Tuesday, January 01, 2013

बाय बाय २०१२ ..... सन २०१३चे स्वागत !



सन २०१२ ला निरोप देत असतांना हे वर्ष कशासाठी लक्षात राहील असा विचार मनात येतोच. व्यक्ती, कुटुंब, देश आणि विश्व यांच्या संदर्भात या वर्षभरात घडलेल्या मुख्य घटनांमुळेच संपलेले वर्ष आपल्या लक्षात राहते.

कुठल्याही बाबतीत लक्षणीय असे वैयक्तिक यश मिळवण्यासाठी या वर्षात मी काहीच प्रयत्न केले नाहीत, पण गेल्या तीन चार वर्षांमध्ये माझ्या ब्लॉगवर मी थोडे फार लिहीत होतो त्याची नोंद घ्यावी असे एका समीक्षकाला या वर्षात वाटले आणि त्याने माझ्या ब्लॉगची ओळख लोकसत्ता या प्रमुख दैनिकातल्या त्याच्या स्तंभात करून दिली हे माझ्या दृष्टीने लक्षात राहण्यासारखे आहे. हा स्तंभ वाचून माझा ब्लॉग वाचणा-यांच्या संख्येत भरीव अशी भर पडली नाही, तरीही एकंदर वाचनांच्या संख्येने एक लाखाचा आकडा पार केला, तसेच तो फॉलो करणा-यांची संख्या शंभरावर गेली आणि ती टिकून राहून हळूहळू वाढत आहे. व्यक्तीगत बाबतीत लक्षात येण्याजोगी गोष्ट म्हणजे मुंबईला स्थाईक झाल्यानंतर प्रथमच मी वर्षभरातला जास्त काळ मुंबईच्या बाहेर पुण्याला राहिलो.

कौटुंबिक पातळीवर पाहता आमच्या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि सर्वांना प्रिय असलेला आमचा मोठा भाऊ (प्रभाकर) या वर्षी आम्हाला सोडून गेला ही अत्यंत दुःखद घटना घडली. त्या घटनेच्या थोडेच दिवस आधी तो काहीसा अचानक पुण्याला आला होता आणि काही दिवस राहिला होता. त्या काळात आम्ही त्याला भेटून आलो आणि अनेक वर्षांनंतर त्याच्या सहवासात काही वेळ आनंदात घालवू शकलो ही त्यातल्या त्यात थोडी समाधानाची गोष्ट घडली. सन २०१२ च्या सुरुवातीला जानेवारी आणि फेब्रूवारी महिन्यात अलका बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहून आली होती आणि आता वर्षाच्या अखेरीलाही ती पुन्हा काही दिवस इस्पितळात राहून आताच परत आली आहे. गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी माझा पुतण्या, त्याची पत्नी आणि लहान मुलगी यांच्या गाडीला मोठा अपघात झाला. दैवी कृपेने आणि आमच्या सुदैवाने त्यांना झालेल्या दुखापती त्या मानाने कमी आहेत.

मी कॉलेजमध्ये शिकत असतांना माननीय बाळासाहेब ठाकरे आणि सुपरस्टार राजेश खन्ना ही दोन नावे अचानक पुढे आली आणि त्यांनी अल्पावधीतच आपापल्या क्षेत्रात थेट शिखर गाठले. त्या काळात हे दोघेही त्या जमान्यातल्या बहुसंख्य युवकांप्रमाणेच माझेही आयडॉल झाले होते. पं.रविशंकर, संगीतकार रवी, ज्येष्ठ नट ए के हंगल आणि यश चोप्रा यांच्याबद्दल मनात आपलेपणा नसला तरी त्यांच्यामुळे मला आनंदाचे चार क्षण मिळाले होते याबद्दल कृतज्ञता आणि आदरभाव होता. या सर्वांनी जगाचा निरोप घेतला. ही सारी पिकली पाने होती तरीही त्यांच्यापैकी माननीय बाळासाहेब आणि यश चोप्रा मात्र अखेरपर्यंत कार्यरत होते, बाकीच्या लोकांचे जीवितकार्य पूर्ण होऊन ते अस्तंगत झालेले होते. पण आजच्या आवडत्या कलाकारांमधल्या आनंद परांजपे यांच्यी अपघाती निधनाचे वृत्त काळजाला चर्र करणारे होते.

गेल्या कित्येक वर्षात न घडलेली एक गोष्ट २०१२ मध्ये घडली. एका नराधमाला त्याच्या दुष्कृत्याबद्दल झालेल्या फाशीचे देशभरात सर्वांनी उत्स्फूर्तपणे जल्लोश व्यक्त करून समाधान व्यक्त केले. या वेळी प्रसारमाध्यमांनी त्या बातमीला भरपूर प्रसिध्दी दिली आणि समाजाने व्यक्त केलेल्या उन्मादाला उचलून धरले. मानवतावादाच्या नावाखाली गुन्हेगारांना पाठीशी घालणा-यांचे तुणतुणे या वेळी ऐकवले नाही. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याच्या घटना मागील वर्षात वाढत गेल्या ही गोष्ट जनता जागृत होत असल्याचे सुचिन्ह मानता येईल, पण विशेषतः दिल्लीमध्ये त्यांना जे रूप येत चालले आहे ते थोडे काळजी वाटण्यासारखे आहे.  

आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये अमेरिका आणि रशीया या महासत्तांच्या देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि अनुक्रमे ओबामा व पुतिन हे पुन्हा निवडून आले. चार वर्षांपूर्वी अमेरिकेत झालेल्या निवडणुकीच्या काळात मी अमेरिकेत होतो आणि ओबामा यांची वक्तव्ये, मुलाखती वगैरे लक्ष देऊन टीव्हीवर पहात होतो. मि.पुतिन यांनी भारताला भेट दिली असतांना ते बीएआरसीमध्ये आले होते तेंव्हा मी त्यांना दुरूनच प्रत्यक्ष पाहिले होते. यामुळे त्यांच्या फेरनिवडणुकांकडे माझे लक्ष होते. नव्याने महासत्ता झालेल्या चीनमध्ये सत्तेत बदल झाला, पण ना पहिल्या राष्ट्रप्रमुखाबद्दल मला काही माहिती होती आणि नव्या नेत्याचे नावही ऐकले नव्हते. दक्षिण कोरियात आता एक महिला प्रमुखपदावर आली आहे. एवढे सोडल्यास जगातली शांत राष्ट्रे शांत राहिली आणि अशांत राष्ट्रे धुमसतच राहिली. गेल्या वर्षभरात त्यात फारसा बदल जाणवला नाही.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज काही ना काही नवनवे चाललेले असते पण त्याची वार्ता आपल्यापर्यंत पोचत नाही. क्युरियॉसिटी हे अमेरिकेचे यान मंगळ ग्रहावर जाऊन उतरले आणि हिग्ज बोसॉन किंवा गॉड्स पार्टिकल या मूलकणाचे रहस्य उलगडण्यात किंचित प्रगती झाली या प्रसिध्द झालेल्या मोठ्या बातम्या होत्या.

शेवटी गेल्या वर्षात मी वेगळे असे काय सुरू केले याचा विचार केल्यास
१.नियमितपणे प्राणायाम आणि काही बैठे व्यायाम करत राहिलो.
२.इंटरनेट बँकिंग समजून घेतली आणि घरी बसून निरनिराळी बिले भरली
३.फेसबुकवर वारंवार जाऊ लागलो.

तर आता सन २०१२ ला निरोप देऊन सन २०१३चे स्वागत !

हे नवीन वर्ष सर्वांना सुखसमृध्दीआयुरारोग्यदायक ठरो अशा शुभेच्छा.

एक पुस्ती  ..............................................................................
माझी ब्लॉगगिरी
मराठीत ब्लॉग लिहिणा-यातल्या पहिल्या शंभरजणांमध्ये एक मीही होतो. त्या पहिल्या शंभर अनुदिनींमधला 'आनंदघन' हा माझा ब्लॉगरवरचा ब्लॉग अजून चालत आहे आणि मी त्यावरच नवे लेखन करतो. त्याखेरीज मी वर्डप्रेसवर दोन नवीन ब्लॉग सुरू केले. मला मिळालेल्या पत्रांमधून किंवा मी आंतर्जालावर शोधून काढलेल्या माहितीमधून मला आवडलेली किंवा महत्वाची वाटलेली अशी माहिती मी 'शिंपले आणि गारगोट्या' या ब्लॉगवर देत असतो. माझ्या आनंदघन या ब्लॉगवरले काही जुने निवडक लेख पुनर्संपादन करून मी 'निवडक आनंदघन' या ब्लॉगवर चढवतो. या ठिकाणी त्यांची विषयानुसार वर्गवारी केलेली असल्यामुळे त्यांना शोधणे सोपे आहे.
हे रिकामपणाचे उद्योग जरी मी स्वांत सुखाय करत असलो तरी हे लिखाण कोणी तरी वाचावे ही इच्छा मनात असतेच. किती लोकांनी या ब्लॉगांच्या पानांवर टिचक्या मारल्या याची गणना आजकाल होते. आनंदघन लिहायला लागून सात वर्षे झाली असली तरी वाचनांची मोजदाद गेल्या २-३ वर्षांपासूनच सुरू झाली. बाकीचे ब्लॉग त्यानंतर सुरू केले. या तीन्ही ब्लॉगांना गेल्या वर्षांमध्ये आणि एकंदर किती भेटी दिल्या गेल्या हे खाली दिले आहे.
ब्लॉगचे नाव           सन २०१२     एकूण भेटसंख्या
आनंदघन               ४०६६५       ११३६२६             
शिंपले आणि गारगोट्या    ८८८५        २४१७१
निवडक आनंदघन        १२८७०        २३६३१   
या ब्लॉग्जचे पत्ते असे आहेत.
http://anandghan.blogspot.in/ .....  'आनंदघन'
http://www.anandghare.wordpress.com   ........ शिंपले आणि गारगोट्या
http://www.anandghare2.wordpress.com .......  निवडक आनंदघन

याखेरीज मी अलीकडे ब्लॉगरवर एक नवा ब्लॉग सुरू केला आहे. वैद्यकीय माहिती, समजुती, गैरसमजुती, वावड्या, प्रचार वगैरे सगळ्या प्रकारचा जो मजकूर आपल्यावर येऊन आदळत असतो तो बहुधा इंग्रजी भाषेत असतो. तो या ठिकाणी वाचायला मिळेल.
http://abghare.blogspot.in/ ...........  Good Klostrol Bad Choklet

No comments: