Sunday, July 09, 2017

सिंहगड रोड - भाग १, २

सिंहगड रोड - भाग १

माझ्या ब्लॉगमध्ये मी स्वतः असतोच. त्यामुळे सिंहगड रोड हा भागसुध्दा सिंहगड रोड आणि मी असाच असणार आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. या रस्त्याचा इतिहास, भूगोल वगैरेसंबंधी माहिती न सांगता हा रस्ता माझ्या जीवनात कसा येत गेला त्याचा हा वृत्तांत आहे.

आता कर्नाटक राज्यात असलेल्या जमखंडी या लहान गावात माझे बालपण गेले. माझ्या लहानपणी मी बेळगाव, सांगली, कोल्हापूर यासारखी जवळची शहरे सुध्दा कधी पाहिली नाहीत, त्यामुळे पुणे तर माझ्या दृष्टीने खूपच दूर होते. साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात आणि त्या लहान गावात जी पुस्तके किंवा मासिके माझ्या वाचनात येत होती त्यातल्या  चोरून वाचलेल्या अनेक कथाकादंब-यांमधली मुख्य पात्रे पुण्यात रहात आणि पर्वती, पेशवे पार्क, तळ्यातला गणपती वगैरे परिसरामध्ये घुटमळत असत. पुढे तयार झालेल्या सारसबाग नावाच्या सुंदर उद्यानाने त्यामधील प्रेमी युगलांसाठी निवांत आडोशांची सोय केली. अशा प्रकारे गणपती आणि पर्वती या धार्मिक स्थानांना एक वेगळे रोमँटिक आणि गूढ असे वलय प्राप्त झाले होते. त्या काळात पुण्यावरचा कोणताही लेख पर्वतीच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हता. पुण्याहून आमच्याकडे आलेल्या किंवा पुण्याला जाऊन आलेल्या लोकांच्या बोलण्यामध्ये या ना त्या निमित्याने पर्वतीचा उल्लेख हमखास येत असेच. या सगळ्यांमुळे माझ्या वाचनामधून आणि मोठ्या लोकांच्या बोलण्यातून पर्वती हे आणखी एक नाव माझ्या मनःपटलावर कोरले गेले होते.

मी कॉलेजला गेल्यानंतर पुण्याला पहिली भेट दिली. तेंव्हा मला पर्वती पहायची तीव्र इच्छा असल्याचे तिथे असलेल्या माझ्या मोठ्या भावाला सांगितले आणि त्यानेही ती लगेच पूर्ण केली. आम्ही दोघे बसने प्रवास करून टिळक रोडवरील एस.पी.कॉलेजच्या समोरच्या बसस्टॉपवर उतरलो आणि त्या कॉलेजच्या कुंपणाला लागून असलेल्या रस्त्याने चालत चालत पर्वतीच्या टेकडीवर गेलो. वाटेत लागलेल्या इमारतींमधल्या संस्था, बंगल्यांमध्ये राहणारी मोठी माणसे, वगैरेंबद्दल सांगत असतांनाच माझा भाऊ वाटेत लागणा-या रस्त्यांचीही थोडी माहिती देत होता. ती बहुतेक नावे मी पहिल्यांदाच ऐकत असल्यामुळे मला त्यामधून फारसा बोध होत नव्हता आणि ती लक्षात राहणे तर कठीणच होते, पण त्यातले एक नाव ऐकताच मी क्षणभर थबकून तिथेच उभा राहिलो कारण ते नाव माझ्या मनात आधीपासून रुतून बसलेले होते.

"हा रस्ता सिंहगडाकडे जातो." असे त्याने सांगिताच शिवाजी महाराजांचे किल्ले सह्याद्री पर्वतावर होते ही इतिहासातली पुस्तकी माहिती मला आठवली आणि मी लगेच बोलून दाखवली.
"बरोबर आहे, पण सह्याद्रीच्या रांगा तर पुण्यापासूनच सुरू होतात. त्यातला सिंहगड हा जवळचा किल्ला इथून अंदाजे पंधरा मैलांवर (चोवीस किलोमीटर्सवर) असेल."  त्याने सांगितले. म्हणूनच तर राजमाता जिजाबाईं यांना तो कोंढाणा किल्ला त्यांच्या लालमहालामधून दिसला आणि तो काबीज करून आणण्याची आज्ञा त्यांनी राजांना दिली हे ही मला आठवले.
"म्हणजे हा रस्ता सुध्दा चारशे वर्षांपूर्वी बांधला आहे ! सगळ्याच किल्ल्याकडे जाण्यासाठी असे रस्ते पण बांधले होते का?"
माझी जिज्ञासा संपत नव्हती, पण आता माझ्या सर्वज्ञ भावाने हात टेकले.
"ते माहीत नाही रे, मुठा नदीच्या कांठावर वसलेल्या लहान लहान गांवांना जोडत हा रस्ता खडकवासल्याला जातो. तिथे एक मोठे धरण आहे, तसेच मिलिटरीचे कॉलेज (एनडीए), एक मोठे संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) आणखी काही काही आहे. कदाचित त्यासाठी इंग्रजांच्या काळातच हा पक्का रस्ता बांधला गेला असेल. तिथून पुढे डोंगरातल्या इतर गांवांकडे जाणारे निरनिराळे साधे रस्ते आहेत, त्यातला एक सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गांवापर्यंत जातो."
त्यावेळी या विषयावरचे आमचे बोलणे एवढ्यावरच संपले असावे, मला त्यातले इतर काहीच आठवत नाही. सिंहगड आणि पर्वती ही मनावर कोरलेली दोन नावे असलेली ठिकाणे एकमेकांना रस्त्याने जोडलेली आहेत एवढे मात्र लक्षात राहिले. जाता जाता मी त्या रस्त्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला.
एकाद्या मोठ्या गावाबाहेर गेल्यावर आजूबाजूच्या खेड्यांकडे  जाणारे रस्ते, त्यांच्या बाजूला लावलेल्या झाडांमधून डोकावणारी घरे, देवळे, रस्त्यावरून अधून मधून जाणारी एकाददुसरी वाहने, सायकलीवरून किंवा चालत जाणारे पाचदहा वाटसरू वगैरेंची आठवण करून देणारा असा तो रस्ता त्या काळात होता. फक्त त्यावर गुरेढोरे आणि बैलगाड्या दिसत नव्हत्या किंवा बैलगाड्यांच्या चाको-या पडलेल्या नव्हत्या एवढेच.

इंजिनियरिंगच्या अभ्यासात आकंठ बुडून गेल्यावर मला डोके वर करायलाही उसंत मिळत नव्हती आणि शिक्षण संपल्यानंतर मी नोकरीसाठी मुंबईला गेलो. त्यामुळे स.प.महाविद्यालयाच्या बाजूने जाणा-या त्या रस्त्याने मी पुनः कधीच पर्वतीवर चालत गेलो नाही. त्यामुळे वाटेत लागलेला सिंहगडचा रस्तासुध्दा मला नेमका कुठे दिसला होता हे मी नंतर विसरून गेलो.
--------------------------------------------------------------------------------------------------

सिंहगड रोड - भाग २

मी पुण्याला कॉलेजात असतांना लकडी पुलापासून सुरू होणारा डेक्कन जिमखाना हा त्या मानाने शहरातला आधुनिक भाग समजला जात होता. त्या काळातले मुख्य पुणे शहर तिथूनच सुरू होत होते. कर्वे रोडवरील आयुर्वेद रसशाळा जवळ जवळ गावाच्या हद्दीवर होती. पुढे काही ठिकाणी तुरळक वस्ती दिसत होती, पण मला कधीच तिकडे जायची गरज पडली नाही. मी नोकरीला लागल्यानंतर अनेक वेळा पुण्याला येऊन जात असे. तेंव्हा माझी ऑफीसची बहुतेक कामे उपनगरांमधल्या कुठकुठल्या कारखान्यात असायची आणि माझे बहुतेक सगळे नातेवाईक शहराच्या जुन्या भागातल्या पेठांमध्ये रहात असत. यामुळे माझा पुण्यातला संचार तेवढ्या भागातच होत असे. तरीसुध्दा पुणे शहर सर्व बाजूंनी कसे पसरत चालले होते याची माहिती मला बोलण्यामधून मिळत होतीच.
 
ज्या लोकांनी पूर्वीचे जुने वाडे किंवा चाळी यामधल्या एक दोन खोल्यांमध्ये संसार थाटले होते त्या लोकांच्या पुढल्या पिढ्या कोथरूड, एरंडवणे, पौड रोड, कर्वेनगर वगैरे भागांमध्ये सेल्फकन्टेन्ड फ्लॅट्समध्ये रहायला जात होत्या किंवा सातारा रोडवरील बिबवेवाडी, पद्मावती, सहकारनगर यासारख्या भागांमध्ये स्थलांतर करत होत्या. नव्याने पुण्यात येणारे मध्यमवर्गीय लोकसुध्दा याच भागात घरे पहात होते किंवा त्यांना तिकडेच मनासारख्या जागा मिळत होत्या. यामुळे पुढील दोन तीन दशकांच्या काळात माझ्या परिचयातली बरीचशी मंडळी या दोन भागात रहायला लागली. थोडक्यात म्हणजे मुठा नदीच्या डाव्या तीरावरील भागामध्ये आणि दक्षिणेला सातारा रोडवर होत असलेल्या शहराच्या विस्तारात नवनव्या वस्त्यांमध्ये भर पडत होती. या विस्ताराची खबर मला मिळत होती आणि या ना त्या निमित्याने मला कधीकधी तिकडे जावेही लागत होते. पण या दोन भागांच्या बेचक्यातल्या म्हणजे मुठा नदीच्या उजव्या तीरावरील भागाचा कसा विकास होत होता याचा मात्र बरीच वर्षे मला पत्ता ही नव्हता. किंबहुना माझ्या लेखी तो भाग अस्तित्वातच नव्हता. सिंहगडाकडे जाणारा रस्ता त्या भागातून जातो किंवा तो एक मोठा हमरस्ता होत होता हे ही मला माहीत नव्हते. मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस हायवे) सुरू झाला तेंव्हा तो वाकडपासून कात्रजपर्यंत ओसाड भागातून जात होता, पण एकवीसाव्या शतकात मात्र वाकड, हिंजवडी, बालेवाडी, बाणेर, बावधान, वारजे वगैरे खूप मोठा पट्टा झपाट्याने विकसत गेला आणि त्याचा वेग वाढतच आहे. त्यांच्या तुलनेत सिंहगड रोडला तितके प्राधान्य मिळाले नाही.

एकोणीसशे नव्वद पंच्याण्णऊच्या सुमाराला एके दिवशी माझा मुंबईतच राहणारा एक आतेभाऊ मला भेटायला आला आणि त्याने बोलताबोलता मला एक लहानसा धक्का दिला. त्याने पुण्याजवळच्या कुठल्याशा बुद्रुक किंवा खुर्दमध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता म्हणे. ते नवराबायको दोघेही मुंबई महापालिकेत नोकरीला असल्यामुळे तिथे चांगले स्थायिक झालेले होते आणि त्यांना रिटायर व्हायला निदान पंचवीस वर्षे अवकाश होता. त्यामुळे त्यांनी आताच असल्या खेड्यात घर का घेतले याचे मला सहाजिकच आश्चर्य वाटले. किंचित हेटाळणीच्या स्वरातच मी त्याला विचारलं, "काय रे, तुझं हे बुद्रुक नेमके कुठं आहे?"
त्याने अत्यंत अभिमानाने सांगितलं. "सिंहगड रोडवर."
"काय?" मी ताड्कन उडालो. थोडासा सांवरून त्याला विचारलं "म्हणजे तू एकदम मावळ्यांच्या वस्तीत रहायला जाणार ? शेला, पागोटं वगैरे घेऊन ठेवलं असशील ना!" त्याचे ते बुद्रुक सिंहगडाच्या अगदी पायथ्यापाशी असावे असेच मला वाटले होते. तोंपर्यंत मी सिंहगडही पाहिला नव्हता, फक्त ह.ना.आपट्यांच्या कादंबरीतले त्याचे वर्णन वाचले होते.
"नाही रे, सिंहगड रोड पुण्यातच आहे." त्याने मला नसलेली माहिती दिली.  मला तीस वर्षांपूर्वी पाहिलेला सिंहगडकडे जाणारा लहानसा रस्ता आठवला.
"अरे व्वा ! तो गावाबाहेरचा जुना खेडवळ रस्ता सिंहगड रोड कधी झाला?" मी विचारले.
आता मात्र त्याला बोलायची संधी मिळाली. "म्हणजे तुला एवढं सुध्दा माहीत नाही? अरे सिंहगड रोड कसला पॉश रोड आहे! आपल्या चेंबूरमध्येसुध्दा असला रस्ता नाही." कदाचित त्या काळात नसेलही.
"खरंच ? मला येऊन पहायलाच हवं." मी म्हणालो.
"पुढच्या आठवड्यात आम्ही सगळ्या जवळच्या नातेवाइकांसाठी तिथे एक कार्यक्रम ठेवला आहे ते सांगायलाच मी आलो होतो. अर्थातच तुम्हालाही यायचे आहेच. तुम्ही सगळे येणार ना ?"
"हो, नक्की येणार."
असे मी सांगितले खरे आणि मला जायची इच्छाही होती, पण आयत्या वेळी काही अडचण आल्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही. माझ्या त्या आत्तेभावाला तिथे प्रत्यक्षात रहायला जायचे नव्हतेच, त्याने फक्त गुंतवणूक म्हणून तो विकत घेऊन ठेवला होता. त्या फ्लॅटचे पुढे काय झाले कोण जाणे, पण मला काही तो पहाण्याची आणि त्या निमित्याने सिंहगड रोडचे नवे रूप पाहण्याची संधी मिळाली नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------

No comments: