Tuesday, October 24, 2017

हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा

आधी हॅप्पी दसरा, मग हॅप्पी बर्थडे, हॅप्पी दिवाळी वगैरे मेसेजेसचा एका पाठोपाठ एक नुसता वर्षाव गेले तीन आठवडे होत होता. त्यात चिंब भिजून गेल्यामुळे मलासुध्दा थोडं हॅपी हॅपी वाटायला लागलेलं असतांना मला एक संस्कृतीसंरक्षक गृहस्थ भेटले.
"कसे आहात?" त्यांनी विचारलं, ती एक औपचारिक चौकशी असेल असं मला वाटलं.
मी अजून हॅपी मूडमध्येच होतो. हंसत हंसत म्हणून गेलो, "मजेत!"
ते एकदम स्तब्ध होऊन माझ्याकडे पहात राहिले. बहुधा त्यांना या उत्तराची अपेक्षा नसावी. हे जग, आपला देश, आपले शहर यात रोज उठून केवढ्या भयानक घटना घडत आहेत, आपला समाज अधःपाताच्या खोल रसातळाच्या दिशेने चालला आहे, आपली कुटुंबसंस्था कोलमडून पडायला लागली आहे, आपली शरीरे व्याधींनी आणि मने चिंतांनी पोखरून निघत आहेत, या माणसाच्या वाट्याला काय कमी पीडा आल्या आहेत? अशाही परिस्थितीत हा माणूस मजेत कसा असू शकतो? आणि तरीही तोंड वर करून तसं सांगायलाही याला काहीच वाटत नाही! असे प्रश्न मला त्यांच्या चेहे-यावर दिसायला लागल्यामुळे मी थोडासा वरमलो आणि चांचरत म्हणालो, "म्हणजे देवाच्या दयेने माझं तसं ठीक चाललं आहे, आला दिवस पुढे ढकलतो आहे."
"मग मघाशी काय म्हणालात?" ते मघाचे उत्तर विसरायला तयार नव्हते. माझ्या हातातला मोबाईल दाखवत मी बोललो, "अहो बघा ना, यात सगळं हॅपी हॅपी भरलंय्, म्हणून .... "
"हे एक खूळ किती बोकाळलंय् बघा! अहो ख्रिश्चन लोक मेरी ख्रिसमस म्हणतात, मुसलमान लोक ईद मुबारक म्हणतात, त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे आणि आपले लोक? ते अजूनही इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर पडलेले नाहीत, हॅप्पी दिवाळी म्हणायला यांना लाजा कशा वाटत नाहीत?" त्यांच्या सात्विक संतापाचा पारा चढायला लागला होता.
"अहो मला हे संदेश पाठवणारे सगळे लोक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जन्माला आलेले आहेत. त्यांनी कधीच इंग्रजांची गुलामी पाहिलेलीही नाही."
"बघा तरीसुध्दा ते हॅपी हॅपीची पोपटपंची करताहेत! आता यांना काय म्हणावं?"
"अहो, आपण तिळगुळ घ्या गोड बोला असं संक्रांतीला म्हणतो, सोन्यासारखं रहा असं दस-याला म्हणतो तसंच एकदा मी एकाला सांगितलं, बाबारे, दिवाळी आली, आता दिवे लाव, उजेड पाड, देव तुझं भलं करो. तर तो माझ्यावरच चिडला की हो. मी त्याला मराठीत काय सांगायला पाहिजे होतं?"
"कां, शुभ दीपावली म्हणता नाही येत?"
"दिवाळी तर शुभ असतेच ना? त्यात मी माझं म्हणून काय सांगितलं?"
"मग दिवाळीच्या शुभेच्छा म्हणावं."
"आताशी मी तेच करतोय्. मराठीभाषिकांना शुभेच्छा, हिंदीभाषिकांना शुभकामनाएँ लिहितो, पण त्यात मजा, आनंद वगैरे भावना येत नाहीत. शुभेच्छा हा शब्द कुणी शोधून काढला कोण जाणे, तो कृत्रिम आणि कोरडा वाटतो. मी तामीळतेलुगू आणि मल्याळीबंगाली मित्रांचं काय करू? मला त्यांच्या भाषा येत नाहीत आणि त्यांना माझी. नेहमी आम्ही इंग्रजीमधूनच  एकमेकांशी बोलतो. ती आता आमची संपर्कभाषा आहे. यात कुणाच्या गुलामीचा संबंध कुठे येतो?"
त्यांना लगेच काही उत्तर सुचले नाही, तेवढ्यात मीच त्यांना विचारलं,
"तुम्ही तर सगळी पोथ्यापुराणं वाचली असतील, त्यात शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द कुठे येतात का? म्हणजे रावणाने कुंभकर्णाला किंवा सुभद्रेनं द्रौपदीला कुठल्याशा सणाच्या शुभेच्छा दिल्या होत्या असले उल्लेख आहेत का?"
"अहो, त्या काळात तशी रीत नव्हती."
"तेंव्हाच कशाला? साठपासष्ट वर्षांपूर्वी माझ्या लहानपणीसुध्दा सणासुदीच्या दिवशी लहान मुलांनी घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडायचं आणि त्यांनी मोठा हो, शहाणा हो असे आशीर्वाद द्यायचे अशी पध्दत होती. मी तरी तेंव्हा शुभेच्छा, सदीच्छा, शुभकामना हे शब्द ऐकलेसुध्दा नव्हते. ते संस्कृतमधले असल्यासारखे वाटतात, पण प्राचीन काळातल्या मूळच्या संस्कृत भाषेत ते उपयोगात होते का ?"
"मी म्हंटलं ना की ही आपली संस्कृती नाहीच, हे इंग्रजांचं आंधळं अनुकरण आहे."
"कदाचित असेलही, पण त्यात काय वाईट आहे? वैदिक काळातले लोक जसे रहात होते तसे आपण आज राहतो का? इंग्रज लोकसुध्दा रोमन साम्राज्याच्या किंवा आठव्या हेन्रीच्या काळात रहायचे तसे आता रहात नाहीत. काळाबरोबर सगळ्याच लोकांची राहणी, त्यातल्या चालीरीती हळूहळू बदलत असतात. त्यातले जे आपल्याला बरे वाटते ते आपण कळत नकळत उचलतो. त्याचा उगाच अंधानुकरण वगैरे मोठा बाऊ कशाला करायचा?"
"पण हॅप्पी दिवाळी असं म्हणायचं नाही म्हणजे नाही. आपली संस्कृतीच सगळ्या जगात श्रेष्ठ आहे. आपण तीच पाळायची." हरिदासाची कथा मूळपदावर यायला लागली.
"आणि आज थोडी मजा करून घे, आनंदी रहा असं कुणालाही सांगणे ही गोष्ट त्यात बसत नाही. असंच ना?"
हा माणूस वाया गेला आहे, याला काही सांगण्यात अर्थ नाही असा विचार त्यांनी बहुधा केला असावा. मलाही आपला मूड घालवायचा नव्हता. मी मनातल्या मनात त्यांनाही हॅप्पी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पण माझ्या मनातलं चक्र फिरतच राहिलं. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे. पूर्वीच्या काळातसुध्दा अनेक उत्सव असायचेच आणि कुठलाही उत्सव कधी एकट्याने साजरा होतच नसतो, त्यात कसलीच मजा नसते. लहानपणी आम्ही शुभेच्छा हा शब्द उच्चारत नसलो तरी गांवातल्या नातेवाइकांना आणि मित्रांना भेटून त्यांच्यासह सणवार साजरे करत होतो. या एकत्र येण्यात, सहवासातच उत्सवाचा खरा आनंद असायचा. पुढे शहरात रहायला लागल्यावर दूर दूर रहात असलेल्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रांना प्रत्यक्ष जाऊन भेटणे शक्य होत नव्हते, पण टेलीफोनचा प्रसार झाल्यावर सणासुदीला त्यांच्याशी टेलीफोनवर बोलून एकमेकांच्या आनंदात सहभागी होणे सुरू झाले. मधल्या काळात रंगीबेरंगी आकर्षक अशी ग्रीटिंग कार्डे बाजारात आली आणि ती तुफान लोकप्रिय झाली. आपल्या मनातल्या भावना मोजक्या शब्दात व्यक्त करायचे एक आयते आणि सोपे साधन मिळाले. एकमेकांना शुभेच्छा देण्याची प्रथा या काळात प्रचलित होत गेली.

प्रत्यक्ष भेटण्याला आणि टेलीफोनवरल्या संभाषणालाही स्थळकाळाच्या मर्यादा होत्याच. इंटरनेटच्या आगमनानंतर त्या मर्यादा अमर्याद विस्तारल्या गेल्या. ईमेल, फेसबुक, वॉट्सअॅप यासारख्या माध्यमांमुळे शेकडो मित्र आणि आप्त जोडले गेले. त्या सर्वांना शब्द आणि चित्रांमधून एकाच वेळी संदेश पाठवणे शक्य झाले. ही माध्यमे मुख्यतः इंग्रजी भाषेत चालत असल्यामुळे त्या भाषेचा प्रभाव पडणारच आणि या संदेशांमध्ये ती भाषा प्रामुख्याने निदान सध्या तरी दिसणारच. आपण तरी तिला परकी मानून तिचा तिरस्कार का करायचा? त्या संदेशांमधल्या भावना आणि उद्देश समजून घेऊन उत्सव साजरा करावा हे जास्त महत्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते?


No comments: