Monday, March 23, 2026

उतारवयातले विकार

 




आमच्या शाळेच्या पुस्तकात शारदा या नाटकातले एक गीत होते, "म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान ।" त्याची शारीरिक अवस्था कशी होती?

दंताजीचें ठाणें उठलें, फुटले दोन्ही कान ।

डोळे रुसले कांहिं न बघती नन्‍ना म्हणते मान ॥

तुरळक कोठें केस रुपेरी, डोइस टक्कल छान ।

भार वयाचा वाहुनि वाहुनि कंबर होय कमान ॥

काठीवाचुनि नेट न पाया परि मोठे अवसान ।

त्या वेळेला आम्ही हे एक विनोदी गाणे समजून छान हावभाव करून म्हणत होतो आणि खदाखदा हसत होतो. पण अशी सत्य परिस्थिती किती उदास असते याची तेंव्हा आम्हाला कल्पना नव्हती.

जिथे कुठलीही अप्रिय गोष्ट नजरेलाही पडणार नाही अशा राजवाड्यात युवराज सिद्धार्थाला वाढवले होते. पण एक दिवस तो राजवाड्याच्या बाहेर पडला तेंव्हा रस्त्यात त्याला एक जख्ख म्हातारा दिसला. हा माणूस असा का वाकलेला दिसतो असे सारथ्याला विचारल्यावर त्याला उत्तर मिळाले की सगळीच माणसे अखेर म्हातारी होतात. याशिवाय त्याला एक आजारी माणूस आणि एक प्रेत दिसले. या अवस्थासुद्धा सगळ्यांच्याच आयुष्यात येतात हे ऐकून सिद्धार्थाला एवढा मोठा धक्का बसला की तो संसारातून विरक्त होऊन तपश्चर्या करायला गेला आणि मानवी जीवनामधील दुःखांवर उपाय शोधण्यावर विचार करत गौतमबुद्ध झाला.

. . . . .

माझ्या लहानपणी घरात कुणालाही लहानसहान किरकोळ दुखणे झाले तर त्यावर घरगुती उपचारच केले जात असत, काही गंभीर आजार असला तरच फॅमिली डॉक्टरांना बोलावले जायचे. हे डॉक्टर घरी येऊन थर्मॉमीटरने आजारी माणसाचे टेंपरेचर पहायचे आणि स्टेथास्कोपने त्याची छाती तपासायचे, त्याशिवाय त्याची नाडी, जीभ आणि डोळ्यातली बुबुळे पहात असत, कधीकधी पोट दाबून पहात असत. कदाचित त्यांच्या दवाखान्यात रक्तदाब पहाण्याचे साधन असेलही, पण मी ते कधी पाहिले नव्हते. आमच्या लहान गावात रक्त तपासणी करण्याची सोय नव्हती आणि वाहतुकीची सोयिस्कर साधनेही नव्हती त्यामुळे फक्त तेवढ्यासाठी निदान आमच्या घरातून तरी कोणीही कधीच बेळगाव किंवा मिरजेला हॉस्पिटलमध्ये गेला नव्हता. माझी आई किंवा वडील यांनी कधी रक्तातली साखर किंवा रक्तदाब तपासला होता की नव्हता हेच मला माहीत नाही. "त्यांना हे विकार होते का?" असे डॉक्टर मला विचारतात तेंव्हा मला नाही असेच सांगावे लागते कारण त्यांना यातले काही असते असे समजले असते आणि त्यावर ते रोज काही औषधे घेत असते तर त्याची घरात नक्कीच थोडी तरी चर्चा झाली असती. त्या काळात लहान गावांमध्ये या तपासण्याच केल्या जात नसत म्हणूनही लोक त्याविषयीच्या अज्ञानाचे सुख अनुभवत असतील. आज निम्म्याहून जास्त वयस्कर लोकांना यातले काहीतरी किंवा दोन्ही विकार हमखास असतात.

पूर्वीच्या काळी सरकारी नोकरीतून पंचावन्न वर्षाला रिटायर करत असत आणि बहुतेक पेन्शनर त्यानंतर फार तर पाच दहा वर्षेच पेनशन घेत असत. मध्यमवर्गातल्या माणसाच्या सगळ्या मुलांची लग्ने झाली आणि एक दोन नातवंडे घरात आली की त्याचे इथले काम संपले, आता त्याने जायला हरकत नाही असे समजले जात असे. साठपासष्ट वर्षांपर्यंत हे साधले जात असे. त्यानंतर तो कधी तरी गेला तर त्याचे 'सोने झाले' असेच म्हंटले जात असे. त्यामुळे 'अवघे पाउणशे वयमान' असलेला गाण्यातल्यासारखा गलितगात्र किंवा खरा टुणटुणित असाही मागच्या पिढीमधला कुठला म्हातारा माणूस माझ्या लहानपणी मला जवळून पहायला मिळाला नाही. त्यावेळी मोठ्या लोकांना त्यांचे वय विचारणे अशिष्ट मानले जात होते, पण मला असे वाटते की त्या काळात माझ्या आजूबाजूला दिसणारी सगळी वयस्कर माणसे सत्तरीच्या आतलीच असावीत. 

माझ्या लहानपणी म्हणजे सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वीच्या काळात वयस्कर समजली जाणारी जी कोणी साठपासष्ठ वयाची माणसे मी पाहिली होती त्यातल्या बहुतेक लोकांचेही केस थोडे फार पांढरे झालेले असायचे आणि ते लोक त्यावर कलप लावून ते झाकायचा प्रयत्नही करत नसत. अनेक लोकांना पूर्ण किंवा अर्धवट टक्कल पडले असायचे, पण त्या काळातले लोक नेहमी घराबाहेर जातांना डोक्यावर टोपी किंवा फेटा घालत असत, त्यात ते झाकून जात असे.  चेहेऱ्यावर किंवा हातापायांच्या त्वचेवर सुरकुत्या पडणे हे तर वार्धक्याचे एक मुख्य लक्षण असते. लहान मूलसुद्धा त्यावरूनच पटकन कुणाला आजोबा किंवा आजी म्हणते. त्वचेवरील सुरकुत्या, केस पिकणे किंवा गळणे याला आजार म्हणता येणार नाही. ती नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यावर काही इलाजही नसतो. बहुतेक लोकांचे दात पडायला सुरुवात झालेली असे, त्यामुळे  त्यांना अन्न चावायला त्रास होत असे. काही लोकांची भूक मंदावलेली असे म्हणून ते मिताहारी होत असत, काही लोक रात्री जेवण न घेता थोडा हलकाफुलका अल्पोपहार घेत असत. आमच्या सगळ्या गावात मिळून फक्त दोनतीन व्यक्तीच कंबरेमध्ये वाकल्या होत्या आणि काठीच्या आधाराने हळू हळू एक एक पाऊल टाकून चालत असत. त्या कदाचित सत्तरऐंशीच्या पुढे गेल्या असतील. पण आधीच्या पिढीमध्ये हातात एक काठी घेऊन तिला गरगर फिरवत चालण्याची एक फॅशनसुद्धा होती. त्यामुळे काही धडधाकट लोकांच्या हातातही काठी असायची. काही वयस्क लोकांचे गुढगे दुखत असत, तर काही लोकांच्या पायाचे तळवे दुखत असत आणि ते लोक घरी आल्यावर पाय चेपून घेत असत. बहुतेक नाटकसिनेमांमधले वृद्ध लोक नेहमी खोकतांना दाखवले जातात, त्याप्रमाणे काही लोकांना दमाखोकल्याचा त्रास वरचेवर होत असे. वयाच्या चाळिशीनंतरच बहुतेक लोकांना वाचण्यासाठी भिंगाची गरज पडत असे, क्वचित काही लोकांच्या डोळ्यात मोतीबिंदू होऊन  त्यामुळे त्यांची दृष्टी अधू झालेली असे. त्यात कृत्रिम भिंग बसवून पूर्ववत दृष्टी मिळण्याची सोय त्या काळात नव्हती. मला असे आठवते की त्या काळात काहीसे विक्षिप्त, हेकट, तऱ्हेवाइक, मनाचे संतुलन बिघडलेले, स्वतःशीच बडबड करणारे असे म्हातारे लोक जास्त प्रमाणात दिसायचे. आजच्या जगातही तशा प्रकारचे लोक असतात, पण कदाचित त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला असेल.

आमच्या घरातली कुणीही वडिलधारी व्यक्ती रोज सकाळसंध्याकाळी एखादी गोळी घेत नव्हती. कुणाला ताप आला, खोकला झाला तर त्याने दोनचार दिवस औषधे घेतली आणि तो आजार बरा झाल्यावर ते बंद केले हे ठीक आहे, पण धडधाकट दिसत असलेल्या माणसाने रोज उठून कुठले तरी औषध घेणे ही पूर्वी माझ्या कल्पनेच्या पलीकडली गोष्ट होती. मी नोकरीसाठी मुंबईला आल्यानंतर इथे ज्या लोकांच्या ओळखी होत गेल्या त्यात काही लोक रोज अशी औषधे घेतांना दिसले. वयस्कर लोकांमध्ये त्यांचे प्रमाण जास्त होते. त्यातले बहुतेक लोक रक्तदाब किंवा रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रणामध्ये रहावे या कारणासाठी वर्षानुवर्षे औषधे घेत राहिले होते, आता त्यांचे प्रमाण जास्त वाढले आहे. 

या दोन्ही अशा गोष्टी आहेत की त्यांचे प्रमाण हळूहळू थोडे थोडे वाढले तर ते माणसाला आपोआप जाणवत नाही. आपल्या ज्ञानेंद्रियांमध्ये तशी क्षमता नाही. काही तात्कालिक कारणामुळे त्यात तात्पुरती वाढ झाली तर ते कारण संपल्यावर आपले शरीरच त्यांना पुन्हा नियंत्रणाखाली आणत असते. शरीररचनेमधली ही क्रिया खरोखर अद्भुत अशी आहे. पण जर हे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढले किंवा दीर्घ काळ वाढलेले राहिले तर त्यांचे वाईट परिणाम होऊन एखादे इंद्रिय काम करेनासे होते किंवा एखादा मोठा आजार उद्भवतो. तसे झाले तर तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते, त्यानंतर तिला नियंत्रणाखाली आणणे अवघड असते. कदाचित यामुळेच पूर्वीच्या काळी अपमृत्यूंचे प्रमाण जास्त असायचे.

शहरांमधले डॉक्टर ही धोक्याची सूचना अधिक परिणामकारक पद्धतीने देतात. सामाजिक माध्यमांवरही यावर अनेक लेख आणि सूचना सारख्या येत असतात. रक्तदाब आणि रक्तशर्करा या गोष्टी मोजण्याची नवनवी उपकरणे तयार होऊन बाजारात येत गेली आणि त्यांचा उपयोग करून या दोन्हींची प्रमाणे मोजता येणे अधिकाधिक सुकर होत गेले. यामुळे आजकाल त्यांचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली की लगेच त्यावर उपाययोजना सुरू केल्या जातात. मी सुमारे चाळीस वर्षांचा असतांना पहिल्यांदा रक्ततपासणी करून घेतली होती. त्याच्या आदल्या रात्रीच एका लग्नाच्या मेजवानीला गेलो होतो आणि सगळ्या पक्वान्नांवर यथेच्छ ताव मारला होता. त्याचा परिणाम झाला होता आणि साखरेचे प्रमाण एकदम दोनशेच्या वर गेले होते. पण आमच्या डॉक्टरने काही सूचना दिल्या आणि तीन आठवड्यांनंतर पुन्हा चाचणी केली तर ती शंभराच्या आत आली. त्या डॉक्टरांनी सांगितले होते की यावर नियंत्रण ठेवण्याचे तीन मार्ग असतात, १.आहारावर नियंत्रण, २.व्यायाम आणि ३.औषधोपचार. मी त्यांना सांगितले की मी आहारावर अगदी काटेकोर नियंत्रण ठेवीन आणि मला जमेल तेवढा व्यायाम करेन, पण मला औषध नको. पुढील वीस वर्षे मी नियमितपणे रक्ततपासणी करून घेत होतो आणि माझ्या रक्तामधील साखरेचे प्रमाण कुठल्याही औषधाविनाच नियंत्रणाखाली राहिले होते.

मधुमेह हा तसा फक्त उतारवयातला विकार नाही. कुठल्याही वयाच्या माणसाच्या शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसेल तर त्याने खाल्लेल्या अन्नाचा रस शरीरामधील पेशींपर्यंत पोचू शकत नाही ही मुख्य व्याधी असते, तिच्यामुळे त्या पेशी योग्य प्रकारे काम करू शकत नाहीत. अन्नरसातली साखर पेशींकडून वापरली न गेल्यामुळे ती रक्तामध्ये साठत जाऊन तिचे प्रमाण वाढते. रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण हा या व्याधीचा इंडिकेटर आहे, रोग नाही. सुदृढ माणूस जेवढे अन्न खातो त्याचे पचन होऊन तो अन्नरस त्याच्या शरीराला रक्तामधून मिळत असतो. तो दिवसभरात जेवढी मेहनत करत असतो त्यासाठी लागणारी ऊर्जा तयार करण्यात तो अन्नरस खर्च होऊन जातो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण आपणहून आटोक्यात राहते. आपण दिवसातून दोन तीन वेळाच अन्न खातो, पण शरीरामधल्या पेशी चोवीस तास काम करत असतात. त्यांना सतत अन्नरस पोचवत राहण्यासाठी त्याचा तात्पुरता साठा करून ठेवणे आणि त्यातून तो पुरवत राहणे हे काम आपले शरीर बिनबोभाट करत असते. रोजच गरजेपेक्षा जास्त अन्न खाणाऱ्यांचा अतिरिक्त अन्नरस मेदाच्या स्वरूपात शरीरात ठिकठिकाणी जमा होत राहतो. यामुळे शरीराला चुकीचा संदेश मिळून किंवा अनुवंशिकतेसारख्या इतर काही कारणांमुळे  स्वादुपिंड इन्सुलिनची निर्मिती कमी करायला लागते. यातून मधुमेह उद्भवतो. 

इन्सुलिनची निर्मिती गरजेपेक्षा कमी होत असते तेंव्हा औषधे देऊन ती काही प्रमाणात वाढवली जाते. रक्तातल्या साखरेचे प्रमाण थोडेसेच वाढले असतांना ते लक्षात आले तर ही उपाययोजना त्याला नियंत्रणात आणू शकते. माझ्या माहितीतल्या अनेक लोकांना उतारवयामध्ये याची गरज पडते. कदाचित वयोमानानुसार शरीरातल्या सगळ्याच इंद्रियांची कार्यक्षमता कमी होत असल्यामुळे असेल किंवा शारीरिक श्रम कमी झाल्यामुळे तसे होत असेल. जर औषधे अपेक्षेनुसार काम करत नसतील तर त्या रुग्णाला जेवणाआधी एका लहानशा सुईने इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जाते. त्याला ते रोज घेत रहावे लागते.  हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेल्या पेशंटची रोजच जेवणाआधी रक्ततपासणी करतात आणि साखरेचे प्रमाण जास्त निघाले तर ते लगेच इन्शुलिन देऊन कमी करतात.

मधुमेह बळावला तर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. कुणाची दृष्टी मंद होते, तर कुणाचे पाय कमजोर होतात, काही लोकांना झालेली जखम बरी होतच नाही आणि त्यात सेप्टिक होऊन गंभीर समस्या उद्भवतात. आजकाल तपासणी करण्याच्या इतक्या सोयी निघाल्या आहेत त्यातले ग्लुकोमीटर नावाचे एक उपकरण घेतले तर कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये न जावे लागता घरीच रक्तशर्करा मोजता येते आणि त्याचा रेकॉर्ड ठेवता येतो. नियमितपणे मधुमेहावर उपचार घेत असलेले काही ज्येष्ठ नागरिक हे उपकरण जवळ ठेवतात. आठवडा, पंधरवडा किंवा महिन्यातून एकदा किंवा मनात शंका आली तर लगेच चाचणी करून रक्तातली साखर मोजतात आणि खात्री करून घेतात. त्यांना मधुमेहाचे दुष्परिणाम टाळता येतात.

माणसाचे, तसेच इतर प्राण्यांचे हृदय  शरीरातील सर्व अवयवांना रक्त पोहोचवण्यासाठी एका मध्यवर्ती पंपाप्रमाणे काम करते. जेव्हा ते आकुंचन पावते तेंव्हा ते त्यातले शुद्ध रक्त मोठ्या वेगाने धमन्यांमध्ये (शुद्ध रक्तवाहिनींमध्ये) ढकलते. रक्ताचा हा प्रवाह धमन्यांच्या भिंतींवर एक प्रकारचा दाब निर्माण करतो. यालाच आपण रक्तदाब म्हणतो. या दाबामुळे ते रक्त शरीरभरातल्या सर्व रक्तवाहिन्यांधून सगळीकडे पसरते आणि तिथले अशुद्ध झालेले रक्त हृदयाच्या दुसऱ्या कप्प्यामध्ये परत येते.  तिथून ते फुफ्फुसात जाऊन शुद्ध होऊन हृदयात परत येते आणि तिथून पुन्हा धमन्यांमधून शरीरात पसरते. हे काम एक सेकंदापेक्षा कमी वेळात होत असते अशा प्रकारचे रक्ताभिसरण माणूस जिवंत असेपर्यंत अविरत चाललेले असते. अर्थातच रक्तदाब (Blood Pressure) ही मानवी शरीरातील एक अत्यंत नैसर्गिक आणि आवश्यक प्रक्रिया आहे. रक्तातला हा दाब सतत बदलत असतो. जेंव्हा शुद्ध रक्त हृदयातून धमनीमध्ये ढकलले जाते तेंव्हा तो सर्वात जास्त असतो, त्याला सिस्टोलिक (Systolic - वरचा आकडा) म्हणतात आणि त्यानंतर जेव्हा हृदय शिथिल (Relax) होते, तेंव्हा धमन्यांमध्ये असलेला हा किमान दाब असतो त्याला डायस्टोलिक दाब (Diastolic - खालचा आकडा) म्हणतात. प्रत्येक क्षणी रक्ताचा दाब या दोन आकड्यांमध्ये कमी जास्त होत असतो. याशिवाय माणूस गाढ झोपला असेल, आडवा निजला असेल, उठून बसला असेल किंवा उभा राहिला असेल तरी त्या अवस्थांमध्ये तो बदलतो. तो चालत, धावत किंवा उडी मारत असेल तर तो वाढतो, इतकेच नव्हे पण आनंद, दुःख, भय, आश्चर्याचा धक्का अशा भावनांमुळेसुद्धा तो तात्पुरता वाढतो.

मनगटावरील नाडीवर बोट ठेवले तर आपल्याला रक्तवाहिनीमधील या दाबात होत असलेल्या फरकामुळे मिळत असलेले हलकेसे धक्के जाणवतात, याला ठोके म्हणतात. पूर्वीच्या काळातले वैद्य या नाडीची परीक्षा करून फक्त त्याच्या अनुभवावरून रोगाचे निदान करत असत. शास्त्रज्ञ, डॉक्टर्स आणि इंजिनियर्स या लोकांनी संशोधन करून सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक रक्तदाब मोजण्याचे उपकरण तयार केले. यातून हा दाब  mmHg (Millimeters of Mercury) या युनिटमध्ये मोजला जातो.  त्यासाठी पारा भरलेल्या एका काचेच्या उभ्या नलिकेचा उपयोग केला जात असे. त्या यंत्रावर हा रक्तदाब मोजणे हे चिकाटी आणि कौशल्याचे काम असे. त्यामुळे पूर्वीच्या काळी ते उपकरण फार जास्त वापरले जात नव्हते. पण आता सुटसुटित अशी डिजिटल यंत्रे आली आहेत, त्यामुळे सगळे डॉक्टर आता सरसकट सगळ्या रुग्णांचा आधी रक्तदाब मोजतात, इतकेच नव्हे तर असे यंत्र घरी ठेऊन अनेक लोक स्वतःच आपला रक्तदाब मोजत असतात. त्याला काही कौशल्य लागत नाही, त्यासाठी दोन मिनिटे पुरतात आणि कसलाही खर्चही येत नाही.

हृदयामधून बाहेर ढकललेले रक्त रक्तवाहिन्यांमधूनच  शरीरातल्या सगळ्या अवयवांपर्यंत जाऊन पोचते आणि पुन्हा परत येते. या प्रवाहाला होणाऱ्या विरोधावर मात करेल एवढा दाब निर्माण करणे त्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे  रक्तवाहिन्या (धमन्या) किती अरुंद किंवा रुंद आहेत, यावर रक्तदाबाचे प्रमाण अवलंबून असते. जर धमन्या लवचिक आणि मोकळ्या असतील, तर रक्त सहज वाहते. मात्र त्या काही कारणाने अरुंद झाल्या, तर त्यातून रक्त ढकलण्यासाठी हृदयाला जास्त जोर लावावा लागतो, ज्यामुळे दाब वाढतो. आहारात मीठ, तळलेले पदार्थ आणि जंकफूड जास्त असेल तर रक्तदाब वाढतो,  शारीरिक हालचाल कमी असल्यास वजन वाढते आणि हृदयावर ताण पडतो, सततची चिंता किंवा मानसिक तणावामुळे शरीरात 'कॉर्टिसोल' सारखी संप्रेरके वाढतात, जी रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरतात. धूम्रपान आणि मद्यपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्या कडक होतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो. जर कुटुंबात आई-वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर तो होण्याची शक्यता वाढते. मधुमेह किंवा किडनीशी संबंधित आजार असल्यास रक्तदाब वाढू शकतो. या गोष्टी कुठल्याही वयात होऊ शकतात, पण वयोमानानुसार रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते या कारणाने उतारवयात रक्तदाबाची समस्या जास्त प्रमाणात दिसते.

प्रतिबंधक उपाय म्हणून आहारावर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम, योगासने आणि प्राणायाम करणे, निर्व्यसनी राहणे, रोज ७-८ तास शांत झोप घेणे वगैरे गोष्टी केल्या तर रक्तदाबाला वाढण्याची कारणे कमी होतील.  छंद जोपासणे, संगीत ऐकणे किंवा ध्यान करणे यांमुळे मानसिक ताण कमी होतो, तसेच जास्त चिकित्सा, वादावादी किंवा चिंता यातून मनस्ताप करून न घेणे आणि मन शांत ठेवणे वगैरे गोष्टी कराव्यात असे सांगितले जाते. त्यांचा निश्चितपणे फायदा होतोच, पण अनुवंशिकता आणि वयोमानाचे परिणाम यावर उपाय नसतो. त्यामुळे वयाच्या एका टप्प्यावर डॉक्टर औषधे घेण्याचा सल्ला देतात.  ती नियमितपणे घेत राहल्यास रक्तदाब पूर्णपणे नियंत्रणाखाली राहतो आणि त्यामुळे होऊ शकणारे इतर आजार किंवा धोके टाळता येतात.

जन्मलेल्या मुलाच्या तोंडात दात नसतात.  काही महिन्यानंतर त्याला पहिला दात येतो आणि २-३ वर्षांपर्यंत सगळे म्हणजे २० दात येतात. त्यांना दुधाचे दात म्हणतात. सहाव्या किंवा सातव्या वर्षांच्या सुमाराला या दातांच्या खाली नवे दात तयार व्हायला लागतात आणि आधीच्या दातांना पाडून त्यांच्या जागी हे नवे दात येतात, बारा तेरा वर्षांपर्यंत २८ दात आले असतात आणि सतरा अठरा वर्षांनंतर चार अक्कलदाढा येऊन दातांची बत्तिशी पूर्ण होते. हे कायमचे दात पन्नास साठ वर्षे तरी सहज टिकून राहतात.

हे दात अतिशय कणखर असतात. पण त्यांची निगा राखली नाही तर त्यांना कीडही लागते. हे इतके शक्तिशाली किडे कुठे तयार होतात आणि ते कसे तोंडात येऊन दातांना खातात? याचे आश्चर्य वाटते. हा किडा कधीच डोळ्यांना दिसतही नाही, पण त्याने दातांना पोखरल्यावर त्याने केलेला प्रताप मात्र दिसतो. आपण खाल्लेल्या अन्नातले  काही कण दातांना चिकटून राहतात. या जगात असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव (बॅक्टेरिया) असतात. ते डोळ्यांना दिसत नाहीत, पण गुपचुप काम करत असतात. तोंडात असलेले बॅक्टेरिया या कणांवर जैवरासायनिक प्रक्रिया करतात. या प्रक्रियेतून एक प्रकारचे ॲसिड (आम्ल) तयार होते. हे ॲसिड लाळेसोबत मिसळून दातांवर एक चिकट थर तयार करते, ज्याला 'प्लाक' (Plaque) म्हणतात. बॅक्टेरियाने तयार केलेले ॲसिड हळूहळू दातावरील संरक्षक कवचाला विरघळवून कमकुवत करते आणि त्यात छिद्र पाडते. यालाच आपण 'दात किडणे' किंवा 'कॅव्हिटी' म्हणतो.  ही कीड दातांच्या आतल्या मऊ भागापर्यंत पोहोचते तेंव्हा त्यामुळे सूज येते आणि असह्य अशा वेदना होतात. पूर्वीच्या काळी त्या खळग्यामध्ये चांदी किंवा सोने भरून तो बुजवला जात असे किंवा तो दातच उपटून काढून टाकला जात असे. आजकाल रूट कॅनॉल ट्रीटमेंटने उपचार केले जातात. 

किडणे हा प्रकार कुठल्याही वयात होऊ शकतो पण प्रौढांमध्ये हिरड्यांचे आजार हे दात पडण्याचे सर्वात मोठे कारण असते. जेव्हा दातांवर प्लाक साचते तेंव्हा हिरड्यांना संसर्ग होतो आणि तो हळूहळू दातांना आधार देणाऱ्या हाडापर्यंत  पोहोचतो. यामुळे दात आणि हिरड्यांमधील पकड सैल होते आणि शेवटी दात हलू लागून पडतात. तसेच किडीमुळेही दात आतून पूर्णपणे पोकळ होतो किंवा त्याचे मूळ कुजते, तेव्हा तो दात काढावा लागतो किंवा आपोआप पडतो. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास हिरड्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो, तर ओस्ट्रोपोरोसिसमुळे हाडे कमकुवत होतात यामुळेही दात लवकर पडू शकतात. कधीकधी अपघातामुळे दाताला जबर धक्का बसतो आणि तो पडू शकतो. वय वाढल्यानुसार नैसर्गिकरित्या हिरड्यांची झीज होते. अशा अनेक कारणांनी दातांची पडझड होत राहते. पडलेल्या किंवा उपटून टाकलेल्या दाताच्या जागी नवा दात येत नाही. त्यामुळे उतारवयामध्ये पोचेपर्यंत "दंताजीचे ठाणे उठून" तोंडाचे बोळके होते. नैसर्गिक दात पुन्हा येत नसले तरी आता त्यांच्या जागी कृत्रिम दात लावायची सोय झाली आहे. त्यामुळे अन्न चावायलाही मदत होते आणि चेहेराही दंतहीन दिसत नाही.

निसर्गाने मानवाला दिलेल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी 'डोळा' हे सर्वात महत्त्वाचे आणि संवेदनशील इंद्रिय आहे. डोळ्यांमुळेच आपल्याला आजूबाजूचे जग दिसते, इकडेतिकडे काय आहे किंवा चालले आहे हे समजते आणि आपण या सृष्टीतील रंग, रूप आणि सौंदर्य यांचा आस्वाद घेऊ शकतो. डोळ्यातील बाहुली, भिंग आणि दृष्टिपटल (Retina) यांसारखे घटक मिळून आपल्याला पाहण्यास मदत करतात. डोळ्यांच्या भिंगामधून आत शिरलेल्या प्रकाशामुळे समोरील दृष्याची प्रतिमा  दृष्टिपटलावर तयार होते आणि मज्जातंतूंकडून ती माहिती मेंदूकडे जाते, त्यामुळे आपल्याला ती प्रतिमा 'दिसते'. भिंगांमध्ये असलेल्या नैसर्गिक लवचिकतेमुळे माणूस दूर किंवा जवळ असलेल्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकतो. काही लोकांना जवळचे स्पष्ट दिसते, पण लांबचे पुसट दिसते तर काही लोकांना लांबचे स्पष्ट दिसते, पण जवळचे वाचताना त्रास होतो. हे दृष्टिदोष योग्य त्या प्रकारचा चष्मा लावून सुधारले जातात. आजकाल डोळ्यातच फिट बसणारी काँटॅक्ट लेन्स लावायचीही सोय झाली आहे.

वयाच्या ४० नंतर डोळ्यातील भिंगांची लवचिकता कमी होते, त्यामुळे बहुतेक लोकांना जवळचे वाचण्यासाठी चष्मा लावावा लागतो. हा एक उतारवयातला सामान्य विकार आहे. वाढत्या वयानुसार डोळ्यातील नैसर्गिक भिंगातील प्रथिनांची (Proteins) रचना बदलू लागते. ही प्रथिने एकमेकांना चिकटतात आणि भिंगावर पांढरट थर तयार होतो, ज्यामुळे दृष्टी धूसर होते. याला मोतीबिंदू म्हणतात. रक्तातील साखरेचे प्रमाण किंवा रक्तदाब जास्त असल्यास डोळ्यातील भिंगावर त्याचा परिणाम होऊन मोतिबिंदू लवकर होऊ शकतो. तसेच आई-वडिलांना मोतिबिंदू झाला असेल, तर पुढील पिढीत तो होण्याची शक्यता असते. अतिप्रमाणात धूम्रपान केल्याने डोळ्यांतील पेशींचे नुकसान होते. सतत प्रखर सूर्यप्रकाशात राहिल्याने आणि डोळ्यांचे संरक्षण न केल्याने अतिनील प्रकाशकिरणांमुळे मोतिबिंदूचा धोका वाढतो. व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' युक्त आहाराच्या कमतरतेमुळे आणि  इतर आजारांसाठी दीर्घकाळ स्टिरॉइड्स युक्त औषधे किंवा ड्रॉप्स वापरल्यामुळे मोतिबिंदू होण्याची शक्यता वाढते. अशा काही कारणांमुळे अनेक वयस्कर लोकांना कधी ना कधी मोतिबिंदूचा त्रास सुरू होतो. 

मोतीबिंदूची वाढ ही अत्यंत सावकाश होत वर्षानुवर्षे चालणारी क्रिया आहे. सुरुवातीच्या काळात मोतिबिंदू जाणवतही नाही. मलाही त्याचा पत्ताच लागला नव्हता. पण मी एकदा एका कार्यक्रमाला गेलो असतांना माझ्या समोर बसलेला प्रेक्षक थोडा उंच असल्यामुळे त्याचे डोके थोडे आड येत होते. त्यामुळे मला स्टेजवरचे दृष्य दोन्ही डोळ्यांनी अर्धे अर्धे दिसत होते. त्यात फरक वाटल्यामुळे मला शंका आली आणि मी डॉक्टरकडे तपासणासाठी गेलो. जसजसा डोळ्यातला मोतीबिंदू वाढत जातो, तसे काही बदल दिसायला लागतात. उदाहरणार्थ पुसट दिसणे, समोरच्या हेडलाईटचा खूप त्रास होणे, प्रकाशाभोवती वलये (Halos) दिसणे, रंग गडद न दिसता फिके किंवा पिवळसर दिसू लागणे, एकाच डोळ्याने पाहताना वस्तूच्या दोन प्रतिमा दिसणे इ. मोतिबिंदूतला पांढरा थर जास्त वाढला तर तो भिंगावर दिसायलाही लागतो. पूर्वीच्या काळी मोतीबिंदू पूर्ण वाढ होऊन'पिकल्यावर' तो काढून टाकणे एवढाच उपाय होता, पण त्यातून पहिल्यासारखी दृष्टी मिळत नसे. पण आता फेको-इमल्सिफिकेशन या आधुनिक पद्धतीने  एका लहान छिद्राद्वारे अल्ट्रासोनिक लहरींचा वापर करून खराब झालेले नैसर्गिक भिंग काढले जाते आणि त्या जागी कृत्रिम भिंग (IOL) बसवले जाते. त्यानंतर जवळ जवळ पूर्ण दृष्टी प्राप्त होते. क्वचित काही लोकांना काचबिंदू (Glaucoma) नावाचा मोतिबिंदूपेक्षा वेगळा आणि अधिक गंभीर आजार होतो. यात डोळ्यांच्या नसांना (Optic Nerve) इजा होते. आपल्या डोळ्याच्या पुढच्या भागात 'ॲक्वियस ह्युमर' (Aqueous Humor) नावाचा एक पारदर्शक द्रव सतत तयार होत असतो. हा द्रव डोळ्यांना पोषण देतो, पण काही कारणाने तो डोळ्यात साचू लागतो. यामुळे डोळ्याच्या आतला दाब (Pressure) वाढतो. हा वाढलेला दाब डोळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या 'दृष्टी चेता' (Optic Nerve) वर दबाव टाकतो, या नसांमधील तंतू हळूहळू मरू लागतात. यामुळे दृष्टी कायमची जाऊ शकते. या व्याधीवर कायमचा इलाज नाही. तो आटोक्यात ठेवण्यासाठी काही उपाय आहेत, त्यांचा उपयोग केला जातो.

कान हे सुद्धा डोळ्यांसारखेच अत्यंत महत्वाचे संवेदनशील ज्ञानेंद्रिय आहे. कानांमधल्या श्रवणशक्तीमुळेच आपल्याला आजूबाजूचे आवाज ऐकायला येतात. सर्वात मुख्य म्हणजे ऐकणे आणि बोलणे यातून माणूस इतर माणसांबरोबर संवाद साधू शकतो आणि त्यांच्या आवाजातील भाव, अर्थ आणि संदेश समजतात. या संवादामधून त्याला ज्ञान मिळते, तसेच विचार समजतात. जगातल्या विविध भाषा आणि धर्म, पंथ वगैरे संवादांमधूनच तयार झाले आहेत. यामुळे संवादाला मानवी संस्कृतीचा पाया म्हणता येईल. आपण श्रवणशक्तीमुळे  संगीताचा आनंद घेऊ शकतो. ते आपल्या मनाला शांती आणि प्रसन्नता देते.

कानावर पडणाऱ्या आवाजाला मेंदूपर्यंत पोहोचवणे ही एक अतिशय वेगाने आणि गुंतागुंतीने घडणारी प्रक्रिया आहे. आपला बाह्यकर्ण बाहेरून आलेल्या ध्वनी लहरींना एकत्रित करून कानाच्या नळीतून  कानाच्या पडद्यांकडे पाठवतो. ध्वनी लहरी आदळल्यामुळे कानाचा पडदा कंपन पावतो. अंतर्कर्णामधील पेशी  या कंपनांचे रूपांतर विद्युत लहरींमध्ये करून  त्यांना एका 'श्रवण मज्जातंतू' द्वारे मेंदूकडे पाठवतात. तिथे मेंदू या लहरींचे विश्लेषण करतो आणि आपल्याला त्या आवाजाचा अर्थबोध होतो.

आपली अशी अद्भुत श्रवणशक्ती ही ईश्वराची एक महत्वाची देणगी आहे, पण वयोमानानुसार ती हळूहळू क्षीण व्हायला लागते. वयोमानानुसार श्रवणशक्ती कमी होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याला वैद्यकीय भाषेत 'प्रेसबायकुसिस' (Presbycusis) असे म्हणतात. साधारणपणे ६० वर्षांनंतर ही समस्या प्रकर्षाने जाणवू लागते. वयोमानानुसार अंतर्कर्णामधील  पेशी हळूहळू कमकुवत होतात किंवा नष्ट होतात. एकदा या पेशी नष्ट झाल्या की त्या पुन्हा तयार होत नाहीत, ज्यामुळे ऐकू येणे कमी होत जाते. कानाकडून मेंदूकडे जाणारी श्रवण मज्जातंतू देखील वयानुसार कमकुवत होऊ लागते. यामुळे आवाज ऐकू आला तरी शब्दांचा अर्थ स्पष्टपणे समजत नाही, विशेषतः जिथे खूप गोंधळ किंवा आवाज असेल तिथे बोलणे समजणे कठीण होते. वाढत्या वयात होणाऱ्या इतर विकारांमुळे कानाच्या नाजूक भागांना होणारा रक्ताचा पुरवठा कमी होतो. रक्ताभिसरण नीट न झाल्यामुळे श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो. अशा कारणांमुळे समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे स्पष्ट समजत नाही, टीव्ही किंवा रेडिओचा आवाज इतरांपेक्षा जास्त वाढवावा लागतो. आजकाल आधुनिक श्रवणयंत्रांमुळे उतारवयातही संवाद साधणे सोपे झाले आहे. काही वृद्ध त्यांचा उपयोग करतांना दिसतात.

पाठीचा कणा म्हणजे डोक्याच्या कवटीपासून ते कमरेच्या खालच्या भागापर्यंत ३३ लहान हाडांची एक लांब साखळी असते. या लहान हाडांना 'मणके' म्हणतात. हे मणके एकमेकांवर अशा प्रकारे रचलेले असतात आणि त्यांना आजूबाजूच्या स्नायूंनी असे बांधून ठेवलेले असते की ज्यामुळे आपल्याला वाकता, फिरता आणि हालचाल करता येते. पाठीच्या कण्याच्या मध्यभागी एक पोकळी असते, त्यातून मज्जारज्जू आरपार जातो. पाठीचा कणा या अत्यंत नाजूक मज्जारज्जूचे बाहेरील आघातांपासून संरक्षण करतो. हा कणा शरीराला आधार देऊन सरळ उभे राहण्यास मदत करतो. यासाठी तो मजबूत आणि ताठ असतो पण हालचाल करण्यासाठी आवश्यक तेवढा लवचिकपणाही त्यात असतो. त्यासाठी मणक्यांच्या मध्ये 'गादी' (Discs) सारखा मऊ भाग असतो, ज्यामुळे चालताना किंवा उडी मारताना शरीराला बसणारे धक्के शोषले जातात.

ताठ पाठीचा कणा हे केवळ शारीरिक रचनेचे लक्षण नसून, ते मानवी स्वभाव, नैतिकता आणि स्वाभिमानाचे एक अत्यंत प्रभावी प्रतीक मानले जाते. 'न वाकणारा कणा' म्हणजे अन्यायासमोर न झुकणे, संकटातही आपली तत्त्वे न सोडणे,  आत्मविश्वास आणि बाणेदारपणा. ज्याप्रमाणे पाठीचा कणा शरीराचा भार पेलतो, त्याचप्रमाणे स्वाभिमानाचा 'कणा' माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भार पेलतो.

पण वाढत्या वयानुसार हाडांमधील कॅल्शियम आणि खनिज पदार्थांचे प्रमाण कमी होते. यामुळे पाठीच्या कण्याचे मणके कमकुवत होतात. अनेकदा शरीराचे वजन पेलताना मणक्यांच्या पुढील भागावर जास्त दाब आल्याने ते थोडे दबतात, यामुळे पाठीला नैसर्गिकरित्या बाक येतो आणि व्यक्ती पुढे झुकते. दोन मणक्यांच्या मध्ये असलेली 'गादी' सरकल्यामुळे स्लिप डिस्कचा त्रास सुरू होतो किंवा तिची झीज झाल्यामुळे पाठीचा कणा आपली नैसर्गिक रचना गमावतो आणि त्याला बाक येऊ लागतो. पाठीला सरळ ठेवण्यासाठी पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत असणे आवश्यक असते. वयोमानाने हे स्नायू कमकुवत झाल्यामुळे शरीराचा वरचा भार पेलणे कठीण जाते आणि व्यक्ती झुकलेल्या अवस्थेत चालते.  चुकीची झोपण्याची, बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धतसुद्धा पाठीच्या कण्यावर ताण देते आणि त्याला बाक येऊ शकतो. अशा काही कारणांमुळे अनेक वयस्क लोक कंबरेत वाकून काठी टेकत चालतांना दिसतात. नाटकात किंवा व्यंगचित्रांमध्ये तर त्यांना हमखास तसे दाखवले जाते.  पण आजच्या काळात योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आधुनिक वैद्यकीय उपचार (कॅल्शियम सप्लिमेंट्स इ.) मुळे अनेक ज्येष्ठ नागरिक ८० व्या वर्षीही ताठ कण्याने चालताना दिसतात.

 

माणूस किंवा माणसाचे शरीर म्हणजे नुसता हाडामांसाचा गोळा असतो असे म्हंटले जाते कारण ते मुख्यतः एक हाडांचा सांगाडा आणि त्यावर ठिकठिकाणी बसलेले मांसांचे थर यातूनच बनलेले असते. त्या सर्वांवर त्वचेचे सुंदर आवरण लपेटलेले असते.  मूल जन्माला येतांना या तीन्हींना घेऊन येतो आणि वयाबरोबर त्यांची वाढ होत जाते. तारुण्यात आल्यावर ती वाढ थांबते, तरीही पुढे जन्मभर रोज कित्येक जुन्या पेशी झिजून नष्ट होत असतात आणि सुमारे तितक्याच आणि तशाच प्रकारच्या नव्या पेशी जन्माला येऊन त्यांची संख्या टिकून राहते. जुन्या पेशी आणि नव्या पेशी मिळून त्यांची कामे चालवत राहतात. त्यात कसलाही खंड पडत नाही ही एक अद्भुत गोष्ट आहे. 

पण उतारवयात या प्रक्रियेत हळूहळू किंचित बदल होत असतात. वयानुसार हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजांचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे हाडे पोकळ आणि ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. साध्या धक्क्यामुळेही शरीरातले एखादे हाड मोडू शकते.  सांध्यांमधील कूर्चा (Cartilage) झिजल्यामुळे सांधेदुखी आणि आखडपणा जाणवतो. पाठीच्या कण्यातील मणक्यांमधील अंतर कमी झाल्यामुळे व्यक्तीची उंची थोडी कमी झाल्यासारखी वाटते, त्यात बाक येतो. स्नायूंची ताकद आणि आकार कमी होतात. या प्रक्रियेला 'सार्कोपेनिया' (Sarcopenia) म्हणतात. स्नायूंचे तंतू कमी झाल्यामुळे अंगात पूर्वीसारखी ताकद राहत नाही आणि लवकर थकवा येतो. स्नायू आणि कंडरा (Tendons) कडक होतात, ज्यामुळे शरीराची हालचाल मंदावते. स्नायू कमकुवत झाल्यामुळे चालताना तोल जाण्याची शक्यता वाढते.  उतारवयात घसरून किंवा तोल जाऊन पडणे हे फार मोठ्या समस्यांना आमंत्रण देते. या विकाराचा मला जो अनुभव येत आहे त्याबद्दल खाली सविस्तर लिहिले आहे.

त्वचेवर वयोमानाचा परिणाम सर्वात आधी आणि स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळेच उतारवयातला माणूस लगेच ओळखून येतो. त्वचेतील 'कोलेजन' आणि 'इलास्टिन' या प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वचेचा ताण कमी होतो आणि सुरकुत्या पडतात. त्वचेखालील तेल ग्रंथी (Sebaceous glands) कमी सक्रिय होतात, ज्यामुळे त्वचा कोरडी आणि खडबडीत बनते. त्वचेचा थर पातळ होतो, ज्यामुळे लहानशा जखमेनेही रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा काळेनिळे डाग पडू शकतात. त्वचेवर ठिकठिकाणी काळे किंवा तपकिरी ठिपके (Age spots) दिसू लागतात. 

यातल्या कशावरच कायमचा खात्रीशीर इलाज नसतोच, पण योग्य आहार (कॅल्शियम आणि प्रथिनेयुक्त), नियमित हलका व्यायाम आणि पुरेशी झोप यांमुळे हे बदल पूर्णपणे थांबवता येत नसले तरी त्यांची गती नक्कीच कमी करता येते. ते प्रयत्न करून आपली उरलीसुरली क्षमता शक्य तितका काळ टिकवणे हाच एक उद्योग होऊन बसतो.  

पाठीच्या कण्याबद्दल लिहितांना मी मज्जारज्जूचा उल्लेख केला होता. त्याला बाह्य आघातापासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवाने किंवा निसर्गाने या पोकळ मणक्यांच्या साखळीची योजना केली आहे. मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्ड हा आपल्या मेंदूला शरीराच्या इतर भागांशी जोडणारा मुख्य 'माहिती महामार्ग' (Information Highway) मानला जातो. तो मेंदूपासून निघालेल्या संदेशांना हातापायांपर्यंत आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचवतो. तसेच, शरीराच्या विविध भागांकडून येणारे संवेदन (उदा. स्पर्श, वेदना, तापमान) मेंदूकडे पाठवण्याचे काम करतो. या संवादामुळेच आपण शरीराच्या हालचाली करू शकतो. आपल्या चालण्याच्या, धावण्याच्या किंवा उभे राहण्याच्या प्रक्रियेत मज्जारज्जूची भूमिका महत्त्वाची असते. तो स्नायूंच्या आकुंचन आणि प्रसरणावर नियंत्रण ठेवून शरीराचा तोल सांभाळण्यास मदत करतो. काही वेळा आपल्याला विचार न करता त्वरित कृती करावी लागते, जसे की गरम वस्तूला हात लागल्यावर तो तातडीने मागे घेणे. याला प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex Actions) म्हणतात. अशा वेळी संदेश मेंदूपर्यंत जाऊन निर्णय येईपर्यंत वाट न पाहता, मज्जारज्जू स्वतःच निर्णय घेतो आणि स्नायूंना आदेश देतो. थोडक्यात सांगायचे तर मज्जारज्जूशिवाय आपला मेंदू शरीराच्या कोणत्याही भागाला साधी हालचाल करण्याची सूचना देऊ शकणार नाही किंवा आपल्याला स्पर्शाची जाणीवही होणार नाही. मज्जारज्जूला होणारी इजा किंवा त्याच्याशी संबंधित विकार शरीराच्या हालचालींवर आणि संवेदनांवर गंभीर परिणाम करू शकतात.

गंभीर स्वरूपाच्या अपघातात पाठीचा कणा मज्जारज्जूचे संरक्षण करण्यात असमर्थ ठरला तर त्याचा मेंदूशी असलेला संपर्क तुटतो. यामुळे अपंगत्व येऊ शकते. स्पाँडिलोसिस (Spondylosis) हा उतारवयात होणारा एक आजार आहे. यात वयानुसार मणक्याच्या हाडांमध्ये आणि चकतीमध्ये (Disks) झीज होते. यामुळे मज्जारज्जूवर किंवा त्यातून निघणाऱ्या नसांवर दाब येतो, ज्यामुळे मान किंवा कंबर दुखते. माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थांना उजव्या हाताच्या बोटांच्या अचूक हालचाली करता येईनात.  ते डाव्या हातांनी लिहायला शिकले आणि काम करायला लागले. स्लिप डिस्क या आजारात मणक्याच्या दोन हाडांमधील मऊ चकती सरकते आणि मज्जारज्जूवर दाब निर्माण करते. यामुळे तीव्र वेदना, मुंग्या येणे किंवा स्नायूंमध्ये कमकुवतपणा जाणवतो. स्पाइनल स्टेनोसिस (Spinal Stenosis) या विकारात मणक्याची पोकळी अरुंद होते. यामुळे मज्जारज्जू आणि नसा दबल्या जातात.  मज्जारज्जूमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला गाठ (Tumor) तयार झाल्यामुळे मज्जारज्जूवर दाब येतो. अशा कुठल्याही कारणामुळे नाजुक मज्जारज्जूवर दाब येण्यामुळे त्रास होतो. हात किंवा पायांमध्ये बधिरता किंवा मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे किंवा चालताना तोल जाणे, तीव्र पाठदुखी किंवा मानदुखी, मल-मूत्र विसर्जनावर नियंत्रण सुटणे, अचानक शरीराचा एखादा भाग नीट हलवता न येणे अशासारखी लक्षणे दिसायला लागतात. त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

उतारवयात स्नायूंची ताकद आणि आकार कमी होतात. या प्रक्रियेला 'सार्कोपेनिया' (Sarcopenia) म्हणतात.  सार्कोपीनिया हे नाव ऐकल्यावर तो इथिओपियासारखा आफ्रिकेतला देश असावा असं वाटतं ना? पण तो दूर आफ्रिकेतला देश नाही तर तो इथे घरबसल्या आपल्या शरीरातच तयार होतो.  बाहेरचे कुठले कृमी, कीटक, रोगजंतू किंवा व्हायरस त्याला घेऊन येत नाहीत, तो शरीरात आपोआप तयार होतो. चोवीस तास घरात बसून राहणाऱ्या घरकोंबड्या लोकांना तर हमखास होतो. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्याची बाधा झालेली दिसते, पण त्यांना त्याचे नाव माहीत नसते, मलाही माहीत नव्हते.  आयुष्यभर दगदग, धडपड आणि धावपळ केल्यामुळे हातपाय दमतात आणि त्यामुळे त्यांना कंटाळा येणे, विश्रांती घ्यावी असे वाटणे हे नैसर्गिकच आहे असे समजले जाते. एरवी माणसाच्या शरीरातल्या स्नायूंना पुरेशी विश्रांती दिल्यानंतर ते ताजेतवाने होऊन पुन्हा जोमाने काम करायला तयार होतात, पण बहुतेक लोकांच्या उतार वयात ते तसे करेनासे होतात. त्यांची शक्ती हळूहळू कमी कमी होत जाते.  कधी एखाद्या आजारपणाचे निमित्य झाले तर तसे वेगानेही होते. हातापायांची कुठलीही हालचाल करतांना त्यातले काही स्नायू ताणले जातात आणि काही ढिले होत असतात. या क्रियेमुळेच ते अवयव हलत असतात. हे काम आपल्या नकळत चोवीस तास चाललेले असते. पण हा वेडा सार्कोपिनिया अंगात शिरला की या हालचालीच नकोशा वाटायला लागतात आणि त्या करायचे टाळले तर तो जास्तच बळावतो. 

मी गेली तीन चार दशके नियमितपणे रोज अर्धापाऊण तास चालायचा व्यायाम करतच आलो आहे. तीनचार वर्षांपूर्वी माझ्या घोट्याजवळची दोन हाडे मोडल्यामुळे त्यांचे ऑपरेशन केल्यानंतर हातात काठी आली. पाय दुरुस्त झाल्यानंतर मी काठी टेकत टेकत रोज फिरायला जातच होतो. पण हळूहळू माझी गति कमी होत गेली. आम्ही दहा पंधरा वयस्क लोक संध्याकाळी फिरून आल्यानंतर कट्ट्यावर बसून गप्पा मारतो. त्या संपल्यावर बाकीचे तुलनेने नववयस्क लोक उठून लगेच झपाझप चालायला लागतात. पण मला उठल्यावर दोन तीन सेकंद आपला तोल सांभाळून उभे राहून एक एक पाऊल टाकायला लागायचे. असे का होते हे मी आमच्या डॉक्टर मित्रांना विचारल्यावर ते म्हणाले, "विशेष काही नाही, सार्कोपिनिया असेल." तेंव्हा मी हा शब्द पहिल्यांदा ऐकला. त्यांनी त्यावर काही उपाय सांगितला नाही, फक्त प्रोटीन्स खा आणि हालचाल करत रहा एवढेच सांगितले. 

माझा चालायचा वेग कमी झाला आहे हे मी आमच्या हृदयरोगतज्ञालाही सांगितले. त्यांनी सगळ्या तपासण्या करून सांगितले की हृदय तर ठीक दिसते आहे. कदाचित सार्कोपीनिया असेल. त्यावर उपाय म्हणून त्यांनी फिजिओथेरपी घ्यायला सांगितले. फिजिओथेरेपिस्टने पंचवीस प्रकारचे व्यायाम सांगितले. त्यात झोपून, बसून आणि उभे राहून हातापायांचे एक एक सांधे वाकवायचे आणि पाच पाच सेकंद त्या अवस्थेत धरून ठेवायचे असतात. यालाच कदाचित रेझिस्टन्स ट्रेनिंग म्हणत असतील. ते रोज करून माझे काही स्नायू जरा बळकट झाले असावेत. निदान आपण काही तरी प्रयत्न करत आहोत याचे समाधान मिळते. 

इंटरनेटवर सार्कोपीनियावर बरीच माहिती उपलब्ध आहे. डेक्सास्कॅन नावाची तपासणी करून त्याचे निदान करता येते म्हणे, पण मी ते करायचा प्रयत्न केला नाही. कारण सार्कोपीनिया आहे असे कन्फर्म झाले तरी त्यावर काहीच इलाज नाही.  त्यापेक्षा तो असावा असे समजून जास्त प्रोटीन आणि एबीसीडीई जीवनसत्वे खात रहाणे आणि सतत हातापायाच्या हालचाली करत रहाणे मला ठीक वाटते.

"साठी बुद्धी नाठी" अशी एक मराठी म्हण आहे. हिंदीमध्येही "सठिया जाना" असा वाक्प्रचार आहे. एखादा वृद्ध माणूस काही अनपेक्षित गोष्टी करायला लागला तर त्याला म्हातारचळ लागले आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या सगळ्यांचा रोख उतारवयात होत असलेल्या मानसिक बदलांकडे असतो. वाढत्या वयात शरीरासोबतच मेंदूमध्येही काही नैसर्गिक बदल होत असतात.  ते काही वेळा विशिष्ट विकारांचे संकेत असू शकतात. उतारवयात प्रामुख्याने दिसणारे मेंदूचे विकार खालीलप्रमाणे आहेत:

१. स्मृतिभ्रंश (Dementia) : यामध्ये काही गोष्टी आयत्या वेळी न आठवल्यामुळे विचार करण्याची, लक्षात ठेवण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. तशी ती सर्वच लोकांमध्ये हळूहळू कमी होत असते. नुकत्याच घडलेल्या गोष्टी विसरणे, परिचित पत्ता किंवा रस्ता न सापडणे, बोलतांना योग्य शब्द न सुचणे, समोरच्या व्यक्तीचे नाव न आठवणे, साध्या हिशोबात चुका होणे आणि या सगळ्यांमुळे स्वभावात अचानक चिडचिडेपणा किंवा बदल होणे असे अनुभव जवळजवळ सगळ्याच वयस्कर लोकांना अधून मधून येत असतात. पण त्यामुळे दैनंदिन जीवनात विशेष बाधा येत नसेल  तर ते चालून जाते. सामान्य विसरभोळेपणा आणि गंभीर मेंदूचा विकार (विशेषतः डिमेंशिया किंवा अल्झायमर) यातील फरक ओळखणे सुरुवातीला कठीण वाटू शकते. पण  विसरण्याचे स्वरूप आणि त्याचा दैनंदिन कामावर होणारा परिणाम यावरून ते समजते. सामान्य माणसाला विसरलेली गोष्ट, शब्द किंवा नाव काही वेळानंतर आपोआप आठवते, पण स्मृतिभ्रंशामध्ये ती पूर्णपणे पुसली गेलेली असते. अल्झायमर (Alzheimer's Disease) या आजारात व्यक्ती हळूहळू जुन्या गोष्टी पार विसरू लागते आणि तिला दैनंदिन कामे करणे कठीण होते. समजा, त्यांनी नुकतेच जेवण केले असेल, तर त्यांना आपण जेवलो आहोत हेच आठवत नाही आणि ते पुन्हा जेवण मागतात किंवा एकच प्रश्न पाच दहा मिनिटाने पुन्हा पुन्हा विचारतात. अशी व्यक्ती स्वतः तर स्वतःला सांभाळू शकत नाहीच, पण तिला सांभाळणाऱ्या व्यक्तीलाही ते फार कठीण जाते. हातपाय धडधाकट असल्यामुळे ते लोक हिंडूफिरू शकतात, पण कधी कधी बाहेर गेल्यावर परत घरी यायचा रस्ता विसरतात आणि आपला पत्ता कुणाला नीट सांगूही शकत नाहीत.  माझ्या ओळखीचे एक गृहस्थ एकदा आमच्याबरोबर बाहेर एका ठिकाणी आले होते. कारमधून परत येतांना आम्ही त्यांना ते कुठल्या बिल्डिंगमध्ये राहतात असे विचारले आणि त्यांनी सांगितलेल्या बिल्डिंगपाशी सोडले. पण ते आत न जाता उलट दिशेने चालायला लागले. मग आम्ही जास्त चौकशी करून ते त्यांच्याच घरी जातील अशी व्यवस्था केली. काही लोकांना मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा छोट्या स्ट्रोकमुळे  व्हॅस्क्युलर डिमेंशिया हा आजार होतो.

२. पार्किन्सन (Parkinson's Disease) हा हालचालींशी संबंधित विकार आहे. यात हात-पाय थरथरणे (Tremors), शरीराचा ताठरपणा आणि हालचालींचा वेग अतिशय मंदावणे, चालताना तोल जाणे अशी मुख्य लक्षणे दिसतात. मेंदूमध्ये 'डोपामाइन' (Dopamine) नावाच्या रसायनाची कमतरता झाल्यामुळे हा विकार होतो. हातापायांच्या हालचाली करण्यासाठी किंवा शरीराचा तोल राखण्यासाठी स्नायूंना जे आदेश मेंदूकडून दिले जात असतात, त्यांची नीट अंमलबजावणी या विकारात होत नाही आणि त्या हालचाली अनियंत्रित रीतीने होतात.

३. मेंदूचा झटका (Stroke) : जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा थांबतो किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटते, तेव्हा स्ट्रोक येतो. यामुळे अर्धांगवायू (Paralysis), बोलण्यात अडथळा किंवा दृष्टीदोष होऊ शकतो. हा फार गंभीर प्रकार आहे.

४. नैराश्य आणि चिंता (Depression & Anxiety): उतारवयात एकटेपणा, शारीरिक व्याधी किंवा निवृत्तीनंतरच्या बदलांमुळे मानसिक आरोग्य बिघडू शकते. अनेकदा नैराश्याची लक्षणे स्मृतिभ्रंशासारखी वाटू शकतात, ज्याला 'स्युडो-डिमेंशिया' म्हणतात. नैराश्यामुळे माणूस मानसिक दृष्ट्‍या खचून जातो. 

हे विकार होऊ नयेत यासाठी माणसाने उतारवयातही वाचन, लिखाण, शब्दकोडी सोडवणे किंवा नवीन कौशल्य शिकणे यासारखे बौद्धिक व्यायाम सुरू ठेवावेत, नियमित चालणे फिरणे, प्राणायाम आणि योगासने करावीत, संतुलित आहार घ्यावा आणि मित्र आणि नातेवाईकांशी संवाद कायम ठेवावा.

देवाच्या कृपेने मी आता 'अवघे पाउणशे वयमान' पार करून ऐंशीचा टप्पा गाठला आहे. शारदा नाटकातल्या "म्हातारा अवघा"शी तुलना केली तर माझ्याही बहुतेक दंताजींनी आपले ठाणे उठवले आहे, त्यातले फक्त चार शिलेदार आपले ठाणे अजूनही लढवत राहिले आहेत, पण कृत्रिम दातांनी तोंडावर ताबा मिळवला असल्यामुळे मी नेहमीचे अन्न चावून खाऊ शकतो. दोन्ही कान अजून तरी निदान पन्नास टक्के ध्वनि मेंदूपर्यंत पोचवतात, गाणे ऐकून ते रफीने गायले आहे की मुकेशने हे मला बरोबर समजते.  डोळ्यामधली ओरिजिनल भिंगे रुसून बसली होती, पण डॉक्टरांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी कृत्रिम भिंगे लावून दिली असल्यामुळे मी सगळे पाहू शकतो आणि वाचू शकतो,  मान अजून तरी नन्ना करत नाही. तुरळक कोठें केस रुपेरी, डोइस टक्कल छान । हे मात्र शंभर टक्के झाले आहे.  हातात काठी आली असली तरी वयाचा भार वाहून कंबर कमान झालेली नाही आणि अंगातल्या अवसानाबद्दल तर विचारूच नका. आपण काय काय गमावले याचा विचार न करता जे काय शिल्लक राहिले आहे ते जमेल तितका काळ जपायची धडपड मी सुरू ठेवली आहे.


No comments: