Wednesday, December 26, 2012

आपल्या रक्तात काय काय असते? रक्ताची तपासणी

आपल्या रक्तात काय काय असते?  - भाग १

माणसाचे आईवडील, बहीणभाऊ आणि मुले यांच्याबरोबर असलेले नाते रक्ताचे नाते असते. आनुवंशिकतेमधून त्यांच्यात काही समान गुण आलेले दिसतात. त्याची शरीरयष्टी, बुध्दीमत्ता, स्वभाव, हावभाव वगैरे गोष्टी त्याला जीन्समधून मिळाल्या आहेत असे सांगतात. "ते त्याच्या रक्तातच आहे" असेही अलंकारिक भाषेत म्हंटले जाते. संस्कारातून मिळालेले किंवा प्रशिक्षणातून अंगात बाणवलेले गुणसुध्दा "रक्तात भिनले आहेत" असे म्हंटले जाते.  प्रेमळ, शांत, धीरगंभीर वृत्ती, वाक्चातुर्य, खंबीरपणा, निर्भयता, धडाडी, निर्भीडपणा, विनय यासारखे चांगले गुण किंवा हटवाद, अरेरावी, धांदरटपणा, धरसोड, घाई, कचखाऊपणा, बुजरेपणा, विघ्नसंतोषी वृत्ती यासारखे दुर्गुण कुणाकुणाच्या रक्तातच आहेत असे म्हंटले जाते. माणसाच्या रक्तात खरोखर काय काय असते आणि ते किती प्रमाणात असते हे आजकाल होत असलेल्या शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते. माणसाच्या रक्तात खरोखर काय काय असते आणि ते किती प्रमाणात असते हे आजकाल होत असलेल्या शास्त्रीय तपासण्यांमधून पाहिले आणि मोजले जाते.

ठेच लागणे, खरचटणे वगैरे गोष्टी लहान असतांना रोजच घडायच्या आणि त्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात झालेल्या जखमेमधून लालभडक रंगाचे रक्त बाहेर पडते एवढी माहिती आपोआपच कळत गेली. शरीरात सर्वत्र असलेले हे रक्त कुठेही स्थिर नसते, शरीराच्या सगळ्या भागांमधून ते सारखे हृदयाकडे जात असते आणि तिकडून फुफ्फुसात जाऊन तिथे शुध्द होऊन हृदयात परत येते आणि त्यानंतर ते पुन्हा शरीरभर पसरते या क्रियेला 'रक्ताभिसरण' म्हणतात ही माहिती शालेय शिक्षणात मिळाली. त्याच बरोबर रक्तामध्ये तांबड्या आणि पांढऱ्या पेशी असतात वगैरेही समजले.

माझ्या लहानपणी आमच्या लहान गावात पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी नव्हती. बहुतेक लोकांनी हे शब्दच मुळी ऐकले नव्हते. तिथले डॉक्टर लक्षणे पाहूनच रोगाची चिकित्सा आणि उपचार करायचे. आमच्या घरातले कोणीही रक्त तपासून घेण्यासाठी मोठ्या शहरातल्या दवाखान्यात गेले होते असे मी लहानपणी कधी ऐकले नाही. मला नोकरीला लागल्यानंतर आमची वैद्यकीय तपासणी झाली त्या वेळी माझ्या रक्ताची पहिली चाचणी झाली. त्याचा रिपोर्ट मला मिळालाच नाही, पण माझी नोकरी शाबूत राहिली म्हणजे त्यात काही आक्षेपार्ह असे सापडले नसणार.

आम्ही अणुशक्तीनगरला रहायला गेलो तेंव्हा तिथे एक सुसज्ज असे हॉस्पिटल बांधले गेले होते. त्यात पॅथॉलॉजीचा सेक्शनसुध्दा होता. घरातल्या कोणाला अचानक सडकून ताप भरला किंवा कोणाला आलेला ताप, खोकला वगैरे रेंगाळत राहिले तर त्याच्या रक्ताची तपासणी केली जाई, पण तो रिपोर्ट थेट आमच्या फायलीत जाई आणि तो वाचण्याची परवानगी फक्त डॉक्टरांनाच होती. त्या तपासणीमध्ये कुठल्या रोगाचे जंतू मिळतात ते पाहिले जात असेल असे सुरुवातीला मला वाटायचे. का कोणास ठाऊक पण पूर्वीच्या काळात आमच्या रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट आम्हाला पहायलाही मिळत नसे. एकाद्या ओळखीच्या डॉक्टरने मोठी मेहेरबानी करून तो दाखवलाच तरी बीएसएफ, पीपी, पीसी असली अक्षरे आणि त्यांच्या समोर लिहिलेले आकडे यांमधून काही बोध होत नसे आणि तो समजावून सांगणे हा डॉक्टरच्या ड्यूटीचा भाग नव्हता. पण ही अक्षरे जंतूबिंतूंची नावे असणार नाहीत असे मात्र वाटायचे.

चाळिशीत आल्यानंतर एकदा मी अलकाला घेऊन आमच्या दवाखान्यात गेलो होतो. तिला तपासल्यानंतर डॉक्टरांनी एक चिटोरे आमच्या हातात दिले आणि पॅथॉलॉजीमध्ये जाऊन रक्ताचे सँपल देऊन यायला सांगितले. त्यानंतर माझ्या किंचित स्थूलपणाकडे झुकलेल्या देहाकडे पहात मला विचारले, "तुमच्या बॉडीची केमिस्ट्री कशी आहे?"
माझ्या तोंडावरले प्रश्नचिन्ह पाहून विचारले, "तुमची लेटेस्ट ब्लडटेस्ट कधी झाली आहे?"
मी सांगितले, "मला तर आठवत नाही. तुम्ही जरा फाइलमध्ये बघा."
त्यांनी चारपाच पाने चाळून पाहिली, त्यात काही सापडले नाही हे पाहून आणखी एक चिटोरे लिहून माझ्या हातात दिले आणि अलकाबरोबर माझ्या रक्ताचेही सँपल देऊन यायला सांगितले.

मी धडधाकट असतांना दिलेल्या रक्तात डॉक्टरांना काय सापडणार आहे असाच विचार करत दोन दिवसांनी पुन्हा त्यांना भेटायला गेलो. माझा रिपोर्ट पाहून ते एकदम म्हणाले, "तुम्हाला आता आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवे आणि नियमितपणे थोडा व्यायामही करायला पाहिजे."

मी म्हंटले, "हे तर सगळेच सांगतात. मी सुध्दा इतर लोकांना सांगतो. या रिपोर्टवरून तुम्हाला हे सांगावंसं का वाटलं?"
"कारण तुमच्या रक्तातलं साखर आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण लिमिटच्या बाहेर गेलं आहे."
"पण मला तर तसं काही वेगळं जाणवत नाही. खरं तर मला कसला म्हणजे कसलाच त्रास होत नाही."
"या दोघांचंही असंच असतं. जोपर्यंत त्यांची लक्षणं स्पष्टपणे दिसायला लागतात तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. सुदैवाने तुम्हाला एक वॉर्निंग लवकर मिळाली आहे. आताच प्रयत्न केलात तर त्यांना आटोक्यात आणता येईल."

डॉक्टरांचा सल्ला मनावर घेऊन मी तोंडावर शक्य तेवढा ताबा ठेवायला आणि जमतील तेवढे हातपाय हलवायला सुरुवात केली. महिनाभरानंतर पुन्हा रक्त तपासून घेतले तेंव्हा दोन्हींचे प्रमाण मर्यादेच्या आत आले होते, पण ते सीमारेषेच्या जवळच असल्यामुळे पथ्य आणि व्यायाम हे दोन्ही चालू ठेवणे भार पडले ते कायमचे. त्या घटनेच्या आधीसुध्दा वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर रक्ततपासणीबद्दल माहिती येत असे, पण मी तिकडे लक्ष देत नव्हतो. त्यानंतर मात्र मी लक्ष देऊन ती माहिती वाचायला लागलो. त्यातून बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. त्या थोडक्यात देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

आपला श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, शरीराचे ठराविक तपमान राखणे, झालेली झीज भरून काढणे वगैरे शरीरातली महत्वाची कामे दिवसाचे चोवीस तास अव्याहत चालली असतात. त्यासाठी ऊर्जा आणि कच्चा माल यांचीसुध्दा सतत आवश्यकता असते. यांचा पुरवठा आपल्या अन्नामधून होतो, पण आपण ते दिवसातून दोन तीन वेळाच खातो. त्या वेळी खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर त्याचा रस रक्तात जातो आणि त्यातला थोडा भाग खर्च होऊन उरलेला रस शरीरातच निरनिराळ्या जागी साठवून ठेवला जातो. अन्नाचे पचन होऊन गेल्यानंतरच्या काळात हा रस तिथून पुन्हा रक्तात प्रवेश करतो आणि त्याच्या सहाय्याने शरीराच्या सर्व भागामधल्या सर्व अवयवांना पुरवला जातो. अशा प्रकारे अन्नरसाचा काही भाग नेहमीच रक्तात असतो. विशेषतः साखर, मीठ यासारखे रासायनिक पदार्थ रक्तात विरघळलेले असतातच. त्यांचे प्रमाण किमान आणि कमाल मर्यादांमध्ये ठेवण्याचे काम शरीरातल्या अनेक ग्रंथी मिळून बिनबोभाटपणे करत असतात. काही कारणामुळे त्यांचे संतुलन बिघडले तर मात्र ते प्रमाण लिमिटच्या बाहेर गेले आणि बराच काळ राहिले तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊन अनेक व्याधी जडतात. रक्तामधली साखर किंवा कोलेस्टेरॉल यांचा समावेश त्यातच होतो. हे आणि आणखी काय काय रक्तात असते आणि त्यासाठी तपासणी केली जाते हे पुढे पाहू.

.  . . . . . .  . . . . . .

आपल्या रक्तात काय काय असते?  - भाग २


भरपूर पाण्यात घालून शिजवलेल्या डाळीमध्ये तिखट, मीठ, मसाले, चिंच, गूळ वगैरे घालून त्यावर फोडणी देऊन आमटी बनवतात. या पाककृतीत टाकलेली काही द्रव्ये आमटीतल्या पाण्यात विरघळतात तर काही विरघळत नाहीत. तिचा समरस असा (होमोजिनियस) एकजीव पदार्थ होत नाही. रसायनशास्त्रानुसार आमटी हे एक संयुग (कॉम्पाउंड) नसते, ते एक मिश्रण (मिक्स्चर) असते. त्याचप्रमाणे रक्त हेसुध्दा अनेक घटकांचे मिश्रण असते. शिवाय पचन झालेल्या अन्नरसाचे मिश्रण त्यात मिसळते, तसेच शरीरामधील निरनिराळ्या ग्रंथींमधून निघालेले श्रावसुध्दा त्यात मिसळतात. शरीराला नको असलेली द्रव्ये रक्तामधूनच मूत्रपिंड (किडनी) आणि त्वचेमधील घर्मपिंडात जातात आणि तिथे ती रक्तामधून बाहेर काढली जाऊन लघवी व घामाद्वारे उत्सर्जित केली जातात. ही सारी द्रव्ये रक्तात मिसळलेली असली तरी त्यांच्या गुणधर्मावरून त्यांना ओळखणे आणि त्यांचे प्रमाण मोजणे शक्य असते. रक्ताच्या तपासणी (ब्लड टेस्टिंग)मध्ये हे काम केले जाते. अर्थातच या विविध द्रव्यांसाठी निरनिराळ्या प्रकारांच्या तपासण्या कराव्या लागतात. त्यातल्या काही मुख्य तपासण्यांबद्दल मला असलेली माहिती या लेखात दिली आहे. मी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केलेला नाही. मी स्वतः आणि माझे कुटुंबीय यांना आलेला अनुभव आणि वाचनात आलेली माहिती या आधारावर हे लिहिले आहे.

१.पृथक्करणः (सीबीसी) रक्तामधील मुख्य घटकांची मोजणी या ब्ल़डकाउंटमध्ये करतात. ते असे असतात.
 तांबड्या पेशीः रक्तातला हा सर्वात मोठा घटक श्वासामधून फुफ्फुसात घेतलेल्या हवेतला प्राणवायू (ऑक्सीजन) शोषून घेऊन तो शरीरातल्या सर्व पेशींना पुरवतो आणि शरीरात निर्माण झालेला कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साइड) वायू गोळा करून त्याला फुफ्फुसांपर्यंत नेऊन पोचवतो. तांबड्या पेशींमधला हिमोग्लोबिन नावाचा घटक हे काम करत असतो. तांबड्या पेशींची आणि त्यांच्यातल्या हिमोग्लोबिनची संख्या कमी झाली तर शरीराला आवश्यक तेवढा प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे सारीच इंद्रिये अशक्त होतात.

पांढऱ्या पेशीः आपल्या शरीरात शिरलेल्या रोगजंतूंचा सामना करून त्यांना नष्ट करतात. यांची संख्या आवश्यकतेनुसार वाढते. त्यांचे प्रमाण थोडे वाढलेले तपासणीमध्ये दिसले तर याचा अर्थ आपल्या शरीरात काही रोगजेतूंनी मुक्काम ठोकला आहे असा होतो. ते प्रमाण नीचांकाहूनही कमी झाले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

प्लेटलेट्सः रक्तवाहिनीला इजा झाली आणि त्यामधून रक्त बाहेर आले तर त्यातल्या प्लेटलेट्स लगेच गोठतात आणि एक जाळे तयार करून रक्ताची गुठळी बनवतात. त्यामुळे रक्तवाहिनीच्या फुटलेल्या भागावर एक बूच बसते आणि ते आतल्या रक्ताला बाहेर येण्यास प्रतिबंध करते अशा प्रकारे त्या जखमेमधून होणारा रक्तस्त्राव आपोआप थांबतो. अशा प्रकारे आपला बचाव करणारा रक्तातला हा आणखी एक घटक आहे. त्यांची संख्या कमी झाली तर अगदी किरकोळ जखमांमधून किंवा साध्या खरचटण्यामधूनसुध्दा शरीरातले रक्त भळाभळा वहात राहू शकते.

इलेक्ट्रोलाईट्सः सोडियम, पोटॅशियम, क्लोरिन यासारखी काही मूलद्रव्ये शरीरामधील विविध इंद्रियांच्या कामासाठी आवश्यक असतात. या तपासणीत ते मोजले जातात.
वरील तीन्ही घटकांच्या ब्लडकाउंटवरून रोग्याच्या शरीराच्या धडधाकटपणाचा अंदाज येतो, तसेच अॅनिमियासारख्या काही विकारांची माहिती मिळते. यामधील कोठलाही घटक प्रमाणापेक्षा खूप जास्त असणेही चांगले नसते. ते एकाद्या दुर्धर रोगाचे लक्षण असू शकते.

२.साखरेचे प्रमाणः  आजकाल मधुमेह या विकाराचे प्रमाण वाढले आहे आणि ते वाढतच आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर त्यामधील कार्बोहैड्रेट्सचे साखरेत रूपांतर होते. या साखरेचे प्राणवायूशी संपर्क आल्यावर ज्वलन होऊन त्यामधून ऊर्जा तयार होते. ही क्रिया होण्यासाठी इन्सुलिन या हार्मोनची गरज असते. मधुमेह झाल्यास शरीरातले इन्सुलिनचे उत्पादन कमी होते, पुरेसे इन्सुलिन उपलब्ध नसले तर साखरेचे पुरेसे ज्वलन होत नाही आणि त्यामुळे रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढत जाते. साखरेचे हे प्रमाण सारखे बदलत असल्यामुळे ते मोजून त्या आकड्याची तुलना करण्यासाठी काही संदर्भ वेळ असणे आवश्यक असते. यासाठी दोन वेळा निश्चित केल्या आहेत.

फास्टिंग ब्लड शुगरः रात्रीचे जेवण करून झोपल्यानंतर आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचे रात्रभरात पचन होऊन त्यातली साखर यकृतात साठवली जाते आणि त्यानंतर ती यकृतामधून परत घेऊन तिचा उपयोग करणे चाललेले असते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी रक्ताची तपासणी केल्यास या परिस्थितीमधले प्रमाण समजते. निरोगी माणसाच्या रक्तात हे प्रमाण सुमारे ६० ते १०० च्या दरम्यान असते.

पोस्ट प्रॉन्डियलः सकाळचा नाश्ता किंवा दुपारचे जेवण केल्यानंतर बरोबर दोन तासांनी रक्ताचे सँपल घेऊन ही चाचणी करतात. सर्वसाधारण निरोगी माणसाच्या रक्तामधल्या साखरेचे प्रमाण एवढ्या वेळात पूर्वस्थितीवर आलेले असते. पण काही व्यक्तींच्या बाबतीत कदाचित येत नाही. सामान्य माणसासाठी हे प्रमाण सुमारे ८० ते १२० आणि मधुमेहींसाठी १४० पर्यंत ठीक समजले जाते.
आजकाल शर्करा तपासण्यासाठी पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जाऊन रक्त काढून द्यावे लागत नाही. मुठीत मावू शकेल एवढे छोटेसे ग्ल्युकोमीटर वापरून आपण ही तपासणी घरच्या घरीसुध्दा करू शकतो. यात मिळणारे आकडे अगदी अचूक नसले तरी साधारण कल्पना येण्यासाठी ठीक असतात. रोज इन्सुलिनचे इन्जेक्शन घेणारे मधुमेहाचे काही रुग्ण या शोधामुळे आता ही तपासणी भोजनाच्या आधी करून त्यानुसार डोस ठरवतात.

ग्लायकोनेटे़ड हिमोग्लोबिनः या तपासणीमध्ये मागील तीन महिन्यातील साखरेच्या प्रमाणाची सरासरी समजते. वर दिलेल्या दोन वेळा सोडून इतर काळामध्येसुध्दा साखरेचे प्रमाण कमीजास्त होत असते. त्याचा प्रभाव समजून घेण्यासाठी अधून मधून ही तपासणी करून घेऊन उपचाराची दिशा ठरवली जाते.
 
३. क्लोरेस्टेरॉलः आपण खाल्लेले स्निग्ध पदार्थ कोलेस्टेरॉलच्या रूपाने रक्तात मिसळतात. लो डेन्सिटी. हाय डेंन्सिटी यासारखे त्याचे काही प्रकार आहेत. लिपिड प्रोफाईल नावाच्या ब्लडटेस्टमध्ये त्यांचा संपूर्ण आलेख मिळतो. पक्षघात आणि हृदयरोगाच्या दृष्टीने याला खूप महत्व आले आहे.

४. लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, थाइरॉईड टेस्ट वगैरेः अशा प्रकारच्या तपासण्यांमध्ये रक्तात असलेली या इंद्रियांशी संबंधित रसायने किंवा स्त्राव यांची मोजणी करून त्यांचे प्रमाण दाखवले जाते. त्यावरून ही खास इंद्रिये किती चांगले काम करत आहेत किंवा बिघडली आहेत याचा अंदाज घेतला जातो.

५. पीटीः या तपासणीत रक्त गोठण्यासाठी किती वेळ लागतो आणि लागणे अपेक्षित आहे हे मोजले जाते आणि त्यांची तुलना केली जाते. पक्षघात आणि हृदयरोगाच्या उपचाराच्या दृष्टीने याला खूप महत्व आले आहे.

६. ब्लड टाईपः ए, बी, एबी, ओ आणि आरएच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असे रक्ताचे गट केलेले आहेत. रोग्याला दुसऱ्या माणसाचे रक्त द्यायचे असल्यास हा गट बघून घ्यावा लागतो. चुकीच्या गटाचे रक्त दिल्यास रोग्याचे शरीर त्या रक्ताचा स्वीकार करत नाही, त्यामुळे उपायाऐवजी अपाय होऊ शकतो.

७. एलिसाः ही टेस्ट एड्स हा आजार ओळखण्यासाठी असते. आजकाल या आजाराने थैमान घातले असल्यामुळे रोग्याला दिलेल्या रक्तात या आजाराचे विषाणू नाहीत याची खात्री करून घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ज्या रोग्याचे ऑपरेशन करायचे आहे त्यालासुध्दा या आजाराची लागण झालेली नाही हे पाहून घेणे योग्य असते.

८. ब्लड गॅसेसः या तपासणीसाठी थेट हृदयामधून आलेले रक्त रुग्णाच्या  रोहिणी (आर्टरी) मधून काढून त्यातील प्राणवायू, कार्बन डायॉक्साईड वायू वगैरेंचे प्रमाण मोजतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता यावरून पाहिली जाते.

९. ब्लड कल्चरः रक्तामधील रोगजंतूंना पोषक अशा वातावरणात वाढवून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्यांचे निरीक्षण केले जाते. रोग्याला कोणत्या जंतूंचा संसर्ग झाला आहे आणि कोणती औषधे त्यांना मारक आहेत हे या तपासणीत समजते.

१० डीएनए टेस्टः मुलगा वा मुलगी आणि त्यांचे माता पिता यांचा रक्ताचा संबंध या तपासणीतून सिध्द करता येतो. प्रत्यक्ष जीवनापेक्षा नाटक, सिनेमे, टीव्हीवरील सीरियल्स यांमध्येच ही टेस्ट अनेक वेळा दाखवतात.
 

No comments: