Tuesday, December 26, 2017

वर्ष २०१७ ला निरोप ... (पूर्वार्ध)

हे वर्ष २०१७ संपायला आता चारपांचच दिवस उरले आहेत. ते सुध्दा हां हां म्हणता निघून जातील आणि आपण नव्या वर्षाचे स्वागत करू. अनेक लोक आताच त्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरेंमध्ये बुकिंग करून ठेवले आहे, रेल्वे, बस, विमान वगैरेंची रिशर्वेशन करून ठेवली आहेत. कांही लोक घरीच पार्टी करायची तयारी करत आहेत. पण नव्या वर्षाचे स्वागत करायच्या आधी आपण थोडे मागे वळून गतवर्षाकडे पहातो. तसाच एक प्रयत्न मी या लेखात केला आहे. गेल्या वर्षात मी काय काय केले, त्यात कोणती गोष्ट नवीन किंवा वेगळी होती हे आठवून पाहिले आहे.  पण या संदर्भात कांही अगदी जुन्या आठवणीही जाग्या झाल्या. या लेखाला १० लहान लहान तुकड्यांच्या रूपात मी गेले १०-१२ दिवस फेसबुकावर टाकून  माझ्या मित्रांकडून त्यावर येणा-या प्रतिक्रिया पहात आहे. हा एक वेगळा प्रयोग मी गेल्या वर्षाच्या अखेरीला करून पहात आहे.

बाय बाय २०१७ ..... (भाग १) प्रास्ताविक

"जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऎका पुढल्या हाका"
ही कवि केशवसुतांनी फुंकलेली तुतारीसुध्दा शंभर वर्षांहून जास्त जुनी होऊन गेली तरी अजून अभंग आहे. "इतिहासाचे ओझे खांद्यावरून फेकून द्या, त्याची पाने फाडून आणि जाळून टाका" अशी जळजळीत वक्तव्ये अनेकदा कानावर पडतात आणि त्या क्षणी ती बरोबर वाटतात. पण नवे पान उलटले तरी पूर्वीची काही पाने मनाच्या कोप-यात कुठे तरी लपून बसतात. त्यांच्यावर ढीगभर धूळ बसून ती दिसेनाशी झाली तरी अचानक त्यातल्या एकाद्या पानावरची धूळ पुसली जाते आणि आधी लिहिलेले लख्ख दिसायला लागते. इतकेच नव्हे तर त्यांच्या आधाराने नव्या पानांवर नव्या नोंदी लिहिणे सुरू होते असे काही अनुभव मला या वर्षात आले. पन्नास पंचावन्न वर्षे संपर्कात नसलेले कांही मित्र अचानक सापडले तर कांहींना मी शोधून काढले आणि पुन्हा त्यांच्याशी अरे तुरेच्या भाषेत बोलणे सुरू झाले. ज्या लोकांनी मला माझ्या लहानपणापासून पाहिले आहे अशी मला एकेरीत संबोधणारी  माझ्या संपर्कात असलेली माणसे आता तशी कमीच राहिली आहेत. खूप वर्षांनंतर तसे बोलणारी आणखी कांही माणसे पुन्हा भेटली तर त्यातून मिळणारा आनंद औरच असतो.
-----------------

बाय बाय २०१७ ..... (भाग २) जुने मित्र

कदाचित स्व.जगजीतसिंगांच्या समृध्द पंजाबमध्ये पूर्वीपासून सुबत्ता नांदत असेल, पण दुष्काळी भागातल्या आमच्या लहान गांवात घरोघरी मातीच्या चुली, शेणाने सारवलेल्या जमीनी आणि उंदीरघुशींनी पोखरलेल्या कच्च्या भिंती होत्या आणि त्यात अगदी पिण्याच्या पाण्यापासून अनेक गोष्टींचा खडखडाट असायचा. शहरामधल्या सुखसोयींमध्ये लाडात वाढलेल्या मुलांच्या इतके 'रम्य ते बालपण' आम्हाला तेंव्हा तरी तसे वाटत नव्हते. त्यामुळे परिस्थितीशी झगडून जरा चांगले दिवस आल्यानंतर ते लहानपण परत मिळावे म्हणून "ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो" असे म्हणावेसे वाटले नसेल पण "वो कागज की कश्ती वो बारिश का पानी" यांची ओढ मात्र वाटायची.

माझ्या लहानपणी मित्रांना "अंत्या, पम्या, वाश्या, दिल्प्या" अशा नावांने किंवा "ढब्ब्या, गिड्ड्या, काळ्या, बाळ्या" अशा टोपणनावानेच हांक मारायची पध्दत होती. माझ्या वर्गात वीस पंचवीस मुलं होती. तशा दहापंधरा मुली पण होत्या पण त्यांच्याशी बोलायलासुध्दा बंदी होती. आठदहा मुलांचे आमचे टोळके रोज संध्याकाळी ग्राउंडवर खेळायला आणि मारुतीच्या देवळासमोरच्या कट्ट्यावर बसून टाइमपास करायला जमायचे. शाळेतले शिक्षण झाल्यावर त्यातले फक्त तीन चारजण कॉलेजला जाऊ शकले होते.  इतर मुलांची नोकरीचाकरी शोधण्यासाठी कुठल्या ना कुठल्या शहरातल्या काकामामाकडे रवानगी झाली. फक्त एक सु-या फाटक तेवढा माझ्याच कॉलेजात आला होता, पण त्यानेही वर्षभरानंतर कॉलेज सोडले. दोन तीन वर्षांनंतर माझे गावी जाणे सुध्दा बंद झाले. त्या काळात संपर्काची कसलीही साधनेच नसल्याने शाळेतले सगळे मित्र जगाच्या गर्दीत हरवून गेले. क्वचित कधीतरी त्यातला एकादा योगायोगाने अचानक कुठेतरी भेटायचा, पण तास दोन तास गप्पाटप्पा झाल्यानंतर आम्ही दोघेही पुन्हा आपापल्या मार्गाने चालले जात होतो. त्या काळात  मोबाईल तर नव्हतेच, आमच्यातल्या कोणाकडे ट्रिंग ट्रिंग करणारे साधे फोनसुध्दा नव्हते. त्यामुळे मनात इच्छा झाली तरी एकमेकांशी बोलणार कसे? इंटरनेट आणि फेसबुक आल्यानंतर मी जुन्या मित्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बहुधा त्या गोष्टींची आवड नसावी. त्यामुळे मला कोणीच सापडला नाही.माझ्या पुण्यातल्या शरद या एका कॉलेजमित्राशी २०१७ मध्ये माझी नव्याने ओळख झाली आणि त्याच्याशी बोलता बोलता माझा एक गांववाला मित्र दिलीप त्याच्याही ओळखीचा निघाला. त्या सुताला धरून मी दिलीपला फोनवर गाठले आणि आता वाहनांचीसुध्दा सोय झालेली असल्यामुळे आम्ही दोघे सरळ त्याच्या घरी जाऊन धडकलो. त्या अकल्पित भेटीतून दोघांनाही झालेला आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता.
-------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ ..... (भाग ३) जुने मित्र


दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट। एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ।
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा । पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।

कविवर्य ग दि माडगूळकरांनी अशा शब्दांमध्ये जीवनाचे एक चिरंतन अर्धसत्य सांगितले आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरीपर्यंत शेकडो लोक त्याच्या जीवनात येतात आणि दूर जातात हे खरे असले तरी आप्तस्वकीयांना जोडण्याचे, त्यांना स्नेहबंधनात बांधून ठेवण्याचे त्याचे प्रयत्न चाललेले असतात आणि कांही प्रमाणात ते यशस्वी होत असतात म्हणूनच कुटुंब आणि समाज या व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून राहिल्या आहेत हे ही खरे आहे.  प्रभु रामचंद्रांनी ज्या भरताला उद्देशून हा उपदेश केला होता, त्याच्याशीसुध्दा चौदा वर्षांनी पुनः भेट होणार होतीच. आपल्या जीवनात आलेली काही माणसे काही काळासाठी दूर जातात आणि पुनः जवळ येतात असे होतच असते. काही माणसे मात्र नजरेच्या इतक्या पलीकडे गेलेली असतात आणि आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ती संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेलेली असतात की ती पुनः कधी नजरेला पडतीलच याची शाश्वति वाटत नाही. टेलीफोन, इंटरनेट आदि संपर्कमाध्यमांमुळे आज जग लहान झाले आहे आणि एका लाटेने तोडलेल्या ओंडक्यांची पुन्हा पुन्हा गांठ पडण्याच्या शक्यता थोड्या वाढल्या आहेत.


कृष्णा कामत हा माझा इंजिनियरिंग कॉलेजमधला मित्र वयाने, उंचीने आणि अंगलटीने साधारणपणे माझ्याएवढाच होता किंवा मी त्याच्याएवढा होतो. माझे बालपण लहानशा गांवातल्या मोठ्या वाड्यात तर त्याचे महानगरातल्या चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये गेले असले तरीसुध्दा आमचे संस्कार, विचार, आवडीनिवडी यांत अनेक साम्यस्थळे होती. त्यामुळे आमचे चांगले सूत जमत होते. तो सुध्दा माझ्यासारखाच अणुशक्तीखात्यात नोकरीला लागला, पण त्याचे ऑफिस ट्राँबेला तर माझे कुलाब्याला होते आणि मी रहायला चेंबूर देवनारला तर तो भायखळ्याला होता. आम्ही दोघेही रोज विरुध्द दिशांनी मुंबईच्या आरपार प्रवास करत होतो आणि आराम तसेच इतर कामात रविवार निघून जात असे. पण मला कधी बीएआरसीमध्ये काम असले तर ते करून झाल्यावर मी तिथे काम करणा-या इतर मित्रांना भेटून येत असे. त्यात कामतचा पहिला नंबर लावत असे.

कामतने ती नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तो बंगलोरला गेला. पण त्याने आपला ठावठिकाणा कुणालाच कळवला नाही. त्याच्याशी संपर्क राहिला नव्हता. मी दहा बारा वर्षांनंतर मुंबईतल्याच एका कमी गर्दीच्या रस्त्यावरून चालत असतांना अचानक तो समोरून येतांना दिसला, पण त्याच्या शरीराचा एक आवश्यक भाग असलेला असा तो सोडावॉटर बॉटलच्या कांचेसारखा जाड भिंगांचा चष्मा त्याने लावला नव्हता. हे कसे शक्य आहे असा विचार करत मी त्याच्याकडे पहात असतांना तोच माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला त्याने उत्तर दिले, "अरे, काय पाहतोय्स? माझे कॅटरॅक्टचे ऑपरेशन झाले आणि चष्मा सुटला." तो आता वाशीला रहायला आला होता आणि त्याने दुसरी नोकरी धरली होती. पुढची तीन चार वर्षे आम्ही अधून मधून भेटत राहिलो, पण त्यानंतर तो पुन्हा अचानक अदृष्य झाला. या वेळी तो परदेशी गेला असल्याचे कानावर आले.


२०१७ साली म्हणजे आणखी बारा वर्षे गेल्यानंतर माझ्या बोरीवलीमध्ये रहात असणा-या माझ्या एका पत्रमित्राचा मला एक ईमेल आला. त्यात त्याने लिहिले होते की मला ओळखणारे कामत नावाचे एक गृहस्थ त्याला तिथल्या एका दवाखान्यात भेटले होते. त्याने समयसूचकता दाखवून त्यांचा फोन नंबर घेऊन मला कळवला होता. मी लगेच कामतला फोन लावला. तो बारा वर्षे गल्फमध्ये राहून नुकताच परत आला होता आणि त्याने आता बोरीवलीला घर केले होते. मी पुण्याला आलो असल्याचे आणि इथे काही जुन्या मित्रांच्या संपर्कात असल्याचे त्याला सांगितले. पुढच्या आठवड्यात आम्ही ब्रेकफास्टला एकत्र येणार असल्याने कामतने त्या वेळी पुण्याला यायलाच पाहिजे अशी त्याला गळ घातली आणि त्यानेही उत्साह दाखवला. त्यानंतर मी त्याला रोज फोन करून विचारत राहिलो आणि पुण्यात वास्तव्याला असलेल्या आमच्या नोकरीमधल्या दोन सहका-यांशी बोलून एक पूर्ण  दिवस आमच्यासाठी राखून ठेवायला सांगितले.


ठरल्याप्रमाणे कामत पुण्याला आला आणि किमया रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला हजर राहिला आणि आमच्या कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना कित्येक म्हणजे बारा ते पन्नास  वर्षांनंतर भेटला, पण आम्हा दोघांचाही जवळचा मित्र भोजकर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे  शकला नव्हता. मग लगेच त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आम्ही दोघे तिसरा एक मित्र अशोक याला सोबत घेऊन भोजकरच्या घरी गेलो आणि त्याला भेटलो. त्यानंतर आम्ही दोघेच बीएआरसीमधल्या एका मित्राकडे गेलो आणि तासाभरानंतर त्याला सोबत घेऊन दुस-या जुन्या मित्राकडे गेलो. दोन तीन दिवसांपूर्वी मला ज्याची कल्पनाही नव्हती असा इतक्या जुन्या मित्रांच्या भेटींचा योग त्या दिवशी जुळवून आणता आला तो फक्त इंटरनेट आणि टेलिफोन यांच्या मदतीमुळे. 
----------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ ..... (भाग ४)

अर्थशून्य भासे मजला कलह जीवनाचा ।

अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांचे मळभ सन २०१६ मध्ये घडलेल्या घटनांमुळे त्या वर्षाच्या अखेरीला माझ्या मनावर साचू लागले होते. तेंव्हासुध्दा मला कशाची कमतरता नव्हती. मुळातच मी माझ्या गरजा कधीच वाढवल्या नव्हत्या आणि परिस्थितीमधून जेवढ्या गरजा निर्माण झाल्या होत्या त्या सगळ्या माझ्या घरातली माझी माणसे मी न सांगता पुरवत होती. त्यासाठी मला कांहीच करायची आवश्यकता नव्हती, पण कशासाठीही कांहीही करावे असे न वाटणे हेच मला बेचैन करत होते.  २०१६च्या अखेरीला माझी शारीरिक आणि मानसिक अवस्था जरा दोलायमान झाली असल्यामुळे साधारणपणे तसे कांही तरी झाले होते.

याचा छडा लावण्यासाठी आम्ही हृदयविकारतज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) आणि मेंदूविकारतज्ज्ञ (न्यूरॉलॉजिस्ट) यांना भेटलो. त्यांनी कांही तपासण्या करून सांगितले की मला कोणता नवा विकार झालेला नाही, पण वयोमानानुसार ही इंद्रिये आता उताराला लागली आहेत. त्यांची घसरण थांबवण्यासाठी मला कांहीतरी करणे आवश्यक झाले होते. शरीराचा तोल सांभाळण्याला मदत करतील अशा काही फिजिओथेरपीच्या क्रिया दिवसातून सहा वेळा करायचा आदेश मिळाला. म्हणजे मला दिवसभरासाठी काम मिळाले. त्या थिरपीमधून २-३ महिन्यांनी माझा आत्मविश्वास वाढला आणि मी पुन्हा एकट्याने फिरायला लागलो. आता मला पुढचे पाऊल उचलायचा धीर आला.

लहानपणापासूनच मी निरनिराळी योगासने करून पहात होतो, पण ती एक गंमत म्हणून किंवा सर्कशीतल्या हालचाली करून दाखवण्यासारखे होते. मोठेपणी नोकरीला लागल्यानंतर मी काही योगासने केली नाहीत. ती करण्यासाठी वेळ न मिळणे ही सबब आणि आळस हे पुरेसे कारण होते. निवृत्त झाल्यानंतर मात्र मला योगाच्या वाटेने जावे असे वाटायचे आणि टीव्हीवरील त्याचे कार्यक्रम मी पहायला लागलो होतो, पण अमूक आजार असेल तर तमूक आसन करू नये अशा सूचनांमुळे बहुतेक सगळीच आसने माझ्यासाठी बाद झाली होती. तसेच ही आसने किंवा व्यायामाचा कुठलाही प्रकार नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावा अशी तळटीप सगळीकडे दिलेली असते. हे करणे कसे शक्य आहे ते कळत नव्हते.

 २०१७ साली मात्र आमच्या घरापासून जवळच चालत असलेल्या योगवर्गाला नियमितपणे जायचा माझा विचार पक्का झाला. आपल्याला बहुतेक आसने करता येणार नाहीत यामुळे इतर लोक काय म्हणतील याची लाज आणि मनातून थोडी भीतीही वाटत होती. पण माझ्याच वयाच्या एका नव्या मित्राने मला एकदा फक्त येऊन पहा अशी गळ घातली आणि मी मनात संकोच बाळगतच त्याच्यासोबत पहाटे त्या वर्गाला गेलो.

या वर्गात अनेक आसने आणि प्राणायामाचे प्रकार दररोज एका ठराविक क्रमाने केले जातात. बाबा रामदेवांच्या पतंजलि आश्रमामध्ये जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले प्रशिक्षक इथे रोज ही आसने दाखवतात, पण सगळ्या साधकांनी ती केलीच पाहिजेत अशी सक्ती नसते. ज्याला जेवढे जमेल, झेपेल, इच्छा होईल तेवढे त्याने करावे. माझ्यासारखेच इतर कांही ज्येष्ठ नागरिक तिथे येत होते त्यांनाही अनेक अडचणी होत्या. यामुळे मला लाज वाटायचे कारणच नव्हते आणि प्रयोग करता करता माझ्या मनातली धाकधूक हळूहळू कमी झाली. मुख्य म्हणजे नकारात्मक विचारांकडे चाललेला माझा कल पुन्हा सकारात्मक विचारांकडे झुकला. आता २०१७चा निरोप घेतांना या वर्षातली ही एक उपलब्धी आहे असे म्हणता येईल.

---------------------------

बाय बाय २०१७ ..... (भाग ५)

Man is a social animal. मनुष्यप्राणी समूहांमध्ये रहातात. असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. एकाद्या माणुसघाण्या एकलकोंड्याचा अपवाद सोडला तर बहुतेक माणसांना इतर माणसांचा सहवास हवा असतो. त्यांच्या कुटुंबामधली माणसे असतातच, त्याशिवाय शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी, सहकारी वगैरे इतर अनेक लोकांशी स्नेहसंबंध जोडायचा प्रयत्न बहुतेक माणसे करत असतात. समानशीलव्यसनेषुसख्यम् । या संस्कृत उक्तीनुसार मी सुध्दा मुंबईत असेपर्यंत माझ्याशी जमवून घेऊ शकणा-या लोकांमध्ये वावरत गेलो होतो. पण पुण्याला रहायला आल्यानंतर ही पूर्वीची मंडळी दुरावली गेली.  त्यांच्या प्रत्यक्ष गांठी भेटी घडणे जवळ जवळ थांबले. पण गेल्या कांही वर्षांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल फोनमुळे दूर राहणारी माणसे जोडली गेली आहेत आणि त्यांच्याबरोबर संपर्क साधणे शक्य झाले आहे. मी तसे प्रयत्न करत होतो, पण ते नीट जुळवून आणण्यामधल्या काही तांत्रिक अडचणी दूर करून आवश्यक त्या सुखसोयी प्रस्थापित कराव्या लागतात. ते करेपर्यंत २०१६चे वर्ष बरेचसे संपत आले होते.

२०१७ मध्ये मात्र मला हवे असेल त्या वेळी ईमेल, फेसबुक आणि वॉट्सअॅप उपलब्ध होऊ लागले आणि मी त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. आमच्या ऑफिसमधून निवृत्त झालेल्या सहका-यांच्या गूगल ग्रुपमध्ये आता सुमारे तीनशे सदस्य आहेत, फेसबुकवर माझे सुमारे पाचशे मित्र आहेत आणि वॉट्सअॅपवरील आठ दहा ग्रुप्समध्ये मिळून पुन्हा तितकेच आहेत. यातले माझ्यासकट अनेक लोक झोपाळू सदस्य (स्लीपिंग मेंबर्स) असले तरी रोज निदान पंचवीस मेल्स, पन्नास अपडेट्स आणि शंभर तरी पोस्ट येतातच. त्यात मी सुध्दा अल्पशी भर टाकत असतो. मी लिहिण्याचा कंटाळा करत असलो आणि इधर का माल उधर करणे मला आवडत नसले तरी जमेल तेवढे वाचायचा निदान प्रयत्न तरी करतो. त्यामुळे शहाणपणात भर पडो न पडो, मेंदूतल्या पेशींना थोडा व्यायाम मिळत असावा.  शिवाय त्या निमित्याने त्या मित्राचे किंवा आप्ताचे नांव आणि फोटो दिसतो आणि त्याची आठवण जागी होते. त्याचे क्षेमकुशल आणि प्रगति समजते. यातून जरा चांगले वाटते.

२०१७ मध्ये आमच्या संकुलामधल्या कांही ज्येष्ठ नागरिकांनी एका संघाची स्थापना केली. तसे हे लोक रोजच सकाळ संध्याकाळ दोघातीघांच्या लहान लहान ग्रुप्समध्ये बसून गप्पा टप्पा करत असत. त्यांची संख्या कधी कधी सात आठ पर्यंत जात असे. त्याला आता जास्त जोम आला. या वर्षी मीसुध्दा त्यांच्यात जाऊन बसायला लागलो आणि त्यांच्यासोबत इकडे तिकडे जायला यायला लागलो. निरनिराळ्या गांवांमधून निरनिराळ्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करून आता इथे रहायला आलेल्या या ज्येष्ठ लोकांच्या जीवनातले अनुभव आणि त्यातून घडलेले त्यांचे व्यक्तिमत्व खूप वेगवेगळे असते. अणुशक्तीनगरमध्ये रहात असतांना आजूबाजूचे बहुतेक सगळे लोक ऑफिसात माझ्यासारखेच काम करणारे, माझ्याच शैक्षणिक, बौध्दिक व आर्थिक स्तरामधले आणि साधारणपणे समान विचारसरणीचे असायचे, त्यामुळे मला माणसांमधले इतके वैविध्य पहायला मिळत नव्हते. या वर्षी मी त्याचा अनुभव घेत आहे. आपलेच तेवढे खरे असे न समजता इतरांना हे जग कसे दिसते हे ऐकून घेण्यात एक वेगळी मजा येत आहे.   

. .  . . . . ... .  . . . . . . . . .  (क्रमशः)
--------------------------------------------------------------------------------------------------

No comments: