भोज्याचा स्वभाव बोलका होता आणि त्याला सगळ्या बाबतीत आवडही होती आणि गतीही होती. त्यामुळे त्याच्याशी बोलायला विषयांची कमतरता नव्हतीच, मला त्याच्याशी संभाषण सुरू करण्यासाठी मुद्दाम काही करायची गरजच कधी पडली नाही. बहुतेक वेळा तोच काही ना काही मजेदार गोष्टी रंगवून सांगत असे. त्याला आमच्या लहानशा जगातल्या सगळ्या विषयांची माहिती असायचीच, त्यातल्या प्रत्येकावर त्याचे मत असायचे आणि त्यावर तो ठाम असायचा. काही बाबतीत तर हट्टीसुद्धा म्हणता येईल. रूढी परंपरांच्या काही बाबतीत तो जुन्या विचारांचा होता. तो शुद्ध किंवा कट्टर शाकाहारी होता. त्यासाठी त्याने पूर्णपणे शाकाहारी असलेल्या कर्नाटक क्लबच्या सेक्रेटरीशी कानडीमधून बोलून त्या मेसमध्ये प्रवेश घेतला होता. आधी संमिश्र स्वरूपाच्या महाराष्ट्र क्लबमधल्या सामिष पदार्थांची चंव पाहून घेतल्यानंतर भोज्याच्या ओळखीने मीसुद्धा कर्नाटक क्लबचा सदस्य झालो.
चीनबरोबर झालेल्या युद्धानंतरच्या त्या धामधुमीच्या काळात पाकिस्तानशीसुद्धा युद्ध होण्याची शक्यता दिसत होती आणि आम्ही कॉलेजात असतांनाच ते युद्ध झालेही. त्या काळातली परिस्थिती पाहता आम्हाला एन सी सी चे प्रशिक्षण कंपल्सरी केले होते. त्यानुसार आम्ही सगळ्यांनी परेड मैदानावर जाऊन हजेरी लावली. कमांडंटने सांगितले की सर्वांनी संपूर्ण चेहेऱ्याची चांगली गुळगुळीत दाढी करूनच परेडला यायला पाहिजे, म्हणजे मिशा सफाचट करायला हव्या होत्या. श्रीकांतला आपल्या पिळदार मिशांचा अभिमान तर होताच, पण वडील जीवंत असणाऱ्या मुलाने मिशा उतरवणे हे त्याच्या दृष्टीने अक्षम्य होते. त्याने या प्रॉब्लेमवरही मार्ग काढला. त्या वेळी नौदलाच्या एन सी सी ची वेगळी शाखा होती आणि त्या शाखेत दाढी ठेवली तर मिशा ठेवायला परवानगी होती. भोज्याने लगेच त्या शाखेत नाव नोंदवले आणि जितका काळ एन सी सी चे ट्रेनिंग होते तितका काळ तो सरदारजी होऊन राहिला होता.
त्याच्या अंगात उपजतच भरपूर नेतृत्वगुण होते. त्यामुळे तो पाहता पाहता आपसूकच आम्हा सर्वांचा लीडर बनला. दोन मुलांमधले भांडण मिटवायचे काम असो किंवा रेक्टरकडे जाऊन कसली तक्रार करणे असो सगळ्यांची नजर भोजकरकडे जाई आणि तो पुढाकार घेऊन ते काम यशस्वीपणे तडीला लावून देत असे. त्याने निवडणूक लढवली असती तर कुठलेही पद त्याच्याकडे सहज चालून आले असते, पण हातात घेतलेले कोणतेही काम मन लावून लक्षपूर्वक करायचे अशी सवय त्याला होती आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल अशी कुठलीही जास्तीची जबाबदारी अंगावर घ्यायची नाही यावर तो ठाम होता.
कॉलेजच्या तीन वर्षांच्या काळात हॉस्टेलमधल्या ज्या सात आठ मित्रांचा आमचा एक ग्रुप तयार झाला होता त्यात भोजकर नैसर्गिक लीडर होता. नेहमीचे डेक्कनवर फिरायला जाणे असो किंवा हॉटेलमध्ये (शाकाहारी) खाद्यंती, रेडिओवरली गाणी ऐकणे, कधी नाटकसिनेमा, लहानशी पिकनिक, पत्त्यांचा अड्डा जमवणे, सबमिशन्सचे काम उरकणे असो, किंवा नुसताच हसतखिदळत टाइमपास करणे असो या सगळ्यांमध्ये त्याचा उत्साह असायचाच आणि तो इतरांनाही सोबत घेऊन, कधी कुणाला डिवचून तर कधी धीर देऊन सगळ्यांना कामाला लावायचा. पुढे जाऊन इनिशिएटिव्ह, ड्राइव्ह, मोटिव्हेशन वगैरे मॅनेजमेंटमधले शब्द ऐकतांना माझ्या नजरेपुढे भोजकरचे उदाहरण लगेच उभे रहात असे. सकारात्मक विचार आणि धडाडी या गुणांचे वस्तुपाठ त्याच्या वागण्यामधून मिळत होते. अशा मित्रांमुळेच आमच्या इंजिनियरिंगच्या शिक्षणाची खडतर तपश्चर्येची वर्षे बरीच सुखावह झाली होती.
१९६६ मध्ये माझे इंजिनियरिंग कॉलेजातले शिक्षण संपले आणि मी नोकरीसाठी मुंबईला जाऊन तिथे स्थायिक झालो. त्या काळात संपर्काची काही साधनेच नव्हती. हॉस्टेलमधल्या मित्रांचे परमनंट अॅड्रेस नसायचेच, माझ्याप्रमाणेच ते सगळेही नोकरी मिळेल तिकडे जाणार हे ठरलेलेच होते. मग त्यांच्याशी पत्रव्यवहार करायचा तरी कसा करायचा? आमच्यातल्या कुणाकडेच टेलीफोनही नव्हते आणि त्या काळात ते लगेच मिळण्याची सुतराम शक्यताही नव्हती. त्यामुळे अचानक कोणीतरी एकादा कॉलेजातला मित्र प्रवासात किंवा सिनेमा थिएटरात अशा ठिकाणी भेटला तर त्याच्याशी थोडे बोलणे व्हायचे आणि त्याला अशाच कुठेतरी भेटलेल्या इतर मित्रांची खबरबात त्याच्याकडून कळायची. अशा प्रकारे पहिली दोन तीन वर्षे मला भोजकरबद्दल थोडी उडती माहिती मिळत गेली आणि नंतर तीही मिळणे कमी कमी होत थांबले. या अथांग दुनियेत तो कुठे रहात होता, काय करत होता याचा मला मागमूसही लागत नव्हता.
मी सेवानिवृत्त झाल्यानंतर नव्या मुंबईत घर घेतले होते. तिथे आजूबाजूला काही नवेजुने मित्र रहात होते ते नेहमी मला भेटत असत. तोपर्यंत इंटरनेट सुरू झाल्यामुळे माझे अनेक मित्र आधी ईमेलमधून आणि नंतर ऑर्कुट, फेसबुक वगैरेतून संपर्कात राहिले होते, पण ते सगळे मला नोकरीच्या अखेरच्या काळात भेटलेले होते. शाळा आणि कॉलेजमधला माझा कोणताच मित्र माझ्या या नव्या संपर्कमाध्यमांच्या कक्षेत अजून आला नव्हता. दहा वर्षांनी मी पुण्याला स्थलांतर केल्यावर मुंबईतल्या मित्रांचे प्रत्यक्ष भेटणे थांबले आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्यासाठी पुण्यात स्थायिक झालेले माझे जुन्या काळातले कोणते मित्र आता कुठे भेटतील याचा शोध मी सुरू केला.
जेंव्हा श्रीकांत भोजकर आता पुण्यातच राहतो हे मला समजले तेंव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याला भेटायची प्रचंड उत्कंठा मला लागली आणि तो योगही लगेचच आला. आम्ही इंजिनियरिंग कॉलेजमधून केलेल्या निर्गमनाला पन्नास वर्षे पूर्ण होण्याचा सुवर्णमहोत्सव समारंभपूर्वक साजरा करायचे माझ्या काही मित्रांनी ठरवले आणि त्यासाठी पुण्यातल्या सगळ्या बॅचमेट्सची एक बैठक मल्टीस्पाइस हॉटेलमध्ये ठेवली गेली. मी त्या मीटिंगला आवर्जून हजेरी लावली आणि यापूर्वी मी ज्यांना विशीमध्ये पाहिले होते असे पण आता सत्तरीमध्ये गेलेले अनेक मित्र एकसाथ भेटले. त्यातल्या ज्याला मी अगदी सहजपणे ओळखू शकलो तो श्रीकांत भोजकरच होता. त्या कार्यक्रमानंतर आम्ही एकमेकांची थोडी विचारपूस केली आणि पुन्हा भेटायचे ठरवून निरोप घेतला. त्या काळात मी स्वतः बिकट परिस्थितीमधून जात होतो त्यामुळे भोजकरच्या घरी जाऊन त्याला भेटणे मला शक्य झाले नाही, पण आम्ही टेलीफोनवरून अनेक वेळा बातचित केली, ई मेल, फेसबुक आणि वॉट्सॅपवरून संदेशांची देवाणघेवाण करीत राहिलो.
त्याच्या बोलण्यावरून मला असे समजले की भोजकरने आधीची काही वर्षे इंजिनियरिंगच्या क्षेत्रात काम केले आणि त्यामधून तो मॅनेजमेंटकडे वळला. पण दुसऱ्याची चाकरी करून तो सांगेल ते काम करण्यापेक्षा स्वतः शिक्षक होऊन इतरांना ज्ञानदान करणे श्रेष्ठ आहे असे त्याच्या मनाने घेतले आणि तो जीवनाचे रूळ बदलून शिक्षणक्षेत्रात गेला. तो जिथे जाईल तिथे त्याच्या अंगभूत गुणांमुळे तो चमकणार तर होताच. त्याने या क्षेत्रातही थेट आंतरराष्ट्रीय पातळी गाठली आणि जगभरातल्या अनेक देशांमध्ये दौरे करून व्याख्याने दिली, कार्यशाळा चालवल्या आणि त्यातून असंख्य मॅनेजर्सना प्रशिक्षण दिले होते. तो कुणाकडे नोकरी करीत नसल्यामुळे सक्तीच्या सेवानिवृत्तीचा प्रश्न नव्हता आणि आपले आवडते विद्यादानाचे व्रत सत्तरीमध्ये गेल्यावरसुद्धा जमेल तेवढे चालवतच राहिला होता. यामधून त्याचे अनेक चाहते निर्माण झाले होते आणि त्याचा लोकसंग्रह वाढतच होता.
सदानंद पुरोहित याने आमच्या बॅचच्या सुवर्णमहोत्सवासाठी पुढाकार घेऊन कामातला सिंहाचा वाटा उचलला होता, त्यासाठी तो रात्रंदिवस प्रचंड धडपड करीत होता, पण त्याच्या पाठीवर हात ठेऊन "तू पुढे हो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत" असे त्याला सांगणाऱ्यांमध्ये श्रीकांत भोजकर प्रमुख होता. या कामासाठी सर्वानुमते जी समिति संगठित केली गेली होती तिचे अध्यक्षपण सहजपणे त्याच्याकडे आले होते आणि आपल्या दीर्घ अनुभवाचा उपयोग करून घेऊन तो समितीतल्या कार्यकर्त्यांना सतत योग्य मार्गदर्शन करत होता आणि त्यांच्या कामात सक्रिय सहभागी होत होता.
सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम होऊन गेल्यानंतरसुद्धा पुण्यात राहणाऱ्या काही मित्रांनी एकमेकांना भेटण्यासाठी दर तीनचार महिन्यांमधून एकदा ब्रेकफास्ट मीटिंग करायची असे ठरवले आणि त्यातल्या पहिल्या एक दोन मीटिंग्जना भोजकरसुद्धा नेहमीच्या उत्साहाने हजर राहिला आणि आपल्या बोलण्यामधून त्याने रंग भरला. त्या दरम्यान आमच्या दोघांचाही कॉलेजमधला जवळचा मित्र असलेल्या कृष्णा कामतचा पत्ता मला लागला. तो बारा वर्षे आखाती प्रदेशात राहून नुकताच भारतात परत आला. त्याला मी आमच्या ब्रेकफास्ट मीटिंगबद्दल फोनवरून सांगितले आणि तो आला तर भोजकरसह आणखी काही जुन्या मित्रांची एकत्र भेट होईल असे आमिष दाखवले. त्याने यायचे लगेच कबूल केले आणि ठरल्याप्रमाणे तो पुण्याला आलासुद्धा.
पण त्या दिवशी भोजकर मात्र त्या मीटिंगला येऊ शकला नाही. मग मी त्याच्या घराचा पत्ता विचारून घेतला आणि कामतसह दोन मित्रांना सोबत घेऊन त्याचे घर गाठले. आम्ही त्याच्या घरी गेलो त्या वेळी तो खाटेवर झोपून राहिलेला नव्हता किंवा गंभीर आजारी असल्यासारखा वाटतच नव्हता, वरवर तरी तो तसा ठीकच दिसत होता. फक्त त्याने कंबरेला पट्टा बांधलेला होता आणि पाठीच्या कण्याला धक्का लागून त्रास होऊ नये म्हणून तो बाहेर हिंडत फिरत नव्हता असे त्याने सांगितले. वयोमानानुसार असा तात्पुरता त्रास अनेक लोकांना झालेला मी पाहिला होता म्हणून आम्हीही त्याला "चार दिवस आराम कर, मग सगळे ठीक होऊन जाईल." असे सांगितले. आम्हाला भेटून त्यालाही खूप आनंद झाला. आम्ही दीड दोन तास छान गप्पा मारल्या, पन्नास वर्षांपूर्वीचे हॉस्टेलमधले दिवस आठवून त्या वेळच्या अनेक मजेदार घटनांची उजळणी केली तसेच सध्याच्या परिस्थितीवर आणि पुढे काय काय करायचे प्लॅन आणि विचार आहेत यावरही थोडी हलकीफुलकी चर्चा केली. आता आमच्या जुन्या मैत्रीचे धागे पुन्हा जुळायला सुरुवात झाली होती.
पन्नास वर्षांमध्ये भोजकरच्या मूळच्या उत्साही, सकारात्मक आणि हंसतमुख वृत्तीत काहीच फरक पडला नव्हता, तसेच आपल्या मतावर ठाम असण्याचा गुणही तसाच होता. फक्त दुसऱ्या कोणी विरुद्ध मत मांडलेच तर तो आता त्यावर वाद न घालता "जय जय रघुवीर समर्थ" किंवा "जेजेआरएस" असे म्हणून वादाला तिथेच पूर्णविराम द्यायला लागला होता. तो वॉट्सॅपवर काही धार्मिक स्वरूपाच्या पोस्ट टाकत असे ते पाहता त्याच्या धार्मिक वृत्तीत किंचित वाढ झाली असावी. टेलीफोन उचलल्यावर तो हॅलो न म्हणता "जय जय रघुवीर समर्थ" असे बोलायचा आणि संभाषणाची अखेरही त्या घोषवाक्याने करायचा. त्याची ही नवी लकब आता माझ्या कायम लक्षात राहणार आहे आणि त्याची आठवण करून देणार आहे.
पण त्यानंतरच्या आमच्या कुठल्याच ब्रेकफास्ट मीटिंगला तो येऊ शकला नाही. पण तो यारोंका यार होता. त्याला मित्रांबरोबर चार घटका हंसतखेळत घालवायची दांडगी हौस होती. परगावाहून किंवा परदेशामधून आलेला आमचा एकादा मित्र त्याच्या घरी जाऊन त्याला भेटून यायचा आणि त्या भेटीची छायाचित्रे भोजकर स्वतःच वॉट्सॅप किंवा फेसबुकवर टाकायचा, असे दर महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी होतच असे. त्या फोटोतला त्याचा हंसरा चेहेरा पाहून त्याची तब्येत चांगली प्रगतिपथावर आहे असेच वाटायचे. त्याशिवाय सोशल मीडियावरून त्याचे इतर मेसेजेसही नेहमी येतच होते. मुळात त्याला एकादे गंभीर स्वरूपाचे दुखणे झाले होते हेच मला कित्येक महिने समजले नव्हते. दर मीटिंगच्या दिवशीसुद्धा "तो आज येणार आहे" असे कोणीतरी सांगायचा आणि सगळे खूश व्हायचे, त्याला जिने चढायची दगदग करावी लागू नये म्हणून आम्ही माडीवरच्या हॉलमध्ये न जाता खालच्या लॉनमध्ये जमायचो, पण वाट पाहून त्याला फोन केल्यावर तो या वेळी येऊ शकणार नाही असे समजत असे. असेही दोन तीन वेळा झाले.
त्याचे दुखणे म्हणजे वयोमानामुळे आलेली साधी पाठदुखी नसून त्याचे प्रोस्टेट ग्रंथींचे ऑपरेशन झाले असल्याचे मला बऱ्याच काळानंतर कळले. पण त्याच सुमाराला आमच्या दुसऱ्या एका मित्राचे तशाच प्रकारचे ऑपरशन झाले होते आणि तो तीनचार महिन्यात चांगला हिंडूफिरू लागला होता एवढेच नव्हे तर परदेशी जाऊन आला होता हे समजल्यामुळे मी भोजकरबद्दल निश्चिंत होतो. फक्त त्याला पूर्ववत धडधाकट व्हायला आणखी किती अवधी लागतो याची वाट पहात होतो.
मध्येच एकदा त्याला पुनः हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचे समजले आणि आता मात्र त्याला भेटून यायलाच हवे असे मी आपल्या मनाशी ठरवले. पण आज, उद्या, परवा करता करता मधले काही दिवस निघून गेले आणि एका सकाळी अचानकपणे तो आपल्यात राहिला नसल्याची धक्कादायक वार्ताच समजली. या वेळी आम्ही सगळे मित्र त्याच्या घरी जमलो ते त्याचे अंतिम दर्शन घेऊन साश्रु निरोप देण्यासाठी. तो तर आता काहीच बोलू शकत नव्हता, पण त्याने आम्हाला "जय जय रघुवीर समर्थ" असे म्हणूनच आमचा निरोप घेतला असणार असे मला वाटून गेले.
No comments:
Post a Comment