Wednesday, June 29, 2011

तेथे कर माझे जुळती - ८ - श्री.यशवंत देव (उत्तरार्ध)



वाद्यसंगीत किंवा शास्त्रीय संगीतातला तराणा यांना भाषा नसते. ख्यालगायनामध्ये असलेली तीन चार ओळींची बंदिश तासभर घोळवूनसुद्धा अनेक वेळा तिच्यातले सगळे शब्द कळत नाहीत. सुगम संगीतात संगीताबरोबर त्यातील काव्याला महत्व असते. पण शास्त्रीय संगीताच्या मैफलीतले गवय्ये काही वेळा असे गातात की त्या गाण्यातल्या मनाला स्पर्श करणा-या भावनांपेक्षा त्यांचा मालकंस किंवा मारवाच मनाला जास्त भिडतो. श्री.यशवंत देव यांच्या गाण्यामध्ये मात्र नेहमीच शब्दांना पहिला मान मिळतो. 'शब्दप्रधान गायकी' या विषयावर त्यांनी पुस्तकही लिहिले आहे आणि या विषयावर ते प्रात्यक्षिकांसह जाहीर व्याख्याने देत असत. कोणत्याही गाण्यातले शब्द महत्वाचे असतातच, पण फक्त योग्य शब्दरचना करून भागत नाही. त्याच्या उच्चारातील फरकामुळे गाण्यातच नव्हे तर बोलण्यातसुद्धा किती फरक पडतो हे ते अत्यंत मनोरंजक उदाहरणे देऊन दाखवत. त्यातले एक माझ्या अजून लक्षात राहिले आहे. एका वाक्यातले शब्द असे आहेत
हा रामा काल सकाळी का आला नाही?
वेगवेगळ्या शब्दांवर जोर देण्याने त्याचा अर्थ कसा बदलतो पहाः
हा रामा काल सकाळी का आला नाही? ... आलेला रामा वेगळा होता
हा रामा काल सकाळी का आला नाही? ..... गोविंदा कशाला आला?
हा रामा काल सकाळी का आला नाही? ... आज उगवतो आहे किंवा परवाच येऊन गेला
हा रामा काल सकाळी का आला नाही? ...... सायंकाळी किंवा रात्री आला
हा रामा काल सकाळी का आला नाही? .... न येण्याचे कारण काय?

संगीतातले एक मजेदार उदाहरण पहाः तीन वेगवेगळ्या गवयांना चार शब्द दिले होते. रोको मत जाने दो. त्यांनी ते असे गाऊन दाखवले
रोओओओको रोओओओओको रोको, मत जाने दो ....... अरे त्याला थांबवा
रोको मअतअ, रोको मअअअतअ, रोको मअतअ, जाने दो ... त्याला जाऊ द्या ना
रोओओओओकोओओ, मअअअतअ, जाआआनेएए, दोओओ ... काही ही करा

त्यांनी केलेल्या अनेक स्वररचनांमागे त्यानी केलेला विचार व्याख्यानात मांडून त्यातील चालीत किंवा उच्चारात बदल केल्यास त्या गाण्याचा अर्थ किंवा त्यामधील भावांच्या छटा कशा बदलतात हे सविस्तर सांगतांना ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचे. एकाद्या गीताच्या जन्मापासून ते रेकॉर्ड होऊन श्रोत्यांपर्यंत पोचेपर्यंत त्याचा प्रवास कसा होतो याचे मनोरंजक किस्से सांगायचे. हा कार्यक्रम मी टीव्हीवरही पाहिला आणि प्रत्यक्ष समोर बसूनही त्याची मजा घेतली. मला अतीशय आवडलेल्या कार्यक्रमांत तो येतो.

यशवंत देवांनी सुंदर कविता किंवा गीते तर लिहिली आहेतच, अत्यंत मजेदार विडंबने केली आहेत. पत्नीची मुजोरी या नावाने त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे. याबद्दल बोलतांना त्यांनी एकदा सांगितले की ते जेंव्हा गायनाच्या कार्यक्रमांना जात असत तेंव्हा श्रोतेगण त्यांना ज्या फर्माइशी करत त्यातली काही गाणी त्यांची नसायची. त्या गाण्यांचे शब्द, सुरुवातीचे आणि अंत-यांमधले वाद्यसंगीताचे तुकडे, त्यातल्या आलाप, ताना, लकेरी यासारख्या सुरेख खास जागा वगैरे सर्व तपशीलासकट ती गाणी तयार असायची नाहीत आणि ते नसेल तर त्यात मजा येणार नाही. शिवाय त्यांची स्वतःची इतकी सुरेल गाणी असतांना त्यांनी इतरांची गाणी काय म्हणून तयार करून ठेवायची ? पण श्रोत्यांना एकदम नाही म्हणून नाराज करण्यापेक्षा त्यांच्या पदरात काही तरी तत्सम टाकावे म्हणून त्यांनी तत्कालीन लोकप्रिय गाण्यांच्या चालीवर स्वतः गाणी लिहिली आणि ती गायला सुरुवात केली. 'आम्ही जातो आमुच्या गावा' या चित्रपटातले 'देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता उघड दार देवा।' हे गाणे एके काळी तुफान लोकप्रिय होते. त्याच्या चालीवर देवांनी गाणे रचले, 'पत्नीची मुजोरी, घडे नित्य सेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा।' म्हणजे तिजोरीच्या दाराऐवजी स्वर्गाचे दार उघड! गंमत म्हणजे हे गाणे चालले असतांना त्यांच्या सौभाग्यवती करुणाताई बाजूलाच किंवा समोर बसलेल्या असायच्या आणि खिलाडूपणे त्याचा आनंद घ्यायच्या.

आम्ही त्यांच्या निरनिराळ्या कार्यक्रमांना अनेक वेळा उपस्थिती लावली. शक्य तोवर तो चुकवला नाही. 'असे गीत जन्मा येते', 'शब्दप्रधान गायकी' अशासारख्या कार्यक्रमांमध्ये ते जे सोदाहरण गंमतशीर निवेदन करत असत आणि त्यातले सूक्ष्म बारकावे हसत खेळत श्रोत्यांना समजावून सांगत असत त्यामुळे सुगम संगीताकडे पाहण्याची (किंवा ते ऐकण्याची आणि समजून घेण्याची) माझी क्षमता बरीच बदलली. मला पूर्वी माहीत नसलेल्या बारीक सारीक गोष्टींकडे मी लक्षपूर्वक पाहू लागलो. त्यांच्या आस्वादातून मला मिळणारा आनंद अनेकपटीने वाढला. बहुतेक वेळी यशवंत देवांचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही स्टेजवर जाऊन त्यांना भेटून येत असू. अशी असंख्य माणसे त्यांना रोज भेटत असतील. पण ते जुनी ओळख असल्याप्रमाणे आपुलकी दाखवून नेहमी हसतमुखाने आमचा प्रणाम स्वीकारत असत आणि एकाद्या वाक्यातून ती ओळख पटवून देत असत. त्यामुळे आम्हाला धन्य वाटत असे.

त्यांना वयाची सत्तरी ओलांडली तेंव्हा एका मोठ्या सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पण त्यांचा दांडगा उत्साह आणि चपळपणा तरुणांना लाजवण्यासारखा होता. त्या कार्यक्रमाला कलाक्षेत्रातले सारे दिग्गज उपस्थित होते. मंगेश पाडगावकर, अरुण दाते, व.पु.काळे, पुरुषोत्तम दारव्हेकर ही नावे मला आठवतात, कदाचित अजूनही काही मोठे लोक असतील. यशवंत देवांना अभीष्टचिंतन करतांना त्या सर्वांनी एकमुखाने म्हंटले, 'दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचुन झुलायचे।' यावेळी बोलतांना दारव्हेकर मास्तरांनी एक जुना किस्सा ऐकवला. त्या काळात ते आणि यशवंत देव नागपूरला आकाशवाणीवर काम करत होते. एकदा संगीतकार जोग यांनी यशवंत देवांना अंतर्देशीय पत्रातून नव्या गाण्यासाठी स्वरलिपीतून काही ओळी लिहून पाठवल्या आणि त्यावर योग्य असे गाणे लिहायला सांगितले. त्या 'दुरुन' पोस्टाने आलेल्या चालीवर देवांनी गीत लिहून सादर केले, 'स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी।'

यशवंत देवांच्या अशा खूप आठवणी स्मृतीच्या कप्प्यात साठवून ठेवल्या आहेत. हा लेख लिहिण्याच्या निमित्यांने त्यांना उजाळा मिळाला.

1 comment:

प्रमोद देव said...

वा आनंदराव! अतिशय सुंदर शब्दात देवांविषयी लिहिलं आहे तुम्ही...देवांचा कार्यक्रम उभा राहिला डोळ्यासमोर!