Tuesday, October 30, 2012

चंद्राची गाणी - भाग १ - बालगीते

काल कोजागरी पौर्णिमा होऊन गेली. त्या निमित्य झालेले खास चंद्रगीतांचे दोन कार्यक्रम काल आणि परवा रात्री पाहिले. यावरून मला आठवले की या ब्लॉगच्या सुरुवातीलाच 'तोच चंद्रमा नभात' या नावाची एक दीर्घ मालिका मी ३३ भागात लिहिली होती. तिच्या अखेरीस 'चंद्र' या विषयावरील किंवा चंद्राचा उल्लेख असलेली बरीचशी गाणी मी जमवली होती. तिचा संग्रह पुन्हा उघडून पाहिला आणि त्यातली काही निवडक गाणी तसेच त्यात नसलेली पण काल परवा ऐकलेली चांगली गाणी या ब्लॉगवर द्यायचे ठरवले. त्याचा हा पहिला भाग.
आपल्या तान्ह्या बाळाला झोपवण्यासाठी थोपटता थोपटता त्याची आई गुणगुणते.

लिंबोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई ।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।

गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई ।
परसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई ।
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई ।।

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी ।
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी ।
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई ।।

रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती ।
स्वप्‍न एक उधळून गेले माय लेकराची नाती ।
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई ।।

मधुसूदन कालेलकर हे तसे पाहता गद्य लेखक, नाटककार, पटकथाकार वगैरे म्हणून नावाजलेले आहेत, पण बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातली ही अंगाई ऐकत ज्या मुली मोठ्या झाल्या त्या आता माता झाल्या आहेत आणि त्यांच्या लहानग्या मुलांना हे गाणे ऐकवत थोपटतांना मी त्यांना पाहिले आहे.

थोपटून थोपटून बाळ झोपी गेल्यावर सुध्दा आईचं लक्ष त्याच्याकडे असतंच. त्याला झोपेतच मंद मंद हंसतांना पाहून ती म्हणते,

चांद मोहरे, चांदणे झरे, झोपेतच गाली असा, हसशी का बरे ?

गगनातील नील परी, उतरुनीया भूमीवरी ।
उचलुनीया नेती तुला, उंच काय रे ?

उंच उंच गगनी तुला, काय दिसे सांग मुला ?
दिसते का हळू विमान, एक संचरे ?

बसून आत कोण हसे, कुशल कुणी तरूण पुसे ?
खचितच तेच प्राणनाथ, सांगू काय रे ?

जाग जरा नीज सोड, पापा दे मजसी गोड ।
फिरुनी जाय लंघुनीया, सात अंबरे ।।

लहान बाळाच्या कल्पनाविश्वात काय काय दडलेले असेल आणि त्यातले काय त्याच्या स्वप्नात येत असेल कोण जाणे, पण लहान मुलांच्या गोष्टीतल्या नीलपरीचा आधार घेऊन आईचे मन बाळाच्या वतीने आभाळात उंच भरारी घेते आणि तिथेही तिला तिचा प्राणनाथ दिसतो. अशी कल्पना कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांनी केली आहे. याच गदिमांनी अजरामर झालेले गीतरामायण लिहिले. त्यातली श्रीरामाची आई कौसल्यामाई आपल्या तान्हुल्या रामचंद्राचे किती कौतुक करते यावर त्यांनी एक पूर्ण गीत लिहिले आहे.

सावळा गं रामचन्द्र माझ्या मांडीवर न्हातो। रक्तगंधाचा सुवास निळ्या कमळाला येतो।।

या गीतात चंद्राचा उल्लेख दोन जागी आला आहे. एका ओळीत ती माउली म्हणते,

सावळा गं रामचन्द्र रत्नमंचकी झोपतो। त्याला पाहता लाजून चन्द्र आभाळी लोपतो।।

निजलेल्या रामचंद्राला पाहून आभाळातला चंद्र लाजून ढगाआड लपून बसतो पण रामचंद्राला पहायला जेंव्हा चंद्र ढगाबाहेर येतो, तेंव्हा तो रामचंद्राच्या नजरेला पडताच त्याला इतका आवडतो की आपल्या हातात चंद्र हवा म्हणून तो हट्टच धरतो. याबद्दल कौसल्या सांगते,

सावळा गं रामचन्द्र चन्द्र नभीचा मागतो। रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो।।

बाळ बोबडे बोल बोलायला लागतं तसे आई त्याला गाणी शिकवायला लागते. गेल्या कमीतकमी तीन पिढ्या एक अत्यंत लोकप्रिय गाणं म्हणत मोठ्या झाल्या आहेत. ते आहे

चांदोबा चांदोबा भागलास कां, लिंबोणीच्या झाडामागे लपलास कां।
लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी।
मामा मामा येऊन जा, तूप रोटी खाऊन जा।
तुपात पडली माशी, चांदोमामा राहिला उपाशी।।

या गाण्यात काय गंमत आहे कोण जाणे. पण त्याची लोकप्रियता पिढ्यान् पिढ्या टिकून आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकरांनी या गाण्याला शाळकरी मुलांच्या अँगलमधून कांही आशय देण्याचा प्रयत्न केला आहे तो अशा प्रकारे

चांदोमामा चांदोमामा भागलास काय ? घरचा अभ्यास केलास काय ?
चांदोमामा चांदोमामा लपलास काय ? पुस्तक हरवून बसलास काय ?
चांदोमामा चांदोमामा रुसलास काय ? गणितात भोपळा घेतलास काय ?

एके काळी गृहपाठ न करणे, पुस्तक हरवणे, गणीतात शून्य मार्क मिळवणे वगैरे गोष्टींची मुलांनी खूप भीती वाटायची. चांदोबाच्या पळपुटेपणाच्या आणि लपून बसण्याच्या मागे यातलेच काही कारण असावे असा तर्क या गाण्यात आहे.

लहान मुलांना सगळ्यात प्रिय खाऊ म्हणजे चॉकलेट. त्याचाच बंगला बांधला तर त्याच्या आजूबाजूला कसले दृष्य असेल? त्याची कल्पना फुलवतांना मजा आणण्यासाठी चांदोबाही लागतोच.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला । चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ।।
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार । शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार ।।
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन । हेलो हेलो करायला छोटासा फोन ।।
बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार । पेपेरमींटच्या अंगणात फूल लाल लाल ।।

यानंतर त्या बंगल्याची कल्पना फुलवतांना त्यात मजा आणण्यासाठी चांदोबाही लागतोच.

चांदीच्या झाडामागे चंदोबा रहातो । छोट्याश्या फुलाशी लपाछपी खेळतो ।।
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला । मैनेचा पिंजरा वर टांगला ।।
किती किती सुंदर चॉक्लेटचा बंगला ?

कधी कधी मुलाचा सख्खा मामा त्याला हंसत खेळत बाराखडी शिकवण्यासाठी अ आ आई म म मका, मी तुशा मामा दे मला मुका ।। हे गाणं म्हणतो त्यातसुध्दा चांदोमामा पाहिजेच

प प पतंग आभाळात उडे। ढ ढ ढगात चांदोमामा दडे।।

एखादी चिमुरडी पोर एक गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान वहिनी आणण्यासाठी आपल्या दादाच्या मागे लागते. या खास वहिनीला घरी कशी आणायची?

वहिनीला बसायला चांदोबाची गाडी । चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी ।
हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान। ..... असा सगळा तिचा थाटमाट!

दुसरी एक छकुली चन्द्राला ( किंवा चन्द्रिकेला) चंदाराणी म्हणते आणि विचारते

चंदाराणी, चंदाराणी, कां ग दिसतिस थकल्यावाणी ?

शाळा ते घर घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा,
रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी?

वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई।
म्हणुनिच कां तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी।।

चंद्राला कोणी चंदाराणी म्हणते तर कोणी चंदाराजा म्हणत बोलावते,

चंदाराजा ये ये, चंदाराजा ये ।।

निळ्या निळ्या आभाळात, लखलखत्या चांदण्यात ।
शुभ्र रुपेरी रथात, बसुनि इथे ये ।।

शुभ्र रुप्याची गाडी, पळवी सशाची जोडी ।
दूर करुन अंधारा, उजळित नभ ये ।।

या इथे नि तुजवाचुन, व्याकूळ हो तूच जाण ।
एक दिनी मनोरथा, पुरविण्यास ये।।

आपल्या घरामध्येच गोजिरवाणे हंसरे तारे असतांना आभाळातल्या चांदण्या पहायची गरजच कुठे आहे असं विचारीत एक आई म्हणते,

घरात हंसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे ? असा प्रश्न विचारून ती पुढे असे सांगते.

गोकुळ येथे आनंदाचे, झरे वाहती शांतिसुखाचे ।
वैभव पाहुन मम सदनीचे ढगाआड गं चंद्र दडे ।। मी पाहू कशाला नभाकडे ?



आमच्या लहानपणी शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये पहिली कविता होती

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो ।
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे ।

आणि शेवटी

इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील ।।

शालेय शिक्षणाची सुरुवात अशा सुंदर आणि सकारात्मक विचाराने व्हायची.

Saturday, October 27, 2012

को जागर्ती ? .... कोजागिरी पौर्णिमा

को जागर्ती ?

आजकाल रात्र पडली तरी घरात आणि घराबाहेरही विजेच्या दिव्यांचा झगमगाट असतो. त्यामुळे सगळे लोक हिंडून फिरून आणि बाजारहाट किंवा इतर कामे आवरून सावकाशपणे घरी परततात. जेवणे खाणे वगैरे आटोपून झोपी जाईपर्यंत रात्रीचे दहा अकरा तरी वाजतातच. बाकीचे सगळे झोपायला गेले असले तरी काही जणांना झोप येत नाही. त्यातला कोणी टीव्हीवर एकादी मालिका बघत बसतो तर कोणाला परदेशात चाललेली क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच पहायची असते, कोणाला इंटरनेटवर सर्फिंग करायचे असते नाहीतर वॉट्सअॅप किंवा फेसबुकवर रेंगाळत रहायचे असते. मुलांना सेलफोन किंवा टॅबलेटवर गेम्स खेळायचे असतात. त्यामुळे बाकीचे सगळे झोपले तरी त्यातला एकादा जागत राहतो किंवा हळूच उठून टीव्ही किंवा काँप्यूटर लावतो. त्यातून निघणारे आवाज आणि उघडझाप करणारे प्रकाशझोत यामुळे झोपमोड झालेला एकादा माणूस वैतागून उठतो आणि ओरडतो "कोण तो अजून जागतो आहे ? (को जागर्ती ?)" त्यानंतर त्या जागणा-याच्या आणि ओरडणा-याच्या वयानुसार पुढील संवाद ठरतात. जागणारा लहान मुलगा असल्यास "आता झोप पाहू मुकाट्याने, उद्या सकाळी शाळेला जायचं आहे ना?" असा दम दिला जातो आणि मोठी व्यक्ती असल्यास "काय मेली कटकट, सुखानं झोपावं म्हंटलं तर तेवढं सुख सुध्दा आमच्या नशीबात कुठं आलंय्?" किंवा "आता कृपा करून आम्हाला जरा झोपू देता का?" असे काही तरी बोलले जाते. त्यामुळे 'को जागर्ती ?' हा प्रश्न आता त्रासिकपणाचाच झाला आहे.

पूर्वीच्या काळातली परिस्थिती वेगळी होती. रात्रीच्या वेळी घराबाहेर चहूकडे अंधारगुडुप व्हायचा. सूर्यास्त होण्याच्या आधीच सगळी कामे आणि खेळबीळ संपवून फक्त मुलीच नव्हे तर मुले आणि मोठी माणसेसुध्दा 'सातच्या आत घरात' येऊन जायची. त्यानंतर मुलांनी शुभंकरोती कल्याणम्, परवचे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा, इतर श्लोक, स्तोत्रे वगैरे म्हणायची, देवाला आणि घरातल्या सगळ्या मोठ्यांना वाकून नमस्कार करायचा. तोपर्यंत रात्रीचे जेवण तयार झालेले असायचे. ते खायचे आणि पथा-या पसरायच्या. रात्रीच्या काळोखात घराच्या बाहेर पडायची सोय नव्हती. गावातील ठिकठिकाणच्या झाडांवर मुंजा, हडळ, पिशाच वगैरे अतृप्त आत्मे दबा धरून बसलेले असायचे आणि त्यांच्या तावडीत कोणी एकटा दुकटा सापडला तर मग त्याची खैर नाही अशी भीती दाखवली जायची. पावसाळ्यात चमकणा-या विजा आणि ढगांचा गडगडाट यामधून या समजांना जास्तच जोर चढत असे. यामुळे रात्र पडली की लोक दरवाजे खिडक्या घट्ट बंद करून घ्यायचे. बाहेर काय चालले आहे याची त्यांना शुध्द नसायची.

पण आषाढात जोरात सुरू झालेला पाऊस श्रावणात कमी होऊन 'क्षणात येते सरसर शिवरे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असा येत जात रहायचा आणि भाद्रपदानंतर तो जवळ जवळ संपून जात असे. त्यानंतर येणा-या आश्विन महिन्यात पिठूर चांदणे पडायचे. प्रतीपदेपासून हळूहळू वाढत जाऊन पौर्णिमेला निरभ्र आकाशात पूर्ण चंद्र दिसायचा. त्याचे दर्शन अत्यंत विलोभनीय असायचे. पण निसर्गाचे हे अद्भुत रूप पहाण्यासाठी आधी लोकांनी जागे तरी रहायला हवे ना ! यासाठी एक मजेदार अशी कथा सांगितली जात असे. त्या कथेनुसार आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला रात्री प्रत्यक्ष लक्ष्मी देवी पिठूर चांदण्यामधून पृथ्वीतलावर येते आणि घरोघरी जाऊन "को जागर्ती ?" असे विचारते. तिला जो कोणी माणूस जागा दिसेल त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला ती भरपूर संपत्ती देते. ही संपत्ती मिळण्याच्या आशेने सगळे लोक त्या रात्री उशीरापर्यंत जागत राहिले आणि त्यांना निसर्गसौंदर्याच्या संपत्तीचा लाभ होत गेला. लोकांनी जागत राहून वेळ घालवण्यासाठी चांदण्यात एकत्र बसून गाणी म्हणायची, खेळ खेळायचे वगैरे सुरू केले. या दिवसात चांगले दूधदुभते मिळते. त्यामुळे आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून सर्वांनी ते प्राशन करायचे वगैरे परंपरा पडत गेल्या. 'को जागर्ती ?' या वाक्यावरून या पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' असे नाव पडले आणि हा दिवस साजरा करायची एक सुंदर प्रथा पडली.

--------------------------------------------------------------------------------

Monday, October 15, 2012

घटस्थापना

उद्याच्या घटस्थापनेपासून नवरात्र सुरू होत आहे. माझ्या आधीच्या पिढीपर्यंत बहुतेक लोक संयुक्त कुटुंबांमध्ये रहात असत. प्रत्येक घरी पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेले त्यांच्या घराण्याचे कुलाचार पाळले जात. त्यात आश्विन महिन्यातल्या देवीच्या नवरात्राला मोठे महत्व असायचे. काहीही झाले तरी हे नवरात्र व्यवस्थितपणे पाळले गेले पाहिजे याचा विचार करून त्यानुसार इतर कोणतेही कौटुंबिक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम ठरवले जात असत. आता कुटुंबे विभक्त झाल्यानंतरही कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या (बहुधा सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या) घरी नवरात्र बसवायचे आणि कुटुंबातील इतर लोकांनी शक्य तो एक दोन दिवसासाठी तिथे जाऊन देवीचे दर्शन घेऊन यायचे, तिला नवस करायचे आणि ते फेडायचे वगैरे अनेकांच्या घरी चालत असलेले दिसते.

आश्विन शुध्द प्रतीपदेच्या दिवशी सकाळी घटस्थापना करून या नवरात्राची सुरुवात केली जाते. पुढील नऊ दिवस देवीजवळ नंदादीप तेवत ठेवतात. रोज देवीची पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य वगैरे विधी शक्यतो यथासांग केले जातात. ललितापंचमी, अष्टमी वगैरे काही खास दिवशी जास्तीचे कार्यक्रम असतात. अष्टमीच्या रात्री शिजवलेल्या भाताच्या उकडीपासून देवीचा मुखवटा बनवून त्याच्या समोर घागरी फुंकतात. नऊ दिवस रोजच्या पूजेसाठी निरनिराळ्या रंगाची वस्त्रे आणि फुले देवीला अर्पण करतात. आजकालच्या महिला स्वतःच रोज निरनिराळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेसेस परिधान करतात. या सगळ्यात त्या घटाची कोणाला आठवण किंवा माहिती असते कोण जाणे.

घटस्थापना याचा शब्दशः अर्थ (मातीच्या) घटाची स्थापना करणे असा होतो. गेल्या शतकात घटाचे महत्व कमी होत गेले आहे. पण मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्यापासून ते अगदी कालपरवापर्यंत म्हणजे त्या हजारो वर्षांच्या कालखंडात मातीपासून तयार केलेल्या पात्रांना अनन्यस्धारण महत्व होते. जेंव्हा मनुष्यप्राण्याने शेतीभाती करून घरात रहायला सुरुवात केली तेंव्हापासून त्याला अन्नधान्य, दूधदुभते आणि इतर आवश्यक वस्तूंचा संग्रह करण्याची गरज पटायला लागली. त्यासाठी लाकूड, माती यासारख्या सुलभपणे उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून टोपल्या, खोके, गाडगी, मडकी, रांजण वगैरे तो तयार करू लागला. लोह, ताम्र इत्यादी घातूंची निर्मिती सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात त्यांची पात्रे बनू लागली, पण सर्व लोकांना मातीच सहजपणे उपलब्ध असल्यामुळे तिचा उपयोग होत राहिला. जगाच्या पाठीवरील सर्व ठिकाणच्या उत्खननामधून निघालेल्या प्राचीन अवशेषांमध्ये खापरांचे तुकडे सापडतात. आजसुध्दा खेड्यामधील गरीबांच्या घरात मातीची मडकी, घडे वगैरे असतात आणि शहरातील श्रीमंतांच्या घरात सुध्दा चिनी मातीची सुबक पात्रे आणि शोभेच्या वस्तू ठेवलेल्या असतात.


अग्नी आणि चाक यांचे शोध हे मानवाच्या प्रगतीमधील अत्यंत महत्वाचे टप्पे मानले जातात. मातीपासून घटांचे उत्पादन करण्यात या दोन्हींचा उपयोग केला जातो. कुंभार आपले चाक गरागरा फिरवून मातीच्या गोळ्याला गोलाकार देतो आणि त्या कच्च्या मडक्याला भट्टीत भाजून कठीण आणि टिकाऊ बनवतो. त्यात आपले कौशल्य पणाला लावून कुंभारांनी त्यांना सुबक आकार दिले आणि खास प्रकारच्या मातीचा उपयोग करून आकर्षक रंग आणि इतर गुणधर्म देऊन त्यांचे रांजण, सुरया वगैरे विविध रूपे त्यांना दिली. ही प्रगती हजारो वर्षांपासून होत राहिली आहे.

लोखंड, तांबे, पितळ आदी धातूंचा पत्रा बनवून त्यांची पात्रे तयार करण्यात आली, पण या धातूंची अन्नपदार्थांबरोबर रासायनिक क्रिया होत असल्यामुळे स्वयंपाकघरात त्यांचा उपयोग जपून करावा लागतो. विशेषतः दही, ताक यासारखे दुग्धजन्य पदार्थ त्यात ठेवता येत नाहीत. गेल्या शतकात आलेल्या अॅल्युमिनियम आणि स्टेनलेसस्टीलच्या भांड्यामुळे आता ही परिस्थिती बदलली आहे. पण तोपावेतो त्यासाठी मातीच्या घटांचाच उपयोग केला जात असे. कृष्णावतारात त्याचे बालपण गोकुळात गेल्यामुळे, गोप, गोपिका आणि दहीदूधलोणी या सर्वांना महत्व प्राप्त झाले आणि त्याबरोबर घटांना सुध्दा साहित्यात वेगळे अजरामर स्थान लाभले.

हे सगळे असले तरी घट आणि देवीचे नवरात्र यांचा संबंध कुठे येतो हा प्रश्न राहतोच. नवरात्र बसवतांना देवीच्या सोबत जसा नंदादीप लावतात, तसा एक मातीचा घटसुध्दा ठेवायची पध्दत असावी. नंदादीपामधून ज्योतीची आराधना होते आणि घटाचा आकार आकाशासारखा गोल असतो त्यातून आकाशाचे प्रतिनिधित्व होते असा काहीसा विचार यामागे असावा. आजकाल नवरात्र म्हणजे गरबा, दांडिया, रास असे नवे समीकरण झाले आहे. गुजराथमधून आलेल्या या उत्सवात मात्र घटाला (किंवा घटांना) सुंदर रंगरंगोटी करून छानसे सजवलेले असते. त्यासभोवती फेर धरून नाचतांना 'मुन्नी बदनाम हुई' किंवा 'हलकट जवानी' यासारखी अभिरुचीहीन गाणी लाऊडस्पीकरवर वाजवतात हे त्यांचे आणि आपले दुर्दैव.

Thursday, October 11, 2012

महर्षी धोंडो केशव कर्वे



'दगड्या', 'धोंड्या', 'काळ्या' असले एकादे खत्रुड नाव मुलाला ठेवले तर काळसुध्दा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाही आणि त्यामुळे त्याला दीर्घायुष्य मिळेल अशी एक अजब समजूत पूर्वीच्या काळी प्रचलित होती. लहान मुलांनी नमस्कार केल्यानंतर त्यांना "शतायुषी भव" असा घसघशीत आशीर्वाद दिला जात असे. या दोन्ही समजुतींची प्रचीती एका महापुरुषाच्या बाबतीत आली. मात्र त्याचे नाव विचित्र असूनसुध्दा त्याने आपल्या कर्तृत्वाने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. शंभरावर वर्षे मिळालेल्या आयुष्यात त्यांना उदंड कीर्ती आणि मानसन्मान मिळालेच, पण त्यांनी सुरू केलेले महान कार्य त्यांच्या निर्वाणानंतर सुध्दा जोमाने चालत राहून त्याचा खूप विस्तार झाला आणि त्यातून त्यांचे नाव पुढील शतकानुशतके शिल्लक राहील यात शंका नाही. या महापुरुषाचे नाव आहे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे.

पण हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. ते मिळण्याच्या आधी त्यांनी अत्यंत खडतर तपश्चर्या केली होती, ती नावलौकिक मिळवण्यासाठी नव्हती, तर समाजातील महत्वाच्या घटकाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी. कोकणातल्या एका लहानशा गावी इसवी सन १८५८ मध्ये धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला. तत्कालीन समजुतीनुसार अदृष्य दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी त्यांचे नाव 'धोंडो' असे ठेवले होते. पण हा मुलगा अद्वितीय होता. त्या काळामधील भारतीय लोकांना (त्या काळच्या भाषेत 'एतद्देशीय मनुष्यांना') जेवढे ज्ञान प्राप्त होणे पुरेसे आहे असे मेकॉलेसारख्या साहेबांनी ठरवले होते ते त्यांनी स्थानिक शाळेत जाऊन झटपट शिकून घेतले. त्या काळातली शालांत म्हणजे 'व्हर्नाक्युलर फायनल' ही परीक्षा देण्यासाठी कोकणातील मुलांना मुंबईला जावे लागत असे. बालक धोंडो त्यासाठी मुंबईकडे जायला निघाला, पण तिकडे जाणारी बोट चुकली. त्यामुळे निराश न होता धोंडोने घाटावरील क-हाड की सातारा या शहराची वाट धरली. त्या काळात मोटारी नव्हत्या आणि त्यासाठी लागणारे हमरस्तेही बांधले गेले नव्हते. एका खेड्यापासून शेजारच्या खेड्याकडे जाणा-या पायवाटा किंवा फार तर बैलगाडीच्या चाकोरीमधून इतर वाटसरूंच्या सोबतीने शंभरावर मैल दूर चालत चालत, धो धो पावसात आणि हिेस्र वन्य पशूंची भीती न बाळगता मजल दरमजल करीत ते तिसरे दिवशी क-हाड की साता-याला जाऊन पोचले. त्या ठिकाणच्या शिक्षणाधिका-याने धोंडोची किरकोळ शरीरयष्टी आणि चेहे-यावरील निरागस भाव पाहून त्याला 'अजाण बालक' ठरवले आणि वयाच्या अटीवरून फायनलच्या परीक्षेला बसायची अनुमती दिली नाही. निमूटपणे आपल्या गावी परत येऊन धोंडोपंत अभ्यास करत राहिले आणि यथावकाश मुंबईला जाऊन त्यांनी ती परीक्षा दिलीच, त्यानंतर मुंबईमध्ये राहून हायस्कूल आणि कॉलेजचे शिक्षण घेतले. त्या काळात शाळा, कॉलेज आणि अभ्यास सांभाळून त्यातून वेळ काढून शिकवण्या केल्या आणि त्यातून आपला उदरनिर्वाह केला.

बी.ए. पास झाल्यानंतर मायबाप इंग्रजी सरकारची नोकरी त्यांना सहजपणे मिळू शकली असती, पण त्यांचा कल समाजसेवेकडे होता. त्या काळच्या समाजात रूढी आणि परंपरांच्या नावाने अनेक अनिष्ट प्रथा चालत आल्या होत्या. लहानपणीच मुलांची लग्ने लावून दिली जात होती, धोंडोपंतांचासुध्दा बालविवाह झाला होता. अपमृत्यूंचे प्रमाणही मोठे असल्यामुळे काही दुर्दैवी मुली अज्ञवयातच बालविधवा होऊन जात. त्यांचे केशवपन करून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात असे. उंच माझा झोका ही अलीकडे लोकप्रिय झालेली मालिका आणि काकस्पर्श हा उत्कृष्ट सिनेमा यातून त्या काळातील जीवनाचे थोडे दर्शन घडते. काही समाज सुधारकांनी या रूढींविरुध्द आवाज उठवायला सुरुवात केली होती, पण त्यांची चळवळ लेख, भाषणे, अर्ज विनंत्या या मार्गाने चालली होती. धोंडोपंतांनी प्रत्यक्ष कृतीमधून समाजकार्यात उतरायचे ठरवले.

ते पुण्याला आले आणि लोकमान्य टिळक व आगरकर यांनी सुरू केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजात गणिताचे प्राध्यापक झाले. आपल्याला मिळणा-या वेतनाचा एक भाग फक्त समाजकार्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आणि वैयक्तिक आयुष्यात कुठलीही अडचण आली, कसलीही गरज पडली तरी त्या पैशांना स्पर्श करायचा नाही असे त्यांनी ठरवले आणि हे व्रत कसोशीने पाळले. या स्वतःच्या मिळकतीतून शिल्लक टाकलेल्या निधीत भर टाकण्यासाठी त्यांनी इतर उदार लोकांना आवाहन केले आणि त्यातून जमलेल्या निधीचा फक्त समाजकार्यासाठीच विनियोग केला. सदाशिव पेठेमधील राहत्या जागेत बालविधवांना आश्रय देऊन त्यांनी या कार्याची सुरुवात केली. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवणे हा त्यांचा उद्देश होता. पण तत्कालीन समाजाला तो अजीबात मान्य नव्हता. कर्वे कुटुंब आणि त्या आश्रित महिलांना त्यांनी वाळीत टाकले, त्यांना सन्मानाने जिणे अशक्य केले.

कर्व्यांच्या एका सुधारक मित्राने यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना शहराबाहेर हिंगणे इथे त्यांना जमीन देऊ केली. त्यावर एक पर्णकुटी बांधून त्यात कर्व्यांनी त्या पीडित महिलांसाठी आश्रम सुरू केला. त्या आवारातच पुढे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वसतीगृहे वगैरे सुरू करत गेले. १८९६ साली त्यांनी सुरू केलेली स्त्रीशिक्षणसंस्था आजवर कार्यरत आहे आणि तिचा पसारा अनंतपटीने वाढला आहे. या संस्थेच्या साठ शाखा असून त्यात २५००० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. पूर्वप्राथमिक पातळीपासून स्नातकोत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) शिक्षणापर्यंत आणि अनेक शाखांमधून ते शिक्षण घेण्याची व्यवस्था या संस्थेकडून केली जाते. त्यात इंजिनियरिंग, आर्किटेक्चर आणि फॅशन डिझाईनसारख्या आधुनिक विषयांमधील शाखांचा समावेश आहे. महर्षी कर्वे यांनीच पुढाकार घेऊन एस.एन.डी.टी. युनिव्हर्सिटी हे भारतातले पहिले खास महिलांचे विश्वविद्यालय सुरू केले होते. कालांतराने ते मुंबईला नेले गेले. त्याच्या शाखासुध्दा अनेक ठिकाणी पसरल्या आहेत.


दुर्दैवाने धोंडोपंताच्या पत्नीचे अकाली निधन झाले. त्या काळच्या प्रथेनुसार त्यांच्या दुस-या विवाहासाठी स्थळे सांगून येऊ लागली होती. पण पुनर्विवाह केला तर तो विधवेशीच करायचा असे त्यांनी पक्के ठरवले होते. त्यांच्या एका मित्राची बहीण बाया अनाथ बालविधवा झाली होती. धोंडोपंतांशी विवाह करून बाया कर्वेंनी त्यांच्या जीवनात प्रवेश केला. कर्वे यांची पत्नी होणे हे सुध्दा अग्निदिव्य होते. ते तर दिवसरात्र आपल्या कार्यात मग्न असत. घर चालवणे आणि मुलांना मोठे करणे सर्वस्वी पत्नीलाच करावे लागत होते. त्यात फक्त समाजाचाच विरोध नव्हता, तर कर्व्यांच्या घरातील मंडळींचासुध्दा होता. लग्न करून ही दंपती जेंव्हा कोकणातल्या मुरुड या त्यांच्या गावी गेली, तेंव्हा नव्या सुनेचे स्वागत तर झाले नाहीच, गावातील सर्वांनी त्यांच्या घराचे दरवाजे त्यांना बंद केले.


धोंडोपंत आयुष्यभर आपल्या तत्वांवर ठामपणे उभे राहिले होते. त्याचे एक उदाहरण असे आहे. त्याच्या विम्याची मुदत संपल्यावर त्याचे जे पैसे त्यांना मिळणार होते ते त्यांनी उदारहस्ते आपल्या शिक्षणसंस्थेला देणार असल्याचे जाहीर केले. त्या वेळी त्यांचा मुलगा कॉलेजला जाण्याच्या वयाचा झाला होता. हे पैसे त्याच्या शिक्षणावर खर्च करावे अशी त्यांच्या पत्नीची इच्छा असणे साहजीक आहे. इतर कोणीही तसेच केले असते. पण कर्व्यांचे म्हणणे असे होते की जर त्यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने त्यांनी विमा उतरवला होता. आता ते जीवंत असतांना तशी गरज राहिली नाही, त्यामुळे त्या पैशाचा विनियोग त्यांच्या कार्याकरताच व्हायला हवा. त्याहून त्यांच्या पत्नीला ते पैसे पाहिजेच असतील तर तिने आपला पती निधन पावला आहे असे समजावे, त्यांच्याशी संबंध ठेवू नये आणि तसे जाहीर करावे तरच तिला ते मिळतील.

पत्नी किंवा मुलांबरोबर ते असे कठोरपणे वागत असले तरी समाजावर मात्र त्यांनी कधी राग धरला नाही. समाजाने त्यांचा अनन्वित छळ केला तरी हे लोक अज्ञ आहेत, आपण काय करत आहोत हे त्यांना समजत नाही अशी येशू ख्रिस्तासारखी भूमिका घेऊन त्या समाजाच्या हितासाठीच ते झटत राहिले. संत एकनाथांच्या काळात त्यांनीसुध्दा समानता, विश्वबंधुत्व वगैरेंना धार्मिक समजुतींपेक्षा जास्त वरचे स्थान दिले होते आणि यामुळे तत्कालीन रूढीवादी लोकांचे वैर पत्करले होते. एकदा ते नदीवरून स्नान करून परत येत असतांना कोणी खोडसाळपणे त्यांच्या अंगावर गलिच्छ राड उडवली, त्याच्यावर न रागावता किंवा त्याच्याशी न भांडता एकनाथ महाराज शांतपणे पुन्हा नदीवर जाऊन स्नान करून आले. याची पुनरावृत्ती होत राहिली, पण एकनाथांनी आपला शांतपणा सोडला नाही. अखेर चिखल उडवणाराच कंटाळला. त्याने नाथांची क्षमा मागितली. त्यानर नाथांनी उलट त्याचे आभार मानले आणि तुझ्यामुळे मला आज इतक्या वेळा गोदावरीचे स्नान घडले आणि त्याचे पुण्य लाभले असे सांगितले. महर्षी कर्व्यांची मनोवृत्ती साधारणपणे अशीच होती.

कर्वे यांच्या कामाची महती हळूहळू लोकांना पटत गेली. समाजाची विचारसरणी त्यांना अनुकूल होत गेली. पुराणमतवादी लोकांची पिढी मागे पडून सुशिक्षित आणि उदारमतवादी लोकांची संख्या वाढत गेली. कर्वे यांच्या स्त्रीशिक्षणसंस्थेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक महिलांनी स्वतःला या कार्याला वाहून घेतल्या. त्यांनी केलेल्या प्रगतीमधून आणि त्यांच्या सद्वर्तनातून समाजापुढे चांगली उदाहरणे आली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने त्यांची आणि समाजाची अधोगती होईल या जुन्या खोडांनी दाखवलेल्या भीतीमधील हवा निघून गेली. समाजाने कर्व्यांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या सचोटीबद्दल तिळमात्र शंका नसल्यामुळे त्यांना उदारहस्ते देणग्या मिळत गेल्या आणि त्यांनी त्यातली पै न पै त्यांनी सत्कारणी लावली. त्यांची संस्था मोठी होत गेली. अनेक नामवंत त्यांच्या संस्थेला भेट देऊन त्याला सहाय्य देऊन गेले.

अर्थातच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. भारतामधील सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला. ते महर्षी म्हणवले जाऊ लागले. पूर्वीच्या हिंगणे या गावाच्या परिसरालाच कर्वेनगर असे नाव दिले गेले. पुणे शहराचा विस्तार इतका झपाट्याने झाला की एके काळी ओसाड असलेला हा भाग गजबजून गेला आणि पुणे शहराचा एक महत्वाचा भाग झाला. पूर्वीच्या पुणे शहरापासून हिंगणे या खेड्याकडे जाणा-या रस्त्यालाही कर्वे रोड असे नाव दिले आणि आज हा अत्यंत गजबजलेला हमरस्ता झाला आहे. मुंबईमधील मरीन लाइन्सच्या परिसरातील एक मोठा रस्ता त्यांच्या नावाने ओळखला जातो. पुण्यातील कर्वे रस्त्याच्या कडेला या स्त्रीशिक्षणसंस्थेचे मूळ आणि आजचेही मुख्य स्थान आहे. त्यात अनेक शाळा, कॉलेजे आणि हॉस्टेल्स आहेत. महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांची समाधी आहे, तसेच एक स्मारक आहे. कर्वे यांच्या शाळेमधील हजेरीपटापासून ते त्यांना मिळालेल्या भारतरत्न या पदकापर्यंत त्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक वस्तू तेथे मांडून ठेवल्या आहेत. तसेच अनेक छायाचित्रे आणि तैलचित्रांमधून त्याच्या जीवनातील महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकाने हे संग्रहालय अवश्य पहावे आणि त्यामधून स्फूर्ती घ्यावी.





Wednesday, October 10, 2012

आमच्या वैनी



माझे वडील सर्व भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे त्यांची भावंडे त्यांना 'दादा' म्हणत असत आणि त्यांचे नावच 'दादा' असे पडले होते. पूर्वीच्या काळी अशीच पध्दत रूढ होती. घरातले सारे लोक दादा, अप्पा, नाना, ताई, माई, अक्का अशासारख्या उपनावाने संबोधले जात असत, मग ती व्यक्ती नात्याने काका, मामा, मावशी, आत्या, माता, पिता वगैरे कोणी का असेना ! दादांची पत्नी म्हणून माझ्या आईला 'वहिनी' म्हंटले जात असे. 'वहिनी' या शब्दाचा 'वयनी', 'वैनी' असा अपभ्रंश होऊन अखेर 'वैनी' हेच त्यांचे नाव पडले. माझ्या काकूंना मात्र त्यांच्या मुली 'ताई' म्हणत आणि आम्ही मुले नात्याप्रमाणे 'काकू' किंवा 'मामी' म्हणत होतो.

आमच्या वैनींचा जन्म मध्यप्रदेशातल्या होशंगाबाद या गावी झाला होता. त्या लहान असतांनाच त्यांचे काका त्यांना जमखंडीला घेऊन आले आणि कालांतराने लग्न होऊन त्या तिथेच राहिल्या. ही हकीकत मला माहीतसुध्दा नव्हती. त्या माझ्याकडे मुंबईला रहात असतांना एकदा रेशनिंगचा किंवा खानेसुमारीचा असा कोणतासा फॉर्म भरण्याच्या वेळी मला ते कळले. माझ्या लहानपणापासून वैनींच्या माहेरचे कोणीच सख्खे नातेवाईक नव्हते. त्यांचे एक चुलत भाऊ जमखंडीलाच रहात होते ते गोविंदमामा तेवढे चांगल्या परिचयाचे होते. त्यांच्या घरी आमचे नेहमी जाणे येणेही होत असे. त्या मामांचे सख्खे भाऊ आणि बहिणी परगावाहून अधून मधून कधी जमखंडीला आले तर आम्हालाही भेटून जायचे त्यामुळे ते परिचयाचे होते. आमच्या वैनी आणि (त्यांच्यासोबत मी) माहेरपणासाठी कुणाकडे आठ दहा दिवस जाऊन राहिल्याचे मात्र मला आठवत नाही. 'धुरांच्या रेघा' हवेत काढणाऱ्या 'झुकुझुकुगाडी'त बसून 'पळती झाडे' पहात 'मामाच्च्या गावाला' जाण्याचे भाग्य मला तरी कधीच लाभले नाही. वैनींनी आपणहून सहसा कधी त्यांच्या माहेरच्या लोकांचा विषय काढला नाही की घरातील इतरांच्या बोलण्यात तो कधी आल्याचे मला आठवत नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्या ९९.९९ टक्के सासुरवाशीण झाल्या होत्या. आमच्या काकूंची गोष्ट वेगळी होती. त्यांचे माहेर गावातच होते आणि अधूनमधून त्या तिकडे जाऊन काही दिवस राहून येत असत. त्यांच्या बोलण्यातही नेहमी त्यांच्या माहेरकडल्यांचे कौतुक येत असे.

मी लहान असतांना आमचे दादा नोकरीमुळे परगावी रहात असत. त्यामुळे आमच्या एकत्र कुटुंबाची सगळी व्यवस्था पाहण्याची जबाबदारी वैनींच्यावर असे आणि ती गोष्ट त्या अत्यंत कौशल्याने आणि सक्षमपणे करत होत्या. मोठ्या एकत्र कुटुंबातल्या लोकांच्या निरनिराळ्या पसंती, आवडीनिवडी असतात. प्रत्येकाचे वेगळे स्वभाव, टेंपरामेंट असतात, मानापमानाच्या वेगळ्या कल्पना असतात. त्या सर्वांची मर्जी राखून, गोडीगुलाबीने पण परंपरेनुसार योग्य त्या रीतीने सगळ्या गोष्टी करवून घ्यायच्या ही तारेवरची कसरत करणे वैनींना जमत असे. यासाठी ते काम करणारा माणूस एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी आणि अहम् (इगो) यांना थोडा वेळ बाजूला ठेवणे. बहुतेक वेळी वैनी हेच करत होत्या. पण गरज पडल्यास त्या खंबीरपणाही दाखवत असत. 

पू्वी आमच्या घरातल्या संयुक्त कुटुंबामधील सदस्यांची संख्या बरीच होती, शिवाय परगावाहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रमाणही बरेच होते. गावात कोणा आप्ताचे घर असतांना हॉटेलात जाऊन राहणे किंवा जेवणे याची त्या काळात कल्पनाही केली जात नव्हती. त्यामुळे त्या सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आमच्या स्वयंपाकघरातूनच केली जात असे. गॅस, कूकर, मिक्सर, ओव्हन यासारखी वेळ आणि कष्ट वाचवणारी साधनेही तेंव्हा उपलब्ध नव्हती. 'रेडी टु ईट' असे तयार खाद्यपदार्थ किंवा एमटीआरचे सेमीकुक्ड प्रॉडक्ट त्या काळी बाजारात मिळत नव्हते. कच्च्या मालापासून सुरुवात करून सर्व पाकक्रिया घरीच करावी लागत असे. त्यामुळे गृहिणींचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरात राबण्यातच जात असे.

स्वयंपाकातले कलाकौशल्य वैनींना अवगत होतेच, त्यातले विज्ञान त्यांना चांगले समजले होते आणि त्याचा उपयोग करून त्यातील तंत्रज्ञानाचा त्या कुशलपणे उपयोग करून घेत होत्या. वहन, अभिसरण आणि उत्सर्जन (कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन) या तीन प्रकाराने ऊष्णता इकडून तिकडे जात असते याचे ज्ञान त्यांनी थर्मोडायनॅमिक्स विषयाच्या पुस्तकात वाचले नव्हते आणि त्यातली समीकरणे मांडून ती सोडवणे त्या शाळाकॉलेजात जाऊन शिकल्या नव्हत्या. पण या सर्वांचा उत्तम अंदाज त्यांना अनुभवाने आला होता. कच्च्या मालापासून कोणताही खाद्यपदार्थ तयार करतांना त्याला तव्यावर किंवा प्रत्यक्ष आगीत घालून भाजणे, उकळत्या पाण्यात बुडवून ठेवून किंवा नुसत्या वाफेवर शिजवणे आणि तापलेल्या तेलात किंवा तुपात तळणे किंवा परतणे (बेक, रोस्ट, बॉइल, डीप किंवा शॅलो फ्राय) या प्रक्रियांचा उपयोग केला जातो. त्यासाठी कशा प्रकारच्या किती ऊष्णतेची आवश्यकता असते, त्याला किती वेळ लागतो आणि त्या प्रक्रियांमध्ये त्या पदार्थावर ऊष्णतेचा परिणाम होऊन त्यांच्या गुणधर्मांमध्ये कसे बदल होत असतात वगैरेंचे त्यांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण केले होते. चुलीवर ठेवलेल्या भांड्यामधून बाहेर पडणारी वाफ, ऊष्ण हवा किंवा धूर पाहून, त्यामधून पसरणारा गंध, त्यावेळी होणारा सूक्ष्म आवाज वगैरेमधून त्या पात्राच्या आत काय चालले आहे याचा अचूक अंदाज त्यांना येत असे. कोणत्या पदार्थासाठी कोणते पातेले, कढई किंवा तवा घ्यायचा, कोणती चूल, शेगडी किंवा स्टोव्ह पेटवायचा वगैरे गोष्टी त्या पदार्थाच्या कृतीवर विचार करून त्या अचूकपणे ठरवायच्या. गरज पडल्यास काही खास पदार्थासाठी मुद्दाम वेगळ्या प्रकारची चूल किंवा शेगडी त्या दगडमातीमधून स्वतःच तयार करून घेत असत. 

मी आठवी नववीत गेल्यानंतर वैनींना मदत करण्यासाठी अधून मधून आमच्या स्वयंपाकघरात जाऊ लागलो होतो. त्यांनी मला एकही रेसिपी सांगितली नाही, एकाही विशिष्ट पदार्थाची कृती शिकवली नाही, पण वर दिलेल्या सर्व औष्णिक प्रक्रिया आणि कुटणे, वाटणे, खोवणे, दळणे, लाटणे यासारख्या यांत्रिक (मेकॅनिकल) क्रियांसंबंधी मूलभूत माहिती दिली आणि मी जर हे शिकून घेतले आणि लक्षात ठेवले तर पुढील आयुष्यात मला हवा तो पदार्थ करता येईल असे शिकवले. यालाच खरे शास्त्रीय शिक्षण म्हणतात. जमखंडीतल्या आमच्या स्वयंपाकघरातले पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ, चूल-फुंकणी, सूप यासारखे कोणतेही उपकरण आमच्या आताच्या घरात नाही आणि आमच्या आताच्या स्वयंपाकघरातली फ्रिज, ओव्हन, फूड प्रोसेसर यातली एकही वस्तू त्या काळात उपलब्ध नव्हती. पण लहानपणी खाल्लेले खाद्यपदार्थ मात्र आम्ही आताही तयार करू शकतो कारण त्याच्या मागे असलेले पाकशास्त्र तेच आहे.

त्या काळात आमच्या स्वयंपाकघरात कुकिंग गॅस आणि विजेचा वापर होत नव्हता. वखारीतून फोडून आणलेली बाभळीची कोरडी लाकडे हे मुख्य इंधन होते आणि अर्धवट जळलेल्या लाकडांपासून कोळसा बाजूला काढून त्याचा उपयोग शेगड्यांमध्ये केला जात असे. न जळलेले लाकडाचे तुकडे, रद्दी कागद, चिंध्या, नारळाच्या करट्या वगैरे सटरफटर गोष्टी बंबार्पण केल्या जात असत. याशिवाय ऑइल मिल्समधून भुईमुगाची टरफले आणि सॉमिल्समधून लाकडाचा भुसा अशा वेगळ्या टाकाऊ वस्तू घरी आणून त्यांचा इंधनासाठी उपयोग करायचे स्पेशल तंत्रज्ञान वैनींकडे होते किंवा त्यांनी ते विकसित केले होते. त्यासाठी पत्र्यांच्या रिकाम्या डब्यांपासून खास प्रकारच्या शेगड्या त्या मुद्दाम तयार करून घेत असत. आमच्या घरात कसल्याही प्रकारची भट्टी किंवा ओव्हन नव्हती, पण अनेक ड्रॉवर असलेला एक पत्र्याचा डबा वैनींनी कुठून तरी आणला होता. त्याच्या खाली, वर आणि बाजूला निरनिराळ्या प्रकारांनी गरम हवा खेळवून त्या मस्त खुसखुशीत बिस्किटे घरीच तयार करत असत. कोणताही नवा पदार्थ खात असतांना तो कशापासून तयार केला गेला असेल आणि त्यात कोणकोणती इतर खाद्य द्रव्ये मिसळली असतील हे त्यांना चवीवरून समजत असे आणि लहान प्रमाणात प्रयोग करून तो पदार्थ स्वतः बनवून पहाण्याचा छंद त्यांना होता. हे करतांना त्यांना सामान वाया जाण्याची भीती वाटत नसे. ते तसे होऊच देत नसत. त्यांनी ठरवलेला पदार्थ त्यांच्या अपेक्षेनुसार होतांना दिसला नाही तर मध्येच त्यात बदल करून त्यातून एक वेगळा चांगला पौष्टिक व रुचकर पदार्थ करणे हा त्यांच्या हातचा मळ होता. यामुळे आम्हालाही अनेक नवे नवे अनोखे पदार्थ खायला मिळाले.

विणकाम, भरतकाम, शिवणकाम इत्यादी कलांची साधारण मूलभूत माहिती वैनींना होती, पण त्यांना त्यांची मनापासून खूप आवड नसावी. स्वयंपाकघरातील कामे संपल्यावर उरलेला वेळ अशा प्रकारच्या कलाकुसरीच्या आणि शोभेच्या कामामध्ये घालवण्यापेक्षा तो वाचनात घालवणे त्यांना आवडत असे. त्यांचे वाचन मुख्यतः धार्मिक स्वरूपाचे होते, पण त्यांचे अवांतर वाचनसुध्दा भरपूर होते. मासिकांमधून येणारे लेख, कथा वगैरे साहित्य त्या आवडीने वाचत असत. त्यात मनोरंजनापेक्षा ज्ञानाला जास्त प्राधान्य असायचे. आमच्या घरात असलेली बहुतेक सगळी धार्मिक पुस्तके अनेक वेळा वाचून आणि पोथ्यांची पारायणे करून त्यांना ती जवळ जवळ तोंडपाठ झाली असतील. त्यांना संगीताचे वावडे नव्हते, साधे गाणे ऐकायला आवडत होते, पण संगीताच्या शास्त्रात मात्र त्यांना रुची किंवा गती नव्हती. संतांनी लिहिलेले अभंग, ओव्या वगैरेंचा खूप मोठा स्टॉक त्यांच्याकडे होता. त्यांना प्रसंगानुसार यथायोग्य अशा म्हणी, वाक्प्रचार किंवा सुवचने तत्काळ सुचत असत. रामायण, महाभारत आदि पुराणकालातल्या कथांमधील सगळी मुख्य पात्रे तर त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतीच, शिवाय त्या पात्रांचे काका, मामा, नणंदा, भावजया वगैरे आप्तसंबंधींची नावे आणि त्यांचा इतिहासही त्या सविस्तर सांगत असत. त्या पौराणिक कथा छान रंगवून सांगत असत. त्यांच्याकडे काव्य लिहिण्याची प्रतिभा आणि त्याचा छंद होता. त्यांनी लिहिलेल्या काही कवनांचे संकलन धनंजयने केले आहे. त्यात देवाची स्तुती, प्रार्थना वगैरे आहेत, काही पौराणिक आख्याने आहेत, एक दोन व्यक्तीगत स्वरूपाच्या कविता आहेत.

जमखंडीला त्यांच्या समवयस्क आणि समविचारी महिलांचा ग्रुप होताच, सवड मिळेल तेंव्हा भेटून त्या गप्पागोष्टींबरोबर थोडे वाचन, पठण, मनन. चिंतन, चर्चा वगैरे करत असत. नंतरच्या काळात त्या बार्शी किंवा अणुशक्तीनगरला असतांनासुध्दा त्यांच्याभोवती अशी मंडळे गोळा होत असत आणि त्यांच्या सुसंस्कृत सहवासाचा लाभ घेत असत. त्यांनी स्वतःचे म्हणून कसले विचार मांडून इतरांना उपदेश करण्याचा आव कधी आणला नाही, पण मुख्यतः संतविभूतींच्या काव्यामधील ओळी उद्धृत करून किंवा त्यांच्या जीवनामधील घटनांचे दाखले देऊन त्या सर्वांना योग्य असे मार्गदर्शन करत असत. स्वतःच्या जीवनातसुध्दा त्यांनी अशाच प्रकारे नेहमी योग्य निर्णय घेतले असतील, आणि त्याला इतस्ततः भरकटू न देता योग्य ती दिशा दिली असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. सभोवतालच्या जगात बरीवाईट माणसे असतात, त्यांच्या कृती चांगल्या किंवा वाईट असतात, त्यातल्या चांगल्याकडे आपण पहावे, त्यात समाधान मानावे, इतरांमधल्या वाईटाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही, आपण त्यापासून सावध व्हावे, आपल्याला उपसर्ग होणार नाही किंवा त्रास झाला तर तो कमी व्हावा असा प्रयत्न करावा असे त्या सांगत असत. पुढील आयुष्यात ऑफीसचे हजारो रुपये खर्च करून आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये सकारात्मक विचारपध्दतीबद्दल मी जे शिकलो त्याची बीजे लहानपणी वैनींनी माझ्या मनात पेरलेली होती हे ते शिकतांना मला जाणवत होते.

कोठल्याही नव्या गोष्टीबद्दल त्यांना प्रचंड उत्साह असायचा आणि नवनिर्मितीचे खूप कौतुक वाटत असे. घरातल्या किंवा परिसरातल्या कोठल्याही समारंभाच्या वेळी त्यांच्या अंगात हत्तीचे बळ येत असे आणि त्यात त्या उत्साहाने पुढाकार घेत असत. त्यातल्या बारीकसारीक बाबी त्या काळजीपूर्वक पहात असत. त्यांनी मला सांगितलेले कुठलेही काम "मला येत नाही किंवा जमणार नाही." असे म्हणून टाळणे शक्यच नव्हते. "येत नसेल तर शिकून घे, जमणार नाही असे वाटत असेल तर आधी प्रयत्न तरी करून बघ. जमेल तेवढे तरी कर, त्यात काय प्रॉब्लेम येतात ते आपण पाहू." असे सांगून ते काम त्या करवून घेत असत. "या पूर्वी मी हे काम कधी केले नाही." हे उत्तर तर त्यांना अजीबात मान्य नव्हते. "केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे।" हे समर्थ रामदासांचे वचन लगेच त्यांच्या ओठावर यायचे. कोणतीही गोष्ट कधी तरी कोणी तरी पहिल्यांदा केलीच होती असा त्यांचा युक्तीवाद असे. "बालपणी बाळांची कोमल तरुतुल्य बुध्दी वाकेल। घेईल ज्या गुणांना ते गुण विकसून तेही फाकेल ।।" असा त्यांचा एक आवडता श्लोक होता. त्यामुळे लहानपणी कुठल्याही विषयातले जे जे काही ग्रहण करता येईल ते सगळे आमच्या डोक्यात कोंबण्याच्या दृष्टीने त्या प्रयत्नशील असत. पण ते आमचा मूड पाहून आमच्या कलाकलाने होत असल्यामुळे त्याचा भडिमार वाटत नसे किंवा वैताग येत नसे.

"दादांच्या बद्दल सांगण्यासारखे इतके आहे की ते कधीच लिहून संपणार नाही. शिवाय भावना आणि विचार यांची गल्लत होऊन लिहिणे कठीण होत राहणार. या कारणामुळे मी यापूर्वी तसा प्रयत्नही केला नव्हता. आज थोडा धीटपणा करून एक अंधुकशी झलक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे." असे मी मागील लेखात लिहिले होते. वैनींच्या बाबतीत ते शंभरपट जास्त प्रकर्षाने जाणवते. एक तर त्यांचा सहवास खूपच निकटचा होता आणि आम्हाला तो तुलनेने दीर्घ काळ लाभला. मी लहान असतांना मला मिळालेल्या संस्कारांबद्दल मी थोडेसे वरील परिच्छेदांमध्ये लिहिले आहे. मोठेपणीसुध्दा सतत त्यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि भक्कम आधार आम्हाला मिळत राहिला. जीवनामधली त्यांची जागा कधीही भरून निघाली नाही आणि निघणारही नाही हे निदान माझ्या बाबतीत तरी शंभर टक्के खरे आहे.



Sunday, October 07, 2012

आमचे दादा




माझे वडील सर्व भावंडांमध्ये मोठे होते. त्यांची लहान भावंडे त्यांना 'दादा' म्हणत असत आणि इतर आप्तही त्यांना 'दादा' असे म्हणू लागले. ते ऐकून त्यांची मुलेही म्हणजे आम्ही भावंडे सुध्दा त्यांना 'दादा' म्हणायला लागलो आणि पुढे दादांच्या नातवंडांनीही त्याचे अनुकरण केले. माझ्या वडिलांचे नावच 'दादा' असे पडले होते. पूर्वीच्या काळी अशीच पध्दत रूढ होती. घरातले सारे लोक दादा, अप्पा, नाना, ताई, माई, अक्का अशासारख्या उपनावाने संबोधले जात असत, मग ती व्यक्ती नात्याने काका, मामा, मावशी, आत्या, माता, पिता वगैरे कोणी का असेना ! मोठेपणी कधी त्याचे रूपांतर दादासाहेब, अप्पासाहेब वगैरेंमध्ये होत असे. दादांची पत्नी म्हणून माझ्या आईला 'वहिनी' म्हंटले जात असे. 'वहिनी' या शब्दाचा 'वयनी', 'वैनी' असा अपभ्रंश होऊन अखेर 'वैनी' हेच त्यांचे नाव पडले. आजकाल पितृपक्ष चालला आहे. या पंधरवड्यात आपल्या प्रिय आणि आदरणीय अशा दिवंगत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करावी या विचाराने आज हा लेख लिहीत आहे.

तात्या म्हणजे आमचे आजोबा 'सावळगी' नावाच्या लहानशा गावात (किंवा मोठ्या खेड्यात) स्थाईक झाले होते. त्या काळात हे गाव जमखंडी संस्थानांतर्गत होते, आता हा भाग कर्नाटकातील बागलकोट (पूर्वीच्या विजापूर) जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यात येतो. आपल्या दादांचा जन्म बहुधा सावळगीला झाला आणि बालपण सावळगीतच गेले. तात्या स्वतःच शाळामास्तर असल्यामुळे दादांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याकडेच झाले आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण जमखंडी येथील परशुराम भाऊ (पी.बी.) हायस्कूलमध्ये झाले. या शाळेच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणिकेत उल्लेखनीय माजी विद्यार्थी म्हणून दादांची केलेली नोंद मी लहानपणी पाहिली आहे.

सावळगीपासून जमखंडी गाव बारा मैल (सुमारे एकोणीस कि.मि.) अंतरावर आहे, शिवाय वाटेत जमगी येथे कृष्णा नदी ओलांडावी लागते. पूर्वीच्या काळात वाहतुकीची सोय नव्हतीच. त्यामुळे सावळगीहून जमखंडीला जाण्यासाठी आधी आठ मैल चालत जाऊन, नावेमधून किंवा पोहत नदी पार करायची आणि पुन्हा पुढे चार मैल पायपीट असे करावे लागत असे. एरवी संथपणे वाहणाऱ्या कृष्णामाईला पावसाळ्यात महापूर आला की ती संथ न वाहता अतीशय वेगाने खळाळत धावते आणि तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यानाल्यांमध्ये नदीचे पाणी उलट दिशेने शिरल्यामुळे त्यांना सामावून घेऊन कृष्णा नदीचे पात्रच मैल दीड मैल इतके रुंद होते. त्या काळात जमगीपाशी तिला पार करणे दुरापास्त होऊन जाते. अशा अडचणींमुळे शालेय शिक्षणासाठी दादा जमखंडीला स्थायिक असलेल्या आप्तांकडे रहात असावेत.

पहिल्यापासूनच दादा हुषार विद्यार्थी होतेच. कुशाग्र बुध्दी, चांगली आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते. मॅट्रिक ही त्या काळातली शालांत परीक्षा ते उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाले. त्या काळात जमखंडीच्या आसपास कोठेही पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती. आमच्या आजोबांचे कुटुंब तसे खाऊन पिऊन सुखी असले तरी कॉलेजशिक्षणासाठी रोख पैसे बाजूला काढून देणे त्या काळात बरेच कठीण होते. तात्यांना शिक्षणाचे खूप महत्व वाटायचे आणि दादांनी आपली योग्यता सिध्द करून दाखवली होती. पण संसाधनांचा प्रश्न होता. अशा वेळी "आम्ही वाटल्यास एक वेळ जेवून राहू, पण दादाला कॉलेजला पाठवा." असे दादांच्या लहान बहिणीने म्हणजे आमच्या गंगूआत्यांनी आपल्या वडिलांना सांगितले. ही गोष्ट दादांनी आयुष्यभर लक्षात ठेवली होती आणि त्यांच्या अखेरच्या दिवसात सुध्दा ती जुनी आठवण सांगतांना त्यांना गहिंवरून येत असे. 

अशा ओढाताणीच्या परिस्थितीतही दादा निग्रहाने सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेले आणि त्यांनी बी.ए. ही पदवी संपादन केली. तो सुमारे १९२० ते २२ चा काळ असेल. त्या काळात साधे ग्रॅज्युएशन हीच फार मोठी उपलब्धी असायची. दादाच्या पिढीमधील काका मामांसारख्या आमच्या नातेवाईकांमधला इतर कोणीच तेंव्हा स्नातक झाला नव्हता. त्या काळात बी.ए.नंतर एल. एल. बी. पास करून वकील बनणे हे आजकालच्या इंजिनियरिंग किंवा मेडिकलपेक्षासुध्दा अधिक प्रतिष्ठेचे आणि हमखास चांगले उत्पन्न मिळवण्याचे साधन समजले जात असे. अभ्यास करून ते लक्ष्य गाठण्याएवढी दादांची बौध्दिक पात्रता आणि तयारी होती. सहजपणे छाप पाडणारे प्रभावी व्यक्तीमत्व आणि तर्कशुध्द विचार करून ते सुसंगतपणे मांडण्याची क्षमता वगैरे गोष्टी त्यांच्या बाजूने असल्यामुळे ते वकीलीच्या व्यवसायात यशस्वी ठरलेही असते. पण त्या काळातल्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करता त्यांनी या उच्च शिक्षणापेक्षा नोकरी करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यातही मुंबईपुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे न वळता घराकडे परत येऊन ते जमखंडी संस्थानाच्या सेवेत रुजू झाले.

जमखंडी संस्थानच्या राज्यकारभारात त्यांनी चांगला लौकिक मिळवला. जमखंडी गावात ते 'रावसाहेब' या नावाने संबोधले जात असत. कर्नाटकातील कुंदगोळ आणि सातारा जिल्ह्यातील शिरवडे या गावी जमखंडीच्या संस्थानिकांच्या जहागिरी होत्या. काही काळासाठी त्या ठिकाणचे वहिवाटदार म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. अर्थातच त्या ठिकाणचे ते सर्वेसर्वा असत. या घटना माझ्या जन्मापूर्वीच्या किंवा मी तान्हे बाळ असतांनाच्या असल्यामुळे मला यातले काहीच आठवत नाही, पण मोठ्या लोकांच्या बोलण्यामधून त्याबद्दल मी असंख्य वेळा ऐकले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळासाठी भारतातले सगळे संस्थानिक जवळ जवळ सार्वभौम राजे झाले होते. पण सरदार वल्लभभाई पटेलांनी नेट लावून त्यांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणले. त्या वेळी सर्व संस्थानिकांच्या सेवकांना राज्य सरकारांच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले. त्या काळात जमखंडी संस्थान मुंबई इलाख्यात होते, त्यामुळे दादांना मुंबई राज्याच्या शासनात पद दिले गेले. पण आता त्यांची बदली जमखंडीहून बाहेरगावी झाली. राज्यपुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेले त्या काळातले मैसूर राज्य (आताचे कर्नाटक) किंवा द्विभाषिक मुंबई राज्य यातून त्यांना निवड करायची होती. जमखंडी हे गाव मैसूर राज्यामध्ये गेल्यामुळे दादांनीही तिथून जवळ राहण्याच्या दृष्टीने मैसूर राज्याच्या सेवेत जाण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांना जमखंडीचे पोस्टिंग मात्र कधीच मिळाले नाही. 

या काळात नोकरीच्या गावी ते एकटेच रहात असत आणि आमच्या एकत्र कुटुंबातील इतर सगळे सदस्य जमखंडीच्या घरात रहात. मला कळायला लागल्यापासून मी हीच परिस्थिती पहात मोठा झालो. दरवर्षी दिवाळीला आणि आजी आजोबांचे श्राध्द व सर्व पितरांचे पक्ष या कार्यासाठी दादा न चुकता जमखंडीला येऊन जात. त्याशिवाय महिना दोन महिन्यातून एकाद्या दिवशी धूमकेतूसारखे अचानक येऊन एक दोन दिवसात परत जात असत. त्यांच्या या भेटीमागे काही कारण असले तरी त्याची चर्चा मुलांसमोर कधीच होत नसे. बहुतेक वेळी ते आले म्हणून घरात आनंदाचे वातावरण व्हायचे त्यात आम्हीसुध्दा खूष होत असू. श्राध्दपक्षाच्या दिवशी कोणत्या पुरोहितांना बोलवायचे, नैवेद्याला कोणते विशिष्ट पदार्थ करायचे, गावातील कोणकोणत्या इतर नातेवाईकांना तर्पण आणि प्रसादासाठी घरी बोलवायचे वगैरेबद्दल ठरलेले परंपरागत नियम होते आणि घरातल्या सर्वांनाच ते चांगले ठाऊक होते. इतर वेळी दादांच्या आगमनानंतर त्यांच्या मित्रमंडळींचे संमेलन हमखास भरत असे. त्यासाठी बोलवायच्या लोकांची यादी वेगळी होती. ते मित्र जमले की त्यांच्या हंसण्याखिदळण्याला ऊत येत असे, पण त्यांचे बोलणे ऐकण्याला मुलांना सक्त बंदी असल्यामुळे त्या काळात तरी मला त्याचे कुतूहल वाटत असे. त्यात काही चावटपणा किंवा नॉनव्हेज जोक्सचा भाग असणार हे दहा बारा वर्षांनंतर माझ्या लक्षात आले.

नोकरीत असतांना दादांच्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्या, पण त्या काळात भूगोलाचे फारसे ज्ञान नसल्यामुळे मला त्याचा अर्थ समजत नव्हता आणि त्या गावांची नावेही आता स्मरणातून नाहीशी झाली आहेत. धारवाड जिल्ह्याच्या पार दक्षिणेच्या टोकाला असलेल्या राणीबिन्नूर या गावी ते असतांना मे महिन्याच्या सुटीत आम्हीही तिकडे गेलो होतो. माझ्या आठवणीतला तो पहिलाच लांबचा प्रवास असल्यामुळे कायमचा चांगला लक्षात राहिला आहे. त्यानंतर काही वर्षे ते बागलकोट जवळील इलकल या गावी होते. हातमागावर विणलेल्या काठापदरांच्या खास इरकली लुगड्यांसाठी हे गाव प्रसिध्द आहे. दादा इलकल येथे असतांना त्याच्यासाठी रोज एस् टी बसमधून जेवणाचा डबा पाठवला जात असे आणि त्यासोबतच आम्ही पत्रेही पाठवत असू. इंग्रजी आणि गणित यासारख्या काही विषयांमधील प्रश्नोत्तरे मी त्यांना लिहून पाठवत होतो आणि ती तपासून त्यामधील चुका आणि दुरुस्त्या दादा लगेच पाठवत असत. अशा प्रकारे ते दूर राहूनही माझा अभ्यास घेत होते.

१९५८ साली रिटायरमेंटनंतर दादा कायमचे राहण्यासाठी जमखंडीला आले. तोपर्यंत माझे सर्व मोठे भाऊ कॉलेजचे शिक्षण किंवा नोकरीसाठी परगावी रहात होते. जमखंडीच्या घरात दादा, वैनी, सोनूआत्या आणि मी एवढे चारजणच होतो. दिवाळीच्या वेळी मात्र सगळी मंडळी गोळा झाली की घर भरून आणि गजबजून जात असे. 

दादांचा कल आधीपासून देवभक्तीकडे होताच, रोज पहाटे जाग आल्यानंतर अंथरुणावर पडल्यापडल्याच ते अभंग म्हणत असत. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आणि इतर संतांचे शेकडो अभंग त्यांना तोंडपाठ होते, त्यांना संगीताचे ज्ञान होते आणि अत्यंत सुरेल आवाजात आणि चिपळ्यांच्या ठेक्यात ते अभंग गात असत. सेवानिवृत्तीनंतर ते पूर्ण वेळ भक्तीमार्गाला लागले होते. दररोज विठ्ठल मंदिरात आणि विशिष्ट दिवशी दत्ताच्या देवळात ते भजनासाठी जात होते. अधून मधून त्यांची प्रवचनेही होत असत. या काळात मित्रमंडळींच्या टोळक्यांच्या बैठका कमी कमी होत बंदच पडल्या किंवा दादांनी त्यात सहभागी होणे थांबवले होते.

दादा संस्कृत भाषेतले पंडित होते. जमखंडीच्या राजपुत्राच्या मौंजीबंधनाच्या वेळी त्यांनी संस्कृतमध्ये मंगलाष्टके रचली होती. कवितांमधील विविध वृत्ते, छंद वगैरेंचे समग्र ज्ञान त्यांना होते. घरामधील लग्नमुंजींसारख्या प्रसंगी घरातल्या मुलांनी मंगलाष्टके रचण्याची सुरुवात माझ्या सर्वात मोठ्या भावापासून झाली होती आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली ती परंपरा माझ्यापर्यंत आली होती. ते भारतीय पध्दतीच्या बुध्दीबळामध्ये निष्णात होते. या खेळात विरुध्द पक्षाचे सर्व मोहरे मारून चालत नाही. त्याचा कमीत कमी एक मोहरा जीवंत ठेऊन त्याच्यावर मात करावी लागत असे. आमच्याशी खेळतांना ते चांगल्या खेळी रचून आधी आमचे बरेचसे मोहरे खाऊन टाकत, पण उरलेला शेवटचा मोहरा मात्र मरणाची भीती नसल्यामुळे धीटपणे कसाही वावरत असला आणि बिनधास्तपणे कुठेही घुसत असला तरी त्याला न मारता त्याचा हल्ला चुकवून तो खेळ ते जिंकत असत. शिवाय मात देणारा शेवटचा शह प्यादे किंवा घोड्यानेच देऊन मात करायची अशा गंमती ते आधी सांगून करून दाखवत असत. पाश्चात्य नियमांप्रमाणे चेस खेळून त्यांनी स्पर्धेत भाग घेतला असता तरीही त्यांनी त्यात नक्कीच बक्षिसे मिळवली असती. पण त्यांच्या काळात कदाचित अशा स्पर्धा होत नसाव्यात.

त्या काळात तशी विचित्र पध्दतच होती की काय ते देव जाणे, पण घरातल्या कर्त्या पुरुषांचा प्रमाणाबाहेर दरारा असायचा. काही कामासाठी दादा घराबाहेर गेलेल्या वेळी इतर लोक हास्यविनोद किंवा वादाडी करू शकत, पण दादांचे पाऊल उंबऱ्यात पडल्याची चाहूल आली की सगळेजण चिडीचुप्प होऊन जात असत. त्यानंतर कोणीही मोठ्या आवाजात बोलायचे नाही, रडायचे, ओरडायचे किंवा भांडायचे तर नाहीच अशी सक्त ताकीद लहान मुलांना दिली जात असे. शोले चित्रपटातला "यहाँसे पचास पचास कोसतक .." हा सुप्रसिध्द संवाद ऐकल्यानंतर मला अचानक दादांची आठवण झाली. त्यांना कोणीही कसलाही प्रश्न विचारायचा नाही, उलट उत्तर तर नाहीच, सरळ उत्तरसुध्दा शक्य तोवर मान हलवून निःशब्दपणे द्यायचे असा अलिखित नियम होता. अनवधानाने, अज्ञानामुळे किंवा गैरसमजुतीमधून त्यांनी एकादे चुकीचे विधान केले तरी ती चूक दाखवून देणे हा अक्षम्य अपराध होता. लहान असतांना हे ठीक होते, पण मलाही कॉलेजात गेल्यावर शिंगे फुटायला लागली, मी बाहेरचे जग पाहिले आणि मला ते वागणे पटेनासे झाले, पण गत्यंतर नव्हते. त्यामुळे माझ्या मनाची एक प्रकारची कुचंबणा होत होती. मनात एक प्रकारची आढी निर्माण होत गेली. त्यात माझ्या भल्यासाठी त्यांनी सांगितलेल्या काही चांगल्या गोष्टीसुध्दा त्यावेळी मनाविरुध्द असल्यामुळे अनावश्यक किंवा अतीशयोक्त वाटल्या होत्या. मला त्यांचे मोल कित्येक वर्षांनंतर समजले. पण दादा हयात असेपर्यंत त्यांच्याबरोबर मनमोकळा संवाद करण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता आणि मला तो कधीच करता आला नाही ही खंत मात्र मनात राहून गेली. 

मला इंटर सायन्सच्या परीक्षेत सुवर्णपदक मिळाले होते, पण त्याबद्दल मला दादांच्याकडून  शाबासकी मिळाली नाही अशी समजूत करून घेऊन मी उगाचच खट्टू झालो होतो. मुलांचे जास्त कौतुक केले तर ते त्यांच्या डोक्यात जाऊन ती बिघडतात अशी त्यांची थिअरी होती. वास्तविक पाहता ही गोष्ट ते अभिमानाने गावात इतरांना सांगत होते हे मला नंतर समजले. कॉलेजमधील बक्षीससमारंभात मला ते पदक मिळाल्यानंतर मी सुटीसाठी घरी जाण्यापूर्वीच दादा आजारी पडल्याचे समजले. अशा वेळी त्यांना भेटायला जातांना सोबत पदक घेऊन जाणे योग्य ठरेल की नाही अशी शंका माझ्या मनात आली. शिवाय मनातील बारीकशा आढीमुळे मला मिळालेले सुवर्णपदक त्यांना दाखवायला मी बरोबर घेऊन गेलो नाही. आमच्या दुर्दैवाने त्या दुखण्यामधून ते वाचले नाहीत, माझ्या आठवणीतला तो त्यांचा पहिलाच मोठा आजार शेवटचा ठरला आणि आपल्या या मूर्खपणाची हुरहूर माझ्या मनात कायमची मनात राहून गेली.

दादा गेले तेंव्हा आमचे कुटुंब एकखांबी तंबूसारखे होते. तो आधार अचानक नाहीसा झाल्यानंतर होणाऱ्या पडझडीत आमचे काय होईल याची कल्पनाच करवत नव्हती. पण त्यांनी आयुष्यभर कमावलेली पुण्याई आमच्या पाठीशी होती आणि त्यांनी आम्हाला दिलेली शिकवण लाखमोलाची होती. माणसे जोडणे हा त्यांचा सर्वात मोठा विशेष होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या असंख्य लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल श्रध्देची भावना होती. कोणत्याही रीतीने मदत करून त्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याचा प्रयत्न ते करत होते. कोणीही आम्हाला एकटे वाटू दिले नाही. काटकसर करून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा वस्तुपाठ दादांनी स्वतःच्या आचरणातून आम्हाला दिला होता. घरातले कोणतेही काम घरातील सर्वांना यायलाच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. त्या बाबतीत ते मुलगा आणि मुलगी यात भेदभाव करत नव्हते. त्यामुळे शेणाने जमीन सारवणे, त्यावर रांगोळी काढणे, भांडी घासणे, कपडे पिळून वाळवत टाकणे यासारखी बायकांची समजलेली कामे मी मुलगा असूनसुध्दा गरज पडल्यास करत आलो होतो. घरातले कोणतेही काम आपले असते, त्यासाठी गडीमाणसे किंवा कामवाल्या बायका येत असल्या तरी ते काम त्यांचे ठरत नाही, त्याची मुख्य जबाबदारी घरातल्यांच्यावरच असते हे त्यांनी सर्वांच्या मनावर इतके ठसवले होते की एकाद वेळेस ते काम करणारी व्यक्ती गैरहजर किंवा आजारी असली तरी इतर लोक ते काम बिनबोभाटपणे करून टाकत. कुठलेही काम कमीपणाचे न समजता ते मन लावून केले पाहिजे असे त्यांनी सांगितले होतेच, त्याची गुणवत्ता (क्वालिटी) चांगलीच असली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. कसलाही कामचुकारपणा किंवा थातुरमातुरपणा ते मुळीच सहन करून घेत नसत. त्यात चुका आढळल्यास ते त्या लगेच दुरुस्त करायला लावत. यामुळे आम्हाला अभ्यासासकट सगळी कामे आळस न करता मन लावून करायची सवय लागली ती आयुष्यभर उपयोगी पडली. 

दादाच्या बद्दल सांगण्यासारखे इतके आहे की ते कधीच लिहून संपणार नाही. शिवाय भावना आणि विचार यांची गल्लत होऊन लिहिणे कठीण होत राहणार. या कारणामुळे मी यापूर्वी तसा प्रयत्नही केला नव्हता. आज थोडा धीटपणा करून एक अंधुकशी झलक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो गोड मानून घ्यावा.

Tuesday, October 02, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग ६ - टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती (उत्तरार्ध)

"आजच्या काळातसुध्दा गणेशोत्सव साजरे होतच आहेत, शिवाय त्याच्या आकारात अनंतपटीने वाढच होत चालली आहे. याचे कारण म्हणजे हा उत्सव ही या काळातली गरज राहिलेली नसली तरी त्यातून अनेक प्रकारचे लाभ मिळतात." असे मी मागील लेखाच्या अखेरीस लिहिले होते. हे लाभ कशा प्रकारचे आणि कोणाला मिळतात या प्रश्नाला एकच उत्तर नाही. आजच्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रत्येकांमागे निरनिराळे उद्देश असतात, त्यानुसार त्यांचे फायदे संयोजकांना मिळतात.

लोकमान्य टिळकांच्या काळापासून चालत असलेली आणि त्यावरून प्रेरणा घेऊन सुरू झालेली काही गणेशोत्सव मंडळे अद्याप कार्यरत आहेत. समाजसेवेच्या उद्देशाने काम करणा-या सेवाभावी संस्था आहेत. टिळकांच्या काळातली बहुतेक उद्दिष्टे आज शिल्लक राहिलेली नसली तरी वेळोवेळी समाजापुढे असलेल्या मुद्द्यांवर आणि समस्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम ही मंडळी करीत आली आहेत. चित्ताकर्षक देखावे, पोस्टर्स, पॅम्फ्लेट्स, व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, चर्चासत्रे अशा निरनिराळ्या मार्गाने ही मंडळी गणेशोत्सवात समाजाचे प्रबोधन करतात. महात्मा गांधींच्या काळात दारूबंदी, अस्पृश्यतानिर्मूलन, खादी व ग्रामोद्योग यासारखे विषय होते, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंचवार्षिक योजना, औद्योगिक क्रांती, समाजवादी विचारसरणी, शिक्षणाचा प्रसार यासारखे विषय आले तर चीन आणि पाकिस्तानबरोबर होऊन गेलेल्या युध्दांच्या काळात देशाचे संरक्षण हा ज्वलंत मुद्दा होता. गेल्या दोन तीन दशकांच्या काळात अवकाशात भरारी, संगणकक्रांती, माहितीतंत्रज्ञान, धूम्रपानबंदी, पोलिओचे निर्मूलन, एड्स, स्वाईन फ्ल्यू, अपहरण, दहशतवाद आदि अनेक विषयांकडे लक्ष वेधले गेले होते. पर्यावरणाचे संरक्षण हा तर हल्लीच्या काळातील गणेशोत्सवांमध्ये कळीचा मुद्दा बनून गेला आहे. पॅकिंगसाठी थर्मोकोल आणि बांधकामासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे जेवढे उत्पादन वर्षभर सतत होत असते त्याच्या तुलनेत पाहता या पदार्थांचा गणेशोत्सवामध्ये होणारा उपयोग अगदी नगण्य असतो अशी वस्तुस्थिती असली तरी जणू काही गणेशोत्सवामुळेच पर्यावरणाचा सत्यानाश होणार आहे अशा थाटाचा प्रचार होत असतो. पण या निमित्याने का होईना, पर्यावरणाच्या जपणुकीकडे लोकांचे लक्ष वेधले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. या वर्षी आम्ही सुध्दा शंभर टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा केला. आवर्जून शाडू मातीची मूर्ती आणली, कागद, कापूस आणि कापड यांच्यातून देखावा निर्माण करून आरास केली. उत्सव संपल्यानंतर ते पदार्थसुध्दा व्यवस्थित गुंडाळून ठेवले आणि गणेशमूर्तीचे विसर्जन तात्पुरत्या उभारलेल्या पाण्याच्या कृत्रिम टाकीत केले. अशा प्रकारे या वर्षी आम्ही मुळामुठा नद्यांच्या पात्रात एक कणसुध्दा टाकला नाही. ज्या गणेशोत्सवांमध्ये सामाजिक विषय किंवा तत्कालीन समस्यांकडे लक्ष वेधले जाते त्याचा समाजावर चांगला परिणाम होण्याची शक्यता असते.

मुंबईमधील लालबागचा राजा आणि पुण्यातला दगडूशेठहलवाई गणेशोत्सव यासारख्या अनेक उत्सवांमधील मूर्ती आता असंख्य भाविकांची श्रध्दास्थाने बनल्या आहेत. हे देव नवसाला पावतात या विश्वासाने त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडे काही मागण्यासाठी किंवा त्याच्या प्राप्तीनंतर नवस फेडण्यासाठी लक्षावधी लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी तास न् तास रांगा लावतात आणि पैसे, सोने, चांदी, दागदागीने वगैरे भरपूर मौल्यवान वस्तू स्वेच्छेने त्यांना अर्पण करतात. अर्थातच त्या भक्तांच्या गर्दीची सोयीस्कर व्यवस्था करणे आवश्यक ठरते. अशा ठिकाणचे गणेशोत्सवसुध्दा धूमधडाक्यात साजरे होतात. त्या ठिकाणी अत्यंत लक्ष्यवेधी सजावट असते, या वर्षी दगडूशेठहलवाईच्या गणेशमंदिराला जयपूरच्या हवामहलाचे रूप दिलेले होते. हजारो भक्तांनी एकत्र येऊन अथर्वशीर्षाचे पठण करण्याचा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होतो. लालबागच्या राजाचा राजवाडासुध्दा नेहमीच प्रेक्षणीय असतो. या उत्सवांनिमित्य होणा-या उलाढाली आता कोट्यवधी रुपयांच्या घरात गेल्या आहेत. त्यांचे आयोजन करणा-या धर्मादाय संस्थांची संस्थाने झाली आहेत असे म्हणता येईल. उत्सवाच्या दहा दिवसांव्यतिरिक्त इतर काळातसुध्दा त्यांच्यातर्फे अनेक समाजोपयोगी कामे केली जात असतात. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना किंवा गरीब रुग्णांना त्यांच्याकडून मदत केली जाते. काही संस्था आपला वार्षिक ताळेबंद जाहीर रीत्या प्रकाशित करतात. नवस सायास वगैरेंवर व्यक्तीशः माझा विश्वास असो किंवा नसो, पण त्यामधून अनेक लोकांना मानसिक समाधान मिळत असेल, तर ते हिरावून घेण्याचा मला अधिकारही नाही आणि माझी तशी इच्छाही नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गणेशोत्सवसुध्दा समाजाच्या दृष्टीने हिताचेच म्हणता येतील.

शाळा, कॉलेजे, ऑफीसे, कारखाने, सहकारी गृहनिर्माणसंस्थांच्या किंवा सरकारी नोकरांच्या वसाहती अशा अनेक जागी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात एकाद्या स्नेहसंमेलनाचे वातावरण तिथे असते. या निमित्याने अनेक लोक सहकुटुंब एकत्र येतात, त्यात काही लोकांच्या भेटी होतात, नव्या ओळखी होतात आणि जुन्यांना तजेला मिळतो. या निमित्य ठेवल्या गेलेल्या स्पर्धांमध्ये चित्रकला, शिल्पकला, लिणकाम, भरतकाम, पुष्परचना, संगीत, नृत्य, वक्तृत्व इत्यादि क्षेत्रांमधील आपापले कला गुण दाखवण्याची संधी अनेक लोकांना मिळते. सजावट, आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम, विसर्जन वगैरे गोष्टी सामूहिक रीतीने करतांना लोकांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आणि अनुभव मिळतो. यातून आनंद मिळतो आणि काही नवे अनुभव, नवी माहितीही मिळते.

बदललेल्या परिस्थितीतील गणेशोत्सवात जर असे सगळे चांगलेच घडत असेल त्याच्या विरोधात इतकी ओरड का केली जाते असा प्रश्न पडेल. ती ओरडही अनाठायी वाटत नाही, कारण जास्तीत जास्त गोंधळ आणि गोंगाट सुध्दा काही गणेशोत्सवामध्येच होत असतो. हे उत्सवाच्या नावाने होत असलेले उरूस अनेक प्रकाराने समाजाला त्रासदायक ठरतात. याची सुरुवात दोन तीन महिन्याआधी वर्गणी गोळा करण्यापासून होते. ती करतांना स्वेच्छेपेक्षा दबावावर जास्त भर दिला जातो. मांडव घालण्यासाठी भर रस्त्यांमध्ये खड्डे खणले जातात आणि ते कधीच बुजवले जात नाहीत. अर्धा रस्ता मांडवात गेल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आणखी संकुचित होतो आणि एरवीसुध्दा जिथे वाहनांची गर्दी असते तिथली वाहतूक जवळजवळ बंदच पडते. कर्णकर्कश भोंग्यामधून वेळी अवेळी अभिरुचीहीन गाणी मोठमोठ्याने ऐकवली जातात आणि कधीकधी त्यांच्या तालावर बीभत्स असे नाच केले जातात. या सगळ्या धांगडधिंग्यात मांगल्याचा मागमूसही दिसत नाही आणि याला धार्मिक का म्हणायचे हेच समजत नाही. अशा हिडीस स्वरूपाच्या उत्सवातून समाजाला काही चांगले मिळण्याची फारशी शक्यता नसते. त्याचे आयोजन करणा-यांना त्यातून फायदे होतात. त्यांच्या टोळक्यांना दहा बारा दिवस फुकटात मनसोक्त मजा करता येते आणि त्यांच्या म्होरक्यांना मिरवायला मिळते. त्यांचा धाक आणि भाव थोडा वधारतो. सर्वसामान्य माणूस थोडी कुरकुर करण्यापलीकडे काही करायला धजत नाही. वाटल्यास गणपतीबाप्पानेच या लोकांना चांगली बुध्दी द्यावी अशी प्रार्थना त्याला हात जोडून करतो. एकादा वैतागलेला लेखक आता पुढल्या वर्षी येऊच नका अशी प्रार्थना गणपतीबाप्पाला करतो. पण अशा स्वरूपाचे उत्सव साजरे करणे हा ज्यांचा धंदा बनला असेल आणि त्यात बरकत असेल तर तो आपला धंदा वाढवतच जाणार. जेंव्हा ते सुध्दा अती होईल आणि सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेंव्हा समाजच त्याला आळा घालेल.





Monday, October 01, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग ५ - टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती

रोजच्या रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र होते, वर्षभरात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येऊन जातात, त्यानुसार वातावरणात बदल होतात, झाडांना नवी पालवी फुटते, जुनी पाने गळून पडतात, फुले उमलतात आणि कोमेजतात, प्राणीमात्रांच्या जीवनात बालपण, युवा आणि वार्धक्य या अवस्था येतात. अशा प्रकारे सतत बदलत राहणे हाच सृष्टीचा स्थायी भाव आहे असे म्हंटले जाते. समाजाची राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीसुध्दा हळूहळू बदलत असते आणि त्याचा परिणाम समाजातल्या चालीरीती, घडामोडी वगैरेंवर होत असतो.
१८९३ साल आणि आजच्या सामाजिक परिस्थितीत जमीन अस्मानाइतका फरक पडला आहे. त्या काळातल्या समाजात धर्म, जात, वंश, भाषा वगैरेनुसार असंख्य गट पडलेले होते. प्रत्येक गटातले लोक निरनिराळी आळी, गल्ली, वाडी, मोहल्ला वगैरेंमध्ये गटागटाने आपापल्या संकुचित विश्वात रहात असत. त्यांच्यामध्ये आपापसात विशेष सामंजस्य नव्हते. एकमेकांविषयीचे अज्ञान, गैरसमज, दुरावा यापासून ते वैर आणि तिरस्कारापर्यंत नकारार्थी भावना मनात दडलेल्या असायच्या. साक्षरतेचे प्रमाण फारच कमी होते. त्यातलेही बहुतेक साक्षर लोक आपल्या अक्षरओळखीचा उपयोग पोथ्या, पुराणे, गाथा वगैरेसारख्या धार्मिक वाङ्मयाच्या वाचनासाठीच करत असत. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षणपध्दतीत ज्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले होते अशा मूठभर लोकांनाच भारताचा (त्या काळामधील हिंदुस्थानचा) विशाल भौगोलिक विस्तार व उज्ज्वल इतिहास याबद्दल काहीशी माहिती असायची. इतर सर्वसामान्य लोकांचे सामान्यज्ञान त्यांच्या पंचक्रोशीपुरतेच मर्यादित असायचे. त्यापलीकडे पसरलेल्या आपल्याच देशातल्या भूभागाबद्दल किंवा तिथे रहात असलेल्या लोकांबद्दल त्यांनी कधी फारसे ऐकलेलेही नसायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना आत्मीयता कशी वाटणार? आपण एका मोठ्या देशाचे रहिवासी आहोत याचीच ज्यांना नीटशी कल्पना नव्हती त्यांना त्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान तरी कसा आणि किती असणार? भारतातल्या राजेरजवाड्यांच्यात चालत असलेल्या लढायांचा फायदा घेऊन इंग्रजांनी हा देश काबीज केला होता आणि भारतामधील जनतेमध्ये एकजूट न होणेच त्यांच्या हिताचे होते. त्यामुळे येथील जनतेतल्या आपापसातील तेढीला ते खतपाणी घालत राहिले होते.

इंग्रजी शाळांमधून शिक्षण घेतलेले जे सुशिक्षित लोक होते, त्यामधील बरेच लोक सरकारी नोकरी करीत होते आणि इंग्रज सरकारशी इमानदार होते. इतर अनेक विद्वानांना मात्र त्या काळातली सामाजिक परिस्थिती सहन होत नव्हती. त्यांच्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या थोर लोकांनी समाजसुधारणेचा खडतर मार्ग स्वीकारला. समाजाच्या स्त्रीशूद्रादि मोठ्या भागाला त्या काळात शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, त्यांना शिक्षण मिळवून देण्याचे त्या काळातले अत्यंत कठीण काम त्यांनी हाती घेतले. त्यांना पहिली अनेक वर्षे समाजाचा नुसता विरोधच झाला नाही तर त्यांचा छळ करण्यात आला. अशा काळात इंग्रज सरकारचाही रोष ओढवून घेणे त्यांच्या कार्याला हानीकारक होते. टिळकांचे परममित्र असलेले आगरकर यांच्यासारखे काही देशभक्त लोक सभांमधील भाषणे, वृत्तपत्रांमधील लेखन वगैरे मार्गाने समाजाचे प्रबोधन करत होते तसेच सरकारकडे अर्जविनंत्या करून कायदेशीर मार्गाने समाजाचे जास्तीत जास्त हित करून घेण्याचा प्रयत्न करत होते.

लोकमान्य टिळकांचे विचार या सर्वांहून वेगळे होते. त्यांना इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करायचे होते. पण तीन चार दशकांपूर्वी १८५७चे स्वातंत्र्ययुध्द होऊन गेले होते. त्यावेळी उत्तर भारतामधील काही भागातील सैनिकांनी एकत्र येऊन त्यात उडी घेतली, पण बाकीच्या फार मोठ्या प्रदेशातील जनता त्यापासून अलिप्त राहिली होती. त्यामुळे इतर प्रदेशातील भारतीय सैनिकांच्याच सहाय्याने इंग्रजांनी ते युध्द जिंकले होते. त्यानंतर इंग्रज सरकार सावध झाले असल्यामुळे त्यांच्या विरोधात सशस्त्र लढा देणे अशक्य झाले होते. हा इतिहास ताजा होता. एकट्यादुकट्याच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य मिळू शकणार नाही याची जाणीव त्यांना होती आणि सर्व समाजाला एकत्र आणून त्यांच्या संघटनेच्या बळावर इंग्रज सरकारला आव्हान दिले पाहिजे हे लोकमान्य टिळकांनी जाणले होते. सन १८९३ पर्यंत त्यांनी आपली सुप्रसिध्द स्वराज्याची मागणी उघडपणे केलेली नव्हती आणि आधी सर्व भारतीयांना संगठित करायचे, त्यांच्या मनात देशभक्तीची आंच निर्माण करायची आणि त्यांच्या बळावर स्वातंत्र्याची चळवळ पुढे न्यायची अशी टप्प्याटप्प्यांची योजना आखून त्यानुसार ते एक एक पाऊल यशस्वीपणे टाकत होते. त्यांनी १८९३ साली सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हे त्यातलेच एक महत्वाचे पाऊल होते.

तत्कालीन परिस्थितीत निरनिराळ्या प्रांतांमधील आणि जातीतील लोकांना एका व्यासपीठावर आणणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाचा समारंभ हा त्यांना एकत्र आणण्याचा एकमात्र नामी उपाय होता. एतद्देशीयांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही अशा सूचना सरकारी अधिका-यांना दिलेल्या असल्यामुळे त्याला सरकारकडून मनाई होण्याचा धोका नव्हता. एका ठिकाणी जमलेल्या लोकांना मनोरंजनामधून आपला देश, धर्म, संस्कृती वगैरेंची माहिती मिळावी, त्याबद्दल त्यांना अभिमान वाटावा, प्रेम वाटावे अशा दृष्टीने मेळ्यांचे कार्यक्रम ठेवले. त्यांना आकर्षक वाटावेत तसेच उत्साही लोकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सुरेख आरास आणि सजावटी केल्या, गणपतीच्या मूर्तीचे आगमन आणि विसर्जन यांसाठी वाजत गाजत मिरवणूक काढल्यामुळे या उत्सवाची माहिती गावातल्या सर्वांना कळावी आणि कुतूहलाने त्यांनी त्यात हजेरी लावावी. अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून घेता यावे आणि आपला संदेश खुबीने त्यांच्यापर्यंत पोचवता यावा असा सर्व दृष्टीने विचार करून टिळकांनी या स्वरूपातला उत्सव सुरू केला होता. सिनेमा, रेडिओ, टेलीव्हिजन अशा प्रकारची कोणतीच प्रसारमाध्यमे त्या काळात उपलब्ध नव्हती आणि वर्तमानपत्रे वाचणारा सुशिक्षित वर्ग अत्यल्प होता. अशा त्या काळातील परिस्थितीत मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणून काही सांगण्याची गरज होती, त्यांच्या संघटित प्रयत्नातूनच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला चालना देता येणार होती. पुण्यापासून सुरुवात करून हा उत्सव देशभर गावोगावी पोचवता येईल अशा दृष्टीने त्याची रचना केली होती आणि तसे झालेही.


त्यानंतर अनेक लढे झाले आणि १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. आता पारतंत्र्याचा मुद्दा राहिला नाही. जातीभेद पूर्णपणे नाहीसा झाला नसला तरी त्याचे स्वरूप बदलले आहे. रोजच्या सामान्य जीवनातील इतर अनेक प्रसंगी सुध्दा जातपात विसरून अनेक लोक घडोघडी एकत्र येतातच. त्यासाठी गणेशोत्सवासारख्या वेगळ्या निमित्याची गरज नाही. टीव्ही आणि सिनेमासारखी दृकश्राव्य प्रसारमाध्यमे उदंड झाली असल्यामुळे मनोरंजनाची तसेच प्रचाराची भरपूर सोय, किंबहुना त्यांचा अतिरेक झाला आहे, संगणक आणि आंतर्जाल क्रांतीनंतर माहितीचा महापूर आला आहे आणि मोबाईल फोनमुळे संपर्क अत्यंत सुलभ झाला आहे. त्यामुळे जनसंपर्क, ज्ञान आणि मनोरंजन यासाठी गणेशोत्सवामधील मेळ्यांची गरज नाही. तरीसुध्दा गणेशोत्सव साजरे होतच आहेत, शिवाय त्याच्या आकारात अनंतपटीने वाढच होत चालली आहे. याचे कारण म्हणजे हा उत्सव ही या काळातली गरज राहिलेली नसली तरी त्यातून अनेक प्रकारचे लाभ मिळतात. ते पुढील भागात पाहू.





. . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . (क्रमशः)