Monday, September 16, 2013

वक्रतुंड महाकाय



मी शाळेत असतांना वर्गातल्या बाकीच्या सगळ्या मुलांपेक्षा वयाने आणि चणीनेही लहान असल्यामुळे त्यांना थोडा घाबरत असे. त्यातल्या कोणाला "अरे वाकड्या तोंडाच्या" अशी हाक मी मारली असती तर त्याने माझा एक गाल सुजवून माझेच थोबाड वाकडे करून टाकले असते आणि कोणाला जर मी "ढबाल्या" म्हंटले असते तर त्याच्या गुबगुबीत हाताचा ठोसा मला खावा लागला असता. त्यामुळे असले काही धाडस करायची माझी हिंमत झाली नसती, पण आपले गणपतीबाप्पा कधी असे रागावत नाहीत. मला कळायलाही लागायच्या आधीपासून "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।" हा त्यांचा श्लोक कानावर पडून मला तोंडपाठ झाला होता आणि मीसुध्दा इतर बडबडगीतांबरोबरच "वक्कतुंड म्हाकाय सुल्यकोटी समप्पब" असे काही तरी बडबडू लागलो होतो. त्या शब्दांच्या उच्चारणात हळूहळू सुधारणा होत गेली आणि मी ते व्यवस्थित म्हणू लागलो. तेंव्हापासून ते आजतागायत जगातल्या कुठल्याही ठिकाणच्या, अगदी इंग्लंड अमेरिकेतल्यासुध्दा, एकाद्या देवळात गणेशाची मूर्ती दिसली की त्याला हात जोडून नमस्कार करताच हा श्लोक माझ्या ओठावर येतो. मुंबईतल्या कुठल्याही रस्त्याने जात असतांना वाटेत गणेशोत्सवाचे मंडप लागतात आणि आत जाऊन मंगलमूर्तीचे दर्शन घेतांना हा श्लोकही म्हंटला जातो. असे गेल्या आठवड्यात रोज घडत आले आहे.

कोणत्या ऋषीमुनीने हा श्लोक लिहिला आहे हे काही मला ठाऊक नाही, पण गणपतीच्या सहस्रनामांमधले 'वक्रतुंड' हेच नाव त्यांना या श्लोकात घ्यावेसे का वाटले कोण जाणे, 'महाकाय' याचा अर्थ 'आडव्या अंगाचा' असा न घेता शक्तीशाली, सामर्थ्यवान असाही घेता येईल. या देवाचा मुखडा आणि शरीरयष्टी कशीही (कदाचित भयभीत करणारी) असली तरी त्याचे तेज कोटी सूर्यांइतके दिपवून टाकणारे आहे असे या श्लोकाच्या पहिल्या चरणात लिहिले आहे. पण त्या महाशक्तीला वंदन, नमन वगैरेसुध्दा न करता "निर्विघ्नम् कुरुमे देव सर्वकार्येशु सर्वदा" म्हणजे "माझ्या सगळ्या कार्यांमध्ये येणारी विघ्ने सर्व वेळी दूर कर" अशी प्रार्थना किंवा मागणे या श्लोकाच्या पुढल्या ओळीत मांडले आहे. पहिल्या शब्दात त्याला नावे ठेवायची आणि पुढे लाडीगोडी लावून त्यालाच नेहमी आपली मदत करायला सांगायचे असे या श्लोकाचे स्वरूप दिसते. चांगली बुध्दी, स्वर्ग, मोक्ष, संपत्ती, शांती यातले काही न मागता आपल्या कामातले अडथळे तेवढे दूर करण्याची ही विनंती या श्लोकात आहे. देवाच्या कृपेने आपला मार्ग निर्विघ्न झाला की आपले काम आपल्या प्रयत्नानेच तडीला न्यायचे, आपले यश आपण मिळवायचे, ते आयते हातात पडायला नको असा एक चांगला विचार त्यात दिसतो.  

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नम् कुरुमे देव सर्वकार्येशु सर्वदा।।

या श्लोकाच्या पाठोपाठ म्हंटला जाणारा श्लोक आहे,
गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती । पंचैतैनि स्मरेन्नित्यम् आयुःकामार्थसिध्दये।।

आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेले सगळे काही साध्य करून घेण्यासाठी गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती या पाचजणांचे स्मरण करावे असा या श्लोकाचा अर्थ आहे. यातला गणनाथ म्हणजेच गणपती हा सर्व गणांचा म्हणजे देवांच्या सर्व सेवकांचा प्रमुख आहे. सगळे काही करणे वा न करणे, करू देणे वा न देणे हे  त्याच्या हातात आहे. सरस्वती ही विद्या, कला वगैरेंची देवता आहे. रवी शुक्र आणि बृहस्पती हे नवग्रहांमधले प्रमुख ग्रह आहेत, त्यातला सूर्य अत्यंत तेजस्वी, प्रखर आणि जीवनाधार आहे. शुक्र आणि गुरू हे अनुक्रमे दैत्य आणि देवांचे गुरू होते. त्यांच्या सैन्यांना युध्दामधले सारे कौशल्य आणि डावपेच ते शिकवत असत. बृहस्पती हे अत्यंत बुध्दीमान आणि विद्वान तर शुक्राचार्य हे अत्यंत धोरणी समजले जात असत. पुराणातल्या सर्व लढायांमध्ये शेवटी देवांचाच विजय होत असला तरी पराभवाने निष्प्रभ झालेल्या असुरांना शुक्राचार्य संजीवन देऊन पुन्हा बलिष्ट बनवण्याचे काम करत असत. सामर्थ्य, कलाकौशल्य, तेज, बुध्दीमत्ता, विद्वत्ता, चतुराई हे सगळे गुण अंगात बाणवले तर माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी होणारच.  शुक्र आणि बृहस्पती यांना विकार आणि विवेक यांची प्रतीके असेही बहुधा मानता येईल. 'सगळे काही' मिळवायचे असल्यास या दोघांचीही मदत लागेलच, शिवाय शक्ती, युक्ती, कौशल्य वगैरेही पाहिजेत. 

 -------------------------------------
  • पंचैतैनि स्मरेन्नित्यम् " ----- ह्यानंतर " वेदवाणीप्रवृत्तये " असं मला का आठवते कोण जाणे  
    अशी प्रतिक्रिया एका सुविद्य भगिनीने फेसबुकावर दिली होती.

    यावर मी थोडेसे संशोधन करून खाली दिलेले स्पष्टीकरण देत आहे.
     माझ्या लेखनातली चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. मी हा श्लोक फक्त आठवणीमधून लिहिला होता आणि मला वाटला तसा त्याचा अर्थ काढला होता. गूगलवरून शोध घेता असे दिसते की हा श्लोक गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पतिन् ।
    पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाण
    ी प्रवृत्तये ॥ असाच आहे. आयुष्कामार्थ सिध्दये हा भाग खालील श्लोकाचा आहे. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
    भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥



2 comments:

Yashodhan said...

छान लेख.. तुमच्या पोस्ट मध्ये जे फोटो वापरलेत त्यात पहिल्या फोटोमध्ये गणपतीची सोंड वाकडी आहे आणी म्हणुन वक्रतुंड (वाकड्या तोंडाचा) असे लिहिलेले दिसतेय, पण मध्यंतरी फेसबुकवर वाचण्यात आले होते कि हा गैरसमज आहे.. आणी आख्यायिका अशी सांगितली होती कि, वाकड्या मार्गाने जाणाऱ्यांना दंड करून सरळ मार्गावर आणणारा म्हणुन गणपतीला वक्रतुंड हे नाव पडले.. नक्की माहित नाही.. तुम्हाला काही माहिती असल्यास जाणून घ्यायला आवडेल..!!

यशवंक said...

खरच छान माहीती दिली आपण धन्यवाद
पण प्रत्यक्षात प्रश्न तसाच आहे कोणी लिहीली हा महामंत्र जो ? सर्वांचा तोंडपाठ आहे
उत्तर सापडले तर 951894893