Thursday, July 12, 2018

लोकप्रिय नेता असलेला अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन



सतराव्या शतकामधील पास्कल, न्यूटन, हूक, बॉइल, ह्यूजेन्स आदि शास्त्रज्ञांनी केलेल्या कामामधून युरोपमधील देशांमध्ये विज्ञानावरील संशोधनाला गति आली होती.  अमेरिकेत स्थाईक होण्यासाठी गेलेले बहुतेक लोक युरोपमधून गेले होते. त्यांनी आपल्याबरोबर ख्रिश्चन धर्म आणि युरोपमधील संस्कृतिसुद्धा तिकडे नेली होती.  युरोपमध्ये होत असलेल्या बदलांकडे त्यांचे लक्ष होते. यामुळे विज्ञानाच्या अभ्यासाचे लोणसुद्धा अमेरिकेत पोचले. तिथेसुद्धा प्रयोगशाळा बांधल्या गेल्या आणि त्यात शास्त्रीय संशोधन सुरू झाले. या प्रक्रियेमधून प्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन हा पहिला मोठा अमेरिकन शास्त्रज्ञ तयार झाला.

बेंजामिन फ्रँकलिनचा जन्म बोस्टन येथील एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांना झालेल्या १७ मुलांपैकी तो दहावा होता. त्याने चर्चमध्ये शिक्षण घेऊन धर्मगुरु व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती म्हणून त्या उद्देशाने त्याला बोस्टनच्या शाळेत घातले होते, पण ते शिक्षण परवडत नसल्याने दोन वर्षांनंतर थांबले.  बेंजामिन अत्यंत तल्लख बुद्धीचा आणि मेहनती होता. त्याने पुस्तके आणून आणि ती वाचून आपला अभ्यास सुरू ठेवला.  बारा वर्षाचा असतांना त्यांने आपल्या मोठ्या भावाच्या छापखान्यात काम करायला सुरुवात केली आणि अवघा पंधरा वर्षाचा असतांना त्या भागातले पहिले वर्तमानपत्र सुरू केले. ते काम सोडून कांही वर्षे इकडे तिकडे नोकऱ्या केल्या. त्याच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने भावाचा छापखाना चालवायला घेतला आणि तो लेखनही करायला लागला. त्याने अनेक वर्तमानपत्रे काढून त्यांची साखळी तयार केली. त्यात लेख लिहून आणि व्यंगचित्रे काढून तो समाजाचे प्रबोधन करत राहिला. तो आपली मते प्रांजलपणे आणि धीटपणे मांडून चांगल्या गोष्टींसाठी आग्रह धरायचा. त्याने अनेक समाजसेवा करणाऱ्या संस्थांमधून समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. एक विचारवंत, प्रतिभाशाली आणि तळमळीने काम करणारा लेखक म्हणून समाजात त्याचा मान वाढत गेला. पोस्टमास्टर जनरल, अमेरिकेचा राजदूत आणि पेन्सिल्व्हानिया राज्याचा अध्यक्ष यासारखी मोठी पदे त्याने भूषवली. इंग्रजांना लढाईत पराभूत करून घालवून दिल्यानंतर अमेरिकेतल्या निरनिराळ्या स्टेट्सनी एकत्र येऊन संयुक्तपणे युनायटेड स्टेट्स असे राष्ट्र उभारावे यासाठी फ्रँकलिनने खूप प्रयत्न करून ते घडवून आणले. यामुळे जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन वगैरेंच्या समवेत बेंजामिन फ्रँकलिन याचेही नाव फाउंडर्समध्ये घेतले जाते.

बेंजामिन फ्रँकलिनचे हे सगळे सामाजिक आणि राजकीय काम चाललेले असतांनाच  तो विज्ञानात नवनवे संशोधन करून क्रांतिकारक असे शोध लावून गेला यावरून त्याच्या कर्तृत्वाची कल्पना येईल. विल्यम गिल्बर्टने दाखवून दिलेल्या स्ठिर विद्युतभारावर पुढील शंभर वर्षे हळूहळू संशोधन होत होते. बेंजामिन फ्रँकलिन याने कांच आणि शिशाच्या चपट्या पट्ट्यांपासून विजेचा भार (चार्ज) साठवून ठेवण्याचा एक कपॅसिटर तयार केला. हा भार ऋण (निगेटिव्ह) आणि धन (पॉझिटिव्ह) अशा दोन वेगळ्या प्रकारचा असतो हे सांगितले. या संशोधनासाठी त्याला मानद (ऑनररी) डिग्री मिळाली आणि रॉयल सोसायटीची फेलोशिप (एफ आर एस) दिली गेली. आकाशात चमकणारी वीज आणि स्थिर विद्युत या दोघी एकच असतात असे भाकित करून ते सिद्ध करण्यासाठी त्याने एक प्रयोग करवला. एका पतंगाला वादळी हवेत उंच उडवले गेले. त्याला जोडलेल्या तारेमधून ढगांमधली वीज खाली उतरली आणि तिने ठिणगी पा़डली. त्या विजेचा भार कपॅसिटरमध्ये गोळा करण्याचे प्रयोग सुद्धा त्याने केले. हे करत असतांना विजेचा धक्का बसू नये यासाठी बेंजामिनने पूर्ण काळजी घेतली. तसे प्रयोग करून पाहणारे इतर कांही संशोधक मात्र प्राणाला मुकले. इमारतींवर वीज कोसळू नये यासाठी बेंजामिनने लाइटनिंग रॉड (अरेस्टर) तयार केला.   

बेंजामिन फ्रँकलिनने इतरही निराळ्या प्रकारचे संशोधन केले. अॅटलांटिक महासागरामधील अंतर्गत प्रवाह आणि वारे यांच्यामुळे युरोप ते अमेरिका प्रवास करणाऱ्या जहाजांना कमी अधिक दिवस लागतात हे दाखवून त्यांचा योग्य मार्ग कसा असावा हे सांगितले. वारे आणि तापमान यांच्या त्याने केलेल्या अभ्यासामधून हवामानखाते होण्याला मदत झाली. जोराच्या वाऱ्यात मोठमोठे पतंग उडवून त्यांच्या सहाय्याने माणसांना आणि नौकांना पाण्यातून ओढून नेण्याची कल्पना करून त्यावर प्रयोग केले. लोकसंख्यांमधील वाढीचा अभ्यास करून अमेरिकेत त्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे हे दाखवले आणि त्याच्या मागची कारणे शोधली.  ख्रिश्चन ह्यूजेन्सने मांडलेल्या प्रकाशाच्या लहरींच्या सिद्धांताला बेंजामिन फ्रँकलिनने उचलून धरले होते, पण न्यूटनच्या प्रभावामुळे त्या काळात तिला मान्यता मिळाली नाही. भिजलेले कपडे घातलेल्या माणसाला कोरडे कपडे घातलेल्यापेक्षा जास्त थंडी वाजते यावरून त्याने थर्मॉमीटरच्या बल्बला ईथरमध्ये भिजवून प्रयोग केले आणि तसा ओला थर्मॉमीटर कमी तापमान दाखवतो हे दाखवून दिले.

बेंजामिन फ्रँकलिनने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यावर साधक बाधक विचार करतांना दोन्ही बाजूंचे मुद्दे आधी मांडून घ्यावे आणि एक एक करून त्यांची तुलना करावी अशी पद्धत त्याने सांगितली. नाण्यांच्या ऐवजी कागदावर छापलेल्या नोटा वापरण्याचा आग्रह केला, एवढेच नव्हे तर आपल्या छापखान्यात त्या छापून दिल्या. तो चांगला संगीतज्ञ होता, कांही वाद्ये वाजवण्यात पारंगत होता आणि त्याने ग्लास हार्मॉनिका नावाचे एक वाद्य तयार केले.  तो उत्कृष्ट बुद्धीबळपटू होता आणि त्याने त्या खेळावर निबंध लिहिले.  त्याने आयुष्यातली अनेक वर्षे इंग्लंड आणि फ्रान्समध्ये घालवली. तिथे असतांनासुद्धा आपल्या हुषारी आणि कर्तबगारीमुळे त्याला मानसन्मान मिळत गेले. शालेय शिक्षणसुद्धा पूर्ण न केलेल्या बेंजामिन फ्रँकलिनने पुस्तके वाचून, त्यांचा अभ्यास करून आणि संशोधन करून इतके ज्ञान मिळवले, त्यावर अनेक पुस्तके लिहून ते दाखवून दिले की ऑक्सफर्डसारख्या प्रसिद्ध विद्यापीठाने त्याला डॉक्टरेटची मानद पदवी दिली.  त्याचे चित्र असलेली पोस्टाची तिकिटे अमेरिकेमध्ये अनेक वेळा छापली गेली.

असा हा एक अष्टपैलू माणूस एक महान शास्त्रज्ञही होऊन गेला.

No comments: