Saturday, June 18, 2011

सत्यसाईबाबा आणि ओसामा!

जुनी झालेली वर्तमानपत्रे रद्दीवाल्याला देण्यापूर्वी त्यांच्या मुखपृष्ठावरील ठळक मथळ्यावरून एकदा ओझरती नजर फिरवायची मला सवय आहे. त्यामुळे नजिकच्या गतकालात महत्वाचे असे काय काय घडले याची थोडक्यात उजळणी होते. मागच्या महिन्यात हे करत असतांना मला जाणवले की 'भगवान श्री सत्यसाईबाबा' आणि 'दहशतवाद्यांचा मुकुटमणी ओसामा बिन लादेन' यांच्या मृत्यूविषयक बातम्यांनी त्यातला काही काळ सारी वर्तमानपत्रे ओसंडून वाहात होती. एकमेकाशी कसलाच संबंध नसलेल्या पण एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांनी वृत्तप्रसारणाच्या माध्यमांना व्यापून टाकले होते. या दोन्ही घटनांमध्ये खूप फरक होता आणि काही साम्यस्थळेसुद्धा दिसत होती.

सत्यसाईबाबांना रुग्णालयात ठेवले गेल्यापासून त्यांच्या प्रकृतीसंबंधीचे ताजे वृत्तांत (न्यूज बुलेटिन्स) तासा तासाला टीव्हीवर आणि रोजच्या वर्तमानपत्रांमध्ये ठळकपणे येत होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी पुट्टपार्थीला लक्षावधी भक्त जमा झाले होते. त्यांची गर्दी अनावर झाल्यामुळे पोलिसांना १४४ कलमाखाली संचारबंदी लावावी लागली होती. त्यांना दीर्घायुष्य चिंतण्यासाठी गावोगावी यज्ञयाग जपतप अनुष्ठाने वगैरे होत होती. सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले होते. त्यांच्यासंबंधातली कोणतीही बातमी लगेच उचलून तिचे प्रसारण करण्यासाठी माध्यमांच्या सर्व शक्ती एकवटल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातमीने कोणाला आश्चर्याचा धक्का बसण्याचे कारण नव्हते. ओसामा बिन लादेन याचा अमेरिकन जवानांनी खातमा केल्याचे त्रोटक वृत्त प्रत्यक्ष अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी ते उचलले आणि जगभर पसरवले. अचानक आलेली ही बातमी मात्र खूप धक्कादायक होती असे म्हणता येईल. त्यानंतरसुद्धा अमेरिकेचे प्रवक्ते सांगतील तेच प्रसिद्ध होत होते. चौकस बातमीदारांच्या (इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिस्ट्स) प्रयत्नामधून त्यावर फारसा वेगळा प्रकाश पडलाच नाही.

सत्यसाईबाबांचे नाव मी सर्वात पहिल्यांदा ऐकले तेंव्हाच ते चमत्कारी बाबा म्हणून सर्वश्रुत झाले होते. त्यांच्या भक्तांची आणि चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. मोठमोठे नेते, अभिनेते, खेळाडू, अधिकारी वगैरे प्रसिद्ध व्यक्तींची गणना त्यात होऊ लागली. त्यांच्या दर्शनासाठी धडपडणार्‍या लोकांची संख्या वाढत गेली. बाबा नेहमी झगझमगीत प्रकाशाच्या झोतामध्ये राहिले. त्यांच्या अंत्ययात्रेला जेवढ्या अतिविशिष्ट व्यक्ती उपस्थित राहिल्या होत्या तेवढ्या क्वचितच कोणासाठी एकत्र येत असतील. त्यांच्या अंत्यविधीचे थेट प्रक्षेपण अनेक वाहिन्यांवरून होत होते. ते अगणित भाविकांनी पाहिले असणार. ओसामाचे नाव मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा तो भूमीगत झालेला होता. त्याचे नाव मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये आले होते. काही राज्यकर्त्यांचा त्याला प्रच्छन्न पाठिंबा आणि संरक्षण असल्याचे बोलले जात असले तरी तो अज्ञातवासातच राहून त्याच्या प्रक्षोभक भाषणांच्या सीडींमधून जगासमोर येत होता. त्याला मारणारे सोडून इतर कोणी त्याच्या अखेरच्या क्षणी त्याच्यापाशी नव्हते. त्याचा दफनविधी गुपचुप पार पाडला गेला. सत्यसाईबाबा आणि ओसामा यांच्यापैकी एक नेहमी डोळ्यांसमोर तर दुसरा नजरेआड राहात होता.

सत्यसाईबाबांविषयी नितांत श्रद्धा बाळगणार्‍यांची संख्या प्रचंड होती. ही अंधश्रद्धा आहे, त्यांचे चमत्कार म्हणजे हातचलाखी आहे हे सप्रमाण दाखवण्याच्या अंनिससारख्यांच्या प्रयत्नांचा त्यावर काही प्रभाव पडू शकला नाही. त्यांची गोम जाणणार्‍या विज्ञाननिष्ठ लोकांना त्यांच्याबद्दल अविश्वास नक्कीच वाटायचा, कदाचित तिटकारा वाटत असेल, इतर अनेकांना असूया वाटत असेल, माझ्यासारख्या अनेकांना आश्चर्य वाटायचे, पण कोणीही त्यांचा द्वेष करत असेल असे मला वाटत नाही. त्यांचे भक्त नसलेल्या लोकांनीसुद्धा त्यांनी चालवलेल्या शिक्षणसंस्था, इस्पितळे वगैरेंचा लाभ घेतलेला असणार. त्याबद्दल ते लोक त्यांच्या संस्थांचे उपकृत झाले असतील. ओसामाबद्दल मात्र घृणा, संताप, भीती, दहशत अशा नकारात्मक भावना मनात बाळगणार्‍यांची संख्या त्याच्याविषयी आदर वाटणार्‍यांच्या कित्येकपटीने मोठी असेल. काही जणांना कदाचित यातले काहीच फारशा तीव्रतेने वाटत नसले तरीही बातम्या वाचणार्‍या किंवा पाहणार्‍या एकूण एक लोकांच्या मनात या दोघांच्याहीबद्दल खूप कुतूहल तरी असणार यात शंका नाही. यामुळेच या दोघांच्याही निधनाची बातमी पहिल्या पानावर आठ कलमी शीर्षकासह छापून आली होती. प्रत्येक वाचक किंवा प्रेक्षक या बातमीकडे आकर्षित होणारच याची वर्तमानपत्रांना खात्री होती. प्रत्यक्षात ते दोघे जगासमोर वावरत असोत किंवा पडद्याआडून कारवाया करत असोत, या ना त्या कारणाने बातम्यांच्या विश्वामध्ये त्यांचा उल्लेख वर्षानुवर्षे सारखा होत असे. हे त्यांच्यामधले साम्य होते.

त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीमध्ये त्यांनी आपापल्या कामात घेतलेला धार्मिकतेचा आधार हा अतिशय महत्त्वाचा घटक होता. होता. "सामर्थ्य आहे चळवळीचे, जे जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे" असे समर्थ रामदासांनी लिहिले आहे, तर "धर्म ही अफूची गोळी आहे" असे प्रतिपादन माओझेदुंग याने केले आहे. सत्यसाईबाबा आणि ओसामा यांच्याकडे पाहतांना या दोन्ही उक्तींची आठवण येते. जगातील प्रत्येक घटना इन्शाल्ला म्हणजे ईश्वरेच्छेनुसारच घडत असते असे सांगत असतांना आपण करत असलेले विघातक काम देखील 'तो'च आपल्याकडून करवून घेत आहे. ते करणार्‍याचे रक्षण 'तो'च करेल, त्याची आणि त्याच्या कुटुंबाची काळजी 'तो'च घेईल, 'त्या'चे काम करत असतांना एकाद्याला मरण आले तरी त्याउपरांत त्याला शाश्वत अशा स्वर्गात नक्की जागा मिळणार याची खात्री बाळगा, 'त्या'ला विरोध करणार्‍यांचा नायनाट होईल, त्यांची गय केली जाणार नाही अशा प्रकारची शिकवण देत असतांना दहशतवादाला सुद्धा 'परमेश्वराचे अधिष्ठान' असल्याचा भास ओसामा करून देत असे. सत्यसाईबाबा तर स्वतःच 'भगवान' असल्याचे सांगितले जात होते. चमत्कृतींच्या द्वारे ते भाविकांना पटवून दिल्यानंतर दुसर्‍या कोणा भगवंताच्या अधिष्ठानाची त्यांना आवश्यकताच नव्हती. परमेश्वराच्या फक्त नावाच्या बळावर या दोघांनी आपापल्या चळवळींचे सामर्थ्य कल्पनातीत पातळीपर्यंत वाढवले होते.

अफूसारख्या मादक पदार्थाचे सेवन केल्याने माणसाची विचारशक्ती क्षीण होते, त्याचे भान हरपते, त्याचे व्यसन जडते वगैरे परिणाम होतात. प्रामुख्याने वैज्ञानिकांच्या वसाहतीत होत असलेल्या एका साईभजनाला जाण्याची संधी एकदा मला मिळाली होती. इतर विषयांवर एरवी तर्कसंगत विचार मांडणार्‍या काही बुद्धीमान लोकांना साईचरणी लीन होऊन त्याच्या भजनांमध्ये उन्मन अवस्थेत गेलेले पाहिल्यावर मला माओचे वचन आठवले. थोर संतविभूतींप्रमाणे सत्यसाईबाबांनी महान चिरंतन असे विचार मांडले असे मी कधी ऐकले नाही. तरीही एवढी मोठमोठी मंडळी त्यांच्या भजनी का लागावी याचे गूढ काही माझ्याने उलगडत नाही. कदाचित माओच्या सांगण्यात तथ्य असावे. ओसामाच्या अनुयायांना याचा एवढा मोठा डोस दिला जातो की मानवता, सौजन्य, सारासार विचार यासारखे संस्कृतीतून येणारे त्यांच्यातले गुण तर नाहीसे होतातच, स्वसंरक्षणासारखे नैसर्गिक विचारही ते गमावून बसतात आणि जिवाची पर्वा न करता काहीही करायला तयार होतात. आत्मघातकी हल्ला करण्यामागचे यावेगळे स्पष्टीकरण मला सापडत नाही.

कमालीचे संघटनाकौशल्य हे आणखी एक साम्य या दोन व्यक्तींमध्ये होते. त्यांनी शून्यातून उभी केलेली साम्राज्ये किती मोठी होती आणि त्यांची मुळे कुठपर्यंत रुजली किंवा पसरली आहेत याचा अंदाजच येत नाही. हे काम एकटा दुकटा करू शकत नाही. आपल्या संघटनांचा विस्तार एवढा वाढवणे आणि तरीही त्यांचे सगळे नियंत्रण आपल्या मुठीत ठेवणे यासाठी असामान्य क्षमता लागते. अतिशय हुषार, कष्टाळू, कल्पक आणि एकनिष्ठ असे सहकारी निवडून गोळा करणे, त्यांना आयुष्यभर जवळ बाळगणे. त्यांच्या सहाय्याने दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या वगैरे अनेक स्तरांवरील फळ्या उभारून त्यांचे घट्ट जाळे विणणे, जगभरात अनेक ठिकाणी विधायक कामे किंवा विघातक कृत्ये घडवून आणण्यासाठी तपशीलवार पूर्वनियोजन करणे, त्याची अंमलबजावणी करायचे काम निवडक लोकांवर सोपवणे वगैरे वगैरे अनेक कामे हे लोक कसे करत असतील याचा विचार मनाला थक्क करतो. कदाचित त्यांच्या नावाने भलतेच कोणी हे सगळे करत असतील अशा अफवा अधून मधून उठत असत. ओसामाच्या बाबतीत हे जरा जास्तच होत असे. कदाचित इतर काही लोकांनी केलेली कार्ये किंवा उठाठेवी यांच्या नावावर परस्पर खपवल्या जात असल्याची शक्यता असते. पारदर्शकता कमी असली तर त्यातून संशयाला जागा निर्माण होते. पण या दोन सुपरमॅन्सबद्दल जेवढी हवा निर्माण केली गेली ती पाहता ते जर खरेच असेल तर त्यांचे कौशल्य कल्पनातीत वाटते.

सत्यसाईबाबा आणि ओसामा या दोन दिवंगत व्यक्तींबद्दल अनेक दिवस पानेच्या पाने भरून मजकूर छापून येत होता. मला जाणवलेल्या त्यातल्या काही ठळक मुद्द्यांचा थोडक्यात परामर्ष घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

No comments: