Saturday, February 19, 2011

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - २

आपल्याला जे काही थोडे फार येत असेल त्याचा उपयोग करून घेण्याकडे माझा पहिल्यापासून कल असायचा. तो प्रयत्न करतांना आणखी काही वेगळे शिकायची गरज पडत असे, ते शिकण्याची संधी मिळत असे आणि मी तिचा लाभ घेत गेलो. केवळ पोपटपंची करण्यासाठी घोकंपट्टी करणे मला पसंत नव्हते. शिकलेले विषय समजून घेऊन लक्षात ठेवणे आणि त्यांचा जमेल तसा उपयोग करणे यावर माझा भर होता. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करू लागल्यानंतर तर रोजच नवनव्या तांत्रिक गोष्टी नजरेसमोर येत असत आणि त्या आत्मसात करणे आवश्यक असल्यामुळे कामाशिवाय अवांतर पाठांतर करायला वाव उरला नाही आणि संस्कृत भाषेचे अध्ययन थांबले. मी रहात असलेल्या कोणत्याच भागात संस्कृत ही भाषा बोलली जात नव्हती.

घरात किंवा एकाद्या देवळात चाललेली पूजा अर्चा पाहतांना त्यावेळी म्हंटले जात असलेले संस्कृत मंत्र कानावर पडायचे. संस्कृतचा थोडा अभ्यास केल्यानंतरच्य़ा काळात त्या मंत्रांचा उच्चार स्पष्ट ऐकू आला तर त्यातली सोपी वाक्ये समजायला लागली. वाढत्या वयानुसार केलेल्या अवांतर वाचनातून नव्या विचारांची शिंगे फुटायला लागली होती. "आपल्याला अमूक मिळावे यासाठी आपण तमूक विधी करणार आहोत" असा संकल्प त्या सर्वव्यापी सर्वज्ञ परमेश्वराला सांगायचा आणि सर्व जगाच्या कर्त्याकरवत्याकडे "मी तुझ्यासाठी हे करतो आहे, तेंव्हा तू माझ्यासाठी एवढे कर" अशी प्रार्थना करायची, त्यानंतर "आता मी त्या देवाला स्नान घालतो", "त्याला चंदन लावतो", "फुले वाहतो", नैवेद्य देतो", "दिवा दाखवतो", "धूपाचा सुवास देतो", "त्याचे ध्यान करतो" वगैरे गोष्टी त्याला सांगून करायच्या हे जरासे विसंगत वाटू लागले. परमेश्वराबरोबर करण्याचे हे सगळे संभाषण संस्कृत भाषेतच कशाला करायला हवे असा प्रश्न पडू लागला. मोठेपणी मी या पारंपारिक धर्म किंवा कर्ममार्गाने फारशी वाटचाल केली नाही. अशा प्रकारे माझ्या रोजच्या जीवनात संवाद, लेखन, वाचन यातल्या कुठल्याच मार्गाने संस्कृत भाषेचा उपयोग केला जात नव्हता.

एका परीने मी संस्कृत भाषेकडे अशी पाठ फिरवली असली तरी ती मात्र माझ्या पाठीशी अगदी मला खेटून उभी आहे असे गेली पन्नास वर्षे मला नेहमी जाणवत राहिले आहे. किंबहुना मी तिच्यापासून कधीच दूर गेलो नव्हतो. घरात आणि नातेवाइकांशी होणारे सर्व बोलणे मातृभाषेत होते आणि बाहेरच्या जगाशी होत असलेला संपर्क मुख्यःत्वे राष्ट्रभाषेत होतो. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांची जननी असलेल्या संस्कृत भाषेमधील असंख्य शब्दप्रयोग त्यात सारखे येतच असतात. आजीच्या घरात आपण रहात नसलो तरी तिच्याबद्दल अतीव आपुलकी वाटते, तिच्या आठवणी, तिचे संदर्भ नेहमी निघतच असतात. असेच काहीसे हे आहे. शिवाय या समानतेमुळे यातली एक भाषा चांगली येत असेल तर दुसरी भाषा समजण्याला त्याची खूप मदत होते.

याशिवाय संस्कृत भाषेचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे नवे शब्द निर्माण करण्याचे तिचे सामर्थ्य. माझ्या लहानपणाच्या काळानंतर गेल्या पन्नास वर्षात विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली, रहाणीमानात मोठे बदल झाले, कुटुंबसंस्था, सामाजिक वातावरण, राजकीय परिस्थिती वगैरेंमध्ये बदल झाले. त्यांच्यासोबतीने अनेक नवे शब्दप्रयोग आले. काँप्यूटर, इंटरनेट, व्हायरस यासारख्या नव्या शब्दांसाठी संगणक, आंतर्जाल, विषाणू यासारखे प्रतिशब्द तयार झाले. मराठी आणि हिंदीमधून राज्यकारभार करणे सुरू झाल्यानंतर आयुक्त, उपमहानिरीक्षक, कार्यकारी अभियंता वगैरे नावांची पदे निर्माण झाली. असले बहुतेक सगळे नवे शब्द संस्कृतजन्य आहेत. ज्या काळात संस्कृत ही भाषा बोलली जात होती त्या युगात या शब्दांची गरज नव्हती. त्यामुळे प्राचीन वाङ्मयात हे शब्द दिसणार नाहीत. संस्कृत भाषेच्या मूळ शब्दकोशांमध्ये ते सापडणार नाहीत. पण मराठी, हिंदी या सारख्या संस्कृतजन्य भाषांमध्ये असे नवे शब्द निर्माण करण्यासाठी आणि प्रचलित करण्यासाठी त्या प्राचीन भाषेचा उपयोग केला गेला आणि केला जात आहे. मुलगी मोठी होऊन सासरी नांदायला गेल्यानंतरसुध्दा तिची आई तिला अधून मधून काहीबाही देतच असते आणि गरज पडल्यावर मुलगी आपल्या आईकडे आधारासाठी पाहतेच ना? भारतीय भाषांच्या बाबतीत ही गोष्ट जास्त मोठ्या प्रमाणात होतांना दिसते. सर्वांना मान्य होतील असे नवे शब्द तयार करतांना बहुतेक वेळी संस्कृत भाषेवचाच आधार घेतला जातो.

सिंधूदुर्गपासून गोंदियापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणा-या बोलीभाषांमध्ये निरनिराळ्या स्थानिक शब्दांचा वापर होत असतो. एका भागातले खास शब्द बरेच वेळा दुस-या भागातील लोकांना अपरिचित असतात. हिंदी भाषा बोलणा-या प्रदेशाचा विस्तार तर खूपच मोठा आहे. शिवाय वैराण वाळवंट, घनदाट वनराई, उत्तुंग हिमशिखरे आणि समतल भूमी असे विविध प्रकारचे भौगोलिक प्रदेश त्यात येतात. अर्थातच त्या भागांमध्ये बोलल्या जाणा-या बोलींमध्ये जास्त वैविध्य आहे. पण दोन्ही भाषांच्या बाबतीत असे दिसते की देशातच नव्हे तर आता जगभर पसरलेल्या सुशिक्षित लोकांना समजतील अशा ज्या प्रमाणभाषा तयार केल्या गेल्या आहेत, शासकीय व्यवस्थेमध्ये ज्यांचा उपयोग केला जात आहे, मुद्रणतंत्रज्ञानाचा विकास झाल्यानंतर ज्या प्रमाणभाषांमध्ये अधिकाधिक लेखन केले जात आहे. त्या अधिकृत भाषांवर असलेला संस्कृतचा प्रभाव जाणवल्याशिवाय रहात नाही.

मी लहानपणी शिकलेले संस्कृत भाषेचे व्याकरण आतापर्यंत विसरून गेलो आहे. त्या भाषेत मला कदाचित आज एकादेही व्याकरणशुध्द वाक्य लिहिता येणार नाही. बोलण्याचा तर प्रयत्नसुध्दा मी कधीच केला नव्हता. पण या लेखातल्या वाक्यावाक्यांमध्ये संस्कृत भाषेमधून घेतलेल्या शब्दांची रेलचेल केलेली आणि ती मराठीमध्ये सहज खपून गेलेली दिसेल.

. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: