Monday, October 01, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग ५ - टिळकांच्या काळातली आणि आताची परिस्थिती

रोजच्या रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र होते, वर्षभरात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येऊन जातात, त्यानुसार वातावरणात बदल होतात, झाडांना नवी पालवी फुटते, जुनी पाने गळून पडतात, फुले उमलतात आणि कोमेजतात, प्राणीमात्रांच्या जीवनात बालपण, युवा आणि वार्धक्य या अवस्था येतात. अशा प्रकारे सतत बदलत राहणे हाच सृष्टीचा स्थायी भाव आहे असे म्हंटले जाते. समाजाची राजकीय, आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीसुध्दा हळूहळू बदलत असते आणि त्याचा परिणाम समाजातल्या चालीरीती, घडामोडी वगैरेंवर होत असतो.
१८९३ साल आणि आजच्या सामाजिक परिस्थितीत जमीन अस्मानाइतका फरक पडला आहे. त्या काळातल्या समाजात धर्म, जात, वंश, भाषा वगैरेनुसार असंख्य गट पडलेले होते. प्रत्येक गटातले लोक निरनिराळी आळी, गल्ली, वाडी, मोहल्ला वगैरेंमध्ये गटागटाने आपापल्या संकुचित विश्वात रहात असत. त्यांच्यामध्ये आपापसात विशेष सामंजस्य नव्हते. एकमेकांविषयीचे अज्ञान, गैरसमज, दुरावा यापासून ते वैर आणि तिरस्कारापर्यंत नकारार्थी भावना मनात दडलेल्या असायच्या. साक्षरतेचे प्रमाण फारच कमी होते. त्यातलेही बहुतेक साक्षर लोक आपल्या अक्षरओळखीचा उपयोग पोथ्या, पुराणे, गाथा वगैरेसारख्या धार्मिक वाङ्मयाच्या वाचनासाठीच करत असत. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षणपध्दतीत ज्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले होते अशा मूठभर लोकांनाच भारताचा (त्या काळामधील हिंदुस्थानचा) विशाल भौगोलिक विस्तार व उज्ज्वल इतिहास याबद्दल काहीशी माहिती असायची. इतर सर्वसामान्य लोकांचे सामान्यज्ञान त्यांच्या पंचक्रोशीपुरतेच मर्यादित असायचे. त्यापलीकडे पसरलेल्या आपल्याच देशातल्या भूभागाबद्दल किंवा तिथे रहात असलेल्या लोकांबद्दल त्यांनी कधी फारसे ऐकलेलेही नसायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांना आत्मीयता कशी वाटणार? आपण एका मोठ्या देशाचे रहिवासी आहोत याचीच ज्यांना नीटशी कल्पना नव्हती त्यांना त्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान तरी कसा आणि किती असणार? भारतातल्या राजेरजवाड्यांच्यात चालत असलेल्या लढायांचा फायदा घेऊन इंग्रजांनी हा देश काबीज केला होता आणि भारतामधील जनतेमध्ये एकजूट न होणेच त्यांच्या हिताचे होते. त्यामुळे येथील जनतेतल्या आपापसातील तेढीला ते खतपाणी घालत राहिले होते.

इंग्रजी शाळांमधून शिक्षण घेतलेले जे सुशिक्षित लोक होते, त्यामधील बरेच लोक सरकारी नोकरी करीत होते आणि इंग्रज सरकारशी इमानदार होते. इतर अनेक विद्वानांना मात्र त्या काळातली सामाजिक परिस्थिती सहन होत नव्हती. त्यांच्यापैकी महात्मा ज्योतीबा फुले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या थोर लोकांनी समाजसुधारणेचा खडतर मार्ग स्वीकारला. समाजाच्या स्त्रीशूद्रादि मोठ्या भागाला त्या काळात शिक्षणापासून वंचित ठेवले गेले होते, त्यांना शिक्षण मिळवून देण्याचे त्या काळातले अत्यंत कठीण काम त्यांनी हाती घेतले. त्यांना पहिली अनेक वर्षे समाजाचा नुसता विरोधच झाला नाही तर त्यांचा छळ करण्यात आला. अशा काळात इंग्रज सरकारचाही रोष ओढवून घेणे त्यांच्या कार्याला हानीकारक होते. टिळकांचे परममित्र असलेले आगरकर यांच्यासारखे काही देशभक्त लोक सभांमधील भाषणे, वृत्तपत्रांमधील लेखन वगैरे मार्गाने समाजाचे प्रबोधन करत होते तसेच सरकारकडे अर्जविनंत्या करून कायदेशीर मार्गाने समाजाचे जास्तीत जास्त हित करून घेण्याचा प्रयत्न करत होते.

लोकमान्य टिळकांचे विचार या सर्वांहून वेगळे होते. त्यांना इंग्रजांच्या जोखडातून देशाला मुक्त करायचे होते. पण तीन चार दशकांपूर्वी १८५७चे स्वातंत्र्ययुध्द होऊन गेले होते. त्यावेळी उत्तर भारतामधील काही भागातील सैनिकांनी एकत्र येऊन त्यात उडी घेतली, पण बाकीच्या फार मोठ्या प्रदेशातील जनता त्यापासून अलिप्त राहिली होती. त्यामुळे इतर प्रदेशातील भारतीय सैनिकांच्याच सहाय्याने इंग्रजांनी ते युध्द जिंकले होते. त्यानंतर इंग्रज सरकार सावध झाले असल्यामुळे त्यांच्या विरोधात सशस्त्र लढा देणे अशक्य झाले होते. हा इतिहास ताजा होता. एकट्यादुकट्याच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य मिळू शकणार नाही याची जाणीव त्यांना होती आणि सर्व समाजाला एकत्र आणून त्यांच्या संघटनेच्या बळावर इंग्रज सरकारला आव्हान दिले पाहिजे हे लोकमान्य टिळकांनी जाणले होते. सन १८९३ पर्यंत त्यांनी आपली सुप्रसिध्द स्वराज्याची मागणी उघडपणे केलेली नव्हती आणि आधी सर्व भारतीयांना संगठित करायचे, त्यांच्या मनात देशभक्तीची आंच निर्माण करायची आणि त्यांच्या बळावर स्वातंत्र्याची चळवळ पुढे न्यायची अशी टप्प्याटप्प्यांची योजना आखून त्यानुसार ते एक एक पाऊल यशस्वीपणे टाकत होते. त्यांनी १८९३ साली सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव हे त्यातलेच एक महत्वाचे पाऊल होते.

तत्कालीन परिस्थितीत निरनिराळ्या प्रांतांमधील आणि जातीतील लोकांना एका व्यासपीठावर आणणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाचा समारंभ हा त्यांना एकत्र आणण्याचा एकमात्र नामी उपाय होता. एतद्देशीयांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही अशा सूचना सरकारी अधिका-यांना दिलेल्या असल्यामुळे त्याला सरकारकडून मनाई होण्याचा धोका नव्हता. एका ठिकाणी जमलेल्या लोकांना मनोरंजनामधून आपला देश, धर्म, संस्कृती वगैरेंची माहिती मिळावी, त्याबद्दल त्यांना अभिमान वाटावा, प्रेम वाटावे अशा दृष्टीने मेळ्यांचे कार्यक्रम ठेवले. त्यांना आकर्षक वाटावेत तसेच उत्साही लोकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सुरेख आरास आणि सजावटी केल्या, गणपतीच्या मूर्तीचे आगमन आणि विसर्जन यांसाठी वाजत गाजत मिरवणूक काढल्यामुळे या उत्सवाची माहिती गावातल्या सर्वांना कळावी आणि कुतूहलाने त्यांनी त्यात हजेरी लावावी. अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून घेता यावे आणि आपला संदेश खुबीने त्यांच्यापर्यंत पोचवता यावा असा सर्व दृष्टीने विचार करून टिळकांनी या स्वरूपातला उत्सव सुरू केला होता. सिनेमा, रेडिओ, टेलीव्हिजन अशा प्रकारची कोणतीच प्रसारमाध्यमे त्या काळात उपलब्ध नव्हती आणि वर्तमानपत्रे वाचणारा सुशिक्षित वर्ग अत्यल्प होता. अशा त्या काळातील परिस्थितीत मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्र आणून काही सांगण्याची गरज होती, त्यांच्या संघटित प्रयत्नातूनच देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला चालना देता येणार होती. पुण्यापासून सुरुवात करून हा उत्सव देशभर गावोगावी पोचवता येईल अशा दृष्टीने त्याची रचना केली होती आणि तसे झालेही.


त्यानंतर अनेक लढे झाले आणि १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाला. आता पारतंत्र्याचा मुद्दा राहिला नाही. जातीभेद पूर्णपणे नाहीसा झाला नसला तरी त्याचे स्वरूप बदलले आहे. रोजच्या सामान्य जीवनातील इतर अनेक प्रसंगी सुध्दा जातपात विसरून अनेक लोक घडोघडी एकत्र येतातच. त्यासाठी गणेशोत्सवासारख्या वेगळ्या निमित्याची गरज नाही. टीव्ही आणि सिनेमासारखी दृकश्राव्य प्रसारमाध्यमे उदंड झाली असल्यामुळे मनोरंजनाची तसेच प्रचाराची भरपूर सोय, किंबहुना त्यांचा अतिरेक झाला आहे, संगणक आणि आंतर्जाल क्रांतीनंतर माहितीचा महापूर आला आहे आणि मोबाईल फोनमुळे संपर्क अत्यंत सुलभ झाला आहे. त्यामुळे जनसंपर्क, ज्ञान आणि मनोरंजन यासाठी गणेशोत्सवामधील मेळ्यांची गरज नाही. तरीसुध्दा गणेशोत्सव साजरे होतच आहेत, शिवाय त्याच्या आकारात अनंतपटीने वाढच होत चालली आहे. याचे कारण म्हणजे हा उत्सव ही या काळातली गरज राहिलेली नसली तरी त्यातून अनेक प्रकारचे लाभ मिळतात. ते पुढील भागात पाहू.





. . . . . . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: