Monday, February 08, 2010

पंपपुराण - भाग ३


आमच्या घराजवळच एक सायकलचे दुकान होते; म्हणजे सायकली विकण्याचे नव्हे, त्या तासागणिक भाड्याने देण्याचे. तिथे काम करणारी मुले पंपाने सायकलींच्या चांकांमध्ये हवा भरतांना दिसायची. स्टोव्हची आग प्रखर करणे आणि सायकलची चाके टणक बनवणे हे त्या दोन कृतींचे अगदी वेगवेगळे उपयोग आहेत. पण वातावरणामधील हवेला एका बंदिस्त जागेत कोंबून तिचा दाब वाढवणे हे मात्र या दोन्हीं पंपांचे समान उद्दिष्ट असते. त्यामुळे त्यांची रचना आणि कार्यपद्धती या दोन्हींमध्ये खूप साम्य आहे. स्टोव्हचा पंप जेमतेम बोटभर असतो आणि तो सुध्दा टांकीच्या आंत घुसवून ठेवलेला असल्यामुळे त्याचे बारके टोक तेवढे बाहेरून दिसते. त्याला चिमटीत पकडून तो पंप मारायचा असतो. सायकलचा पंप चांगला हांतभर लांब आणि मनगटाएवढा रुंद असतो, शिवाय त्याला रबराच्या नळीचे दोन हात लांब शेपूट जोडलेले असते. त्या पंपाच्या स्टँडवर दोन्ही पाय भक्कमपणे रोवून उभे राहिल्यावर दोन्ही हातांनी त्या पंपाचा दांडा वर खाली करून हवा भरायची असते. ते काम करतांना अंगाला घाम फुटतो.

स्टोव्हचा पंप आडवा असतो आणि सायकलीच्या चांकांत म्हणजे तिच्या टायरच्या आंतील ट्यूबमध्ये हवा भरणारा पंप उभा धरून चालवतात एवढा फरक सोडला तर सिलिंडर, पिस्टन, वॉशर वगैरे त्याचे भाग स्टोव्हच्या पंपासारखेच पण मोठ्या आकाराचे असतात. चांकात भरलेली हवा पंपात परत येऊ नये यासाठी आवश्यक असलेली झडप सायकलच्या चाकाच्या ट्यूबलाच जोडलेली असते. ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी पंपाची नळी त्या व्हॉल्व्हला जोडतात. पंपाचा दांडा वर ओढतांना आजूबाजूची हवा सिलिंडरमध्ये शिरते आणि तो खाली दाबला की त्या हवेचा दाब वाढतो आणि व्हॉल्व्ह उघडून ती हवा सायकलच्या ट्यूबमध्ये भरली जाते. हवा भरून पंपाची नळी बाजूला केल्यानंतर तो व्हॉल्व्ह आंतील हवेला एकदम बाहेर जाऊ देत नाही. पण सायकलीचा उपयोग करतांना ती सूक्ष्म प्रमाणात हळू हळू लीक होते आणि तिचा दाब कमी होत जातो. त्यामुळे चांकाचे टायर मऊ आणि चपटे होऊ लागतात, ते आपल्याला जाणवते. ट्यूबला एकादे छिद्र पडले किंवा झिजून ती फाटली तर त्यातून आतली सगळी हवा फुसकन बाहेर पडते. त्या नंतर ट्यूबचे पंक्चर काढून किंवा ट्यूबच बदलून तिच्यात पंपाने हवा भरून तिला फुगवतात.

स्वयंचलित वाहनांच्या चांकामध्ये हवा भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर वेगळे यंत्र बसवलेले असते. त्याला मात्र काँप्रेसर म्हणतात. यातही एक गंमत आहे. बंदिस्त जागेतल्या हवेचा दाब वाढवण्यासाठी त्यात आणखी हवेला घुसवणारे यंत्र काँप्रेसर म्हणून ओळखले जाते, पण त्याच जागेत आधीपासून असलेली हवा बाहेर काढून तिथे निर्वात पोकळी पाहिजे असेल तर त्यासाठी वेगळे यंत्र लागते आणि त्याला व्ह्यॅक्यूम पंप असे संबोधतात. याचा अर्थ काँप्रेसर हा देखील पंपाचाच एक उपप्रकार आहे असे म्हणता येईल. हे पंपपुराण संपल्यानंतर त्यांचाही विचार करता येईल.

मी अगदी लहान असतांनासुध्दा आमच्या गांवाबाहेर एक पेट्रोल पंपसुध्दा होता; म्हणजे आम्ही त्याबद्दल ऐकले होते. पूर्वी संस्थान असतांना आपल्या गाड्यांना व्यवस्थित तेल पाणी मिळावे या उद्देशाने संस्थानिकांनी कदाचित तो प्रायोजित केला असावा. पण संस्थानांचे विलीनीकरण झाल्यानंतर गांवात खाजगी मालकीच्या फारशा मोटारगाड्या उरल्या नव्हत्या आणि बाहेरगांवाहून मोटारीत बसून येणा-यांची संख्याही नगण्यच असायची. मालवाहतूकीसाठी कधी तरी येणा-या ट्रकगाड्या आणि प्रवाशांची वाहतूक करणा-या सर्व्हिसच्या गाड्या याच तिथे जात असतील किंवा कदाचित तो बंदच पडला असेल. तिकडे फिरकण्याचे मला कांहीच कारण किंवा निमित्य मिळाले नसावे. त्यामुळे तो ऐतिहासिक पंप पाहिल्याचे आठवत नाही. पण गांवाची प्रगती होत गेली, नवनवे चांगले रस्ते तयार झाले, तसतशी वाहतूक वाढत गेली आणि माझे शालेय शिक्षण संपेपर्यंत गांवाच्या वेशीच्या आंतच एक नवा पेट्रोल पंप उभा राहिला. तो बांधला जात असतांना पासून जाता येतांना दिसत असल्यामुळे जमीनीखाली मोठमोठ्या टांक्या बांधल्या आहेत आणि टँकरमधून आलेले तेल त्यात साठवले जाते एवढे समजले होते आणि रबराच्या एका नळीतून ते मोटारीच्या टँकमध्ये भरतात हे दिसत होते. ते भरतांना किती तेल भरले आहे हे दाखवणारा कांटा फिरतांना पाहतांना मजा वाटायची. पण यात 'पंप' कशाला म्हणायचे? हे कांही त्या वेळी समजले नाही. जमीनीखाली असलेले पेट्रोल त्या होजमधून वर कसे येऊ शकते असा भौतिकशास्त्रातला प्रश्नही त्या वयात मला त्रास द्यायला मनात आला नाही.

No comments: