वर्ष २०१७ जाता जाता
हे वर्ष संपता संपता माझ्या मनात आलेले दोन विचार मी फेसबुकावर मांडले होते. ते एकत्र करून या पोस्टमध्ये देत आहे. गतवर्षी माझ्या जवळच्या व्यक्ती दुर्दैवाने दिवंगत झाल्या त्यांच्या आठवणीने माझ्या मनात जे चलबिचल झाले ते पहिल्या लेखात व्यक्त केले आहे. याच्या बरोबर उलट नववर्षदिनाचा जल्लोश लोकांनी करू नये अशी नकारघंटा वाजत असतांनासुध्दा लोक हा दिवस का उत्साहाने साजरा करतात याचे कारण शोधण्याचा प्रयत्न दुस-या लेखात केला आहे.--------------------------------------------------
वियोग
नैनम् छिन्दंति शस्त्राणि नैनम् दहति पावकः। न चैनम् क्लेबयंत्यापो न शोषयति मारुतः।।वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्न्यानि संयाति नवानि देही ।।
आत्मा अमर असतो, कपडे बदलल्याप्रमाणे तो शरीरे बदलत असतो वगैरे गीतेमधले तत्वज्ञान सामान्य माणसाच्या मनाची समजूत घालू शकत नाही. जी प्रिय व्यक्ति आपल्याशी बोलते, आपल्याबरोबर खेळते, हंसते किंवा रडते, आपली काळजी करते किंवा घेते, प्रेम करते किंवा रागावते, रुसते वगैरे हे सगळे ती व्यक्ती तिच्या शरीरामार्फतच करत असते आणि ते शरीर नष्ट झाल्यानंतर हे सगळे कायमचे थांबते. त्यानंतर तिचा अमर आत्मा स्वर्गात गेला, परमात्म्यात विलीन झाला, त्याने दुसरा जन्म घेतला किंवा इतर धर्मांत सांगितल्याप्रमाणे तो जजमेंट डे किंवा कयामतची वाट पहात शांतपणे स्वस्थ बसला असला, यातले कांहीही झाले असले तरी यापुढे त्याच्याशी आपला कसलाही संपर्क राहणार नाही या विचाराने मन अस्वस्थ होतेच.
शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिकून गळतात आणि वसंतात त्यांना नवी पालवी फुटते हा निसर्गक्रम असतो. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास पानांमधले क्लोरोफिल हे द्रव्य नष्ट होते, ती पाने हवेमधला कार्बनडायॉक्साइड वायू शोषून घेऊन हवेला प्राणवायू देणे थांबवतात, झाडाकडून अन्नपाणी घेणे आणि झाडासाठी अन्नरस तयार करणे ही दोन्ही कामे करत नाहीत. अशी निरुपयोगी झालेली पाने गळून पडतात आणि पाचोळा होतात. माणसांच्या बाबतीत कांहीसा तसाच प्रकार होतो. नट, गायक, चित्रकार, खेळाडू वगैरे मंडळी त्यांच्या बहराच्या काळात जगाला खूप आनंद देतात, पण तो बहराचा काळ ओसरल्यानंतर ते प्रकाशाच्या झोतात रहात नाहीत, वर्षानुवर्षे कुणालाही त्यांची माहिती नसते. कधी तरी त्यांच्या निधनाची बातमी येते तेंव्हा त्यांचे चाहते क्षणभर हळहळतात, पण खरे तर त्या गुणी लोकांचे जीवंत असणे किंवा नसणे याला तोंपर्यंत इतरांच्या दृष्टीने फारसा अर्थ उरलेला नसतो. गेल्या वर्षात अशी किती प्रसिध्द माणसे या जगाचा निरोप घेऊन देवाघरी गेली याच्या याद्या पुढल्या एक दोन दिवसात वर्तमानपत्रांमध्ये येत राहतील.
नोकरीमध्ये माझ्या आयुष्यात आलेले कित्येक लोक पंधरा वीस किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी नोकरी सोडून गेले किंवा सेवानिवृत्त झाले आणि माझ्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले. त्यानंतर ते कुठे आणि कसे रहात होते की अनंतात विलीन होऊन गेले होते याची मला काहीच माहिती मिळत नव्हती. अशातला एकादा दिवंगत झाल्याची बातमी येते आणि झर्रकन त्याच्या संबंधातल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येऊन जातात एवढेच होते. काही लोकांची प्रत्यक्षात भेट होत नसली तरी सोशल मीडियावर अधून मधून गाठ पडत असते आणि काही लोक अचानकपणे भेटतसुध्दा असतात. त्यांच्या सोडून जाण्याने मनाला चटका लागतो. या दोन्ही प्रकारचे तीन चार मित्र गेल्या वर्षभरात दिवंगत झाले. अशा बातम्यांमुळे दुःख होतेच, पण त्यातले जे आपल्यापेक्षा वयाने लहान असतात त्यांच्या जाण्यामुळे धक्कासुध्दा बसतो.
नातेवाईक कधी नात्यामधून रिटायर होत नाहीत. ते परगावी किंवा परदेशीसुध्दा गेले तरी संपर्कात असतात. त्यांच्याशी किती जवळचे व्यक्तीगत संबंध जुळतात आणि जुळून राहतात ते एकमेकांच्या वागण्याप्रमाणे ठरते. त्यामुळे त्यानुसार कमी जास्त तीव्रतेचे दुःख होते. त्यांचा कायमचा वियोग सहन करणे बरेच कठीण असते.
नोकरीमध्ये चांगली प्रमोशन्स मिळत गेली, व्यवसायात चांगला जम बसला, मुले मार्गाला लागली, घरात सुना, जावई, नातवंडे वगैरे आली म्हणजे माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता संपली. अशी पिकली पाने हे जग सोडून गेली तर त्यांचे सोने झाले असे पूर्वीच्या काळात म्हणत असत. पण अशी वडीलधारी माणसे आपल्याला हवीच असतात. माझ्या दोन मोठ्या वहिनी आणि एक आत्तेबहीण यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच भेट झाली होती, त्यांच्याशी प्रत्यक्षात आणि फोनवर बोलणे आणि हास्यविनोद झाला होता तेंव्हा त्यांनी अंथरूण धरलेले नव्हते. असे असतांना अचानक त्यांच्या निवर्तनाच्या मनाला सुन्न करणा-या वार्ता येत गेल्या. पुढच्या पिढीतल्या कुटुंबांचा संसार अजून पूर्ण झालेला नसतो, त्यांच्या किती तरी आशाआकांक्षा आणि योजना अर्धवट राहिलेल्या असतात. अशा वेळी त्यांच्या संसाररथाचे एक चाक निखळून पडले तर त्यामुळे होणा-या वेदना सोसवत नाहीत. माझ्या पुतणीच्या जीवनात अशी एक दुर्दैवी घटना काल घडली. आमच्या त्या सुस्वभावी जावयाला वैकुंठधामात पोचवायला जावे लागले.
वर्षभरात घडलेल्या चांगल्या घटनांचा आढावा घेणारे दहा पोस्ट्स मी गेल्या दहा बारा दिवसात बाय बाय २०१७ या शीर्षकाखाली टाकले होते, पण मनातून इच्छा नसली तरी अखेर गेल्या वर्षानेच दिलेल्या या चटक्यांचा उल्लेख करून डोळ्यांमधले आंसू पुसती ओठावरले गाणे असे म्हणत त्याला निरोप द्यावा लागत आहे.
----------------------------------------------------------------------------------
नकारघंटा
वॉट्सअॅप आणि फेसबुकवर रोज ज्ञानगंगेच्या अनंत धारा धो धो वहात असतात, "मार्केट में नया है" असे सांगून विनोदांच्या शिळ्याच कढीला पुनःपुनः ऊत आणला जात असतो, चमत्कृतिपूर्ण किंवा अविश्वसनीय कामे करणारी नवनवी यंत्रे, अफलातून आकारांच्या इमारती आणि निसर्ग सौंदर्याची किंवा सुंदरींची आकर्षक चित्रे आणि चलचित्रे दाखवली जात असतात, अधून मधून सुरेल गायन वादनसुध्दा ऐकायला आणि पहायला मिळते. पण संगीतामधल्या कुठल्याही वाद्यापेक्षा जास्त वेळा सोशल मीडियावर वाजवले जाणारे एक वाद्य आहे ते म्हणजे नकारघंटा.नकारघंटा वाजवणा-यांचे अनेक प्रकार आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा उपदेश देणारे पोस्ट फटाके नकोत, गोंगाट नको, प्लॅस्टिक नको, थर्मोकोल नको, पाणी वाया घालवू नका, अमूक करू नका, तमूक करू नका वगैरे नकार सांगत असतात. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र वगैरेंच्या काळात या नकारघंटा सतत घणघणत राहतात. त्या प्रचाराच्या तसेच कुठल्याही आधुनिक, पुरोगामी विचारांच्या नांवाने सतत शंखनाद केला जातोच, पण हॅपी या शब्दालाच संस्कृतिसंरक्षणाच्या ऐसपैस छत्रछायेत सरसकट नकारघंटा वाजवली जाते. त्यांच्या दृष्टीने हॅपी बर्थडे, हॅपी दिवाली, हॅपी होली वगैरे म्हणणे म्हणजे शांतम् पापम्. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर म्हणणारा तर पुरता धर्मभ्रष्टच नव्हे तर चक्क देशद्रोही असल्यासारखे दाखवले जाते. यामधले मूळ विचार बरोबरच आहेत, पर्यावरण आणि संस्कृति यांचे महत्व आहेच. माझ्या व्यक्तीगत जीवनात मी सुध्दा माझ्या लहानपणापासून त्यांना सुसंगत असेच वागायचा प्रयत्न करत असतो.
काही लेखांमध्ये जरा विनोदी उपाय सांगितले जातात. केकच्या ऐवजी उकडीचे मोदक खा, व्हिस्कीऐवजी कडुलिंबाचा काढा किंवा गोमूत्र प्या, सांताच्या गोंड्याच्या टोपीऐवजी केशरी पटका बांधा वगैरे वगैरे. पण त्यांची तरी काय गरज आहे ? मुळात कोण या पोस्टा तयार करतात कोण जाणे, पण आला संदेश की त्याला ढकल पुढे असे करणारे असंख्य पोस्टमन मात्र तयार झाले आहेत. अशा एकाद्या पोस्टमनला त्याबद्दल विचारलेच तर "मी फॉरवर्डेड अॅज रिसीव्ह्ड असे लिहिले आहे ना !" असे म्हणून बगला झटकतो. जसे काही "आम्ही पालखीचे भोई , आम्ही पालखीचे भोई , पालखीत कोण आम्ही पुसायाचे नाही।" हे त्याचे ब्रीदवाक्य असावे. आज ज्या प्रमाणात साक्षरतेचा आणि मोबाइल फोन्सचा प्रसार झाला आहे ते पाहता हे सगळे संदेश प्रत्येक माणसाकडे नसले तरी बहुतेक सर्व कुटुंबांपर्यंत नक्कीच पोचतात. पण त्यांचा किती परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे.
"आपले लोक म्हणजे ना, गाढवं आहेत. त्यांच्यापुढे कितीही गीता वाचा, त्यांना ढिम्म होत नाही." असे म्हणणा-यांची मला मजा वाटते. यांना इतके समजते तर ते कशाला गीता वाचायला जातात ? या बाबतीत पहायचे झाले तर गाढव आणि माणूस यांच्यातला फरक ते नीट समजून घेत नसावेत. कुणी तरी गाढवांना कधी हंसतांना, गातांना, नाचतांना पाहिले आहे कां ? ती नेहमी एकाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे (ही उपमा स्व.पुलंची आहे) शांत असतात, पण माणसांना मात्र आनंदाने गावे, ओरडावे, नाचावे, उड्या माराव्यात असे मनातून वाटते. त्यांना देवाने किंवा निसर्गाने हे एक प्रकारचे वरदान दिले आहे. गणेशोत्सव, गरबा, लग्नाची वरात, वाढदिवस किंवा नववर्षदिन ही फक्त निमित्ये असतात. त्यात भाग घेणा-या माणसांना आनंदाने धुंद होण्याची हौस असते हे मुख्य कारण आहे आणि ती हौस या ना त्या स्वरूपात व्यक्त होतेच. धनाढ्य लोक एअरकंडीशन्ड डिस्कोमध्ये नाचतील तर गरीब आदिवासी रानातल्या त्यांच्या पाड्यामध्ये, कुणी भाविक टाळमृदुंगाच्या तालावर नाचत भजन करतील तर कुणी ऑर्गनच्या सुरात कॅरोल्स गातील, या सगळ्यांच्या मागे मानवी स्वभावातली ऊर्मी असते.
त्यामुळे कोणीही आणि कितीही शंखध्वनि किंवा घंटानाद केला तरी निरनिराळे उत्सव हे उत्साहात साजरे होत जाणारच. दर वर्षीप्रमाणेच या वर्षीही ख्रिसमस साजरा होऊन गेला आणि आता नववर्षदिनाच्या पार्ट्यांचा जल्लोश आणि धिंगाणासुध्दा होईल. आणि मला वाटते की सगळे जग जेंव्हा उल्हासाने भारलेले असेल तेंव्हा आपण तरी काय म्हणून आंबट चेहरा करून काळोखात बसा ?
No comments:
Post a Comment