Tuesday, March 08, 2011

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ७ (अंतिम)

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ७ (अंतिम)

संस्कृतीची एक अत्यंत सोपी व्याख्या मला कॉलेजात असतांना मिळाली होती आणि ती अजून माझ्या लक्षात राहिली आहे. निसर्गनिर्मिति म्हणजे 'प्रकृति', त्यातली सुधारणा ही 'संस्कृति' आणि बिघाड म्हणजे 'विकृति' अशा त्या व्याख्या होत्या. संस्कृति या संस्कृत भाषेमधील शब्दाचा मूळ अर्थ कदाचित तसा असावा. माणसांच्या बाबतीत पाहिल्यास बालकात असलेला निरागस मनमौजीपणा ही त्याची प्रकृती, मोठे होतांना अंगात बाणवलेली संयमी आणि परोपकारी वृत्ती वगैरे संस्कृती आणि मनात भिनलेला दुष्टपणा, क्रौर्य ही विकृती असे मी समजत आलो आहे. संस्कृति हा शब्द मराठी भाषेत बोलला जातांना मला तरी 'संस्कृती' असाच ऐकू येतो. यामुळे मी तो तसा लिहिला आहे. आज त्याला इतर काही अर्थ चिकटले आहेत.

वन्य पशूंप्रमाणे अन्नाच्या शोधात रानोमाळ भटकत फिरणारे आदिमानव एका जागी राहून शेती, पशुपालन, उद्योगधंदे वगैरे करू लागले, रानटी टोळ्यांचे रूपांतर सभ्य समाजात झाले हा सिव्हिलायझेशनचा भाग होता. मिळालेल्या स्थैर्याचा फायदा घेऊन त्यांनी साहित्य, संगीत, कला आदिमध्ये प्रगती करून आपल्या जीवनाचा स्तर उंचावला हे कल्चरमध्ये येते. भाकरी व फूल याविषयीच्या एका सुप्रसिध्द जुन्या चिनी उक्तीचा आधार घेतला तर सिव्हिलायझेशनचा संबंध मुख्यतः भाकरीशी आणि कल्चरचा फुलाशी होता. धर्म, न्याय, विज्ञान, तंत्रज्ञान आदि गोष्टींची गरज आणि उपयुक्तता दोन्ही बाबतीत होती. संस्कृतीच्या आजच्या कक्षा इतक्या रुंदावल्या आहेत की या सगळ्यांचा समावेश त्यात केला जातो.

देश, वंश, भाषा, धर्म वगैरेंबरोबर चालीरीती, रूढी वगैरे बदलत असतात. जाती, पोटजातींमध्ये सुध्दा काही बाबतीत त्या वेगळ्या असतात. कधीकधी त्यावरून 'त्यां'ची संस्कृती वेगळी आहे असे म्हंटले जाते तर कधीकधी "थोडा फरक असला तरी तेसुध्दा मराठीच किंवा भारतीयच आहेत" असेही सांगतात. आपल्यातलाच एकादा माणूस जेंव्हा धक्कादायक पध्दतीने वागतो तेंव्हा "त्यांच्या घरातले सगळे असलेच आहेत." असे म्हणून त्यांच्या घरापुरती एक वेगळी संस्कृती असल्याचे दाखवले जाते. दोन समाजांमधला फरक किती सेंटीमीटर किंवा अंशांपेक्षा अधिक असल्यास त्यांच्या संस्कृती वेगळ्या आहेत असे समजावे असे त्याचे मोजमाप नाही. प्रत्येकजण वेळोवेळी निरनिराळ्या फूटपट्ट्या वापरतांना दिसतो.

संस्कृति या विषयावर आंतरजालावर उत्खनन करतांना एक धागा सापडला. विशेषतः वैदिक संस्कृतीचा मला काहीच गंध नव्हता. तिच्याबद्दल कुतूहल असल्यामुळे वाचून पाहिला. त्यात असे लिहिले आहे.
"वैदिक संस्कृति ही आजच्या भारतीय संस्कृतीहून मी निराळी समजतो. आज एकंदर सव्वाशे संस्कृति जगतीतलावर प्रतिष्ठित आहेत असे तज्ज्ञ मानतात. वैदिक संस्कृति ही त्या ‘अनेकातली एक’ संस्कृति नव्हे. सर्व संस्कृतींना अधिष्ठानभूत असणारी जी एक संस्कृति तिचे नाव वैदिक संस्कृति असे आहे. एखाद्या कालखंडापुरती, स्थल-विशेष-निष्ठ अशी ही संस्कृति नव्हे. डॉ.स्पेंग्लर या सुप्रसिद्ध जर्मन पंडिताने सुचविलेले संस्कृतीचे नियम व अनु्क्रम वैदिक संस्कृतीला लागू होत नाहीत. जणू काय, जायते, अस्ति, वधते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यति हे षड्‍-विकार प्रत्येक संस्कृतिला अनिवार्य आहेत, असे स्पेंग्लर म्हणतो. प्रत्येक संस्कृति ही एक सजीव प्रकृति (Organism) आहे व वरील अवस्थांमधून जाणे तिला अपरिहार्य आहे. भारतीय संस्कृति ही विनाशोन्मुख झाली आहे, असेही त्याचे एक विधान आहे. ते अल्प अर्थाने खरेही असेल. पण वैदिक संस्कृति ही अमर आहे, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.
वैदिक संस्कृति ही आदर्श संस्कृति होय. प्रज्ञान, समता, विश्वाचे ईशावास्यत्व हे वैदिक संस्कृतिचे व्यावर्तक त्रैगुण्य आहे. ज्या संस्कृतीत ही वैशिष्ट्ये आहेत ती संस्कृति वैदिक संस्कृतीची प्रतिनिधी आहे. मानवकुल एक आहे. मानवी संस्कृति एकच आहे. आचारविचारांच्या गौण वैशिष्ट्यांमुळे निष्पन्न होणारी सांस्कृतिक विविधता ही मूलभूत एकात्मतेला संपन्नता आणणारी आहे, नष्ट करणारी नव्हे."
- धुं. गो. विनोद
वैदिक संस्कृति किती महान होती हे वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोतच. तिलाच प्राचीन भारतीय संस्कृती म्हणतात असे वाटले होते. तिच्या स्वरूपाबद्दल किंवा वैशिष्ट्यांबद्दल मला तरी यातून काहीही बोध झाला नाही. ती आपण स्वतःच अजरामर असल्यामुळे कोणीही तिची काळजी करण्याचे कारण नाही इतके समजले.

संस्कारांमुळे चांगला बदल होतो. या अर्थानेच 'संस्करण' हा शब्द शोधून काढला असावा किंवा निर्माण केला गेला असावा. पुस्तकाच्या 'एडिशन' साठी 'आवृत्ती' हा शब्द प्रचलित आहे. पण आवृत्ती म्हणजे ती जशीच्या तशी 'पुनरावृत्ती' असावी असे वाटते. पूर्वीच्या आवृत्तीमधल्या चुका दुरुस्त कराव्या, पुस्तकाचे रूप अधिक आकर्षक आणि वाचनीय करावे वगैरे उद्देशाने नव्या आवृत्तीमध्ये बदल केले जात असतात. त्यामुळे 'सुधारलेली आवृत्ती' असेही लिहिले जाते. हिंदी भाषेतील पुस्तकांच्या नव्या एडीशनला 'संस्करण' म्हणतात. मला हा शब्द जास्त समर्पक वाटतो. ज्या काळात संस्कृत भाषा बोलली जात असे त्या काळात छापखाने नव्हते आणि ग्रंथांच्या प्रती हातानेच काढाव्या लागत असत. त्या काळात या दृष्टीने संस्करण या शब्दाला अर्थ नव्हता. त्यामुळे तो शब्द प्रचारात तरी होता की नाही कुणास ठाऊक. असलाच तर त्याचा त्या काळातल्या संदर्भात निराळा अर्थ असण्याची शक्यता आहे.

संस्कृत, संस्कृति किंवा संस्कृती, संस्कार आणि संस्करण या शब्दांशी माझा जेवढा अल्पसा संबंध आला त्यावरून एवढे लिहून ही लांबलेली मालिका संपवत आहे.

. . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

No comments: