Friday, November 30, 2012

तेथे कर माझे जुळती - ११ - श्री.सुधीर दामले


मी लहान असतांना मला काही म्हणजे काहीही, अगदी दिसेल ते सगळे काही वाचण्याचे विलक्षण वेड होते. जे पुस्तक माझ्या हातात पडेल त्यातले मला काहीही समजो वा न समजो, त्यावर घातलेल्या वर्तमानपत्राच्या कव्हरसकट त्यातले अक्षर न् अक्षर मी वाचून काढत असे. त्यात मुद्रक, प्रकाशक, संपादक वगैरेंची नावेसुध्दा वाचली जात. त्यातले 'नवीन किताबखाना' हे नाव मला जरा वेगळे वाटायचे. 'किताब' म्हणजे पुस्तक आणि 'खाना' म्हणजे जेवण एवढाच त्या शब्दांचा अर्थ शाळेत शिकलेल्या हिंदी भाषेच्या ज्ञानावरून कळला होता, उर्दूचा गंधही नव्हता. त्या वयात 'नवीन', 'पुस्तक' आणि 'जेवण' या तीन्ही गोष्टी मला अतीशय प्रिय असल्यामुळे त्या नावाचा एकत्र संदर्भ लागत नसला तरी ते नाव लक्षात राहिले होते. 'किताबखाना' या उर्दू शब्दातल्या 'खाना'चा खाण्याशी कसलाच संबंध नाही असे मला नंतर कळले, पण तोवर तो शब्द माझ्या स्मृतीमध्ये रुतून बसला होता.  

मी कॉलेजात शिकत असतांना 'मार्मिक' हे व्यंगचित्रांना वाहिलेले बहुधा पहिलेच आणि कदाचित अखेरचे प्रसिद्ध मराठी साप्ताहिक सुरू झाले आणि अल्पावधीत ते तुफान लोकप्रिय झाले. मराठी युवकांना तर पुढच्या आठवड्याचा अंक केंव्हा बाहेर पडतो आणि आपण तो वाचतो असे होत असे. विनोदी तसेच जळजळीत व्यंगचित्रे आणि खुसखुशीत तसेच खरमरीत लेखांनी भरलेल्या त्या साप्ताहिकाच्या शेवटच्या पृष्ठावर 'पिटातल्या शिट्ट्या' या सदराखाली तत्कालिन चित्रपट आणि नाटकांचे खुमासदार रसग्रहण केलेले असे. अंकामधील इतर मजकुराप्रमाणे या स्तंभातसुध्दा नर्मविनोद आणि परखड टीका यांचे बेमालूम मिश्रण असायचे. सिनेमा किंवा नाटक यांचा पार पंचनामा न करता किंवा त्यातला कथाविषय सांगून न टाकता त्याबद्दल कुतूहल कायम राखून हे मनोरंजक लेख लिहिलेले असत. माझी वैयक्तिक मते त्या स्तंभलेखकाच्या मताशी जुळत होती की त्याचे शेरे ताशेरे वाचून त्यानुसार माझी मते त्या वयात घडत होती ते मला आता नक्की सांगता येणार नाही, पण मला हे सदर खूप आवडत असे. मी आधीच पाहिलेल्या नाटक सिनेमाबद्दल झालेली माझी मते हे सदर वाचतांना अधोरेखित होत असत आणि हे सदर वाचल्यानंतर ते खेळ पाहतांना त्यातले बारकावे जास्त चांगले कळत असत. थोडक्यात सांगायचे झाल्यास एकादा कार्यक्रम बरा किंवा चांगला वाटला तर तो कशामुळे आणि तो टुकार वाटला तर कशामुळे हे मला थोडे समजायला लागले. 'शुध्दनिषाद' या टोपणनावाने हा स्तंभ लिहिणा-या समीक्षकाचे नाव सुधीर दामले असे होते असे समजले.

किताबखाना आणि सुधीर दामले यांच्यात परस्परांमध्ये काही संबंध असेल असा विचार माझ्या मनात येण्याचे कारण नव्हते आणि माझ्या व्यक्तीगत जीवनाशी त्या दोघांचा दूरान्वयानेही काही संबंध नव्हता. पण माझे लग्न झाल्यानंतर तो आला. पती आणि पत्नी यांचे सर्व नातलग लग्नानंतर एकमेकांचे इन-लॉज होतात, त्यामुळे माझ्या विवाहानंतर आमच्या नातेवाईकांची संख्याही एकदम दुप्पट झाली. माझ्या नव्याने झालेल्या नातेवाईकांमध्ये जयश्रीताई दामले यांचे नाव ठळक होते. पहिल्या भेटीतच चांगली छाप पाडण्यासारखे त्यांचे ठसठशीत व्यक्तीमत्व आहेच, शिवाय मनमिळाऊ स्वभावाने त्या इतरांना आपलेसे करतात. त्यांचे पती सुधीरराव दामले यांनाही सगळ्या आप्तेष्टांमध्ये मोठे मानाचे स्थान होते. हे जोडपे मुंबईमध्ये रहात होते हे आमच्या दृष्टीने खूपच महत्वाचे होते. नव्याने संसार थाटतांना अनेक अडचणी आणि शंका यांचे डोंगर समोर असतात. जुन्या पिढीमधल्या लोकांचे आणि आपले आचारविचार यात जनरेशन रॅप असते. यावेळी आपल्याच पिढीमधल्या आणि सुस्थितीमध्ये स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांचे मार्गदर्शन मोलाचे असते. त्यासाठी सुरुवातीच्या काळात आमचे पाय आपोआप त्यांच्या घराकडे वळत असत.

त्या काळात सर्वांकडे टेलीफोन नसायचे. मोबाईल फोनचा शोधच लागलेला नव्हता आणि मुंबईमध्ये घरी पोस्ट खात्याचा टेलीफोन मिळण्यासाठी दहा बारा वर्षे वाट पहावी लागायची. मी तर त्यासाठी अजून अर्जसुध्दा केला नव्हता. दामल्यांच्या घरी फोन असला तरी शेजारपाजारी कुणाकडे जाऊन त्यांना फोन करण्याची सोय आमच्याकडे नव्हती किंवा कोणाकडे भेटायला जाण्यापूर्वी त्यांना अगोदर सूचना देण्याची सवयही अजून लागली नव्हती. आपण आपले सरळ जाऊन धडकायचे, भेटले तर उत्तमच, नाही भेटले तर चौपाटीवर फिरून यायचे अशा विचाराने एक दिवस आम्ही गिरगावातल्या त्यांच्या घरी गेलो. मी त्यापूर्वी गिरगावातल्या जितक्या लोकांकडे गेलो होतो ते सगळे सुप्रसिध्द 'बटाट्याच्या चाळी'ची आठवण करून देणा-या जुनाट चाळींमध्ये रहात असत. त्यामुळे अख्खे गिरगाव म्हणजे 'चाळ नावाच्या वाचाळ वस्तीं'चा मोठा समूह असावा असा माझा ग्रह झाला होता. दामल्यांच्या घरापर्यंत पोचण्याआधी त्यांच्या इमारतीमधल्या काळोखात दडलेल्या जिन्याच्या पाय-या चढतांना माझा तो ग्रह जास्त दृढ झाला,

त्यांच्या घराच्या दरवाजातून आत प्रवेश करताच मात्र मी थोडासा भांबावलो. त्या काळात आम्ही रहात असलेल्या वन रूम किचनच्या मानाने तो प्रशस्त असा सेल्फ कंटेन्ड फ्लॅट होता. 'इंटिरियर डेकोरेशन' हा शब्द अजून माझ्या ओळखीचा झालेला नव्हता, पण त्यांच्या दिवाणखान्यातले फर्नीचर, त्याची मांडणी, जमीनीवर अंथरलेला गालिचा, खिडक्यांचे पडदे वगैरे सगळे मला कलापूर्ण आणि आकर्षक दिसत होते. जयश्रीताईंनी सुहास्यवदनाने आणि मनःपूर्वक आपुलकीने आमचे स्वागत केले. आम्हाला आमच्या अगांतुकपणाची जाणीव करून दिली नाही. त्या वेळी सुधीरही घरात होते. त्यांनीही आमचे औपचारिक स्वागत केले.

'पिटातल्या शिट्ट्या' वाचून सुधीर दामले यांची जी प्रतिमा माझ्या मनात तयार झाली होती त्यात ते खूप खेळकर, मिश्किल स्वभावाचे आणि बोलघेवडे असतील असे मला वाटत होते. शिवाय त्यांच्याकडे मनोरंजनाच्या विश्वातल्या बातम्या आणि घडामोडी वगैरेंचा खजीना होता. त्यांच्याशी गप्पा मारतांना आपल्याला खूप मजा येईल, काही 'अंदरकी बातें' कळतील अशी आशा मला वाटत होती. त्यांच्या स्वतःच्या वर्तुळात ते बरेचसे माझ्या कल्पनेतल्यासारखेच असतात असे मला नंतर कळले. पण बहुधा त्यांच्या 'इनर सर्कल'मध्ये कुणाही सोम्यागोम्याला सहजासहजी प्रवेश मिळत नसावा. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा परस्परांना नमस्कार वगैरे उपचार झाल्यानंतर जयश्रीताई अलकाला घरात बोलावून घेऊन गेल्या. तिकडे गेल्यावर माहेरच्या मंडळींबद्दल आणि पूर्वीच्या आठवणीवर त्यांच्या गप्पा रंगल्या. मी त्यातल्या कोणालाच ओळखतही नव्हतो त्यामुळे मला त्यात रस नव्हताच. मी हॉलमधल्या सोफ्यावर बसून राहिलो.

सुधीर थोडा वेळ कसलीशी कागदपत्रे वाचत बसले होते आणि कोणाकोणाशी टेलीफोनवर बोलत होते. त्यानंतर ते उठून बाहेर चालले गेले, कदाचित त्यांच्या दुकानावर किंवा आणखी कोठे गेले असतील. समोर बसलेल्या माझ्या अस्तित्वाची त्यांनी फारशी गंभीर दखल घेतली नाही असे मला जाणवले. मीसुध्दा त्या काळात वडीलधारी माणसांशी बोलायला थोडा बिचकत होतो, त्यामुळे मी ही आपले तोंड उघडले नाही. समोर पडलेल्या वर्तमानपत्रांची पारायणे करीत आणि खिडकीतून दिसणारी गिरगावरोडवरली रहदारी पहात राहिलो. त्यानंतर सुरुवातीला काही ना काही कारणाने किंवा निमित्याने आम्ही वरचेवर त्यांच्या घरी जात होतो. दर वेळी जयश्रीताई आमचा चांगला पाहुणचार करायच्या. सुधीर मात्र कधी घरी भेटत, कधी त्यांची भेटही होत नसे. ते जिथे रहात होते त्याच बिल्डिंगच्या तळमजल्यावर त्यांचे ऑफीस कम दुकान होते, कदाचित आतल्या बाजूला छपाईची यंत्रसामुग्रीसुध्दा असेल. 'नवीन किताबखाना'चा व्यवहार तेथून चालत असे. हेच त्यांचे मुख्य ऑफीस होते की ती एक ब्रँच होती हे मला समजले नाही. त्या गाळ्यावर 'एन के प्रिंटर्स' असा बोर्ड होता. कधीकधी सुधीरांचे मँनेजर आतल्या बाजूला बसलेले दिसत. त्यांच्या घरी जातांना किंवा परत जातांना मी बाहेरूनच हात हलवून त्यांना अभिवादन करत असे. पुढे माझे काम आणि प्रपंच यात मी गुंतून गेलो आणि हळूहळू अलकाला मुंबईतले रस्ते आणि बसेस, टॅक्सी वगैरेंची चांगली माहिती झाली. अलका एकटीच किंवा मुलांना घेऊन जयश्रीताईंना भेटून येऊ लागली. त्यानंतर तिच्याबरोबर माझे दामल्यांच्या घरी जाणे कमी कमी होत बंद झाले. सुधीर आमच्या घरी कधी आलेच तरी त्या भागात त्यांची इतर कामे असत आणि ती करतांना ते आमच्याकडे उभ्याउभ्याने भेटून जात असत. आमच्या दोघांच्या एकत्र बसून दिलखुलास अशा गप्पा कधी झाल्याच नाहीत.  

असे असले तरी त्यांचे नाव मात्र आमच्या घरातल्या बोलण्यामध्ये नेहमी निघायचे. त्यांनी मार्मिकमध्ये लिहिणे थांबवले की मी मार्मिक वाचणे बंद केले ते आता आठवत नाही, पण माझे 'पिटातल्या शिट्ट्या' वाचणे कधीच थांबले होते. तरीही इतर वर्तमानपत्रे, मासिके वगैरेंमध्ये त्यांचे लेख, फोटो किंवा उल्लेख अधून मधून नजरेला पडत असत. कधी ते कोणाची मुलाखत घेतांना किंवा कोणाला मुलाखत देतांना किंवा एकाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे दूरदर्शनवर अचानक दर्शन घडत असे. 'नाट्यदर्पण' या नावाचे नावाप्रमाणेच मराठी नाट्यसृष्टीला वाहून घेतलेले एक सुरेख मासिक त्यांनी सुरू केले आणि काही काळ चालवले. त्याचा दिवाळी विशेषांक तर फारच वाचनीय असे. मुंबईतल्या दादर आणि गिरगाव या भागातच त्या काळी मराठी नाटकांचे प्रयोग होत असत. आम्ही तिथून खूप दूर रहात असल्यामुळे आम्हाला नाटक पहायला तिकडे जाणे कठीण होते आणि ते संपल्यानंतर मध्यरात्री परत घरी जाणे त्याहूनही कठीण होते. तरीही आम्ही नाट्यदर्पणचे अंक आवर्जून वाचत असू आणि सुटीच्या दिवशी जमतील तेवढी नाटके पहात असू.

त्या काळात फिल्मफेअर हे मॅगेझिन अतीशय लोकप्रिय होते आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड्स म्हणजे ऑस्कर अॅवॉर्ड्सच्या तुल्यबळ अशी भारतातली बक्षिसे होती. त्यांचा वितरण समारंभसुध्दा मोठ्या झोकात साजरा केला जात असे. आजकाल दर वर्षी अशा प्रकारची पंधरावीस अॅवॉर्ड्स दिली जातात आणि त्यांचे संयोजन कुठल्या ना कुठल्या परदेशातल्या ठिकाणी अतीभव्य प्रमाणात केले जाते. दर शनिवारी किंवा रविवारी त्यातला निदान एकादा तरी समारंभ टेलीव्हिजनवर दाखवला जातो. त्यामुळे आता त्याचे खास महत्व वाटत नाही. पण तीस पस्तीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरील कलाकारांचे कौतुक करण्याची कसली योजनाच नव्हती. त्या काळात सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण मासिकातर्फे असे अॅवॉर्ड्स समारंभ साजरे करणे सुरू केले आणि त्यासाठी दरवर्षी एका नाट्यदर्पण रजनीचे संयोजन केले.

ही नाट्यदर्पण रजनी मात्र आम्ही न चुकवता पहात होतो. तिची तारीख समजली की कॅलेंडरवर ठळक खूण करून तो दिवस आणि रात्र फक्त या कार्यक्रमासाठी आधीपासून राखून ठेवत असू. हा कार्यक्रमसुध्दा अत्यंत प्रेक्षणीय आणि सुश्राव्य असायचा. रंगमंचावर तसेच तिच्या पार्श्वभूमीवर चोख काम विविध करणा-या रंगकर्मींना पारितोषिके देऊन त्यांचा यथोचित सन्मान त्यात केला जात असेच, शिवाय विविध प्रकारचे आणि नाविन्याने भरलेले अत्यंत अभिरुचीसंपन्न आणि मनोरंजक असे लहान लहान कार्यक्रमांचे तुकडे त्या पारितोषिक वितरण समारंभाच्या मागे पुढे सादर केले जात असत. स्व.पु.ल.देशपांडे किंवा हेमा मालिनी यासारखी त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च स्तरावरली एकादी सुप्रसिध्द व्यक्ती दर वर्षी मुख्य अतिथी असायची. नाट्यक्षेत्रामधले सारे प्रमुख कलाकार या सोहळ्याला हजर रहायचे आणि त्यातल्या लहानशा मनोरंजक आयटममधले छोटेसे काम समरस होऊन करायचे. त्या रात्री पुण्यामुंबईतल्या कुठल्याही सभागृहात नाटकाचा कार्यक्रम होत नसे असे मी ऐकले होते. नाट्यदर्पणच्या कार्यक्रमाची व्याप्ती, त्यातले वैविध्य आणि रंजकता दर वर्षी वाढतच गेली. इतका वैशिष्ट्यपूर्ण असा कुठल्याही भाषेमधला दुसरा कोणताही कार्यक्रम पहाण्याची संधी मला पुढेसुद्धा कधीच मिळाली नाही असे मी ठामपणे सांगू शकेन.  

इतके सुरेख आयटम्स फक्त एका प्रयोगासाठी बसवणे आणि त्यांची रंगीत तालीम घेणे वगैरे कामे सुधीर कशी करवून घेत असतील हे तेच जाणोत. यात प्रसिध्दीच्या शिखरावर असलेले मुरब्बी कलाकार असायचे आणि उदयोन्मुख किंवा अगदी नवे कलाकारही असायचे. या सर्वांना एकत्र आणणे किती कठीण काम असेल? अर्थातच यासाठी मोठे टीमवर्क असणार यात शंका नाही, पण ते सुरळीतपणे जुळवून आणण्यासाठी असणारे केंद्रीय नियोजन दामले कुटुंबीयच करत असत. या महत्कार्याचे मंचावरील संचालन या क्षेत्रामधील सुप्रसिध्द अशा इतर व्यक्ती करत असल्या तरी त्यांच्याही मागले खरे मुख्य सूत्रधार सुधीर दामले हेच असायचे हे समजून येत असे. पण रंगमंचावरील त्यांचा प्रत्यक्ष वावर मात्र अगदी मोजून मापून असायचा. त्यांच्या भाषणात कधीही आत्मप्रौढी नसायची, किंवा ते इतरांनाही त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळू देत नसत. नाट्यसृष्टी आणि त्यातले कलाकार यांच्यासंबंधी त्यांच्या मनात असलेले प्रेम, आत्मीयता तसेच तळमळ ते व्यक्त करून दाखवत असत. नाट्यविश्वाकडून त्यांना मिळणारा प्रतिसादसुध्दा अचंभित करणारा होता. त्यातले झाडून सारे प्रथितयश रंगकर्मी व्यावसायिक रंगभूमीवरचे काम (आणि त्याबरोबर त्यातून होणारी प्राप्ती) सोडून एक रात्र त्या सोहळ्याला उपस्थित रहात हे कौतुक किंवा आश्चर्य करण्यासारखे असे. पहायला गेल्यास सुधीर दामले हे नट, निर्माता, दिग्दर्शक वगैरे कोणी नव्हते किंवा त्यांच्या मालकीची नाट्यगृहे नव्हती, तरीही त्यांच्या हातात एवढे सामर्थ्य कशामुळे असायचे हे कोडे मला अनेक वेळा पडत असे.

नाट्यदर्पण रजनी या वार्षिक सोहळ्याखेरीज ते इतर काही नाट्यमहोत्सवांचे आयोजन करीत असत. एकाच सभागृहात एकाद्या वीक एंडच्या दोन अडीच दिवसात एका पाठोपाठ एक अशी आठ दहा संपूर्ण नाटके पहाण्याची संधी त्यात रसिकांना मिळत असे. नाटकांची निवड करतांना काही सामाजिक, काही रहस्यमय, तर काही जुनी पौराणिक कथेवरील संगीत नाटके अशी व्हरायटी त्यात मिळत असे. आमच्यासारख्या भुकेल्या प्रेक्षकांना ही पर्वणी वाटत असे. नाट्यदर्पण रजनी आणि हे नाट्योत्सव या दोन्ही कार्यक्रमात त्यातील कलाकारांना अगदी जवळून पहाण्याची संधी आम्हाला मिळत असे. कधी बॅकस्टेजवर जाऊन त्यांना भेटायला किंवा त्यांच्या संगतीत चहापाणी, भोजन वगैरे करायलासुध्दा मिळाले. "अमक्या प्रसिद्ध नटीने आमच्या डब्यातल्या तिखटमिठाच्या पु-या मिटक्या मारत खाल्या किंवा तमक्या वयस्क नटाला मी एकदा हाताशी धरून थोडे अंतर चालवत नेले." असल्या बढाया मारायची सवय मला नसली तरी कधी कधी तसे घडत होते आणि त्या आठवणी आपसूकच मनात जपून ठेवल्या गेल्या.

सुधीर दामले अनेक वर्षे मुंबईला रहात असले तरी पुण्याला त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता. मुंबई सोडून कायमचे तिकडे जाऊन रहायचा निर्णय त्यांनी घेतला. त्या वाड्याची पुनर्रचना करून तिथे मोठी इमारत बांधली. त्यातला तळमजला बँका आणि इतर व्यावसायिकांना देऊन वरील दोन मजल्यांवर मोठे हॉल आणि राहण्यासाठी फ्लॅट बांधले. सुदर्शन या नावाने प्रसिध्द झालेला हा रंगमंच पुण्यामधील हौशी कलाकारांसाठी एक अत्यंत महत्वाचे ठिकाण झाले. त्याना फक्त एक मंच मिळाला असे म्हणण्यापेक्षा त्यातून प्रायोगिक नाटकांची एक सांस्कृतिक चळवळ (मूव्हमेंट) उभी राहिली असे म्हंटल्यास वावगे होणार नाही.  सुधीररावांचे बंधू रवी आणि वहिनी शुभांगीताई यांच्या पुढाकारामधून हे घडत असले तरी त्यामागची प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाठिंबा सुधीरांचाच असणार.

सुधीर दामले यांचा शष्ट्यब्दपूर्तीचा उत्सव त्यांनी पुण्यातल्या एका चांगल्या हॉटेलात साजरा केला होता. त्या कार्यक्रमाला आम्ही मुंबईहून तिथे गेलो होतो. त्यांना अभीष्टचिंतन करण्यासाठी नाट्यक्षेत्रामधले कित्येक दिग्गज या कार्यक्रमाला आले होते. त्या अविस्मरणीय अशा संध्याकाळी जमलेल्या पाहुण्यांसाठी सुग्रास भोजनाखेरीज संगीताचीही मेजवानी होती. त्यात शास्त्रीय संगीतही होते आणि चक्क बैठकीची लावणी ठेवली होती. (कदाचित अप्रत्यक्षपणे सुधीररावांना उद्देशून गायिलेल्या) "पिकल्या पानाचा देठ बाई हिरवा" या लावणीनंतर जो टाळ्यांचा कडकडाट झाला त्याने सभागृह दुमदुमून गेले. अशा प्रकारचा वेगळेपणा आणि रसिकता फक्त तेच दाखवू शकतील. अशा पध्दतीची आणि इतकी रंगलेली साठी शांत मी तरी कधी आणि कुठे पाहिली नाही. अशा कार्यक्रमासाठी लागणारा दिव्य स्पर्श फक्त सुधीरांच्याचकडे आहे.

मागील आठवड्यात सुधीर आणि जयश्री यांच्या विवाहाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. हा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम त्यांच्याच सुदर्शन हॉलमध्ये ठेवला होता. अगदी जवळचे असेसुध्दा शंभरावर आप्तस्वकीय त्याला उपस्थित होते. त्यातले बहुतेक लोक ज्येष्ठ नागरिक असणार हे अपेक्षितच होते. वयोमानानुसार सुधीरांची हालचाल मंद झाली होती. पण सर्वांना उद्देशून केलेल्या छोट्याशा भाषणात त्यांनी आपले मनोगत म्हणजे मुख्यतः आभार प्रदर्शन मोजक्या शब्दात खणखणीत आवाजात व्यक्त केले. "या निमित्याने जमलेल्या आप्तेष्टांना एकमेकांना भेटण्याची आणि गप्पागोष्टी करण्याची संधी देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून हा औपचारिक भाग आम्हाला शक्य तितक्या लवकर आटोपायचा आहे." असे सांगून त्यांनी त्यांची स्तुती करण्याची भाषणे करण्याची संधी कोणालाही दिली नाही. एवढे होईपर्यंत पाहुण्यांना सूप देणे सुरू झालेले होते आणि वरील मजल्यावर स्नेहभोजन तयार असल्याची वर्दी दिली गेली. आलेल्या प्रत्येक पाहुण्याने आल्याआल्या त्यांची भेट घेऊन अभीष्टचिंतन केलेले होतेच. हळूहळू सारे लोक भोजनकक्षात गेले आणि ओळखीतल्या इतर पाहुण्यांबरोबर गुजगोष्टी करत रेंगाळत राहिले. या कार्यक्रमाला येतांना कोणीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नये असे आमंत्रणपत्रिकेत लिहिलेले होते आणि त्याचे पालन झाले होते. आयोजकांनी मात्र आलेल्या पाहुण्यांना परत जातांना आभारपत्र आणि नव्या वर्षाचे कॅलेंडर दिले.

सुधीररावांच्याबद्दल मनांत खूप आदरभावना होतीच, त्यात आणखी एक तुरा खोवला गेला.  
--------------------------------------------------------------------------------------------------
Facebook status on 18/8/2016

तीस चाळीस वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवरील कलाकारांचे कौतुक करण्याची कसली योजनाच नव्हती. त्या काळात सुधीर दामले यांनी नाट्यदर्पण मासिकातर्फे असे अॅवॉर्ड्स समारंभ साजरे करणे सुरू केले आणि त्यासाठी दरवर्षी एका भव्य नाट्यदर्पण रजनीचे संयोजन केले. ... इतका वैशिष्ट्यपूर्ण असा कुठल्याही भाषेमधला दुसरा कोणताही कार्यक्रम पहाण्याची संधी मला पुढेसुद्धा कधीच मिळाली नाही असे मी ठामपणे सांगू शकेन. ..... नाट्यदर्पण रजनी आणि हे नाट्योत्सव या दोन्ही कार्यक्रमात त्यातील कलाकारांना अगदी जवळून पहाण्याची संधी आम्हाला मिळाली ती फक्त श्री.सुधीर दामले यांच्यामुळेच.  

निवडक आनंदघन Wordpress link 


Wednesday, November 21, 2012

कॉमन मॅन, सायंटिस्ट, इंजिनियर आणि एक कोडे



काही दिवसापूर्वी मिसळपाव या संस्थळावर एक सोपे वाटणारे कोडे दिले गेले होते. ते असे होते, "वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. सर्व टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल?"


सर्वसामान्य माणूस असा विचार करेल, "दोन लिटर पाणी निघायला १ मिनिट लागले, या गतीने वीस लिटर पाणी दहा मिनिटात बाहेर पडेल."

हे प्राथमिक शाळेतले साधे त्रैराशिक झाले, यात कोडे कसले आले? टाकीमधील पाण्याची पातळी जसजशी खाली जाईल तसतसा पाण्याचा वेग कमी कमी होत जातो हे आपल्याला दिसतेच, त्यामुळे हे उत्तर बरोबर असणार नाही.

तोटीमधून बाहेर पडणा-या पाण्याचा वेग टाकीमधील पाण्याच्या पातळीच्या उंचीच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असतो ( उंची चौपट असली तर वेग दुप्पट असेल) आणि टाकीमधील पाण्याच्या उंचीत दर क्षणाला होणारी घट (dh) त्या वेगाच्या समप्रमाणात असते (पाण्याचा वेग दुप्पट झाला तर पातळी दुप्पट वेगाने खाली येते). म्हणजेच ती उंचीच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असते. असे त्याचे शास्त्र आहे. जसजशी पाण्याची पातळी खाली जाऊन उंची कमी होत जाईल तसतसा तोटीमधून बाहेर निघणा-या पाण्याचा वेगसुध्दा कमी होत जाईल. जेंव्हा त्याची उंची शून्याच्या जवळ जाईल तेंव्हा त्याचा टाकीच्या बाहेर जाण्याचा वेगही शून्याच्या जवळ पोचेल पण शून्याला गाठण्यासाठी अनंत काळ लागेल. असे सायंटिस्ट सांगतील. तत्वतः हे बरोबर आहे. प्रत्यक्षात सुध्दा टाकीच्या तळाशी असलेला पाण्याचा पातळसा थर त्याला चिकटून राहतो. तो गुरुत्वाकर्षणाने कधीच वाहून जात नाही. या परिस्थितीत गुरुत्वाकर्षणाचा जोर अत्यंत क्षीण झालेला असतो आणि पाण्याचे सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी वगैरेंचा प्रभाव जास्त झाल्यामुळे टाकीच्या तळाशी थोडे पाणी शिल्लक असले तरी तोटीमधून पाणी बाहेर निघणे बंद होते. हे घडण्यासाठी अनंत काळापर्यंत थांबायची गरज नाही. यामुळे हे उत्तरसुध्दा बरोबर नाही.

माझ्यासारखा एक इंजिनियर यातले कोणतेही उत्तर देणार नाही. आळशीपणा करून मी एक सोपे तोंडी गणित केले. पाण्याचा तोटीमधून बाहेर पडण्याचा वेग सुरुवातीला एका मिनिटाला दोन लीटर असा होता आणि अखेरीस तो शून्य होणार, म्हणजे सरासरीने दर मिनिटाला एक लीटर एवढा धरला तर वीस लीटर पाणी वीस मिनिटात बाहेर पडेल. हे उत्तर मी टंकणार होतो, पण त्यापूर्वी आधी आलेली उत्तरे वाचली. त्यात वर दिलेली उत्तरे होतीच, शिवाय मौजमजा म्हणून या प्रश्नाला अनेक फाटे फोडलेले होते. ते पाहून मी आपला बेत बदलला आणि कॉलेजमध्ये असतांना ऐकलेले एक मजेदार असे अशा प्रकारचे उदाहरण दिले.
पण मला असेही जाणवले की काही लोकांना बरोबर उत्तर जाणून घेण्याची इच्छा आहे. मला आलेल्या एका संदेशात असे लिहिले होते, "उंची नसल्यामुळे उत्तर कसे काढणार?? मी Bernoulli principle चा विचार केला पण त्यासाठी उंची लागेलच ना?" त्यामुळे मला या विषयावर थोडे खोलात जाऊन काम करण्याची प्रेरणा मिळाली. कोडे घालतांना पाण्याची उंची दिलेली नाहीच, टाकीचा आकारही दिलेला नाही. ती त्रिकोणी, चौकोनी, गोल अशा कोणत्या आकाराची आहे, ती उभी आहे की पसरट आहे तेही ठाऊक नाही. शिवाय ते पाणी समुद्रातले आहे की नदीतले, त्याचे तपमान किती आहे वगैरे माहितीही नाही. प्लँटचे डिझाईन करतांना अशा अनेक गोष्टींचा उपयोग केला जातो.

पण पुरेशी माहिती नाही म्हणून इंजिनियर अडून बसत नाही. जेवढी माहिती उपलब्ध असेल तिचा पुरेपूर उपयोग करायचा आणि जी नसेल त्याबद्दल आपल्या अनुभवावरून अंदाज बांधायचा, काही बाबी गृहीत धरायच्या आणि पुढे जायचे असे त्याने करायचे असते. भरलेली टाकी रिकामी होईपर्यंत तिच्यात खारे, गोडे, थंड, गरम वगैरे जे पाणी आहे, ते जसे असेल तसेच राहणार, त्याचे गुणधर्म बदलणार नाहीत असे गृहीत धरायला काहीच हरकत नाही. टाकीचा आकार चित्रात दाखवल्याप्रमाणे कसलाही असणे शक्य असले तरी प्रत्यक्षात बहुतेक ठिकाणी त्या सिलिंडर किंवा चौकोनी आकाराच्याच असतात. या आकारांमध्ये टाकीचे क्षेत्रफळ (क्रॉस सेक्शन एरिया) तळापासून वरपर्यंत सारखेच असते. त्यामुळे गणित मांडणे सोपे होते.
टाकीचे घनफळ २० लिटर आहे आणि पहिल्या एका मिनिटात २ लिटर पाणी तोटीमधून बाहेर पडले एवढी माहिती दिली आहे. याचाच अर्थ पहिल्या एक मिनिटात एक दशांश एवढे पाणी बाहेर पडले आणि त्यामुळे पाण्याची पातळी एक दशांशाने खाली आली असा होतो. मी टाकीची उंची दहा विभागात (झोन्समध्ये) विभागली. प्रत्येक विभागातल्या पाण्याची तळापासूनची उंची वेगळी असल्यामुळे तोटीमधून बाहेर पडण्याचा वेगही त्यानुसार निराळा असणार, पण तो उंचीच्या वर्गमूळाच्या प्रमाणात असणार. दिलेल्या माहितीमधील (पहिल्या मिनिटातील) वेगाशी तुलना करून तो वेग मिळाला की तेवढ्या वेगाने त्या विभागातील सर्व पाणी बाहेर येण्यासाठी किती वेळ लागेल हे गणित करणे अगदी सोपे आहे. असा रीतीने सर्व दहा भागांना लागणारा वेळ काढला आणि त्याची बेरीज करून टाकी रिकामी होण्याला लागणारा वेळ मिळाला.

हे करतांना तीन निरनिराळ्या गोष्टी गृहीत धरल्या.

१. प्रत्येक विभागाच्या वरील टोकाएवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे पूर्णपणे खरे नाही, पण सोपे आहे.)

२. प्रत्येक विभागाच्या मध्यपातळीएवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे सत्यपरिस्थितीच्या किंचित अधिक जवळ आहे)

३. प्रत्येक विभागाची मध्य पातळी ठरवतांना त्यांच्या उंचींच्या वर्गमूळांचा (रूट मीन स्क्वेअर्स) विचार करून जी उंची निघते तेवढी त्यातील पाण्याची उंची धरून त्यामुळे पाण्याचा जेवढा वेग येईल तेवढ्याच वेगाने त्या विभागातले सर्व पाणी बाहेर आले. (हे सत्यपरिस्थितीच्या जास्त जवळ आहे)
यांची उत्तरे अनुक्रमे १५.८८ मिनिटे, १९.४९ मिनिटे आणि १७.६३ मिनिटे इतकी आली.

यातील शेवटच्या एक दशांश (सर्वात तळामधील) विभाग रिकामा होण्यास लागणारा वेळ अनुक्रमे ३.१६, ६.१६ आणि ४.३६ इतका आहे. वरचे नऊ विभाग अनुक्रमे १२.७१, १३.३२ आणि १३.२७ मिनिटात संपले. तीन्ही उदाहरणांमध्ये हे आकडे जवळ जवळ सारखे आहेत.
टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती किती अचूक असायला हवी आणि ती काढण्यासाठी किती आटापिटा करावा लागणार आहे या मुद्यांचा सापेक्ष विचार करून योग्य त्या पध्दतीने ते गणित मांडले आणि सोडवले जाते.

यात आणखी सूक्ष्म सुधारणा करायची असल्यास टाकीमधील पाण्याच्या स्तंभांचे (कॉलम्सचे) शंभर, हजार किंवा लाख विभाग करता येतील, प्रत्येक वेळी तळामधील विभाग शून्याच्या अधिकाधिक जवळ जाईल आणि तो रिकामा होण्यास लागणारा वेळ वाढत जाऊन तो अनंताच्या दिशेकडे जाईल. पण त्या परिस्थितीत गुरुत्वाकर्षणाचा जोर अत्यंत क्षीण आणि पाण्याचे सरफेस टेन्शन, व्हिस्कॉसिटी वगैरेंचा प्रभाव पडत होत असल्यामुळे त्या गोष्टी गणितात आणाव्याच लागतील. अगदी 'बालकी खाल' काढायची झाल्यास टाकीमधील पाण्याची वरची पातळी आणि तोटीची पातळी या ठिकाणी वातावरणातील हवेचा दाब आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण सुध्दा सूक्ष्म विचार करता किंचित वेगळे असते याची दखल घेता येईल, पण हे म्हणजे 'पाय'चे उत्तर तीन पूर्णांकानंतर दिलेल्या दशांश चिन्हापुढे शेकडो, लाखो आकड्यापर्यंत काढण्याइतके निरर्थक आहे.



Thursday, November 15, 2012

केवढा चांगुलपणा ?

स्वस्थ बसून न राहता काही काम करावे असे वाटावे हा माणसाचा एक चांगला गुण आहे, ते काम स्वतःसाठी न करता दुस-यासाठी करावेसे वाटणे त्याहून चांगले आणि दुस-यासाठी केलेले काम उत्कृष्ट प्रतीचे व्हावे असे वाटणे हा तर दुर्मिळ असा सद्गुण आहे. त्यामुळे दुसरा माणूस आनंदी होईल आणि त्याच्या आनंदामधून त्या सद्गुणी माणसाला समाधान वाटेल. अशा प्रकारे दोघेही सुखी होतील. याची पुनरावृत्ती होत गेली तर सारा समाज सुखी होईल. असे तात्विक दृष्ट्या म्हणता येईल. पण प्रत्यक्षात कधी कधी तसे घडत नाही. करायला जावे (चांगले) एक आणि तसे न घडता व्हावे भलतेच असा प्रकार होतो. प्रभाताई आणि प्रमोद यांच्या बाबतीत असेच झाले.

प्रभाताई ही प्रमोदची सर्वात थोरली बहीण होती आणि त्यांच्या वयात बरेच अंतर होते. लहानग्या प्रमोदला प्रभाताईंनी तिच्या अंगाखांद्यावर खेळवले होते आणि प्रमोदला समज आल्यापासून तो तिला घरातल्या एकाद्या मोठ्या व्यक्तीसारखा मान देत आला होता. दोघेही मोठे झाले, त्यांनी आपापले संसार थाटले, त्यांचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले. प्रभाताई अशीच एकदा प्रमोदकडे थोडे दिवस रहायला आली होती. तिचा सारा जन्म लहान गावातल्या मध्यमवर्गीय घरात गेला होता, तिथे तिला घरातली सगळी कामे करावी लागत होती, पण प्रमोदला त्या मानाने जरा चांगले दिवस आले होते. आपल्या बहिणीने आपल्या घरी चार दिवस चांगले ऐशोआरामात रहावे, तिला कसलेही कष्ट पडू नयेत असे प्रमोदला वाटत होते. घराची साफसफाई, धुणी भांडी वगैरे कामे करण्यासाठी ठेवलेल्या कामवाल्या बायका दिवसातून दोन वेळा येऊन ती सर्व कामे करून जात असत. श्रम आणि वेळ वाचवणारी स्वयंपाकघरातील जेवढी उपकरणे आणि यंत्रे बाजारात आली असतील त्यातली बहुतेक सगळी प्रमोदच्या घरी होती. त्यामुळे स्वयंपाकाचे कामसुध्दा बरेच सोपे झाले होते. घरातले कोणीही प्रभाताईला कसल्याच कामाला हात लावू देत नव्हते. तिने दिवसभर बसून किंवा वाटल्यास लोळत राहून पडल्या पडल्या आराम करावा, टीव्हीवरील कार्यक्रम पहावेत, रेडिओ किंवा टेपरेकाँर्डवर गाणी ऐकावीत, पुस्तके आणि मासिके वाचावीत, वाटल्यास आजूबाजूला फेरफटका मारून यावा, देवळात जाऊन यावे अशी प्रमोदची विश्रांतीची कल्पना होती. पण प्रभाताईच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या. तिच्या दृष्टीने ज्ञान, मनोरंजन, अध्यात्म वगैरे गोष्टी चवीपुरत्या ठीक होत्या. दिवसातला सगळा वेळ त्यात घालवणे तिला कठीण जात होते. आयुष्यभर ती घरातली सगळी कामे आनंदाने करत आली होती. आतासुध्दा भावाच्या घरातही निदान थोडेसे काम केल्याखेरीज तिला चैन पडत नव्हती, पण कोणीही तिला काहीच करू देत नव्हते. प्रमोद आणि प्रतिभाला काय वाटेल अशा विचाराने ती आपल्या मनातली बेचैनी दाखवत नव्हती, आपण तिथे मजेत असल्यासारखी वागत होती.

एकदा असे झाले की प्रभाताईचा गुरुवारचा उपास असल्याने तिला संध्याकाळी जेवायचे नव्हते. हे समजल्यावर तिच्या उपासाच्या फराळासाठी प्रतिभाने साबूदाणा भिजवून ठेवला. अचानक काही आवश्यक अशा कारणाने तिला एका मैत्रिणीकडे जाणे आवश्यक झाले. प्रभाताईंना सोबत नेले तर त्यांना दगदग झाली असती, शिवाय ऑकवर्डही वाटले असते. त्यांना घरी एकटीने बसवून ठेवणेही प्रतिभाला प्रशस्त वाटले नाही. तिने फोनवर प्रमोदशी बोलून घेतले आणि काय करायचे ते ठरवले. प्रमोद ऑफीसमधून परत यायच्या वेळी ती तयार होऊन बसली आणि तो घरी येताच मैत्रिणीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली.

त्या दिवशी प्रमोदला त्याचे सर्व काम संपवण्यासाठी ऑफीसमध्ये जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते. तिथली एक दोन कामे त्याच्याबरोबर घरी आली. त्यांचा शांतपणे अभ्यास करून आणि त्यावर विचार करून त्याला निर्णय घ्यायचा होता. घरी आल्यावर त्याने कपडे बदलले आणि बॅग उघडून तो कामाचे कागद बाहेर काढणार होता तेवढ्यात त्याला प्रभाताईची हाक ऐकू आली. आपल्याला नको म्हणणारे कोणी नाही असे पाहून प्रभाताई स्वयंपाकघरात गेल्या होत्या. त्यांची हाक ऐकून प्रमोद लगेच तिथे गेला. तिने साबूदाण्याची खिचडी करण्याची तयारी केली होती आणि त्यासाठी तिला कढई पाहिजे होती. त्याच्या स्वयंपाकघरात ओट्याच्या खाली खण करून त्यात भांडी ठेवण्याची व्यवस्था होती आणि काही डबे ठेवले होते. ओट्यापासून दोन हात मोकळी जागा सोडून वरच्या बाजूला कप्पे केले होते आणि काही डबे त्यात ठेवले होते. ओट्याखाली ठेवलेले सामान काढण्यासाठी खाली वाकावे लागत होते आणि वर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टूलावर चढावे लागत होते. वयोमानानुसार प्रभाताईंना या दोन्ही गोष्टी करणे कष्टाचे किंवा धोक्याचे होते. तिला स्वयंपाकघरातले कसले काम न सांगण्यामागे हेही एक कारण होते. शिवाय गॅस, ओव्हन, मिक्सर वगैरेंचा वापर कसा करायचा हे तिला माहीत नव्हते.

स्वयंपाकघरात कुठे कुठे काय काय ठेवले असेल हे प्रमोदला नीटसे ठाऊक नव्हतेच. त्याने अंदाजाने कढई शोधून काढून दिली, त्याबरोबर झाराही दिला. साबूदाण्याची खिचडी कशी करतात आणि त्यासाठी कोणकोणते जिन्नस लागतात हे त्याला माहीत नव्हते आणि ते कुठे ठेवले असतील याचीही कल्पना नव्हती. स्वयंपाकघरात आणलेला प्रत्येक पदार्थ ते नाव लिहिलेल्या ठराविक डब्यातच भरून तो डबा ठराविक फडताळातल्या ठरलेल्या जागीच ठेवायचा अशी शिस्त त्यांच्या घरी नव्हती. प्रभाताईला पाहिजे असलेले जिन्नस तिलाच शोधायला सांगणे त्याला योग्य वाटले नाही. कढई मिळताच तिने शेंगदाण्याचे कूट कुठे आहे ते विचारले. तयार केलेले कूट घरात असेल की नाही याची प्रमोदला खात्री नव्हती. निरनिराळे डबे काढून ते उघडून पहातांना त्याला एका डब्यात कच्चे शेंगदाणे सापडले. त्याने ते भाजले आणि मिक्सर चालवून त्याचे कूट करून दिले. त्यानंतर तूप, जिरे, खोबरे, मीठ, साखर वगैरे एक एक गोष्टीचं नाव काढताच प्रमोद ती शोधून काढून देत राहिला, तसेच गॅस पेटवायचा, विझवायचा, त्याची आच कमी किंवा जास्त करायची वगैरे कामांसाठी तो स्वयंपाकघरात जा ये करत राहिला.
तो विचार करत होता की प्रभाताईला साबूदाण्याची खिचडी हवी आहे असे तिने तासाभरापूर्वी सांगितले असते तर प्रतिभाने ती करून दिली असती. तिला मैत्रिणीच्या घरी जायला उशीर होऊ नये म्हणून कदाचित तिने प्रतिभाला सांगितले नसेल. अजून तासाभरात प्रतिभा परत आली असती आणि तिने त्यानंतर खिचडी करून दिली असती. पण तिला यायला उशीर लागला असता तर प्रभाताईला तोपर्यंत उपाशी रहावे लागले असते. त्याला स्वतःला साबूदाण्याची खिचडी करणे येतच नव्हते. त्यामुळे ताईला जे जे भांडे किंवा जिन्नस लागेल ते ते तो शोधून देत राहिला.
सगळे काम संपले असे पाहून प्रमोदने आपली बॅग उघडून त्यातले कागद बाहेर काढले. ते वाचायला तो सुरुवात करत होता तेवढ्यात प्रभाताईने साबूदाण्याच्या खिचडीने भरलेली प्लेट आणून त्याच्या हातात दिली. तो उद्गारला, "अगं ताई, तुझा उपास आहे ना? तूच ही प्लेट घे. मी जेवणात खाईन."

संध्याकाळच्या या वेळी काही खाण्याची त्याला सवय नव्हती आणि गरजही वाटत नव्हती. उलट अवेळी जास्तीचे खाण्यामुळे रात्रीचे जेवण व्यवस्थित होणार नाही आणि पचनसंस्था नीट राहणार नाही असे त्याला वाटत असे आणि तो शक्य तोवर ते टाळत असे.

पण प्रभाताई म्हणाली, "अरे, आत्ता गरम गरम खाऊन घे. जेवणापर्यंत ती थंड होऊन गेल्यावर तिची चंव राहणार नाही."

तो म्हणाला, "ठीक आहे. तू ही प्लेट घे. मी बशीत थोडी खिचडी घेऊन खाईन."

ताई म्हणाली, "नाही रे, तुपातले पदार्थ खाऊन अलीकडे मला खोकला येतो आणि शेंगदाण्याने पित्त होते म्हणून मी खिचडी खाणं सोडलं आहे."

हा धक्का प्रमोदला अनपेक्षित होता. तो म्हणाला, "मग तू रात्री काय खाणार आहेस ? आणि ही खिचडी कुणासाठी बनवलीस ?"

ताई म्हणाली, "मी थोडी फळं आणि दूध घेईन. तुला खिचडी आवडते ना, म्हणून तुझ्यासाठी तर ही बनवली आहे."

प्रमोदने नाइलाजाने प्लेटमधून चमचाभर खिचडी उचलून तोंडात टाकली. घास खाऊन झाल्यावर "मस्त झाली आहे." असं तो सांगणार होता तेवढ्यात ताई उद्गारली, "कशी झालीय् कुणास ठाऊक!"

तो म्हणाला, "असं का म्हणतेस? किती वर्षांपासून तू खिचडी करते आहेस? ती बिघडणं कसं शक्य आहे? "

ताई म्हणाली, " फोडणीत घालायला ताजी हिरवी मिरची मिळाली असती तर चांगला स्वाद लागला असता. "

आता मात्र प्रमोदला रहावलं नाही. आपल्या हातातलं महत्वाचं काम सोडून इतका वेळ तो निरनिराळ्या वस्तू आणि जिन्नस शोधून तिला देत होता. 'मिरची' म्हंटल्यावर त्याने शोधून काढून दिलेल्या मिरच्या हिरव्या होत्या की लाल, शिळ्या होती की ताज्या इकडे त्याने पाहिले नव्हते आणि त्याने काही फरक पडेल असेही त्याला वाटले नव्हते. तेवढीच उणीव ताईने काढावी याचे त्याला आश्चर्य वाटले.

तो म्हणून गेला, "आपल्या आईबाबांनी तर असं शिकवलं होतं की समोर येईल ते अन्न पूर्णब्रह्म म्हणून खाऊन घ्यायचं असतं आणि त्याला नावं ठेवायची नसतात. त्यामुळे मी तरी असली एवढी चिकित्सा कधी केली नाही."

प्रभाताईंचा चेहेरा खर्रकन उतरला आणि त्या देवासमोर जाऊन स्तोत्र म्हणत बसल्या. प्रमोदनं आपली प्लेट बाजूला सरकवून दिली आणि ऑफीसमधून आणलेल्या कागदात डोके खुपसले. पण आपण काय वाचत आहोत ते त्याला समजत नव्हते.

प्रभाताई आणि प्रमोद दोघेही मनाने खूप चांगले होते, दोघेही आपापल्या परीने एकमेकांचा विचार करून कृती करत राहिले, पण अखेर त्यातून त्यांच्यात थोडासा दुरावाच निर्माण झाला. त्यापेक्षा त्यांनी एकमेकांना विचारून घेतले असते तर ?

Monday, November 12, 2012

दिवाळीतले फटाके



आश्विन अमावास्येच्या काळोखात दिव्यांच्या रांगा लावून 'दीपावली' साजरी करण्याची परंपरा 'दिवाळी' या सणाने सुरू झाली. त्याला शेकडो वर्षांचा काळ उलटून गेला. आजही धार्मिक परंपरा किंवा शास्त्र म्हणून दिवाळीमध्ये रोज संध्याकाळी घरोघरी तेलाच्या पणत्या लावल्या जातातच. पण विजेच्या दिव्यांचा लख्ख प्रकाश मिळण्याची सोय झाल्यानंतर निरनिराळ्या प्रकारचे आकाशकंदील आणि झगमगणा-या दिव्यांच्या माळांनी अत्यंत नेत्रदीपक अशी रोषणाई करणे सुरू झाले. आज कोणत्याही शहरात एक फेरफटका मारून पाहिल्यास त्याची प्रचीती येईल. लहान मुलांनी विजेशी खेळणे सुरक्षित नसते आणि त्यांना ते करणे शक्यही नसते म्हणून बहुतेक घरी हे काम मोठी माणसेच करतात. दिवाळीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे फराळ. पूर्वीप्रमाणे आता सगळे खाद्य पदार्थ घरी तयार करण्याची खटपट केली जात नाही. मोठ्या शहरात तर मिठायांचे इतके वेगवेगळे प्रकार आता मिळतात आणि ते आकर्षक वेष्टनांमध्ये विक्रीसाठी मांडून ठेवले जातात की दिवाळीसाठी तेच मोठ्या प्रमाणात आणले जातात. हल्लीच्या काळात वर्षभरच चांगले चुंगले खाऊन जिभेचे चोचले पुरवणे चाललेले असते. त्यामुळे दिवाळीच्या फराळाची पूर्वीसारखी अपूर्वाई राहिली नाही. या सगळ्यांच्या तुलनेत दिवाळी म्हंटले की लहान मुलांना लगेच कशाची आठवण प्रकर्षाने येत असेल तर ती फटाक्यांचीच !


पुराणातल्या कहाण्यांमध्ये फुलापानांच्या माळा, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या वगैरे इतर प्रकारच्या सजावटीचे उल्लेख सापडतात, दीपज्योती तर कुठल्याही मंगल प्रसंगी आवश्यकच असते, पण गंमत म्हणून धडाडधूम आवाज करणारे फटाके उडवणे दिसत नाही. स्फोटकांचा शोध चीनमध्ये लागला आणि फटाक्यांचा उपयोगही सर्वात आधी म्हणजे सातव्या शतकात चीनमध्ये सुरू झाला. त्याचे तंत्रज्ञान तिकडून युरोपमध्ये गेले आणि त्यांनी त्यात प्रचंड प्रगती आणि सुधारणा केली. ब्रिटीशांच्या काळात त्याची भारतात आवक झाली आणि फटाके उडवणे हा कोठल्याही उत्सवाचा अविभाज्य भाग झाला. इतर समारंभ एका कुटुंबापुरते किंवा एका समूहापुरते मर्यादित असतात, पण दिवाळी हा सर्वांचाच सण असल्याने त्याचे कानठळ्या बसवणारे आवाज एकाच वेळी सगळ्या बाजूने येत राहतात.


प्रकाश आणि ध्वनि यांच्या निर्मितीमधून काही धमाल उडवण्याचा प्रयत्न दिवाळीत उडवायच्या दारूमधून केला जातो. त्यामुळे लहान किंवा मोठा आवाज करणारे फटाके आणि निरनिराळे प्रकाश उत्पन्न करणारी उत्पादने असे दोन मुख्य प्रकार यात असतात. याशिवाय आकाशात उडणारे अग्निबाण असतात, तसेच यांना एकत्र आणणारे फटाके असतात. कशात आधी अग्निबाण आकाशात उडतो आणि वर गेल्यानंतर त्याचा स्फोट होऊन धमाका होतो किंवा त्यातून चमकदार ठिणग्यांचा वर्षाव होतो. लहानशा फटाकडीपासून सुतळी बाँबसारख्या मोठ्या फटाक्यापर्यंत त्यात अनेक प्रकार असतात, तसेच फुलबाजी, भुईचक्र आणि कारंजे वगैरे निरनिराळ्या प्रकाराने प्रकाशाची आतिशबाजी केली जाते. त्यातही एकाच रंगाच्या किंवा विविध रंगांच्या ठिणग्या उडवल्या जातात.

हे सारे फटाके कोणत्या तत्वावर काम करतात हे अनेकांना ठाऊक नसते पण ते जाणून घ्यायची इच्छा असते. त्यांचे कुतूहल शमवण्याचा एक लहानसा प्रयत्न या लेखात केला आहे. आपण साधा कागद किंवा लाकडाचा तुकडा जाळतो तेंव्हा त्यांच्यामधील मुख्यतः कार्बन व हैड्रोजनच्या अणूंचा हवेमधील प्राणवायूच्या अणूंशी संयोग होऊन कार्बन डायॉक्साईड वायू आणि पाण्याची वाफ तयार होते आणि त्या रासायनिक क्रियेत या पदार्थांमधून ऊष्णता बाहेर पडते. त्यामुळे त्या ठिकाणचे तपमान वाढते आणि त्यातून निघालेल्या प्रकाशकिरणांमुळे आपल्याला जाळ दिसतो, तसेच त्यात हात घातल्यास हाताला चटका बसतो. या जळण्यात कागद किंवा लाकडामधील काही कण जळत नाहीत, त्यातले सूक्ष्म कण हवेत पसरल्यामुळे त्यातून धूर तयार होतो आणि काही कण राखेच्या रूपाने खाली राहतात. ज्वलनाची क्रिया होण्यासाठी जळणारा पदार्थ आणि प्राणवायू यांची आवश्यकता असते आणि ही क्रिया उच्च तपमानालाच होऊ शकते. यामुळे वातावरणाच्या तपमानात (रूम टेंपरेचरला) कागद किंवा कपडे ठेवल्या जागी आपोआप पेट घेत नाहीत.

गंधक, कापूर यासारखे ज्वालाग्राही पदार्थ पटकन पेटतात आणि भुरूभुरू जळतात. काही रासायनिक पदार्थांमध्ये जादा प्राणवायू असतो आणि उच्च तापमानाला तो त्यांच्यामधून बाहेर पडतो. अशी रसायने आणि ज्वालाग्राही पदार्थ यांचे मिश्रण स्फोटक बनते. त्यांचे ज्वलन होण्यासाठी बाहेरील हवेमधील प्राणवायूची आवश्यकता नसते. एका ठिणगीने त्यांच कण पेटवले की त्यांच्या ज्वलनामधून अधिकाधिक ऊष्णता बाहेर पडत जाते आणि ते जळत जातात. बंदुका व तोफा यांना उडवण्यासाठी लागणारी किंवा सुरुंगाची दारू या प्रकारची असते. दिवाळीच्या फटाक्यांमध्ये याच प्रकारची दारू सौम्य रूपात वापरली जाते.

फटाका तयार करतांना कागदाची जाड गुंडाळी करून त्यात ही दारू भरतात आणि त्याला जोडलेली एक कागदाची वात बाहेरपर्यंत ठेवली जाते. या वातीवर दारूचा पातळसा थर दिलेला असतो. ती पेटवली की हळूहळू आतपर्यंत जळत जाते. यामुळे पेटवणा-याला दूर पळायला वेळ मिळतो. कागदाच्या गुंडाळीच्या आतील दारू बाहेरील हवेशिवायच पेट घेते. त्यांच्या ज्वलनातून जे वायू बाहेर पडतात त्यांचे आकारमान मूळ स्थितीच्या शेकडो पटीने जास्त असते आणि त्यांना व्यापण्यासाठी फटाक्याच्या आत पुरेशी जागा नसल्यामुळे त्या वायूचा दाब वाढत जातो. कागदाचे वेष्टण आतल्या बाजूने जळत जाऊन कमकुवत होत जाते. अखेर आतला दाब सहन न झाल्यामुळे ते टराटरा फाटते आणि आतील वायू सर्व बाजूंनी वेगाने बाहेर पडतो. त्यामुळे हवेत कंपने निर्माण होऊन मोठा ध्वनि निघतो. हे सगळे क्षणार्धात होते. फटाक्यामधील दारूचा प्रकार आणि प्रमाण यानुसार लहान किंवा मोठा स्फोट होऊन थोडा किंवा कानठळ्या बसवणारा आवाज निघतो. अगदी लहानशा कागदाच्या दोन गोल तुकड्यांमध्ये कणभर दारू ठेवून टिकली तयार होते. ती खेळातल्या पिस्तुलात ठेऊन तिचा घोडा ओढला की पिस्तुलातला खटका दाणकन टिकलीवर आदळून तिच्यातल्या दारूचा लहानसा स्फोट होतो. अनेक फटाके एकमेकांना जोडून त्यांची माळ तयार करतात आणि त्यातले सारे फटाके एकदम न उडता ते एकामागोमाग एक करून उडावेत अशी त्यांची रचना केली असल्यामुळे ती माळ काही सेकंद किंवा मिनिटे तडतडत राहते.
फटाक्याच्या वेष्टनाची गुंडाळी करतांना तिच्या एका बाजूला मोकळी वाट ठेवली तर ज्वलनामुळे आत निर्माण झालेले वायू त्यातून वेगाने बाहेर पडतात आणि न्यूटनच्या तिस-या नियमानुसार त्याच्या प्रतिक्रियेमुळे तो फटाका उलट बाजूने दूर फेकला जातो. अग्निबाणामधील फटाक्याला खालच्या बाजूने मोकळी वाट असते. त्यातून हे ऊष्ण वायू बाहेर पडतात आणि काडीला जोडलेला फटाका आभाळात उड्डाण करतो. त्याच फटाक्यातल्या दुस-या कप्प्यात आणखी थोडी दारू भरलेली असते. बाण आकाशात उंच उडल्यानंतर ती दारू पेटते आणि तिचा स्फोट होतो.
शोभेच्या दारूला जाड वेष्टण नसते. तिचा एकदम स्फोट होऊ नये म्हणून तिच्यात काही न जळणारी रसायने किंवा धातूंचा भुगा मिसळतात. त्यांना तापवल्यावर उच्च तपमानाला त्यांचा रंग बदलतो. उदाहरणार्थ कॅल्शियमचा रंग केशरी होतो तर सोडियमचा पिवळा, तांब्याचा निळा तर बेरियमचा हिरवा. पांढरा शुभ्र प्रकाशासाठी मुख्यतः मॅग्नेशियम किंवा अॅल्युमिमियमचा वापर होतो. मॅग्नेशियम धातू स्वतःच ज्वालाग्राही असल्यामुळे त्यातूनच अत्यंत चमकदार अशा ठिणग्या पडतात. फुलबाजी पेटवली की तिच्या काडीला चिकटवलेली दारू किंवा मॅग्नेशियमची पूड जळत राहते. त्याचबरोबर या भुग्याचे कण तापून चमकतात आणि त्यांच्यामधून रंगीबेरंगी प्रकाशकिरण बाहेर पडतात. भुईचक्र तयार करण्यासाठी ही शोभेची दारू एका कागदात गुंडाळून तिचे वेटोळे लहानशा भिंगरीला चिकटवतात. त्यामुळे ती प्रकाशाचे झोत टाकत स्वतःभोवती गोल गोल फिरत राहते. एका कोनिकल आकाराच्या वेष्टनात बरीच दारू भरून ठेवली तर त्याचे झाड किंवा कारंजे होते.


फटाके तयार करतांना त्यातून होणारे स्फोट विध्वंसक होऊ नयेत इतपत लहान ठेवले असतात, पण माणसाला धाडसाचे वेड असल्यामुळे तो त्याचा आकार वाढवत जातो. असे मोठ्या आकाराचे फटाके उडवतांना पुरेशी काळजी घेतली नाही आणि कोणी त्या फटाक्याच्या अगदी जवळ आला तर स्फोटाच्या धक्क्याने त्याला इजा होऊ शकते. ढिले किंवा ज्वालाग्राही कपडे पेट घेऊन तो माणूस भाजू शकतो. फार मोठ्या आवाजाने त्याचे कान बधीर होऊ शकतात. एकादी ठिणगी डोळ्यात गेल्यास अंधत्व येऊ शकते. लहान मुले आणि वृध्द लोकांची सहनशक्ती कमी असते. त्यामुळे जो प्रखर उजेड किंवा आवाज मोठे लोक सहन करू शकतात, त्यांच्यामुळे लहान मुलांना किंवा वृध्दांना इजा होऊ शकते. पर्यावरण हा एक नवा मुद्दा अलीकडे अधिकाधिक महत्वाचा होत चालला आहे. दिवाळीनिमित्य फार मोठ्या प्रमाणात फटाके उडवले गेल्यामुळे त्यांच्या ज्वलनामधून निघालेले विषारी वायू हवेत मिसळतात आणि त्रासदायक ठरतात. ज्या लोकांची श्वसनसंस्था कमकुवत असते अशा लोकांना श्वास घेणेसुध्दा जड जाऊन त्यांचा जीव व्याकूळ होतो. या सगळ्यांचा विचार करून केवळ मौज म्हणून फटाक्यांवर कमी भर देणेच योग्य आहे.

Saturday, November 10, 2012

चंद्राची गाणी - भाग ४ - इतर गीते

निसर्गातून सगळ्या चांगल्या गोष्टी वेचून घेण्याच्या इच्छेने एक प्रेमिका चंद्रिकेकडे प्रीतीचे वरदान मागते. चंद्राला यावेळी चंद्रिका असे संबोधून ती तिला आपली मैत्रिण बनवते. यासाठी पौर्णिमेचा पूर्ण चंद्र कामाचा नाही, द्वितीयेची नाजुक कौरच हवी.


दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी, रानहरिणी दे गडे भीती तुझी ।।
मोहगंधा पारिजाता रे सख्या, हांसशी कोमेजतां रीती तुझी ।।
रे कळंका छेदितां तुज जीवनी, सुस्वरे जन भारिते गीती तुझी ।।
सोशितोशी झीज कैसी चंदना, अपकारिता उपकार ही नीती तुझी ।।

या गाण्यामधील सर्व उदाहरणे ही त्यागाची आहेत. पारिजाताचे फूल, वेळूचे (बांबूचे) झाड, चंदनाचे खोड हे सर्व स्वतः नष्ट होऊन त्यातून दुस-यांना सुखी करतात. सुरेख दिसणारी चंद्राची कोर आणि भित्री हरिणी यांना त्यांच्या पंक्तीत का बसवले आहे ते कवीवर्य राजा बढेच जाणोत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांच्या दीदी लताताई यांनी जनसंमोहिनी रागामधील मधुर सुरावटीतून श्रोत्यांवर अजब मोहिनी घातली आहे.


पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची उपमा सुंदर चेहे-याला नेहमी दिली जातेच तर द्वितीया आणि तृतीयेची चंद्रिका अत्यंत आकर्षक असते. अंगाने थोड्या भरलेल्या चवतीच्या चंद्रकोरीचा सुध्दा केवढा झोक?

कशी झोकांत चालली कोळ्याची पोर ?
जशी चवतीच्या चंद्राची कोर ।।

फेसाळ दर्याचं पाणी खारं ।
पिसाट पिऊनी तुफान वारं ।
उरात हिरव्या भरलं हो सारं ।
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर ।।१।।

टाकून टाकशील किती रं जाळी ?
मेघाची सावली कुणाला घावली ?
वा-यानं अजूनी पाठ नाही शिवली ।
वाटेला बांग दिली हिच्यासमोर ।।२।।

केसाची खूणगाठ चाचपून पाहिली ।
फुलांची वेणी नख-यानं माळली ।
कुणाला ठाव रं कुणावर भाळली ।
प्रीतीचा चोर तिला राजाहून थोर ।।३।।

चवतीच्या चंद्रासारखे देखणे रूप मिळालेल्या पोरीने ते अधिक खुलून दिसावे यासाठी थोडा साजश्रुंगार केला कारण राजापेक्षासुध्दा जास्त महत्वाचा असा तिच्या प्रीतीचा चोर तिला भेटणार असावा. कोळ्याच्या देखण्या मुलीचे वर्णन करतांना कविवर्य गदिमांनी ग्रामीण भागातील जीवनाचे सुंदर दर्शन या गीतात घडवले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमधील चित्रपटांना मधुर संगीत देऊन ज्यांनी अमर केले असा वसंत देसाई यांनी बांधलेल्या स्वररचनेला आपल्या गोड आवाजातल्या ठसक्याने आशा भोसले यांनी अधिकच बहार आणली आहे.


प्रेम, सौंदर्य वगैरे दर्शवणारी चन्द्राची इतकी रूपे पाहिली. आता थोडी वेगळी रूपे पाहू. यमुनेच्या पलीकडे रहाणा-या कुब्जेला पहाटेच्या वेळी श्रीकृष्ण भेटायला गेला त्या प्रसंगाचे वर्णन करतांना कवयित्री इंदिरा संत म्हणतात,

अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ ।
अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे का पांवा मंजुळ ।।

मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भंवती भणभण ।
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकुन अपुले तनमन ।।

विश्वचि अवघे ओठा लावुन, कुब्जा प्याली तो मुरलीरव ।
डोळ्यामधले थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ।।

अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे कां पांवा मंजुळ ।
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ।।

एरवी नुकताच उगवलेला 'चंद्र पुनवेचा' नेहमी कौतुकाचा असतो, पण मधुर गळ्याची गायिका सुमन कल्याणपूर आणि संगीतकार दशरथ पुजारी या द्वयीने दिलेल्या या भावगीतात मावळतीवर आलेल्या केशरी चंद्राच्या उल्लेखाने पहाटेची वेळ दाखवली आहे.
संत जनाबाई विठ्ठलाची इतकी लाडकी होती की तिला घरकामात मदत करण्यासाठी तो स्वतः तिच्या घरात येत असे. गीतकार शांताबाई जोशी यांनी लिहिलेल्या एका जुन्या गाण्याची चाल एका काळातले भावगीतांचे सम्राट गजानन वाटवे यांनी बांधली होती आणि माणिक वर्मा यांनी ते गयिले होते. जनाबाईची श्रध्दा पाहून तिचा कामाचा भार हलका करण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंग तिला दळण दळायला मदत करतो तेंव्हा ती हर्षभरित होऊन म्हणते,

आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात ।
पंढरीचा रावा दळी जनीच्या घरात ।।
किती करी काम देवा, घेई रे विसावा ।

हेच ऐक एवढे रे, मान किती घ्यावा ।
घनश्याम विठ्ठला रे, पंढरीच्या राया ।
धावुनिया भक्तांपाठी, वृथा शिणवाया ।
जरा थांबू दे रे देवा, कोमल दे हात ।।

किती माझ्यासंगे, गाउनिया गाणी ।
भागलीस आता, तू रे चक्रपाणी ।
कटी पितांबर शोभे, तळा वैजयंतीमाळा ।
असा हरी गरीबांच्या, झोपडीत झोपी गेला ।
सावळीच गोजिरी ही, मूर्ती सदा नयनात ।।


सूर्य आणि चंद्र पृथ्वीवर प्रकाशकिरणांचा वर्षाव करतात. त्या उजेडात उजळून निघालेल्या पृथ्वीकडे आकाशातले देवच सूर्य व चंद्र या डोळ्यांनी पहात असतात अशी कल्पना आहे. मृत्यू पावलेले जीव स्वर्गात म्हणजे देवलोकात गेल्यानंतर ते सुध्दा असेच पहात असतील अशी कल्पना कवी पी. सावळा राम यांनी केली आहे. आपल्या लाडक्या कन्येचे आयुष्य सुखात जावे, तिला कशाची ददात पडू नये यासाठी तिला चांगले शिक्षण, कला कौशल्य वगैरेंमध्ये निपुण करून एका त-हेने तिच्यासाठी कल्पवृक्ष लावून गेलेल्या बाबांची आठवण काढून त्यांची यशस्विनी झालेली लाडकी लेक म्हणते,

सूर्य चंद्र तुमचे डोळे, दुरूनीच हो बघतात ।
कमी नाही आता कांही, कृपादृष्टीची बरसात ।
पांच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात ।
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा ।।

या गाण्यातले भाव लता मंगेशकरांच्या व्यक्तीगत आयुष्यालासुध्दा लागू पडत असल्यामुळे त्यांनी अत्यंत समरसतेने गाऊन हे गीत अजरामर केले आहे. संगीतकार वसंत प्रभू यांनी या गीताला दिलेली चालही अप्रतिम अशी आहेच.

पी.सावळाराम, वसंत प्रभू आणि लतादीदी यांनी जी अप्रतिम गीते मराठी रसिकांना दिली आहेत त्यातलेच दुसरे एक गीत आहे.
श्रीरामा, घनश्यामा, बघशिल कधी तू रे, तुझी लवांकुश बाळे ।

वनवासाच्या घरात माझ्या, अरुण चंद्र हे सवे जन्मता ।
विरह प्रीतीचे दुःखही माझे, हंसते रघुनाथा ।
विश्वाची मी मंगल माता, तुझी लाडकी सीता ।
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले ।।

'चंदा है तू मेरा सूरज है तू' अशा शब्दात सगळ्या माता आपल्या मुलांचे कोतुक करत असतात. सूर्य आणि चंद्र ही तेज आणि सौंदर्य यांची प्रतीके आहेत. वाल्मिकी मुनींच्या आश्रमात आपल्या मुलांना वाढवत असतांना सीतामाई वर दिलेले गाणे म्हणते अशी कल्पना आहे.

पुण्यवान लोक मरणानंतर स्वर्गाला जातात. तेंव्हा चंद्र तारे यासारखे आकाशस्थ देव त्यांचे स्वागत करतात. देशकार्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मुलाचा पिता आपला शोक आवरून म्हणतो,

पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी ।
चंद्र तारे धन्य तुजला आरती ओवाळुनी ।

गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव भारता ।।
झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे सुता ।
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता ।।


सूर्य हा सर्वात जास्त प्रकाशमान आहेच, चंद्र हा त्याच्या खालोखाल तेजस्वी दिसतो. पण हे दोघेही साध्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश देऊन अंधःकार दूर करतात. सद्गुरूच्या कृपेने मन उजळून निघते. ज्ञानाचा हा प्रकाश इतका प्रखर असतो की तो सूर्यचंद्रांनासुध्दा लाजवतो. ओंकारस्वरूप समर्थ सद्गुरूंना नमन करतांना संत एकनाथ म्हणतात,

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्यापुढे उदास चंद्र रवि ।
रवि, शशि, अग्नि, नेणति ज्या रूपा, स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ।।
ओंकारस्वरूपा सद्गुरूसमर्था, अनाथांच्या नाथा तुज नमो ।।


विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले संत गोरा कुंभार आळवणी करतात,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर ।
चंद्र व्हा हो पांडुरंगा, नम करा थोर ।।
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले ।
वृध्दपणी देवा आता, दिसे पैलतीर ।।

जन्म मरण नको आता, नको येरझार ।
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।
चराचरापार न्याहो लागला उशीर ।
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

गीतकार अशोकजी परांजपे यांनी लिहिलेल्या या नाट्यगीताला संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी दिलेली चाल इतकी सुरेख आहे की गायनाच्या अनेक मैफलींची सांगता या भैरवीने केली जाते.



ज्ञानेश्वरी ग्रंथाचे शेवटी पसायदान मागतांना संत ज्ञानदेव विनंति करतात,

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।

जगातल्या सर्व लोकांचे प्रत्यक्ष सूर्य चंद्राबरोबर नाते जुळावे, ते सुध्दा काळिमा नसलेला चंद्र आणि दाहक नसलेला सूर्य यांच्याबरोबर, असे मागणे त्यांनी केले आहे. सर्व लोकांनी सज्जन आणि तेजस्वी व्हावे पण त्याबरोबर निष्कलंक रहावे आणि तापदायक होऊ नये असा संदेश या पसायदानांमध्ये दिलेला आहे.



 . . . . .  . . (समाप्त)

Tuesday, November 06, 2012

चंद्राची गाणी - भाग ३ - विरहगीते

चंद्र आणि प्रेम यांच्यात किती जवळचा संबंध आहे हे मागील भागात दिलेल्या गीतांवरून पाहिलेच आहे. चंद्राच्या आभाळातल्या अस्तित्वानेच जशा समुद्रात लाटा उठतात तशाच प्रेमिकांच्या मनातही उठतात. ते एकमेकांच्या सहवासात असतील तर त्यांच्या मनातल्या भावनांचा आवेग जास्तच वाढतो. पण असे चांदण्या रात्रीच्या धुंदीमध्ये एकत्र येऊन न्हाऊन निघणे सर्वच प्रेमिकांच्या नशीबात नसते. त्यातले अनेक दुर्दैवी जीव विरहव्यथा भोगत असतात. त्यातलीच कुणी आर्जवे करते (किंवा करतो) की या पौर्णिमेच्या रात्री एकदा तरी येऊन मला भेटून जा, कधीपासून माझ्या मनात साठून राहिलेल्या मृदु भावना इतक्या प्रबळ आहेत की त्या वाळवंटातही फुलबाग फुलवतील, अंधालाही दिसतील आणि सुखवतील. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी रचलेल्या या गीतामधील भावना कवीमनाच्या संगीतकार यशवंत देव यांनी अचूक ओळखून सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजातून रसिक श्रोत्यांपर्यंत या गाण्यातून पोचवल्या आहेत. या गाण्यात विरहव्यथेपेक्षा आर्जव आणि आशा यांना जास्त महत्व आहे.



रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा ।
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा ।।

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी ।
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी ।
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा ।।१।।

पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना ।
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना ।
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा ।।२।।

अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही ।
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही ।
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा ।।३।।


उंबरठा या चित्रपटात एका महिलासुधारगृहात रहात असलेली एक मदनिका तिथल्या नीरस वातावरणात अस्वस्थ होत असते. तेथे यायच्या आधी ती पुरुषांच्या सहवासाला चटावलेली असते. चांदण्या रात्री त्या कामिनीला हा मदनावेग अनावर झाला आहे. तिच्याच शब्दात सांगायचे तर,

चांद मातला मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सांवरू ?

अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा,
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू ।।

आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा,
वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू ।।

गोड गारव्याचा वारा, देह थरारला सारा,
लाख चुंबनांचा मारा, चांद लागला करू ।।

याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी,
झाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू ?

चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी,
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू ।।

कवी वसंत बापट, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या सर्व सोज्ज्वळ स्वभावाच्या कलाकारांनी मिळून हे वेगळ्या प्रकारचे अप्रतिम गीत आपल्याला दिले आहे.
आधा है चंद्रमा रात आधी, रह न जाये तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी हे हिंदी गाणे एके काळी खूप गाजले होते आणि अजून सर्वांच्या स्मरणात राहिले आहे. अशाच अर्थाचे एक मराठी गीत कवी मधुकर जोशी यांनी लिहिले आणि कवीमनाचे संगीतकार यशवंत देव यांनी कृष्णा कल्ले या गुणी गायिकेकडून गाऊन घेतले.

कुणा जोडप्याची भेट झाली आहे पण अर्धेमुर्धे बोलणे होईपर्यंत पुन्हा त्यांच्या विरहाचा क्षण आला आहे. त्यांची व्यथा ते सांगतात,

चंद्र अर्धा राहिला, रात्र अर्धी राहिली,
भेट अर्धी, गीत अर्धे, प्रीत अर्धी राहिली ।।

मोकळे बोलू कसे मी, शब्द ओठी थांबले,
लाज-या डोळ्यात माझ्या चित्र अर्धे रेखिले,
ओठ अर्धे विलगले, अर्ध उकले पाकळी ।।

बिलगुनी रमल्या तरूंशी पेंगलेल्या साउल्या,
तो निळा एकांत तेथे भावना भारावल्या,
धुंद झाल्या दशदिशा, रात्रही ओलावली ।।

वाकले आकाश खाली दूरच्या क्षितिजावरी,
चांदणे चुंबीत वारा झोपला वेलीवरी,
भेट घ्याया सृष्टि ही अर्ध झुकली, वाकली ।।


कधी कधी असे होते की प्रियकर आपल्या प्रियेला भेटलेला आहे, पण तो बिचारा इतका थकलेला भागलेला असतो की ती जवळ असतांनासुध्दा तो चक्क झोपून जातो, चांदण्या रात्रीचा आनंद पूर्णपणे उपभोगण्याचं त्राणच त्याच्यात नसतं. या अवस्थेत वियोग नसतांनासुध्दा तिचे मन विरहावस्थेच्या जवळ असते. तेंव्हा अतृप्तावस्थेतील ती म्हणते,

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास कां रे?
एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे?

अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला ।
अजुन मी विझले कुठे रे? हाय ! तू विझलास का रे?

सांग, ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू ?
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे?

बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा ।
रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे?

उसळती हुदयात माझ्या अमृताच्या धुंद लाटा ।
तू किनार्‍यासारखा पण कोरडा उरलास का रे?

कवीवर्य स्व. सुरेश भट त्यांच्या कवितांमधून आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातात. त्यातली मध्यवर्ती कल्पनाच अफलातून असते आणि त्यातून हवे तेवढे निरनिराळे अर्थ काढता येतील अशी गूढ पण कुशल शब्दरचना असते. वर वर दिसणा-या अर्थाहून वेगळा आणि अधिक भेदक अर्थ त्यात दडलेला आहे असे कोणा विद्वानाने सांगितले होते. अकाली निधन पावलेल्या पतीच्या पत्नीचा आकांत त्याला त्यात दिसला. कोणाला यात पुरुष आणि प्रकृती किंवा जीव आणि आत्मा यांची अवेळी झालेली ताटातूट सापडली.

संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर सुरेश भटांचे चांगले मित्र होतेच आणि त्यांच्या कवितांचा अर्थ समजून घेऊन त्याला तितकीच अफलातून चाल लावत असत. या गाण्यातला भाव पाहता त्यांनी हे गाणे आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतले आणि या दोघांनी मिळून या गाण्यात किती आर्ततेचे भाव आणले आहेत याला तोड नाही.


मधुचंद्र चित्रपटातल्या बिचा-या नायक नायिकांचे नशीबच विचित्र असते. त्या दोघांना त्यांच्या लग्नानंतर मधुचंद्राची रात्रसुध्दा तुरुंगवासामध्ये वेगवेगळी घालवावी लागते. बिच्चारे म्हणतात,

मधू इथे अन चंद्र तिथे, झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात।
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे?
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात।।

माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले ।
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात ।
अजब ही मधुचंद्राची रात ।।

किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्‍तीत ।
अशी निघाली लग्‍नानंतर, वार्‍यावरची वरात ।
वार्‍यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात ।।

अशा बिकट पण विनोदी प्रसंगाला साजेसे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिले. संगीतकार एन्‌. दत्ता हे मुख्यतः हिंदी चित्रपटांना संगीत देत असत. त्यातले काही खूप गाजलेही होते. या मराठी चित्रपटासाठी हे द्वंद गीत आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायिले.

वरील गाण्यातला चंद्र दोघांना उदासच बनवतो. तरुण आहे या गाण्यात त्याची जादू पुरेशी ठरत नाही, तशीच प्रेमाचा भर ओसरून गेला किंवा काही कारणाने त्यांच्यात कटुता आली तरी होते. काही जोडप्यांच्या बाबतीत असं होतं की प्रेमाचा पहिला बहर ओसरून गेल्यावर वास्तवाचे कांटेकुटे बोचू लागतात आणि व्यथित अंतःकरणाने तो म्हणतो,

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी,
एकांती मजसमीप तीच तूही कामिनी ।।

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे ।
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे ।
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ।।

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे ?
मी ही तोच तीच तू ही, प्रीति आज ती कुठे ?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी ।।

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा ।
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा ।
गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी ।।

कवयित्री शान्‍ताबाई शेळके आणि संगीतकार व गायक सुधीर फडके यांचे हे गीत म्हणजे भावगीतांच्या क्षेत्रातला एक मैलाचा दगड ठरले किंवा ते त्यातले एक उत्तुंग असे शिखर आहे असेही म्हणता येईल.
प्रत्येकाचे प्रेम सफल होतेच असे नाही. त्यात अनेक अडचणी येतात. काही वेळा त्यातून मार्ग काढणे अशक्यच असते. अशा अपरिहार्य अशा प्राप्त परिस्थितीपुढे नमते घेऊन कुणाकुणाला प्रेम वगैरे विसरून जावेच लागते. अशी एक अभागिनी म्हणते,

चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा ।
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा ।।

आणिले धागे तुझे तू मीहि माझे आणिले ।
गुंफिला जो गोफ त्याचा पीळ तू विसरून जा ।।

मी दिली वचने तुला अन्‌ वाहिल्या शपथा खुळ्या ।
शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा ।।

प्रीतिचे हितगूज ते, कुजबुज ती, रुसवेहि ते ।
ते हसू अन्‌ आंसवे ती, आज तू विसरून जा ।।

चंद्र ज्याला साक्ष होता, जे फुलांनी पाहिले ।
रेखिले प्राणांत जे मी तेच तू विसरुन जा ।।

कवयित्री शान्‍ता शेळके यांच्याच या गाण्यातला चंद्र साक्षीला होता, पण तो कसली मदत करू शकणार ? वसंत पवार यांनी रचलेल्या चालीवर माणिक वर्मा यांनी ही काकुळतीची विनंती किती प्रभावीपणे केली आहे ?



चंद्र किंवा चांदणे यांचा ओझरता उल्लेख तर अनेक गीतांमध्ये येतो. कुणाच्या मनात पूर्वीच्या गोड आठवणी येतात. त्या आपल्या येतात आणि जातात आणि कधी कधी ते क्षण पुन्हा अनुभवायची आशाही त्यांना चंद्र दाखवतो.

चंद्र कोवळा पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला,
जरा लाजुनी, जाय उजळुनी, काळोखाच्या राती,
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती ।।

किंवा

अजून फिक्कट चंद्राखाली, माझी आशा तरळत आहे,
गीतामध्ये गरळ झोकुनी अजून वारा बरळत आहे ।।
अजून त्या झुडुपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ।
अजून अपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते ।।







(क्रमशः)

Thursday, November 01, 2012

चंद्राची गाणी - भाग २ - प्रेमगीते

चंद्र आणि प्रेम यांचे अतूट नाते युगायुगापासून चालत आले आहे. महाकवी कालीदासांपासून ते आजच्या नवकवींपर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रेम या विषयावर साहित्यिक कृती निर्माण केल्या आहेत त्यात कुठे ना कुठे चंद्र डोकावतांना दिसतोच. चांदण्या रात्रीच्या धुंद करणा-या वातावरणाचे वर्णन मराठी कवितेत विविध त-हेने आले आहे.

मुख्यतः शास्त्रीय संगीताला प्राधान्य देऊन त्यातल्या गाण्यांना एकत्र गुंफण्यापुरते प्रसंग टाकून अनेक संगीत नाटके तयार करण्यात आली. त्या नाटकांमधल्या गाण्यांमध्ये शब्दांना फार जास्त महत्व नसे, किंबहुना ती नाट्यगीते एकाद्या बंदिशीसारखी अगदी लहानशी असत आणि त्यातल्या ओळी पुनःपुन्हा घोळवून गायिल्या जात तरीसुध्दा अनेक गाण्यांचे बोल स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. ते शब्द आलाप तानांच्या गुंत्यांमध्ये हरवून जातात. काही सुंदर गीते मात्र याला अपवाद आहेत. अशा एका भावपूर्ण आणि सुप्रसिध्द नाट्यगीताचे बोल आहेत,

उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा ।

दाही दिशा कशा खुलल्या, वनिवनि कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनि जाहल्या, प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा।।

चंद्रामुळे समुद्राला भरती येते त्याचबरोबर हृदयातल्या प्रीतीच्या सागरालाही येते आणि चंद्रोदयानंतर सारा निसर्गच आनंदमय होतो आणि प्रणयरसाने भारला जातो असे वर्णन या गीतात आहे.

चित्रपट या माध्यमात मात्र आणि विशेषतः मराठी चित्रपटांमध्ये अनेक भावपूर्ण गीते पहायला मिळतात आणि ऐकून ऐकून तोंडपाठ होतात. गीतकार जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेले असेच एक सदाबहार गीत आहे,

पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला ।
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ।।
चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला।
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला ।।

स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो ।
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो ।
रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला ।।
चंद्र आहे साक्षिला ।।

लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा ।
अंग का चोरिसी दो जीवांच्या संगमा ।
आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला ।।
चंद्र आहे साक्षिला ।।

चांदण्या रात्रीमधल्या अशा धुंद वातावरणाचा लाभ प्रेमिकांनी घ्यायलाच पाहिजे ना? रेडिओवरील भावसरगम नावाच्या कार्यक्रमातल्या या विषयावरील पहिल्याच गाण्याने पन्नास वर्षांपूर्वी इतिहास घडवला होता. त्या काळात या गाण्याने धमाल उडवून दिली होतीच, त्यानंतर असंख्य वेळा असंख्य कार्यक्रमात ते गायिले जाऊनही आणि ऐकूनही त्याची गोडी अजून अवीट राहिली आहे. मराठी भावगीतामध्ये हा मैलाचा दगड ठरला. कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या या गाण्याचे बोल, श्रीनिवास खळे यांनी लावलेली चाल आणि अरुण दाते व सुधा मलहोत्रा यांचे आवाज यामध्ये सर्वात जास्त सरस काय आहे ते सांगता येणार नाही. प्रेम या भावनेचा इतका तरल आविष्कार आणखी कुठे पहायला मिळणार नाही. दुसरे तिसरे काही नको, चंदेरी रातीत फक्त एकमेकांच्या जवळ असणे एवढेच या गीतातील प्रेमिकांना हवे आहे. हे प्रेमी युगल म्हणते,

शुक्रतारा मंद वारा, चांदणे पाण्यातूनी ।
चंद्र आहे स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातूनी ।
आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा ।
तू अशी जवळी रहा ॥ १ ॥

मी कशी शब्दांत सांगू, भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे, लाजणाऱ्या या फुला ।
अंतरीचा गंध माझ्या, आज तू पवना वहा ।
तू असा जवळी रहा ॥ २ ॥

लाजऱ्या माझ्या फुला रे, गंध हा बिलगे जिवा ।
अंतरीच्या स्पंदनाने, अन् थरारे ही हवा ।
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा ।
तू अशी जवळी रहा ॥ ३ ॥


शोधिले स्वप्नात मी, ते ये करी जागेपणी ।
दाटूनी आलास तू रे, आज माझ्या लोचनी ।
वाकला फ़ांदीपरी, आता फुलांनी जीव हा ।
तू असा जवळी रहा ॥ ४ ॥


हेच कवी, संगीतकार आणि गायकगायिका यांचे आकाशवाणीच्या त्याच मालिकेतले त्या काळातले दुसरे अप्रतिम गाणे आहे. त्यातले प्रेमी युगुलही चांदण्या रात्री एकत्र आले आहे आणि हातात हात घेऊन बसले असतांना त्यांना रोजचाच चंद्र वेगळा आणि नवा नवा वाटू लागतो.

हात तुझा हातात अन् धुंद ही हवा ।
रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा ।।ध्रु।।

रोजचेच हे वारे, रोजचेच तारे ।
भासते परि नवीन विश्व आज सारे ।
ही किमया स्पर्शाची भारिते जिवा ।।१।।

या हळव्या पाण्यावर मोहरल्या छाया ।
मोहरले हृदय तसे मोहरली काया ।
चांदण्यात थरथरतो मधुर गारवा ।।२।।

जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो ।
स्वप्‍नांच्या वाटेने चांदण्यात नेतो ।
बिलगताच जाईचा उमलतो थवा ।।३।।

...... आणि त्या सुखाचा उपभोग घेता घेता..

क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे ।
विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे ।
आज फुले प्राणातून केशरी दिवा ।।४।।
रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा ।।


फक्त हातात हात घेऊन एकमेकांच्या जवळ राहण्यात सर्वच प्रेमिकांचे समाधान होत नाही. ते एक एक पाऊल पुढे जाण्यासाठी आतुर झालेले असतात. अशी एक अधीर झालेली प्रेमिका म्हणते,

शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला ।
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला ।
साजणा रे मोहना रे ऐक ना रे, तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी,
सगे सोयरे मी सांडिले पाटी ।।

मोहन मधुर राती, भराला येऊ दे प्रीती ।
प्रीतीची हीच ना रीती, कशाला कुणाची भीती ।
झाडामागे चांद हा वरती आला, ये ना ये ना जीव आतुर झाला।
मी भुलावे, स्वैर व्हावे, गीत गावे ।।

साजणाने तिला प्रतिसाद दिल्यावर मग तर काय विचारता? आता ही चांदरात मनात केवढा कल्लोळ माजवणार आहे अशा विचाराने ती म्हणते,

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ।
सखया रे आवर ही सावर ही चांदरात ॥धृ.॥

निजलेल्या गावातून आले मी एकटीच ।
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच ।
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात ॥१॥

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर ।
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर ।
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात ॥२॥

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून ।
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून ।
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात ॥३॥


तर एका नाट्यगीतामधला नायक असे उद्गार काढतो,

चांद माझा हा हासरा, नाचवी कसा प्रेमसागरा, प्रीतलहरी ये भरा।।
गुण कनकाचा नवकोंदणी गे, शोभसी सखे तू हिरा ।।
प्रेमाचे रंग अनेक आहेत. एकमेकांच्या प्रेमाची खात्री पटल्यानंतर ते सहजपणे समजू नये यासाठी कधी कधी लपवाछपवीचे खेळ सुरू होतात, पण ते शक्य असते का? मग..

लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल का ?

जवळ मने पण दूर शरीरे, नयन लाजरे, चेहरे हसरे ।
लपविलेस तू जाणून सारे, रंग गालिचा छपेल का ?

क्षणात हसणे, क्षणात रुसणे, उन्हात पाउस, पुढे चांदणे
हे प्रणयाचे देणे-घेणे, घडल्यावाचुन चुकेल का ?

..... या खेळात सुध्दा चंद्र असा येतो ...

पुरे बहाणे गंभिर होणे, चोरा, तुझिया मनी चांदणे ।
चोरहि जाणे, चंद्रहि जाणे, केली चोरी छपेल का ?
प्रीत लपवुनी लपेल कां?

चंद्राच्या साक्षीने सगळे होत असते, तो सुध्दा लपून छपून ते पहात असतो, शिवाय प्रेमिकांच्या मनातही चांदणे फुललेले अलते, त्यामुळे ते गुपित उघड होणारच. अशा अवस्थेत कोणी सावधगिरीचा इशारा देते.

हसले मनी चांदणे, जपुनि टाक पाउल साजणी, नादतील पैंजणे ।।

बोचतील ग, फुलं जाइची तुझी कोमला काय ।
चांदण्यातही सौंदर्याने पोळतील ना पाय ?

पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे ।
सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे ।

कुजबुजुनी कानात सांगतो मधुप, नको ग रुसू ।
लाजलाजर्‍या कळ्याफुलांना खुद्‌कन्‌ आलं हसू ।

हो जरा, बघा की वरी, कळू द्या तरी, उमटु द्या वाणी ।
का आढेवेढे उगाच, सांगा, काय लाभले राणी ?

का ग अशा पाठीस लागता मिळुनी सार्‍या जणी ?
आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी ।।

किति, किति ग भाग्याची, भलतीच ओढ ही कामसुंदराची ।
नव्हे ग श्यामसुंदराची ।।


नव्या संसाराची चित्रे कल्पनेमध्ये रंगवतांना एक युवती म्हणते,

लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची ।।ध्रु।।

सौख्यात वाढलेली, प्रेमात नाहलेली ।
कळिकळि फुलून ही चढते, मंडपी वेल मायेची ।।१।।

संपताच भातुकली, चिमुकली ती बाहुली ।
आली वयात खुदुखुदू हसते, होऊनी नवरी लग्नाची ।।२।।

हे माहेर , सासर ते, ही काशी , रामेश्वर ते ।
उजळिते कळस दो घरचे, चंद्रिका पूर्ण चंद्राची ।।३।।

गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि गायिका लता मंगेशकर या त्रिकूटाने अनेक अतीशय गोड गाणी दिली आहेत. त्यांच्या या अजरामर झालेल्या गीतातसुध्दा शेवटी चंद्र आलाच. ल या अक्षराने सुरू होणारी मराठी गाणी कमी आहेत, पण हे अक्षर गाण्याच्या शेवटी खूप वेळा येते. त्यामुळे भेंड्यांच्या कोणत्याही खेळात हे गाणे हटकून येतेच.

रोजचाच चंद्र प्रेमिकांना नवा नवा वाटतो हे वर आलेलेच आहे. दुसरा एक प्रेमी आपल्या सखीला असेच सांगतो आणि अर्थातच तीही त्याला सुरेख प्रतिसाद देते.

नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी ।
मनी नवीन भावना, नवेच स्वप्न लोचनी ।।

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी ।
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी ।
घर न प्रीतिकुंज हा, बैस ये सुहासिनी।।

दूर बाल्य राहिले, दूर राहिल्या सखी ।
बोलण्या कुणासवे सूर दाटले मुखी ।
अननुभूत माधुरी आज गीत गायनी ।।

अनादि चंद्र अंबरी, अनादि धुंद यामिनी ।
यौवनात तू नवी मदीय प्रीत-स्वामिनी ।
घर न प्रीतकुंज हा बैस ये सुहासिनी ।।

कोण बाइ बोलले वाणि ही प्रियंवदा ।
या मनात नांदते तुझीच प्रीतसंपदा ।
कशास वेगळेपणा जवळ ये विलासिनी ।।


मुंबईचा जावई या चित्रपटातली लग्न होऊन सासरी आलेली एक लाजरी बुजरी नववधु आधी लहानशा घरातल्या नातेवाईकांच्या बुजबुजाटाने बावरून गेलेली असते. त्या जोडप्याला एकांत मिळावा म्हणून एकदा घरातली इतर सारी मंडळी बाहेर जातात. ऑफीसमधून घरी येणार असलेल्या पतीची वाट पहात असतांना ती विचार करते,

कशी करू स्वागता, एकांताचा आरंभ कैसा, असते कशी सांगता?

कशी हसू मी, कैसी बोलू ?
किती गतीने कैसी चालू ?
धीटपणाने मिठी घालु का, कवळू तुज नाथा ?

फुलते कळि की फुलवी वारा ?
चंद्र हसवि की हसवी तारा ?
कुठले आधी कुठले नंतर, येई ना सांगता ।।

कुणी न पुढती कुणी न पाठी ।
घरात आहे मीच एकटी ।
प्रथमदर्शनी बोलायाचा, भाव तरी कोणता ?



चंद्राचा उल्लेख असलेली अशी किती प्रेमगीते सांगावीत?



. . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, October 30, 2012

चंद्राची गाणी - भाग १ - बालगीते

काल कोजागरी पौर्णिमा होऊन गेली. त्या निमित्य झालेले खास चंद्रगीतांचे दोन कार्यक्रम काल आणि परवा रात्री पाहिले. यावरून मला आठवले की या ब्लॉगच्या सुरुवातीलाच 'तोच चंद्रमा नभात' या नावाची एक दीर्घ मालिका मी ३३ भागात लिहिली होती. तिच्या अखेरीस 'चंद्र' या विषयावरील किंवा चंद्राचा उल्लेख असलेली बरीचशी गाणी मी जमवली होती. तिचा संग्रह पुन्हा उघडून पाहिला आणि त्यातली काही निवडक गाणी तसेच त्यात नसलेली पण काल परवा ऐकलेली चांगली गाणी या ब्लॉगवर द्यायचे ठरवले. त्याचा हा पहिला भाग.
आपल्या तान्ह्या बाळाला झोपवण्यासाठी थोपटता थोपटता त्याची आई गुणगुणते.

लिंबोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई ।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।

गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई ।
परसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई ।
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई ।।

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी ।
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी ।
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई ।।

रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती ।
स्वप्‍न एक उधळून गेले माय लेकराची नाती ।
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई ।।

मधुसूदन कालेलकर हे तसे पाहता गद्य लेखक, नाटककार, पटकथाकार वगैरे म्हणून नावाजलेले आहेत, पण बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली सुमन कल्याणपूर यांच्या गोड आवाजातली ही अंगाई ऐकत ज्या मुली मोठ्या झाल्या त्या आता माता झाल्या आहेत आणि त्यांच्या लहानग्या मुलांना हे गाणे ऐकवत थोपटतांना मी त्यांना पाहिले आहे.

थोपटून थोपटून बाळ झोपी गेल्यावर सुध्दा आईचं लक्ष त्याच्याकडे असतंच. त्याला झोपेतच मंद मंद हंसतांना पाहून ती म्हणते,

चांद मोहरे, चांदणे झरे, झोपेतच गाली असा, हसशी का बरे ?

गगनातील नील परी, उतरुनीया भूमीवरी ।
उचलुनीया नेती तुला, उंच काय रे ?

उंच उंच गगनी तुला, काय दिसे सांग मुला ?
दिसते का हळू विमान, एक संचरे ?

बसून आत कोण हसे, कुशल कुणी तरूण पुसे ?
खचितच तेच प्राणनाथ, सांगू काय रे ?

जाग जरा नीज सोड, पापा दे मजसी गोड ।
फिरुनी जाय लंघुनीया, सात अंबरे ।।

लहान बाळाच्या कल्पनाविश्वात काय काय दडलेले असेल आणि त्यातले काय त्याच्या स्वप्नात येत असेल कोण जाणे, पण लहान मुलांच्या गोष्टीतल्या नीलपरीचा आधार घेऊन आईचे मन बाळाच्या वतीने आभाळात उंच भरारी घेते आणि तिथेही तिला तिचा प्राणनाथ दिसतो. अशी कल्पना कवीवर्य ग. दि. माडगूळकर यांनी केली आहे. याच गदिमांनी अजरामर झालेले गीतरामायण लिहिले. त्यातली श्रीरामाची आई कौसल्यामाई आपल्या तान्हुल्या रामचंद्राचे किती कौतुक करते यावर त्यांनी एक पूर्ण गीत लिहिले आहे.

सावळा गं रामचन्द्र माझ्या मांडीवर न्हातो। रक्तगंधाचा सुवास निळ्या कमळाला येतो।।

या गीतात चंद्राचा उल्लेख दोन जागी आला आहे. एका ओळीत ती माउली म्हणते,

सावळा गं रामचन्द्र रत्नमंचकी झोपतो। त्याला पाहता लाजून चन्द्र आभाळी लोपतो।।

निजलेल्या रामचंद्राला पाहून आभाळातला चंद्र लाजून ढगाआड लपून बसतो पण रामचंद्राला पहायला जेंव्हा चंद्र ढगाबाहेर येतो, तेंव्हा तो रामचंद्राच्या नजरेला पडताच त्याला इतका आवडतो की आपल्या हातात चंद्र हवा म्हणून तो हट्टच धरतो. याबद्दल कौसल्या सांगते,

सावळा गं रामचन्द्र चन्द्र नभीचा मागतो। रात जागवितो बाई सारा प्रासाद जागतो।।

बाळ बोबडे बोल बोलायला लागतं तसे आई त्याला गाणी शिकवायला लागते. गेल्या कमीतकमी तीन पिढ्या एक अत्यंत लोकप्रिय गाणं म्हणत मोठ्या झाल्या आहेत. ते आहे

चांदोबा चांदोबा भागलास कां, लिंबोणीच्या झाडामागे लपलास कां।
लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी।
मामा मामा येऊन जा, तूप रोटी खाऊन जा।
तुपात पडली माशी, चांदोमामा राहिला उपाशी।।

या गाण्यात काय गंमत आहे कोण जाणे. पण त्याची लोकप्रियता पिढ्यान् पिढ्या टिकून आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकरांनी या गाण्याला शाळकरी मुलांच्या अँगलमधून कांही आशय देण्याचा प्रयत्न केला आहे तो अशा प्रकारे

चांदोमामा चांदोमामा भागलास काय ? घरचा अभ्यास केलास काय ?
चांदोमामा चांदोमामा लपलास काय ? पुस्तक हरवून बसलास काय ?
चांदोमामा चांदोमामा रुसलास काय ? गणितात भोपळा घेतलास काय ?

एके काळी गृहपाठ न करणे, पुस्तक हरवणे, गणीतात शून्य मार्क मिळवणे वगैरे गोष्टींची मुलांनी खूप भीती वाटायची. चांदोबाच्या पळपुटेपणाच्या आणि लपून बसण्याच्या मागे यातलेच काही कारण असावे असा तर्क या गाण्यात आहे.

लहान मुलांना सगळ्यात प्रिय खाऊ म्हणजे चॉकलेट. त्याचाच बंगला बांधला तर त्याच्या आजूबाजूला कसले दृष्य असेल? त्याची कल्पना फुलवतांना मजा आणण्यासाठी चांदोबाही लागतोच.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला । चंदेरी सोनेरी चमचमता चांगला ।।
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार । शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार ।।
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन । हेलो हेलो करायला छोटासा फोन ।।
बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार । पेपेरमींटच्या अंगणात फूल लाल लाल ।।

यानंतर त्या बंगल्याची कल्पना फुलवतांना त्यात मजा आणण्यासाठी चांदोबाही लागतोच.

चांदीच्या झाडामागे चंदोबा रहातो । छोट्याश्या फुलाशी लपाछपी खेळतो ।।
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला । मैनेचा पिंजरा वर टांगला ।।
किती किती सुंदर चॉक्लेटचा बंगला ?

कधी कधी मुलाचा सख्खा मामा त्याला हंसत खेळत बाराखडी शिकवण्यासाठी अ आ आई म म मका, मी तुशा मामा दे मला मुका ।। हे गाणं म्हणतो त्यातसुध्दा चांदोमामा पाहिजेच

प प पतंग आभाळात उडे। ढ ढ ढगात चांदोमामा दडे।।

एखादी चिमुरडी पोर एक गोरी गोरी पान आणि फुलासारखी छान वहिनी आणण्यासाठी आपल्या दादाच्या मागे लागते. या खास वहिनीला घरी कशी आणायची?

वहिनीला बसायला चांदोबाची गाडी । चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी ।
हरणांची जोडी तुडवी गुलाबाचे रान। ..... असा सगळा तिचा थाटमाट!

दुसरी एक छकुली चन्द्राला ( किंवा चन्द्रिकेला) चंदाराणी म्हणते आणि विचारते

चंदाराणी, चंदाराणी, कां ग दिसतिस थकल्यावाणी ?

शाळा ते घर घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा,
रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी?

वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई।
म्हणुनिच कां तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी।।

चंद्राला कोणी चंदाराणी म्हणते तर कोणी चंदाराजा म्हणत बोलावते,

चंदाराजा ये ये, चंदाराजा ये ।।

निळ्या निळ्या आभाळात, लखलखत्या चांदण्यात ।
शुभ्र रुपेरी रथात, बसुनि इथे ये ।।

शुभ्र रुप्याची गाडी, पळवी सशाची जोडी ।
दूर करुन अंधारा, उजळित नभ ये ।।

या इथे नि तुजवाचुन, व्याकूळ हो तूच जाण ।
एक दिनी मनोरथा, पुरविण्यास ये।।

आपल्या घरामध्येच गोजिरवाणे हंसरे तारे असतांना आभाळातल्या चांदण्या पहायची गरजच कुठे आहे असं विचारीत एक आई म्हणते,

घरात हंसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे ? असा प्रश्न विचारून ती पुढे असे सांगते.

गोकुळ येथे आनंदाचे, झरे वाहती शांतिसुखाचे ।
वैभव पाहुन मम सदनीचे ढगाआड गं चंद्र दडे ।। मी पाहू कशाला नभाकडे ?



आमच्या लहानपणी शाळेत पहिल्या इयत्तेमध्ये पहिली कविता होती

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो ।
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे ।

आणि शेवटी

इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील ।।

शालेय शिक्षणाची सुरुवात अशा सुंदर आणि सकारात्मक विचाराने व्हायची.

Saturday, October 27, 2012

को जागर्ती ? .... कोजागिरी पौर्णिमा

को जागर्ती ?

आजकाल रात्र पडली तरी घरात आणि घराबाहेरही विजेच्या दिव्यांचा झगमगाट असतो. त्यामुळे सगळे लोक हिंडून फिरून आणि बाजारहाट किंवा इतर कामे आवरून सावकाशपणे घरी परततात. जेवणे खाणे वगैरे आटोपून झोपी जाईपर्यंत रात्रीचे दहा अकरा तरी वाजतातच. बाकीचे सगळे झोपायला गेले असले तरी काही जणांना झोप येत नाही. त्यातला कोणी टीव्हीवर एकादी मालिका बघत बसतो तर कोणाला परदेशात चाललेली क्रिकेट किंवा फुटबॉलची मॅच पहायची असते, कोणाला इंटरनेटवर सर्फिंग करायचे असते नाहीतर वॉट्सअॅप किंवा फेसबुकवर रेंगाळत रहायचे असते. मुलांना सेलफोन किंवा टॅबलेटवर गेम्स खेळायचे असतात. त्यामुळे बाकीचे सगळे झोपले तरी त्यातला एकादा जागत राहतो किंवा हळूच उठून टीव्ही किंवा काँप्यूटर लावतो. त्यातून निघणारे आवाज आणि उघडझाप करणारे प्रकाशझोत यामुळे झोपमोड झालेला एकादा माणूस वैतागून उठतो आणि ओरडतो "कोण तो अजून जागतो आहे ? (को जागर्ती ?)" त्यानंतर त्या जागणा-याच्या आणि ओरडणा-याच्या वयानुसार पुढील संवाद ठरतात. जागणारा लहान मुलगा असल्यास "आता झोप पाहू मुकाट्याने, उद्या सकाळी शाळेला जायचं आहे ना?" असा दम दिला जातो आणि मोठी व्यक्ती असल्यास "काय मेली कटकट, सुखानं झोपावं म्हंटलं तर तेवढं सुख सुध्दा आमच्या नशीबात कुठं आलंय्?" किंवा "आता कृपा करून आम्हाला जरा झोपू देता का?" असे काही तरी बोलले जाते. त्यामुळे 'को जागर्ती ?' हा प्रश्न आता त्रासिकपणाचाच झाला आहे.

पूर्वीच्या काळातली परिस्थिती वेगळी होती. रात्रीच्या वेळी घराबाहेर चहूकडे अंधारगुडुप व्हायचा. सूर्यास्त होण्याच्या आधीच सगळी कामे आणि खेळबीळ संपवून फक्त मुलीच नव्हे तर मुले आणि मोठी माणसेसुध्दा 'सातच्या आत घरात' येऊन जायची. त्यानंतर मुलांनी शुभंकरोती कल्याणम्, परवचे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा, इतर श्लोक, स्तोत्रे वगैरे म्हणायची, देवाला आणि घरातल्या सगळ्या मोठ्यांना वाकून नमस्कार करायचा. तोपर्यंत रात्रीचे जेवण तयार झालेले असायचे. ते खायचे आणि पथा-या पसरायच्या. रात्रीच्या काळोखात घराच्या बाहेर पडायची सोय नव्हती. गावातील ठिकठिकाणच्या झाडांवर मुंजा, हडळ, पिशाच वगैरे अतृप्त आत्मे दबा धरून बसलेले असायचे आणि त्यांच्या तावडीत कोणी एकटा दुकटा सापडला तर मग त्याची खैर नाही अशी भीती दाखवली जायची. पावसाळ्यात चमकणा-या विजा आणि ढगांचा गडगडाट यामधून या समजांना जास्तच जोर चढत असे. यामुळे रात्र पडली की लोक दरवाजे खिडक्या घट्ट बंद करून घ्यायचे. बाहेर काय चालले आहे याची त्यांना शुध्द नसायची.

पण आषाढात जोरात सुरू झालेला पाऊस श्रावणात कमी होऊन 'क्षणात येते सरसर शिवरे, क्षणात फिरुनी ऊन पडे' असा येत जात रहायचा आणि भाद्रपदानंतर तो जवळ जवळ संपून जात असे. त्यानंतर येणा-या आश्विन महिन्यात पिठूर चांदणे पडायचे. प्रतीपदेपासून हळूहळू वाढत जाऊन पौर्णिमेला निरभ्र आकाशात पूर्ण चंद्र दिसायचा. त्याचे दर्शन अत्यंत विलोभनीय असायचे. पण निसर्गाचे हे अद्भुत रूप पहाण्यासाठी आधी लोकांनी जागे तरी रहायला हवे ना ! यासाठी एक मजेदार अशी कथा सांगितली जात असे. त्या कथेनुसार आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला रात्री प्रत्यक्ष लक्ष्मी देवी पिठूर चांदण्यामधून पृथ्वीतलावर येते आणि घरोघरी जाऊन "को जागर्ती ?" असे विचारते. तिला जो कोणी माणूस जागा दिसेल त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला ती भरपूर संपत्ती देते. ही संपत्ती मिळण्याच्या आशेने सगळे लोक त्या रात्री उशीरापर्यंत जागत राहिले आणि त्यांना निसर्गसौंदर्याच्या संपत्तीचा लाभ होत गेला. लोकांनी जागत राहून वेळ घालवण्यासाठी चांदण्यात एकत्र बसून गाणी म्हणायची, खेळ खेळायचे वगैरे सुरू केले. या दिवसात चांगले दूधदुभते मिळते. त्यामुळे आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून सर्वांनी ते प्राशन करायचे वगैरे परंपरा पडत गेल्या. 'को जागर्ती ?' या वाक्यावरून या पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' असे नाव पडले आणि हा दिवस साजरा करायची एक सुंदर प्रथा पडली.

--------------------------------------------------------------------------------

Monday, October 15, 2012

घटस्थापना

उद्याच्या घटस्थापनेपासून नवरात्र सुरू होत आहे. माझ्या आधीच्या पिढीपर्यंत बहुतेक लोक संयुक्त कुटुंबांमध्ये रहात असत. प्रत्येक घरी पिढ्यान् पिढ्यांपासून चालत आलेले त्यांच्या घराण्याचे कुलाचार पाळले जात. त्यात आश्विन महिन्यातल्या देवीच्या नवरात्राला मोठे महत्व असायचे. काहीही झाले तरी हे नवरात्र व्यवस्थितपणे पाळले गेले पाहिजे याचा विचार करून त्यानुसार इतर कोणतेही कौटुंबिक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम ठरवले जात असत. आता कुटुंबे विभक्त झाल्यानंतरही कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या (बहुधा सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या) घरी नवरात्र बसवायचे आणि कुटुंबातील इतर लोकांनी शक्य तो एक दोन दिवसासाठी तिथे जाऊन देवीचे दर्शन घेऊन यायचे, तिला नवस करायचे आणि ते फेडायचे वगैरे अनेकांच्या घरी चालत असलेले दिसते.

आश्विन शुध्द प्रतीपदेच्या दिवशी सकाळी घटस्थापना करून या नवरात्राची सुरुवात केली जाते. पुढील नऊ दिवस देवीजवळ नंदादीप तेवत ठेवतात. रोज देवीची पूजाअर्चा, आरत्या, नैवेद्य वगैरे विधी शक्यतो यथासांग केले जातात. ललितापंचमी, अष्टमी वगैरे काही खास दिवशी जास्तीचे कार्यक्रम असतात. अष्टमीच्या रात्री शिजवलेल्या भाताच्या उकडीपासून देवीचा मुखवटा बनवून त्याच्या समोर घागरी फुंकतात. नऊ दिवस रोजच्या पूजेसाठी निरनिराळ्या रंगाची वस्त्रे आणि फुले देवीला अर्पण करतात. आजकालच्या महिला स्वतःच रोज निरनिराळ्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेसेस परिधान करतात. या सगळ्यात त्या घटाची कोणाला आठवण किंवा माहिती असते कोण जाणे.

घटस्थापना याचा शब्दशः अर्थ (मातीच्या) घटाची स्थापना करणे असा होतो. गेल्या शतकात घटाचे महत्व कमी होत गेले आहे. पण मानवी संस्कृतीची सुरुवात झाल्यापासून ते अगदी कालपरवापर्यंत म्हणजे त्या हजारो वर्षांच्या कालखंडात मातीपासून तयार केलेल्या पात्रांना अनन्यस्धारण महत्व होते. जेंव्हा मनुष्यप्राण्याने शेतीभाती करून घरात रहायला सुरुवात केली तेंव्हापासून त्याला अन्नधान्य, दूधदुभते आणि इतर आवश्यक वस्तूंचा संग्रह करण्याची गरज पटायला लागली. त्यासाठी लाकूड, माती यासारख्या सुलभपणे उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून टोपल्या, खोके, गाडगी, मडकी, रांजण वगैरे तो तयार करू लागला. लोह, ताम्र इत्यादी घातूंची निर्मिती सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात त्यांची पात्रे बनू लागली, पण सर्व लोकांना मातीच सहजपणे उपलब्ध असल्यामुळे तिचा उपयोग होत राहिला. जगाच्या पाठीवरील सर्व ठिकाणच्या उत्खननामधून निघालेल्या प्राचीन अवशेषांमध्ये खापरांचे तुकडे सापडतात. आजसुध्दा खेड्यामधील गरीबांच्या घरात मातीची मडकी, घडे वगैरे असतात आणि शहरातील श्रीमंतांच्या घरात सुध्दा चिनी मातीची सुबक पात्रे आणि शोभेच्या वस्तू ठेवलेल्या असतात.


अग्नी आणि चाक यांचे शोध हे मानवाच्या प्रगतीमधील अत्यंत महत्वाचे टप्पे मानले जातात. मातीपासून घटांचे उत्पादन करण्यात या दोन्हींचा उपयोग केला जातो. कुंभार आपले चाक गरागरा फिरवून मातीच्या गोळ्याला गोलाकार देतो आणि त्या कच्च्या मडक्याला भट्टीत भाजून कठीण आणि टिकाऊ बनवतो. त्यात आपले कौशल्य पणाला लावून कुंभारांनी त्यांना सुबक आकार दिले आणि खास प्रकारच्या मातीचा उपयोग करून आकर्षक रंग आणि इतर गुणधर्म देऊन त्यांचे रांजण, सुरया वगैरे विविध रूपे त्यांना दिली. ही प्रगती हजारो वर्षांपासून होत राहिली आहे.

लोखंड, तांबे, पितळ आदी धातूंचा पत्रा बनवून त्यांची पात्रे तयार करण्यात आली, पण या धातूंची अन्नपदार्थांबरोबर रासायनिक क्रिया होत असल्यामुळे स्वयंपाकघरात त्यांचा उपयोग जपून करावा लागतो. विशेषतः दही, ताक यासारखे दुग्धजन्य पदार्थ त्यात ठेवता येत नाहीत. गेल्या शतकात आलेल्या अॅल्युमिनियम आणि स्टेनलेसस्टीलच्या भांड्यामुळे आता ही परिस्थिती बदलली आहे. पण तोपावेतो त्यासाठी मातीच्या घटांचाच उपयोग केला जात असे. कृष्णावतारात त्याचे बालपण गोकुळात गेल्यामुळे, गोप, गोपिका आणि दहीदूधलोणी या सर्वांना महत्व प्राप्त झाले आणि त्याबरोबर घटांना सुध्दा साहित्यात वेगळे अजरामर स्थान लाभले.

हे सगळे असले तरी घट आणि देवीचे नवरात्र यांचा संबंध कुठे येतो हा प्रश्न राहतोच. नवरात्र बसवतांना देवीच्या सोबत जसा नंदादीप लावतात, तसा एक मातीचा घटसुध्दा ठेवायची पध्दत असावी. नंदादीपामधून ज्योतीची आराधना होते आणि घटाचा आकार आकाशासारखा गोल असतो त्यातून आकाशाचे प्रतिनिधित्व होते असा काहीसा विचार यामागे असावा. आजकाल नवरात्र म्हणजे गरबा, दांडिया, रास असे नवे समीकरण झाले आहे. गुजराथमधून आलेल्या या उत्सवात मात्र घटाला (किंवा घटांना) सुंदर रंगरंगोटी करून छानसे सजवलेले असते. त्यासभोवती फेर धरून नाचतांना 'मुन्नी बदनाम हुई' किंवा 'हलकट जवानी' यासारखी अभिरुचीहीन गाणी लाऊडस्पीकरवर वाजवतात हे त्यांचे आणि आपले दुर्दैव.

Thursday, October 11, 2012

महर्षी धोंडो केशव कर्वे



'दगड्या', 'धोंड्या', 'काळ्या' असले एकादे खत्रुड नाव मुलाला ठेवले तर काळसुध्दा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाही आणि त्यामुळे त्याला दीर्घायुष्य मिळेल अशी एक अजब समजूत पूर्वीच्या काळी प्रचलित होती. लहान मुलांनी नमस्कार केल्यानंतर त्यांना "शतायुषी भव" असा घसघशीत आशीर्वाद दिला जात असे. या दोन्ही समजुतींची प्रचीती एका महापुरुषाच्या बाबतीत आली. मात्र त्याचे नाव विचित्र असूनसुध्दा त्याने आपल्या कर्तृत्वाने सर्व जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. शंभरावर वर्षे मिळालेल्या आयुष्यात त्यांना उदंड कीर्ती आणि मानसन्मान मिळालेच, पण त्यांनी सुरू केलेले महान कार्य त्यांच्या निर्वाणानंतर सुध्दा जोमाने चालत राहून त्याचा खूप विस्तार झाला आणि त्यातून त्यांचे नाव पुढील शतकानुशतके शिल्लक राहील यात शंका नाही. या महापुरुषाचे नाव आहे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे.

पण हे यश त्यांना सहजासहजी मिळाले नाही. ते मिळण्याच्या आधी त्यांनी अत्यंत खडतर तपश्चर्या केली होती, ती नावलौकिक मिळवण्यासाठी नव्हती, तर समाजातील महत्वाच्या घटकाला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी. कोकणातल्या एका लहानशा गावी इसवी सन १८५८ मध्ये धोंडो केशव कर्वे यांचा जन्म झाला. तत्कालीन समजुतीनुसार अदृष्य दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी त्यांचे नाव 'धोंडो' असे ठेवले होते. पण हा मुलगा अद्वितीय होता. त्या काळामधील भारतीय लोकांना (त्या काळच्या भाषेत 'एतद्देशीय मनुष्यांना') जेवढे ज्ञान प्राप्त होणे पुरेसे आहे असे मेकॉलेसारख्या साहेबांनी ठरवले होते ते त्यांनी स्थानिक शाळेत जाऊन झटपट शिकून घेतले. त्या काळातली शालांत म्हणजे 'व्हर्नाक्युलर फायनल' ही परीक्षा देण्यासाठी कोकणातील मुलांना मुंबईला जावे लागत असे. बालक धोंडो त्यासाठी मुंबईकडे जायला निघाला, पण तिकडे जाणारी बोट चुकली. त्यामुळे निराश न होता धोंडोने घाटावरील क-हाड की सातारा या शहराची वाट धरली. त्या काळात मोटारी नव्हत्या आणि त्यासाठी लागणारे हमरस्तेही बांधले गेले नव्हते. एका खेड्यापासून शेजारच्या खेड्याकडे जाणा-या पायवाटा किंवा फार तर बैलगाडीच्या चाकोरीमधून इतर वाटसरूंच्या सोबतीने शंभरावर मैल दूर चालत चालत, धो धो पावसात आणि हिेस्र वन्य पशूंची भीती न बाळगता मजल दरमजल करीत ते तिसरे दिवशी क-हाड की साता-याला जाऊन पोचले. त्या ठिकाणच्या शिक्षणाधिका-याने धोंडोची किरकोळ शरीरयष्टी आणि चेहे-यावरील निरागस भाव पाहून त्याला 'अजाण बालक' ठरवले आणि वयाच्या अटीवरून फायनलच्या परीक्षेला बसायची अनुमती दिली नाही. निमूटपणे आपल्या गावी परत येऊन धोंडोपंत अभ्यास करत राहिले आणि यथावकाश मुंबईला जाऊन त्यांनी ती परीक्षा दिलीच, त्यानंतर मुंबईमध्ये राहून हायस्कूल आणि कॉलेजचे शिक्षण घेतले. त्या काळात शाळा, कॉलेज आणि अभ्यास सांभाळून त्यातून वेळ काढून शिकवण्या केल्या आणि त्यातून आपला उदरनिर्वाह केला.

बी.ए. पास झाल्यानंतर मायबाप इंग्रजी सरकारची नोकरी त्यांना सहजपणे मिळू शकली असती, पण त्यांचा कल समाजसेवेकडे होता. त्या काळच्या समाजात रूढी आणि परंपरांच्या नावाने अनेक अनिष्ट प्रथा चालत आल्या होत्या. लहानपणीच मुलांची लग्ने लावून दिली जात होती, धोंडोपंतांचासुध्दा बालविवाह झाला होता. अपमृत्यूंचे प्रमाणही मोठे असल्यामुळे काही दुर्दैवी मुली अज्ञवयातच बालविधवा होऊन जात. त्यांचे केशवपन करून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात असे. उंच माझा झोका ही अलीकडे लोकप्रिय झालेली मालिका आणि काकस्पर्श हा उत्कृष्ट सिनेमा यातून त्या काळातील जीवनाचे थोडे दर्शन घडते. काही समाज सुधारकांनी या रूढींविरुध्द आवाज उठवायला सुरुवात केली होती, पण त्यांची चळवळ लेख, भाषणे, अर्ज विनंत्या या मार्गाने चालली होती. धोंडोपंतांनी प्रत्यक्ष कृतीमधून समाजकार्यात उतरायचे ठरवले.

ते पुण्याला आले आणि लोकमान्य टिळक व आगरकर यांनी सुरू केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजात गणिताचे प्राध्यापक झाले. आपल्याला मिळणा-या वेतनाचा एक भाग फक्त समाजकार्यासाठी बाजूला काढून ठेवायचा आणि वैयक्तिक आयुष्यात कुठलीही अडचण आली, कसलीही गरज पडली तरी त्या पैशांना स्पर्श करायचा नाही असे त्यांनी ठरवले आणि हे व्रत कसोशीने पाळले. या स्वतःच्या मिळकतीतून शिल्लक टाकलेल्या निधीत भर टाकण्यासाठी त्यांनी इतर उदार लोकांना आवाहन केले आणि त्यातून जमलेल्या निधीचा फक्त समाजकार्यासाठीच विनियोग केला. सदाशिव पेठेमधील राहत्या जागेत बालविधवांना आश्रय देऊन त्यांनी या कार्याची सुरुवात केली. त्यांना शिक्षण देऊन सक्षम बनवणे हा त्यांचा उद्देश होता. पण तत्कालीन समाजाला तो अजीबात मान्य नव्हता. कर्वे कुटुंब आणि त्या आश्रित महिलांना त्यांनी वाळीत टाकले, त्यांना सन्मानाने जिणे अशक्य केले.

कर्व्यांच्या एका सुधारक मित्राने यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना शहराबाहेर हिंगणे इथे त्यांना जमीन देऊ केली. त्यावर एक पर्णकुटी बांधून त्यात कर्व्यांनी त्या पीडित महिलांसाठी आश्रम सुरू केला. त्या आवारातच पुढे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा, वसतीगृहे वगैरे सुरू करत गेले. १८९६ साली त्यांनी सुरू केलेली स्त्रीशिक्षणसंस्था आजवर कार्यरत आहे आणि तिचा पसारा अनंतपटीने वाढला आहे. या संस्थेच्या साठ शाखा असून त्यात २५००० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. पूर्वप्राथमिक पातळीपासून स्नातकोत्तर (पोस्ट ग्रॅज्युएट) शिक्षणापर्यंत आणि अनेक शाखांमधून ते शिक्षण घेण्याची व्यवस्था या संस्थेकडून केली जाते. त्यात इंजिनियरिंग, आर्किटेक्चर आणि फॅशन डिझाईनसारख्या आधुनिक विषयांमधील शाखांचा समावेश आहे. महर्षी कर्वे यांनीच पुढाकार घेऊन एस.एन.डी.टी. युनिव्हर्सिटी हे भारतातले पहिले खास महिलांचे विश्वविद्यालय सुरू केले होते. कालांतराने ते मुंबईला नेले गेले. त्याच्या शाखासुध्दा अनेक ठिकाणी पसरल्या आहेत.


दुर्दैवाने धोंडोपंताच्या पत्नीचे अकाली निधन झाले. त्या काळच्या प्रथेनुसार त्यांच्या दुस-या विवाहासाठी स्थळे सांगून येऊ लागली होती. पण पुनर्विवाह केला तर तो विधवेशीच करायचा असे त्यांनी पक्के ठरवले होते. त्यांच्या एका मित्राची बहीण बाया अनाथ बालविधवा झाली होती. धोंडोपंतांशी विवाह करून बाया कर्वेंनी त्यांच्या जीवनात प्रवेश केला. कर्वे यांची पत्नी होणे हे सुध्दा अग्निदिव्य होते. ते तर दिवसरात्र आपल्या कार्यात मग्न असत. घर चालवणे आणि मुलांना मोठे करणे सर्वस्वी पत्नीलाच करावे लागत होते. त्यात फक्त समाजाचाच विरोध नव्हता, तर कर्व्यांच्या घरातील मंडळींचासुध्दा होता. लग्न करून ही दंपती जेंव्हा कोकणातल्या मुरुड या त्यांच्या गावी गेली, तेंव्हा नव्या सुनेचे स्वागत तर झाले नाहीच, गावातील सर्वांनी त्यांच्या घराचे दरवाजे त्यांना बंद केले.


धोंडोपंत आयुष्यभर आपल्या तत्वांवर ठामपणे उभे राहिले होते. त्याचे एक उदाहरण असे आहे. त्याच्या विम्याची मुदत संपल्यावर त्याचे जे पैसे त्यांना मिळणार होते ते त्यांनी उदारहस्ते आपल्या शिक्षणसंस्थेला देणार असल्याचे जाहीर केले. त्या वेळी त्यांचा मुलगा कॉलेजला जाण्याच्या वयाचा झाला होता. हे पैसे त्याच्या शिक्षणावर खर्च करावे अशी त्यांच्या पत्नीची इच्छा असणे साहजीक आहे. इतर कोणीही तसेच केले असते. पण कर्व्यांचे म्हणणे असे होते की जर त्यांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने त्यांनी विमा उतरवला होता. आता ते जीवंत असतांना तशी गरज राहिली नाही, त्यामुळे त्या पैशाचा विनियोग त्यांच्या कार्याकरताच व्हायला हवा. त्याहून त्यांच्या पत्नीला ते पैसे पाहिजेच असतील तर तिने आपला पती निधन पावला आहे असे समजावे, त्यांच्याशी संबंध ठेवू नये आणि तसे जाहीर करावे तरच तिला ते मिळतील.

पत्नी किंवा मुलांबरोबर ते असे कठोरपणे वागत असले तरी समाजावर मात्र त्यांनी कधी राग धरला नाही. समाजाने त्यांचा अनन्वित छळ केला तरी हे लोक अज्ञ आहेत, आपण काय करत आहोत हे त्यांना समजत नाही अशी येशू ख्रिस्तासारखी भूमिका घेऊन त्या समाजाच्या हितासाठीच ते झटत राहिले. संत एकनाथांच्या काळात त्यांनीसुध्दा समानता, विश्वबंधुत्व वगैरेंना धार्मिक समजुतींपेक्षा जास्त वरचे स्थान दिले होते आणि यामुळे तत्कालीन रूढीवादी लोकांचे वैर पत्करले होते. एकदा ते नदीवरून स्नान करून परत येत असतांना कोणी खोडसाळपणे त्यांच्या अंगावर गलिच्छ राड उडवली, त्याच्यावर न रागावता किंवा त्याच्याशी न भांडता एकनाथ महाराज शांतपणे पुन्हा नदीवर जाऊन स्नान करून आले. याची पुनरावृत्ती होत राहिली, पण एकनाथांनी आपला शांतपणा सोडला नाही. अखेर चिखल उडवणाराच कंटाळला. त्याने नाथांची क्षमा मागितली. त्यानर नाथांनी उलट त्याचे आभार मानले आणि तुझ्यामुळे मला आज इतक्या वेळा गोदावरीचे स्नान घडले आणि त्याचे पुण्य लाभले असे सांगितले. महर्षी कर्व्यांची मनोवृत्ती साधारणपणे अशीच होती.

कर्वे यांच्या कामाची महती हळूहळू लोकांना पटत गेली. समाजाची विचारसरणी त्यांना अनुकूल होत गेली. पुराणमतवादी लोकांची पिढी मागे पडून सुशिक्षित आणि उदारमतवादी लोकांची संख्या वाढत गेली. कर्वे यांच्या स्त्रीशिक्षणसंस्थेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक महिलांनी स्वतःला या कार्याला वाहून घेतल्या. त्यांनी केलेल्या प्रगतीमधून आणि त्यांच्या सद्वर्तनातून समाजापुढे चांगली उदाहरणे आली. स्त्रियांना शिक्षण दिल्याने त्यांची आणि समाजाची अधोगती होईल या जुन्या खोडांनी दाखवलेल्या भीतीमधील हवा निघून गेली. समाजाने कर्व्यांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या सचोटीबद्दल तिळमात्र शंका नसल्यामुळे त्यांना उदारहस्ते देणग्या मिळत गेल्या आणि त्यांनी त्यातली पै न पै त्यांनी सत्कारणी लावली. त्यांची संस्था मोठी होत गेली. अनेक नामवंत त्यांच्या संस्थेला भेट देऊन त्याला सहाय्य देऊन गेले.

अर्थातच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले. अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. भारतामधील सर्वोच्च असा भारतरत्न हा पुरस्कार त्यांना मिळाला. ते महर्षी म्हणवले जाऊ लागले. पूर्वीच्या हिंगणे या गावाच्या परिसरालाच कर्वेनगर असे नाव दिले गेले. पुणे शहराचा विस्तार इतका झपाट्याने झाला की एके काळी ओसाड असलेला हा भाग गजबजून गेला आणि पुणे शहराचा एक महत्वाचा भाग झाला. पूर्वीच्या पुणे शहरापासून हिंगणे या खेड्याकडे जाणा-या रस्त्यालाही कर्वे रोड असे नाव दिले आणि आज हा अत्यंत गजबजलेला हमरस्ता झाला आहे. मुंबईमधील मरीन लाइन्सच्या परिसरातील एक मोठा रस्ता त्यांच्या नावाने ओळखला जातो. पुण्यातील कर्वे रस्त्याच्या कडेला या स्त्रीशिक्षणसंस्थेचे मूळ आणि आजचेही मुख्य स्थान आहे. त्यात अनेक शाळा, कॉलेजे आणि हॉस्टेल्स आहेत. महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांची समाधी आहे, तसेच एक स्मारक आहे. कर्वे यांच्या शाळेमधील हजेरीपटापासून ते त्यांना मिळालेल्या भारतरत्न या पदकापर्यंत त्यांच्या जीवनाशी निगडित अशा अनेक वस्तू तेथे मांडून ठेवल्या आहेत. तसेच अनेक छायाचित्रे आणि तैलचित्रांमधून त्याच्या जीवनातील महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकाने हे संग्रहालय अवश्य पहावे आणि त्यामधून स्फूर्ती घ्यावी.





Wednesday, October 10, 2012

आमच्या वैनी



माझे वडील सर्व भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे त्यांची भावंडे त्यांना 'दादा' म्हणत असत आणि त्यांचे नावच 'दादा' असे पडले होते. पूर्वीच्या काळी अशीच पध्दत रूढ होती. घरातले सारे लोक दादा, अप्पा, नाना, ताई, माई, अक्का अशासारख्या उपनावाने संबोधले जात असत, मग ती व्यक्ती नात्याने काका, मामा, मावशी, आत्या, माता, पिता वगैरे कोणी का असेना ! दादांची पत्नी म्हणून माझ्या आईला 'वहिनी' म्हंटले जात असे. 'वहिनी' या शब्दाचा 'वयनी', 'वैनी' असा अपभ्रंश होऊन अखेर 'वैनी' हेच त्यांचे नाव पडले. माझ्या काकूंना मात्र त्यांच्या मुली 'ताई' म्हणत आणि आम्ही मुले नात्याप्रमाणे 'काकू' किंवा 'मामी' म्हणत होतो.

आमच्या वैनींचा जन्म मध्यप्रदेशातल्या होशंगाबाद या गावी झाला होता. त्या लहान असतांनाच त्यांचे काका त्यांना जमखंडीला घेऊन आले आणि कालांतराने लग्न होऊन त्या तिथेच राहिल्या. ही हकीकत मला माहीतसुध्दा नव्हती. त्या माझ्याकडे मुंबईला रहात असतांना एकदा रेशनिंगचा किंवा खानेसुमारीचा असा कोणतासा फॉर्म भरण्याच्या वेळी मला ते कळले. माझ्या लहानपणापासून वैनींच्या माहेरचे कोणीच सख्खे नातेवाईक नव्हते. त्यांचे एक चुलत भाऊ जमखंडीलाच रहात होते ते गोविंदमामा तेवढे चांगल्या परिचयाचे होते. त्यांच्या घरी आमचे नेहमी जाणे येणेही होत असे. त्या मामांचे सख्खे भाऊ आणि बहिणी परगावाहून अधून मधून कधी जमखंडीला आले तर आम्हालाही भेटून जायचे त्यामुळे ते परिचयाचे होते. आमच्या वैनी आणि (त्यांच्यासोबत मी) माहेरपणासाठी कुणाकडे आठ दहा दिवस जाऊन राहिल्याचे मात्र मला आठवत नाही. 'धुरांच्या रेघा' हवेत काढणाऱ्या 'झुकुझुकुगाडी'त बसून 'पळती झाडे' पहात 'मामाच्च्या गावाला' जाण्याचे भाग्य मला तरी कधीच लाभले नाही. वैनींनी आपणहून सहसा कधी त्यांच्या माहेरच्या लोकांचा विषय काढला नाही की घरातील इतरांच्या बोलण्यात तो कधी आल्याचे मला आठवत नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्या ९९.९९ टक्के सासुरवाशीण झाल्या होत्या. आमच्या काकूंची गोष्ट वेगळी होती. त्यांचे माहेर गावातच होते आणि अधूनमधून त्या तिकडे जाऊन काही दिवस राहून येत असत. त्यांच्या बोलण्यातही नेहमी त्यांच्या माहेरकडल्यांचे कौतुक येत असे.

मी लहान असतांना आमचे दादा नोकरीमुळे परगावी रहात असत. त्यामुळे आमच्या एकत्र कुटुंबाची सगळी व्यवस्था पाहण्याची जबाबदारी वैनींच्यावर असे आणि ती गोष्ट त्या अत्यंत कौशल्याने आणि सक्षमपणे करत होत्या. मोठ्या एकत्र कुटुंबातल्या लोकांच्या निरनिराळ्या पसंती, आवडीनिवडी असतात. प्रत्येकाचे वेगळे स्वभाव, टेंपरामेंट असतात, मानापमानाच्या वेगळ्या कल्पना असतात. त्या सर्वांची मर्जी राखून, गोडीगुलाबीने पण परंपरेनुसार योग्य त्या रीतीने सगळ्या गोष्टी करवून घ्यायच्या ही तारेवरची कसरत करणे वैनींना जमत असे. यासाठी ते काम करणारा माणूस एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे स्वतःच्या आवडीनिवडी आणि अहम् (इगो) यांना थोडा वेळ बाजूला ठेवणे. बहुतेक वेळी वैनी हेच करत होत्या. पण गरज पडल्यास त्या खंबीरपणाही दाखवत असत. 

पू्वी आमच्या घरातल्या संयुक्त कुटुंबामधील सदस्यांची संख्या बरीच होती, शिवाय परगावाहून येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रमाणही बरेच होते. गावात कोणा आप्ताचे घर असतांना हॉटेलात जाऊन राहणे किंवा जेवणे याची त्या काळात कल्पनाही केली जात नव्हती. त्यामुळे त्या सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आमच्या स्वयंपाकघरातूनच केली जात असे. गॅस, कूकर, मिक्सर, ओव्हन यासारखी वेळ आणि कष्ट वाचवणारी साधनेही तेंव्हा उपलब्ध नव्हती. 'रेडी टु ईट' असे तयार खाद्यपदार्थ किंवा एमटीआरचे सेमीकुक्ड प्रॉडक्ट त्या काळी बाजारात मिळत नव्हते. कच्च्या मालापासून सुरुवात करून सर्व पाकक्रिया घरीच करावी लागत असे. त्यामुळे गृहिणींचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरात राबण्यातच जात असे.

स्वयंपाकातले कलाकौशल्य वैनींना अवगत होतेच, त्यातले विज्ञान त्यांना चांगले समजले होते आणि त्याचा उपयोग करून त्यातील तंत्रज्ञानाचा त्या कुशलपणे उपयोग करून घेत होत्या. वहन, अभिसरण आणि उत्सर्जन (कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन) या तीन प्रकाराने ऊष्णता इकडून तिकडे जात असते याचे ज्ञान त्यांनी थर्मोडायनॅमिक्स विषयाच्या पुस्तकात वाचले नव्हते आणि त्यातली समीकरणे मांडून ती सोडवणे त्या शाळाकॉलेजात जाऊन शिकल्या नव्हत्या. पण या सर्वांचा उत्तम अंदाज त्यांना अनुभवाने आला होता. कच्च्या मालापासून कोणताही खाद्यपदार्थ तयार करतांना त्याला तव्यावर किंवा प्रत्यक्ष आगीत घालून भाजणे, उकळत्या पाण्यात बुडवून ठेवून किंवा नुसत्या वाफेवर शिजवणे आणि तापलेल्या तेलात किंवा तुपात तळणे किंवा परतणे (बेक, रोस्ट, बॉइल, डीप किंवा शॅलो फ्राय) या प्रक्रियांचा उपयोग केला जातो. त्यासाठी कशा प्रकारच्या किती ऊष्णतेची आवश्यकता असते, त्याला किती वेळ लागतो आणि त्या प्रक्रियांमध्ये त्या पदार्थावर ऊष्णतेचा परिणाम होऊन त्यांच्या गुणधर्मांमध्ये कसे बदल होत असतात वगैरेंचे त्यांनी अत्यंत बारकाईने निरीक्षण केले होते. चुलीवर ठेवलेल्या भांड्यामधून बाहेर पडणारी वाफ, ऊष्ण हवा किंवा धूर पाहून, त्यामधून पसरणारा गंध, त्यावेळी होणारा सूक्ष्म आवाज वगैरेमधून त्या पात्राच्या आत काय चालले आहे याचा अचूक अंदाज त्यांना येत असे. कोणत्या पदार्थासाठी कोणते पातेले, कढई किंवा तवा घ्यायचा, कोणती चूल, शेगडी किंवा स्टोव्ह पेटवायचा वगैरे गोष्टी त्या पदार्थाच्या कृतीवर विचार करून त्या अचूकपणे ठरवायच्या. गरज पडल्यास काही खास पदार्थासाठी मुद्दाम वेगळ्या प्रकारची चूल किंवा शेगडी त्या दगडमातीमधून स्वतःच तयार करून घेत असत. 

मी आठवी नववीत गेल्यानंतर वैनींना मदत करण्यासाठी अधून मधून आमच्या स्वयंपाकघरात जाऊ लागलो होतो. त्यांनी मला एकही रेसिपी सांगितली नाही, एकाही विशिष्ट पदार्थाची कृती शिकवली नाही, पण वर दिलेल्या सर्व औष्णिक प्रक्रिया आणि कुटणे, वाटणे, खोवणे, दळणे, लाटणे यासारख्या यांत्रिक (मेकॅनिकल) क्रियांसंबंधी मूलभूत माहिती दिली आणि मी जर हे शिकून घेतले आणि लक्षात ठेवले तर पुढील आयुष्यात मला हवा तो पदार्थ करता येईल असे शिकवले. यालाच खरे शास्त्रीय शिक्षण म्हणतात. जमखंडीतल्या आमच्या स्वयंपाकघरातले पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ, चूल-फुंकणी, सूप यासारखे कोणतेही उपकरण आमच्या आताच्या घरात नाही आणि आमच्या आताच्या स्वयंपाकघरातली फ्रिज, ओव्हन, फूड प्रोसेसर यातली एकही वस्तू त्या काळात उपलब्ध नव्हती. पण लहानपणी खाल्लेले खाद्यपदार्थ मात्र आम्ही आताही तयार करू शकतो कारण त्याच्या मागे असलेले पाकशास्त्र तेच आहे.

त्या काळात आमच्या स्वयंपाकघरात कुकिंग गॅस आणि विजेचा वापर होत नव्हता. वखारीतून फोडून आणलेली बाभळीची कोरडी लाकडे हे मुख्य इंधन होते आणि अर्धवट जळलेल्या लाकडांपासून कोळसा बाजूला काढून त्याचा उपयोग शेगड्यांमध्ये केला जात असे. न जळलेले लाकडाचे तुकडे, रद्दी कागद, चिंध्या, नारळाच्या करट्या वगैरे सटरफटर गोष्टी बंबार्पण केल्या जात असत. याशिवाय ऑइल मिल्समधून भुईमुगाची टरफले आणि सॉमिल्समधून लाकडाचा भुसा अशा वेगळ्या टाकाऊ वस्तू घरी आणून त्यांचा इंधनासाठी उपयोग करायचे स्पेशल तंत्रज्ञान वैनींकडे होते किंवा त्यांनी ते विकसित केले होते. त्यासाठी पत्र्यांच्या रिकाम्या डब्यांपासून खास प्रकारच्या शेगड्या त्या मुद्दाम तयार करून घेत असत. आमच्या घरात कसल्याही प्रकारची भट्टी किंवा ओव्हन नव्हती, पण अनेक ड्रॉवर असलेला एक पत्र्याचा डबा वैनींनी कुठून तरी आणला होता. त्याच्या खाली, वर आणि बाजूला निरनिराळ्या प्रकारांनी गरम हवा खेळवून त्या मस्त खुसखुशीत बिस्किटे घरीच तयार करत असत. कोणताही नवा पदार्थ खात असतांना तो कशापासून तयार केला गेला असेल आणि त्यात कोणकोणती इतर खाद्य द्रव्ये मिसळली असतील हे त्यांना चवीवरून समजत असे आणि लहान प्रमाणात प्रयोग करून तो पदार्थ स्वतः बनवून पहाण्याचा छंद त्यांना होता. हे करतांना त्यांना सामान वाया जाण्याची भीती वाटत नसे. ते तसे होऊच देत नसत. त्यांनी ठरवलेला पदार्थ त्यांच्या अपेक्षेनुसार होतांना दिसला नाही तर मध्येच त्यात बदल करून त्यातून एक वेगळा चांगला पौष्टिक व रुचकर पदार्थ करणे हा त्यांच्या हातचा मळ होता. यामुळे आम्हालाही अनेक नवे नवे अनोखे पदार्थ खायला मिळाले.

विणकाम, भरतकाम, शिवणकाम इत्यादी कलांची साधारण मूलभूत माहिती वैनींना होती, पण त्यांना त्यांची मनापासून खूप आवड नसावी. स्वयंपाकघरातील कामे संपल्यावर उरलेला वेळ अशा प्रकारच्या कलाकुसरीच्या आणि शोभेच्या कामामध्ये घालवण्यापेक्षा तो वाचनात घालवणे त्यांना आवडत असे. त्यांचे वाचन मुख्यतः धार्मिक स्वरूपाचे होते, पण त्यांचे अवांतर वाचनसुध्दा भरपूर होते. मासिकांमधून येणारे लेख, कथा वगैरे साहित्य त्या आवडीने वाचत असत. त्यात मनोरंजनापेक्षा ज्ञानाला जास्त प्राधान्य असायचे. आमच्या घरात असलेली बहुतेक सगळी धार्मिक पुस्तके अनेक वेळा वाचून आणि पोथ्यांची पारायणे करून त्यांना ती जवळ जवळ तोंडपाठ झाली असतील. त्यांना संगीताचे वावडे नव्हते, साधे गाणे ऐकायला आवडत होते, पण संगीताच्या शास्त्रात मात्र त्यांना रुची किंवा गती नव्हती. संतांनी लिहिलेले अभंग, ओव्या वगैरेंचा खूप मोठा स्टॉक त्यांच्याकडे होता. त्यांना प्रसंगानुसार यथायोग्य अशा म्हणी, वाक्प्रचार किंवा सुवचने तत्काळ सुचत असत. रामायण, महाभारत आदि पुराणकालातल्या कथांमधील सगळी मुख्य पात्रे तर त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक होतीच, शिवाय त्या पात्रांचे काका, मामा, नणंदा, भावजया वगैरे आप्तसंबंधींची नावे आणि त्यांचा इतिहासही त्या सविस्तर सांगत असत. त्या पौराणिक कथा छान रंगवून सांगत असत. त्यांच्याकडे काव्य लिहिण्याची प्रतिभा आणि त्याचा छंद होता. त्यांनी लिहिलेल्या काही कवनांचे संकलन धनंजयने केले आहे. त्यात देवाची स्तुती, प्रार्थना वगैरे आहेत, काही पौराणिक आख्याने आहेत, एक दोन व्यक्तीगत स्वरूपाच्या कविता आहेत.

जमखंडीला त्यांच्या समवयस्क आणि समविचारी महिलांचा ग्रुप होताच, सवड मिळेल तेंव्हा भेटून त्या गप्पागोष्टींबरोबर थोडे वाचन, पठण, मनन. चिंतन, चर्चा वगैरे करत असत. नंतरच्या काळात त्या बार्शी किंवा अणुशक्तीनगरला असतांनासुध्दा त्यांच्याभोवती अशी मंडळे गोळा होत असत आणि त्यांच्या सुसंस्कृत सहवासाचा लाभ घेत असत. त्यांनी स्वतःचे म्हणून कसले विचार मांडून इतरांना उपदेश करण्याचा आव कधी आणला नाही, पण मुख्यतः संतविभूतींच्या काव्यामधील ओळी उद्धृत करून किंवा त्यांच्या जीवनामधील घटनांचे दाखले देऊन त्या सर्वांना योग्य असे मार्गदर्शन करत असत. स्वतःच्या जीवनातसुध्दा त्यांनी अशाच प्रकारे नेहमी योग्य निर्णय घेतले असतील, आणि त्याला इतस्ततः भरकटू न देता योग्य ती दिशा दिली असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. सभोवतालच्या जगात बरीवाईट माणसे असतात, त्यांच्या कृती चांगल्या किंवा वाईट असतात, त्यातल्या चांगल्याकडे आपण पहावे, त्यात समाधान मानावे, इतरांमधल्या वाईटाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात अर्थ नाही, आपण त्यापासून सावध व्हावे, आपल्याला उपसर्ग होणार नाही किंवा त्रास झाला तर तो कमी व्हावा असा प्रयत्न करावा असे त्या सांगत असत. पुढील आयुष्यात ऑफीसचे हजारो रुपये खर्च करून आयोजित केलेल्या कार्यशाळांमध्ये सकारात्मक विचारपध्दतीबद्दल मी जे शिकलो त्याची बीजे लहानपणी वैनींनी माझ्या मनात पेरलेली होती हे ते शिकतांना मला जाणवत होते.

कोठल्याही नव्या गोष्टीबद्दल त्यांना प्रचंड उत्साह असायचा आणि नवनिर्मितीचे खूप कौतुक वाटत असे. घरातल्या किंवा परिसरातल्या कोठल्याही समारंभाच्या वेळी त्यांच्या अंगात हत्तीचे बळ येत असे आणि त्यात त्या उत्साहाने पुढाकार घेत असत. त्यातल्या बारीकसारीक बाबी त्या काळजीपूर्वक पहात असत. त्यांनी मला सांगितलेले कुठलेही काम "मला येत नाही किंवा जमणार नाही." असे म्हणून टाळणे शक्यच नव्हते. "येत नसेल तर शिकून घे, जमणार नाही असे वाटत असेल तर आधी प्रयत्न तरी करून बघ. जमेल तेवढे तरी कर, त्यात काय प्रॉब्लेम येतात ते आपण पाहू." असे सांगून ते काम त्या करवून घेत असत. "या पूर्वी मी हे काम कधी केले नाही." हे उत्तर तर त्यांना अजीबात मान्य नव्हते. "केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे।" हे समर्थ रामदासांचे वचन लगेच त्यांच्या ओठावर यायचे. कोणतीही गोष्ट कधी तरी कोणी तरी पहिल्यांदा केलीच होती असा त्यांचा युक्तीवाद असे. "बालपणी बाळांची कोमल तरुतुल्य बुध्दी वाकेल। घेईल ज्या गुणांना ते गुण विकसून तेही फाकेल ।।" असा त्यांचा एक आवडता श्लोक होता. त्यामुळे लहानपणी कुठल्याही विषयातले जे जे काही ग्रहण करता येईल ते सगळे आमच्या डोक्यात कोंबण्याच्या दृष्टीने त्या प्रयत्नशील असत. पण ते आमचा मूड पाहून आमच्या कलाकलाने होत असल्यामुळे त्याचा भडिमार वाटत नसे किंवा वैताग येत नसे.

"दादांच्या बद्दल सांगण्यासारखे इतके आहे की ते कधीच लिहून संपणार नाही. शिवाय भावना आणि विचार यांची गल्लत होऊन लिहिणे कठीण होत राहणार. या कारणामुळे मी यापूर्वी तसा प्रयत्नही केला नव्हता. आज थोडा धीटपणा करून एक अंधुकशी झलक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे." असे मी मागील लेखात लिहिले होते. वैनींच्या बाबतीत ते शंभरपट जास्त प्रकर्षाने जाणवते. एक तर त्यांचा सहवास खूपच निकटचा होता आणि आम्हाला तो तुलनेने दीर्घ काळ लाभला. मी लहान असतांना मला मिळालेल्या संस्कारांबद्दल मी थोडेसे वरील परिच्छेदांमध्ये लिहिले आहे. मोठेपणीसुध्दा सतत त्यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि भक्कम आधार आम्हाला मिळत राहिला. जीवनामधली त्यांची जागा कधीही भरून निघाली नाही आणि निघणारही नाही हे निदान माझ्या बाबतीत तरी शंभर टक्के खरे आहे.