Tuesday, January 20, 2026

भारतीय अवकाश संशोधनाचा इतिहास आणि यशोगाथा

आज अवकाशसंशोधनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांमध्ये भारताचे नाव घेतले जाते, पण सुरुवातीपासून आजवर केल्या गेलेल्या कामगिरीचा याचा इतिहास मनोरंजक तसाच चित्तथरारक आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर प्रगत देशांमध्ये अणुशक्ती आणि अवकाश यावर जोराने संशोधन सुरू झाले होते. डॉ.होमी भाभा आणि डॉ.विक्रम साराभाई या द्रष्ट्‍या शास्त्रज्ञांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वतंत्र भारतानेही या विषयांवरील संशोधन सुरू केले. इ.स.१९४८ साली  डॉ.भाभा यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची (Atomic Energy Commission) स्थापना करण्यात आली आणि त्याच काळात डॉ.साराभाई यांनी अहमदाबाद इथे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL)स्थापन करून तिथे अध्यापन आणि संशोधन सुरू केले. त्यांनी अणुशक्ती विभागाच्या सहकार्याने १९५४मध्ये काश्मीरातील गुलमर्ग इथे हाय आल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी स्थापन केली. १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या देशापुढे अनेक आव्हाने होती. इतर अनेक क्षेत्रांना निधी वाटपासाठी प्राथमिकता देणे आवश्यक होते. शासनापुढे देशातील लोकांचे अनेक ज्वलंत प्रश्न असतांना  अवकाशाच्या संशोधनावर करायचा खर्च अनाठायी समजला जाणे शक्य होते. त्याला मंजूरी मिळणे अवघड होते. पण देशाच्या विकासासाठी अंतराळ संशोधनाचा उपयोग होऊ शकतो हे सरकारला पटवून देण्यात शास्त्रज्ञांना यश आले आणि १९६२ मध्ये डॉ.भाभा यांच्या अणुशक्ती विभागाखालीच भारतीय राष्ट्रीय अंतरिक्ष अनुसंधान समिति (Indian National Committee for Space Research) (INCOSPAR) स्थापन करण्यात आली. या समितीचे नेतृत्व डॉ.विक्रम साराभाई यांनी केले. 

सुरुवातीला वातावरणामधील उच्च थरांचा अभ्यास करण्यासाठी लहान ‘साऊंडिंग’ रॉकेट उडवण्याचे प्रयोग करायचे ठरवले. त्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर वसलेले केरळ मधले थुंबा हे लहानसे खेडे गाव निवडले. पण तिथे प्रयोगशाळेसाठी नवी इमारत बांधण्यासाठी बराच खर्च आला असता आणि वेळ लागला असता. तो वाचवण्यासाठी थुंबा इथल्या मेरी मॅग्डनेल या चारशे वर्षे जुन्या चर्च मध्ये “थुंबा इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन" (TERLS)चे पहिले ऑफिस थाटण्यात आले.  त्यासाठी तरुण शास्त्रज्ञ डॉ.अब्दुल कलाम यांच्यासह स्वतः डॉ.विक्रम साराभाई तिथल्या बिशपला जाऊन भेटले आणि त्यांनी रविवारच्या प्रार्थनासभेमध्ये जमलेल्या सर्व समुदायासमोर हा प्रस्ताव मांडून विज्ञानाचा उद्देशसुद्धा मानवतेचे उत्थान हाच आहे असे सांगून त्या चांगल्या कामासाठी चर्चचा उपयोग करण्यासाठी लोकांची अनुमति मागितली आणि त्यांना ती सहजपणे मिळाली. 

आकृति अवकाश संशोधन १ पहा :  समुद्रकिनाऱ्यावरील रॉकेट लाँच करायचे ठिकाण चर्च पासून किलोमीटरभर अंतरावर होते. रॉकेटचे सुटे भाग सायकलवरून आणून तिथल्या शाळेत किंवा समुद्रकिनाऱ्यावर रॉकेटची जुळवणी करावी लागली. अशा खडतर परिस्थितीवर मात करून २१ नोव्हेम्बर १९६३ रोजी भारताच्या भूमीवरून पहिले रॉकेट लाँच केले गेले आणि अंतराळ संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हे पहिले रॉकेट अमेरिकेत बनवले गेले होते. त्यानंतर थुंबा इथूनच फ्रान्स आणि यूएसएसआरमधून आणलेली अनेक रॉकेट्स लाँच करण्यात आली. १९६५ मध्ये डॉ.साराभाईंनी अंतराळ कार्यक्रमाचे नियोजन आणि विस्तार करण्यासाठी   तिरुअनंतपुरम इथे अंतराळ संशोधन केंद्र स्थापन केले. त्यांच्या निधनानंतर या केंद्राला विक्रम साराभाई स्पेस सेंटर(VSSC) असे त्यांचेच नाव दिले गेले. १९६७ मध्ये भारतात तयार केलेले रोहिणी हे पहिले रॉकेट थुंबाहून उडवण्यात आले. १९६८ मध्ये भारताने थुंबाचे केंद्र संयुक्त राष्ट्रांना अर्पण केले. तिथे आता पाच लाँच पॅड्स असून जगभरातले अनेक देश तिथून आपली रॉकेट्स उडवतात.

१९६६मध्ये डॉ.होमी भाभा यांच्या अपघातात झालेल्या आकस्मिक निधनानंतर डॉ.विक्रम साराभाई यांची अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अणुशक्ती आणि अवकाश या दोन्ही क्षेत्रांच्या संबंधातील सर्व संशोधन आणि प्रकल्प त्यांच्या अखत्यारीमध्ये होते. त्यांनी सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्स्पेरिमेंट (SITE साइट) या आंतरराष्ट्रीय प्रयोगासाठी नासाबरोबर वाटाघाटी सुरू करून १९६९ मध्ये त्यासाठी करार केला. 

अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी अणुऊर्जा विभागामधील भारतीय अंतराळ संशोधन समिती(INCOSPAR)चे आधुनिकीकरण करून १५ ऑगस्ट १९६९ ला तिचे नामकरण ‘भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन’ (Indian Space Research Organization) म्हणजेच ‘इस्रो’ असे करण्यात आले. १९७१ मध्ये डॉ विक्रम साराभाई यांच्या आकस्मिक दुर्दैवी निधनाने भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. पण त्यानंतर प्रो.सतीश धवन, प्रो.यू.आर राव, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि इतर शास्त्रज्ञांनी अवकाशसंशोधनाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आणि प्रगतीची उच्च शिखरे गाठली. (आकृति अवकाश संशोधन २)

भारतात अनेक ठिकाणी अणुविद्युतगृहांचे प्रकल्प सुरू झाले होते आणि अणु ऊर्जा विभागाचा पसारा वाढत होता, तसेच अवकाश संशोधनातही नवनवी क्षेत्रे उदयाला येत होती याचा विचार करून १९७२ मध्ये भारत सरकारने अणु ऊर्जा विभागाचे विभाजन केले आणि एका वेगळ्या अंतरिक्ष आयोगाची (Space Commission) स्थापना केली. १ जून १९७२ पासून इस्रोला डिपार्टमेंट ऑफ स्पेस (DoS)च्या व्यवस्थापनाखाली आणले.  इस्रोने सुरुवातीपासूनच उपग्रह उडवण्यासाठी लागणारी रॉकेट्स आणि उपग्रहांचे विविध उपयोग यावर लक्ष केंद्रित करून त्याविषयीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भारतात विकसित करायला सुरुवात केली होती. पण या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याची वाट न पाहता आधी त्या वेळी जगात जे तंत्रज्ञान उपलब्ध होते त्याचा होईल तितका उपयोग करून घ्यावा असे धोरण ठरवले.

डॉ.साराभाई यांनी सुरू केलेल्या साइट प्रकल्पासाठी १९७४मध्ये  नासाने ATS-6 हा उपग्रह तयार करून अवकाशातल्या जिओस्टेशनरी ऑर्बिंटमध्ये नेऊन ठेवला, आकाशवाणी व दूरचित्रवाणीने कृषिदर्शनसारखे खास कार्यक्रम तयार करून घेतले, या उपग्रहामधून येणारे संदेश ग्रहण करण्याची व्यवस्था देशभरामधील अनेक ठिकाणी  केली. अशी सगळी तयारी करून झाल्यावर नासा, इस्रो आणि आकाशवाणी यांच्या संयुक्त प्रयत्नामधून १९७५-७६मध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला, देशभरातील सहा राज्यांमधल्या २४०० खेड्यांमधील दोन लाख प्रेक्षकांना दूरचित्रवाणी दाखवण्यात आली  आणि  प्राथमिक शाळांमधील पन्नास हजार शिक्षकांना विज्ञानाचे पाठ दिले. हा १९७५-७६ मधला जगातला सर्वात मोठा सामाजिक प्रयोग होता. अशा रीतीने देशाच्या विकासासाठी, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांच्या शिक्षणासाठी उपग्रहांचा कसा उपयोग होऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवले गेले. 

या यशानंतर १९७७ ते १९७९ मध्ये सिंफनी या फ्रेंचजर्मन उपग्रहाचा उपयोग करून उपग्रह दूरसंचार प्रयोग Satellite Telecommunication Experiments Project (STEP) हा प्रकल्प राबवण्यात आला. भूस्थिर (जिओसिंक्रोनस) उपग्रह आणि जमीनीवरील केंद्रे यांच्या संयोगातून देशभरामधील परस्पर संपर्क कसा साधायचा यावर संशोधन करून देशभरात अशी केंद्रे स्थापन करण्यात आली. त्यांची रचना, निर्मिती व स्थापना करून ती चालवण्याचे सगळे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात आले. या प्रयोगांमधून अशा प्रकारच्या उपग्रहांची आणि त्यांच्याबरोबर संपर्क ठेवण्याच्या तंत्रज्ञानाची समग्र माहिती भारताला मिळाली. 

अवकाशविज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा सर्वांगीण विकास करून त्याचा देशामधील जनतेच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी उपयोग करणे तसेच अवकाशातील ग्रहगोलांचे संशोधन करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून इस्रो हे संगठन काम करत राहिले आहे. त्यात अग्निबाण (रॉकेट्स), उपग्रह आणि अंतराळयाने यांची रचना आणि उत्पादन करून त्यांना अवकाशात उडवणे, त्यांच्याशी संपर्क साधणारी जमीनीवरील केंद्रे उभारणे आणि त्यांचा उपयोग करून घेणे हे सगळे काम येते. 

अग्निबाण (रॉकेट्स)  (आकृति अवकाश संशोधन ३)

सुरुवातीची साउंड रॉकेट्स परदेशांमधून आणून थुंबा इथून उडवली जात होती. १९६५ नंतर तशा प्रकारची रॉकेट्स भारतातच तयार केली गेली. त्यांचे आकारमान आणि क्षमता यात वाढ होत गेली. त्यांचे प्रक्षेपण करण्यासाठी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा इथे आणखी एक नवे लाँचिंग स्टेशन उभे केले गेले. १९७५ पासून साउंड रॉकेट्सचे काम रोहिणी साउंड रॉकेट (RSR) या प्रोग्रॅमखाली केले जात आहे. ही सर्व रॉकेट्स घनरूप इंधनावर उडतात. त्यात एक किंवा दोन स्टेजेस असतात. आतापर्यंत निरनिराळ्या प्रयोगांसाठी अशी हजारो रॉकेट्स तयार करून उडवली गेली आहेत. या भक्कम पायावर पुढील प्रगत रॉकेट्सचे तंत्रज्ञान विकसित केले गेले. 

