मी हा ब्लॉग सन २००६ मध्ये सुरू केला. त्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये मला दिसलेली गणपतीची आगळी वेगळी रूपे वाचकांना दाखवण्याच्या विचाराने मी 'कोटी कोटी रूपे तुझी' ही लेख माला लिहिली होती. पण त्या काळात मराठी ब्लॉगविश्व खूपच छोटे होते आणि वाचकांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखी होती. त्यानंतर मला गणेशाच्या विविध रूपांचा संग्रह करायचा छंदही लागला. आता ११ वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे. रोजच किमान १०० तरी वाचक माझ्या या स्थळावर टिचकी मारतात. त्यावरील जुन्या मालिकांमधील आशय त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी त्यातल्या कांही लेखांमधला सारांश नव्या चित्रांसोबत या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या कालावधीत देण्याचा विचार करून मी ओळीने नऊ लेख लिहिले. पण घरातल्या आणि कॉलनीमधल्या उत्सवात सहभागी होऊन उरलेल्या वेळात हे संकलन करत असतांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये अडचणी येत गेल्या. त्यामुळे या वर्षी झालेल्या गणेशोत्सवाबद्दल लिहून त्यात भर घालणे जमले नाही. ते करायचा प्रयत्न मी या वेगळ्या लेखामधून केला आहे. हे म्हणजे वरातीमागून आलेल्या घोड्यासारखे झाले आहे. त्याबद्दल क्षमा असावी.
लोकमान्य टिळकांनी सन १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे मी आतापर्यंत समजत होतो. या वर्षी पुणे महापालिकेतर्फे १२५ वा म्हणजे शतकोत्तर रौप्यमहोत्सव दणक्यात साजरा करावा असे ठरले होते, पण पुण्यातला पहिला सार्वजनिक गणेशोत्सव भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये सुरू केला असल्यामुळे लो.टिळकांचा उत्सव पहिला ठरत नाही असा आक्षेप घेतला गेला. या निमित्याने भाऊसाहेबांबद्दल आणि त्यांनी केलेले समाजकार्य, त्यांनी सुरू केलेल्या उत्सवाचे स्वरूप, त्यामागील उद्देश, वगैरेसंबंधी अधिक माहिती मिळेल असे वाटले होते. पण तसे फारसे काही समजले नाही. जेवढे माझ्या वाचनात आले त्यावरून पाहता ते स्वतः लोकमान्य टिळकांचे चाहते किंवा सहकारी असावेत, प्रतिस्पर्धी किंवा विरोधक नसावेत असाच माझा ग्रह झाला. पण हा आक्षेप घेणा-यांच्या पाठीशी उभ्या असलेल्यांना बहुधा या समारोहाच्या फलकांमधून लो.टिळकांचे नाव, फोटो वगैरे गाळण्यात रस होता आणि ते त्यात यशस्वी झाले.
सकाळ या वर्तमानपत्राने या निमित्याने एक विशेष लेखमाला चालवली आणि गेल्या सव्वाशे वर्षांमधल्या पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सवांतली खास वैशिष्ट्ये त्यामधून वाचकांना सादर केली. हा एक प्रकारचा माहितीचा खजिनाच मला मिळाला. यात अनेक प्रकारचे लेख, आठवणी आणि ठेवणीतली दुर्मिळ छायाचित्रे यांचा समावेश होता. गणेशोत्सवातले बोधप्रद व मनोरंजक कार्यक्रम असोत किंवा त्याची पूजा आराधना करण्याच्या धार्मिक विधी, गणेशाबद्दल पौराणिक कथा, आख्यायिका किंवा पुण्यातल्या निरनिराळ्या प्रमुख मंडळांचा इतिहास अशा प्रकारची भरपूर माहिती या पुरवण्यांमधून मिळाली. निरनिराळ्या विषयांवर त्या क्षेत्रातल्या अनुभवी तज्ज्ञ व्यक्ती, समाजातल्या मान्यवर किंवा तारांकित व्यक्ती आणि सामान्य युवक वर्ग अशा अनेकजणांच्या मतांना किंवा विचारांना यात स्थान दिले होते. शंभर सव्वाशे वर्षामधल्या बदलांचा थोडक्यात मागोवा घेतला होता. यामुळे ही मालिका वाचनीय झाली होती. मी त्यातली काही माहिती या लेखात खाली दिली आहे.
सव्वाशे वर्षांपूर्वी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, नानासाहेब खासगीवाले, गणपतराव भोपटकर, खंडोबा तरवडे, दगडूशेठ हलवाई यांच्या पुढाकाराने आणि लोकमान्य टिळकांच्या पुरस्काराने पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. अण्णासाहेब पटवर्धन, बाळासाहेब नातू, घोटवडेकर, सातव, भोरकर वकील, गंगाधर रावजी खैर आदि मंडळीही यासंबंधी घेतलेल्या बैठकीला उपस्थित होती. भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट यांच्या गणेशोत्सवात तेंव्हापासूनच योध्दागणेश या स्वरूपाची मूर्ती असते. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, नागनाथ पार, शनिपार, तरवडे, बढाई समाज, काळभैरवनाथ मंडळ, विंचूरकर वाडा वगैरे ठिकाणचे गणेशोत्सव त्यानंतर १-२ वर्षात सुरू झाले आणि होत आले आहेत. विंचूरकर वाडा इथे लोकमान्य टिळकांनीच सुरू केलेला गणेशोत्सव नंतर गायकवाड वाड्यात हलवला गेला. त्यांच्या केसरी या वर्तमानपत्राचे कार्यालय या वाड्यात होते. त्याला आता केसरी वाडा असेच म्हणतात. गुरुजी तालीम ही सन १८८७ मध्येच सुरू झाली होती आणि हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक होती. आता ती तालीम अस्तित्वात नाही, पण त्या जागेजवळच गणपती उत्सव मात्र साजरा होतो.
खाली दिलेले पांच गणपती पुण्यातले मानाचे गणपती आहेत. विसर्जनाच्या मिरवणुकीत ते या क्रमानेच आणले जातात अशी परंपरा आहे.
१. कसबा गणपति - छत्रपति शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांनी १६३९ साली हे मंदिर बांधले.
२. तांबडी जोगेश्वरी - ही पुण्याची ग्रामदेवता आहे. तिचे देऊळ पंधराव्या शतकातले आहे. त्या देवळाच्या जवळ गणपतीची स्थापना करतात.
३. गुरुजी तालीम मंडळ
४. तुळशीबाग गणपती
५. केसरीवाडा (गायकवाड वाडा) गणपती
दगडूशेट हलवाई आणि मंडईचा गणपती हे मानाचे नसले तरी त्यांचे उत्सव सर्वाधिक लोकप्रिय असतात. तिथे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांची अमाप गर्दी असते.
मी अकरा वर्षांपूर्वी केलेल्या निरीक्षणामध्ये मधल्या काळात विशेष फरक पडलेला दिसला नाही. हा उत्सव थाटामाटात साजरा करणे किंवा न करणे या दोन्ही बाजूने असलेले मुख्य मुद्दे तेच राहिले, त्याच्या तपशीलामध्ये थोडा फरक पडला. या वर्षीच्या गणेशोत्सवातले कांही ठळक बदल आणि नवे मुद्दे खाली दिले आहेत.
पर्यावरण हा मुद्दा दर वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी चर्चेला येतोच. त्याला धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध करणारेही असतात. त्यांच्या वागण्यात फारसा बदल झाला नसला तरी उघड विरोधाची धार आता जरा कमी झाली आहे. याउलट घरातल्या उत्सवांसाठी तरी शाडू मातीच्या आणि लहान आकाराच्या मूर्ती तयार कराव्यात असा प्रचार शाळांमधून केला जाऊ लागला आहे, त्या मूर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जात आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्षीसुध्दा विसर्जनाची ठिकाणे नेमून दिली होती आणि गणेशाला वाहिलेली फुलेपाने वगैरे हरित कचरा वेगळा करून कुंडामध्ये टाकण्याची चांगली व्यवस्था त्या ठिकाणी केली होती. यामुळे जलप्रदूषणात किती टक्के फरक पडला त्याची आंकडेवारी जाहीर झाली नसली तरी लोकांच्या मनात याविषयी जागृति निर्माण होत असल्याचे दिसले. मुठा नदीमधील पाण्याचा प्रवाह अगदी कमी झाल्यानंतर मानाच्या गणपतींचे विसर्जन आता कृत्रिम हौदांमध्ये केले जाते. या वर्षी मात्र गणेशोत्सव संपून महिना होऊन गेला तरी पाऊस पडणे सुरूच आहे. त्यामुळेही विसर्जन झाल्यानंतर नद्यांमध्ये पडलेला कचरा वेगाने वाहून जाण्यास मदत झाली.
गणपतीच्या मूर्ती निरनिराळ्या स्वरूपात केल्या जातात किंवा त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे देखावे केले जातात ही सव्वाशे वर्षांची परंपरा आहेच. त्यातल्या अनेक ठिकाणी सुंदर आणि भव्य असे काल्पनिक महाल किंवा विशिष्ट सुप्रसिध्द इमारती किंवा मंदिरांच्या प्रतिकृती असतात. काही जागी गणेश, शंकर, विष्णू, दत्तात्रेय, हनुमान आदि देवांच्या संबंधित कथांची दृष्ये असतात किंवा इतिहासातील प्रमुख घटना दाखवल्या जातात, त्यात छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या अद्भुत घटना हमखास असतात, तसे देखावे या वर्षीसुध्दा होते. त्याव्यतिरिक्त सध्या चर्चेत असलेले काही विषय घेतले होते, उदाहरणार्थः- सायबरगुन्हे, सेल्फीचे दुष्परिणाम, सर्जिकल स्ट्राइक, चिनी वस्तूंवर बहिष्कार, महिला सुरक्षा, आमटे कुटुंबीय, पाणी वाचवा वगैरे. बाहुबली आणि जेजुरीचा खंडोबाराया हे चित्रपट व मालिकांमधून लोकप्रिय झालेले विषय या वर्षीच्या सजावटींमध्ये दिसले. काही जागी रावणाचे गर्वहरण, कुंभकर्णाचा निद्राभंग, ज्वालासूर, अघासुर वगैरे कोणालाही फारशा माहीत नसलेल्या कथांचे देखावे केलेले होते. काही ठिकाणी तर विनोदी पुणेरी पाट्या, भेदक व्यंगचित्रे, प्रस्तावित पनवेलच्या विमानतळाचा देखावा अशा सजावटींनी शोभा आणली होती. गणेशोत्सवाच्या निमित्याने कलाकारांमधल्या सुप्त सर्जनशीलतेला (क्रिएटिव्हिटीला) भरपूर पंख फुटतात खरे.
पुण्यामध्ये ढोलताशा या वाद्यांना पहिल्यापासून मोठा मान आहे, पण हौशी आणि व्यावसायिक ढोलताशावादकांच्या संख्येत मात्र कित्येक पटीने वाढ झाली आहे. महिनाभर आधीपासूनच त्यांच्या तालमी सुरू झाल्या आणि पुण्यातल्या गल्ल्याबोळांमधले वातावरण त्यांच्या आवाजाने दणाणून जात राहिले. या सोबतच डॉल्बी नावाच्या कर्णकर्कश कृत्रिम आवाज काढणा-या यंत्राचा वापरही अनेकपटींने वाढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात आणि त्यानिमित्याने काढलेल्या मिरवणुकांमध्ये अपरंपार ध्वनिप्रदूषण होत गेले. ढोलाचा आवाज एकवेळ कानात बोळे घालून किंचित सौम्य करता येईल, पण डॉल्बीचा आवाज तर पोट आणि छातीमधल्या पोकळ्यांमध्ये घुमून आतल्या नाजुक इंद्रियांना पर ढवळत राहतो. वयस्क लोकांसाठी ते असह्य होते.
घराबाहेर न पडता संगणकावर किंवा मोबाइल फोनवरच गणेशोत्सवांची किंवा तिथल्या पूजा, आरती वगैरेंची दृष्ये पाहण्याची भरपूर सोय निरनिराळ्या संकेतस्थळांद्वारे केलेली होतीच. फेसबुक, वॉट्सअॅप आदि सोशल नेटवर्किंग साइट्सवर गणपतीची स्थिर किंवा हलती चित्रे, देखाव्यांचे फोटो आणि गाणी, काव्ये वगैरेंचा महापूर आला होता. अनंतहस्ते अपलोड होत असलेल्या या पोस्ट्स पाहता किती पाहशील दोन डोळ्यांनी अशी परिस्थिती झाली होती.
विसर्जनाचा थाट तर वाढतोच आहे. ढोलताशे, डॉल्बी वगैरेंचा कर्णकर्कश आवाज सहन करू शकत असला तर डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखी रोषणाई केलेली असायची. आजकाल प्रत्येक मंडळ मांडवातली सजावट करतेच, पण विसर्जनासाठी खास चित्ररथ तयार केले जातात. ट्रकवर ठेऊन रस्त्यामधून जाऊ शकतील अशा आकारात पण विविधतेने नटलेले वेगळेच अत्यंत आकर्षक देखावे केले होते.
चैतन्याने भारलेले गणेशोत्सवाचे अकरा दिवस वेगळेच होते यात शंका नाही.
No comments:
Post a Comment