
सुमारे एक वर्षापूर्वी मी 'कारवाँ बनता गया' हा लेख या ठिकाणी लिहिला होता. तेंव्हा याच्या फॉलोअर्सची संख्या फक्त पाचच होती. तरीही मला त्याचे नवल वाटल्यामुळे मी त्यांना 'थवा' असे नांव देऊन करून खाली दिलेला प्रसिध्द उर्दू शेर मराठीत स्वैर रूपांतर करून दिला होता.
जात होतो एकटा मी मार्ग शोधूनी नवा ।
मागुनी पांथस्थ आले जाहला त्यांचा थवा ।।
त्या लेखातला महत्वाचा भाग नवीन वाचकांच्या सोयीसाठी खाली उद्धृत केला आहे.
"खरे तर मी चौफेर लिहीत आलो आहे. मी एकादा वेगळा पंथ काढला नव्हता आणि त्यात सामील व्हायचे आवाहनही कधीच कोणाला केले नव्हते. त्यामुळे माझा अनुयायी म्हणून एक नांव माझ्या ब्लॉगवर दिसू लागल्यावर मला त्याचे थोडे आश्चर्यच वाटले. त्यांची संख्या वाढत वाढत आता पांचावर गेली आहे. यापूर्वी आंतर्जालावर भटकत असतांना ब्लॉगधारकांना आवडलेल्या इतर ब्लॉग्जची यादी आणि आंतर्जालावरून तिकडे जाणारे दुवे कांही ब्लॉग्जवर दिलेले मी पाहिले होते. कदाचित त्यांची लेखकमंडळी आपापल्या मित्रांच्या ब्लॉगची नांवे एकमेकांच्या अनुदिन्यांवर घालून ते चटकन पहाण्याचा सोयीचा मार्ग तयार करून ठेवत असतील किंवा आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा ओघ आपल्या मित्रांकडे वळवीत असतील अशी माझी कल्पना होती. माझ्या ब्लॉगचे अनुयायी झालेल्या मंडळींची मात्र माझी साधी तोंडओळखसुध्दा झालेली नाही आणि त्यांनी कधी माझ्या लिखाणावर प्रतिसाद दिले असले तरी ते माझ्या ध्यानात राहिलेले नाहीत. चांगला लक्षात रहावा एवढा संवाद नक्कीच कोणाबरोबर साधलेला नाही. त्यातील एका अनुयायाने आपले नांवसुध्दा माझ्यापासून गुप्त राहील अशी व्यवस्था करून ठेवली आहे. माझे (सुध्दा) कांही अनुयायीगण आहेत ही भावना जरी अत्यंत उत्साहवर्धक असली तरी ते कोण आहेत आणि कसल्या बाबतीत ते माझ्या कोणत्या मार्गाचे अनुसरण करतात हे समजले तर मला जास्तच आनंद होईल. माझ्याकडून त्यांना कांही अपेक्षा असतील आणि त्यांनी त्या व्यक्त केल्या तर मला त्या समजू शकतील. हा भाग वाचल्यानंतर ते प्रतिसाद पाठवतील अशी अपेक्षा आहे."
'फॉलोअर' या इंग्रजी शब्दाला 'अनुयायी' असा प्रतिशब्द असला तरी या बाबतीत मला तो तेवढा सयुक्तिक वाटला नाही. त्यामुळे मी त्यांना माझे 'पाठीराखे' असे म्हणायचे ठरवले. या पाठीराख्यांची संख्या वाढून आता चाळीसवर पोचली आहे. यात कोण कधी आले आणि कोण किती दिवस राहून (कंटाळून) सोडून गेले वगैरेचा हिशोब मी कधी ठेवला नाही. तशी माहिती सोयीस्कररीत्या उपलब्धही नाही. सुरुवातीला मी त्या सर्वांच्या संकेतस्थळावर जाऊन ती पहायचे ठरवले होते. पण वेळेअभावी ते जमलेच नाही याबद्दल क्षमायाचना करतो. या वर्षी पुन्हा प्रयत्न करावा असा विचार आहे.
मी वर दिलेल्या उता-यातले बहुतेक मुद्दे अजून अनुत्तरितच आहेत. नरेंद्र गोळे माझ्या ओळखीचे आहेत आणि देवदत्तची नुकतीच ओळख झाली. इतर अडतीस लोकांबद्दल कांहीच माहिती नाही, पण जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यांनी पुढे येऊन खाली दिलेल्या प्रश्नांपैकी योग्य वाटतील तेवढी उत्तरे द्यावीत अशी कळकळीची विनंती आहे.
१. टोपणनांव दिले असल्यास खरे नांव काय आहे?
२. माझ्या ब्लॉगवरील कोणता भाग आवडतो आणि कोणता आवडत नाही?
३. आणखी काय वाचायला किंवा पहायला आवडेल?
3 comments:
नमस्कार काका, माझं नाव कांचन कराई आहे. टोपणनाव आदिती. पण मला कांचन हेच नाव जास्त आवडतं. मी ’मोगरा फुलला’ या ब्लॉगवर लिहिते. तुमच्या ब्लॉगवर मी तशी उशीराच आले. सर्व आवडते ब्लॉस एका दिवसात वाचणं शक्य नसतं पण जसा वेळ मिळेल, तसं वाचत रहाते. ब्लॉग फॉलोअर्समधे आपलं नाव गुप्त ठेवण्याची सुविधा आहे, त्यामुळे आपले अनेक फॉलोअर्स कळत नाहीत, ही गोष्ट खरीच. ब्लॉग फॉलो करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण ब्लॉगरवर साईन केलं की ताबडतोब आपल्या आवडत्या ब्लॉगची नवीन पोस्ट दिसायला लागते. तुमचं टोपणनाव ’आनंदघन’ हे मला आवडतं.
वाचले मी काय जे जे ।
काही अंतरी भावले ॥
त्यातले होते जिथे ।
मी नाव तेथे लावले ॥
आनंदघनसाहेब,
मी तुमचे सर्व लिखाण काही अजूनही वाचू शकलेलो नाही. मात्र तुमचे कित्येक लेख मला संस्मरणीय, अभिरुचीपूर्ण आणि रूचकर वाटले.
जात होतो एकटा मी मार्ग शोधूनी नवा ।
मागुनी पांथस्थ आले जाहला त्यांचा थवा ।।
हा तुमचा अनुवाद तर मला बेहद्द आवडला आहे.
मात्र, following म्हणजे "अनुयायी असणे" नव्हे तर "अनुसरत असणे" होय.
तुम्हाला मिळालेल्या "ब्लॉग माझा"च्या सन्मानाखातर हार्दिक अभिनंदन!
क्लिष्टतंत्र भौतिक रहस्यांना शुद्ध सोप्या मराठीत वर्णन करण्याची हातोटी तुम्हाला उत्तम साधलेली आहे. अवजारांची माहिती, वायूयानांची माहिती अशा तुमच्या सुरस लेखांची मला अजूनही आठवण होते.
भविष्यात गहन तांत्रिक विषयांना सोप्या मराठीत, सामान्यांच्या आवाक्यात याव्यात म्हणून, तुम्ही अभिव्यक्त करालच. त्याकरता माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!
कांचन आणि नरेंद्र, दोघांचेही मनःपूर्वक आभार
Post a Comment