Thursday, August 31, 2017

जुने गणेशोत्सव भाग ७ - मूर्तीकार, ८-देखावे , ९-जाहिराती

जुने गणेशोत्सव भाग ७- मूर्तिकार




(कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ७ च्या आधारावर विस्तारित लेख)

या वर्षी गणेशोत्सवासाठी अमूक इतक्या लक्ष गणेशमूर्ती बनल्या, त्यातून तमूक इतक्या कोटी रुपयांचा व्यापार व्यवहार झाला अशा प्रकारचे मोठमोठे आकडे आपण वर्तमानपत्रांत वाचतो, टेलीव्हिजनवरील चर्चांमध्ये ऐकतो आणि सोडून देतो. मुळांत हे आंकडे या लोकांना कळतात कसे हेच समजत नाही. आणि हा खर्च होतो तेंव्हा हे पैसे कुठे जातात?  गणेशाच्या मूर्ती बनवणारे, त्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणारे, वाहतूक करणारे, व्यापारी, त्यासाठी भांडवल पुरवणारे वगैरे अनेक लोकांचा त्यांत वाटा असतो. त्यांतील अनेक लोकांची पोटे हातांवर असतात त्यामुळे त्यांना मिळालेले पैसे लगेच खर्च होऊन त्यांच्या गरजेच्या वस्तूंचे उत्पादन आणि पुरवठा करणा-यांच्या खिशात जातात. असा प्रकारे ते विस्तृत समाजामध्ये फिरत राहतात. पण एवढे करून सरतेशेवटी ते सगळं अक्षरशः पाण्यातच जाणार ना? त्यातून समाजाला काय मिळतं? एवढ्या पैशांत समाजासाठी दुसरं काय काय करता आलं असतं असा विसंवादी सूरही कांहीजण लावतात. यामागचं संपूर्ण अर्थशास्त्र कांही आपल्याला फारसं उमगत नाही आणि तो या मालिकेचा विषयही नाही.

पण ही विविध रूपे बनवणारे हात कुणाचे असतात याचं कुतुहल मात्र वाटतंच. मोठमोठे सार्वजनिक गणपती बनवणे तर विलक्षण हस्तकौशल्य आहे. पण घरोघरी जाणारी इतकी एकासारखी एक शिल्पे नुसत्या हातांच्या बोटाने आकार देऊन बनवणे कांही शक्य नाही. त्यासाठी साचे वगैरे निश्चितपणे वापरत असणार. मार्च एप्रिलपासूनच मुंबईत ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला आडोशाला बांधलेल्या शेड्समध्ये हालचाल सुरू झालेली दिसायला लागते आणि पहाता पहाता तिला वेग येतो. याशिवाय नजरेआड पक्क्या इमारती असलेले कारखाने सुध्दा असतीलच, पण हे काम जास्त करून अशा तात्पुरत्या छपराखालीच चालतं असं ऐकलं आहे. मुंबईत विकल्या जाणा-या मूर्तींपैकी फक्त पाव हिस्सा इथे बनतात व तीन चतुर्थांश बाहेरून येतात म्हणे. अर्थांत ही फक्त आकडेवारी झाली. मोठ्या आकाराच्या व अर्थातच तशाच भारी किंमतीच्या सा-या मूर्ती तर इथेच तयार होत असणार.  कांही मूर्तींचा आकार तर गणेशाचा दिसतो पण रंग मातकट असंही आपल्याला अनेक वेळा जाता येता दिसतं. अर्थातच त्यांच्या निर्मितीच्या कामाची विभागणी केली जात असणार. माती आणणे, कालवणे, मळणे, साच्यात घालून आकार देणे, त्याला थोडे सुकवणे अशी जास्त जागा व्यापणारी कामे बाहेरगांवी करून त्यावर शेवटचे रंगकाम करून सजवण्याचे कौशल्यपूर्ण काम इथे कुशल कारागीर करीत असतील. त्यांतही फक्त डोळे रंगवणारे, दागीन्याची कलाकुसर करणारे वगैरेचे तज्ञ विशेषज्ञ वेगळे.



मुंबईपासून जवळच असलेल्या पेण गांवाने या उद्योगांत मोठी आघाडी मारली आहे. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या या व्यवसायात वंशपरंपरागत हस्तकौशल्य आणि कारखानदारी, मार्केटिंग व वाहतुक यांची प्रगत तंत्रे यांचा सुंदर मेळ घालून या गांवाने मुंबई महानगरीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज केली आहे. येथील महिला कलाकार या उद्योगांत खंबीरपणे पाय रोवून उभ्या आहेतच पण इथल्या माहेरवाशिणींनी ही कला आपल्याबरोबर सासरी सुध्दा नेऊन तिचा प्रसार केला आहे. एवढेच नव्हे तर येथील कांही विशेषज्ञ अगदी परदेशांत सुध्दा जाऊन तेथील उत्साही लोकांच्या कार्यशाळा घेतात. येथील अनेक कारखान्यांमध्ये वर्षातील बाराही महिने काम चालते आणि देवाच्या प्रतिमा घडवण्याच्या मंगल कामात हजारोच्या संख्येने कारागीर तल्लीनतेने रत असतात. गेल्या कांही वर्षात आलेल्या अतिवृष्टी, महापूर, विजेचे भारनियमन वगैरेसारख्या भीषण संकटांना तोंड देऊनसुध्दा त्यावर यशस्वीपणे मात करता आली ही गणरायाची कृपा असे भाविक सांगतात. हे सुध्दा त्याच्या कृपादृष्टीचे एक रूपच नाही कां?

गणपतीचा आकार इतका आकर्षक असतो की प्रत्येक लहान बालकाला त्याचे चित्र काढावे असे वाटते. आमच्या लहानपणी आम्ही चिकणमातीच्या गोळ्याला गणपतीचा आकार देऊन पहात होतो, मग आमची मुलेही तेच करतांना पाहिले आणि थोडे मार्गदर्शन केले. आता आमच्या नातवंडांना शाळेतसुध्दा मातीचे गणपती करायचे धडे देतात. मोल्डिंग क्ले घेऊन खेळतांना सुध्दा नकळत त्यांची बोटे गणेशाचा फॉर्म घडवतात. या कच्च्या मूर्ती फक्त स्फूर्ती आणि आनंद देतात, पण कोणी ती पूजेला ठेवत नाहीत. कांही उत्साही लोक मात्र स्वतःच सुबक मूर्ती तयार करतात, त्याला रंगवून सजवतात आणि गणेशोत्सवामध्ये त्याच मूर्तीची पूजा करतात. अशी एक मूर्ती वर दाखवली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------

 जुने गणेशोत्सव -भाग ८ - देखावे


(कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ८ आणि ९  वरून विस्तारित)

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी केलेल्या सजावटीची आणि देखाव्यांची सचित्र आणि सविस्तर वर्णने रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये येत राहतात. जवळपास असेलेले काही उत्सव आपण प्रत्यक्षात जाऊन पाहूनही येतो. आता मला प्रकृतिला सांभाळून दूर जाणे जमत नाही. गेल्या कांही वर्षातील उत्सवांच्या आठवणीतील दृष्यांबद्दलच आता लिहू शकतो.

सजावट ही तर प्रत्यक्ष पहायची, अनुभवायची गोष्ट आहे. त्या चित्रविचित्र आकृत्यांच्या कमानी, कलाकुसर केलेले खांब,  आकर्षक झुंबरं, चमकदार पताका,  रंगीबेरंगी फुलं आणि पानं,  त्या सर्वांवर पडणारे धांवते प्रकाशझोत, फिरणारी चक्रे, डोळे मिचकवणारे मिणमिणते दिवे आणि आपले डोळे दिपवणा-या झगमगणा-या दिव्यांच्या माळा, कुठेकुठे आजूबाजूला आकर्षक चौकटीमधून सुंदर चित्रे वा शिल्पे मांडून ठेवलेली तर कांही ठिकाणी उदबत्त्यांचा किंवा हवेमध्ये फवारलेल्या अत्तराचा मंद मंद सुगंध आणि कर्णमधुर पार्श्वसंगीत यांनी सारे वातावरण भारून टाकलेले. या सगंळ्याचे शब्दांत वर्णन करणे कठिण आहे.

देखावे निर्माण करणे हे काम तर एकाद्या चित्रपटाचा सेट उभारण्यासारखे आहे. त्या व्यवसायातील कांही लोक इथे मदतीला येतात आणि इथे चांगले काम करणा-यांना तिकडे यायचे बोलावणे येते म्हणतात. मी एका प्रख्यात शिल्पकाराची मुलाखत टेलीव्हिजनवर पाहिली होती. त्याने सांगितले की त्याने आपल्या कारकीर्दीची सुरुवातच मुळी प्रथम गणपतीच्या सजावटीपासून केली, तिथून पुढे शासनाचे वतीने महाराष्ट्रदिन, प्रजासत्ताक दिन वगैरेंसाठी चित्ररथ तयार केले, प्रसिध्द व्यक्तींचे पुतळे बनवले असे करत करत आता विविध माध्यमामध्ये अनेक उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती त्याने केली आहे व त्यांची ठिकठिकाणी प्रदर्शने भरवली आहेत.

पौराणिक देखाव्यांमध्ये रामायण व महाभारतातील प्रसंग हटकून असतात. सीतास्वयंवर, अहिल्योध्दार, शबरीची बोरे, जटायुयुध्द, लंकादहन, रामराज्याभिषेक वगैरे रामायणातील घटना आणि वनवासातील पांडव, लाक्षागृह, द्रौपदीस्वयंवर, वस्त्रहरण, भगवद्गीताकथन यासारखी महाभारतातील दृष्ये उभी करतात. कृष्णजन्म व त्याच्या गोकुळातील लीला, विशेषतः रासक्रीडा, दहीहंडी वगैरे विशेष लोकप्रिय आहेत.  इतर पौराणिक प्रसंगात नळदमयंती, गजेन्द्रमोक्ष यासारखी आख्याने, कुठल्या ना कुठल्या असुराचा देवाकडून संहार अशासारखे प्रसंग असतात. कधी नृत्य करणा-या रंभा मेनकांसह भव्य इन्द्रसभा तर चमत्कृतीपूर्ण मयसभा भरलेली असते. कधी कधी गरु़डाचे गर्वहरण यासारख्या सहसा न ऐकलेल्या गोष्टीसुध्दा शोधून काढून आपल्या कल्पनेने त्यांची मांडणी केलेली असते. गणेशाशी संबंधित पुराणातल्या कथा तर असतातच. बहुधा या सगळ्या घटना गणपतीचे समोर घडत आहेत व तो त्या पहात आहे असे दाखवतात. पण कमरेवर हात ठेऊन उभा विठोबा किंवा आशीर्वाद देण्याच्या मुद्रेतील कृष्ण भगवान असे एकएकटेच रूप गणेशालाच तसे बनवून सुध्दा दाखवतात.

ऐतिहासिक देखाव्यांची सुरुवात गौतमबुध्द व महावीर यांच्या जीवनातील प्रसिध्द प्रसंगापासून होते. त्यानंतर क्वचित कुठे अलेक्झँडरची स्वारी, सम्राट अशोक वगैरे आढळतील. पण त्यानंतर मधला दीड हजार वर्षांचा कालखंड ओलांडून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांत येतो.  रोहिडेश्वरासमोर घेतलेली शपथ, अफजलखानाचा वध, पावनखिंडीतील बाजीप्रभूचे शौर्य, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट, आग्र्याहून सुटका, महाराजांचा राज्याभिषेक अशासारखे त्यांच्या जीवनातील बहुतेक सर्व महत्वाचे प्रसंग कुठल्या ना कुठल्या देखाव्यात पाहिलेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची संत तुकाराम व सद्गुरू रामदासस्वामी यांच्याबरोबर घडलेली भेट, त्यांची राजमाता जिजाबाई यांच्याबरोबर चाललेली चर्चा, भवानीमातेकडून तलवारीचा स्वीकार अशी द्रृष्ये समर्थपणे उभी केली जातात. या सगळ्या देखाव्यामागील नियोजन, त्या काळानुरूप पार्श्वभूमी, पोशाख, चेह-यावरील भाव यासह व्यक्त करणे वाखाणण्याजोगे आहे.




आधुनिक काळातील कांही देखाव्यात स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाची पर्वे दाखवली जातात. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांनी केलेल्या स्वार्थत्यागाची आठवण त्यांतून करून दिली जाते. झांशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस वगैरे अग्रणींच्या आयुष्यातील निवडक प्रेरणादायक प्रसंग मंचावर उभे केले असतात. ब्रिटिश सरकारने लोकमान्यांवर घातलेला राजद्रोहाचा खटला व त्यांनी तेथे केलेले सुप्रसिध्द वक्तव्य आहेच, त्यांनी सुरू करून दिलेल्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचाही उल्लेख जागोजागी दिसतो. महात्माजींनी केलेल्या दांडीयात्रेसारख्या चळवळीची दृष्ये असतात तसेच सत्य, अहिंसा, निर्भयता, स्वावलंबन आदि त्यांची शिकवण त्यात व्यक्त केली जाते. कांही ठिकाणी शहीद भगतसिंगासारख्या देशभक्त क्रांतिकारकांच्या गौरवगाथा दाखवल्या जातात तर कुठे स्वातंत्र्यवीर सावरकरांची खडतर तपश्चर्या. भारतमातेचे देवतेच्या स्वरूपांत दर्शन घडवणारे आणि तिच्याबद्दल निष्ठा व्यक्त करणारे देखावे नेहमी पहायला मिळतात.

स्वातंत्र्यानंतरच्या काळातीन स्थितीवर आधारित देखाव्यात कांही जागी भारताची विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय प्रगति दाखवली जाते. त्यात मुख्यत्वे भाक्रा व कोयनेसारखी प्रचंड धरणे, मोठमोठे अवजड यंत्रांचे कारखाने, पृथ्वी, अग्नी यासारखी प्रक्षेपणास्त्रे, आर्यभट, इन्साट वगैरे कृत्रिम उपग्रह वगैरेची चित्रे दिसतात. कारगिलच्या लढाईतील आपल्या सैनिकांचा विजय हा एक अलीकडच्या काळांत बहुचर्चित विषय होता. बर्फाच्छादित डोंगराळ प्रदेशातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाचे त्यावर आधारलेले देखावे पाहिले. संगणकाच्या उपयोगाच्या क्षेत्रात आज सुरू असलेल्या घोडदौडीला दृष्य स्वरूपात दाखवणे तसे कठिणच असेल.

सद्यस्थितीत आ वासून पहाणा-या विविध समस्या अनेक देखाव्यांमध्ये दाखवल्या जातात. पांचवीला पूजलेली महागाई, सर्वभक्षक बेकारी,  भ्रष्टाचाराचा भस्मासुर, ढांसळत चाललेली नीतिमत्ता, कायदा आणि सुव्यवस्था, बंद पडत चाललेले कारखाने, कर्जबाजारीपायी होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या वगैरे ज्वलंत समस्या या माध्यमातून व्यक्त करून त्यांच्या निरसनासाठी गणरायाला साकडं घातलं जातं. कधी कधी त्यांतून अपेक्षाभंगाचा व निराशेचा सूर उमटतांना दिसतो. त्याशिवाय एड्स सारखा भयानक रोग, शहरातील वाढते प्रदूषण, जंगलांची व वन्य प्राण्यांची होत असलेली कत्तल यांच्या भयावह परिणामांची जाणीव करून देण्याचा उपक्रमही या देखाव्यांमध्ये दिसतो.

भारतातील कांही वैशिष्ट्यपूर्ण व सुंदर इमारतींच्या प्रतिकृती व चित्रेसुध्दा या निमित्ताने पहावयास मिळतात. त्यांत म्हैसूरचा राजवाडा, सौराष्ट्रातील सोमनाथाचे मंदिर, अलीकडे प्रसिध्दी पावलेले अक्षरधाम वगैरे शिल्पकलेचे अद्भुत नमुने तर आहेतच पण कुणी नाशिकचे काळ्या रामाचे मंदिर नाहीतर अष्टविनायकामधील एखादे देऊळ अशी भाविकांची श्रध्दास्थाने तात्पुरती उभी करतात. थर्मोकोल आणि पुठ्ठ्यासारख्या माध्यमातून या भव्य वास्तूंचे बारकावे दाखवण्यासाठी सारे कौशल्य पणाला लागते आणि भरपूर मेहनत करावी लागते.

गेल्या वर्षदोन वर्षांत घडलेल्या घटना आणि सध्या समाजापुढे किंवा देशापुढे उभे असलेले प्रश्न यांची छाया अनेक देखाव्यांवर पडलेली असते. यात अतिरेकी, काळा पैसा, ड्रग्जच्या व्यसनापासून मुक्ती, नारीशक्ती तसेच अबलांची सुरक्षा, सीमेवरील तणाव यासारख्या अनेक विषयांवर आधारलेले देखावे मांडून यांचेपासून संरक्षण करण्यासाठी गणरायाला कांकडे घातले जाते किंवा तो आपल्या पाठीशी उभा असल्याचे दाखवले जाते. सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवणा-या या कलाकृती पाहिल्यावर गणेशोत्सवामधील प्रबोधनाचा भाग अगदीच कांही नाहीसा झालेला नाही असे वाटते.
--------------------------------------------------------------------------------------------------

जुने गणेशोत्सव - भाग ९ - जाहिराती


कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प १० च्या आधारे )

आजचे युग जाहिरातीचे आहे असे म्हंटले जाते. विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवा यांच्या जाहिरातींनी वर्तमानपत्रांची पाने भरलेली असतात आणि टेलिव्हिजनच्या प्रत्येक कार्यक्रमातल्या कमर्शियल ब्रेक्समध्ये एकापाठोपाठ एक जाहिराती वारंवार आपल्या कानांवर आदळत असतात. त्या वस्तू विकत घ्याव्यात असे आपल्यालाही कधीकधी वाटायला लागते. गणेशोत्सवाच्या सुमारास या क्षेत्रावरसुध्दा गणपतीचे अधिराज्य प्रस्थापित झाले असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

नव्या गगनचुंबी इमारतींमधील महागड्या सदनिका (फ्लॅट्स) आणि आधुनिक सुखसोयीने परिपूर्ण मोटारगाड्या व दुचाकी वाहने यांच्या मोठमोठ्या जाहिराती बारा महिने येतच असतात. त्यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती सर्वसामान्य ग्राहकांच्या आंवाक्याबाहेर असल्यामुळे त्यांना अर्थसहाय्य करायला पुढे सरसावलेल्या वित्तसंस्था तसेच महागडे दागदागीने विकणारे ज्युवेलर्स यांच्या जाहिरातीसुध्दा नेहमीच प्रामुख्याने झळकत असतात. मोठमोठ्या जाहिराती देण्यात त्यांच्या पाठोपाठ टी.व्ही., फ्रिज, म्यूजिक सिस्टिम्स वगैरेंचा क्रम लागेल. त्या देणा-यात कांही दुकानदार असतात तर कांही निर्माते. कधी कधी तर एकाच दुकानदाराने वा निर्मात्याने वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या पानांवर जाहिरात दिलेली दिसते. गणेशोत्सव आला की यांतील बहुतेक जाहिरातदार आपल्या जाहिरातीत कुठेतरी गणपतीचे एक सुरेख चित्र घालून त्याला अभिवादन करीत त्याच्या नांवाने ग्राहकांना आवाहन करतात.

"गणपती बाप्पा मोरया" च्या जोडीला "आमच्या नव्या घरांत या" किंवा " नव्या गाडीत बसून या" असे कांहीतरी लिहिलेले असते. "मोअर या, मोअर घ्या, मोअर द्या" अशा प्रकारच्या दुस-या ओळी "ये दिल माँगे मोअर" ही ओळ हिट झाल्यावर येऊ लागल्या. कांही जाहिरातीत किंचित काव्य केलेले असते. "गणरायाचे करितो स्वागत, करून कमी किंमत", "प्रदूषणाचे विघ्न हराया, गणपती बाप्पा जरूर या", "स्मरणात ठेवा गणेशमूर्ती, होईल स्वप्नांची पूर्ती", "तू सुखकर्ता तू दुखहर्ता, तू विघ्नहर्ता तू कर्ता करविता" अशी याची कांही उदाहरणे आहेत.

वर दिलेली उत्पादने नेहमीचीच असली तरी गणेशोत्सवासाठी कांही भेटवस्तु किंवा सवलतींचे आमिष दाखवले जाते.  वर्तमानपत्रे मात्र या काळांत विशेष पुरवण्या काढून वेगळी माहिती पुरवतात आणि त्यामधून मोठमोठ्या जाहिराती सुध्दा करतात. गणपतीच्या आरत्या व गाणी यांच्या नवनवीन ध्वनिफिती निघतात त्यांची गजाननाच्या व प्रमुख गायकाच्या चित्रांसह जाहिरात केली जाते. याशिवाय साबण, कॅमेरे, मिठाई,  मोबाईल फोन, चहा, पुस्तके अशा अनेकविध वस्तू आणि बँका, लहान मुलांच्या शाळा यासारख्या संस्था सुध्दा या वेळी आपापल्या जाहिराती देतात. गणेशाच्या विविध आकारातील मूर्ती, चित्रे, त्याच्या प्रार्थनांची पुस्तके, पूजेचे साहित्य वगैरेंना या दिवसांत मोठी मागणी असते, त्यांचीही प्रसिध्दी होते.
इलेक्ट्रानिक्स व वाहनांच्या क्षेत्रातील प्रसिध्द जपानी व कोरियन कंपन्या आणि भूतान देशाची सोडत अशा परदेशी संस्थांना सुध्दा गणपतीचे नांव घेऊन भारतात जाहिराती कराव्या असे वाटते. इतकी त्याची टी आर पी आहे.

यातील कांही मोठमोठ्या कंपन्याद्वारे गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्या स्पर्धांची भरपूर जाहिरात होते. कांही ठिकाणी निवडसमिती स्पर्धांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन आपला निर्णय ठरवते तर कांही ठिकाणी जनता जनार्दनाच्या बहुमताचा कौल लावला जातो. इंडियन आयडॉलच्या प्रचंड यशानंतर अशा कामासाठी एस.एम.एस. चा मोठा वापर केला जाऊ लागला. या रिअॅलिटी शोजचा अतिरेक झाल्यामुळे आता त्यांचे प्रमाण कमी झालेले दिसते.

काही वर्तमानपत्रे गणेशोत्सवाच्या सजावटींच्या स्पर्धा जाहीर करतात. आपापल्या घरामधील किंवा मंडळांमधील गणेशाच्या सुंदर मूर्ती, आरास आणि सजावट यांची छायाचित्रे मोबाईल फोनवरून पाठवली जातात. ती वर्तमानपत्रांत छापून येतात, तसेच त्यांना बक्षिसे दिली जातात. या स्पर्धा, त्यातील स्पर्धक व विजेते हे प्रसिध्दीच्या झोकांत येतात. या सगळ्यांच्या निमित्ताने गणपतीची विविध रूपे  वर्तमानपत्रांच्या पानांपानांवर आणि दूरचित्रवाणीच्या पडद्यावर झळकत राहतात आणि आपल्याला घरबसल्या पहायला मिळतात हा त्यांचा एक फायदा आहे.
       

No comments: