Wednesday, March 09, 2011

महिला दिवस जिंदाबाद, थँक यू गूगल !

जागतिक महिला दिवस आणि गूगल सर्च या दोन गोष्टींचा आपसात काय संबंध असेल? बुचकळ्यात पडलात ना? माझ्या बाबतीत त्यांचा एकमेकांशी संबंध येणार आहे असे मलासुध्दा कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पण अचानक तो आलेला दिसला, तेंव्हा त्याबद्दल लिहायला एक आयता विषय मिळाला.

कोणी एकादे चिटोरे लिहिले तरी दुस-या कोणीतरी ते वाचावे हा उद्देश ते चिटोरे लिहिणा-याच्या मनात असतो. ते चिटोरे त्या संभाव्य वाचकापर्यंत पोचवण्याची तजवीज तो करतो. एवढे दिवस या ब्लॉगवर मी फक्त स्वांतसुखाय, म्हणजे आपल्या मनाच्या समाधानासाठी (त्याची लिहिण्याची हौस भागवण्यासाठी) लिहितो आहे असे जरी मी इतरांना सांगितले तरी आपल्या मनाचे काय? दुस-या कोणी ना कोणी आपले लेखन वाचावे असे त्या मनालासुध्दा वाटत राहते त्याचे काय करणार? ते वाचले जात असल्याचे जोपर्यंत मनाला समजत नव्हते तोपर्यंत ते अस्वस्थ रहायचे. हा अट्टाहास कशासाठी करायचा असा प्रश्न स्वतःलाच विचारून त्याचे समर्पक उत्तर न मिळाल्याने ते बेचैन होत असे. इंटरनेटवरील स्थळांना भेट देणा-या लोकांची गणना करण्याचे तंत्र विकसित झाले आणि आपल्या स्थळाला भेट देणा-यांचा आकडा समजण्याची सोय झाली तेंव्हा त्यातून मनाला दिलासा मिळावा म्हणून मीही त्या यंत्रणेचा उपयोग करून घेतला. जालावर भटकतांना इथपर्यंत आलेल्या लोकांपैकी काहीजण तरी या पानावर लिहिलेला मजकूर वाचून पहात असतील या कल्पनेने मनाला बरे वाटायला लागले.

दरवेळी नवा भाग लिहिण्यासाठी या ब्लॉगचे पान उघडले की इथे येऊन गेलेल्या पाहुण्यांचा आकडा ठळकपणे दिसतो. दिवसाला शंभर दीडशेने तो वाढतांना पाहून मनाचे समाधान होत होते. पण काल मी हे पान उघडले तेंव्हा त्या आकड्यात एकदम सातआठशेची घसघशीत वाढ झालेली पाहून थोडा धक्का बसला. गेले काही दिवस मी संस्कृत, संस्कृती यासारख्या रुक्ष विषयावर लिहीत असल्यामुळे ते आवर्जून वाचावे असे खूप लोकांना वाटेल अशी आशा नव्हती. माझ्या ब्लॉगचा टीआरपी किंचित कमीच होत चालला आहे असे वाटत होते. मग त्याने एकदम अशी उसळी कशी मारली हे एक गूढ होते.

आजचे वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असते असे एक सुवचन आहे. ब्लॉगच्या बाबतीतसुध्दा ते लागू पडते अशी सर्वसाधारण समजूत आहे. रोजच्या रोज त्या दिवसाच्या तात्कालिक विषयावर लिहिल्या जाणा-या ब्लॉगला भेट देणारे रोज नवे लिखाण वाचण्यासाठीच येत असतात. नेदर्लंडबरोबर काल झालेल्या मॅचमध्ये आपल्या क्रिकेटवीरांनी काय कर्तृत्व गाजवले हे उद्यापरवा कोणीसुध्दा वाचणार नाही. याच कसोटीवर पाहता माझ्या ब्लॉगला भेट देणा-यांची संख्या अचानक कशी वाढली याचे मलासुध्दा आश्चर्य वाटले.

ब्लॉगरने आता स्वतःचे स्टॅटिस्टिक्स द्यायला सुरुवात केली आहे. त्यावर नजर टाकल्यावर या गूढाचा उलगडा झाला. आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्य यंदा मी काहीच लिहिले नव्हते. पण मागील दोन वर्षांमध्ये लिहिलेल्या लिखाणाला सहाशेहून जास्त लोकांनी गेल्या दोन दिवसात भेटी दिल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी मी काही लिहिले होते त्याची मला आता आठवण नसली तरी गूगलसर्चने ते शोधून काढून त्याचे धागे दिले आणि ते पकडून वाचकांनी त्यावर टिचकी मारली हे पाहून मी थक्क तर झालोच तसेच मला खूप आनंदसुध्दा झाला. गूगलमध्ये शोध घेतांना असंख्य नोंदी सापडतात, पण त्यातल्या फक्त पहिल्या काही नोंदींचे धागे येतात. त्यानंतर पुढे पुढे जाऊन शोध घ्यावा लागतो. हा क्रम कोठल्या निकषावर लागतो हे मला माहीत नाही. पण या वेळी मला त्यातून नक्कीच अनपेक्षित लाभ झाला यात शंका नाही.
यासाठी गूगलचे धन्यवाद

No comments: