ज्ञान, विज्ञान, शास्त्र या संस्कृत भाषेमधील प्राचीन शब्दांना कालमानानुसार वेगवेगळे अर्थ जोडले गेले. मी शाळेत शिकत असतांना शास्त्र या नावाच्या विषयामध्ये सायन्स शिकलो होतो. आता विज्ञान हा शब्द अधिक प्रचलित झाला आहे. तरी संशोधन करणा-या सायंटिस्ट लोकांना शास्त्रज्ञ असेच संबोधले जाते. मुळात सायन्स आणि सायंटिस्ट हे शब्दसुध्दा अलीकडच्या काळातलेच म्हणजे गेल्या दोन तीनशे वर्षात पुढे आलेले आहेत. आपण आज ज्यांचा समावेश सायन्समध्ये करतो त्या विषयांचा समावेश युरोपमध्ये नॅचरल फिलॉसॉफीमध्ये केला जात होता आणि तो फिलॉसॉफीचा एक भाग होता. निरनिराळे विद्वान विचारवंत त्यांच्या बुध्दीमत्तेनुसार विचार करून अनेक विषयांवर आपली मते किंवा सिध्दांत मांडत असत आणि ती भिन्न किंवा परस्परविरोधी असली तरी त्या त्या विद्वानांचे अनुयायी त्यांचा डोळे मिटून स्वीकार करून त्यांना पुढे नेत असत आणि ज्याच्या नावाचा दबदबा जास्त त्याच्या सांगण्याला मान्यता मिळत असे. फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञानामध्ये हे चालत आले आहे, पण सायन्समध्ये तसे चालत नाही. यामुळे सायन्सची फिलॉसॉफीपासून फारकत करण्यात आली. इंग्रजी शिक्षणपध्दतीमधून जेंव्हा आपल्याकडे सायन्सचे शिक्षण सुरू झाले तेंव्हा त्याला शास्त्र किंवा विज्ञान अशी नावे दिली गेली, पण तो नेमका अर्थ अजूनही लोकांच्या मनात पूर्णपणे रुजलेला नाही. त्यामुळे अमूक तमूक गोष्ट शास्त्रीय आहे की नाही यावर अनेक वादविवाद होत असतात. या लेखामध्ये मी विज्ञान हा शब्द फक्त सायन्स याच अर्थाने घेतला आहे.
विज्ञान (सायन्स) म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास आपले जग कसे चालते याचा पध्दतशीर अभ्यास आणि त्यातून समजलेले निसर्गाचे नियम व सिध्दांत मुद्देसूदपणे मांडणे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि त्यांच्यापासून निघालेल्या उपशाखांचा समावेश विज्ञानात केला जातो. या विषयातले सिध्दांत प्रत्यक्ष प्रमाणाने सिध्द केले जातात. याचा पाया घालण्यात गॅलीलिओचा मोठा वाटा आहे.
प्राचीन काळातले ऋषीमुनि आणि विद्वानांनी अनेक शास्त्रांचा विकास केला होता. मंत्रतंत्र, स्तोत्रे, कथा, पुराणे, वगैरें धर्मशास्त्रे पिढी दर पिढी पुढे दिली जात गेली. योगविद्या, आयुर्वेद, ज्योतिष वगैरे कांही शास्त्रेही टिकून राहिली. पण विज्ञानाशी संबंधित शास्त्रांना बहुधा प्राधान्य दिले जात नसावे. आर्यभट, वराहमिहिर आदि विद्वानांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित वगैरे विषयांवर काम केले होते. पण त्यांचे सिध्दांत आणि सूत्रे यांचा प्रसार मधल्या काळात थांबला. शास्त्रज्ञांची मालिका तयार झाली नाही. मध्ययुगाच्या काळात त्यांच्या संस्कृत ग्रंथांवर मराठी किंवा हिंदीसारख्या भाषेतही भाष्य किंवा लेखन झालेले दिसत नाही.
युरोपमध्ये पूर्वीच्या काळात ज्ञानाचा प्रसार करण्याचे काम मुख्यतः धर्मगुरूंकडेच होते. तेंव्हा विज्ञानाचा समावेश तत्वज्ञानात केला जात होता. तिकडल्या कांही ठिकाणी विद्यापीठांची स्थापना झाली होती आणि तिथे विविध विषयांवरील पुरातन ग्रंथांचा आणि इतर शास्त्रांसोबत खगोलशास्त्र व गणितासारख्या विषयांचासुध्दा अभ्यास केला जात असे. अॅरिस्टॉटल, टॉलेमी, युक्लिड, पायथॉगोरस, आर्किमिडीस आदि विद्वानांनी सांगितलेली प्रमेये, सिध्दांत, नियम वगैरे त्यांच्या नावानिशी जतन करून ठेवले गेले होते आणि त्यामध्ये रस असलेल्या विद्यांर्थ्यांना ते शिकणे शक्य होते.
गॅलीलिओ गॅलीली या इटालियन शास्त्रज्ञाने विज्ञानामधल्या निरनिराळ्या विषयांवर संशोधन केले, त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग आणि प्रात्यक्षिके केली, त्यामधून केलेल्या निरीक्षणांचा तर्कसंगत अर्थ लावून त्यामधून निष्कर्ष काढले आणि ते सुसंगतपणे जगापुढे मांडले. यालाच शास्त्रीय पध्दत (सायंटिफिक मेथड) असे म्हणतात आणि पुढील काळातले संशोधन कार्य त्या पध्दतीने होऊ लागले. म्हणून गॅलीलिओला आधुनिक विज्ञानाचा जनक समजले जाते.
गॅलीलिओचा जन्म १५६४ साली इटलीमधल्या सुप्रसिध्द पिसा या गावात झाला. त्याचे वडील एक संगीतज्ञ होते. कुशाग्र गॅलीलिओने लहानपणी संगीत आणि त्यातले गणित आत्मसात केले. त्या काळातही डॉक्टरांची कमाई चांगली होत असे म्हणून त्याला वैद्यकीय शास्त्राच्या शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवले होते. पण त्याचा ओढा विज्ञानाकडे असल्यामुळे त्याने औषधोपचाराऐवजी गणित आणि नैसर्गिक तत्वज्ञान या विषयांचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळवले.
मेडिकलचा अभ्यास करत असतांनाच त्याचे लक्ष चर्चमध्ये टांगलेल्या झुंबरांकडे गेले. ती झुंबरे वा-याने कमी जास्त झुलत होती, पण त्यांना जोराने ढकलले किंवा हळूच लहानसा झोका दिला तरी त्यांची आंदोलने तेवढ्याच वेळात होतात असे त्याला वाटले आणि त्याने आपल्या नाडीच्या ठोक्यांच्या आधारे ते झोके मोजले. त्याने घरी येऊन दोन एकसारखे लंबक तयार करून टांगले. त्यातल्या एकाला जास्त आणि दुस-याला कमी खेचून सोडले तरी दोन्ही लंबक एकाच लयीमध्ये झुलत राहिले. त्यानंतर त्याने तपमान मोजणे, वजन करणे वगैरे कामे करणारी उपकरणे तयार केली आणि तत्कालिन शास्त्रज्ञांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले.
गॅलीलिओने एकापेक्षा एक अधिक शक्तीशाली दुर्बिणी तयार केल्या आणि त्या दुर्बिणींमधून आकाशाचे खूप बारकाईने निरीक्षण केले. चंद्राला असतात तशाच शुक्रालासुध्दा कला असतात हे त्याने पाहिले. त्याने शनी ग्रहाच्या सभोवती असलेली कडी पाहिली, शनी ग्रहाच्या पलीकडे असलेल्या नेपच्यूनलाही पाहिले, पण तो सूर्याभोवती अत्यंत मंद गतीने फिरणारा ग्रह न वाटता एकादा अंधुक तारा आहे असे वाटले. गुरु या ग्रहाला प्रदक्षिणा घालणारे चार लहानसे ठिपके पाहून त्याने ते गुरूचे उपग्रह असल्याचे अनुमान केले. त्यापूर्वी शास्त्रज्ञांना फक्त तारे आणि ग्रह माहीत होते, उपग्रह ही संकल्पनाच नव्हती. पृथ्वीलाच ग्रह मानले जात नसतांना चंद्र हा फक्त चंद्रच होता. गॅलीलिओने सूर्यावरचे डाग आणि चंद्रावरचे डोंगर व खळगे पाहिले. धूसर दिसणारी आकाशगंगा असंख्य ता-यांनी भरलेली आहे असे सांगितले. ग्रह आणि तारे यांचे ढोबळपणे आकार मोजण्याचा प्रयत्न केला. आकाशातले सगळे तारे एकाच प्रचंड गोलाला चिकटले आहेत असे अॅरिस्टॉटलने वर्तवले होते आणि मानले जात होते. ते निरनिराळ्या अंतरावर असल्याचे गॅलीलिओने निरीक्षणांवरून सिध्द करून दाखवले.
गॅलीलिओला खगोलशास्त्राची खूप आवड होती आणि त्याने गणितातही प्राविण्य मिळवले होते. त्याने कोपरनिकस आणि केपलर यांनी केलेल्या संशोधनाचा आणि किचकट आकडेमोडीचा अभ्यास केला. त्यांनी मांडलेली सूर्यमालिकेची कल्पना गॅलीलिओला पटली आणि त्याने ती उचलून धरली. सूर्य एका जागी स्थिर असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरते हे मत बायबलमधल्या काही ओळींच्या विरोधात जात होते. धर्मगुरूंनी ते खपवून घेतले नाही आणि गॅलीलिओने या विषयावरचे काम ताबडतोब थांबवावे असा आदेश दिला. त्याने तो आदेश पाळला आणि आपले मत बदलले नसले तरी ते उघडपणे मांडणे टाळले. तरीही सोळा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच्यावर खटला भरून त्याला नास्तिकपणाच्या विचारांचा प्रसार करण्याच्या गुन्ह्यासाठी आजन्म स्थानबध्दतेची शिक्षा फर्मावली गेली.
भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयांमध्येसुध्दा गॅलीलिओने मोलाची भर घातली. उंचावरून खाली पडत असलेल्या वस्तूंच्या गतीच्यासंबंधी त्याने केलेल्या निरीक्षणांचा आणि मांडलेल्या विचारांचा पुढे न्यूटनला उपयोग झाला. गॅलीलिओने ध्वनींची कंपनसंख्या आणि प्रकाशाचा वेग मोजण्याचे प्रयत्न केले. भूमिती आणि निरीक्षणासाठी लागणा-या कंपॉसपासून ते दुर्बिण आणि सूक्ष्मदर्शक यंत्रापर्यंत अनेक प्रकारची उपकरणे गॅलीलिओने तयार केली, बाजारात विकली आणि संशोधनासाठी स्वतः वापरली.
या सर्वांपेक्षा अधिक मोलाची गोष्ट म्हणजे त्याने जगाला एक वैज्ञानिक दृष्टी दिली. त्याने प्रयोग, प्रात्यक्षिक आणि गणित यांची सांगड घालून कुठलाही तर्कशुध्द निष्कर्ष काढणे किंवा तपासून पाहणे आणि तो रूढ समजुतींना धक्का देणारा असला तरीही निर्भीडपणे आणि सुसंगतपणे मांडणे याची एक वैज्ञानिक चौकट घालून दिली. विज्ञान किंवा सायन्स आणि सायंटिफिक मेथड या शब्दांचा उपयोग गॅलीलिओच्या काळात होत नव्हता, ते रूढ व्हायला आणखी शंभर दीडशे वर्षे लागली असली तरी त्या विचारांना आधी गॅलीलिओने दिली. त्यामुळे त्याला आधुनिक विज्ञानाचा जनक ही सार्थ पदवी दिली गेली.
No comments:
Post a Comment