Monday, July 10, 2017

सिंहगड रोड - भाग ३ -४

सिंहगड रोड - भाग ३

त्या गोष्टीनंतर आणखी कांही वर्षांच्या काळात माझ्या माहितीतली काही कुटुंबे सिंहगड रोडवरील आनंदनगर, वडगांव, धायरी वगैरे भागात रहायला गेली किंवा तिकडे रहात असलेल्या काही लोकांशी माझा नव्याने परिचय झाला. त्यांच्या बोलण्यातून तो परिसर माझ्या ओळखीचा होऊ लागला. पंधरासोळा वर्षांपूर्वी मला आमच्या अगदी जवळच्या आप्तांकडून एक आगळ्या स्वरूपाची लग्नाची आमंत्रणपत्रिका आली. त्या विवाहसोहळ्यात फारसे धार्मिक विधी नव्हते, मुहूर्ताची वेळसुध्दा दिलेली नव्हती. अमूक तारखेला सकाळपासून सर्वांनी एका ठिकाणी जमायचे, यजमान कुटुंबाला आणि एकमेकांना भेटायचे, वधुवरांना आशीर्वाद द्यायचे आणि दिवसभर मजेत घालवायचा असा झकास कार्यक्रम होता. त्या अजब कार्यस्थळाचा पत्ता दिला होता 'अभिरुचि कॉटेज रेस्टॉरेंट, भिडे बाग, वडगांव बुद्रुक, सिंहगड रोड'. आम्हाला तिथे जायलाच तर हवेच होते, शिवाय हा एक नवा अनुभव, ती वेगळ्या प्रकारची लग्नसमारंभाची जागा आणि अजून न पाहिलेला सिंहगड रोड या सगळ्यांचे मला आकर्षण होते. आम्ही ठरल्याप्रमाणे पुण्याला जाऊन तिथला सिंहगड रोड गाठला आणि तो पहात पहात, विचारपूस करत वडगांवपर्यंत गेलो. तिथून पुढे जातांना आमची गाडी एका मोठ्या फ्लायओव्हरच्या खालून पलीकडे गेली. वरून जाणारा रस्ता म्हणजे मुंबईपुणे द्रुतगति महामार्गाचाच पुढे बंगलोरकडे जाणारा विस्तार होता असे समजले. तो महामार्ग कात्रजला जाऊन जुन्या सातारा रोडला मिळत होता. कात्रजच्या घाटालाच टाळणारा (बायपास करणारा) नवा बोगदा त्यानंतरच्या काळात तयार झाला.

बंगलोर हायवे पार करून पुढे गेल्यावर थोड्याच अंतरानंतर भिडे बाग आली. ते एक निसर्गसुंदर असे रिसॉर्ट होते. त्यात एकाद्या खेड्याचा देखावा तयार केला होता. खूप लहान मोठी झाडे होती, त्यांच्या आड एक दोन खोल्या असलेली लहानगी कॉटेजेस थोड्या थोड्या अंतरावर जराशी अस्ताव्यस्त वाटतील अशी बांधलेली होती, फुलझाडांचे अनेक ताटवे होते, त्यांना आणि झाडांना वळसे घालत वळणावळणाने जाणा-या अरुंद पायवाटा होत्या. स्वादिष्ट खाण्यापिण्याची छानशी व्यवस्थादेखील मोठ्या झोपडीसारख्या दिसणा-या जागेत केली होती. त्या जागेतले एकंदर वातावरणच एकदम शांत आणि प्रसन्न होते. आपण एका महानगराच्या आसमंतात आहोत हे विसरायला लावणारे होते. व्यवस्थित निगा राखलेली निरनिराळ्या प्रकारची आणि आकारांची झाडे, त्यांची विविध आकाराची पाने, रंगीत सुंदर फुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे, मधूनच दिसणारे रंगीबेरंगी पक्षी, शांत वातावरणात स्पष्टपणे ऐकू येणारी त्यांची गोड किलबिल वगैरे सगळे काही आम्हा शहरवासियांसाठी विलक्षण होते.

पुण्यातल्या जुन्या काळातल्या पारंपरिक पध्दतीच्या सुप्रसिध्द मंगल कार्यालयांमधला गोंगाट, गर्दी आणि तिथे दरवळणारे वास किंवा धूर यांनी भरलेल्या कोंदट वातावरणापेक्षा हा खूप वेगळा अनुभव होता. आमच्यासाठी राखून ठेवलेल्या झोपडीमध्ये आमचे सामान ठेऊन आम्ही बाहेर पडलो, यजमान आणि वधूवरांना भेटून झाल्यावर इतर कोण कोण पाहुणे आले आहेत ते पहात आणि त्यांच्या गाठी भेटी घेत त्या विस्तीर्ण बागेतले निसर्गसौंदर्य न्याहाळत मनसोक्त फिरत राहिलो. आम्हाला ती निवांत जागा इतकी आवडली की एकादा दिवस आपल्या परिवारासह पिकनिकसाठी तिथे जायचे आणि मुक्तपणे फिरत वेळ घालवायचा असे ठरवून आम्ही तिथून बाहेर पडलो. त्या वेळी आम्ही मुंबईला परत गेलो आणि नंतर तो योग जुळून आला नाही, पण ती कल्पना मात्र मनात रुजून राहिली.

सात वर्षांपूर्वी आमच्या विस्तारित परिवारातल्या म्हणजे चुलत, आते, मामे, मावस वगैरे जवळच्या नात्यातल्या सगळ्या लोकांनी लग्नमुंजीसारखे कुठलेही निमित्य नसतांना फक्त मौजमजा करण्यासाठी म्हणून एका ठिकाणी जमायचे आणि दोन दिवस एकमेकांच्या सहवासात गप्पागोष्टी करत, गाणी गात, नाचत, खेळत घालवायचे असे ठरले. टेलीफोनवरूनच साठसत्तर लोकांनी तयारी दाखवली आणि हा आकडा शंभरावर जाण्यासाऱखा असल्याने तितक्या लोकांची एकत्र राहण्याची व्यवस्था होऊ शकेल अशी निवांत जागा पाहणे आवश्यक होते. थोडी चौकशी केल्यावर खडकवासला धरणाच्या पलीकडे त्यासाठी एक योग्य स्थान सापडले आणि त्या रिसॉर्टचे दोन दिवसांसाठी फक्त आमच्या ग्रुपसाठी बुकिंग करून ठेवले. पुण्यात राहणा-या काही लोकांनी कार पूलिंग करून आपापल्या गाड्यांनी आधी एका ठिकाणी जमायचे आणि सर्वांनी मिळून पुढे जायचे म्हणजे प्रत्येकाला ती आडवळणातली नवी जागा शोधत बसावे लागणार नाही असे विचारांती ठरवले.

मध्यंतरीच्या काळात मुठा नदी ओलांडून जाण्यासाठी राजाराम पूल बांधला गेला होता आणि तिथून म्हात्रे पुलापर्यंत नदीच्या काठाने चांगला प्रशस्त नवा रस्ता बांधला गेला होता. त्यामुळे कोथरूड, कर्वे नगर पासून औंध, पाषाण वगैरे सगळ्या भागांमध्ये रहात असलेल्या लोकांना सिंहगड रोडवरील बराचसा दाट वस्ती आणि रहदारीचा भाग टाळून थेट विठ्ठलवाडी गाठता येत होती. त्य भागांमधून येणारे आम्ही दहापंधराजण आधी ठरवून राजाराम पुलाच्या कर्वेनगरकडच्या टोकाला जमलो. पुलाच्या पलीकडे समोरच एक मोठा पहाड दिसत होता. त्यामुळे आपण आता नदी ओलांडली की लगेच गावाबाहेर पडून निसर्गाच्या कुशीत प्रवेश करणार असे वाटून मी खूष झालो होतो.

त्याप्रमाणे राजाराम पूल ओलांडून आम्ही सिंहगडरोडला लागलो, पण मला वाटले होते त्याप्रमाणे आम्ही अजून शहराबाहेर पडलो नव्हतो. समोर दिसणा-या डोंगराला डाव्या बाजूला ठेऊन आम्ही तो डोंगर आणि मुठा नदी यांच्या मध्ये असलेल्या भागातून पुढे जात राहिलो. विठ्ठलवाडी, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, धायरी वगैरे वस्त्या एकामागून एक येत गेल्या. त्यात काही अगदी जुनी मातीची कौलारू किंवा पत्रे लावलेली घरे, काही दुमजली चाळी, काही टुमदार बंगले, कांही गगनचुंबी आधुनिक इमारती असे सर्वांचे मिश्रण दिसत होते. रस्त्याच्या कडेला नाना प्रकारची आधुनिक पध्दतीची दुकाने थाटलेली होती आणि ती गि-हाइकांनी गजबजलेली होती. या रस्त्यावरून मी सात आठ वर्षांपूर्वी भिडे बागेत गेलो होतो, पण तेवढ्या काळात बराच बदल झालेला दिसत होता. पूर्वी विरळ वाटणारी वस्ती दाट झाली होती आणि आधी वेगवेगळ्या असलेल्या वस्त्या सलग झाल्या होत्या. रस्त्यावरून जाणा-या वाहनांची संख्या अनेक पटीने वाढली होती. पुणे शहराचा विस्तार जवळ जवळ खडकवासल्यापर्यंत येऊन पोचलेला होता. पुढे विस्तीर्ण जलाशय आणि मिलिटरीचे साम्राज्य असल्याने नागरी वस्तीला पसरायला वाव नव्हता. आमचे शांतिवन मात्र त्यांच्याही पलीकडच्या बाजूला होते. तिकडल्या एका खेडेगावात पोचल्यानंतर आम्ही सिंहगडकडे जाणारा रस्ता सोडून दिला आणि शांतिवनाकडे जाणारा रस्ता धरला.                                                                                          
------------------------

सिंहगड रोड - भाग ४

मध्यप्रदेशातले आमचे एक आप्त पाच सहा वर्षांपूर्वी स्थाईक होण्याच्या विचाराने पुण्याला आले. त्यांच्यासाठी सोयिस्कर घर शोधतांना त्यांनी पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून तिथे बांधल्या जात असलेल्या अनेक संकुलांमधील इमारतींची पाहणी केली. त्यांच्या सर्व गरजा भागवण्याइतक्या सुखसोयी असणारे आणि त्यांच्या बजेटमध्ये बसणारे असे धायरी भागात बांधले जात असलेले एक घर त्यांनी विचारपूर्वक निवडून पक्के केले. त्या वेळी आम्ही मुलाकडे पुण्याला आलो होतो आणि वारजेजवळील आदित्य गार्डन सिटीमध्ये रहात होतो. तिथून बंगलोर हायवेवरून जाऊन मुठा नदी ओलांडली की वडगाव लागते आणि तिथून सिंहगड रोडने पुढे गेले की धायरी, म्हणजे ती जागा वारजेपासून फक्त पंधरा वीस मिनिटांच्या अंतरावर असणार असे आम्हाला आधी वाटले आणि आम्ही उत्साहाने ती जागा पहायला गेलो. पण नदी ओलांडून पलीकडे गेल्यानंतर लगेच एक फ्लायओव्हर सुरू झाला आणि तो काही नाले आणि वाटा यांच्यावरून जात सिंहगड रोडला सुध्दा ओलांडून पलीकडे दूर जाऊन पोचला. हायवेच्या डाव्या बाजूलाच सिंहगड रोडला जोडणारा रस्ता एक रस्ता होता, पण तो फक्त तिकडून हायवेकडे येणा-या वाहतुकीसाठी एकेरी करून ठेवलेला असल्याने आमच्या उपयोगाचा नव्हता. त्यामुळे आम्ही कात्रजच्या दिशेने आणखी पुढे गेलो आणि पुढल्या फ्लायओव्हरच्या खालच्या कमानीखालून हायवे ओलांडला. तिथून यू टर्न घेऊन वारजेच्या दिशेने परत आल्यावर सिंहगड रोडला जाऊन मिळणारा दुसरा रस्ता घेतला. अशा रीतीने ज्या पॉइंटला आम्ही हायवेवरून सिंहगड रोड ओलांडला होता तिथून दीड दोन मैलांचा फेरा घालून पुन्हा त्याच ठिकाणी खालून जाणा-या सिंहगड रोडला येऊन लागलो.

सिंहगड रोडवर खूप ट्रॅफिक जॅम होता. आमची गाडी मुंगीच्या पावलाने पुढे सरकत गेल्यावर त्याचे कारण समजले. तिथे एका उड्डाणपुलाचे बांधकाम चालले होते. त्यासाठी अर्धा रस्ता खणून ठेवला होता आणि दोन्ही बाजूची वाहतूक उरलेल्या रस्त्यातून कशीबशी होत होती. धायरी फाट्यावर तर सगळा सावळागोंधळ होता. बांबूच्या स्कॅफोल्डिंगमधून वाट काढत वळणारी वाहने आडवी तिडवी येऊन रस्ता जास्तच अडवीत होती. कसेबसे आम्ही धायरीच्या वाटेला लागलो तेंव्हा तो रस्तासुध्दा वाहनांनी फुललेला होताच. आम्ही आता मुंगीच्या पावलांऐवजी गोगलगाईच्या गतीने सरकायला लागलो. कुठल्या गल्लीत वळायचे हे आम्हाला नेमके माहीत नव्हते. खुणेचे गणपतीचे देऊळ शोधता शोधता थोडे पुढेच गेलो आणि मागे वळून परत आल्यानंतर जे के हिल पार्कचा फलक दिसला. तिकडे जाणारी गल्ली मात्र संपूर्णपणे मोकळी होती. पण तिथे पोचेपर्यंत चांगला सव्वादीड तास वेळ लागला होता.

या वसाहतीमध्ये हिल म्हणजे टेकडी नव्हतीच, उलट थोडा उतार होता आणि पार्क किंवा बागेच्या नावाने फक्त कुंपणावर एका रांगेत लावलेली शोभेची झाडे होती. लांबट आकाराच्या त्या प्लॉटमध्ये दहा टोलेजंग इमारतींचे अजस्र चौकोनी ठोकळे एका सरळ रेषेत उभे करून ठेवले होते. त्यातल्या जवळ जवळ शेवटच्या इमारतीत आम्हाला जायचे होते. तोंपर्यंत अंधार पडायला लागला होता. इमारतीचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसल्यामुळे लिफ्ट बसवली नव्हती, जिन्याच्या पाय-यांवर लादी नव्हती, जिन्याचे कठडेही नव्हते, दिवे तर नव्हतेच. आम्ही अंधारात चाचपडत सिमेंटच्या पाय-यांवरून दोन मजले चढून वर गेलो. तिथे पुन्हा दोन्ही बाजूंना जाणा-या दोन बोळकंड्या होत्या आणि त्यांच्या दोन बाजूंना प्रत्येकी दोन दोन फ्लॅट असे एकूण आठ फ्लॅट होते. त्यातल्या टोकाच्या फ्लॅटमध्ये आम्ही गेलो.

त्या घराच्या भिंती उभारल्या होत्या, पण त्यांना दरवाजे आणि खिडक्या नव्हत्या. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी आत शिरून सगळीकडे ओल झालेली होतीच, त्यात सिमेंट आणि माती मिसळलेली होती. पँट दुमडून आणि हाताने थोडी वर धरून आम्ही आपला तोल सांभाळत आत शिरलो.  आमच्या आप्तांनी माहिती सांगायला सुरुवात केली, "हा हॉल, हे किचन, या बेडरूम्स, इथे टॉयलेट्स" वगैरे वगैरे. त्या घराला दोन प्रशस्त बाल्कन्या होत्या, पण तिथे बरेच पाणी साठलेले होते आणि निसरड्या जमीनीवर पाय घसरून पडण्याची खात्री होती. यामुळे आम्ही तिकडे जाऊन पाहण्याचे धाडस केले नाही. "त्या बाल्कनीमधून दिसणारे दृष्य फार मोहक असते, आधी दूरवर पसरलेली निसर्गरम्य शेते, झाडेझुडुपे वगैरे आणि पलीकडे डोंगरांच्या रांगा, त्यांच्याच एका बाजूला नांदेडसिटीमधले गगनचुंबी टॉवर्स आणि टेकडीवर वसवलेले डी एस के विश्व ..." वगैरेंचे रसभरीत वर्णन माझ्या आप्तांनी केले. त्यांना तो फ्लॅट आवडला होताच. मी यापूर्वी राहिलेलो असलेल्या प्रशस्त घरांच्या तुलनेमध्ये तो माझ्या पसंतीला उतरत नसला तरी मी सुध्दा त्यांच्या होकारात होकार मिळवत आणि त्या जागेची तोंडदेखली स्तुति करत राहिलो.

वारजेला परत येतांना पुन्हा एकदा सिंहगड रोडवरील त्या ट्रॅफिकमधून मुंगीच्या पावलांनी सरकत जाण्याचे दिव्य तर करावे लागलेच, पण तिथून परत जातांनासुध्दा सरळ हायवेला जोडणारा रस्ता नव्हताच. आता हायवेच्या पुलाखालून आधी पलीकडे गेलो, तिथून उलट कात्रजच्या दिशेने मैलभर जाऊन दुसरा फ्लायओव्हर गाठला, त्या ठिकाणी हायवेच्या पुलाखालून पुन्हा अलीकडे आलो आणि हायवेवर चढून आमच्या मार्गाला लागलो. या भागातल्या रस्त्यांचे नियोजन करणारा इंजिनियर बहुधा सातारा किंवा क-हाडचा असावा. तिकडच्या बाजूने हायवेने आल्यास थेट सिंहगड रोडला जोडणारे रस्ते होते तसेच सिंहगड रोडवरून थेट त्या दिशेने जाण्याची सोय होती, पण वारजे, वाकडच्या बाजूला राहणा-या आमच्यासारख्या लोकांना मात्र येतांना आणि जातांना अशा दोन्ही वेळा दोन दोन मैलांचा वळसा घालावा लागत होता.

काही महिन्यांनंतर ती इमारत बांधून पूर्ण झाल्यावर आमची आप्त मंडळी तिथे रहायला गेली. त्यांना भेटायला आम्ही पुन्हा सिंहगड रोडवरून धायरीला गेलो. आता ती इमारत रंगरंगोटी करून बाहेरून छान दिसत होतीच, आतमध्ये दिव्यांचा झगमगाट होता, अंतर्गत सजावटीने तो फ्लॅट आता सुरेख दिसत होता. बाल्कनीमधून दिसणारे सृष्टीसौंदर्य लोभसवाणे होते, त्यांनी घरातल्या सगळ्या सुखसोयी करून घेतलेल्या होत्याच. धायरी गावाच्या मुख्य रस्त्यापासून तो पुरेसा दूर असल्यामुळे तिथल्या रहदारीचा गोंगाटगलका ऐकू येत नव्हता, पण त्या रस्त्यावर सगळ्या प्रकारची दुकाने असल्यामुळे कुठल्याही जीवनावश्यक वस्तूची गरज पडली तर चालत जाऊन पंधरा वीस मिनिटात आणि वाहनाने गेल्यास पाच मिनिटात ती मिळण्याची सोय होती. तिथून पुणे शहराकडे अनेक बसेस जात होत्या, एकापाठोपाठ एक रिक्शा दिसत होत्या. आमचे नातेवाईक त्या जागेवर बेहद्द खूष झालेले दिसत होते.

सिंहगड रोडवरील धायरी फाट्याच्या कोप-यावर बांधलेला फ्लायओव्हर बांधून पुरा झाला होता. त्यामुळे त्या रस्त्यावरची रहदारी थोडीशी सुधारली होती, पण गंमत अशी होती की त्या फ्लायओव्हरवरून पुढे खडकवासल्याकडे जाणारी वाहने अगदी कमी आणि धायरीकडे वळणारीच जास्त असा प्रकार होता. त्यामुळे त्या अरुंद वाटेत खूप गर्दी झाली होती. हायवेवरून सिंहगड रोडकडे जाणारा एक शॉर्टकट निघाला होता, पण झाडाझुडुपांमधून आणि ओढेनाल्यांमधून वाट काढत वळत वळत जाणारा तो कच्चा रस्ता अगदीच जुनाट ग्रामीण भागातला वाटत होता. वाटेत एका जागी तर अशी परिस्थिती होती की तिथून फक्त चिटपाखरेच दिसत होती. एकसुध्दा माणूस किंवा वाहन दृष्टीपथात नव्हते. रात्रीच्या अंधारात तर त्या खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्याने जाणे शक्यच नव्हते. त्यापेक्षा दोन मैलांचा वळसा घेतलेला बरा होता. सिंहगड रोडवरील धायरीला जाण्यासाठी या सगळ्या दिव्व्यांमधून जावे लागल्यामुळे मला ती जागा मनापासून विशेष आवडली नाही. आपण स्वतः सुध्दा तिथे रहायला जावे असा विचार त्यावेळी मनाला शिवला नाही.  

धायरीमधल्या त्या घराच्या खिडकीमधून दूर डोंगरावर वसलेले डीएसके विश्व दिसताच माझ्या मनात दडलेली एक जुनी आठवण जागी झाली. माझ्या हैदराबादच्या आतेभावाने सेवानिवृत्त झाल्यानंतर पुण्याला स्थायिक व्हायचे ठरवले होते तेंव्हा डीएसके विश्वामध्ये घर घेतले होते. मुख्य शहरापासून बरेच दूर असलेल्या एका मोठ्या टेकडीच्या माथ्यावरील माथेरानसारख्या रम्य वातावरणात ती जागा आहे, निसर्गाच्या कुशीत बांधलेल्या अनेक उंच इमारतींमधून हे स्वर्गासारखे स्वयंपूर्ण विश्व वसवले आहे, तिथे सगळ्या सुखसोयी आहेत, पण शहरातला गोंगाट नाही वगैरे त्याचे रसभरीत वर्णन त्याने मागे एकदा तो कुठेतरी भेटला असतांना सांगितले होते. ती स्वर्गसम जागा नेमकी कुठे आहे हे मात्र तेंव्हा माझ्या लक्षात आले नव्हते. सिंहगड रोड हा पुण्याकडून तिथे जायचा रस्ता आहे हे ही मला त्या वेळी समजले नव्हते. या वेळी त्याचे जे दुरून दर्शन घडले ते मात्र सिमेंट काँक्रीटच्या जंगलासारखेच वाटले.

मी पहिल्यांदा सिंहगड रोड पाहिला तेंव्हा तिथल्या भिडे बागेत गेलो होतो. तो रस्ता काही खास वाटला नव्हता, पण ती बाग मला खूप आवडली होती. त्या दिवसाच्या अनेक गोड आठवणींमध्येच एक वेगळी आठवणही होती. त्या उपवनातल्या निसर्गाला न शोभणारे असे काही पुणेरी फलक जागोजागी लावलेले होते आणि त्यावर "झाडांवर चढू नये", "फुले तोडू नये" यासारखे अनेक नियम आणि ते न पाळल्यास त्याची काय फळे भोगावी लागतील याचा इशारा वगैरे बराच मजकूर होता. त्या नियमांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी काही तत्पर रक्षक आणि रक्षिका तैनात केल्या गेल्या होत्या. आम्ही सगळे सुशिक्षित, सुसंस्कृत, सूज्ञ वगैरे लोक असल्यामुळे ते बोर्ड न वाचताच तसे शहाण्यासारखे वागत होतो. पण अवखळ लहान मुलांना मात्र तिथे बागडायला शब्दशः मोकळे रान मिळाले होते. त्यांना निसर्गतःच निसर्गाचे जास्तच आकर्षण असते. त्यांना झाडाझुडुपांबरोबर लगट करायला आवडते. एकाद्या लहानग्या मुलाने किंवा मुलीने कुंपणावरच्या झुडुपाचे पान जरी तोडले तरी लगेच कोणी तरी येऊन तिचा कान पकडायचा, तिने भोकाड पसरले की तिची आई धावत यायची, मग तिला चार शब्द सुनावले जायचे, तिचा मूड गेल्यामुळे तिने आणखी दोघातीघींच्या मूडवर विरजण घालायचे असे प्रकारही होत होते.

या वेळी धायरीला जातांना मी भिडे बाग कुठे दिसते हे लक्ष देऊन पहात होतो. आमची गाडी मुंगीच्या पावलाने पुढे जात असल्याने ती माझ्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. तरीही मला ती कुठे दिसलीच नाही. त्या भागात एक मोठा मॉल उभाारलेला होता आणि तिकडे जाण्यासाठी दोन, तीन व चार चाकी वाहनांची रीघ लागली असल्यामुळे ट्रॅफिक जॅम जास्तच वाढला होता. या अभिरुची मॉलमुळे अनेक लोकांची खूप सोय झाली होते हे अगदी खरे असले तरी पूर्वीची सुंदर भिडे बाग नाहीशी झाल्याची हळहळही वाटली. जिथे पानालासुध्दा धक्का लागलेले खपवून घेतले जात नव्हते तिथली सगळी झाडे, संपूर्ण बागच उध्वस्त केली केली गेली होती आणि त्या जागेवर एक काँक्रीटचा अवाढव्य आणि बेढब ठोकळा उभा केला होता !
----------------------------------- (क्रमशः)


--------------------------------------------------------------------------

Sunday, July 09, 2017

सिंहगड रोड - भाग १, २

सिंहगड रोड - भाग १

माझ्या ब्लॉगमध्ये मी स्वतः असतोच. त्यामुळे सिंहगड रोड हा भागसुध्दा सिंहगड रोड आणि मी असाच असणार आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. या रस्त्याचा इतिहास, भूगोल वगैरेसंबंधी माहिती न सांगता हा रस्ता माझ्या जीवनात कसा येत गेला त्याचा हा वृत्तांत आहे.

आता कर्नाटक राज्यात असलेल्या जमखंडी या लहान गावात माझे बालपण गेले. माझ्या लहानपणी मी बेळगाव, सांगली, कोल्हापूर यासारखी जवळची शहरे सुध्दा कधी पाहिली नाहीत, त्यामुळे पुणे तर माझ्या दृष्टीने खूपच दूर होते. साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात आणि त्या लहान गावात जी पुस्तके किंवा मासिके माझ्या वाचनात येत होती त्यातल्या  चोरून वाचलेल्या अनेक कथाकादंब-यांमधली मुख्य पात्रे पुण्यात रहात आणि पर्वती, पेशवे पार्क, तळ्यातला गणपती वगैरे परिसरामध्ये घुटमळत असत. पुढे तयार झालेल्या सारसबाग नावाच्या सुंदर उद्यानाने त्यामधील प्रेमी युगलांसाठी निवांत आडोशांची सोय केली. अशा प्रकारे गणपती आणि पर्वती या धार्मिक स्थानांना एक वेगळे रोमँटिक आणि गूढ असे वलय प्राप्त झाले होते. त्या काळात पुण्यावरचा कोणताही लेख पर्वतीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हता. पुण्याहून आमच्याकडे आलेल्या किंवा पुण्याला जाऊन आलेल्या लोकांच्या बोलण्यामध्ये या ना त्या निमित्याने पर्वतीचा उल्लेख हमखास येत असेच. या सगळ्यांमुळे माझ्या वाचनामधून आणि मोठ्या लोकांच्या बोलण्यातून पर्वती हे आणखी एक नाव माझ्या मनःपटलावर कोरले गेले होते.

मी कॉलेजला गेल्यानंतर पुण्याला पहिली भेट दिली. तेंव्हा मला पर्वती पहायची तीव्र इच्छा असल्याचे तिथे असलेल्या माझ्या मोठ्या भावाला सांगितले आणि त्यानेही ती लगेच पूर्ण केली. आम्ही दोघे बसने प्रवास करून टिळक रोडवरील एस.पी.कॉलेजच्या समोरच्या बसस्टॉपवर उतरलो आणि त्या कॉलेजच्या कुंपणाला लागून असलेल्या रस्त्याने चालत चालत पर्वतीच्या टेकडीवर गेलो. वाटेत लागलेल्या इमारतींमधल्या संस्था, बंगल्यांमध्ये राहणारी मोठी माणसे, वगैरेंबद्दल सांगत असतांनाच माझा भाऊ वाटेत लागणा-या रस्त्यांचीही थोडी माहिती देत होता. ती बहुतेक नावे मी पहिल्यांदाच ऐकत असल्यामुळे मला त्यामधून फारसा बोध होत नव्हता आणि ती लक्षात राहणे तर कठीणच होते, पण त्यातले एक नाव ऐकताच मी क्षणभर थबकून तिथेच उभा राहिलो कारण ते नाव माझ्या मनात आधीपासून रुतून बसलेले होते.

"हा रस्ता सिंहगडाकडे जातो." असे त्याने सांगिताच शिवाजी महाराजांचे किल्ले सह्याद्री पर्वतावर होते ही इतिहासातली पुस्तकी माहिती मला आठवली आणि मी लगेच बोलून दाखवली.
"बरोबर आहे, पण सह्याद्रीच्या रांगा तर पुण्यापासूनच सुरू होतात. त्यातला सिंहगड हा जवळचा किल्ला इथून अंदाजे पंधरा मैलांवर (चोवीस किलोमीटर्सवर) असेल."  त्याने सांगितले. म्हणूनच तर राजमाता जिजाबाईं यांना तो कोंढाणा किल्ला त्यांच्या लालमहालामधून दिसला आणि तो काबीज करून आणण्याची आज्ञा त्यांनी राजांना दिली हे ही मला आठवले.
"म्हणजे हा रस्ता सुध्दा चारशे वर्षांपूर्वी बांधला आहे ! सगळ्याच किल्ल्याकडे जाण्यासाठी असे रस्ते पण बांधले होते का?"
माझी जिज्ञासा संपत नव्हती, पण आता माझ्या सर्वज्ञ भावाने हात टेकले.
"ते माहीत नाही रे, मुठा नदीच्या कांठावर वसलेल्या लहान लहान गांवांना जोडत हा रस्ता खडकवासल्याला जातो. तिथे एक मोठे धरण आहे, तसेच मिलिटरीचे कॉलेज (एनडीए), एक मोठे संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) आणखी काही काही आहे. कदाचित त्यासाठी इंग्रजांच्या काळातच हा पक्का रस्ता बांधला गेला असेल. तिथून पुढे डोंगरातल्या इतर गांवांकडे जाणारे निरनिराळे साधे रस्ते आहेत, त्यातला एक सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गांवापर्यंत जातो."
त्यावेळी या विषयावरचे आमचे बोलणे एवढ्यावरच संपले असावे, मला त्यातले इतर काहीच आठवत नाही. सिंहगड आणि पर्वती ही मनावर कोरलेली दोन नावे असलेली ठिकाणे एकमेकांना रस्त्याने जोडलेली आहेत एवढे मात्र लक्षात राहिले. जाता जाता मी त्या रस्त्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला.
एकाद्या मोठ्या गावाबाहेर गेल्यावर आजूबाजूच्या खेड्यांकडे  जाणारे रस्ते, त्यांच्या बाजूला लावलेल्या झाडांमधून डोकावणारी घरे, देवळे, रस्त्यावरून अधून मधून जाणारी एकाददुसरी वाहने, सायकलीवरून किंवा चालत जाणारे पाचदहा वाटसरू वगैरेंची आठवण करून देणारा असा तो रस्ता त्या काळात होता. फक्त त्यावर गुरेढोरे आणि बैलगाड्या दिसत नव्हत्या किंवा बैलगाड्यांच्या चाको-या पडलेल्या नव्हत्या एवढेच.

इंजिनियरिंगच्या अभ्यासात आकंठ बुडून गेल्यावर मला डोके वर करायलाही उसंत मिळत नव्हती आणि शिक्षण संपल्यानंतर मी नोकरीसाठी मुंबईला गेलो. त्यामुळे स.प.महाविद्यालयाच्या बाजूने जाणा-या त्या रस्त्याने मी पुनः कधीच पर्वतीवर चालत गेलो नाही. त्यामुळे वाटेत लागलेला सिंहगडचा रस्तासुध्दा मला नेमका कुठे दिसला होता हे मी नंतर विसरून गेलो.
--------------------------------------------------------------------------------------------------

सिंहगड रोड - भाग २

मी पुण्याला कॉलेजात असतांना लकडी पुलापासून सुरू होणारा डेक्कन जिमखाना हा त्या मानाने शहरातला आधुनिक भाग समजला जात होता. त्या काळातले मुख्य पुणे शहर तिथूनच सुरू होत होते. कर्वे रोडवरील आयुर्वेद रसशाळा जवळ जवळ गावाच्या हद्दीवर होती. पुढे काही ठिकाणी तुरळक वस्ती दिसत होती, पण मला कधीच तिकडे जायची गरज पडली नाही. मी नोकरीला लागल्यानंतर अनेक वेळा पुण्याला येऊन जात असे. तेंव्हा माझी ऑफीसची बहुतेक कामे उपनगरांमधल्या कुठकुठल्या कारखान्यात असायची आणि माझे बहुतेक सगळे नातेवाईक शहराच्या जुन्या भागातल्या पेठांमध्ये रहात असत. यामुळे माझा पुण्यातला संचार तेवढ्या भागातच होत असे. तरीसुध्दा पुणे शहर सर्व बाजूंनी कसे पसरत चालले होते याची माहिती मला बोलण्यामधून मिळत होतीच.
 
ज्या लोकांनी पूर्वीचे जुने वाडे किंवा चाळी यामधल्या एक दोन खोल्यांमध्ये संसार थाटले होते त्या लोकांच्या पुढल्या पिढ्या कोथरूड, एरंडवणे, पौड रोड, कर्वेनगर वगैरे भागांमध्ये सेल्फकन्टेन्ड फ्लॅट्समध्ये रहायला जात होत्या किंवा सातारा रोडवरील बिबवेवाडी, पद्मावती, सहकारनगर यासारख्या भागांमध्ये स्थलांतर करत होत्या. नव्याने पुण्यात येणारे मध्यमवर्गीय लोकसुध्दा याच भागात घरे पहात होते किंवा त्यांना तिकडेच मनासारख्या जागा मिळत होत्या. यामुळे पुढील दोन तीन दशकांच्या काळात माझ्या परिचयातली बरीचशी मंडळी या दोन भागात रहायला लागली. थोडक्यात म्हणजे मुठा नदीच्या डाव्या तीरावरील भागामध्ये आणि दक्षिणेला सातारा रोडवर होत असलेल्या शहराच्या विस्तारात नवनव्या वस्त्यांमध्ये भर पडत होती. या विस्ताराची खबर मला मिळत होती आणि या ना त्या निमित्याने मला कधीकधी तिकडे जावेही लागत होते. पण या दोन भागांच्या बेचक्यातल्या म्हणजे मुठा नदीच्या उजव्या तीरावरील भागाचा कसा विकास होत होता याचा मात्र बरीच वर्षे मला पत्ता ही नव्हता. किंबहुना माझ्या लेखी तो भाग अस्तित्वातच नव्हता. सिंहगडाकडे जाणारा रस्ता त्या भागातून जातो किंवा तो एक मोठा हमरस्ता होत होता हे ही मला माहीत नव्हते. मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) सुरू झाला तेंव्हा तो वाकडपासून कात्रजपर्यंत ओसाड भागातून जात होता, पण एकवीसाव्या शतकात मात्र वाकड, हिंजवडी, बालेवाडी, बाणेर, बावधान, वारजे वगैरे खूप मोठा पट्टा झपाट्याने विकसत गेला आणि त्याचा वेग वाढतच आहे. त्यांच्या तुलनेत सिंहगड रोडला तितके प्राधान्य मिळाले नाही.

एकोणीसशे नव्वद पंच्याण्णऊच्या सुमाराला एके दिवशी माझा मुंबईतच राहणारा एक आतेभाऊ मला भेटायला आला आणि त्याने बोलताबोलता मला एक लहानसा धक्का दिला. त्याने पुण्याजवळच्या कुठल्याशा बुद्रुक किंवा खुर्दमध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता म्हणे. ते नवराबायको दोघेही मुंबई महापालिकेत नोकरीला असल्यामुळे तिथे चांगले स्थायिक झालेले होते आणि त्यांना रिटायर व्हायला निदान पंचवीस वर्षे अवकाश होता. त्यामुळे त्यांनी आताच असल्या खेड्यात घर का घेतले याचे मला सहाजिकच आश्चर्य वाटले. किंचित हेटाळणीच्या स्वरातच मी त्याला विचारलं, "काय रे, तुझं हे बुद्रुक नेमके कुठं आहे?"
त्याने अत्यंत अभिमानाने सांगितलं. "सिंहगड रोडवर."
"काय?" मी ताड्कन उडालो. थोडासा सांवरून त्याला विचारलं "म्हणजे तू एकदम मावळ्यांच्या वस्तीत रहायला जाणार ? शेला, पागोटं वगैरे घेऊन ठेवलं असशील ना!" त्याचे ते बुद्रुक सिंहगडाच्या अगदी पायथ्यापाशी असावे असेच मला वाटले होते. तोंपर्यंत मी सिंहगडही पाहिला नव्हता, फक्त ह.ना.आपट्यांच्या कादंबरीतले त्याचे वर्णन वाचले होते.
"नाही रे, सिंहगड रोड पुण्यातच आहे." त्याने मला नसलेली माहिती दिली.  मला तीस वर्षांपूर्वी पाहिलेला सिंहगडकडे जाणारा लहानसा रस्ता आठवला.
"अरे व्वा ! तो गावाबाहेरचा जुना खेडवळ रस्ता सिंहगड रोड कधी झाला?" मी विचारले.
आता मात्र त्याला बोलायची संधी मिळाली. "म्हणजे तुला एवढं सुध्दा माहीत नाही? अरे सिंहगड रोड कसला पॉश रोड आहे! आपल्या चेंबूरमध्येसुध्दा असला रस्ता नाही." कदाचित त्या काळात नसेलही.
"खरंच ? मला येऊन पहायलाच हवं." मी म्हणालो.
"पुढच्या आठवड्यात आम्ही सगळ्या जवळच्या नातेवाइकांसाठी तिथे एक कार्यक्रम ठेवला आहे ते सांगायलाच मी आलो होतो. अर्थातच तुम्हालाही यायचे आहेच. तुम्ही सगळे येणार ना ?"
"हो, नक्की येणार."
असे मी सांगितले खरे आणि मला जायची इच्छाही होती, पण आयत्या वेळी काही अडचण आल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही. माझ्या त्या आत्तेभावाला तिथे प्रत्यक्षात रहायला जायचे नव्हतेच, त्याने फक्त गुंतवणूक म्हणून तो विकत घेऊन ठेवला होता. त्या फ्लॅटचे पुढे काय झाले कोण जाणे, पण मला काही तो पहाण्याची आणि त्या निमित्याने सिंहगड रोडचे नवे रूप पाहण्याची संधी मिळाली नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------