भारतात तयार केलेल्या उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत दाखल करण्यासाठी आवश्यक असलेले स्वतःचे प्रक्षेपक म्हणजेच रॉकेट सज्ज नसल्यामुळे आधी त्यासाठी इतर प्रगत देशांच्या मदतीवर विसंबून राहावे लागत होते. हे परावलंबन कमी करत स्वदेशी रॉकेट तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इस्रोने सॅटेलाईत लॉन्च व्हेईकल प्रकल्प हातात घेतला. त्या प्रकल्पासाठी देशामध्येच एसएलव्ही -३ (Sattelite Launch Vehicle -3) या प्रकारची रॉकेट्स विकसित केली. या रॉकेटच्या प्रक्षेपणासाठी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा इथे अधिक सुसज्ज आणि अत्याधुनिक उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले. १९७९ मध्ये पहिल्या रॉकेटची प्रायोगिक चाचणी घेतली गेली, त्यात आंशिक यश मिळाले. त्या अनुभवावरून काही सुधारणा करून तयार केलेले  एस.एल.व्ही -३  हे पहिले भारतीय रॉकेट १८ जुलै १९८० मध्ये डॉ कलामांच्या नेतृत्वाखाली अंतराळात झेपावले आणि त्याने रोहिणी हा उपग्रह अवकाशात नेऊन सोडला. हे काम यशस्वीरीत्या करणारा भारत हा जगातला सहावा देश ठरला. हे रॉकेट २२ मीटर उंच, १७ टन वजनाचे होते आणि ते ४० किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहाला लो अर्थ ऑर्बिटमध्ये घेऊन जाण्यात सक्षम होते. त्यानंतर भारताने अनेक एसएलव्ही -३ रॉकेट्स उडवून निरनिराळ्या उपग्रहांना अंतराळात नेले. या रॉकेटमध्ये  घनरूप इंधनाची चार स्टेजेस असतात.

एसएलव्ही -३ मध्ये मिळवलेल्या यशानंतर घनरूप इंधनाच्या पाच स्टेजेस असलेली एएसएलव्ही (Augmented Satellite Launch Vehicle) रॉकेट्स तयार करण्यात आली. ती २४ मीटर उंच, ४०टन वजनाची होती आणि त्यांची क्षमता एसएलव्हीच्या तिपटीहून जास्त म्हणजे १५० किलोग्रॅम वजन पृथ्वीपासून ४०० किलोमीटर दूर लो अर्थ ऑर्बिटमध्ये घेऊन जाण्याएवढी होती. त्याचे पहिले प्रायोगिक उड्डाण १९८७मध्ये आणि दुसरे १९८८मध्ये केल्यावर १९९२ आणि १९९४मध्ये या रॉकेटचा उपयोग करून दोन उपग्रह यशस्वीरीत्या उडवण्यात आले. 

पीएसएलव्ही (Polar Satellite Launch Vehicle (PSLV) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन ) हे तिसऱ्या पिढीमधले रॉकेट १९९४मध्ये पहिल्यांदा यशस्वीपणे उडवण्यात आले. यातले मुख्य रॉकेट ४४ मीटर उंच आणि २.८ मीटर व्यासाचे असून त्याचे वजन ३२०टन इतके असते. त्याच्या चार स्टेजेस असतात, त्यातल्या दोन घनरूप इंधनाच्या आणि दोन द्रवरूप इंधनाच्या असतात. शिवाय गरजेप्रमाणे त्यात थोडे बदल करून त्याला घनरूप इंधनाचे दोन किंवा चार किंवा सहा बूस्टर रॉकेट्स (Strap-on Motors) जोडता येतात. गेली तीस वर्षे ही रॉकेट्स इस्रोचे मुख्य प्रक्षेपक आहेत. यात थोडे बदल करून त्याच्याकडून निरनिराळी कामे करून घेता येतात. या रॉकेट्सबरोबर भारतासह इतर अनेक देशांचे उपग्रह अंतराळात सोडण्यात आले आहेत. एकाच उड्डाणात निरनिराळ्या कक्षांमध्ये उपग्रह नेऊन सोडण्याचे कामही हे रॉकेट करू शकते. एकदा तर या रॉकेटच्या सहाय्याने एकदम शंभर उपग्रह उडवण्यात आले होते. ते सगळे आपापल्या कक्षांमध्ये फिरत आहेत. चंद्रयान आणि मंगलयान यासारखी मोठी वैशिष्ट्यपूर्ण कामेसुद्धा पीएसएलव्हीकडूनच करून घेतली आहेत. अत्यंत विश्वसनीय, बहुगुणी (व्हर्सटाइल) आणि किफायतशीर असे प्रक्षेपक (लाँचर) म्हणून या रॉकेटने  जागतिक बाजारपेठेत प्रसिद्धी मिळवली आहे आणि उपग्रह उडवणारा एक प्रमुख देश म्हणून भारताची गणना होत आहे. 

पीएसएलव्ही नंतर इसरोने जीएसएलव्ही (Geosynchronous Satellite Launch Vehicle  भू-तुल्यकाली उपग्रह प्रमोचन रॉकेट ) हे त्याहून अधिक शक्तिशाली रॉकेट तयार केले. हे रॉकेट सुमारे ५२ मीटर उंच असून त्याचे वजन ४२० टन इतके असते आणि हे रॉकेट भूस्थिर कक्षेमध्ये २२२० किलोग्रॅम आणि लो अर्थ ऑर्बिटमध्ये ६००० किलोग्रॅम इतके वजन नेऊ शकते.  यात तीन स्टेजेस असून त्या अनुक्रमे घनरूप, द्रवरूप आणि क्रायोजेनिक इंधनांच्या असतात आणि त्याला चार द्रवरूप इंधनाची स्ट्रॅप ऑन रॉकेट्स जोडलेली असतात. रशीयाकडून आणलेल्या क्रायोजिनिक इंजिनाच्या सहाय्याने या रॉकेटचे पहिले उड्डाण २००१ साली झाले. त्यानंतर त्याने भारतातच तयार केलेल्या क्रायोजिनिक इंजिनासह २०१४मध्ये पहिले यशस्वी उड्डाण केले.

याहीपेक्षा अधिक शक्तिशाली असे LVM -3 हे नवे रॉकेट भूस्थिर कक्षेमध्ये ४००० किलोग्रॅम आणि लो अर्थ ऑर्बिटमध्ये १००००किलोग्रॅम इतके वजन असलेल्या उपग्रहांना प्रक्षेपित करू शकेल. गगनयान कार्यक्रमात मानवाला घेऊन जाण्यासाठी या रॉकेटचे  HLRV हे रूप तयार केले जात आहे. लहान उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी  SSLV हे एक नवे रॉकेट तयार केले जात आहे.

उपग्रह (आकृति अवकाश संशोधन -४)

स्वदेशी उपग्रह निर्मितीचे डॉ साराभाईंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ.सतीश धवन यांनी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांनी बंगळूर इथे इंडो सोव्हिएत सॅटेलाईट प्रोजेक्ट (ISSP) प्रकल्प  सुरू करून उपग्रह निर्मितीचा पाया घातला. डॉ.यु आर राव यांच्या नेतृत्वाखाली बंगळूर इथल्या पिनया भागात साध्या कामचलाऊ शेड मध्ये स्वदेशी उपग्रह निर्मितीचे काम सुरू झाले. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नातून १९ एप्रिल १९७५ला आर्यभट्ट हा भारताने तयार केलेला पहिला स्वदेशी उपग्रह सोव्हिएत युनियनमधील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून 'कॉसमॉस-3एम' रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. प्राचीन काळातील महान भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आले. आर्यभट्ट उपग्रह मुख्यत्वे खगोलशास्त्र आणि क्ष-किरण भौतिकशास्त्र (X-ray astronomy) यांसारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन करण्यासाठी बनवला गेला होता. या उपग्रहाचा व्यास सुमारे 1.4 मीटर होता. उपग्रहाच्या बाजूला सौर पॅनेल (solar panels) बसवण्यात आले होते, त्यामधून उपग्रहाला ऊर्जा मिळत होती. हा उपग्रह सुमारे 17 वर्षे अवकाशात होता, आणि 10 फेब्रुवारी 1992 रोजी तो पृथ्वीच्या वातावरणात परतला. आर्यभट्ट उपग्रह भारताच्या अवकाश कार्यक्रमातील एक महत्त्वाचे पाऊल ठरला. 

आर्यभट्टच्या यशानंतर दुसरे प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ भास्कराचार्य यांच्या नावाने दोन प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह (experimental remote sensing satellites) तयार करण्यात आले.  भास्कर-१ हा भारताचा पहिला प्रायोगिक रिमोट सेन्सिंग उपग्रह ७ जून १९७९ रोजी प्रक्षेपित केला. या उपग्रहामध्ये ऑनबोर्ड टीव्ही कॅमेरा आणि मायक्रोवेव्ह रेडिओमीटर (SAMIR) होते. त्याच्या योगे समुद्रशास्त्र आणि जलविज्ञानासाठी डेटा गोळा केला. भास्कर-२ हा उपग्रह २० नोव्हेंबर १९८१ रोजी प्रक्षेपित केला. भास्कर-१ प्रमाणेच, हा देखील एक प्रायोगिक रिमोट सेन्सिंग उपग्रह होता. या दोन उपग्रहांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. त्यांच्या द्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करण्यासाठी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास सुरुवात झाली. समुद्रशास्त्र (oceanography) आणि जलविज्ञान (hydrology) या क्षेत्रांमध्ये संशोधनासाठी उपयुक्त डेटा उपलब्ध झाला. या उपग्रहाने भारताच्या भूभागाच्या ३०० हून अधिक दूरचित्रफिती (television images) पाठवल्या. या उपग्रहाद्वारे मिळालेला डेटा 1991 पर्यंत गोळा करण्यात आला. हे उपग्रह परदेशांमधून उडवले गेले होते. पण या दरम्यान १९८० मध्ये रोहिणी हा उपग्रह भारतामधूनच प्रक्षेपित करण्यात आला.

मिळालेल्या अनुभवामधून भारतीय शास्त्रज्ञानी उपग्रहांच्या संदेशवहनाचे तंत्र आत्मसात केले आणि स्वदेशी उपग्रह कार्यक्रम, ‘इन्सॅट’ च्या निर्मितीला चालना मिळाली. उपग्रह प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी इस्रो सॅटेलाईट सेंटर स्थापन झाले. १९८०च्या दशकात भारताने भारतीय राष्ट्रीय उपग्रह- इन्सॅट ही भूस्थिर उपग्रहांची मालिका विकसित केली. १० एप्रिल १९८२ रोजी इन्सॅट - १ ए या उपग्रहाचे प्रक्षेपण केले पण त्याने अपेक्षेइतके काम न केल्यामुळे त्याला सहा महिन्यांनंतर निवृत्त केले. त्यानंतर ३० ऑगस्ट १९८३ ला प्रक्षेपित केलेल्या इन्सॅट१ बी या उपग्रहाने १९९३पर्यंत चांगली सेवा दिली. इन्सॅट मालिकेत २४ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले, त्यातले ११ आजही कार्यरत आहेत. या प्रणालीने भारताच्या दूरसंचार, आकाशवाणी , दूरदर्शन प्रसार , हवामानशास्त्र इत्यादी क्षेत्रात क्रांती आणली. इन्सॅट ही आशिया -पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठी देशांतर्गत दूरसंचार प्रणाली ठरली. इन्सॅटनंतर जीसॅट या मालिकेमध्ये वीस अधिक आधुनिक भूस्थिर (Geosynchronous Satellite) उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले.  भारताने आतापर्यंत सुमारे १६० उपग्रह तयार करून प्रक्षेपित केले आहेत, त्यातले फक्त ३७ युरोप व अमेरिकेमधून उडवले गेले आहेत, बाकीचे सगळे उपग्रह आपल्याच देशामधील प्रक्षेपण केंद्रावरून आपल्याच रॉकेट्सने उडवले आहेत.



आता भारतात सर्व प्रकारचे उपग्रह तयार केले जातात. (आकृति अवकाश संशोधन -५) संचार उपग्रहांमधून  इंटरनेट आणि टेलिफोन यासारख्या सेवा दिल्या जातात. भूप्रेक्षण उपग्रहांमधून जमीन आणि समुद्र यांचे निरीक्षण व सर्वेक्षण केले जाते, वैज्ञानिक आणि परीक्षणात्मक उपग्रह यांचेमधून विविध प्रयोग करून वातावरण व अवकाशाचे संशोधन केले जाते, नौवहन उपग्रहांमधून नेव्हिगेशनला मदत मिळते, लघु उपग्रहांचे विविध उपयोग असतात आणि महाविद्यालये व विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडून विद्यार्थी उपग्रह तयार करवून घेऊन त्यांचे प्रक्षेपण केले जाते.

या लेखामधील बहुतेक माहिती आणि चित्रे इस्रोच्या वेबसाइटमधून घेतली आहेत. 




No comments: