Sunday, April 13, 2025

सत्य, असत्य, आभास आणि कल्पना

 सत्य, असत्य, आभास आणि कल्पना


आपल्या जीवनात रोजच आपण जे काही पहातो, वाचतो किंवा ऐकतो त्याबद्दल काही वेळा आपल्या मनात शंका उठतात. हे खरोखरच असे असेल का असा विचार पडतो, कारण कधीकधी तो आपला भ्रम असतो किंवा दुसऱ्या कुणीतरी मुद्दाम थाप मारलेली असते किंवा कदाचित त्याचाच गैरसमज झालेला असू शकतो. औषधाच्या कडू गोळीवर एक गोड थर दिलेला असतो अशा वेळी ती आपल्या नकळत केलेली फसवणूक चांगल्या हेतूनेही केलेली असते.  कोणती गोष्ट खरी समजावी आणि तिच्यावर विश्वास ठेवावा की तो एक आभास आहे असे समजावे असा प्रश्न काही वेळा मनात येतो.  कधीकधी 'त' वरून ताकभात ओळखण्याच्या नादात मनात उठलेली एक निव्वळ कल्पना असू शकते. मनोरंजनाचे सगळे विश्वच कल्पनारंजनातून उभे राहिलेले असते. नाटक, सिनेमात जे दाखवले जात असते ते काल्पनिक आहे हे माहीत असले तरी ते पहातांना आपण सुखावतो. प्रत्येक बाबतीतले सत्य काय आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे का असा विचार करून आपण नेहमीच खोलात जातही नाही. पण तत्वज्ञान आणि विज्ञान यांच्या मार्गावर जाणाऱ्या विद्वानांनी सत्य शोधण्याचे चिकाटीने प्रयत्न केले आणि ते अजूनही करत आहेत यामुळे आतापर्यंत प्रगति होत गेली आणि अजून होत आहे. या विषयाच्या अशा अनेक पैलूंचा विचार करून ते दाखवण्यासाठी मी फेसबुकावर एक स्फुट लेखांची मालिका लिहिली होती ती या पानावर संकलित केली आहे.  


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १

एका बाजूला सत्य आणि दुसऱ्या बाजूला असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया वगैरे यांचे द्वंद्व अनादि काळापासून चालत आलेले आहे आणि अनंतकाळापर्यंत चालत राहणारच आहे असे वाटते. असत्य म्हणजे धडधडीत खोटेपणा कदाचित वेगळा दिसून येऊ शकतो, पण आभास आणि सत्य दोन्ही वरून सारखेच वाटतात. खरे खोटे याबद्दल काही ठोकताळे दिले जातात. ऐकीव गोष्टींवर जास्त विश्वास ठेवू नये, प्रत्यक्ष पाहून खात्री करून घ्यावी असे सांगितले जाते. "चक्षुर्वै सत्यम् " असे म्हंटले जाते, पण 'दिसते तसे नसते, म्हणून जग फसते' असाही एक वाक्प्रचार आहे.



रोज सकाळी पूर्व दिशेला क्षितिजावर सूर्याचे लालचुटुक बिंब उदयाला येते. हा सूर्य प्रखर होता होता आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हीला माथ्यावर येतो. त्यानंतर पश्चिमेकडे खाली उतरत संध्याकाळी त्याचे फिकट पडत जाणारे बिंब क्षितिजाला टेकून अदृश्य होते. हे दृश्य आपण रोज आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पहात असतो. त्याच्या सत्य असण्याबद्दल काही शंका घेण्याचे कारणच नसते. पण संत ज्ञानेश्वरांनी असे लिहून ठेवले आहे, "आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे || जैसे न चालता सूर्याचे चालणे || तैसे नैष्कर्म्यत्व जाणे || कर्मेची असता ||" आणि "उदय-अस्तासाठी ज्याप्रमाणे सूर्य चालत नसतांनाही चालल्यासारखा वाटतो " असा दाखला देऊन "त्याचप्रमाणे कर्मात असूनही नैष्कर्म्य असते." असे तत्वज्ञान त्यांनी सांगितले आहे. याचा अर्थ आपल्याला दिसतो त्याप्रमाणे सूर्य आकाशातून चालत नसतो हे त्यांना माहीत होते. त्यांच्याही कित्येक शतके आधी होऊन गेलेल्या आर्यभटाने "नावेत बसलेल्या माणसाला काठावरील झाडे मागे गेल्यासारखी दिसतात त्याप्रमाणे स्थिर असलेल्या नक्षत्रांचा उदय-अस्त झाल्याचा आभास होतो "असे सांगितले होते, पण पुढील शेकडो वर्षे सामान्य लोकांना ते समजलेच नाही किंवा मान्य झाले नव्हते. आपल्या डोळ्यांना सपाट आणि स्थिर दिसणारी पृथ्वी चेंडूसारखी गोल असेल, ती अवकाशात अधांतरी तरंगत असेल आणि सतत स्वतःभोवती गिरक्या घेत असेल हे कुणाला खरे वाटेल? पण शेकडो किंवा हजारो शास्त्रज्ञांनी तसे एकमुखांनी अनेक वर्षे सांगितल्यानंतर लोकांना पटायला लागले की आपल्याला जे दिसते तो आभास असतो आणि सत्य वेगळेच आहे. इथे डोळ्यांना दिसते ते खरे नसते, ते आभासी असते, पण शाळेतल्या मास्तरांनी सांगितलेले बरोबर असते असे म्हणावे लागते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २

चांदोबाची गोष्ट तर जास्तच मजेदार आहे. तो महिन्यात एक दिवस अमावास्येला आभाळात दिसतच नाही, त्यानंतर प्रतिपदेला त्याची फिकट कोर काही मिनिटे दिसली नी दिसली तोपर्यंत अदृष्य होते. द्वितीयेला मात्र अत्यंत रेखीव अशी आल्हाददायक चंद्रकोर तासभर दिसते. त्यानंतर रोजच्या रोज तिचा आकार वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार तेजस्वी चंद्र दिसतो. त्याच्या चांदण्याच्या मंद प्रकाशात आपले जग उजळून निघते. त्यानंतर त्याची कोर दिवसेंदिवस खंगत जाऊन अमावास्येला ती दिसेनाशी होते. ही सगळी मजा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पहातो. पुराणात अशी गोष्ट आहे की चंद्राचा सासरा दक्ष प्रजापती याने दिलेल्या शापामुळे त्याचा क्षय होत जातो आणि देवाने दिलेल्या वरदानामुळे त्याचा पुनर्जन्म होऊन तो पुन्हा पूर्णाकृति होतो. हजारो वर्षे लोक हे खरेच मानत आले होते.  महिन्यातले पहिले पंधरा दिवस आपल्याला चंद्र मावळतांना दिसतो, तर दुसरे पंधरा दिवस तो उगवतांना दिसतो. संकष्ट चतुर्थीचे दिवशी तर काही लोक चंद्रोदयाची आतुरतेने वाट पहातात आणि त्याचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. 


पण शास्त्रज्ञांनी असे शोधून काढले की चंद्राकडे मुळी स्वतःचे तेजच नसते. सूर्याच्या किरणांनी त्याचा अर्धा भाग उजळून निघतो आणि उरलेला अर्धा भाग अंधारातच राहतो. पृथ्वीभोवती फिरतांना  अमावास्येच्या दिवशी तो दिवसभर आकाशात दिसणाऱ्या सूर्यबिंबाच्या जवळपास असतो त्या वेळी त्याचा अंधारात दडलेला भाग पृथ्वीकडे असतो त्यामुळे आपल्याला तो दिसत नाही. तो जसा जसा आभाळातल्या सूर्यबिंबापासून दूर जात जातो तसा तसा त्याचा सूर्यकिरणांनी उजळलेला अधिकाधिक भाग आपल्याला दिसत जातो त्यामुळे त्याची कोर अंगाने वाढत जाते. पौर्णिमेच्या संध्याकाळी पश्चिमेकडे सूर्य मावळत असतो तेंव्हा पूर्वेच्या क्षितिजावर चंद्राचा उदय होत असतो. याचाच अर्थ सूर्याच्या प्रकाशाने उजळलेला चंद्राचा अर्धा भाग आपल्या समोर असतो आणि आपल्याला तो दिसतो.  पण एकाद्या पौर्णिमेला या चंद्राला ग्रहण लागते तेंव्हा पाहता पाहता त्याचा काही भाग अंधारात जातो, खग्रास ग्रहणात तर पूर्ण चंद्रच झाकाळतो आणि काही वेळानंतर तो पुनः  पहिल्यासारखा होतो. हे सगळे आभास चंद्रावर पडणाऱ्या पृथ्वीच्या सावलीमुळे होतात.  


थोडक्यात सांगायचे झाल्यास चंद्राचे हे सगळे दिसणे किंवा न दिसणे हे सत्य नसून भास असतात. प्रत्यक्षात बाराही महिने चोवीस तास चंद्र अवकाशात असतोच. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे तो कधी उगवतांना तर कधी मावळतांना दिसतो आणि त्याच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे त्याच्या कला म्हणजे त्याचा उजळलेला भाग आपल्याला दिसतात आणि पृथ्वीच्या हलत्या सावलीमुळे त्याला ग्रहण लागते आणि सुटते.

(क्रमशः)



सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ३

मंगळ. बुध. गुरु, शुक्र आणि शनि हे ग्रह आपण आकाशात पाहू शकतो. सूर्य आणि चंद्र या आकाशातल्या तेजस्वी गोलांसह या पाचही ग्रहांची नावे वारांना देऊन सात दिवसांचा आठवडा बनवला गेला आणि तो जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये पाळला जातो. आपल्या पूर्वजांनी या सात जणांचा समावेश ग्रह या एकाच सदराखालील देवतांमध्ये केला. याशिवाय राहू आणि केतू या नावाचे दोन ग्रह कल्पिले गेले. ते साध्या डोळ्यांनी तर दिसत नाहीतच, कुठल्याही दुर्बिणीमधूनसुद्धा दिसू शकत नाहीत, तरीही ते काल्पनिक बिंदूंच्या रूपात आकाशात वावरत असतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत सूर्य पूर्वेकडून ते पश्चिम क्षितिजापर्यंत एका अर्धवर्तुळासारख्या मार्गाने जात असतो तर चंद्र त्याच मार्गाने न जाता जराशा वेगळ्या मार्गाने आकाशातून जात असतो. या दोन मार्गांची वर्तुळे दोन ठिकाणे एकमेकांना छेद देतात त्या बिंदूंना  राहू आणि केतू अशी नावे दिली आहेत.  सूर्य आणि चंद्र या दोघांचेही आकाशातले मार्ग रोज किंचित बदलत असतात. त्यामुळे हे बिंदूही पुढे पुढे सरकत असतात. अमावास्येच्या दिवशी सूर्य आणि चंद्र आपापल्या मार्गाने जात असतांना एकमेकांच्या जवळ येत असतात. ते जर एकाच वेळी या बिंदूपाशी आले तर त्या वेळी सूर्याला ग्रहण लागते. आपल्या पूर्वजांनी या बिंदूंची कल्पना कशी केली, त्यांचा कसा अभ्यास केला आणि ग्रहणकाळ वगैरेंचे अचूक अंदाज आधीच लावले हे खरोखर आश्चर्य वाटण्यासारखे आणि कौतुक करण्यासारखे आहे. 



या नवग्रहांना देव मानून त्यांची पूजा केली जाते, त्यांचे स्तोत्र आहे आणि पुराणामध्ये त्यांच्या विषयीच्या कथा आहेत. इतकेच नव्हे तर ते आकाशात भ्रमण करत असतांना पृथ्वीवर राहणाऱ्या माणसांवर बारीक नजर ठेवून असतात आणि त्यांच्या जीवनामधल्या घटना घडवून आणतात असा समज पसरवला गेला आणि असंख्य लोक आजही तसे मानतात. या नवग्रहांमधला सूर्य हा एक तारा आहे आणि फक्त तोच स्वयंप्रकाशी आहे. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरणारा तिचा उपग्रह आहे आणि मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे सूर्याभोवती फिरणारे ग्रह आहेत. हे सगळे ग्रह सूर्याच्या प्रकाशामुळे उजळून निघतात आणि सूर्यापासून मिळालेले प्रकाशकिरण आकाशात सगळ्या दिशांना पसरवत असतात.  शुक्र हा ग्रह पृथ्वीपासून सगळ्यात जवळ आहे आणि तो सूर्यापासूनही जवळ असल्यामुळे त्याला जास्त प्रकाश मिळतो. यामुळे रात्रीच्या आकाशात दिसणारा तो सर्वात जास्त तेजस्वी ग्रह आहे. गुरु हा ग्रह शुक्राच्या अनेकपटीने मोठा असला तरी तो सूर्यापासूनही आणि पृथ्वीपासूनही दूर असल्यामुळे शुक्राच्या नंतर त्याचा क्रमांक वागतो. शनि हा ग्रह त्याच्यापेक्षाही दूर असल्यामुळे आकाराने मोठा असूनही फिक्कट दिसतो. 

या सगळ्या ग्रहांच्या बाबतीत सत्य, आभास, भ्रम आणि कल्पना या सगळ्यांचे एक अजब मिश्रण आहे. 

------

सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ४

माझ्या लहानपणी आमच्या गावात रात्री आठ साडेआठपर्यंत जेवणे आटोपून सामसूम होत असे आणि आम्ही बहुतेक वेळा गच्चीवर अंथरूण पसरून गप्पा मारत मारत उघड्या आकाशाखाली झोपत होतो. त्या काळात त्या भागात सगळीकडे रात्रीच्या वेळी अंधारगुडुप होत असल्यामुळे आकाश निरभ्र असले तर त्यात लाखो चांदण्या लुकलुकतांना दिसत असत. तेंव्हा झोप लागेपर्यंत आमचे आभाळाचे निरीक्षण चाललेले असे. मृग आणि हस्त नक्षत्रे, वृश्चिक रास, सप्तर्षी आणि ध्रुव तारा ही काही ठळकपणे दिसणारी मंडळी माझ्या ओळखीची झाली होती. माझ्या वडिलांना तर बहुतेक सगळी नक्षत्रे आणि सगळ्या राशी माहीत होत्या. आज चंद्र मकर राशीत आहे किंवा सध्या गुरु सिंह राशीत असतो असे ते मला दाखवतांना सांगत असत. एखादा ग्रह कुठल्या राशीत असतो किंवा त्या राशीमधून निघून पुढच्या राशीत जातो म्हणजे नेमके काय होते याचा अर्थ त्यामधून मला समजला होता. 

   


राशीभविष्य वाचतांना असे वाटते की आकाशाच्या एका मोठ्या कॉफी हाउसमध्ये बारा टेबले मांडून ठेवलेली असावीत आणि त्यातल्या कुठल्या टेबलावर दोघे तिघे तर इतर काही टेबलांवर एकेकटे ग्रह बसलेले असतात आणि ते अधून मधून उठून पुढच्या टेबलावर जाऊन बसतात. त्यातला रवि दर महिन्यात एकदा टेबल बदलतो, त्याचा सवंगडी बुध त्याच्याच टेबलावर किंवा लगतच्या टेबलावर बसतो, शुक्रही कधीही रवीपासून जास्त दूर जात नाही, मस्त कलंदर मंगळ जरा अनियमितपणे टेबले बदलत असतो, गुरु एक पूर्ण वर्ष त्याच टेबलावर बसून राहतो आणि शनि तर अडीच वर्षे टेबल बदलत नाही. प्रेमळ चंद्र मात्र दर दोन अडीच दिवसात टेबल बदलून महिनाभरात सगळ्या ग्रहांना भेटून येतो आणि अमावास्येला मात्र न चुकता रवीच्या टेबलावर हजेरी लावतो.  

जेंव्हा आपल्याला कुंडलीमध्ये  दोन किंवा तीन ग्रह एका घरात (राशीत) दिसतात तेंव्हा आकाशात सुद्धा ते एकमेकांच्या जवळ आल्यासारखेच दिसतात. ते जास्तच जवळजवळ दिसले तर त्याला युति म्हणतात. प्रत्यक्षात मात्र चंद्र आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये असला तर मंगळ कोथरूडला, गुरु कऱ्हाडला आणि शनि कोल्हापूरला इतके ते दूर दूर असतात. प्रत्येक ग्रह आणि उपग्रह आपापल्या कक्षांच्या  किंचितही बाहेर जात नाहीत आणि कुठलाही ग्रह किंवा उपग्रह कधीही दुसऱ्या कुठल्याही ग्रहाच्या जवळपाससुद्धा जात नाही आणि  तेच बरे आहे. समजा कधी मंगळ किंवा बुध महाकाय गुरूच्या जवळपास गेला तर तो गुरुत्वाकर्षणाने त्या लहान ग्रहांना गिळून टाकेल आणि कुठलाही ग्रह सूर्याच्या जवळपास गेला तर  क्षणार्धात त्याची वाफ होऊन जाईल.

नक्षत्रे आणि राशी हे चांदण्यांचे समूह आहेत. ज्या तारका मिळून हे समूह बनतात त्या आकाशात एकमेकींच्या जवळ दिसतात. पण त्यासुद्धा प्रत्यक्षात एकमेकींपासून खूप दूर दूर असतात.  मृग नक्षत्रातला व्याध (Sirius) हा तारा सूर्यमालिकेपासून सर्वात जवळ म्हणजे सुमारे आठ प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहे, तर या व्याधाने मारलेल्या बाणातले तीन तारे एक हजार ते दोन हजार प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर आहेत, म्हणजे ते सुद्धा एकमेकांपासून हजार प्रकाशवर्षे इतक्या अंतरांवर आहेत. साध्या डोळ्यांनी मात्र हे सगळे जवळजवळच दिसतात. विज्ञानामध्ये झालेल्या प्रगत संशोधनामुळे ही अंतरे मोजता आली आहेत.

आकाशातले सूर्य, चंद्र. ग्रह आणि तारे यांचे साध्या डोळ्यांनी निरीक्षण करून मिळणारी माहितीसुद्धा एका दृष्टीने बरोबरच असते, पण त्यात काही प्रमाणात आपले अज्ञान असते. त्यात थोडा आभास असतो आणि विज्ञानामधून त्यांच्या बाबतीतले अधिक सखोल ज्ञान प्राप्त झाल्यावर तो भ्रम दूर होतो.

(क्रमशः)  


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ५

आपल्याला आकाशात दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी जशा दिसतात तशाच नसतात किंवा तितक्याच नसतात, आपल्याला जे दिसत नाही असेही बरेच काही तिथे असते, पण ते आपल्याला समजत नाही हे आपले अज्ञान आहे. त्यात कुणीही ठरवून केलेली कसली लपवाछपवी नाही. पण अनेक वेळा असेही होते की जे प्रत्यक्षात नसतेच ते  आहे असे कुणाकडून तरी काही उद्देशाने दाखवले जाते. हे सुद्धा प्राचीन काळापासून होत आले आहे.


रामायणात मारीच राक्षस सोन्याच्या हरिणाचे रूप घेऊन सीतेला मोहात पाडतो आणि तो हरिण पकडून आणण्यासाठी राम वनात जातो.  तो राक्षस नंतर रामाच्या आवाजात "लक्ष्मणा धाव धाव" असे ओरडतो आणि तो रामाचाच आवाज आहे असे वाटून लक्ष्मणही रानात धाव घेतो. तेवढ्यात रावण एका याचकाचा वेष घेऊन सीतेकडे जातो आणि तिला पळवून लंकेला घेऊन जातो अशी रचून केलेली बनवाबनवी आहे.

महाभारतात मयासुर राक्षस पांडवांना एक मयसभा बांधून देतो. त्यात जिथे जमीन दिसते तिथे पाणी आणि जिथे पाणी आहे असे वाटते तिथे जमीन असे भास होत असत. याला फसून दुर्योधनाची फजिती होते आणि द्रौपदी त्याला खदखदा हसून "आंधळ्याचा मुलगा आंधळा" असा टोमणा मारते. दुर्योधनाला हा अपमानाचा घाव सहन होत नाही आणि तो जन्मभर त्याचा सूड घेण्यासाठी दुष्ट कारवाया करत राहतो असा कथाभाग आहे.

पुढे कौरवपांडवांच्या युद्धात अभिमन्यूच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सूर्यास्ताच्या आत जयद्रथाचा वध करण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने केलेली असते आणि ती पूर्ण नाही केली तर अग्नीत उडी घेईन असे सांगितले असते.  त्या वेळी कौरव जयद्रथाला एका गुप्त जागी लपवून ठेवतात. ती जागा अर्जुनाला सापडत नसते. अर्जुनाला या धर्मसंकटातून वाचवण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या सुदर्शनचक्राने सूर्याला झाकून टाकतात आणि काळोख पडतो. आपली प्रतिज्ञापूर्ति करण्यासाठी अर्जुन तयार होतो आणि ते पहाण्यासाठी जयद्रथ समोर येतो. तेवढ्यात श्रीकृष्ण आपले सुदर्शन चक्र हटवतो आणि अर्जुनाला सांगतो, "हा पहा सूर्य आणि हा जयद्रथ."

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ६

सर्वशक्तिमान देवांना तर काहीही करणे शक्य असते आणि राक्षसांकडे काही मायावी शक्ती असतात त्यामधून ते आपल्याला अशक्य असलेल्या गोष्टी करू शकतात या दोन गृहीतकांवर पुराणातल्या कथा आधारलेल्या असतात.  माणसांच्या जगात होत नसलेल्या घटना त्या कथांमध्ये घडत असतात. त्यामुळे त्या अद्भुत वाटतात.  त्या खऱ्या म्हणायच्या की कल्पित म्हणायच्या यावर वाद घालण्यात अर्थ नसतो.  ते ज्याने त्याने आपापल्या मनाप्रमाणे किंवा बुद्धीने ठरवावे किंवा ठरवले नाही तरी काही फरक पडत नाही. पण या अद्भुतरम्य कथा हजारो वर्षे टिकून राहिल्या आहेत आणि अजूनही सांगितल्या जातात कारण त्या मानवी मनाचे काही पैलू दाखवतात. या रूपक कथांच्या अनुषंगाने 'कांचनमृग', 'लक्ष्मणरेखा' यासारखे शब्द  उदाहरणादाखल वापरले जातात.


आपल्याकडे जे नसेल ते मिळावे अशी इच्छा कुणालाही होणे साहजिक आहे. ते तुम्हालाही सहज मिळू शकेल अशी प्रलोभने दाखवली जात असतात. आजकाल जाहिरातबाजीच्या काळात तर त्यांचा सतत भडिमार होत असतो. त्यामुळे असा सोन्याचा हरिण अस्तित्वात तरी असेल का याचा विचार न करता काही लोक त्या कांचनमृगाच्या मागे वेड्यासारखे धावत सुटतात. प्रलोभन पाहून लगेच तिकडे आकर्षित होऊ नये, चकाकते ते सगळेच सोने नसते, त्या आकर्षक दिसणाऱ्या गोष्टीची आपल्याला काही गरज किंवा उपयोग तरी आहे का? यावर जरा विचार करावा. 


प्रत्येक माणसाला नेहमी स्वातंत्र्य हवे असते, मनात येईल तसे वागायचे असते, पण त्याचे आईवडील, नातेवाइक, शिक्षक, मित्र , समाज, शासन वगैरे सगळे लोक त्यावर काही बंधने घालत असतात.  केंव्हा कुठे कसे वागायचे याचे काही नियम घालून दिले जात असतात. ते पाळण्यात त्याचे हित असते आणि नाही पाळले, या लक्ष्मणरेखा ओलांडल्या तर त्याचे घातक परिणाम होण्याची शक्यता असते.


असे काही संदेश या कथांमधून मिळतात. या कथा सत्य आहेत की काल्पनिक यापेक्षा ते संदेश महत्वाचे असतात.

(क्रमशः)


---


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ७

दोन हजार वर्षांपूर्वी भरत मुनींनी सविस्तर नाट्यशास्त्र लिहून ठेवले आहे म्हणजे भारतामध्ये त्यांच्याही आधीच्या काळापासून नाटके दाखवली आणि पाहिली जात असणार. कित्येक शतकांपूर्वी भास, कालिदास, शूद्रक वगैरे नाटककारांनी संस्कृत भाषेत नाटके लिहिली. विलियम शेक्स्पीअर या प्रसिद्ध इंग्लीश नाटककाराने अनेक नाटके लिहिली आणि ती रंगमंचावर आणली. मराठी भाषेतही अनेक नाटके लिहिली गेली आणि लिहिली जात आहेत. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी सुरु करून दिलेली मराठी रंगभूमीवरीवरील नाटकांची परंपरा  गेली सुमारे दीडशेहून अधिक वर्षे अखंड चालत आली आहे. याचे कारण कोणतेही नाटक प्रेक्षकांना थोड्या वेळासाठी एका वेगळ्या आभासी जगात घेऊन जाते,  नाटक पहातांना त्याला एक वेगळा भावनिक अनुभव येतो आणि प्रेक्षकांना ते आवडते, ते हवे असते म्हणून ते नाटक पहायला येतात. 


"जग ही एक रंगभूमी आहे" असे एक शेक्स्पीअरचे सुप्रसिद्ध वचन असले तरी रंगभूमीवरचे नाटक बाहेरच्या जगापेक्षा वेगळे असतेच. तिथे एक पात्र होऊन थोडा वेळ वावरणारा नट त्याच्या आयुष्यात एक वेगळा माणूस असतो. रंगमंचावर चाललेल्या घडामोडी खऱ्या नसतात, प्रेक्षकांना दाखवण्यासाठी त्या मुद्दाम घडवून आणलेल्या असतात हे प्रेक्षकांनाही माहीत असते आणि कलाकारांनाही माहीत असते. तरीही कलाकार जीव ओतून ती कामे करतात आणि प्रेक्षकही समरस होऊन त्याचा आनंद घेतात, ते नाटकातल्या विनोदावर हसतात, खिदळतात, सुखद प्रसंग पाहून खूष होतात आणि दुःखद प्रसंग पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येते. एखादे नाटक सत्यकथेवर आधारलेले असले तरी त्यातले प्रसंग त्या नाटकातल्या नटनट्यांच्या आयुष्यात आलेले नसतात, पण रंगमंचावर ते तसा आभास निर्माण करतात, त्यातले संवाद तर नाटककाराने त्याच्या प्रतिभेनुसार कल्पनेतूनच लिहिलेले असतात. बहुतेक नाटके तर पूर्णपणे काल्पनिकच असतात. त्यातली पात्रे, त्यांच्यामधले संवाद आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना हे सगळे खोटेच असते, हे सुद्धा माहीत असते, तरीही ते नाटक पहात असतांना ते खरे वाटते.


नाटकातली दृष्ये खरी वाटावीत यासाठी रंगमंच सजवला जातो. पूर्वीच्या काळी निरनिराळी चित्रे रंगवलेले मोठमोठे पडदे गुंडाळी करून वर लटकवून ठेवलेले असत आणि जसा नाटकाचा प्रवेश असेल त्याप्रमाणे केंव्हा बाग, केंव्हा अरण्य, तर केंव्हा देऊळ किंवा घराचा दिवाणखाना दाखवणारा पडदा खाली सोडून त्या दृष्याच्या पार्श्वभूमीवर कलाकार आपले संवाद बोलत असत. नंतरच्या काळात निरनिराळ्या दृष्यांसाठी लगेच हलवता येण्यासारखे सेट मांडले जाऊ लागले. ते काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी फिरते रंगमंच आणि सरकते रंगमंच आले. या सगळ्यांचा उद्देश जे प्रत्यक्ष अस्तित्वात नाही ते आहे असे तात्पुरते दाखवणे हाच असतो.

(क्रमशः) 


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ८

पूर्वीच्या काळात आतासारखे तयार रंग, ब्रश आणि ड्रॉइंग पेपर वगैरे गोष्टी बाजारात मिळत नसत. निरनिराळ्या वनस्पतींची पाने, फुले, फळे, मुळे, बिया आणि रंगीत दगड, खनिजे, कोळसे वगैरेंना कुटून त्यांची पूड विशिष्ट प्रकारची तेले, मेण, चरबी वगैरेंमध्ये मिसळून रंग तयार केले जात असत, प्राण्यांचे मऊ केस कापून त्यांचे कुंचले तयार केले आत असत आणि चित्र काढण्यासाठी खास तयार केलेला जाड कागद किंवा दडस विणलेले कापड यावर ती चित्रे काढली जात असत. हे सगळे कष्टाचे आणि खर्चिक काम सामान्य लोकांच्या आवाक्यात नव्हतेच. तत्कालिन राजे रजवाडे, जहागीरदार वगैरे लोक गुणी चित्रकारांना आपल्या आश्रयाला ठेवून घेत असत. माणसाचा चेहेरा पाहून त्याचे हुबेहूब चित्र काढता येणे ही एक अद्भुत आणि अत्यंत दुर्मिळ कला आहे. त्यात पारंगत असलेले चित्रकार वर्षानुवर्षे परिश्रम करून राजघराण्यातल्या लोकांच्या मोठमोठ्या तसबिरी काढत असत. जगभरातल्या अनेक म्यूजियम्समध्ये अशी भव्य जुनी पोर्ट्रेट्स पहायला मिळतात. हे चित्रकार चित्र काढतांना त्या व्यक्तीमधल्या वैगुण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यातल्या पुरुषांना जास्तीत जास्त रुबाबदार आणि स्त्रियांना जास्तीत जास्त सुंदर असेच दाखवत असत. त्यांच्या अंगाखांद्यावर भरजरी उंची कपडे आणि बहुमोल रत्नांनी भरलेले भरपूर दागदागिने दाखवत असत.  त्या चित्रकारांनी वस्तुनिष्ठ कला म्हणून काही वेडेवाकडे दाखवले असते तर त्यांची धडगत नव्हती. 



गेल्या शतकात फोटोग्राफी करण्याचे तंत्र विकसित झाल्यानंतर हुबेहूब छायाचित्र लगेच तयार व्हायला लागले. त्यामुळे दीर्घ काळ घालवून हुबेहूब चित्र काढणाऱ्या चित्रकारांना तितकेसे महत्व राहिले नाही. पण उत्कृष्ट छायाचित्र घेण्यासाठी एकाहून एक चांगले कॅमेरे तयार होत गेले. विशेष प्रकाशयोजना करता येतील असे स्टूडिओ आले. निरनिराळ्या अँगल्समधून पाहून योग्य त्या अँगलने चेहेऱ्याकडे पाहून त्यावरचे भाव स्पष्ट दिसतील अशा प्रकारे नेमक्या क्षणी कॅमेराला क्लिक करणे ही एक नवी कला जन्माला आली आणि त्यात वाकबगार असे छायाचित्रकार नावारूपाला आले. "प्रत्यक्षाहुनि प्रतिमा सुंदर" कशी येईल याचा प्रयत्न करणे हाच या सर्वांचाही उद्देश होता. मग त्यातही जरा वेगळेपणा येण्यासाठी अत्यंत भेसूर असे चेहेरे दाखवणाऱ्या काही 'रिअॅलिस्टिक' छायाचित्रांनाही प्रसिद्धी मिळायला लागली.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ९

सत्यम् शिवम् सुंदरम् हे शब्द नेमके कुठून आले हे मला माहीत नाही, पण त्या नावाचा सिनेमा येण्याच्या खूप वर्षे आधीपासून ते शब्द प्रचारात आहेत.  कदाचित परमेश्वर हा सत्य आहे, शिव म्हणजे कल्याणकारी मंगलमय असा आहे आणि तो मनमोहक, सुंदर असा आहे अशा अर्थाने ते स्तोत्रांमध्ये म्हंटले गेले असेल. भारतातली प्राचीन काळातली शिल्पकला आणि चित्रकला ही मंदिरांच्या आधारानेच प्रगट होत गेली असावी.  बहुतेक मंदिरांमधल्या मूर्ती पहायला सुंदरच दिसतात, देवीदेवतांची चित्रेसुद्धा सुंदरच असतात असा पायंडाच पूर्वीपासून पडला होता आणि तो आजवर चालत आला आहे. कुठल्या देवाचे खरे रूप कुणी पाहिले आहे? पण परमेश्वर हा निर्गुण निराकार असला तरी त्याची उपासना करण्यासाठी जे सगुण रूप डोळ्यांसमोर आणले जाते ते कलाकारांनी आपल्या कल्पनेमधून ते साकारलेले असते तरी ते नेहमी सुंदरच असते. 

लिओनार्दो दा विंचि आणि मायकेलांजेलो यांच्यासारख्या युरोपातल्या जुन्या काळातल्या कलाकारांनी आपल्या कलाकृतींमध्ये सौंदर्याला महत्व दिले होते आणि त्यात एक उच्च दर्जा स्थापन केला होता. त्यांच्या चित्रकलेचे अनुकरण पुढील काही शतके होत गेले आणि अनेक चित्रकारांनी तशाच प्रकारच्या एकाहून एक सुंदर कलाकृती निर्माण केल्या. पण शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या पाश्चिमात्य कलाकारांनी वेगळा विचार करायला सुरुवात केली. जरी वीर सावरकरांनी स्वतंत्रतेला उद्देशून "जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते" असे म्हंटले असले तरी या बंडखोर कलाकारांनी मात्र आपल्या कलात्मक स्वातंत्र्यासाठी कलेमध्ये  त्याहून वेगळे असे काही आणणे आवश्यक आहे असे सांगायला सुरुवात केली.  पूर्वीच्या काळात या कलाकांरांचे राजघराण्यातले आश्रयदाते असत त्यांच्या कलाने घेणे आवश्यक होते. पण आर्ट गॅलरीज उघडल्या आणि त्यात सामान्य लोकही  मोठ्या संख्येने येऊन तिथे मांडलेल्या कलाकृती पहायला लागले हे पाहून त्या काळातल्या कलाकारांना नवीन प्रयोग करायचा धीर आला. शिवाय फोटोग्राफी आल्यानंतर हुबेहूब आकृति काढण्याचे महत्व कमी होऊन कल्पनेतून वेगळे काही तरी काढावे असे वाटायला लागले होते. जर प्रत्यक्ष जीवनात गलिच्छपणा आणि ओंगळपणा अस्तित्वात असेल तर तो चित्रांमध्ये का नको? असे म्हणणारे लोक एका दृष्टीने कलेला सत्याच्या जवळच नेत होते. त्यांनी उघडपणे ते दाखवायला सुरुवात केली. पण कला ही मुख्यत्वे कल्पनेची भरारी असते असे म्हणून काही कलाकारांनी त्यांना सुचतील तशा विकृति त्यात घुसवल्या. पुढे पुढे तर मॉडर्न आर्ट किती अनाकलनीय असावी याची चढाओढ सुरु झाली तेंव्हा मात्र ती पूर्णपणे सत्यापासून दूर भरकटत गेली.

(क्रमशः) 


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १०

कॅमेरा हे एक निर्जीव यंत्र असते, त्याला भावना, बुद्धी वगैरे काही असत नाही. तो खोटे चित्रण करत नाही.  त्याच्या भिंगाच्या समोर जे काही दृष्य असते तेच तो प्रामाणिकपणे फोटोमध्ये उतरवतो. असे असले तरी त्या कॅमेराला हाताळणारे लोक लबाड असू शकतात. जवळच्या गोष्टी मोठ्या दिसतात आणि दूरच्या लहान दिसतात या निसर्गाच्या नियमाचा उपयोग करून घेऊन ते गंमतशीर फोटो काढू शकतात. त्यात कोणी ताजमहालला आपल्या डोक्यावर घेतले आहे, अख्ख्या कुतुबमिनारला तळहातावर तोलून धरले आहे, आ वासून चंद्राला गिळतो आहे किंवा मावळत्या सूर्याला चिमटीत पकडून धरले आहे अशी चित्रे पहायला मिळतात. एक नूर आदमी दस नूर कपडा असे म्हंटले जाते. बहुतेक लोकांना चित्रविचित्र कपडे घासून आपले फोटोकाढून घेण्याची हौस असते.  त्या पोशाखात ते जसे दिसतात तसे ते प्रत्यक्ष आयुष्यात नसतात. जे लोक हिमाचल प्रदेश, गोवा, दार्जिलिंग, स्विट्झर्लंड अशा सारख्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात तिथल्या स्थानिक लोकांचे कपडे घालून आपले फोटो काढून घेतात आणि त्या सहलीची एक वेगळी आठवण आपल्यापाशी ठेवतात. 



कधी कधी आपल्याला दृष्टिभ्रमामुळे जे आहे त्यापेक्षा वेगळे काही तरी दिसते. काही हुषार लोक अशा दृष्यांना कॅमेरामध्ये कैद करून किंवा तसे चित्र रंगवून ती दृष्ये लोकांना दाखवतात. या सोबत दिलेल्या एका दृष्यात आपल्याला गणपतीचा भास होत असला तरी ती फक्त नारळाची झाडे आहेत. सतत बदल होत राहणे हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे.  त्यानुसार शहरे, आसमंत आणि माणसांचे चेहेरेही हळूहळू बदलत असतात. फोटोग्राफीची सोय झाल्यामुळे जुन्या आठवणीतली दृष्ये साठवून ठेवून आपण ती कालांतराने पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वीचे पुणे, मुंबईतले रस्ते, इमारती वगैरेंचे फोटो आपल्याला बरेच वेळा पहायला मिळतात आणि आपल्या जन्मापूर्वी ही शहरे कशी होती याचा अंदाज येतो. खाली दिलेल्या फोटोमधले जोडपे आता शंभर वर्षांहून मोठे आहे, ते विशीत असतांना कसे दिसत होते हे त्या फोटोच्या वरच्या भागात दिसते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - ११

चित्रपटाच्या शोधाने मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाला.  नाटकामधील पात्रे एका वेळी एकाच रंगमंचावर आपला खेळ करू शकत असत आणि फक्त तिथे असलेले प्रेक्षकच ते पाहू शकत असत. रंगमंचावरील पडदे किंवा सेट यामधून एका नाटकात किती वेगवेगळ्या जागा दाखवता येतील आणि एका वेळी किती माणसे स्टेजवर असू शकतील याला मर्यादा असत. तिथे फार कमी घटना प्रत्यक्ष घडतांना दाखवता येत असत. त्यामुळे नाटकाचा सगळा भर संवादावर असायचा. 


चित्रपटांनी या सगळ्या मर्यादा झुगारून दिल्या. त्यांचे शूटिंग निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या ठिकाणी करून ती चित्रे नंतर एकत्र आणली जातात. त्यात घोडे दौडतांना, मोटारी पळतांना किंवा विमाने उडतांना दाखवता येतात. माणसांची प्रचंड गर्दी, प्राण्यांचे कळप किंवा पक्ष्यांचे थवे दाखवता येतात. अनेक प्रकारच्या घटना घडत असतांना दाखवता येतात. चेहेऱ्यावर कॅमेरा फोकस करून डोळ्यातून प्रकट होणारे सूक्ष्म हावभावसुद्धा दाखवता येतात. हत्ती, उंट, वाघ, सिंह, सुसरी अशासारख्या ज्या मोठमोठ्या जनावरांना नाटकाच्या रंगमंचावर आणणे शक्य नसते, त्यांना तर सिनेमामध्ये पडद्यावर दाखवता येतेच, बारीक किडामुंग्यांनाही मोठे करून दाखवता येते. इंद्राच्या महालापासून ते शहरातल्या गजबजलेल्या वस्तीपर्यंत कुठल्याही वास्तवातल्या किंवा कल्पनाविलासातल्या जागा आणि तिथे घडणाऱ्या काल्पनिक घटना दाखवता येतात. त्यांना सुमधुर अशा गाण्यांची जोड देता येते.  एकदा तयार केलेल्या फिल्मच्या अनेक प्रती काढून त्या अनेक चित्रपटगृहांमध्ये अनेक वेळा दाखवता येतात. या सगळ्या फायद्यांमुळे नाटके मागे पडत गेली आणि सिनेमांनी त्यांच्यावर मात करून ते अनेकपटीने जास्त पाहिले जाऊ लागले. 


सिनेमाचा दुसरा फायदा असा असतो की  जुन्या झालेल्या फिल्मसुद्धा कित्येक वर्षांनंतरही पुन्हा दाखवता येतात. तोपर्यंत त्यात काम करणारे कलाकार म्हातारे किंवा दिवंगत झाले असले तरी त्यांचे तारुण्यातले सौंदर्य सिनेमाच्या फिल्ममध्ये टिकून राहिलेले असते. सिनेमाच्या पडद्यावर दिसणारे सगळे १००टक्के भासच असतात, तरीही तो पहात असतांना पहाणाऱ्यांना गुंगवून ठेवतात. चित्रपट भास असला तरी तो पहाणाऱ्याच्या मनावर होणारे परिणाम खरे असतात.  काही काही चित्रपट तर जन्मभर लक्षात राहतात. मधुमती हा चित्रपट १९५८ साली प्रकाशित झाला तरी तो पन्नास वर्षांनंतरही मला खडा न खडा आठवत होता आणि अजूनही माझ्या आठवणीत राहिला आहे.

(क्रमशः)

https://anandghan.blogspot.com/2008/04/blog-post_29.html


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १२

पूर्वीच्या काळात प्रवासाची सुलभ साधने कमी होती आणि मध्यमवर्गाकडे ओढाताणीची आर्थिक परिस्थिति होती. अत्यावश्यक काम असेल तरच लोक प्रवास करत असत. अनेक लोकांना पर्यटन हा शब्दच माहीत नसायचा. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे अनुभव विश्व संकुचित असायचे. म्हैसूरची वृंदावन गार्डन किंवा काश्मीरचे सृष्टिसौंदर्य हेसुद्धा प्रत्यक्ष पहायला जाणे अवघड असायचे. परदेशगमन तर फारच कमी लोकांच्या नशीबात  असे. पण वाचनसंस्कृतीचा प्रसार होत असल्यामुळे वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके यामधून जगभरातल्या प्रेक्षणीय स्थळांची रसभरित वर्णने वाचनात येत असत आणि त्यांचेबद्दल कुतुहल वाटत असे. यामुळे हे सगळे अद्भुत वाटणारे वेगळे जग सिनेमाच्या पडद्यावर अगदी स्वस्तात पहायला मिळते याचे अप्रूप वाटत असे. ईव्हनिंग इन पॅरिस, नाइट इन लंडन, लव्ह इन टोकियो अशा नावांमुळेच लोक थेटरांकडे खेचले जात असत.


दूरचित्रवाणी आल्यावर आणखी एक चमत्कार झाला. घरात बसूनच सगळ्या जगाचे दर्शन व्हायला लागले. यात हे सगळे चित्रपट, त्यातली गाणी, निवडक दृष्ये वगैरेही पहायला मिळतातच, तसेच जगभरातल्या बातम्या दाखवल्या जात असतात, त्यांमध्ये तिथला निसर्ग, तिथले रस्ते, घरे, इमारती हे सगळे आपोआप दिसतेच. मुख्य म्हणजे त्यासाठी उठून कुठल्या थेटरात जाण्याची गरज नाही. आता तर अनेक वाहिन्यांवरील टी.व्हीचे प्रक्षेपण चोवीस तास चाललेले असते. त्यात बातम्या, चर्चा, संगीत, नृत्य, खेळांचे सामने अशा अनंत गोष्टी असतात. आपल्याला इच्छा आणि वेळ असेल तेंव्हा टीव्ही सुरु करावा आणि आपल्याला जे आवडते ते पहावे अशी सोय झाली आहे. आपण फक्त एका निर्जीव काचेकडे पहात असतो हे सत्य असले तरी त्यात जे दाखवले जाते ते जीवंत वाटते आणि त्यातला काही भाग खराखुरा आणि काही भाग काल्पनिक असे मिश्रण असते.  

(क्रमशः)  

 

सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १३

मी नोकरीला लागलो तेंव्हा फक्त टी.आय.एफ.आर.सारख्या महत्वाच्या प्रयोगशाळांमध्ये संगणक आला होता. एका मोठ्या हॉलमध्ये अनेक रॅक्समध्ये रचून ठेवलेल्या हजारो इलेक्ट्रॉनिक काँपोनंट्समधून तो एक काँप्यूटर होत होता. तेंव्हा मला त्या खोलीत शिरायची परवानगीसुद्धा मिळत नव्हती. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होत आलेल्या प्रगतीमुळे मी रिटायर व्हायच्या आधी चक्क माझ्या घरात एक पर्सनल काँप्यूटर (पीसी) आला आणि मी तो चालवायला लागलो. तसेच त्याच्याबरोबर इंटरनेटही आले. अक्षरे, चित्र आणि ध्वनि या तीन्ही माध्यमांमधून प्रकट होत असलेली माहिती आणि संदेश मला त्यातून मिळायला लागले, इतकेच नव्हे तर मीसुद्धा ते पाठवायला लागलो. सिनेमा किंवा टीव्हीमध्ये इतर काही लोकांनी मिळून तयार केलेले कार्यक्रम मी फक्त प्रेक्षक होऊन पहात होतो. पण  मी स्वतः संगणकावर ब्लॉग लिहून ते इंटरनेटवर पाठवायला लागलो. 


त्याच्या पाठोपाठ स्मार्ट फोन आला आणि या सगळ्या गोष्टी जास्तच सोप्या झाल्या. इतकेच नव्हे तर त्याच्या अंतर्गत एक उत्कृष्ट कॅमेराही आला.  हा तर मी जेथे जातो तेथे माझा सांगाती असल्यामुळे जगभरात कुठेही असलो तरी संपर्कक्षेत्रात रहायला लागलो आहे आणि मला हे संदेश मिळायला लागले आहेत, तसेच मी फोटो काढून तेही पाठवू शकतो.


या आंतर्जालातून एक वेगळेच आभासी जग निर्माण झाले आहे. विशेषतः फेसबुक, वॉट्सॅप आणि यू ट्यूब यांच्यामुळे असंख्य प्रकारच्या निरनिराळ्या मति गुंग करणाऱ्या गोष्टी फारच सहजासहजी उपलब्ध व्हायला लागल्या आहेत. लोकांना ते पाहण्याचे वेड किंवा व्यसन लागले आहे. अनेक लोक दिवसातला बराच वेळ खऱ्याखुऱ्या आपल्या माणसांच्या सोबत घालवण्याऐवजी या मायावी विश्वात रमायला लागले आहेत. त्यामुळे नातेसंबंध कमकुवत होत चालले आहेत. खऱ्या जगातले काही लोकसुद्धा अनेक मुखवटे धारण करून वावरत असतातच, या आभासी जगात तर कोण खरी व्यक्ती आहे आणि कोण बनावट किंवा फ्रॉड आहे, कुणावर विश्वास ठेवावा की ठेवू नये हेच समजत नाही. ऑन लाइन व्यवहारांमधून कुणाकुणाला कसे आणि किती फसवले याच्या बातम्या रोजच येत असतात.  त्याचबरोबर अनोळखी माणसाशी बोलूसुद्धा नका असे उपदेशही दिले जातात. हे भीतीदायक सगळे वाटते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १४

आपल्या खऱ्या जगामधल्या माणसांचे नाव, गाव, पत्ता यावरून त्यांची ओळख निर्माण होते आणि त्यांची अमोरासमोर भेट होते. आपल्या ओळखीतली अशी अनेक माणसे इंटरनेटच्या आभासी जगातही वावरत असतात, ती आपल्या मित्रांच्या यादीमध्ये असतात आणि आजकाल प्रत्यक्ष भेटींपेक्षा तिथेच त्यांच्या जास्त वेळा भेटी होत असतात. 


पण त्या आभासी जगात त्यांनी कधी कधी यूजर नेम म्हणून स्वेच्छेने वेगळे (खोटे) नाव धारण केले असते किंवा तिथल्या काही नियमांमुळे त्यांना ते करावे लागते. आभासी विश्वाला सायबर स्पेस असे म्हंटले जाते आणि तिथल्या जागांना वेबसाइट म्हणतात, पण त्यांना पुणे, मुंबई, कोल्हापूर यासारखे भौगोलिक अस्तित्व नसते किंवा त्या स्पेस म्हणजे अवकाशात नसतात. ज्या मोठमोठ्या कंपन्यांनी हे वैश्विक महाजाल तयार करण्यात पुढाकार घेतला त्यांनी जगभरात ठिकठिकाणी स्थापन केलेल्या अजस्त्र संगणकांमधल्याच कुठल्या तरी सर्व्हरमध्ये त्या वसत असाव्यात असे मला वाटते. या प्रत्येक वेबसाइटला एक पत्ता असतो. ईमेल प्रोव्हाइडर्स किंवा फेसबुकसारख्या संस्था जगातील कोट्यावधी लोकांना त्यांच्या वेबसाइटवरच  अगदी फुकटात एकेक कप्पा देतात, त्या कप्प्यालाही वेगळा पत्ता मिळतो.  या वेब स्पेसमध्ये डोमेन नावाची जागा भाड्याने घेऊन तिथे आपली स्वतःची वेबसाइट बांधता येते आणि तिला एक वेगळा पत्ता मिळतो.  तो कप्पा किंवा ती साइट नेमकी कुठल्या सर्व्हरमध्ये असते ते त्या माणसालाही कधीच समजत नसते, तरीही तो आपल्या घरी बसूनच तिचा उपयोग करून घेऊ शकतो. प्रत्येक संगणकाला आयपी अॅड्रेस नावाचा एक पत्ता असतो त्याची नोंद कुठेतरी केली जात असते आणि त्या माणसाला येणारे संदेश त्या पत्त्यावर जाऊन पोचतात. आज या जगात सुमारे दोन अब्ज वेबसाइट आहेत आणि सुमारे पाच अब्ज लोक त्यांचा वापर करत असतात.


आपल्या खऱ्या जगातल्या कुणी दुसऱ्या कुणाला पत्र लिहून ते पोस्टाच्या पेटीत टाकले तर कितीही सक्षम पोस्ट खाते असले तरी ते पत्र त्या दुसऱ्या माणसाच्या हातात पडायला काही दिवस लागतात, पण आपण पाठवलेली ईमेल या आभासी जगातल्या पाच अब्ज लोकांपैकी नेमक्या आपल्याला हवे असलेल्या माणसांच्या टपाल पेटीत जाऊन पडायला काही सेकंद पुरेसे असतात. असे काही होऊ शकेल असे कुणी २५-३० वर्षांपूर्वी सांगितले असते तर ते कुणालाही खरे वाटले नसते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १५

मी लहानपणी अल्लाउद्दिनच्या जादूच्या दिव्याची गोष्ट ऐकली होती तेंव्हा तीसुद्धा मला खरीच वाटली होती. आपल्यालाही असा एखादा दिवा मिळावा  म्हणजे त्याला घासल्यावर त्यातून बाहेर आलेल्या जिन्नला सांगितले की आपल्याला हव्या असतील त्या वस्तू तो आणून देईल असे वाटले होते. पण खऱ्या जगात तसे काही असत नाही, आपल्याला हवे असलेल्या वस्तू स्वतःच परिश्रम करून मिळवाव्या लागतात याची जाणीव झाली. पूर्वी वस्तूच काय, माहितीसुद्धा सहजासहजी मिळत नसे. पुढे निरनिराळी जाडजूड पुस्तके आधी शोधून काढायची, मग  ती वाचून त्यातली माहिती मिळवायची आणि ती आपल्या वहीत लिहून काढायची हे करण्यात माझा सगळा जन्म गेला. अनेक वेळा इतर लोकांनी अशा प्रकारे जमवलेली माहिती त्यांच्या व्याख्यानांमधून किंवा लेखांमधून मिळत असे तीही टिपून ठेवावी लागत असे. आपल्याला हवी असेल ती माहिती लगेच मिळवण्याचे काही सोपे साधन नव्हते आणि कधी तरी ते उपलब्ध होऊ शकेल असेही वाटले नव्हते.


एका संगणकातली माहिती दुसऱ्या संगणकाकडे कशी पोचवायची यावर संशोधन करत असतांनाच नेटवर्किंग करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. पुढे त्याचा जगभर विस्तार करून इंटरनेटचा शोध लावला गेला. या महाजालावर असंख्य प्रकारची माहिती उपलब्ध असली तरी ती आपल्याला कोण देणार हा मोठा प्रश्न होताच. मग काही हुषार लोकांनी सर्च इंजिनांचा शोध लावला आणि ती इंजिने सगळ्या पब्लिकला फुकट उपलब्ध करून दिली.  या इंजिनांच्या चढाओढीत गूगलने बाजी मारली आणि ते इतके लोकप्रिय झाले की आंतर्जालावर माहिती शोधणे या अर्थाचे गूगलणे हे क्रियापद तयार झाले आहे.

गूगल नावाचा हा ब्रह्मराक्षस खरोखरच अल्लाउद्दिनच्या जिन्नसारखा महापराक्रमी आहे. त्याला नुसता एक शब्द सांगितला तरी तो शब्द  वेबस्पेसमधल्या कुठकुठल्या लेखात आला असेल त्या सगळ्या लेखांचे पत्ते निमिषार्धातआणून देतो. मग ते लेख वाचून त्यातून आपल्याला हवी असेल ती माहिती मिळवावी आणि आपल्या संगणकावरच साठवून ठेवावी किंवा आणखी कुणाला ती पुरवावी हे आता किती सोपे झाले आहे.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १६

पुराणकाळात एक विश्वामित्र नावाचे महर्षि होऊन गेले.  पुराणातले देव आणि दानव तर अनेक प्रकारचे चमत्कार करू शकत असतच, या ऋषींनीही  घोर तपश्चर्या करून अद्भुत सामर्थ्य प्राप्त करून घेतले होते. त्रिशंकु नावाच्या एका राजाला जिवंतपणीच स्वर्गात जायचे होते. त्याने विश्वामित्र ऋषींना शरण जाऊन आपली मनोकामना सांगितली.  विश्वामित्रांनी त्रिशंकूसाठी एक विशेष यज्ञ करून असे सामर्थ्य मिळवले त्यातून त्याला रॉकेटसारखे आकाशात उडवून दिले आणि त्याची स्वर्गाकडे रवानगी केली. पण स्वर्गाचा राजा इंद्र त्रिशंकूला स्वर्गात घ्यायला तयार नव्हता. त्याने त्रिशंकूला वरून खाली ढकलून दिले, पण विश्वामित्राने लावलेला जोर त्याला पृथ्वीवर येऊन खाली पडू देत नव्हता. त्यामुळे तो आकाशात अधांतरीच लटकत राहिला. मग विश्वामित्राने त्या त्रिशंकूसाठी त्याच्या आजूबाजूला एक प्रतिश्रृष्टी तयार करून दिली. त्याला लागणारे खाणेपिणे आणि इतर सगळ्या वस्तू त्याला तिथे बसून मिळायला लागल्या.


अल्लाउद्दिनच्या जिन्नसारखा महापराक्रमी गूगल इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या सगळ्या कोठारांच्या चाव्या आणून देतो, पण त्यातली कोठारे उघडून तिथे असलेली माहिती आपणच गोळा करायची असते.  त्यातली कुठली माहिती खरी आहे, कुठली भ्रामक आहे, कुठली मार्गदर्शक आहे, कुठली दिशाभूल करणारी आहे हे आपणच ठरवायचे असते आणि त्यानुसार तिचा उपयोग करून घ्यायचा असतो.


त्यानंतर आलेल्या एआयने याच्या पुढची पायरी गाठली आहे. ते वापरून काम करणारे आधुनिक विश्वामित्र फक्त माहिती मिळवून थांबत नाहीत तर तिचा उपयोग करून तुम्हाला हवा असेल तसा लेख, कविता किंवा कथा लिहून देतात, तुम्ही सांगाल तसे चित्र काढून देतात, गाण्याला चाल लावून तशी रील तयार करून देतात. ते  एक प्रकारचे प्रतिविश्व निर्माण करायला लागले आहेत. ते लोकही अजून नवखे असल्यामुळे त्यांच्या कामात कधीकधी चुका होतात, पण लवकरच ते सगळ्या जगाचा विश्वास संपादन करतील असे सांगितले जात आहे.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १७

अलीबाबा आणि चाळीस चोरांच्या गोष्टीतल्या गुहेला जादूचा दरवाजा होता. "खुल जा सिमसिम" असा मंत्र म्हंटल्यावर तो आपोआप उघडत असे आणि दुसरा एक मंत्र म्हंटला की तो आपोआप बंद होत असे. एरवी कुणीही कितीही जोर लावून तो दरवाजा उघडू किंवा बंद करू शकत नसे. लहानपणी ही गोष्ट ऐकतांना त्याची खूप मजा वाटत असे.


संत ज्ञानेश्वरांची एक आख्यायिका सांगितली जाते. त्यात एकदा ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे एका कट्ट्यावर किंवा अर्धवट बांधलेल्या भिंतीवर सकाळचे कोवळे ऊन खात बसले असतांना समोरून महायोगी चांगदेव महाराजांचे आगमन होतांना त्यांना दिसले. हे योगीराज एका वाघावर आरूढ झाले होते आणि त्यांचे हजारो शिष्यगण त्यांचा जयजयकार करत त्यांच्यासोबत चालत येत होते. ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला आज्ञा केली की चल, आपण पुढे जाऊन त्यांचे स्वागत करू आणि ती भिंत चालायला लागली. चांगदेवांने पाहिले की आपण सजीव वाघावर ताबा मिळवला असला तर हे महात्मे निर्जीव भिंतीला चालवत घेऊन येत आहेत. त्याचा सगळा ताठा तत्काळ गळून पडला आणि त्याने ज्ञानेश्वरांचे पाय धरले.


मी अणुशक्ती खात्यात नोकरीला लागल्यानंतर जे पहिलेच काम माझ्यावर सोपवण्यात आले त्यात एक सहा मीटर उंच, चार मीटर रुंद आणि एक मीटर जाड असा अजस्त्र आकाराचा दरवाजा तयार करून घ्यायचा होता. दोनतीन सेंटिमीटर जाड पोलादी पत्र्यांचे तुकडे कापून आणि त्यांना पुन्हा वेल्डिंगने जोडून एक इतका मोठा रिकामा डबा तयार करायचा होता आणि त्याच्या तळाशी चाके आणि काही यंत्रसामुग्री जोडायची होती. ती सगळी त्या डब्याच्या आतच बसवली होती. कोटा इथे बांधल्या जात असलेल्या आमच्या अणुविद्युतकेंद्रात या दरवाजाला उभे केल्यानंतर तो सिमेंट काँक्रीटने भरला गेला. तो दरवाजा म्हणजे एका भिंतीचा भाग होता आणि भिंतीसारखाच दिसत होता. त्याच्यापासून काही अंतरावर एका सुरक्षित जागी ठेवलेल्या पॅनेलवरील एक बटन दाबले की तो दरवाजा किंवा ती भिंत दोन मीटर मागे सरकून एका व्हॉल्टमध्ये जायचा मार्ग मोकळा करून देत असे. एक अजस्त्र आकाराचे यंत्र त्यातून व्हॉल्टच्या आत गेल्यावर पॅनेलवरील दुसरे बटन दाबले की ती भिंत पुढे सरकून ती मोकळी जागा भरून टाकत असे.  सगळी यंत्रसामुग्री अंतर्गत असल्यामुळे बाहेरून पहाणाऱ्याला असेच वाटायचे की ती भिंत स्वतःच चालत असावी.

(क्रमशः) 


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १८

मी कॉलेजात शिकत असतांनाच ऐकले होते की जर्मनी जपानमध्ये कारखान्यातली काही कामे कामगार न करता रोबो करतात. रोबोसाठी मराठीमध्ये यंत्रमानव हा शब्द वापरला जातो. पण त्याला माणसासारखे हातपाय, नाकतोंड, कान आणि डोळे असायलाच हवेत असे काही नाही हे मला नंतर समजले. त्या काळातच मी जे कारखाने पाहिले त्यात काही ठिकाणी ऑटोमॅटिक यंत्रे होती. त्यांना एक प्रोग्रॅम दिला की ती ते ठराविक काम आपल्याआप करून तंतोतंत एकासारखे एक अनेक पार्ट धडाधड तयार करत असत. नंतरच्या काळात अशी यंत्रे अधिकाधिक प्रमाणात तयार होत गेली आणि आता पारंपरिक साधी यंत्रेच दुर्मिळ झाली आहेत. आमच्या अणुभट्टीमध्ये तीव्र विकिरण (रेडिएशन) होत असल्यामुळे तिथल्या काही भागात मानवी कामगार जाऊच शकत नाही. अशा ठिकाणची यंत्रे दुरूनच म्हणजे कंट्रोल रूममधून चालवावी लागतात.  ती डिझाइन करून तयार करवून घेणे हेच काम माझ्याकडे होते. ते सगळे आपोआप चालणारे रोबोच होते. ते अशा प्रकारच्या हालचाली करायचे की त्यांना पाहून ते सजीव आहेत की काय अशी शंका यावी.


अलीकडच्या काळात हुबेहूब माणसासारखे दिसणारे, चालणारे आणि बोलणारे रोबो तयार होत आहेत. केरळमधल्या शाळेत अशी एक शिक्षिका मुलांना शिकवण्याचे काम करते असा व्हीडिओ प्रसृत झाला होता.  इतर कामे करणारे रोबोही तयार झाले आहेत आणि होत राहतील. कपड्यांच्या दुकानांमध्ये हुबेहूब माणसांसारखे दिसणारे पुतळे तर सर्रास असतात, यापुढे ते ग्राहकांशी बोलायलाही लागतील. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि यंत्रमानवशास्त्र (रोबोटिक्स) यांच्या संयोगातून पुढे कशा प्रकारची खोटी माणसे तयार होतील आणि ती या जगातल्या खऱ्या लोकांमध्ये बेमालुम मिसळून काय काय गोंधळ घालतील याची चिंता वाटायला लागली आहे.


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - १९

माणसाला जी बुद्धिमत्ता मिळाली आहे त्यात आकलनशक्ती, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती हे मुख्य भाग आहेत. माणसाला त्याच्या ज्ञानेंद्रियांकडून सतत कोणते ना कोणते संदेश मिळत असतात. डोळ्यांनी पाहिलेली दृष्ये किंवा अक्षरे, कानावर पडलेले स्वर किंवा शब्द, जिभेला मिळालेली चव, नाकाने घेतलेले वास आणि त्वचेला झालेले स्पर्श या सारखे असंख्य संदेश क्षणोक्षणी त्याच्या अफाट स्मरणात साठवले जातात आणि पुन्हा तशा प्रकारचा संदेश आला की पूर्वीच्या अनुभवांची आठवण आपोआप जागी होते. यावरूनच त्याला परिस्थितीचे आणि घटनांचे आकलन होत असते. 


त्याला कुठलीही घटना नेहमीपेक्षा वेगळी वाटली तर तो तिकडे जास्तच लक्ष देऊन पाहतो, कान टवकारून ऐकतो, चौकशी करतो आणि ती घटना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ती आपले नातेवाईक, शेजारी, मित्र वगैरेंना सांगतो, कधीकधी तर अनोळखी लोकांना सुद्धा सांगतो. ते लोक ती गोष्ट तिखटमीठ लावून आणखी अधिक लोकांना सांगतात. यामधूनच ती बातमी पसरत जाते. त्यातला बराचसा भाग खरा असला तरी  कधी कधी दिसते तसे नसते यातून होणाऱ्या गैरसमजामुळे किंवा सांगण्यातल्या ऐकण्यातल्या चुकीमुळे त्यात फरक पडत जातो आणि काही लोक  जाणून बुजून मुद्दाम खोट्या अफवा पसरवण्याचे काम करत असतात.  या सगळ्यांमुळे मौखिक माध्यमातून पसरणाऱ्या ऐकीव माहितीत सत्य आणि असत्य याची सरमिसळ असते.  प्रत्येक जण आपापल्या बुद्धीनुसार त्यातले काय समजण्यासारखे आणि किती पटण्यासारखे आहे हे ठरवत असतो. प्रत्येकाने ते करायला हवे. कुणीही काहीही सांगितले तर त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये. पण पूर्णपणे तसे होत नाही असे दिसते.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २०

पूर्वीच्या काळात जेंव्हा काही महत्वाचे कारण असेल तेंव्हा राजाचा शिपाई गावागावांमध्ये जाऊन दवंडी पिटत असे.  तो चौकात उभारून आपल्याकडच्या वाद्यातून ढण् ढण् असा आवाज काढून लोकांना  गोळा करत असे आणि चार लोक जमले की "ऐका हो ऐका" अशी सुरुवात करून बातमी, संदेश किंवा सूचना जोरात ओरडून सांगत असे. ग्रामपंचायत आणि नगरपालिकासुद्धा दवंड्या पिटत असत. आता पद्धत थोडी बदलली आहे. आमच्या हिंजवडी ग्रामपंचायतीची व्हॅन गावभर फिरते आणि त्यात बसलेला माणूस लाउडस्पीकरवरून अनाउन्समेंट करत असतो.


छापखान्यांचा प्रसार झाल्यानंतर कुठलीही माहिती, विचार आणि कल्पना कागदावर छापून आणि त्याच्या अनेक प्रती काढून त्या अनेक वाचकांपर्यंत पोचवण्याची सोय झाली. काही लोक छापील पत्रके वाटून आपले विचार जनतेपर्यंत पोचवायला आणि त्यांना काही कृति करायचे आवाहन करायला लागले. रोजच्या रोज कुठे काय घडते याची बातमी छापून तिचा प्रसार करण्यासाठी अनेक वर्तमानपत्रे निघाली. त्यात स्थानिक बातम्यांशिवाय जिल्ह्यात, राज्यात, देशात, परदेशात आणि अगदी अंतरिक्षात घडणाऱ्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली जायला लागली. जसजसे लोकांचे भूगोलाचे ज्ञान वाढत गेले तसतसे लोकांना आपल्या परिसराच्या बाहेर कुठे काय चालले आहे हे समजून घेण्याची उत्सुकता वाढत गेली. त्यातून वर्तमानपत्रे लोकप्रिय होत गेली.


पण रोज कुठे तरी खूप महत्वाची घटना घडतेच असे नाही. पण जी बातमी असेल तिला आकर्षक मथळा देऊन सनसनाटी करायचे तंत्र निघाले. त्याशिवाय लोकांनी आपले वर्तमानपत्र विकत घेऊन वाचावे यासाठी  बातम्यांबरोबरच अग्रलेख, व्यंगचित्रे, विनोदी चुटकुले, माहितीपूर्ण किंवा मनोरंजक लेख, राशी भविष्य, शब्दकोडे वगैरेंची खोगिरभरती होत गेली. अनेक वस्तूंच्या जाहिराती छापून यायला लागल्या. आम्ही खरे तेच छापतो असे बहुतेक सगळे वर्तमानपत्रवाले पूर्वीपासून सांगत आले आहेत आणि बहुतेक लोक त्यावर विश्वास ठेवतात. पण बहुतेक वर्तमानपत्रे चालवणारा एक वर्ग असतो. त्याचे काही राजकीय व सामाजिक विचार आणि हितसंबंध असतात.  त्या वर्तमानपत्रातल्या मजकुरावर त्यांची छाप पडत असते. आजकाल नॅरेटिव्ह या नावाची अर्धसत्ये सांगितली जातात. त्यात काही भाग खरा असला तरी त्यावर वेगळे रंग चढवलेले दिसतात.

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २१

ब्रिटिशांच्या काळातच त्यांनी मुंबईसारख्या महानगरांमध्ये रेडिओ स्टेशन्स सुरू केले होते. गुरुदेव टागोरांनी त्याला आकाशवाणी असे नाव दिले. पुराणातल्या कथांमध्ये आकाशवाणीमधून प्रत्यक्ष देवच काहीतरी सांगत असे.  ते १००% सत्य असणार यात काही शंकाच नव्हती. स्वातंत्र्यानंतर पुणे, नागपूर, सांगली यासारख्या अनेक शहरांमधून आकाशवाणीचे कार्यक्रम प्रसारित होऊ लागले. त्यात बातम्यांना खूप महत्व होते. एखादी घटना घडल्यानंतर त्याची बातमी वर्तमानपत्रात छापून ते वर्तमानपत्र लहान लहान गावापर्यंत पोचेपर्यंत दोन तीन दिवस उलटून जायचे. रेडिओवरील बातम्या त्याच्या आधी पोचायच्या. या कारणामुळे माझ्यासारखे रोज पेपर वाचणारे लोकसुद्धा रोज आवर्जून रेडिओवरच्या बातम्या ऐकत असत. १९७०च्या दशकात दूरदर्शन आल्यानंतरही काही वर्षे आम्ही रोज रेडिओ ऐकत होतो. हळू हळू ते कमी होऊन बंद झाले. पण अजूनही आकाशवाणी सुरू आहे आणि ती ऐकणारे श्रोते आहेत.


आकाशवाणी आणि दूरदर्शनवर बातम्या सांगणाऱ्या व्यक्ती एका काळी स्टार असायच्या. त्यांनी सांगितलेल्या बातम्या विश्वसनीय असायच्या.  हे दोन्ही केंद्रे सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे त्या बातम्यांवर काही बंधने असली, त्यात मोघमपणा असला तरी त्यात ठरवून केलेला खोटेपणा नसायचा. नंतरच्या काळात असंख्य खाजगी चॅनेल्स निघाली, त्यातली काही तर चोवीस तास फक्त बातम्याच प्रसारित करणारी आहेत.  त्यामुळे प्रेक्षकांना बातम्यांचे भरपूर वैविध्य मिळाले आहे. पण प्रत्येक वाहिनी चालवणाऱ्या लोकांचे विचार आणि हितसंबंध यामुळे  यात इतका गोंधळ आणि गोंगाट सुरू झाला आहे की शिरा ताणून तावातावाने भांडणाऱ्या लोकांमधल्या कुणाचे सांगणे खरे आहे आणि कुणाचे नाही हेच समजत नाही. त्यामुळे कंटाळून मी त्यांच्या बातम्या पाहणे सोडून दिले आहे.  

(क्रमशः)


सत्य, असत्य, मिथ्या, भ्रम, आभास, मोह, माया, कल्पना वगैरे - २२

अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही समांतर मार्गांवरून जाणारे वाटसरू आपण सत्याचा शोध घेत आहोत असेच सांगतात. अध्यात्मामध्ये उच्च पातळीवर जाऊन पोचलेल्या ऋषिमुनींनी  "ब्रह्म सत्यम् जगन्मिथ्या।" असा एका वाक्यात निर्णय देऊन टाकला आहे. पण हे जगच मिथ्या असेल तर त्यातल्या आपल्याला जाणवणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त आपल्याला होणारे भास असतात  हा विचार पचनी पडणे फारच कठीण आहे, हे सर्वसामान्य माणसाच्या कुवतीपलीकडचे आहे. 

विज्ञान मात्र आपल्या विश्वातल्याच निरनिराळ्या गोष्टींची अधिकाधिक माहिती मिळवून पुढे पुढे जाते आणि त्या माहितीच्या आधाराने विकसित होत जाणारे तंत्रज्ञान नवी नवी साधने तयार करायला मदत करते. जसजसे नवे शोध लागतात आणि नव्या तंत्रज्ञानाने नव्या गोष्टी समोर येतात तसतसे आपल्या सत्याबद्दलच्या जुन्या कल्पना कशा बदलत जातात याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न मी या लेख मालिकेत केला आहे.


विज्ञानाच्या जगात काही भिन्न प्रवाह निर्माण होऊन त्यातून तात्विक वाद निर्माण झाले यावर मी "विज्ञानातले द्वैत आणि अद्वैत" ही मालिका लिहिली होती. त्याला पूरक असे मुद्दे घेऊन ही मालिका सुरू केली आणि तिचा विस्तार होत गेला. आधीच्या मालिकेतले लेख एकत्र करून या ब्लॉगवर दिले आहेत.

https://anandghan.blogspot.com/2024/12/blog-post.html


(समाप्त)




Tuesday, March 11, 2025

निसर्गाच्या सान्निध्यात

 मी २०२३मध्ये अमेरिकेला जाऊन न्यूजर्सी स्टेटमधील एका लहानशा खेडेगावात चार महिने राहून आलो होतो. तिथे मला चोवीस तास निसर्गाच्या सहवासात रहायचा एक आगळा वेगळा अनुभव आला. त्याचे वर्णन मी मागच्या वर्षी फेसबुकावरील एका लेखमालिकेत केले होते. त्याचे संकलन या ब्लॉगमध्ये करून देत आहे.

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१

आमचे जमखंडीचे घर भरवस्तीत होते आणि तिथली सगळी घरे एकमेकांना खेटून उभी होती. आमच्या घराच्या तीन्ही बाजूंच्या भिंतींपलीकडे आमच्या घराला लागूनच दुसऱ्या लोकांची घरे होती. आमच्या दरवाजासमोर एक लहानशी मोकळी जागा होती, तिला आम्ही अंगण म्हणत असलो तरी त्या जागेत तीन बाजूंनी तीन दरवाजे उघडत असल्यामुळे तिचा उपयोग लोकांच्या जाण्यायेण्यापुरताच होता. आम्ही आमच्या गच्चीवरच पंधरावीस कुंड्या ठेवून त्यात तुळस, ओवा, पुदीना, गवतीचहा, कोरफड यासारखी उपयोगी आणि गुलाब, मोगरा, शेवंती वगैरे फुलझाडे लावली होती. आमच्या हायस्कूलच्या आवारात मात्र  एक खूप मोठा जुना वटवृक्ष आणि कडूनिंब, चिंचा, शमी, कवठ यासारखे आणखी काही  काही मोठमोठे वृक्ष होते आणि एक सुंदर फुलबागही होती.

अणुशक्तीनगर या वसाहतीला एका मोठ्या बगीचाचे रूप होते. त्यामुळे बिल्डिंगमधून खाली उतरल्यावर सगळीकडे हिरवळ आणि भरपूर झाडेझुडुपे दिसत होती. आम्ही मुंबईत असूनसुद्धा बरेचसे निसर्गाच्या कुशीत रहात होतो. पुण्यातल्या आदित्यगार्डन सिटीमध्येही त्या नावाला साजेशी बाग होती. मी हल्ली रहात असलेले ब्ल्यूरिज टाउनशिपसुद्धा हिरवाईच्या बाबतीत अणुशक्तीनगराची आठवण करून देणारे आहे. पण बिल्डिंगमधून लिफ्टने खाली उतरून काही अंतर चालत गेल्यावर मला त्या झाडाझुडुपांचा सहवास मिळतो.


गेल्या वर्षी मी अमेरिकेला जाऊन आलो तेंव्हा मला पहिल्यांदाच अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात रहायचा एक वेगळाच अनुभव मिळाला. न्यूजर्सीमध्ये माझ्या मुलाने एक छोटासा बंगला घेतला आहे. त्याच्या आजूबाजूला चांगली चारपाचपट मोकळी जागा आहे, त्यामुळे तिथे अंगणही आहे आणि परसही आहे. त्या संकुलातल्या सगळ्याच बंगल्यांच्या आवारात भरपूर मोकळ्या जागांमध्ये अनेक मोठमोठी  झाडे  लावून ठेवलेली आहेत. झाडांच्या जंगलात अधूनमधून घरे बांधली असावीत असा भास होतो. ती सगळी मेपल, ओक यासारखी माझ्या ओळखीची नसलेली अमेरिकेतली झाडे आहेत. पण त्या झाडांवर सतत काही पक्ष्यांची ये जा चाललेली असते, त्यातले चिमण्यांच्या आकाराचे दोन पक्षी फारच सुरेख दिसतात. मी तिथे असतांना अगदी घरात बसूनसुद्धा रोज सकाळसंध्याकाळ निरनिराळ्या पक्ष्यांचे काही मंजुळ तर काही कर्कश आवाज माझ्या कानावर पडत असत. त्या वेळी तिथल्या जास्वंदीच्या झाडांना भरभरून फुले आली होतीच, इतर अनेक अनोळखी झाडांनासुद्धा फुलांचा बहर आला होता. त्यामुळे सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक प्रशस्त पडवी होती. तिथे आणि बागेतही खुर्च्या ठेवल्या होत्या.  मी दिवसातला बराचसा वेळ तिथेच बसून रहात असे.


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -२

आमच्या तिथल्या घराच्या अंगणात म्हणजे समोर पण डाव्या बाजूला सुंदर लॉन आहे आणि कडेकडेला काही फुलझाडे आहेत. दरवाजाच्या समोरच्या एका झाडाला गोलगोल लिंबासारखी फळे येत होती. ती कसली हे आम्हाला समजत नव्हते. तिथल्या चिमण्या, कावळे किंवा ससेसुद्धा त्यांना खात नव्हते. आमच्याकडे आलेल्या एका अमेरिकेतल्या पाहुणीने सांगितले की ते अॅप्रिकॉट आहेत. सुका मेवा या स्वरूपातले जरदाळू आम्हाला माहीत होते, पण ते कसल्या प्रकारच्या झाडाला लागत असतील याची सुतराम कल्पना नव्हती.  गूगलवरून शोध घेतल्यावर त्याचे झाड आणि त्याची पाने आमच्या झाडासारखीच दिसली.  थोडासा धीटपणा करून ते फळ चाखून पाहिले, पण त्याची आंबटतुरट चंव कुणालाही आवडली नाही. त्या फळांना उन्हात ठेऊन सुकवून पाहिले, पण अमेरिकेत कडक ऊन पडत नव्हते. तिथल्या माफक उन्हात ती फळे सुकली नाहीत, सडतच गेली.  त्याचा सुका मेवा करायचे नेमके तंत्र माहीत नसल्यामुळे  या अॅप्रिकॉटच्या झाडाला लागलेल्या फळांना सुकवून त्यांचे खाण्यायोग्य जरदाळू बनवायला काही केल्या जमले नाही. कदाचित अॅप्रिकॉटमध्येही निरनिराळ्या जाती असतील आणि हे झाड वेगळ्या जातीचे असेल.

कमळाचे फूल नेहमी चिखलात उगवते म्हणून त्याचे पंकज असेही एक नाव आहे.  तलावात किंवा निदान पाण्याच्या डबक्यांमध्ये फुललेली कमळे मी भारतात अनेक ठिकाणी पाहिली आहेत. पण आमच्या अमेरिकेतल्या घराच्या परसातल्या एका झाडाच्या शेंड्यावर कमळासारखे दिसणारे फूल आले होते. आधी त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी स्टुलावर चढून त्याला निरखून पाहून घेतले. ते एक वेगळ्याच प्रकारचे झाड होते. नंतरही त्याला आणखी दोन तीन फुले आली.  त्यांच्या पाकळ्या झडून गेल्यावर त्यांची रसरशीत बोंडे त्या झाडाला लटकून रहात होती.








अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -३

आपण नेहमी असे पाहतो की काही झाडांची फुले सकाळी उमलतात आणि संध्याकाळपर्यंत कोमेजून जातात किंवा गळून पडतात, तर काही फुले झाडांवरच राहिली तर दोन चार दिवस टिकतात, पण ती वेचून देवांना वाहिली तर नंतर दिवसभरात त्यांचे निर्माल्य होते. झेंडूसारखी काही फुले जेमतेम आठवडाभर टिकतात, गुलाबाच्या फुलांची फांदी फ्लॉवरपॉटमध्ये पाण्यात बुडवून ठेवली तर ती फुले काही दिवस टवटवीत राहतात.  पण तीही त्या आधीच हळूहळू सुकायला लागतात. 


अमेरिकेत मला एक वेगळे आश्चर्य पहायला मिळाले.  या छायाचित्रात दाखवलेले दोन फुलांचे गुच्छ महिना उलटून गेला तरी तसेच टवटवीत राहिले होते. त्यातला एक माझ्या मित्राने आम्हाला भेट दिला होता आणि दुसरा आम्हीच बाजारातून आणलेला होता. ही फुले आणि पाने प्लॅस्टिकची  आहेत का अशी मला शंका आली म्हणून मी एक पान आणि पाकळी चुरगळून पाहिली आणि ती खरीच निघाली. पण यांच्यावर कसली रासायनिक प्रक्रिया केली होती की जेनेटिक मॉडिफिकेशन करून वनस्पतीची आगळी वेगळी जात तयार केली होती कोण जाणे. महिनाभरात त्यांची पानेसुद्धा मलूल झाली नाहीत की फुलांचा रंग बदलला नाही. महिनाभर आमच्या हॉलची शोभा वाढवून झाल्यावर त्यांनाच कदाचित कंटाळा आला असेल आणि हवाबदल हवासा वाटत असेल म्हणून आम्ही त्यांना हॉलमधून उचलून निसर्गाच्या संगतीत आणून ठेवले. तिथेसुद्धा ती आणखी एकदोन महिने ताजीतवानी राहिली होती.


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -४

आमच्या अमेरिकेतल्या घराच्या अंगणात आणि परसात म्हणजे पुढच्या आणि मागच्या बाजूला असलेल्या मोठ्या मोकळ्या जागेत आधीच्या रहिवाशांनी लावलेले सातआठ मोठे वृक्ष आणि अनेक लहान लहान झाडे होतीच. एक दोन ठिकाणी लहान लहान वाफे तयार करून फुलझाडे लावलेली होती आणि रानफुलांची अनेक झाडेही उगवलेली होती. अंगणात सगळीकडे आणि परसात एका बाजूला लॉन होते. तिकडे बंगल्यांच्या आवारात उगवणारे अपरंपार गवत आणि कुपण अस्ताव्यस्त अवस्थेत ठेवता येत नाही, त्याला छाटून व्यवस्थित आकारात ठेवणे आवश्यक असते.  सकाळ संध्याकाळ "लॉन मोविंग" नावाने या गवताची हजामत करणे हा इथल्या रहिवाशांचा आवडता छंद आहे. पण तेवढा वेळ, तेवढी चिकाटी आणि तेवढे बळ कुणाच्या अंगात नसल्यामुळे आम्ही याचे कंत्राट एका एजन्सीला दिले होते.  त्यांची चार माणसे एका व्हॅनमध्ये दोन तीन यंत्रे घेऊन येत आणि पंधरा वीस मिनिटात सगळ्या परिसरातले गवत आणि कुपणावरील झुडुपे छाटून साफसूफ करून जात असत.  

मी मुंबईमध्ये काही लोकांना गवतावर अनवाणी पायाने येरझारा करतांना पाहिले होते. त्यामधून योग आणि अॅक्यूप्रेशर या दोन्हीचे फायदे शरीराला मिळतात असे सांगितले जाते. पण पुण्यामुंबईत कुठेही सार्वजनिक जागेत लॉन असले तर त्यावर माणसांना चालायला बंदी असते. न्यूजर्सीच्या जागेत आमच्या मालकीचे हक्काचे लॉन होते. तिथे आम्हाला अडवणारा कोणी नव्हता. त्या गवतात पायाला बोचणारे काटेही नव्हते आणि विंचूसापांची भीती नव्हती.  यामुळे मी रोज सकाळी कोवळे ऊन अंगावर घेत तिथल्या तिथेच वीस पंचवीस मिनिटे अनवाणी पायांनी फेऱ्या मारून घेत होतो.

----

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -५

आमच्या अमेरिकेतल्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत  काही मोठे वृक्ष आणि लहान झाडे होती पण उरलेली बरीचशी जागा पडीक होती. आम्ही तिथे काही फुलझाडे, शोभिवंत पानांची झाडे आणि थोडा भाजीपाला वगैरे उगवायचे प्रयत्न करायचे ठरवले. घरात कुणालाच या बागकामाचा फारसा अनुभव नव्हता आणि तेवढ्यासाठी माळी ठेवणे परवडणारे नव्हते. थोडी जागा सपाट करून घेतली आणि त्यावर माती पसरून लहान लहान वाफे तयार केले. बाजारातून काही रोपे आणून त्यात लावली. त्यांना पाइपातून पाणी देण्याची व्यवस्था होतीच. रोज एकेका रोपट्याला आलेले नवे कोंभ, पाने,फुले, फळे वगैरे निसर्गाची किमया पहातांना कौतुक वाटत होते. त्याने आमचा उत्साह थोडा थोडा वाढत गेला. लाकड्याच्या फळ्यांचा एक संच आणला आणि त्यांना एकमेकांशी जोडून, त्यात माती भरली आणि आणखी दोन वाफे तयार केले. त्यात आणखी थोडी रोपे आणून लावली.

तिथल्या सपाट जमीनीवर लाकडाच्या फळ्यांचा एक चौकोन करून ठोकून घेतला आहे. त्यावर टेबल खुर्च्या ठेवल्या होत्या. तिथे बसून कोवळे ऊन आणि वाऱ्याच्या मंद झुळुका अंगावर घेत गप्पा मारता मारता चहाफराळ करतांना वेगळीच मजा येत होती. पण हे सुख जास्त दिवस मिळाले नाही. काही दिवसानंतर तिथे रोजच पाऊस पडायला लागला. त्यामुळे त्या टेबल खुर्च्यांना उचलून पडवीत आणावे लागले.  

--------

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -६


 मला समजायला लागल्यापासूनच तुळस ही वनस्पती माझ्या चांगल्या ओळखीची होती. आम्ही आमच्या गच्चीवरल्या बागेतल्या कुंड्यांमध्ये अनेक तुळशीची रोपे लावली होती, किंवा तुळशीचे बी जमीनीत पडून ती आपोआप उगवत होती. त्यांना रोज पाणी देऊन आणि लक्ष ठेऊन त्यांना जगवत ठेवणे हे अत्यावश्यक कर्तव्य समजले जात होते. वर्षातून एकदा तर या तुळशीमाईचे बाळकृष्णाबरोबर विधीवत लग्न लावण्याचा विधी केला जात होता. एरवीसुद्धा रोज पूजा करतांना देवांना तुळशीची पाने वाहिली जात होती. घरात कुणाला खोकला झाला किंवा घसा खवखवत असला तर तुळशीची पाने खाऊन त्याला आराम मिळत असे हा औषधी उपयोगही होताच. नंतरच्या आयुष्यातसुद्धा आम्ही नेहमीच घरातल्या एकाद्या कुंडीमध्ये एकादे तरी तुळशीचे रोप लावून ठेवतच आलो आहोत. 

बेसिल नावाचा प्रकार मात्र मी भारतात कधीच पाहिला नव्हता. मी पूर्वी कधीतरी कुठेतरी असे वाचले होते की तुळशीला इंग्रजीमध्ये बेसिल म्हणतात. म्हणजे जसे गायीला काउ किंवा घोड्याला हॉर्स म्हणतात तसेच हे तुळशीचे इंग्रजी नाव असेल अशी माझी समजूत होती. एकदा मी फेसबुकवर तुळस आणि बेसिल या झाडांवर एक पोस्ट वाचली तेंव्हा कुतूहलाने मी त्यांच्यात काय फरक आहे अशी विचारणा केली.  लगेच त्याचे उत्तर मिळाले आणि बॉटनीनुसार या दोन्ही एकाच जातीच्या पण वेगवेगळ्या वनस्पती आहेत एवढी किंचितशी भर माझ्या ज्ञानात पडली. 

मी अमेरिकेत असतांना आम्ही या दोन्ही वनस्पतींची रोपे आणून आमच्या लहानशा वाटिकेत लावली. ती तिथे चांगली रुजली, फोफावली आणि त्यांना मंजिरीही आल्या. तुळशीचा उपयोग औषधी म्हणून आणि धार्मिक कामांसाठी आहे, जेवणामध्ये कुणी तुळशीची भाजी, चटणी किंवा कोशिंबीर वगैरे करत नाहीत. फार तर नैवेद्याच्या शिऱ्यावर तुळशीचे पान ठेवतात. दान देतांना त्या दानावर तुळशीचे पान ठेवले जात असावे. यावरून  "हलवायाच्या घरावर तुळशीपत्र " अशी म्हण प्रचारात आली आहे.

अमेरिकेत बेसिलची पाने चक्क सॅलडमध्ये घालून जेवणात खाल्ली जातात. आम्हीही अधून मधून खात होतो. दोन्हींच्या चवींमध्ये किंचित साम्य वाटते, पण जाणवण्याइतका फरक असतो. तुळशीच्या पानाच्या मानाने बेसिलचे पान बरेच सौम्य असते. तुळशीचे झाडही दिसायला जरा गंभीर प्रवृत्तीचे वाटते तर बेसिल त्या मानाने खूपच तजेलदार दिसते.  

Tulasi : Scientific name: Ocimum tenuiflorum, Family: Lamiaceae

Basil : Scientific name: Ocimum basilicum

------

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -७

आमचा बागकामाचा आधीचा एकत्रित अनुभव बाल्कनीमधल्या कुंड्यांमध्ये लावलेल्या तुळस, गवती चहा, गुलाब, मोगरा, मनी प्लँट वगैरेपर्यंतच मर्यादित होता. या झाडांना पाणी देत राहिले तर ती पुण्यामुंबईच्या हवामानात काही वर्षे टिकून राहतात. पण भाजीपाला एकाच हंगामापुरता असतो असे ऐकले होते. आम्ही कधीच बाल्कनीमध्ये भाजीपाला पिकवला नव्हता. त्यामुळे कुठले झुडुप (किंवा वेल) किती मोठे होईल आणि त्याला किती फळे लागतील याचा कुणालाही काही अंदाज नव्हता. न्यू जर्सीमध्ये थंडीच्या दिवसात भरपूर बर्फ पडतो आणि जमीनीवर साचून राहतो. आम्ही लावत असलेली कुठलीच झाडे त्या वातावरणात तग धरून राहू शकतील अशी अपेक्षा आम्हाला नव्हती. आमची सगळी बागायती फक्त चार पाच महिन्यांपुरती असणार याची जाणीव होती.  तरीही केवळ हौस म्हणून आम्ही हा प्रयोग करून बघत होतो.

आम्ही भोपळा, वांगी, टोमॅटो, भेंडी, सिमला मिरची आणि साधी मिरची यांची दोन दोन रोपे आणून आमच्या परसातल्या बागेत लावली होती. त्यातली बहुतेक सगळीच रोपे तिथे रुजली, बघता बघता त्यांना कोंभ फुटले, फांद्या, पाने, फुले आली आणि भोपळ्याचा अपवाद वगळता फळधारणाही झाली. या झाडांमध्ये रोजच्या रोज होत असलेले बदल पहायचा मला छंदच लागला होता. दोन्ही प्रकारच्या मिरच्यांना भरघोस फळे आली आणि त्यांचा स्वयंपाकात उपयोग झाला.  वांगी किती मोठी होतील हे पहाण्यासाठी आम्ही वाट पहात राहिलो, कारण दोन तीन लहान वांग्यांची भाजी अगदीच कमी झाली असती. मोठ्या फुगलेल्या वांग्यांमधून दोनतीन वेळा भरीत झाले. दोन्ही प्रकारच्या टोमॅटोंनाही  सॅलड किंवा कोशिंबीर करण्यासाठी पुरेशी फळे आली.  भेंडीच्या झाडाला एक दोनच भेंड्या लागत होत्या, तेवढ्याची भाजी कुणाला पुरणारी नव्हती. त्या किती मोठ्या होतात हे पाहण्याच्या नादात जून होऊन गेल्या आणि खाण्याच्या लायकीच्या राहिल्या नाहीत. 



भोपळ्याचा वेल सरसर वाढला आणि कुंपणावर चढून पसरला. त्याला मोठमोठी सुंदर फुलेही येत होती, पण फळधारणा काही झाली नाही. बहुधा एकाच झाडातल्या फुलांमध्ये स्त्रीकेसर आणि पुंकेसर तयार  होत नसावेत. या छंदावर किती खर्च झाला आणि भाजीपाल्याचे किती पैसे वाचले याचा हिशोब ठेवला नव्हताच. जो काही नफा किंवा तोटा झाला असेल तो नगण्यच असणार. पण आपल्या बागेतली ताजी ताजी ऑर्गॅनिक भाजी खायला मिळण्याचे कौतुक आणि समाधान मिळाले,  थोडा अनुभव मिळाला, अंदाज आला.


------


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -८

मी चार वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलो होतो तेंव्हा कॅलिफोर्नियातल्या टॉरेन्स गावात रहात होतो. तिथल्या आमच्या घरासमोरच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रस्ता आणि इमारती यांच्यामध्ये चार पाच मीटर रुंद इतकी मोकळी जागा ठेवलेली होती आणि त्यावर दाट गवताचा हिरवागार गालिचा पसरलेला होता, 'त्या सुंदर मखमालीवरती' जागोजागी नाजुक फुलराण्या खेळत होत्या, त्या जागांमध्ये अनेक लोकांनी तऱ्हेतऱ्हेची सुंदर फुलझाडे लावली होती आणि सर्वांनीच त्यांना हिरव्यागार घनदाट झुडुपांचे सुंदर कुंपण घातले होते. मैलोगणती लांब रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट हिरवळ आणि सुंदर फुलांचे ताटवे पसरले होते. 


न्यू जर्सीला उद्यान राज्य (गार्डन स्टेट) असे म्हणतात, पण मी तिथल्या साउथ प्लेन फील्ड नावाच्या अप्रसिद्ध अशा  लहानशा गावात राहिलो होतो. त्या भागात असे प्रशस्त रस्ते नव्हते. खरे तर तिथे सगळीकडे वृक्षांची गर्दी असलेले जंगल होते आणि त्यात मधून मधून घरे डोकावत होती. त्यातही मोठ्या इमारती कमीच होत्या, सगळीकडे टुमदार लहान लहान बंगले दिसत होते. त्या बंगल्यांच्या आवारातसुद्धा प्रत्येकाने लहानसे लॉन आणि खूप फुलझाडे लावली होती. मी तिथे असतांना या सगळ्या फुलझाडांना बहर आला होता. तिथे सहसा कुणी झाडांवरील फुले तोडत नाही. काही फुले आपल्याआप गळून जमीनीवर त्यांचा सडा पाडतात, तर बहुतेक फुले दीर्घ काळ झाडांच्या फांद्यांवर हसत राहतात. इथल्या बहुतेक झाडांना फुलांचे गुच्छ लागतात असे दिसले. अगदी गवतातूनसुद्धा फुलांचे भरघोस पीक आले.


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -९  :  अमेरिकेतल्या म्हाताऱ्या

आमच्या शाळेजवळ काही सावरीची झाडे होती. त्यांना लांबट आकाराच्या लांबट आकाराच्या मोठ्या शेंगा लागायच्या आणि एक दिवस त्या वाळून फुटायला लागल्या की त्यांच्या आतला कापूस भुरुभुरु बाहेर निघायचा आणि वाऱ्यावर तरंगत इकडे तिकडे उडत पसरायचा. त्याला आम्ही म्हातारी म्हणत होतो, हवेतून उडणाऱ्या एकेका म्हातारीला हळूच पकडून त्यांना गोळा करत होतो आणि घरी नेऊन काडेपेटीमध्ये भरून ठेवत होतो. मला ही सगळी मजा अजून आठवते.


 न्यूजर्सीमध्ये रहात असतांना मला आमच्या अंगणातच अधून मधून एकादी म्हातारी उडत जातांना दिसायची, पण आसपास कुठेच सावरीचे झाड दिसत नव्हते. एकदा मला आमच्या बागेतच एक अगदी लहानसे झुडुप दिसले, त्याला शेंगा लागल्या नव्हत्या, पण म्हाताऱ्यांचा झुबका वाटेल अशी गोल आकाराची फुले लागली होती आणि प्रत्येक फुलातून अनेक म्हाताऱ्या एक एक करून हळूच बाहेर सटकत होत्या. निसर्गाचीही किती गंमत आहे ना? भारतात सावरीचे उंच झाड आणि त्यातून एकदम बाहेर पडणाऱ्या हजारो म्हाताऱ्या आणि इथे लहानशा झाडाच्या फुलामधून एकेकटी बाहेर पडणारी म्हातारी! 


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१०

मी  पोथ्या, स्तोत्रे किंवा हिंदी साहित्यामध्ये कदंब हे नाव वाचले होते, पण प्रत्यक्षात हे झाड कसे दिसते हे मी कदाचित कधी पाहिलेही असले तरी मला कुणी त्याचे नाव सांगितले नव्हते. आतापर्यंत मी कधीच कदंबाचे फूल किंवा फळ कुणाकडे  किंवा बाजारातही पाहिलेले नाही.  मी एकदा वॉट्सॅपवर येणाऱ्या ढकलचित्रांमध्ये  कदंबाच्या नावाने चेंडूसारख्या गोल फुलाचे एक चित्र पाहिले आणि लक्षात आले की अमेरिकेत आमच्या घराच्या समोरच  काटेरी लाडवांसारखी खूप गोल गोल फुले किंवा फळे खाली पडलेली दिसत होती. मला वनस्पतीशास्त्राचे काहीच ज्ञान नसल्यामुळे तो कोणता वृक्ष होता कोण जाणे, कदंब तर नसेलच. 


 न्यूजर्सीमध्ये आमच्या घराच्या आसपास असलेली पूर्वीची सगळीच झाडे मला अनोळखी होती. पण मी दिवसभर त्यांच्याच सान्निध्यात रहात आणि फिरत असल्यामुळे त्यांना येणारी पाने, कळ्या, फुले वगैरेंचे निरीक्षण हाच माझा तात्पुरता छंद झाला होता. त्या तीन चार महिन्यांच्या काळात हे बदल होत होत त्या झाडांना लहान लहान फळेसुद्धा लागली. त्यातली काही काटेरी तर काही गोलमटोल होती. अॅप्रिकॉटच्या झाडाला लिंबासारखी पिवळी गोल फळे लागली होती. एका झुडुपाला आलेले लालचुटुक फळांचे घोस तर फारच गोड दिसायचे. माहिती नसतांना  ते चाखून पहाणे धोकादायक असल्यामुळे मी तसे काही केले नाही. फक्त त्यांचे फोटो काढून ठेवले.

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -११

आपल्याकडे वर्षात सहा ऋतूंचे सहा सोहळे असतात. तरी बहुतेक सगळे मोठे वृक्ष वर्षभर हिरवेच दिसतात. त्यांना नवी पाने येणे आणि जुनी पाने गळून पडणे हे कमी जास्त प्रमाणात वर्षभर चाललेलेच असते.  अमेरिकेत चारच ऋतू असतात, स्प्रिंग, समर, फॉल आणि विंटर. तिथल्या स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूत सगळ्या झाडांना भराभर पानेफुले यांचा जोरात बहर येतो तो समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात टिकून राहतो. तिथला उन्हाळा कडक नसून आल्हाददायक असतो. फॉल किंवा ऑटम सीझनमध्ये पानांचा रंग बदलत जातो. हिरवी गार पाने पिवळी तांबूस होत ब्राऊन कलरची होतात, सुकत जातात आणि गळून पडायला लागतात. विंटर सीजनपर्यंत बहुतेक सगळी मोठी झाडे निष्पर्ण झालेली असतात आणि त्यांच्या फांद्यांचे सांगाडे उरलेले असतात. 



मी यापूर्वी दोन वेळा अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा सप्टेंबर म्हणजे फॉल सीजनमध्ये तिथे पोचलो होतो आणि जानेवारीपर्यंत राहिलो होतो. त्या वेळी मोहक फॉल कलर्स पाहिले होते तसेच नंतर उघडी बोडकी झालेली झाडेही पाहिली होती. या वेळी मी जूनमध्ये तिथे गेलो तेंव्हा फुलांना येत असलेला भरपूर बहार पाहिला. पण ऑक्टोबरमध्ये परत येईपर्यंत फॉल सीझन सुरू झाला होता. हिरवीगार रसरशित दिसणारी पाने मलूल व्हायला लागली होती आणि काही झाडांच्या खाली सुकलेल्या पानांचा सडा पडलेला दिसायला लागला होता.      


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१२



"वृक्षवल्ली आम्हा सोयरी" असे संत तुकोबांनी एका अभंगात म्हंटले आहे. निसर्गामध्ये झाडांबरोबर वेलीही आल्याच समजा.  माझ्या न्यूजर्सीच्या वास्तव्यात मी प्रथमच इतक्या वृक्षांच्या सान्निध्यात रहात होतो आणि रोज त्यांना अगदी जवळून न्याहाळत होतो. हे महाभाग कधी एकटे सडेफटिंग नसतात. कुठे त्यांच्या अंगाखांद्यावर वेली लपेटलेल्या असतात, काही बांडगुळे मजेत रहात असतात, तर कुठे किलबिल करणाऱ्या पक्ष्यांनी घरटी बांधलेली असतात. त्यांच्या खबदाडांमध्ये  असंख्य किडे, मुंग्या वगैरे बारीक जीव लपून बसलेले असतात किंवा इकडे तिकडे फिरत असतात. या चित्रातल्या वृक्षाची साल पाहिली तर त्यात किती किचकट डिझाइनची वीण दिसते. त्याच्या बुंध्यावर शेवाळ्यानेच वस्ती केली होती आणि त्यावर आपला हिरवा शालू पांघरला होता.

आमच्या परसात आपोआपच उगवलेली रानटी झुडुपे आणि त्यांच्यातच मिसळलेल्या वेली यांनी काही भागात भरगच्च किंवा घनदाट हिरवाई तयार केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर नाजुकशी रानफुले किती मोहक दिसत होती. आमच्या कुंपणाच्या या टोकापासून त्या टोकावर वेलींनी चढून कबजा केला होता. कुंपणापलीकडे असलेल्या एका वीस पंचवीस फूट उंच झाडाला वेलींनी विळखा घातला होता आणि त्या झाडावर चढत चढत त्याचा शेंडा गाठला होता. ही सगळी निसर्गाची किमया पाहतांना त्याचे कौतुक वाटत होते. 


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१३

माझ्या लहानपणी आमच्या घरी गायीम्हशींचा गोठा किंवा घोड्याचा तबेला नव्हता. गुरंढोरं, गायीची वासरं वगैरेंशी माझा कधीच जवळचा संबंध आला नव्हता. आमच्याकडे फारशी स्थावर जंगम मालमत्ता नसल्यामुळे तिची राखण करण्यासाठी आम्हाला कुत्रे पाळायची गरज नव्हती. त्या काळात घराचे दरवाजे दिवसभर उघडे  रहात असल्यामुळे गल्लीतील मांजरे हळूच आत शिरायची आणि दूध, दही उघडे दिसले तर गट्ट करायची. आम्ही त्यांना शक् शुक् करून पळवून लावत होतो. कुठलेच मांजर कधी प्रेमाने माझ्याजवळ येऊन बसले नाही आणि मीही कधी त्याला जवळ घेऊन कुरवाळले नाही. गावातली काही माकडे उड्या मारत आमच्या गच्चीवर यायची, आम्ही त्यांनाही हाडहूड करून पळवूनच लावत होतो. मी  पुढे आयुष्यभर फ्लॅटमध्ये रहात असतांना त्यात कुठले जनावर पाळणे मला तरी अशक्य वाटत होते. एक तर मला मनातून तशी आवड नव्हती आणि आम्हाला कुठे बाहेर जायचे असले तर त्या प्राण्याचे काय करायचे हा प्रश्न होता. अशा कारणांमुळे आतापर्यंत मी कधी कुठल्या पाळीव प्राण्याला  जवळ घेतलेच नव्हते. 

पण न्यूजर्सीला बंगला घेतल्यानंतर तिथे एक कुत्रा पाळायचा असे मुलांनी ठरवले आणि मायलो नावाचे एक क्यूट पिलू दत्तक घेतले. मला याची बातमी भारतात असतांनाच मिळाली होती. पण अमेरिकेला गेल्यावर तो आपले स्वागत कसे करेल याबद्दल मनात थोडी धाकधुक होती. पण मी न्यूजर्सीला घरात गेल्यावर हा क्यूट मायलो आपणहून येऊन मला बिलगला आणि त्याने पहिल्या भेटीतच माझ्याशी गट्टी केली. तो माझ्यावर अजीबात भुंकला नाही. आमचे हे बाळ खूपच प्रेमळ होते. त्याला बोलता येत नसले तरी तो मनातल्या भावना आपल्या चेहेऱ्यावर आणि डोळ्यातून व्यक्त करत असे. मी सोफ्यावर किंवा परसात खुर्चीवर बसलेलो असतांना तो माझ्याशी लगट करत असे. पण मी त्याला माझ्या अंथरुणात येऊन कुशीत झोपायला मात्र परवानगी दिली नाही कारण माझ्या स्वच्छता आणि हायजिनच्या ताठरलेल्या कल्पना मला तसे करू देत नव्हत्या. तिथे बंगल्याबाहेर खूप मोकळी जागा असल्यामुळे तो स्वैरपणे आतबाहेर करत असे. त्याला कसे ट्रेन केले होते कोण जाणे पण तो नेहमी बाहेर परसात जाऊनच नैसर्गिक विधी करून येत असे.  त्याच्यासाठी खास प्रकारचे अन्न (डॉगफूड) आणून ठेवलेले असे. त्यातही काही व्हरायटीज होत्या आणि त्यात त्याची पसंती नापसंती असायची. 

अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१४

न्यूयॉर्क महानगराला लागून असलेले न्यूजर्सी स्टेट म्हणजे पूर्णपणे शहरीकरण झालेला भाग असेल अशी माझी समजूत होती आणि ती काही अंशाने बरोबरच होती. पण इथले शहरीकरण जरा वेगळे आहे. मी ज्या भागात रहात होतो तिथे क्षितिजावर दूर दूरपर्यंत एकही गगनचुंबी उंच इमारत दिसत नव्हती. सगळीकडे सुटी सुटी दोन मजली घरे आणि त्यांच्या चारी बाजूला ताड माड उंच झाडे आणि लहान लहान झुडुपे यांनी नटलेले बगीचे पसरले होते. या राज्यात अमेरिकेतली सर्वात दाट वस्ती आहे. पण त्याबरोबरच तिथे घनदाट जंगलेही आहेत.  न्यूजर्सीच्या ज्या भागात आम्ही राहतो तिथे अजूनही आजूबाजूला चांगले मोठे मोकळे रान आहे आणि त्यात हरणे आणि ससे मुक्तपणे वावरत असतात. कधीकधी ते धीटपणे आमच्या संकुलातही शिरतात आणि हिरव्या गार गवतांच्या गालिचांवर ताव मारत हुंदडत असतात. त्यांना खाणारे वाघसिंह तर इथे नाहीतच, लांडगे, कोल्हे किंवा अस्वलेही असलीच तरी ती फार कमी असावीत. ती कुणाच्या नजरेला पडल्याचे मी ऐकले नाही. इथे मला हरणांचा कळप दिसला नाही, पण एक दोन हरणे न घाबरता आमच्या वस्तीत येतात, थोडे फार चरतात आणि रानात पळून जातात. त्या मानाने ससे जास्त प्रमाणात दिसतात. आमच्या अंगणातल्या झाडांवरून खालीवर पळणाऱ्या खारी तर मला रोजच दिसत होत्या.

सगळ्याच लहान मुलांना ससा या प्राण्याचे खूप आकर्षण असते, तसे मलाही होते. आमच्या गावाजवळच्या रानावनातही कदाचित कधीकाळी ससे, हरिणे यासारखे सुंदर प्राणी रहात असावेत, पूर्वी तिथे वाघसुद्धा होते. माझ्या वडिलांनी एकदा वाघाला पाहिले होते. पण माणसांनी केलेले वृक्षतोडीमुळे माझ्या लहानपणापर्यंत तिथे गावाच्या जवळपास कुठे घनदाट जंगलही शिल्लक राहिले नव्हते आणि हे सगळे वन्य प्राणी  तिथून दूर पळून गेले असतील. मी फक्त दोन तीन वेळा कोल्हेकुई ऐकली होती, पण लबाड कोल्हाही कधीच नजरेला न पडल्यामुळे तोही गोष्टींपुरताच राहिला होता.  कधीतरी आमच्या गावात येणाऱ्या सर्कशींमध्ये वाघसिंह, हत्तीघोडे असायचे, पण मी तिथेही कधी हरिण किंवा ससे पाहिलेले आठवत नाहीत. मला नंतरच्या काळात निरनिराळ्या प्राणीसंग्रहालयांमध्ये सगळे वन्य प्राणी पहायला मिळाले. 

मी एकदा कुणाच्या तरी घरी पाळलेले ससे जवळून पाहिले होते, ते पांढरेशुभ्र आणि गुबगुबित होते. "ससा ससा दिसतो कसा? कापुस पिंजून ठेवला जसा" या बालगीतात शोभून दिसणारे होते.  आमच्याच अंगणात आलेल्या एका सशाच्या जोडीला मी कॅमेरात कैद केले, पण त्यांना बघून मला म्हणावेसे वाटले, "सशा सशा, तू दिसतोस असा कसा ?  राख फासलेला गोसावडा जसा!" 


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१५

मी पूर्वी अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा आमच्या घराच्या मागेच एक मोठा तलाव होता आणि त्या तळ्यात काही काळी 'बदके सुरेख' होती. ती कधी पाण्यावर तरंगायची तर कधी जमीनीवर येऊन क्वाक् क्वाक् करत एका रांगे मध्ये ऐटीत चालायची. ती सगळी बदके चांगली माणसाळलेली होती आणि बिनधास्त जवळ येत असत किंवा कुणाचीही पर्वा न करता आपल्या मार्गाने मार्च करत निघून जात असत. ती कुणाच्या मालकीची होती माहीत नाही, पण त्यांची कॉलनीतल्या सगळ्यांशी मैत्री होती, लहान मुलांशी थोडी जास्तच होती. 

या वेळी न्यूजर्सीमध्ये आमच्या आवारात अशी बदके नव्हती, पण घराच्या अंवती भंवती असलेल्या झाडांवर अनेक पक्ष्यांची वस्ती होती. त्यांची किलबिल तर चाललेली असेच, एखादा पक्षी किंवा त्यांची जोडी झाडावरून उडून समोरच्या गवतावर येऊन किडे वगैरे शोधत असे किंवा लगेच उडून समोरच्या कुंपणावर जाऊन बसत असे. फोटोत दाखवलेला देखणा पक्षी जरा जास्तच धीट होता. तो नेहमी आमच्या ओसरीवरही येऊन बसत असे. न्यूजर्सीमध्ये अजूनही ओव्हरहेड वायरींमधून वीजपुरवठा होतो. आमच्या घरामागच्या अशा तारेवर अनेक पक्षी एका रांगेत बसलेले दिसायचे. 


अमेरिकेतल्या निसर्गाच्या सान्निध्यात -१६

मी लहानपणी एका लग्नासाठी मुंबईला आलो होतो तेंव्हा गेटवे ऑफ इंडियापासून हँगिंग गार्डनपर्यंतचा भाग पाहिला होता. त्यातले तारापोरवाला अॅक्वेरियम मला सर्वात जास्त आवडले होते. मी मुंबईला स्थाइक झाल्यानंतर आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही ते मत्स्यालय दाखवत होतो आणि त्यांनाही ते आवडत असे.  चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात घरात एक लहानसा फिश टँक ठेवायची फॅशन आली होती तेंव्हा आम्हीही आमच्या हॉलमध्ये एक लहानसा काचेचा फिशटँक थोडे दिवस ठेवला होता. त्यात एक दोन इंच आकाराचे पिटुकले मासे आणून सोडत होतो आणि त्यांना खास खाद्य आणून पुरवत होतो. त्या लहानशा जागेत होत असलेली माशांची हालचाल पहात होतो. पण तो छंद फार काळ टिकला नाही. 


न्यूजर्सीच्या आमच्या घरातच्या मागील बाजूला असलेल्या ओसरीला लागूनच एक जवळ जवळ वीस फूट लांब आणि चारपाच फूट रुंद असा मोठा टँक होता, त्याची खोली किती होती याचा अंदाज लागत नव्हता कारण पाणी थोडे गढूळ झालेले असल्यामुळे त्या टाकीचा तळ वरून दिसत नव्हता.  त्यात २०-२२ लहानमोठे रंगीबेरंगी मासे होते.  ते सतत त्या पाण्यात पोहत फिरत असायचे. कधी एकटे तर कधी गटागटाने खालून वर येऊन पाण्याच्या पृष्ठभागावर यायचे तर कधीखाली जाऊन लपून बसायचे. पण  माणसे काठावर येऊन त्यांना पहायला लागली की त्यांच्याकडून काही खायला मिळणार आहे एवढे त्यांना समजायचे. ते आमच्याकडे वर पहात आपल्या तोंडाची उघडझाप करायचे आणि आम्ही त्यांचे खास खाद्य पाण्यात टाकले की त्यावर तुटून पडायचे.  या माशांचे सळसळते चैतन्य खरोखर प्रेरणादायी होते. 

पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहेच आणि म्हणून आपण दिवसभर पाणी पीत असतो. आपल्या डोळ्यांनासुद्धा जलाशय नुसते पहायलाही आवडतात. समुद्र किंवा मोठ्या नद्यांच्या किनारी असलेल्या गावांमधले लोक  वेळ मिळाला की किनाऱ्यावर जाऊन मंद वाऱ्याची मजा घेत इकडे तिकडे फिरतात किंवा पाण्याच्या लाटा पहात आणि त्यांचे संगीत ऐकत एकाद्या ठिकाणी बसून राहतात. भोपाळ, हैदराबाद आणि बंगलोर या शहरांमध्ये मोठ्या नद्या नसल्या तरी सुंदर विस्तीर्ण तलाव आहेत. पर्यटक ते पहायला जातात. कोल्हापूरचे रंकाळा, सोलापूरचा सिद्धेश्वर तलाव आणि पुण्याच्या खडकवासला धरणाच्या काठावरसुद्धा संध्याकाळी चांगलीच गर्दी असते, कारण लोकांना पाण्याचे असे सान्निध्य आवडते.

सध्या मी न्यूजर्सीमधल्या साउथ प्लेनफील्ड नावाच्या लहानशा गावात राहतो. इकडे त्याची गणना बरो या नावाखाली होते. मला हा खेडे आणि शहर यांच्यामधला प्रकार वाटतो. अशा लहानशा गावाला लागून एक स्प्रिंग लेक पार्क आहे. त्यात एक बऱ्यापैकी मोठे तळे आहे. त्या तळ्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी कडेकडेने रस्ता बांधला आहे. तळ्याच्या एका भागात पाण्यातच सुंदर कारंजी बांधली आहेत बसून आराम करायला एक छान चबूतरा आहे, तिथे बाकडी ठेवली आहेत. आजकाल अमेरिकेतले लोक रस्त्यांवरून चालतांना सहसा दिसत नाहीत, पण मोटारीत बसून या पार्कमध्ये येतात आणि तिथे पायी चालतात. इथे लहान खेडेगावातसुद्धा आपल्याला रस्त्याच्या कडेला हवी तिथे गाडी उभी करून ठेवता येत नाही. त्यामुळे आम्ही आधी गाडी पार्क करायसाठी जागा शोधली आणि तिथून पार्कमध्ये तळ्याकाठी चालत जाऊन त्याला प्रदक्षिणा घातली. 

---






Wednesday, February 05, 2025

माझा छंद -ब्लॉग लेखन


 मी शाळेत शिकत असतांना मला अवांतर काहीतरी लिहिण्याची हौस होती आणि त्या लिखाणाचे घरी आणि शाळेत थोडे फार कौतुक होत होते. पण कॉलेजातला अवाढव्य अभ्यास आणि नोकरीतले काम यामुळे मी ते विसरून गेलो होतो. पुढे अणुशक्तीनगरच्या वसाहतीत रहात असतांना तिथल्या काही मराठी बंधूभगिनींनी हितगुज नावाचे मंडळ स्थापन केले असे ऐकले. त्यांच्या मासिक बैठकींमध्ये वेचक मराठी कथा, कविता, विनोद, प्रवासवर्णन अशा प्रकारचे साहित्य वाचून दाखवले जात असे. त्यांनी मलाही त्या मंडळात प्रवेश दिला आणि चार ओळी लिहायला आणि त्या वाचून दाखवायला प्रोत्साहन दिले. त्या निमित्याने मी तीस पस्तीस वर्षांनी  पुन्हा एकदा लेखणी हातात घेतली. पण त्या काळात ऑफिसातल्या कामाचा बोजा वाढतच होता. तो सांभाळतानाच नाकी नऊ येत होते. त्यातून कुठल्याच अवांतर कामासाठी वेळ मिळत नव्हता. 

सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर नोकरीमधली बऱ्यापैकी अवजड जबाबदारी व ती पेलण्यासाठी वेळीअवेळी अंगावर पडत असलेल्या कामांचा बोजा या दोन्हीचा भार डोक्यावरून उतरला. आता मिळणार असलेला भरपूर फावला वेळ आंतर्जालावर स्वैरपणे भटकण्यांत सत्कारणी लावण्यासाठी नव्या घरी ब्रॉडबॅंड नेटवर्कचे कनेक्शन घेतले. त्या काळात ती नवीन गोष्ट होती आणि त्यासाठी बराच खर्च करावा लागत होता. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर रोजच्या जीवनात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी काही छंद जोपासावेत असा उपदेश केला जातो. म्हणून मी आपल्याला जमेल आणि परवडेल असा कुठला नवा छंद धरावा याचाही विचार करायला लागलो. त्यातच श्रमपरिहार आणि हवापालट वगैरेसाठी थोडे दिवस मुलाकडे इंग्लंडला जाऊन रहायची टूम निघाली आणि आम्ही अलगदपणे लीड्सला जाऊन पोचलो. तिथल्या थंडगार वातावरणात थोडेसे रुळल्यावर एक फारसा वापरात नसलेला मुलाकडचा "मांडीवरचा" संगणक (लॅपटॉप) आपल्या ताब्यात घेतला आणि त्याला टेबलावर ठेऊन गोंजारत असतांना त्याच्या सहाय्याने आंतर्जालाशी संपर्क साधला. मी लीड्समध्ये घरी बसल्या बसल्याच आंतर्जालावर स्वैर भ्रमण करतांना अगदी योगायोगाने ब्लॉग या संकल्पनेशी माझी पहिली ओळख  झाली.

 ब्लॉग या संकल्पनेशी ओळख  झाल्यानंतर दोन तीन दिवसातच मी एकावरून दुसरा, त्यावरून तिसरा अशा टणाटणा उड्या मारीत मिळतील ते दहा पंधरा ब्लॉग्ज पाहिले आणि ही कल्पना मला अतिशय आवडली, इतकेच नव्हे तर त्यातून माझ्या  मनात चाललेल्या एका द्वंद्वावर उत्तर सापडले. मी हितगुजच्या निमित्याने मराठीत पेनने कागदांवर दहा वीस पाने लिहिली होती आणि  मराठीत काही लिखाण करावे अशी मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात वर्षानुवर्षे दडून बसलेली सुप्त इच्छा जागी होत होती. रिटायरमेंटनंतर इंग्रजीत काही न लिहिता आता आपल्या मनात येईल ते मराठीतच लिहावे असेही वाटत होते. पण ते वाचणार कोण? कुणी वाचणारेच नसतील तर कशाला लिहायचे? अशा प्रश्नांनी उत्साहावर विरजण पडायचे. एक तर माझे गिचमिड हस्ताक्षर आणि केलेल्या खाडाखोडी कुणाला दाखवायला संकोच वाटायचा आणि आजकालच्या जमान्यात मी ते कागद दाखवायला कुणाकडे घेऊन जावे हा ही एक प्रश्नच होता. मी यावर हे जे काही लिहिले आहे ते तू वाचून बघ असे कुणालाही जाऊन सांगणे मला तरी माझ्या जन्मजात भिडस्तपणामुळे अशक्य होते.

 संगणक आल्यावर कागदावर पेनने लिहायची गरज संपली होती. की बोर्डवरची बटने दाबून अत्यंत सुबक अक्षरात लिहिणे आणि खाडाखोड न करता त्यात सुधारणा करणे शक्य झाले होते. त्यामुळे मला इच्छा होईल आणि सुचेल तेंव्हा ते लिहून संगणकावर साठवून ठेवता येत होते. ब्लॉगच्या आयडियाने हे लिखाण आंतर्जालावर टाकायची सोय सापडली होती.  जसे इतर लोकांचे ब्लॉग कधी ना कधी कुणी ना कुणीतरी वाचत असतील तसे कुणीतरी माझे लिखाणही वाचेल अशी आशा वाटत होती. लवकरच येऊ घातलेल्या नववर्षाची सुरुवात आपण आपला स्वतःचा ब्लॉग सुरू करूनच करायची असा दृढनिश्चय मी करून टाकला. केला तर खरा, पण तो पूर्ण कसा करायचा यासंबंधी त्या वेळी मला कांहीच ज्ञान नव्हते.

त्या दोन तीन दिवसात मी आंतर्जालावर एकंदरीत जेमतेम दहा पंधरा ब्लॉग्ज उडत उडत वाचले होते, ते सगळे इंग्रजीमध्ये होते. त्याशिवाय इतर जे अनेक ब्ल़ॉग दिसले होते ते चिनी, जपानी, कोरियन अशा अज्ञात लिपींमध्ये होते किंवा फ्रेंच, जर्मन, रशियन अशा भाषांमधले होते. पण ते पाहून आपल्याला मराठीतसुद्धा ब्लॉग लिहिता येईल अशी आयडियाची कल्पना माझ्या डोक्यात आली. त्या लेखकांनी त्यांच्या रचनांना आंतर्जालावर कसे चढवले (अपलोड केले) असेल याचाच मी विचार करत होतो. त्या माहितीसाठी आंतर्जालावर भटकतांना तिथेच "तुम्हीही आपला ब्लॉग निर्माण करू शकता.", "ते अगदी सोपे आहे.", "फक्त आमच्या आज्ञावलीनुसार पावले टाकीत चला", "कधी सुरुवात करीत आहात?" अशा प्रकारच्या गळेपडू जाहिराती पाहिल्यामुळे बराच धीर आला. त्या वेळी माझे बोट धरून वाट मला दाखवणारा कुणीच तिथे नव्हता. मग मी स्वतःच त्या जाहिरातींचा पाठपुरावा करत ब्लॉगस्पॉटला गाठले आणि ब्लॉग कसा लिहायचा असतो ते वाचून समजून घेतले. त्या काळात अजून ई पेमेंट सुरू झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी डॉलर मागितले असते तर ते कसे पाठवायचे हा सुद्धा एक प्रश्नच होता. पण  ते लोक हे काम अगदी फुकट करणार होते हे वाचून हायसे वाटले.

मी तर आपला ब्लॉग मराठीमध्येच लिहायचा असे ठरवले होते. मराठीमधील कोणताही ब्लॉग तोपर्यंत माझ्या वाचनात आलेला नसल्यामुळे त्यात नवलाईचाही थोडा भाग होता. पण तिथे माझ्याकडे असलेल्या संगणकावर मराठीमध्ये कसे लिहायचे हा दुसरा प्रश्न समोर आला. माझा ओळखीचा बहुभाषिक संगणक मुंबईलाच राहिला होता आणि इंग्लंडमधल्या या साहेबी मांडीवरल्याला मराठीचा गंधही नव्हता. आंतर्जालावरच शोधाशोध केल्यावर युनिकोडची माहिती सापडली आणि पदोपदी अनेक चुका करीत व त्या दुरुस्त करीत, धडपडत कां होईना, पण मी आपल्या संगणकावर देवनागरी लिपीची प्रतिष्ठापना करून मराठी लिहिण्यासाठी सोय एकदाची केली. तोपर्यंत २००६चे नववर्ष उजाडलेले होते.

ब्लॉगस्पॉटवर माझ्या ब्लॉगची नोंदणी करायला घेतल्यावर सुरुवातीला मी आपले नाव टाइप करायला लागलो Anand Gh इतके टाइप केल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांना  ब्लॉगचे नांव आणि माझे नांव अशी दोन नांवे द्यायची होती. त्या क्षणी मला आनंदघन हा शब्द सुचला आणि Anandghan असे नांव मी या ब्लॉगला देऊन टाकले. अशा रीतीने १ जानेवारी २००६ला माझ्या या बाळाचा आंतरजालावर जन्म झाला. त्यावेळी मी इंग्लंडमधल्या लीड्स या गावी होतो आणि तिथल्या एका लॅपटॉपवर त्याचा जन्म आणि नामकरण झाले.

आपण एकादी नवी गोष्ट करायची असे ठरवतो आणि थोडी धडपड केल्यानंतर ती गोष्ट साध्य होते त्या क्षणी गंगेत घोडं न्हाल्याचा आनंद मिळतो, पण तो फार वेळ टिकत नाही. मी सुरू केलेला तो ब्लॉग जेंव्हा कुणीतरी वाचेल आणि मला ते समजेल तेंव्हा मला थोडे समाधान वाटेल म्हणून मलाच त्याचीही व्यवस्था करणे क्रमप्राप्त होते. तो ब्लॉग आंतर्जालावर अमूक जागेवर उपलब्ध आहे हेच आधी लोकांना समजायला पाहिजे. त्यासाठी माझ्या ई-मेलच्या पत्त्यांच्या यादीत जेवढी म्हणून मराठी आडनांवे दिसली त्या सर्वांना संदेश पाठवून मी आपल्या ब्लॉगचा पत्ता कळवला. पण चार पांच दिवल लोटले तरी कोणाच्या प्रतिसादाचा पत्ताच नव्हता! मग चार पाच जिवलग मित्रांना आठवण करून देऊन मी किती आतुरतेने त्यांच्या उत्तराची वाट पहात आहे तेही कळवले. अपेक्षेप्रमाणे त्यांची उत्तरे तर आली, पण त्यांतील कांही लोकांच्या संगणकांना ते स्थळ सापडतच नव्हते आणि काही लोकांना त्यावरील देवनागरी लिपीतील मजकूर न दिसतां त्या जागी चौकोनी ठोकळ्यांच्या रांगा दिसल्या होत्या. थोडक्यात मी लिहिलेले एक अक्षरसुद्धा माझ्या ओळखीच्या कोणालाही वाचताही आले नव्हते. मग ते त्यावर कसला अभिप्राय देणार?

त्या कालखंडात या लोकांच्या घरात ज्या प्रकारचे इंटरनेट, कॉंप्यूटर, त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिम्स व ब्राउजर उपलब्ध होते त्यांच्या मर्यादा याला कारणीभूत होत्या हे लगेच माझ्या लक्षांत आले, पण त्या लोकांना त्यांना उपलब्ध असलेल्या तंत्राचा उपयोग करूनच वाचता येईल असेच कांहीतरी त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवणे आवश्यक होते, कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानापेक्षा उपलब्ध तंत्रज्ञान जास्त महत्वाचे असते हे मी अनुभवावरून शिकलो होतो. मी त्या दृष्टीने विचार केला आणि माझ्या ब्लॉगवरील लेखांच्या परिच्छेदांचे पेंटमधल्या इमेजेसमध्ये रूपांतर करून ते चित्ररूपाने ब्लॉगवर चढवले. आणखी कांही प्रयोग केल्यावर प्रत्येक चित्राचा आकार तसेच त्यावर लिहिण्याच्या अक्षरांचा आकार निश्चित केला. 

मी इंग्लंडमधल्या लीड्समुक्कामी तिथल्या एका जुन्या लॅपटॉपचा उपयोग करून हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. पण त्या लॅपटॉपची बॅटरी कधीच संपून गेली होती आणि मी त्या संगणकाला एलिमिनेटर चार्जर लावून मेन्सवर चालवत होतो. त्याचा अंतर्गत पंखाही काम करत नव्हता, त्यामुळे तो अर्धा तास काम केल्यावर संतप्त व्हायचा. मग त्याला अर्धा तास झोपवून ठेवावे लागायचे. तिथल्या थंडगार हवेत तो शांत मात्र होत असे. असे करण्यात माझा सगळा दिवस जात असे. पण आठवडाभरातच तो लॅपटॉप दमून कायमचा झोपी गेला. 

भारतात जसे किरकोळ दुरुस्त्या करणारे कुशल कारागीर मिळतात तसे तिकडे इंग्लंडमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे जिथून तो संगणक पूर्वी आणला होता त्या मोठ्या दुकानांत त्याला नेले. त्याच्या गॅरंटी वॉरंटीचा काळ कधीच संपून गेलेला असल्याने तेथील दुकानदारावर त्याची कसली जबाबदारी नव्हती. आता तो दुरुस्त करायचा असेल तर आधी साठ पौंड देऊन तज्ञाकरवी त्याची तपासणी करायची व त्यात जर तो दुरुस्त करण्याजोगा निघाला तर त्याचे एस्टिमेट मिळेल व तेवढा खर्च करावा लागेल, तरीसुद्धा तो आणखी किती काळ काम करेल याची खात्री देता येणार नाही वगैरे तेथील काउंटरवरल्या माणसाने सांगून त्यापेक्षा आम्ही आता नवीन मॉडेलचा लॅपटॉप घ्यावा असा आग्रह  केला. आम्ही तो जुना लॅपटॉप इतके दिवस कसा ठेऊन घेतला होता याचेच त्याला आश्चर्य वाटले होते.  तोपर्यंत आमची भारतात परतण्याची तारीख ठरलेली असल्यामुळे मी तो नाद सोडून दिला व थोड्या दिवसासाठी अंतर्जालावरूनच सुटी घेतली. 

आजकाल आपल्या मोबाइलमध्ये सुद्धा शेकडो जीबी डेटा असतो.  काही एमबीचे वॉट्सॅप मेसेजेस सारखे येत असतात आणि ते काही सेकंदांमध्ये उघडतात. या वातावरणात वाढलेल्या लोकांचा कदाचित विश्वासही बसणार नाही, पण २००६मध्ये फार वेगळी परिस्थिति होती. तेंव्हा मी लिहिलेल्या टेक्स्ट फाइल्स बाइटमध्ये असायच्या आणि इंटरनेटचा स्पीड सेकंदाला काही बाइट इतका कमी असायचा. त्यामुळे त्या लहानशा फाइलना अपलोड किंवा डाउनलोड करायलासुद्धा वेळ लागत असे. तेंव्हा व्हीडिओ तर नव्हताच, इमेज फाइल उघडायला किंवा चढवायला इतका वेळ लागायचा की www म्हणजे World wide wait असे म्हंटले जायचे. RAM आणि Floppy disk यांच्या क्षमता केबीमध्ये असायच्या. त्यामुळे एक पानभर इतका मजकूर लिहिला तरी त्याच्या तीन चार इमेज फाइली करून त्यांना ब्लॉगवर अपलोड करायला काही तास लागत असत. शिवाय त्या अपलोड किंवा डाउनलोड करण्यासाठी खर्च येत असे. कदाचित म्हणूनही माझे ब्लॉग उघडून वाचायला कुणी उत्सुक नसावेत.

त्या वेळी मी त्या काळातल्या मराठी ब्लॉगविश्वाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. तसेही ते अजून बाल्यावस्थेतच होते. त्यांची संख्या शंभराच्याही आतच होती. अमेरिकानिवासी नंदनसारख्या अनेक लोकांनी मराठी भाषेत सुंदर ब्लॉग्ज लिहायला सुरू केले होते हे सुद्धा मला त्या वेळी माहीत नव्हते. माझ्या ओळखीच्या लोकांनी माझा ब्लॉग वाचून त्यावर आपले अभिप्राय द्यावेत अशा मी त्यांच्याकडून बाळगलेल्या अपेक्षा तांत्रिक कारणामुळे पूर्ण होतांना दिसत नव्हत्या. पण अमेरिकेत राहणारे नंदन होदावडेकर आणि आणखी काही अनोळखी अनामिक मित्रांनी मला शुभेच्छा संदेश पाठवून माझे मराठी ब्लॉगच्या विश्वांत स्वागत केले.  माझ्या डोक्यांत ही कल्पना जरी स्वतंत्रपणे आली असली तरी, त्याच्या बरेच आधीच दुसऱ्या अनेक लोकांनी मराठी ब्लॉग सुरू करून त्यांत मोलाची भर घातलेली होती. इतकेच नव्हे तर त्या विषयाला वाहिलेले मराठी ब्लॉगविश्व नावाचे संकेतस्थळ सुरू करून तेथून नवख्या लोकांना मार्गदर्शन केले जात होते. मी अगदी पहिला वहिला नसलो तरी निदान पहिल्या शंभरात आपण आहेत याचेच मला मोठे कौतुक वाटले होते. "महाजनो येन गतः स पंथः।" या उक्तीप्रमाणे पुढे गेलेल्या महाभागांच्या वहिवाटेने रुळलेली एक पायवाट मला सापडली होती. ती धरून पुढे जाणे आता सोपे झाले होते. 

मी इंग्लंडला जायच्या आधीच मला एका अनोळखी मित्राकडून त्याचा याहू ग्रुप जॉईन करण्यासंबंधी आमंत्रण ई-मेलने आले होते. यापूर्वी मी अशा समूहांबद्दल कांही सुद्धा ऐकलेले नव्हते. तरीही कुतुहल म्हणून त्या समूहात शिरल्यानंतर मला ई-मेलवर रोज दहा पंधरा पत्रे यायला सुरुवात झाली. त्यातली सातआठ पत्रे मुलींच्या नांवाने लिहिलेली असायची. त्यातल्याच एका पत्रमैत्रिणीने याहू ३६० वर इंग्रजीमधून ब्लॉग सुरू केला आणि त्यावरील आपल्या मित्रपरिवारात सामील होण्यासाठी मला आमंत्रण दिले. ते स्वीकारण्यासाठी मला स्वतःला याहू ३६० चा सदस्य बनणे आवश्यक होते व ते सोपेही होते. अशा तऱ्हेने एके दिवशी ध्यानी मनी नसतांना माझा याहू ३६० वर प्रवेश झाला. याहू ३६० या संकेतस्थळावर ब्लॉग लिहिण्यासाठी जास्त सोयी दिलेल्या होत्या. त्यामुळे तिथे ब्लॉग सुरू करतांना मला ते काम सोपे वाटले. शिवाय आपली आवडती चित्रे दाखवण्यासाठी तिथे वेगळी मोकळी जागा दिलेली होती. याचा विचार करता जमेल तितक्या नियमितपणे आधी या नव्या ब्लॉगवर टेक्स्टमध्ये लिखाण करायचे आणि अधून मधून त्यातल्या मजकुराची इमेजेस तयार करून ती ब्लॉगस्पॉटवर चढवायची असे मी ठरवले. अशा प्रकारे नव्या मित्रांसाठी एक आधुनिक ढंगाचा आकर्षक दिसणारा असा हा याहू ब्लॉग आणि उपलब्ध तंत्रज्ञानातील कमतरतेमुळे तो न पाहू शकणाऱ्या जुन्या मित्रांसाठी दुसरा ब्लॉग अशा माझा दुहेरी प्रवास सुरू झाला. 

मराठी ब्लॉगविश्वावर ज्या ९०-९५ ब्लॉग्जची नावे होती त्यातले निम्मे लोक आरंभशूर होते. त्यांनी एक दोन प्रयत्न करून झाल्यावर तो नाद सोडून दिला होता, २०-२५ लोक महिना दोन महिन्यात एकदा हजेरी लावून जात होते आणि २०-२५ लोक मात्र नियमितपणे लिहित होते. नंदनच्या ब्लॉगवर तो सुप्रसिद्ध मराठी लेखकांच्या निवडक साहित्यकृतींची ओळख करून देत होता. त्याची निवड फार छान होती आणि त्याचे लेखनही मुद्देसूद तसेच रंजक असे. त्यामुळे माझ्या मते तो त्यावेळी सर्वोत्तम ब्लॉग होता. आणखी कुणी आधी एकेक सुंदर चित्र किंवा फोटो दाखवून त्यावर शब्दांकन करत होता, तर कुणी वृत्त किंवा छंदबद्ध किंवा मुक्तछंद कवितांमधून आपले मन मोकळे करत होता. कुणी प्रवासवर्णन किंवा स्वानुभव सांगत होता, तर कुणी विविध विषयांवरील आपले विचार व्यक्त करत होता. पण असे थोडे अपवाद सोडले तर बहुतेक लेखन रोजनिशी किंवा दैनंदिनीतल्या पानांसारखे असे.

ब्लॉग हा शब्द वेबलॉग या शब्दाचा शॉर्टफॉर्म आहे. यातील लॉग या शब्दाचा अर्थच नोंद असा होतो. कांही लोकांनी ब्लॉगला अनुदिनी, वासरी अशी नांवे दिलेली वाचली आहेत. पण त्यांचा दैनंदिनी वा रोजनिशी असा अर्थ घेतला तर दररोज त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाबद्दल त्यांत लिहायला पाहिजे असे ध्वनित होते. मला तसली बंधने नकोत म्हणून मी मराठीत वेगळे नांव न देता ब्लॉग असेच म्हणायचे ठरवले. रोजच्या रोज वेळेची डेडलाईन गाठण्यासाठी कसेतरी कांहीतरी लिहिण्याची घिसाडघाई करण्यापेक्षा एखाद्या विषयावर दोन चार दिवस विचार करून, माहिती मिळवून, योग्य शब्द जुळवून, वाचायला निदान बरे तरी दिसेल असे लिखाण प्रस्तुत करणे मला पसंत होते. सुरुवातीला मी सुध्दा काही प्रासंगिक महत्वाच्या घटनांवरच लिहित असे, त्यानंतर मात्र असे इकडे तिकडे न भरकटतां एक विषय घेऊन त्या दिशेने सुसूत्र असे टिकाऊ लेखन सलगपणे निदान कांही दिवस करावयाचे  ठरवले.


एका वद्य त्रयोदशीच्या पहाटे फिरतांना आकाशात दिसलेल्या नाजुक व रेखीव चंद्रकोरीवरून आपल्या ब्लॉगसाठी तोच विषय घ्यावा असे मला चटकन सुचले. आमच्या मित्रांना गंमत म्हणून दाखवण्यासाठी जमवलेल्या चंद्रविषयक चित्रांचा एक छोटासा संग्रह माझ्याकडे होता. त्यांना शब्दरूप तेवढे द्यायचे होते. ते काम करता करता त्याचा विस्तार होत गेला आणि त्यासाठी नवी माहिती मिळवीत व देत गेलो. 'तोच चन्द्रमा नभात' या मालिकेचा शेवट होईपर्यंत तिचे तेहतीस भाग झाले. चंद्राच्या भ्रमणाविषयी बऱ्यापैकी तपशीलवार शास्त्रीय माहिती, भारतीय तसेच पाश्चिमात्य पौराणिक वाङ्मयात आढळणारे त्याचे उल्लेख व त्याचेसंबंधी ऐकलेल्या दंतकथा, पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत चंद्राच्या अभ्यासावरून कसा निष्पन्न झाला याची सर्वसामान्य लोकांना ठाऊक नसलेली माहिती, चंद्राशी संबंधित सण, उत्सव व व्रतवैकल्ये, चंद्राचा उल्लेख असलेली लोकप्रिय हिंदी व मराठी गाणी अशा अनेक अंगांनी चंद्राकडे पाहून त्याचे दर्शन वाचकांना घडवण्याचा एक प्रयत्न या मालिकेतून केला. 

माझ्या लीड्समधल्या दोन तीन महिन्याच्या मुक्कामात मी त्या शहरातली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे आणि म्यूजियम्स पाहून घेतली होती, तिथल्या लायब्ररीमधून त्या शहराची माहिती असलेली पुस्तके आणून वाचली होती, बरेचसे फोटो घेतले होते आणि पँफ्लेट्स जमवली होती. 'तोच चंद्रमा नभात' मालिका लिहून संपवल्यानंतर   त्या सगळ्या सामुग्रीचा उपयोग करून मी 'लीड्सच्या चिप्स' या नावाने एक नवी मालिका लिहायला घेतली. भारतातून इंग्लंडला जाण्यायेण्याचा विमान प्रवास, तेथील स्थानिक जागांना दिलेल्या भेटी, तेथील स्थानिक इतिहास, तिकडील जनतेबरोबर आलेल्या संपर्कातून कळलेल्या गोष्टी, तेथील सुप्रसिद्ध तशाच कुप्रसिद्ध व्यक्ती आणि वल्ली, तिकडील समाजसुधारक संस्था असे अनेक पैलू या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र या मालिकेतील प्रत्येक भाग एक स्वतंत्र लेख वाटावा असे त्याचे स्वरूप ठेवले. ते काम सुरू असतांनाच माझे एक गंभीर आजारपण उद्भवले आणि त्यातून थोडे सावरेपर्यंत माझा संगणक रुसून बसला त्यामुळे तीन महिने खंड पडला.


तोपर्यंत सन २००६चा गणेशोत्सव सुरू झाला. शारीरिक असमर्थतेमुळे मला प्रत्यक्षात इकडे तिकडे जाणे अशक्य झाले होते. त्यामुळे घरी बसूनच वर्तमानपत्रातील बातम्या, दूरचित्रवाणीपरून प्रसारित होणारे कार्यक्रम व अंतर्जालावर येणारे सचित्र वृत्तांत यामधूनच मी गणरायाच्या 'कोटी कोटी रूपांचे' दर्शन घेतले आणि 'कोटी कोटी रूपे तुझी' या मालिकेतून ती सगळी वाचकांना घडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन नवरात्रानंतर पुन्हा लीड्सच्या चिप्स लिहायला घेतल्या. ते काम चाललेले असतांना काय झाले कुणास ठाऊक, पण २००७च्या सुरुवातीला अचानक हा ब्लॉग बंद पडला. माझ्या संगणकावरून तो उघडलाच जात नव्हता. हे सगळे काम ब्लॉगस्पॉट विनामूल्य करत असल्यामुळे त्यांच्या मेहेरबानीवरच तो चालत होता. आता कुणाकडे दाद मागावी किंवा कोण मला मदत करू शकेल हेच समजत नव्हते. पण मी माझे सगळे लेखन आधी याहू३६० वर टाकत असल्यामुळे ते शाबूत राहिले होते.

त्या वेळी ब्लॉगस्पॉटवरील ब्लॉग किती वाचकांनी पाहिला होता हे समजण्याची व्यवस्था नव्हती. मी काही मित्रांना आणि नातेवाइकांना फोनवर आणि ईमेलवर विचारून पहायचा प्रयत्न केला  होता पण त्यांच्याकडून फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत नव्हता.  याहू ३६० वर मात्र सुरुवातीपासूनच वाचनसंख्या दाखवणारे मीटर लावलेले होते. ते सुद्धा सुरुवातीला अतीशय मंद गतीने पुढे सरकत होते. त्या काळात आपला ब्लॉग फारसे कोणीच वाचतच नाही असे वाटून मन खिन्न व्हायचे. त्या वैषम्याचे प्रतिबिंब माझ्या लिखाणातसुद्धा पडू लागले होते. कधी कधी आपण हा उद्योग नेमका कशासाठी करत आहोत असा प्रश्न स्वतःलाच सतावायचा.  तेंव्हा माझ्या कांही हितचिंतकांनी मात्र मला पत्रे पाठवून खूप प्रोत्साहन दिले. कुणी 'धीर धरी रे धीरापोटी, फळे रसाळ गोमटी' या उक्तीची आठवण करून दिली तर कुणी 'कर्मण्ये वाधिकारस्ते ना फलेषु कदाचन' या श्लोकाची. आता हे कर्म मी स्वतःच स्वतःच्या अंगावर ओढवून घेतले आहे हे कुणाला सांगणार?  

पण या सगळ्या सदुपदेशांचा थोडा चांगला परिणाम होऊन मी हा नसता उद्योग चिकाटीने सुरू ठेवला.  हळू हळू तो लोकांच्या नजरेला पडायला लागला. मी मालिकांच्या रूपात लिहायला घेतले असल्यामुळेही ती पूर्ण करण्यासाठी ती कोण वाचत आहे की नाही इकडे लक्ष न देता लिहिणे चालू ठेवले होते. पहिले दोन तीन महिने जेमतेम शंभर दोनशेच्या घरात घुटमळत असलेल्या वाचनसंख्येने पांचव्या महिन्यापर्यंत हजाराचा आंकडा पार केला तेंव्हा मला धन्य वाटले होते. त्यानंतर दर दीड दोन महिन्यात एक एक हजाराने वाढत गेला आणि २००६ वर्ष संपेपर्यंत दहा हजारांचा पल्ला गाठला. दिवसेदिवस त्या ब्लॉगची वाचनसंख्या वाढत गेली. दुसऱ्या वर्षात हा वेग वाढत राहिला आणि वाचनसंख्येतील सहस्रांचे रौप्यमहोत्सव आणि सुवर्णमहोत्सव साजरे होत २००७ वर्षअखेरपर्यंत साठ हजारांचा पल्ला गाठून एप्रिल २००८ मध्ये पाऊण लक्ष (७५०००) झाला . पण तेंव्हाच  याहूवर नवी नोंद करतांना खूप अडचणी यायला  लागल्या. याहूने लवकरच ती सेवा बंद करायची सूचना दिली होती आणि हळूहळू ती अंमलात यायला लागली होती.

पण काय गंमत आहे? एक दरवाजा बंद होतो तेंव्हा दुसरा उघडतो असे म्हणतात. इथे एकदा आधी बंद झालेला दरवाजा माझ्यासाठी पुन्हा उघडला.२००८ सालीच हे चित्र पुन्हा  बदलले. मध्यंतरीच्या काळात माझ्या संगणकाची हार्डडिस्क बदलून तिचा नवा जन्म झाला होता. सहज प्रयत्न करून पाहता चक्क माझे २००७ साली बंद पडलेले ब्लॉगस्पॉटवरील खाते अचानक उघडले. एवढेच नव्हे तर त्यावर चार शब्द लिहून पाहिले तर ते लगेच त्यावर उमटले देखील! त्यामुळे त्या ब्लॉगचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय मी घेतला. काही काळ मी माझे नवे लेख पुन्हा एकाच वेळी दोन्ही ठिकाणी चढवले, तसेच त्या ब्लॉगवर पूर्वी न दिलेले याहूवरील कांही निवडक जुने लेख इथे देणे सुरू केले. 

याहू३६० वरील माझ्या ब्लॉगची वाचनसंख्या पाऊण लक्ष वर गेली होती तेंव्हापर्यंत म्हणजे पहिल्या सुमारे सव्वादोन वर्षांमध्ये मी चारशे भाग लिहिले होते. पण त्यानंतर ते स्थळ बंद होत असल्याची लक्षणे दिसायला लागली आणि योगायोगाने त्याच सुमाराला ब्लॉगस्पॉट पुन्हा सुरू झाले होते. दरम्यानच्या काळात गूगलने ब्लॉगस्पॉट विकत घेतले होते आणि त्याला ब्लॉगर असे नाव देऊन त्याच्या कामात लक्षणीय बदल केले होते. तिथे ब्लॉग लिहिणे आणि त्यात चित्रे टाकून त्याला सजवणे सुगम झाले होते आणि प्रोसेसिंगचा वेगही वाढला होता. यामुळे मी याहू३६० वर लिहिलेल्या सगळ्याच ब्लॉग्जना पुन्हा ब्लॉगस्पॉटवरही द्यायचे असे ठरवले. ब्लॉगस्पॉटवरील ब्लॉग बंद व्हायच्या आधीही मी माझे ब्लॉग या दोन्ही ठिकाणी देत होतोच. पण याहू३६०  ब्लॉगवरील लेखांच्या परिच्छेदांचे पेंटमधल्या इमेजेसमध्ये रूपांतर करून ते चित्ररूपाने ब्लॉगस्पॉटवर चढवत होतो. यात मला खूप जास्त काम करावे लागत होते आणि त्या कामाला जास्त वेळही लागत होता. पण  याहू३६० वर युनिकोडमध्ये देवनागरी लिपीमध्ये प्रसिद्ध होणारे लेख माझ्या भारतातल्या मित्रांना वाचता येत नव्हते म्हणून त्यांच्या सोयीसाठी पहिले वर्षभर मी हे दुप्पट काम काम करत होतो. पहिले सुमारे पाऊणशे भाग झाल्यानंतर ब्लॉगस्पॉटवरचा ब्लॉग बंदच पडल्यामुळे ही झंझट संपली होती

दोन वर्षांमध्ये परिस्थिती खूपच बदलली होती. याहू३६० वरच माझ्या ब्लॉगच्या वाचनांची संख्या पाऊण लाखावर गेली होती. त्यामुळे माझ्या लेखनाला तशाच प्रकारचे वाचक ब्लॉगस्पॉटवरही मिळतील अशी अपेक्षा होती. वाचक मिळावेत यासाठी लेखांचे चित्रांमध्ये रूपांतर करण्याच्या आडवळणी मार्गाची आवश्यकता वाटत नव्हती. त्यामुळे नवीन लेखनाच्या सोबतीने याहू३६० वरील लेखांचे थोडे संपादन करून त्यांना ब्लॉगस्पॉटवर चढवण्याचा सपाटा सुरू केला. २००८ या पहिल्या वर्षातच २५१ भाग चढवले. हा एका वर्षात लिहिलेल्या भागांचा सर्वोच्च आकडा आहे.  याच वेगाने काम करून २००९च्या पहिल्या तीन महिन्यात या ब्लॉगवरील चारशे भागही लिहून पूर्ण केले. तर जुलैपर्यंत ५०० भाग  झाले. तोपर्यंत याहू३६० वरील ब्लॉग मात्र कायमचा बंद पडला होता. मी वेळेवर तिकडचे बहुतेक सगळे ब्लॉग इकडे आणल्यामुळे ते नाहीसे होण्यापासून वाचले होते. मला हे काम करत असतांना विचार करून नवे लेखन न करता आधी लिहिलेल्या लेखांचे फक्त थोडेसे संपादन करायचे होते त्यामुळे ब्लॉगवर लेख चढवण्याचा वेग वाढला होता. त्यानंतर साहजिकपणेच तो मंदावला. 


आम्ही केसरी टूर्सबरोबर तीन आठवड्याची युरोपची सहल करून आलो होतो, तेंव्हा खूप फोटो काढले होते आणि माहिती गोळा केली होती. सन २००९ मध्ये मी त्यावर 'ग्रँड युरोप' या नावाने ३७ भागांची सविस्तर लेखमालिका लिहिली. काही वाचकांना ती इतकी आवडली की "तुमचे लेख वाचत वाचत आम्ही युरोपचा दौरा केला, आम्हाला त्यांची खूप मदत झाली." असे त्यांनी नंतर मला आवर्जून कळवले. आमच्या टूरवरील ग्रुपमध्ये ३० इतर सहप्रवासी होते. भारतात परत आल्यानंतरही आम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवला होता. मी या ३७ लेखांचे प्रिंटआउट काढून आणि त्यांच्या झेरॉक्स कॉपी काढून त्यांचे स्पायरल बाइंडिंग करून सचित्र पुस्तिका तयार केल्या. त्याच्या २०-२२ प्रति या सहप्रवाशांनी मागून घेतल्या. यासाठी मला आलेला खर्च भरून निघेल अशा हिशोबाने मी त्याचे मूल्य ठेवले होते, ते त्यांनी आनंदाने दिले.  मी लिहिलेल्या लेखांची पुस्तिका करून ती विकायचा माझा हा पहिला आणि शेवटचा अनुभव होता. त्याच्या आधी आणि नंतरही काही मित्रांनी मी माझे लेखन छापून प्रकाशित  का करत नाही असे विचारले होते किंवा तशी सूचना केली होती, पण त्यासाठी मुद्रक, प्रकाशक वगैरे लोकांचे उंबरे झिजवणे मला कधीच मान्य होण्यासारखे नव्हते किंवा मला तशी इच्छा होत नव्हती आणि गरज वाटली नाही. पण काही लोकांनी मला विचारून माझे काही लेख त्यांच्या मासिकांमध्ये छापून आणले आणि काही मासिकांसाठी मी लेख लिहून दिले आणि आजही देत आहे.अशा प्रकारे माझ्याही चार ओळी छापून आल्या आहेत, येत आहेत आणि काही वाचकांनी त्या वाचल्या असतील.


इ.सन २०१०च्या मध्यापर्यंत माझ्या ब्लॉगच्या शतकांचे षटक (६०० भाग) पूर्ण झाले. या सहाही षटकांमध्ये माझी लेखणी चौखूर उधळली होती. विज्ञान तंत्रज्ञान या माझ्या होमपिचपासून प्रवास वर्णने, व्यक्तीचित्रे, जीवनात आलेले अनुभव, दैनिक बातम्यांवरील भाष्य, मला भावलेली परमेश्वराची अनंत रूपे, आवडलेले करमणुकीचे कार्यक्रम, कवितांचे रसग्रहण, क्वचित एकादी ज्वलंत समस्या वगैरे बहुस्पर्शी लिखाण मी या ठिकाणी केले होते. यातले बहुतेक लेख १-२ भागात लिहिलेले असले तरी एकाद्या विषयावर मालिका लिहिण्याचे कामही मी पहिल्या वर्षापासून करत आलो होतो. या सहा शतकांमध्ये आलेल्या प्रमुख मालिकांचे विषय खाली दिले आहेत. यातल्या कांही मालिका चार पाच भागात लिहिल्या होत्या तर कांही मालिकांचे तीस पस्तीस भागही झाले होते. 

पहिले शतकः- तोच चन्द्रमा नभात (३४), कोटी कोटी रूपे तुझी (११), लीड्सच्या चिप्स (२०)

दुसरे शतकः- थोर भारतीय शास्त्रज्ञ (५), विमानाचे उड्डाण (५), माझीही अपूर्वाई (६)

तिसरे शतकः- विठ्ठला तू वेडा कुंभार (६), गणेशोत्सव आणि पर्यावरण (५), ऑलिंपिक खेळांची कथा (५), आजीचे घड्याळ(१२), आली दिवाळी (५)

चौथे शतकः- शाळेतले शिक्षण (१०), राणीचे शहर लंडन (६), सलिल चौधरी (७),  चन्द्रयान (७) झुकझुकगाडी भारतातली आणि परदेशातली (४), मौंजीबंधन (५)

पांचवे शतकः- सांचीचे स्तूप (४), ग्रँड युरोप (३७), जन्मतारीख (५) 

सहावे शतकः- आयुधे, औजारे आणि यंत्रे (४), अमेरिकेची लघुसहल (२०), पंपपुराण (१५)


इ.सन २००९-१०च्या सुमारालाच मी फेसबुकवर माझे खाते उघडले होते आणि तिथे बहुभाषिक मित्रमंडळी गोळा करत होतो. रोज  त्यांच्याबरोबर दोनचार शब्द संभाषण होऊ लागले. मी अधून मधून मनोगत', 'मिसळपाव' आणि 'उपक्रम' या लोकप्रिय मराठी संकेतस्थळांवर  हजेरी लावत राहिलो होतो. काही दिवसांनी त्यात 'ऐसी अक्षरे' आणि 'मी मराठी' यांचीही भर पडली. एका गुढी पाडव्याच्या दिवशी मी वर्डप्रेस या नव्या संकेतस्थानावर 'शिंपले आणि गारगोट्या' हा वेगळा ब्लॉग सुरू करून दिला. आंतर्जालाच्या सागरकिनाऱ्यावर स्वैर भ्रमण करत असतांना वेचलेले शंखशिंपले, रंगीबेरंगी खडे, गारगोट्या वगैरे तिथे साठवत गेलो.  यात मला आवडलेले लेख, कविता, माहिती, चित्रे, सुभाषिते, विनोदी चुटके अशा विविध प्रकारच्या गोष्टींचा संग्रह करायला सुरुवात करून दिली. त्यांची ओळख करून देण्यासाठी मीही त्यावर माझे चार शब्द लिहित होतो. याहू ३६० वरील माझा ब्लॉग शेवटचे आचके देत २००९अखेर कायमचा बंद होऊन गेला होता.  आधी एकदा 'ब्लॉगस्पॉट'बद्दल अशा प्रकारचा अनुभव  येऊन गेला होता. त्यामुळे आणखी एक पर्याय असावा म्हणून मी 'निवडक आनंदघन' या नावाचा एक ब्लॉग 'वर्डप्रेस'वर सुरू करून दिला आणि काही निवडक जुन्या लेखांवर एक संपादनाचा हात फिरवून त्यांना त्या ब्लॉगवर नवा जन्म द्यायला लागलो. 'वर्डप्रेस' या ठिकाणी ब्लॉगवरील लेखांचे वर्गीकरण करण्याची आणि त्यांचे शोध घेण्याची अधिक चांगली सोय असल्यामुळे तिथे माझे जुने लेख शोधणे सोपे जाते हा त्यातला आणखी एक फायदा होता.


या सगळ्या कामांमध्ये माझा बराच वेळ जात असल्यामुळे आनंदघन या माझ्या पहिल्या मूळ ब्लॉगकडे लक्ष द्यायला मला पुरेसा वेळ मिळत नव्हता.  त्यामुळे मी संख्येने कमी पण गुणवत्तेच्या दृष्टीने थोडे जास्त चांगले असे थोडे मोठे लेख लिहिण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यानंतर दर वर्षाला सुमारे नव्वद, शंभर भाग देत मी सव्वा तीन वर्षांनंतर ९०० भागांचा आकडा गाठला. पुढे वैयक्तिक जीवनातल्या अडचणींमुळे तो वेग कमी कमी होत गेला. जानेवारी २००६मध्ये सुरुवात केल्यानंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे २०१५ या वर्षाच्य़ा अखेरीला मी १०००वा भाग लिहिला. या काळात मी कौटुंबिक संमेलन (७), पंपपुराण -द्वितीय खंड (१०),  मोतीबिंदू आणि भिंगाचे भेंडोळे (५), मन (७), संस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे (७), अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती (११), शाश्वत ऊर्जा कार्यशाळा(५), वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिवस (५), पावसाची गाणी (७), गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला (६), विठ्ठल किती गावा ?(८), मंगल मंगळ, मंगलयान (७), निवडणुका (६) यासारख्या काही लेख मालिका लिहिल्या. तेथे कर माझे जुळती आणि स्मृती ठेवुनी जाती या लेखमालिकांमध्ये मला आदरणीय वाटलेल्या व्यक्तींविषयी प्रत्येकी १०-१५ भाग लिहिले आणि त्या मालिका पुढेही चालू ठेवल्या.

याहू३६० वर रोजच्या रोज वाचक आणि वाचने यांच्या संख्या दाखवल्या जात असत. ते आकडे पाहून थोडे उत्तेजन मिळत असे. तो ब्लॉग बंद पडेपर्यंत वाचनांची संख्या लाखावर गेली होती. ब्लॉगस्पॉट किंवा ब्लॉगरवर आधी ती सोय नव्हती. त्यामुळे आपले लेखन किती लोकांकडून वाचले जात होते ते समजत नव्हते. पण २०१०च्या सुमाराला त्यांनीही हे आकडे द्यायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षात एक लक्ष वाचनांचा पहिला टप्पा पार करून ही संख्या पाच आकड्यांमध्ये आली. ब्लॉगरने फॉलोअरची योजना कधी सुरू केली हे मला कळलेच नाही, पण या ब्लॉगवर अचानक त्यांची नावे दिसायला लागली. माझ्या ब्लॉगचा मागोवा घेणारे असे नाव मी त्यांना दिले. दोन वर्षांत त्यांच्या संख्येनेही शतक पूर्ण केले.

मे २०१३मध्ये माझ्या आनंदघन या ब्लॉगच्या वाचकांची संख्या सव्वा लाखावर गेली तेंव्हा मी 'झाकली मूठ सव्वा लाखाची' हा लेख लिहिला होता. आपले दौर्बल्य किंवा वीक पॉइंट झाकून ठेवावेत, आपल्या हातातले पत्ते उराला कवटाळून धरावेत म्हणजे ते कोणाला दिसणार नाहीत. असा या म्हणीचा अर्थ आहे, पण मी तर पहिल्या दिवसापासून माझे जवळ जवळ सगळे पत्ते उघडून ते टेबलावर मांडून ठेवत होतो. मला संगणकाची फारशी माहिती नव्हती, आंतर्जालावर भ्रमण करायची संवय नव्हती, मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिण्याचा यत्किंचित अनुभव नव्हता वगैरे माझे हँडिकॅप्स घेऊन मी हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेंव्हाच ते सगळे सांगून टाकले होते. माझ्या या नसत्या उद्योगातून मला कसलाही आर्थिक लाभ मिळण्याची सुतराम संभावना नव्हती, माझ्या अधिकारक्षेत्रात मला मिळून गेला होता त्याहून वेगळा अधिक मानमरातब मिळवण्याची  अपेक्षा नव्हती, "येन केन प्रकारेण प्रसिध्द पुरुषो भवेत्।" हे माझ्या जीवनाचे ब्रीदवाक्य नाही. माझे लेखन वाचून ते वाचणाऱ्यामधल्या कोणाला कणभरही फरक पडू शकेल अशी माझी समजूत नाही. असा सगळा नन्नाचा पाढा वाचल्यावर "मी हा खटाटोप कशासाठी चालवतो आहे?" असा प्रश्न कोणालाही पडेल. का कुणास ठाऊक, पण आपल्याला सुचेल ते जमेल त्या शैलीमध्ये लिहावे आणि ते चार लोकांना वाचायला द्यावे. अशी एक इच्छा काही वर्षांपूर्वी माझ्या मनात जन्माला आली होती आणि त्या लेखनाच्या वाचनसंख्येत होणारी वाढ या टॉनिकवर ती ऊर्मी सुदृढ होत होती. केवळ तिच्या प्रेरणेमुळे रिकामा वेळ मिळाला की माझे हात शिवशिवायला लागायचे आणि बोटे कीबोर्डवर चालायला लागायची.

माझ्या या प्रयत्नांची इतर माध्यमांमध्येही किंचित नोंद होत होती. 'स्टार माझा'ने आयोजित केलेल्या ब्लॉगलेखनाच्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगचा समावेश 'उल्लेखनीय ब्लॉग्ज'मध्ये झाला. माझ्या ब्लॉगची ओळख करून देणारा एक लहानसा लेख 'अनाग्रही सभ्य भूमिका' अशा मथळ्याखाली लोकसत्ता या दैनिकात छापून आला. दोन वर्षे मराठी ब्लॉगर्सची संमेलने दादरला भरली, तिथेही मला हजर राहून निवेदन करण्याची संधी मिळाली. माझ्या ब्लॉगचा मागोवा घेणाऱ्या मित्रांची संख्या हळूहळू वाढतच होती.  हे सगळे प्रेरणादायी होते.

नेमके कोण लोक आपले वाचक आहेत हा प्रश्न मला नेहमीच पडत आला होता आणि त्याचे उत्तर मिळत नव्हते, ते अजूनही मिळालेले नाही. माझ्या ब्लॉगच्या आयडीवर कुठकुठल्या देशांमधून टिचक्या मारल्या गेल्या यांचे आकडे तेवढे मिळत होते. त्यानुसार पहिल्या सव्वा लाखापैकी पंधरा हजार परदेशातले होते, त्याच्यामधले फक्त अमेरिकेतले   सहा हजार तर उरलेले लोक युरोप आणि आशियातल्या निरनिराळ्या देशांमधले होते. ते सगळे मराठी भाषा जाणणारे होते की चुकून आले होते कोण जाणे. त्यांच्याबद्दल जास्त विचार करण्यापेक्षा माझी ही सव्वा लाखाची मूठ झाकून ठेवलेलीच बरी होती.

२०१५च्या अखेरीला मी मुंबईला कायमचा रामराम ठोकून पुणेकर झालो होतो. तोपर्यंत म्हणजे पहिल्या दहा वर्षांमध्ये माझ्या आनंदघन या ब्लॉगचे १००० भाग होऊन गेले होते. हा आकडा पुढे आणखी वाढवत ठेवायचा नाही असा निर्णय घेऊन मी तो आकडा कमी करायला सुरुवात केली. काही जुने भाग डिलीट केले, २-३ भागांचे एकत्रीकरण केले असे करून एकूण संख्या तीन आकड्यातच ठेवली.  ती आजवर ९९९च्या आतच ठेवली आहे. इथे आल्यावर निरनिराळ्या कारणांमुळे आनंदघन या ब्लॉगवर लिहिणे कमी होत गेले होते, तरीही महिन्या दोन महिन्यातून ३-४ जुने भाग काढून टाकून नव्या भागांसाठी जागा करत राहिलो आहे.

मी २०१६मध्ये फक्त १९ भाग लिहिले त्यातले १२ भाग स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान या मालिकेचे होते. २०१७ मध्ये  २८ भाग लिहिले त्यातले ९ भाग सिंहगडरोडवर आणि ४ भाग गणेशोत्सवावर होते. त्याशिवाय शिक्षणविवेक मासिका साठी  शास्त्रज्ञ आणि संशोधन या विषयावर ४ लेख लिहिले. २०१८ मध्ये तीस लेख लिहिले त्यातले १२ शास्त्रज्ञ आणि संशोधन या विषयावर आणि ५ माझ्या संग्रहवृत्तीवर होते. २०१९ मध्ये मी चार महिने अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो. तरीही २७ लेख लिहिले त्यातले १२ शास्त्रज्ञ आणि संशोधन या विषयावर आणि ५ अमेरिकेतल्या अनुभवावर होते. २०२० साली कोविडने धुमाकूळ घातला होता, त्यामुळे जीवन थंडावले होते. घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकायलाही परवानगी नव्हती. त्यामुळे भरपूर रिकामा वेळ होता, पण त्या वेळी काहीही काम करायला उत्साहच वाटत नव्हता. त्या वर्षभरात मी १२च लेख लिहिले त्यातले पाच अमेरिकेतल्या आठवणींवर होते. २०२१मध्येही कोविडचा धुमाकूळ सुरूच होता. त्या वर्षभरात १५ लेख लिहिले. एकदा मंदावलेल्या गाडीला नंतर वेग आलाच नाही.  २०२२मध्ये १२, २०२३मध्ये फक्त ५ आणि २०२४मध्ये १० लेख लिहिले गेले.

या काळात व्हॉट्सॅपचे आगमन झाले होते आणि मी अनेक ग्रुप्सचा मेंबर झालो असल्यामुळे मला रोज शेकडो मेसेजेस येत होते. माझ्या एका मित्राच्या सहकार्याने मी फेसबुकवर 'Learning Sanskrit through Subhashitani सुभाषितांमधून संस्कृत शिकूया' या नावाने एक मालिका सुरू करून दिली. त्यात रोज एक संस्कृत सुभाषित देऊन त्याचा इंग्रजी आणि मराठीत अर्थ देत असतो. हे काम खंड न पडता गेली सहा वर्षे चालले आहे आणि आतापर्यंत २३०० सुभाषिते देऊन झाली आहेत. वर्षभरापूर्वी विज्ञानधारा या मासिकाने मला लेख लिहायची संधी दिली. त्यांच्यासाठी सात आठ विज्ञानविषयक लेख लिहून दिले. 


वॉट्सॅप आणि फेसबुकवर रोज नवीन नवीन माहिती मिळत असल्यामुळे ती गोळा करून शिंपले आणि गारगोट्या या ब्लॉगवरील योग्य त्या भागामध्ये संग्रहित करणे हे माझे मुख्य काम झाले होते. त्यामुळे मी रोज त्याच ब्लॉगला भेट देत होतो. वाचकांनीही त्या ब्लॉगलाच जास्त भेटी देऊन मला प्रोत्साहन दिले. त्यात आनंदघनचे काम मागे पडत गेले. शिंपले आणि गारगोट्या हा माझा ब्लॉग मी मार्च २००९ मध्ये सुरू केला होता आणि पहिल्या वर्षात धडाधड  शंभर लहान लहान चुटके जमवले होते. पुढच्या तीन चार वर्षांमध्ये हळूहळू आणखी शंभर सव्वाशे किरकोळ नग जमवल्यानंतर मी ते काम थांबवले होते. आधी जमवलेल्यातले निम्म्याहून अधिक भाग मी नंतर डिलिट करून टाकले.  सागरकिनाऱ्यावर फिरतांना जमवलेले काही शंखशिंपले आणि रंगीत खडे नंतर आपल्यालाच तितकेसे आवडत नाहीत म्हणून आपण टाकून देतो तसे केले. 

२०१८ मध्ये मी पुन्हा नव्याने या ब्लॉगमध्ये रस घेतला आणि त्यात थोडी अर्थपूर्ण भर घालायला सुरुवात केली. मी त्यानंतर आतापर्यंत आणखी दोनशेच भाग लिहिले असले तरी त्या प्रत्येक भागामध्ये नंतरच्या काळात अनेक लेख आणि चित्रे साठवत गेलो आहे. मराठी कवी आणि कविता यांच्या संग्रहात ६०-६५ कवींच्या रचना गोळा केल्या आहेत आणि त्या सुमारे पन्नास हजार वाचकांनी पाहिल्या आहेत. समर्थ रामदास स्वामी आणि दासबोध यांचेवरील लेखांपासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि  आकाशातले ग्रह, तारे वगैरेंच्या माहिती पर्यंत अनेक विषयांमधले लेख यात आहेत. आद्य मराठी नाटककार, आद्य उद्योजक तसेच राजकारण, समाजसेवा, शास्त्रीय संशोधन वगैरे विविध क्षेत्रांमधील नामवंत प्रसिद्ध व्यक्तींची माहिती गोळा केली आहे.  गीतकार ग दि माडगूळकर, संगीतकार सुधीर फडके आणि लोकप्रिय लेखक पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दिनिमित्य अनेक उत्तमोत्तम लेख मिळत गेले ते साठवून ठेवले. मी अशा प्रकारे एक प्रकारचा लहानसा खजिना तयार केला आहे आणि त्यात रोज भर पडत आहे.


गेली पाच वर्षे दर वर्षी सुमारे एक लाख वाचक या ब्लॉगला भेट देत आहेत आणि आज त्यांची एकूण संख्या साडेसहा लाखावर गेली आहे. ती माझ्या सर्व ब्लॉग्जमध्ये सर्वात जास्त आहे. आनंदघन या माझ्या पहिल्या ब्लॉगवर मी हल्ली जास्त भर टाकत नसलो तरीही तो ब्लॉग पहायला दर रोज सुमारे शंभर वाचक येतात आणि एकूण वाचकांची संख्या आता सव्वा सहा लाखावर आहे.  निवडक आनंदघन या तिसऱ्या ब्लॉगमध्ये आतापर्यंत ६२५ लेख दिले असून या ब्लॉगलाही रोज जवळजवळ ७०-८० वाचकांच्या भेटी होत असल्याने या ब्लॉगच्या वाचनसंख्येनेही आता सव्वाचार लाखांचा आकडा पार केला आहे. आजच्या वॉट्सॅप आणि इन्स्टाग्रामच्या काळात  ब्लॉगसारख्या आता जुन्या झालेल्या प्रकारालाही अजूनही इतके वाचक मिळत आहेत ही माझ्या दृष्टीने अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. माझ्या ब्लॉग्जच्या सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.

आनंदघन      https://anandghan.blogspot.com/

शिंपले आणि गारगोट्या      https://anandghare.wordpress.com/

निवडक आनंदघन     https://anandghare2.wordpress.com/

(समाप्त)