Monday, September 23, 2013

गणेशोत्सवातली उणीव

प्रमोदचं लहानपण एका लहान गावातल्या मोठ्या कुटुंबात गेलं होतं. दरवर्षी गणेशचतुर्थीला त्यांच्या घरी गणपतीची स्थापना होत असे आणि त्याचा उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जात असे. कळायला लागल्यापासूनच प्रमोदही त्यात हौसेने सहभाग घ्यायला लागला. गणपतीच्या मूर्तीला वाजत गाजत घरी आणण्यापासून ते त्याचे मिरवत नेत विसर्जन करण्यापर्यंतच्या सर्व काळात त्याच्या मखराची सजावट, पूजा, आरती, भजन, कीर्तन, नैवेद्य, प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टींकडे तो लक्ष देऊन पहात असे आणि शक्य तितके काम अंगावर घेऊन ते उत्साहाने आणि मनापासून करत असे. स्वतःच्या प्रत्यक्ष सहभागामधून या उत्सवाची इत्थंभूत माहिती त्याने लहानपणीच करून घेतली होती. 

शिक्षण पूर्ण करून प्रमोद नोकरीला लागला, त्याने लग्न करून बि-हाड थाटले आणि तो दरवर्षी आपल्या नव्या घरात गणपती बसवायला लागला. त्याची पत्नी प्रमिलाही त्याच्याइतकीच किंबहुना त्याच्यापेक्षाही कांकणभर जास्तच उत्साही होती. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या आठ दहा दिवस आधीपासूनच दोघे मिळून प्रचंड उत्साहाने तयारीला लागत असत आणि सगळे काही व्यवस्थित आणि उत्तम प्रकारे होईल याची संपूर्ण काळजी घेत. यथाकाल त्यांच्या संसारात मुलांचे आगमन झाले आणि जसजशी ती मोठी होत गेली तशी तीसुध्दा आईवडिलांना हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांच्या कामात गोड लुडबूड करायला लागली. दरवर्षीचा गणेशोत्सव आधीच्या वर्षीपेक्षा अधिक चांगला कसा करायचा याचा प्रयत्न ते दोघे करत असत. त्या उत्सवाच्या काळात ते सगळ्या आप्तेष्टांना अगत्याने त्यांच्या घरी बोलावत असत आणि दोघांचेही मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी, नातेवाईक वगैरे त्यांच्याकडे  येऊन जात, दोन घटका गप्पा मारत, चांगले चुंगले जिन्नस खात त्यांचे तसेच गणपतीच्या सजावटीचे कौतुक करत, आरत्यांमध्ये भाग घेत. एकंदरीत ते काही दिवस त्यांच्या घरात खूप धामधूम, धमाल चालत असे. सगळ्यांनाच याची इतकी सवय होऊन गेली की "आमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला या" म्हणून मुद्दाम सर्वांना सांगायचीही गरज वाटेनासे झाले. उत्सव सुरू झाला की बोलावणे मिळाले नसले तरीही नेहमीचे लोक आपणहून येऊ लागले. गणेशोत्सवाचे एक बरे असते, ते म्हणजे कोणालाही येऊन जाण्यासाठी तारीख वार वेळ वगैरे ठरवावे लागत नाही. ज्याला जेंव्हा जेवढा वेळ मिळेल तेंव्हा तो डोकावून जातो आणि त्याचे त्यावेळी हसतमुखाने स्वागतच केले जाते.

अशी पंधरा वीस वर्षे गेली. प्रमोद आणि प्रमिला हे दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रगतीपथावर होते, त्यांची मुले मोठी होत होती आणि कामाला मदत करू लागली होती. दरवर्षी येणारा गणेशोत्सवसुध्दा पहिल्याइतक्याच उत्साहात साजरा होत होता. पण एकदा गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असतांना प्रमिलाला कसलेसे गंभीर आजारपण आले आणि काही दिवसांसाठी बेडरेस्ट घेणे आवश्यक झाले. तिची प्रकृती तशी काळजी करण्यासारखी नव्हती, तिच्यात हळूहळू सुधारणा होत होती, पण तिला घरातसुध्दा ऊठबस करायला आणि इकडे तिकडे फिरायला डॉक्टरांनी बंदी घातली होती. तिने लवकर बरे होण्यासाठी ती बंधने पाळणे आवश्यक होते. अर्थातच प्रमोदने ऑफिसातून रजा घेतली आणि पूर्णवेळ तो घरी राहू लागला. मुलेही आता मोठी झाली होती आणि त्याला लागेल ती मदत करत होती.

कुठलेही काम योजनापूर्वक आणि सगळ्या गोष्टी तपशीलवार ध्यानात घेऊन मन लावून करणे हा प्रमोदचा स्वभावच होता. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी त्याने त्यासाठी लागणा-या एकूण एक वस्तूंची यादी तयार केली. दुर्वा, शेंदूर, बुक्का आणि अष्टगंध वगैरे पूजाद्रव्यांपासून ते किती प्रकारचे मोदक आणायचे इथपर्यंत सगळे लिहून काढले, ती यादी प्रमिलाला वाचून दाखवली, त्यात आणखी कशाकशाची भर घालायची ते विचारून घेतले आणि ते सगळे सामान बाजारातून घरी आणून ठेवले. दोन दिवस बसून सुंदर मखर तयार केले, त्याला रंगीबेरंगी विजेच्या माळांनी सजवले, दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले. घरी येणा-या पाहुण्यांना देण्यासाठी तीन चार प्रकारच्या मिठाया आणि तीन चार प्रकारचे टिकाऊ तिखटमिठाचे पदार्थ आणून ते डब्यांमध्ये भरून ठेवले. त्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या त्या डब्यांवर चिकटवून ठेवल्या. दोन तीन प्रकारच्या थंड पेयांच्या मोठ्या बाटल्या आणून फ्रिजमध्ये ठेवल्या. पेपर डिशेस आणि प्लॅस्टिकच्या ग्लासेसची पॅकेट्स आणून जवळच ठेवली. पहिल्या दिवसाच्या पूजेसाठी भरपूर फुले आणली आणि रोज फुलांचे दोन ताजे हार आणून देण्याची ऑर्डर फूलवाल्याला देऊन ठेवली.

गणेशचतुर्थीचा दिवस उजाडण्याच्या आधीच प्रमोदने अशी सगळी तयारी करून ठेवली होती. त्या दिवशी त्याने दरवर्षाप्रमाणेच गणपतीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा केली. आंब्याचे, खव्याचे आणि तळलेले मोदक, इतर मिठाया, सफरचंद, केळी, चिकू वगैरे निरनिराळी फळे या सर्वांचा महानैवेद्य दाखवला. जवळ राहणारे शेजारीपाजारी झांजांचा आवाज ऐकून आले होते त्यांना प्लेटमध्ये प्रसाद दिला. उत्सवाची सुरुवात तर नेहमीप्रमाणे अगदी व्यवस्थित झाली. एरवी त्याला रोज सकाळी नोकरीवर जाण्याची घाई असायची. यापूर्वीच्या वर्षापर्यंत घाईघाईत गणपतीला हार घालून आणि दिवा व उदबत्ती ओवाळून तो ऑफिसची बस पकडायला जात असे. या वर्षी तो दिवसभर घरीच असल्यामुळे रोज सकाळी गणपतीची साग्रसंगीत पूजा करत होता, अथर्वशीर्षाची आवर्तने करत होता, स्तोत्रसंग्रह, समग्र चातुर्मास यासारख्या पुस्तकांमधून वेगवेगळी स्तोत्रे शोधून काढून ती वाचत होता. निरनिराळ्या आरत्या म्हणत होता. "सर्वांना सुखी ठेव", विशेषतः "प्रमिलाला लवकर पूर्णपणे बरे वाटू दे" यासाठी रोज प्रार्थना करत होता.

गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जो कोणी येईल त्याचे स्वागत करणे, त्याच्याशी चार शब्द बोलणे, त्याला प्लेटमध्ये प्रसाद भरून देणे वगैरे सगळे मुलांच्या सहाय्याने तो व्यवस्थितपणे सांभाळत होता. यापूर्वी दरवर्षी हे काम प्रमिला करायची. फराळाचे सगळे डबे असे खाली मांडून ठेवणे तिला पसंत नसल्यामुळे ती एक एक डबा खाली काढून त्यात काय आहे हे पाहून प्लेट भरायची आणि खाली काढलेले डबे उचलून ठेवायला प्रमोदला सांगायची. ते करतांना तो हमखास इकडचा डबा तिकडे आणि तिकडचा तिसरीकडे वगैरे करायचा आणि त्यामुळे पुन्हा कोणासाठी प्लेट भरतांना प्रमिलाला जास्त शोधाशोध करावी लागायची. यात वेळ जात असे. शिवाय कोणी बेसनाचा लाडू खात नसला तर "खरंच तुला लाडू आवडत नाही का? थांब तुझ्यासाठी काजूकटली आणते." असे म्हणून प्रमिला आत जायची आणि "काजूकटली कुठे ठेवली गेली कुणास ठाऊक, हा पेढा घे." असे म्हणत बाहेर यायची. कधी एकादीला उपास असला तर "तुझ्यासाठी मी बटाट्याचा चिवडा आणायचा अगदी ठरवला होता गं, पण आयत्या वेळी लक्षातून राहून गेलं बघ." असे म्हणत तिच्या प्लेटमध्ये एक केळं आणून ठेवायची. पण या वर्षी असे काही होत नव्हते. जवळच्या लोकांच्या आवडीनिवडी प्रमोदला चांगल्या ठाऊक झाल्या होत्या. त्याच्या घरी आलेले लोक गणपतीचे दर्शन घेऊन, त्याला हळदकुंकू, फुले, दुर्वा वाहून नमस्कार करून आणि आरास पाहून खुर्चीवर येऊन बसेपर्यंत त्यांच्या आवडीच्या पदार्थांनी भरलेली प्लेट त्यांच्यासमोर येत होती.

प्रमोदचे मित्र त्याच्याशी आरामात गप्पा मारत बसत, त्याच्या ऑफिसातले सहकारी तर जास्त वेळ बसून त्याच्या गैरहजेरीत ऑपिसात काय काय चालले आहे याची सविस्तर चर्चा करत. जाण्यापूर्वी प्रमिलाची चोकशी करून तिला "गेट वेल सून" म्हणून जात. प्रमिलाच्या मैत्रिणी प्लेट घेऊन आतल्या खोलीत जात आणि तिच्याशी गप्पागोष्टी करत बसत. बहुतेक वेळी त्या अशा होत असत.
"अगं तुला काय सांगू? मी अशी बिछान्यावर पडलेली, आता कसला गणपती आणि कसचं काय? देवा रे, मला माफ कर रे बाबा."
"खरंच गं, मुख्य तूच नाहीस तर मग यात काय उरलंय्? तुझी सारखी किती धावपळ चाललेली असायची ते मला माहीत आहे ना."
"अगं, एक सेकंद श्वास घ्यायला पण फुरसत मिळायची नाही बघ. या वर्षी काय? जे काही चाललंय तसं चाललंय्" .... वगैरे वगैरे
शेजारच्या खोलीत चाललेला हा संवाद प्रमोदच्या कानावर पडायचा पण त्याला त्याचा अर्थ समजत नव्हता.
"मी काही विसरतोय का? माझ्याकडून गणपतीचं काही करण्यात राहून जातंय का?" असं त्यानं प्रमिलाला विचारून पाहिलं. त्यावर "मी कुठं असं म्हणतेय्?" असं म्हणून ती त्याला उडवून लावायची आणि आणखी एकादी मैत्रिण आली की पुन्हा तेच तुणतुणं सुरू करायची. त्यामुळे "या वर्षीच्या उत्सवात कोणती उणीव राहिली?" या प्रश्नाचा भुंगा प्रमोदच्या डोक्यात भुणभुणत राहिला.

त्या वर्षातला गणपतीचा उत्सव संपला, पुढे प्रमिलाही पूर्ण बरी होऊन हिंडूफिरू लागली, त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित रुळावर आली. वर्षभराने पुन्हा गणेशचतुर्थी आली. पूर्वीप्रमाणेच दोघांनी मिळून सगळी खरेदी, सजावट वगैरे केली. गणपतीच्या मूर्तीची स्थापना, पूजा आरती वगैरे झाले. प्रमिला नेमके काय काय करते आहे यावर मात्र या वेळी प्रमोद अगदी बारीक लक्ष ठेवून पहात होता. दुपारचा चहा होऊन गेल्यानंतर काही वेळाने प्रमिलाच्या दोन तीन मैत्रिणी आल्या आणि तिच्या खोलीत त्यांची मैफिल जमली. प्रमिलानं तिच्या कपाटातल्या सगळ्या साड्या काढून पलंगावर ठेवल्या आणि त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्यातली एक चांगली दिसणारी साडी हातात घेऊन प्रमिलानं विचारलं, "आज संध्याकाळी मी ही साडी नेसू का?"
"कुठे बाहेर जाणार आहेस का?"
"छेः गं, आज ही कसली बाहेर जातेय्? आता हिच्याच घरी सगळे लोक येतील ना?"
"हो, म्हणून तर जरा नीट दिसायला नको का?"
"ही साडी तशी ठीक आहे, पण जरा जुन्या फॅशनची वाटते ना?" 
"मग तर छानच आहे, लोकांना एथ्निक वाटेल."
"इतकी काही ही जुनीही नाहीय् हां. पण ठीक आहे, ही बघ कशी वाटतेय्?"
"अगं मागच्या महिन्यात त्या सुलीच्या घरी फंक्शनला तू हीच साडी नेसली होतीस. ही नको, ती बघ छान आहे."
"पण महिला मंडळाच्या मागच्या मीटिंगला मी ही साडी नेसले होते, आज त्यातल्या कोणी आल्या तर त्या काय म्हणतील?"
"हो ना? हिच्याकडे एकच साडी आहे की काय? असंच म्हणायच्या, महाखंवचट असतात त्या."
या चर्चा चालल्या असतांना बाहेर ताईमावशी आल्याची वर्दी येते.
"त्यांना पाच मिनिटं बसायला सांगा हं, मी आलेच." असे प्रमोदला सांगून प्रमिला एक साडी निवडते, ती परिधान करते आणि पंधरा वीस मिनिटांनी बाहेर येते. ताईमावशी तिच्याच दूरच्या नात्यातल्या असतात. त्यांच्याशी काय बोलावे हे प्रमोदला समजत नाही. महागाई, गर्दी, आवाज प्रदूषण, ताज्या बातम्या वगैरेंवर काही तरी बोलत तो कसाबसा वेळ काढून नेतो.
ताईमावशी थोडा वेळ बसून बोलून गेल्यानंतर प्रमिला पुन्हा आत जाते. मैत्रिणी तिची वाट पहातच असतात.
"ही साडीसुध्दा नेसल्यावर छान दिसते आहे हं, पण बाकीच्याचं काय?" मग प्रमिला कपाटातले ख-या खोट्या दागिन्यांचे सगळे बॉक्स बाहेर काढते. त्यातला एक एक उघडून "अय्या कित्ती छान?", "कुठून घेतलास गं?" "केवढ्याला पडला?" वगैरे त्या अलंकारांचं साग्रसंगीत रसग्रहण सुरू होते. त्याला फाटा देत "यातलं मी आज काय काय घालू?" असे म्हणत प्रमिला मुद्द्याला हात घालते.
त्यावर मग "हे छान दिसेल.", "नाही गं, या साडीला हे इतकं सूट नाही होत, त्यापेक्षा हे बघ.", "तुझ्या हॉलमधल्या लाइटिंगमध्ये हे फँटास्टिक दिसेल बघ." वगैरे चर्चा सुरू असतांना बाहेर आणखी कोणी येतात.
"हे लोक सुध्दा ना, एक मिनिट निवांतपणे बसून काही करू देणार नाहीत" असे काही तरी पुटपुटत ती त्यातला एक सेट गळ्यात, कानात, हातात वगैरे चढवून बाहेर यायला निघते.   
"अगं, अशीच बाहेर जाणार? जरा आरशात तोंड बघ, घामानं किती डबडबलंय?"
मग प्रमिला घाईघाईत तोंडावरून हात फिरवते, मुखडा, केस वगैरे थोडे नीटनीटके करून बाहेर येते. तोपर्यंत आलेली मंडळी तिची वाट पाहून "आम्हाला आज आणखी एकांकडे जायचे आहे" असे सांगून निघून गेलेली असतात. ती फणफणत पुन्हा आत जाते. जरा साग्रसंगीत तयार होऊन बाहेर येते. त्यानंतर आलेल्या मंडळींना हसतमुखाने सामोरी जाते, त्यांची चांगली विचारपूस, आदरातिथ्य वगैरे करून दमून जाते. शिवाय पलंगावर पडलेला तिच्या साड्यांचा ढीग तिची वाट पहात असतो. त्याला एका हाताने बाजूला सारून आणि अंगाचं मुटकुळं करून उरलेल्या जागेत पडल्या पडल्या ती झोपी जाते.

हे सगळं पाहून झाल्यावर प्रमोदच्या डोक्यातला भुणभुण करणारा भुंगा मात्र शांत होतो. "मागल्या वर्षीच्या गणेशोत्सवात प्रमिलाला कोणती उणीव भासत होती? ती काय मिस् करत होती?" या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले होते.

No comments: