Saturday, February 27, 2010

पंपपुराण भाग ७


सेंट्रिफ्यूगल पंप सुरू केला की त्यातले चक्र फिरू लागते, ते पंपाच्या पात्रातील पाण्याला गोल फिरवते आणि ते पाणी फिरत फिरत पंपाबाहेर पडते, वातावरणाच्या दाबामुळे विहिरीतले पाणी पाइपातून वर चढून पंपात झालेली रिकामी जागा भरते आणि गोल गोल फिरत ते सुध्दा पंपाबाहेर पडते. अशा प्रकारे पाण्याचा ओघ चालत राहतो हे आपण मागील भागात पाहिले. भूमीगत पाण्याला उपसून जमीनीवर आणण्यासाठी माणसाला पडणारे कष्ट अशा प्रकारे वाचल्यानंतर पंपाच्या क्षमतेचा उपयोग करून अनेक नव्या गोष्टी माणूस करू लागला. पूर्वी ज्या भागात पाटाचे पाणी जाऊ शकत नव्हते अशा जमीनींना पाणीपुरवठा करून त्या लागवडीखाली आणल्या, ठिबकसिंचन आणि फवारासिंचनाने झाडाच्या मुळांना किंवा त्यांच्या शेंड्यावर, जिथे हवे तिथे पाणी देता योऊ लागले, बहुमजली इमारती बांधून त्यांच्या वरच्या मजल्यापर्यंत पाणी देण्याची सोय झाली, गांवे, शहरे यांच्यासाठी पाणीपुरवठ्याच्या योजना करून नळावाटे घरोघरी पाणी पोचवले गेले, लग्नसमारंभासारख्या प्रसंगी सजावटीसाठी तात्पुरते कृत्रिम कारंजे थुईथुई नाचवले जाऊ लागले, वगैरे वगैरे अनंत कामे पंपामुळे शक्य झाली. कारखान्यांमध्ये होत असलेला पंपांचा वापर पाहिला तर इंजिनानंतर पंप हेच सर्वाधिक उपयोगाचे यंत्र आहे असे म्हणता येईल.

ज्याप्रमाणे तलवारीने दाढी करता येत नाही किंवा रेझरने भाजी चिरता येत नाही, त्यासाठी वेगवेगळी साधने वापरावी लागतात, त्याच प्रमाणे लहानमोठी निरनिराळी कामे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या पंपाचा उपयोग केला जातो. पण योग्य अशा पंपाची निवड करण्यासाठी सर्वात आधी दोन मुख्य बाबी पहतात. पहिली म्हणजे दर मिनिटाला किती गॅलन किंवा दर सेकंदाला किती लीटर किंवा घनमीटर पाणी त्याने पुरवायला हवे. याला पंपाची क्षमता किंवा कपॅसिटी म्हणतात. दुसरी गोष्ट अशी की ते पाणी किती उंच उचलण्याची गरज आहे. याला हेड असे म्हणतात. पंपापासून जितक्या उंचावर पाणी चढवायचे आहे तेवढा पाण्याचा दाब त्यावर पडतो. त्यामुळे पंपाचे हेड आणि पाण्याचा दाब हे समानार्थी शब्द आहेत.

सेंट्रिफ्यूगल पंपाचे कार्य पाहता असे लक्षात येईल की त्याच्या इंपेलरचा व्यास जितका जास्त असेल तितक्या जास्त वेगाने पाणी परीघाकडे फेकले जाते आणि ते अधिक उंच जाऊ शकते. यामुळे जास्त हेड हवे असेल तर इंपेलरचा व्यास मोठा घेतात. इंपेलरची रुंदी वाढवली तर जास्त पाणी त्यात सामावले जाते आणि कपॅसिटी वाढते. त्याचा फिरण्याचा वेग वाढवला तर दर मिनिटाला अधिक पाणी अधिक वेगाने बाहेर फेकले जाईल म्हणजे हेड आणि कपॅसिटी या दोन्ही गोष्टी वाढतील. याशिवाय कांही उपाय करून पंपाची कार्यक्षमता आणि उपयोग वाढवता येतो, पण या सर्व गोष्टींना मर्यादा असतात. त्यांचा विचार करून आणि मुख्य म्हणजे आपली गरज कमीत कमी खर्चात कशी भागवता येईल या दृष्टीने पंपाची निवड केली जाते. बैलगाडीला हत्ती जोडण्यात कांही फायदा नसतो, त्याप्रमाणेच गरजेहून जास्त क्षमतेचा पंप वापरल्यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याची शक्यता असते. पण भरलेली बैलगाडी माणूस ओढू शकत नाही, ती जागच्या जागी अडून बसते. हे ही बरोबर नाही. यामुळे पंपाची निवड विचारपूर्वक करावी लागते.

दुस-या बाजूने विचार केला तर आपली गरज वारंवार बदलण्याची शक्यता असते. आणि त्यासाठी रोज वेगवेगळा पंप बसवता येत नाही. त्यामुळे जो पंप आपण बसवू त्याने आपली कमीत कमी पासून जास्तीत जास्त जेवढी गरज असेल ती पुरी करता येईल हे पहावे लागते, किंवा तो पंप ज्या रेंजमध्ये काम करू शकेल त्यानुसार आपल्या गरजा ठरवाव्या लागतात.

. . . . . (क्रमशः)

No comments: