Tuesday, February 15, 2011

संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - १

माझ्या लहानपणापर्यंत सुलभपणे मराठी भाषेची लिपी शिकण्यासाठी 'गमभन'चा शोध लागला नव्हता. सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात 'श्रीगणेशा'ने होत असे. 'श्रीगणेशा' म्हणजेच 'शुभारंभ' असा मुळी एक वाक्प्रचारच आहे. त्याप्रमाणे लेखन व वाचनाच्या शिक्षणाची सुरुवातसुध्दा 'श्रीगणेशायनमः' या वाक्याने होत असे. त्याचा उच्चार तेंव्हा श्रीगणेशायन्महा असा व्हायचा. श्रीश्री, गग करत एक एक करून सावकाशपणे श्री ग णे शा य न मः ही सारी अक्षरे शिकून झाल्यानंतर अआइई, कखगघ वगैरे मुळाक्षरे शिकायला मिळाली. पण अक्षरज्ञान होण्याच्याही आधीच रोज संध्याकाळी 'शुभंकरोती' म्हणायची संवय मला लावली गेली होती. घरातली सगळी मुले, म्हणजे माझी मोठी भावंडे तीन्ही सांजा होऊन गेल्यावर एकत्र बसून 'शुभंकरोती कल्याणम्', 'वक्रतुंड महाकाय', 'गणनाथ सरस्वती' वगैरे श्लोक म्हणायचे. ते रोज ऐकून मला तोंडपाठ झाले होते आणि मी सुध्दा रोज त्या सामूहिक पठणात सामील होत असे. अशा प्रकारे मला कळायला लागण्याच्या आधीच संस्कृत भाषेची थोडीशी ओळख झाली होती. फक्त त्याला 'संस्कृत' म्हणतात हे ठाऊक नव्हते. हे सगळे म्हणजे 'देवबाप्पाची प्रार्थना' आहे, मुलांनी रोज ती करायची असते आणि ती केल्यामुळे तो बाप्पा आपल्याला 'चांगली बुध्दी' देतो आणिकही आपले सगळे काही चांगले करतो असे एक कारण त्यासाठी दिले जात असे आणि बालमनाला त्याचीही गरज नव्हती. आई सांगेल ते ऐकायचे एवढेच कारण पुरेसे होते.

संस्कृतातले हे श्लोक म्हणायला येऊ लागल्यानंतर वाढत्या वयानुसार त्यात रामरक्षा, गणपतीअथर्वशीर्ष वगैरेंची भर पडत गेली. 'ध्यायेदाजानुभावम् धृतशरधनुष्यम् बध्दपद्मासनस्थम्' अशासारखे जोडाक्षरांनी युक्त शब्दसमूह एका दमात आणि चालीवर म्हणण्यामुळे जीभ लवचीक होते, नाहीतर ती जड होते, तसेच अशा पठणातून छातीला व्यायाम मिळतो वगैरे त्यापासून असलेले इतर फायदेही सांगत असत. शिवाय त्या काळात अंधा-या रात्री हे श्लोक म्हणजे भुताखेतांपासून आपले संरक्षण करण्याचे प्रमुख साधन होते. लहान गावात विजेचा प्रसार फारसा न झाल्यामुळे रस्त्यात नेहमी अंधारगुडुप असायचाच, घरातसुध्दा अनेक वेळा अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे भुते, हडळी, पिशाच, समंध वगैरेंना मनसोक्तपणे हिंडायला मोकळे रान मिळत होते आणि कोणाकोणाला कसला कसला भास झाल्याच्या सुरस कथा नेहमी ऐकायला मिळत असत. त्यामुळे अशा श्लोकांपासून मनाला मोठा आत्मविश्वास मिळत असे.

तोंडपाठ केलेल्या श्लोकांचा किंवा मंत्रांचा अर्थ समजावून द्यावा किंवा तो समजून घ्यावा असे सहसा कोणालाही वाटायचे नाही. लिहिलेली अक्षरे आणि त्यांचे पठण करतांना होणारा नाद एवढ्याच गोष्टी अत्यंत महत्वाच्या असत. त्यात तसूभरही अंतर पडलेले चालत नव्हते. आपल्या महान पूर्वजांनी लिहून ठेवलेले हे सारे श्लोक आणि मंत्र सामर्थ्यवान आणि अचूकच असले पाहिजेत आणि ते जसेच्या तसे पुढील पिढीला देणे हे आपले परमकर्तव्य आहे अशीच सर्वसाधारण धारणा असायची. त्याबद्दल कोणताही प्रश्न विचारायची मुभा नसायची. शंका घेणे हा तर सर्वस्वी अक्षम्य गुन्हा होता. एका दृष्टीने ते ही ठीकच होते. एकाद्या आडदांड थोराड मुलाला 'अरे ढबाल्या' किंवा 'वाकडतोंड्या' असे म्हंटले तर तो आपले थोबाड नक्की फोडणार एवढी अक्कल मुलांना त्यांच्या अनुभवातून येत होती. पण गणपतीबाप्पाला मात्र 'वक्रतुंड, महाकाय' ही विशेषणे लावली तरी तो कसा रागावत नाही? असा प्रश्न त्या शब्दांचा अर्थ समजल्यास त्यांना पडला असता. कोटी या प्रचंड संख्येचा त्यांना अंदाज नसला तरी त्या बाप्पाचा एका सूर्याएवढा प्रकाशसुध्दा आपल्याला कसा दिसत नाही?, उलट आपल्यालाच त्याच्यासमोर दिवा का लावावा लागतो? असल्या अधार्मिक शंका लहान मुलांच्या मनात उठल्या असत्या. त्यापेक्षा त्यांना तो अर्थ न समजलेलेच बरे होते.

शाळेत मराठी भाषेचे व्याकरण शिकतांना 'तत्सम', 'तद्भव', 'संस्कृतजन्य' आदि शब्दांसह जसजशी अशा शब्दांची ओळख होत गेली, तसतसशी संस्कृत भाषेच्या ज्ञानात भर पडत गेली, आठवीपासून अकरावीपर्यंत संस्कृत या विषयाचाच अभ्यास केला. त्यासाठी 'रामः रामो रामाः' पासून पाठांतराला एकदा जी सुरुवात झाली त्यानंतर चार वर्षे पाठांतरे होतच राहिली. अकार, आकार, इकार, उकार वगैरें निरनिराळ्या 'कारां'नी अंत असलेले पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी शब्द आणि त्यांची एकवचन, द्विवचन व बहुवचनातील प्रथमा, द्वितिया आदि आठ विभक्त्यांमधली सगळी रूपे पाठ करावी लागत होती. त्याचप्रमाणे सर्वनामे, विशेषणे, क्रियाविशेषणे यांची वेगवेगळी रूपे आणि अनेक प्रकारच्या क्रियापदांची विविध काळामधली विविधवचनी रूपे अशा असंख्य गोष्टींचे पाठांतर करणे आवश्यक होते. पण रोजच्या जीवनात त्यांचा उपयोग नसल्यामुळे त्यांचे विस्मरण व्हायलाही वेळ लागत नसे.

सोपे शब्द असलेल्या काही वाक्यांमधून एकादी गोष्ट सांगणारे किंवा बोध देणारे गद्य धडेसुध्दा संस्कृतच्या पुस्तकात असायचे आणि व्यास, वाल्मिकी यांच्यापासून ते कालिदास, भवभूती यांच्यापर्यंतच्या महाकवींच्या रचनांची किंचित झलक दाखवणारे पद्याचे उतारेही असत. त्यातल्या एकाद्या परिच्छेदाचे किंवा श्लोकाचे मराठी भाषांतर करायचे प्रश्न पेपरात असायचे, त्यामुळे त्याचेही पाठांतर केले जात असे. तसेच गाळलेल्या जागा भरा, जोड्या जमवा, वाक्य पूर्ण करा असे पैकीच्या पैकी मार्क देणारे अनेक प्रश्न पेपरात असल्यामुळे संस्कृत हा गणितासारखा स्कोअरिंग विषय होता. मात्र गणित हा विषय पायरी पायरीने चढता चढता अधिकाधिक पक्का होत गेला तसा संस्कृत हा विषय झाला नाही. शाळेबरोबरच संस्कृतशी असलेला संबंध सुटला तो जवळ जवळ कायमचा.

. . . . . . . . (क्रमशः)

No comments: