Wednesday, July 27, 2022

एक संस्मरणीय सहल

 एक संस्मरणीय सहल  - भाग १



अलीकडेच माझा अमेरिकेत रहाणारा मुलगा उदय सहकुटुंब भारतात आला होता. नेहमीप्रमाणेच त्यांना मोजक्या दिवसात बरीच कामे करायची होती. त्यांना गोव्यातल्या एका हॉटेलात ठेवलेल्या मित्रांच्या मेळाव्यात सामील व्हायचे होते, तसेच सर्वांना घेऊन कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जायचे होते. पुण्यातल्या मुलाला (अजयला) उन्हाळ्याच्या सुटीत मुलांसाठी एकादे लहानसे आउटिंग करायचे होते.  तेंव्हा दोघा मुलांनी मिळून सर्वांची एक लहानशी सहल काढायचे ठरवले आणि इंटरनेटवरूनच चौकशा करून  उत्तर गोव्यातल्या अरंबोळ नावाच्या एका अप्रसिद्ध बीचवरील रिसॉर्टवर तीन दिवसांचे बुकिंग करून टाकले. तसेच हवामानाचा विचार करून एक प्रशस्त अशी वातानुकूलित टेंपो ट्रॅव्हेलर ड्रायव्हरसह तीन दिवसांसाठी भाड्याने घेतली. म्हणजे कुणाला ड्रायव्हिंग करायचा ताण येणार नाही आणि सर्वांनाच ती ट्रिप पूर्ण एंजॉय करायला मिळेल.

 पुण्याहून गोव्याला जायच्या प्रवासाला सुमारे आठ तास लागतात हे आम्हाला माहीत होतेच, अगदी इथल्या घरापासून ते त्या रिसॉर्टपर्यंत जायला साडेआठ तास लागतील असे गूगलबाबाने सांगितले. मग दुपारचे जेवण करून निघायचे आणि रात्री समुद्राच्या लाटा पहात पहात गोव्यातल्या सुप्रसिद्ध मत्स्याहारावर ताव मारायचा असा विचार काही जणांनी केला. पण इतक्या सगळ्या लोकांनी तयार होऊन, जेवणखाण आटोपून, घराची आणि सामानाची आवराआवर करायला लागायचा तेवढा वेळ लागलाच आणि निघायला उशीर झाला. शिवाय आम्हाला कुठली ट्रेन किंवा फ्लाइट पकडायची नसल्यामुळे त्याचे प्रेशर नव्हते. त्यामुळे फार घाई न करता लागेल तेवढा वेळ दिला गेला. 

हायवेवरील चांदणी चौकावर एक भला मोठा फ्लायओव्हर बांधायचे जंगी काम चालले आहे, त्यामुळे तो एक कायमचा ट्रॅफिक जॅमचा वीक पॉइंट झाला आहे. तिथे नेमक्या त्याच वेळी एक अवाढव्य ट्रक की ट्रेलर बंद पडला होता आणि वाहतुकीची पुरती कोंडी झाली होती. त्यामुळे हायवेवर पार बाणेर वाकडपर्यंत शेकडो वाहनांची भाऊगर्दी होऊन गेली होती. आमच्या गाडीला त्या ट्रॅफिकजॅममधून हळूहळू वाट काढायलाच चांगला तास दीडतास लागला. पुढे बंगळूरु महामार्गावरही बऱ्यापैकी रहदारी सुरू होती त्यामुळे कोल्हापूरपर्यंत जाता जाताच रात्रीचे आठ वाजायला आले.

पुढे घाटात चांगले जेवण मिळेल की नाही याची शंका होती म्हणून कोल्हापूरजवळच रस्त्यावर एक बऱ्यापैकी हॉटेल दिसले तिथे प्रवेश केला. सगळेजण हॉलिडे मूडमध्ये होते. आता कुणाला तिथला प्रसिद्ध तांबडा आणि पांढरा रस्सा चाखायचा होता तर कुणाच्या डोक्यातून रात्रीची फिशकरी गेली नव्हती, कुणाला पाश्ता आणि पिझ्जा खायचा होता तर माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना साधा वरण भात किंवा दहीभातच हवा होता.  सगळ्यांना हवे ते खायला घालून तृप्त केल्यावर आम्ही गगनबावड्याच्या रस्त्याला लागलो. 

------------------------------

भाग -२

गगनबावड्याहून कणकवलीकडे जाणाऱ्या घाटाचा रस्ता हायवेच्या मानाने अरुंद होता. त्यात विभाजकही नव्हते आणि दोन्ही बाजूंनी येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांची रहदारी जोरात सुरू होती. रस्त्यात अधूनमधून लहानमोठे खड्डेही पडलेले होते आणि पावसाच्या सरी येत होत्या. एका ठिकाणी तर इतका मुसळधार पाऊस लागला की समोरचे काहीही दिसत नव्हते आणि त्यातून वळणवळणाचा रस्ता. त्यामुळे थोडा वेळ थांबावे लागले होते. मग एक जीप आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि तिच्या मागे मागे आम्हीही हळूहळू पुढे सरकायला लागलो. घाटातला कठीण रस्ता संपून आम्हाला मुंबई गोवा महामार्ग लागला तेंव्हा मनाला हायसे वाटले.   

आम्हाला वाटेत उशीर झाला होता आणि आमचा प्रवासही हळू हळू होत होता. रिसॉर्टचे बुकिंग करतांना आम्ही दिलेल्या वेळेत तिथे जाऊन पोचणे तर शक्यच नव्हते. म्हणून आम्ही रिसॉर्टला फोन लावला. तेंव्हा तो एका बाप्याने उचलला आणि "काही हरकत नाही" असे सांगितले. नंतरही आम्ही दर तासातासाला फोन करून वेळ वाढवून घेत होतो. मध्यरात्रीच्या सुमाराला एकदा त्याचाच फोन आला आणि त्याने एक विचित्र मागणी केली.   त्याला अचानक आम्हा सर्वांची आधार कार्डे लगेच पाहिजे होती म्हणे. तिथे पोचल्यावर आम्ही दाखवू असे सांगितले तरी त्याला धीर धरवत नव्हता.  "तुम्ही ही कार्डे बुकिंगच्या वेळीच का मागितली नव्हती ?" असे विचारूनही काही उपयोग झाला नाही. आम्हाला उशीर होत असल्यामुळे आमची बाजू थोडी लंगडी होती आणि त्याने तर हट्टच धरला होता. मग आम्ही गाडी बाजूला थांबवली. पूर्वीच्या अनुभवावरून बहुतेक सर्वांनी आपापली आधार कार्डे जवळ बाळगली होतीच. ती बाहेर काढून त्यांची मोबाइलनेच छायाचित्रे घेतली आणि ती रिसॉर्टला वॉट्सॅपवर पाठवून दिली. आधुनिक तंत्रज्ञानामधील प्रगतीचा वेळप्रसंगी केवढा मोठा उपयोग होत होता याचेच मला कौतुक वाटले. 

गोव्याच्या हद्दीवर गाडी थांबवून ड्रायव्हर खाली उतरला आणि आमच्याकडून बरेचसे पैसे घेऊन तिथल्या ऑफिसात गेला. बहुधा त्याला तिकडचे 'टेंपररी लायसन' काढायचे होते. तिथल्या बॉर्डर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तो परत आला तोपर्यंत रात्रीचे दोन वाजून गेलेले होते. आम्ही रिसॉर्टला फोन केला तर आतापर्यंत तो फोनवरचा 'बाप्या' गायब झाला होता आणि त्याच्या ऐवजी एक 'बया' आली होती. आम्हाला तर त्याचे आश्चर्यच वाटले. ती बया आधी तर खूप वेळ फोन उचलतच नव्हती आणि उचलला तरी काहीतरी तुटक आणि असंबद्ध उत्तरे देत होती. दुसऱ्या दिवशी मॅनेजमेंटकडे तिची तक्रार करायलाच हवी होती.   

गोव्याच्या हद्दीत पोचेपर्यंतचा हमरस्ता फारच सुंदर आणि प्रशस्त होता. त्या वेळी त्यावर अगदी तुरळक रहदारी होती, त्यामुळे आमचा प्रवास छान होत होता. पण गोव्यात शिरल्यानंतर लगेचच आम्ही तो मोठा रस्ता सोडला आणि गावातल्या छोट्या रस्त्याला लागलो. आमचा सगळा प्रवास जीपीएसच्या मार्गदर्शनाखालीच चालला होता. ड्रायव्हरही त्या भागात पहिल्यांदाच येत होता आणि रात्रीच्या वेळी रस्त्यात कुणालाही वाट विचारायची तर काही सोयच नव्हती. जीपीएस सांगेल तिथे वळणे घेत आम्ही त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून अर्धा तास फिरत राहिलो. खरे तर तो भाग अत्यंत रमणीय असा होता, पण गडद अंधारात गुडुप झाला होता. 

अखेरीस आमची गाडी एका ठिकाणी जाऊन थांबली आणि "तुम्ही तुमच्या गंतव्य ठिकाणी पोचला आहात" असे जीपीएसवाल्या बाईने सांगितले. तिथे पाहिले तर सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता आणि आमच्या गाडीच्या प्रकाशात जेवढे दिसले तिथे एक पाच फूट चौरस आणि दोन फूट उंच पांढरा कट्टा होता आणि त्यावर पुरुषभर उंचीचा क्रॉस उभा केलेला होता. त्यावर आर आय पी असे लिहिले होते.

--------------

भाग - ३

गोव्यातले एक सी साइड रिसॉर्ट म्हंटल्यावर तिथे रस्त्यावर एक मोठा चकचकीत बोर्ड असेल, एक आकर्षक गेट, आत मोकळ्या जागेत अनेक मोटारगाड्या उभ्या असलेल्या, सगळीकडे दिव्यांचा झगझगाट, आत जाताच एक सुरेख रिसेप्शन लाउंज, रिसेप्शन डेस्कच्या मागे एक स्मार्ट आणि हसतमुख युवक किंवा युवति आणि एक दोन काँप्यूटर्स अशी कल्पना मी केली होती. पण इथे तर त्यातल्या कशाचाही मागमूस दिसत नव्हता. रस्त्यात सगळा गडद अंधार आणि गाडीच्या उजेडात पहिले तर दोन्ही बाजूंना गर्द झाडी आणि त्यातून डोकावणारी लहान लहान घरे होती. त्यात रहाणारी सगळी माणसे दिवे मालवून गाढ झोपी गेलेली होती. आता आम्ही विचारपूस तरी कशी करायची?  इंटरनेटवर रिझर्वेशन करणाऱ्या माणसाने आम्हाला गंडा घातला आहे की काय ? अशा प्रश्नाची एक अशुभ पाल मनात चुकचुकून गेली. दूर एका ठिकाणी थोडा उजेड आणि एक माणूस दिसला म्हणून आम्ही हळूहळू गाडी तिकडे नेली तर तो इसम नशेत तर्र झालेला होता आणि तिथला स्थानिक वाटतही नव्हता, तो कुठून तरी आला असावा आणि पिऊन झाल्यावर तिथे हवा खात उभा असावा. आम्हाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 

आमचे ठिकाण आले आहे असे जीपीएसने सांगितल्यापासून आम्ही रिसॉर्टला सारखा फोन लावतच होतो, पण कोणीच तो उचलत नव्हते.  अखेर त्या बयेने एकदाचे 'हेल्लो' म्हंटले. आम्ही लगेच तिला सांगितले की "तुम्ही दिलेल्या पत्यावर आम्ही आलो आहोत, पण आम्हाला ते रिसॉर्ट तर कुठे सापडत नाही आहे". " आत्ता तुम्ही कुठे आहात ?" असे तिने विचारल्यावर आम्ही तिला तिथल्या कुठल्या झाडाची कसली खूण सांगणार ? त्यापेक्षा तिलाच तिच्या रिसॉर्टची खूण सांगायला आम्ही सांगितले. तिने सांगितले की "तुम्हाला *** रिसॉर्ट दिसलं का? तिथून फुटणाऱ्या गल्लीतून सरळ पुढे या." आमच्या ड्रायव्हरने जागा बघून गाडी रिव्हर्स घेतली आणि हळू हळू चालवत मागे नेल्यावर ते '*** रिसॉर्ट' सापडलं. तिथे बोर्ड होता, उजेड होता, मोकळी जागा होती आणि गेटही होते पण ते बंद होते आणि आतली माणसे दार बंद करून झोपली होती. 

आम्ही पुन्हा फोन करून त्या बयेला विनंति केली की जर त्यांच्या रिसॉर्टचा एकादा माणूस तिथे आला आणि आम्हाला घेऊन गेला तर बरं होईल. तिने नकार देऊन सरळ फोन ठेऊन दिला. आता काय करायचं? मध्यरात्र उलटून गेली असल्यामुळे आमच्या गाडीतले बरेच जण पेंगत पेंगत झोपलेलेच होते. बाहेर काय चाललंय याचा त्यांना पत्ताही नव्हता. मग जागे असलेल्या सर्वांना जागेवरच बसून रहायला सांगून माझे दोघे मुलगे खाली उतरले आणि मोबाईलच्या उजेडात चालत चालत नजरेआड गेले. बराच वेळ ते परत आले नाहीत यामुळे माझ्या जिवाला नसता घोर लागला होता. मी एकाला फोन लावला तर तो एंगेज्ड येत होता. आता या वेळी तो आम्हाला सोडून आणखी कुणाशी कशाला बोलतोय् म्हणून चरफडत मी दुसऱ्या मुलाला फोन लावला. त्याने मात्र लगेच फोन उचलला आणि त्यांना ती जागा सापडली असल्याची मुख्य खुशखबर दिली.   

मग आम्ही आधी गाडी घेऊन ज्या गल्लीत जाऊन परत आलो होतो तिकडेच पुन्हा हळूहळू गेलो. वाटेत माझा मुलगा उभा होता. तो गाडीत चढला आणि वाटाड्या झाला. थोडे पुढे गेल्यावर दोन घरांच्या मध्ये थोडी मोकळी जागा होती. तिथे गाडी घुसवली तर पुढे रिव्हर्स करता येईल का अशी रास्त शंका वाहनचालकाला आली.  पण पुढे मोकळी जागा आहे असे म्हणून गाडी आणखी पुढे नेली. तिथे डेड एंड होता, पण गाडीला उलट फिरवायला पुरेशी मोकळी जागा तिथे होती. त्यात उजव्या बाजूला एक गोल आकाराची विहीर होती आणि तिच्या बाजूला 'नो पार्किंग' असे ठळकपणे लिहिलेला एक बोर्ड होता. पण आम्ही त्या बोर्डना न जुमानता त्या वेळी तिथेच गाडी उभी केली आणि सगळेजण खाली उतरलो. डाव्या बाजूच्या बोळकंडीमधून आत घुसल्यावर समोर चक्क एक लहानसा पण सुबक असा स्विमिंग पूल होता. त्याच्या बाजूला असलेल्या बिल्डिंगच्या मागे आणखी एक तीन मजली बिल्डिंग होती. तिच्यात आम्हाला चार खोल्या मिळाल्या होत्या. एकदाचे मुक्कामावर पोचलो म्हणून सर्वांना हुश्श वाटले. 

  ------------------------

 भाग  - ४



आम्हाला त्या रिसॉर्टमध्ये सलग चार खोल्या मिळाल्या नव्हत्या. दोन खोल्या तळमजल्यावर, एक दुसऱ्या मजल्यावर (फर्स्ट फ्लोअरवर) आणि एक तिसऱ्या मजल्यावर होती. मला तळमजल्यावरच्या खोलीत जागा दिली आणि आमचे सगळ्यांचे सामानही आधी त्या खोलीच्या पडवीत आणून ठेवले. पाचसहा तासांच्या प्रवासातून आल्यामुळे मी आधी बाथरूम गाठले. तिथल्या टाइल्स, बेसिन, कोमोड वगैरे सगळे पांढरे शुभ्र आणि स्वच्छ होते. मी फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत कोणी कोणी कुठकुठल्या खोलीत झोपायचे हे ठरवून सगळे आपापले सामन उचलून नेत होते. आमच्या खोलीत एक अवाढव्य आकाराचा पलंग होता आणि त्यावर फोमची अखंड गादी होती. नवरा बायको आणि दोन लहान मुले अशा कुटुंबाला पुरावी अशी ही सोय केली असावी. त्यामुळे त्यावर तीन माणसे आरामात मावत होती. सगळ्यांची चांगली सोय झाली आहे हे पाहून माझी दोन मुलेही माझ्या खोलीत झोपायला आली. तोपर्यत रात्रीचे साडेतीन वाजले असल्यामुळे ही गप्पा मारत पडायची वेळ नव्हती.  

मी त्यांना एकच प्रश्न विचारला, "ही आडबाजूची जागा त्यांनी कशी शोधून काढली?" उदयने सांगितले "जीपीएस ! आधी आम्ही कारचा जीपाीएस लावला होता त्याने जिथपर्यंत रस्ता होता तिथे बरोबर नेले होते. आत्ता आम्ही पायी चालत जायचा जीपीएस लावला, त्या मुलीला फोन लावला आणि ती जिथे आपली वाट पहात बसली होती तिथपर्यंत येऊन पोचलो." मी जिला 'बया' म्हंटले होते ती प्रत्यक्षात एक लहान मुलगी होती आणि आमची वाट पाहून आम्हाला आमच्या खोल्या सांगायच्या एवढेच छोटेसे काम तिला दिले होते. तेवढे करून ती अंतर्धान पावली. ती आधी आमच्याशी एकाद्या रिसेप्शनिस्टसारखी नीट का बोलत नव्हती याचा उलगडा झाला.

बहुतेक लोकांनी गाडीतच थोडी झोप काढली होती आणि समुद्रकिनाऱ्यावर जायची ओढ होती यामुळे सगळेजण आठ वाजेपर्यंत उठून तय्यार झाले. आमच्या रूममध्ये नोकराला बोलवायची बेल नव्हती आणि रिसेप्सनला करायला फोनही नव्हता. तिथे या सोयीच अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे कुणालाच मॉर्निंग टी मिळाला नाही, पण आमच्या घरी कुणाचेच त्याशिवाय काही अडतही नाही. पण आता नाश्त्याची काय सोय आहे? याची चौकशी करता सीशोअरवरच एक शॅक असल्याचे समजले. सगळे लगेच तिकडे जायला निघाले. मीही कपडे बदलून बाहेर पडलो तर माझ्यकडे किंवा कुणाकडेच त्या खोलीची किल्ली नव्हती. त्या खोलीच्या दरवाज्याला कडी कोयंडा किंवा लॅचही नव्हते. मग मी माझी बॅग उचलून शेजारच्या खोलीत ठेवली आणि कुलुप लावून आम्ही निघालो. 

आमच्या इमारतीच्या कॉम्पाऊंडला एक पत्र्याचे दार होते. ते उघडल्यावर बाहेरच्या गवतातून एक पायवाट जात होती त्या वाटेने २५-३० पावलावर एका झोपडीत ते शॅक होते आणि त्याच्या पलीकडे लगेच अथांग समुद्र होता.

----------------

भाग  - ५



ते शॅक एका मध्यम आकाराच्या शेडमध्ये होते आणि समुद्राच्या बाजूने पूर्णपणे उघडे होते. तिथे बांबूची दोन लांबुळकी आणि दोन लहान टेबले आणि काही प्लॅस्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या. आम्ही एकंदर दहा माणसे होतो. समुद्राची शोभा पहात लांबुळक्या टेबलांवर एका रांगेत बसून घेतले. तिथे कामाला फक्त दोनच माणसे होती, तेच कुक, वेटर, आचारी, वाढपी काही म्हणा. आम्ही लवकर मिळतील म्हणून सँडविचेस आणि ऑमलेटे मागवली. पण ते लोक फारच सुस्तपणे काम करत होते आणि आम्हाला गप्पा मारत समुद्राच्या लाटा पहायला भरपूर वेळ देत होते. मुले तर वाळूत खेळायला अधीर झाली होती. वीस पंचवीस मिनिटांनी एक एक प्लेट सँडविडचेस आणि ऑमलेट्स यायला लागली ती आधी मुलांनी खाऊन घेतली आणि ती धावत किनाऱ्यावरच्या वाळूत बागडायला गेली. त्यांच्यावर लक्ष ठेवायला दोघेजण गेले. हे चालले असतांना कुणीतरी आणखी काय मिळेल हे विचारले आणि चार प्लेट पोहेही मागवले. आमचे सँडविचेस आणि ऑमलेटे खाऊन चहा पिऊन झाले तरी ते पोहे आलेच नाहीत, पण एकदा दिलेली ऑर्डर कँसल होणार नव्हती म्हणून आम्ही चारजण वाट पहात बसलो. ते पोहे आल्यानंतर मुलांना हाका मारून खायला बोलावून घेतले. ती शॅक म्हणजेच आमच्या रिसॉर्टचे अधिकृत भोजनालय होते आणि समुद्रकिनाऱ्यावर त्याचा बोर्डही होता. साधी झोपडीसारखी कच्ची शेड असली तरी तिथले रेट मात्र भारी होते. बशीभर पोहे आणि एक एक सँडविचच्या किंमती प्रत्येकी शंभर दीडशे रुपये लावल्या होत्या. पण काही म्हणा ते पदार्थ चविष्ट आणि पोट भरण्यासारखे मात्र होते. त्यामुळे आमचे पैसे अगदीच वाया गेले नाहीत.



तिथला समुद्र किनारा मात्र अप्रतिम होता आणि कमालीचा स्वच्छ होता. मुख्य म्हणजे एकदीड किलोमीटर लांबीच्या त्या परिसरात त्या वेळी तरी आमच्याशिवाय आणखी कोणीही नव्हते आणि आम्ही पर्यावरणप्रेमी असल्यामुळे किनाऱ्यावर कचरा टाकणारे नव्हतो. आम्ही नाश्ता खात असतांना पंधरावीस कोळी बांधव समुद्रात टाकलेले त्यांचे अवाढव्य जाळे ओढून बाहेर काढत होते. किनाऱ्यावर ठोकलेल्या दहा बारा खुंट्यांना टांगलेले ते जाळे खोल समुद्रापर्यंत त्यांनी कसे पसरवले होते त्यांनाच माहीत. सर्वांनी एकजुटीने 'जोर लगाके हय्या' करत ते किनाऱ्यावरील वाळूत ओढून आणले. त्यात जमा झालेली आपली रुपरी मासोळ्यांची दौलत टोपल्यांमध्ये भरून घेऊन ते निघून गेले, त्यानंतर त्या अफाट किनाऱ्यावर आमचेच राज्य होते. 



मी भारतातले तसेच परदेशांमधले अनेक समुद्रकिनारे पाहिलेले असले तरी मला समुद्राच्या एकापाठोपाठ एक येत राहणाऱ्या अगणित लाटांकडे पहात रहायचा कधीच कंटाळा येत नाही. प्रत्येक वेळी तिथली वाळू, तिथल्या लाटा यांत काहीतरी नाविन्याचा अनुभव येतो. अरंबोळचा किनारासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होता आणि गुढघ्याइतक्या पाण्यात जायला तरी चांगला सुरक्षित होता. त्यापेक्षा खोल पाण्यात जायची कुणाला हौस नव्हतीच. पावलांपासून गुढघाभर इतक्या पाण्यातच बसून आणि उभे राहून मुलांची दंगामस्ती चालली होती, एकमेकांवर पाणी उडवणे चालले होते. 



समुद्राची लाट परत जातांना पायाखालची वाळू सरकते आणि तोल सावरला नाही तर धुप्पम्पई व्हायला वेळ लागत नाही. मला तो धोका घ्यायचा नव्हता, म्हणून मी शास्त्रापुरत्या दोन चार लाटा पायावर घेऊन लगेच वाळूवर आलो. मी गोव्याहून परत आल्यानंतर जेमतेम दहा दिवसात घरातच पाय घसरून पडलो आणि आता एक पाय प्लॅस्टरमध्ये घालून अडकून पडलो आहे. तसे काही तिथे झाले असते तर मलाच नाही तर सगळ्यांनाच खूप त्रास झाला असता आणि आमच्या सहलीचा पुरा विचका झाला असतात.  त्यामुळे मी या वेळी पाण्यात धांगडधिंगा करायचा मोह आवरला तेच चांगले केले म्हणावे लागेल. 

----------------------

भाग  - ६

 समुद्रकिनाऱ्यावर भटकत वेळ काढताकाढता ऊन वाढत गेलं म्हणून मी आपल्या रूमवर परत गेलो. पायापासून डोक्यापर्यंत सर्वांगाला चिकटलेले रेतीचे बारीक कण धुवून टाकण्यासाठी मी बाथरूममध्ये शिरलो. तिथे गीजरही दिसला नाही आणि गीजरचे बटनही नव्हते. दोन नळ होते पण दोन्हींमधून थंडगार पाणीच येत होते. त्या पाण्याने बादली भरून घेतली आणि आधी हात, पाय, तोंड, डोके वगैरे वेगळेवेगळे स्वच्छ धुवून घेतले आणि मग "हर हर गंगे" म्हणत दोन जग पाणी दोन्ही खांद्यांवर ओतले आणि लगेच टॉवेलने घसाघसा घासून अंगात थोडी ऊब आणली. लहान बाळासारखे आंघोळ करून कपडे बदलून झोपून गेलो. आदले दिवशी जागरण झालेले असल्यामुळे अंथरुणावर पाठ टेकताच झोपही लागली.

मुले आणि पुन्हा मूल झालेले त्यांचे आईबाबा समुद्रात जलक्रीडा करण्यात रंगून गेले होते. एवढ्यासाठीच तर आम्ही गोव्याच्या किनाऱ्यावर आलो होतो. इथे बाहेरचे कोणी बघायला नसल्यामुळे त्यांना मुक्तपणे दंगामस्ती करायला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते. पूर्ण समाधान झाल्यानंतर ते सावकाशपणे परत आले आणि त्यांनीही लगेच स्नान वगैरे केले. तोपर्यंत कुणाला तरी शोध लागला की आमच्या बाथरूममध्ये असलेल्या दोन नळापैकी दुसऱ्या नळामधून सौर ऊर्जेने तापवलेले कढत पाणी मिळण्याची सोय होती. मात्र  नळातून ते गरम पाणी यायला सुरू व्हायच्या आधी एक दोन बादल्या गार पाणी वाहून जावे लागत होते.  मी या ज्ञानाचा उपयोग नंतर दोन दिवस करून घेतला.

दुपारपर्यंत सगळ्यांना सडकून भूक लागली होती. आम्ही अरंबोळ गावात पायीच फिरत फिरत चांगल्या  क्षुधाशांतीगृहाचा शोध घेतला. त्या लहानशा खेड्यातसुद्धा 'पंजाबी, चायनीज. मालवणी, गोमंतकी' वगैरे पद्धतीचे "जेवण तयार आहे" असे बोर्ड अनेक ठिकाणी लागलेले होते, पण ते गावठी 'ढाबे' आमच्या 'क्वालिटी'च्या कल्पनेत बसत नव्हते. दहा पंधरा मिनिटांनंतर एका ठिकाणचा अँबियन्स बरा वाटला म्हणून आम्ही तिथे आत शिरलो.  ती सुद्धा एक शेडच होती पण ती आकाराने आमच्या रिसॉर्टच्या शेडच्या चौपट मोठी होती. तिच्या अर्ध्या भागात दोनतीन परदेशी आणि चारपाच देशी पर्यटक जेवण करत बसले होते. आम्ही दुसऱ्या अर्ध्या भागात विसावलो. 



एका वेटरने तत्परतेने तीन चार छापील मेनूकार्डे आणून दिली. ती इंग्लिशमध्ये होती आणि तिथल्या बहुतेक खाद्यपेय पदार्थांची नावेही इंग्रजी, पोर्च्युगीज, स्पॅनिश, इटालियन वगैरे वाटत होती. एक ओझरती नजर टाकून मी माझ्या हातातले मेनूकार्ड कुणाला तरी देऊन टाकले. माझी मुले, सुना, नातवंडे वगैरे लोक इंग्लंड अमेरिकेत काही काळ राहिलेली असल्यामुळे काही नावे त्यांच्या ओळखीची असावीत. त्यांनी एकमेकांशी चर्चा करून तीन चार अजीबोगरीब पेये आणि पाचसहा अनोळखी खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली. "तुम्हाला काय पाहिजे ?" असे मला विचारताच "मी चार घास वरणभात, खिचडी असे काहीतरी खाईन आणि तुमच्या पदार्थांमधला एक एक घास चाखून पाहीन" असे सांगितले.  त्यानुसार माझ्यासाठी एका प्रकारचा पुलाव मागवला गेला. अर्थातच तोही आम्ही वाटून घेतला.

तिथला वेटर चेहेऱ्यावरूनच ईशान्य भारतातला किंवा तिबेटी दिसत होता आणि त्याचा सहाय्यकही तसाच नकटा आणि मिचिमिची डोळ्यांचा होता, पण ते दोघेही अतीशय नम्र आणि तत्पर होते. आम्ही मागवलेले सगळे निरनिराळे पदार्थ त्यांनी काही चूक न करता रीझनेबल वेळात आणले आणि अदबीने वाढले.  तिथली चवही सगळ्यांना पसंत पडली आणि खिशाला मानवली.

---------------

भाग  - ७

मी १९६१ साली शाळा सोडली, १९६३ साली सायन्स कॉलेज आणि १९६६ साली इंजिनियरिंग कॉलेज सोडले. त्या काळात कुठलीच संपर्कसाधने उपलब्ध नसल्यामुळे माझ्या तिथल्या मित्रांशी नंतर माझा कसलाही संपर्क राहू शकला नव्हता. माझी मुले त्या बाबतीत सुदैवी आहेत आणि आजही त्यांच्या शाळेतल्या काही मित्रांच्या संपर्कात आहेत. उदयच्या शाळेतले बरेचसे मित्र परदेशात स्थायिक झाले आहेत, पण त्यातले काहीजण भारतात परत आले किंवा इथेच राहिले आहेत. ते मुख्यतः मुंबई, पुणे किंवा बेंगळूरूला असल्याने त्या सर्वांनी गोवा या मध्यवर्ती ठिकाणी भेटायचे ठरवले आणि तिथल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये एका ग्रँड रियुनियन पार्टीचे आयोजन केले होते. योगायोगाने उदय यावेळी भारतात आलेला असल्यामुळे त्याला त्या पार्टीत सामील होणे शक्य होते आणि तिथे जाणे हेच आमच्या गोवा ट्रिपचे एक कारण होते. ती जागा आमच्या रिसॉर्टपासून बरीच दूर होती. उदय आणि शिल्पा गाडी घेऊन संध्याकाळी त्या पार्टीला गेले. 



सगळी मंडळी सकाळी समुद्रात खेळून थोडी दमली होती आणि दुपारी छान पेटपूजा झाल्याने सुस्तावली होती. बाहेर थोडा थोडा पाऊसही पडत होता आणि वातावरण थोडे कुंद झाले होते. त्यामुळे आम्ही संध्याकाळचा कुठला कार्यक्रम ठरवला नाही. रिसॉर्टच्या अंगणातच फिरून आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य न्याहाळून घेतले. ज्येष्ठ नागरिकांसाठी शॅकमधून रूमवरच एक हंडी खिचडी मागवली आणि तिथेच बसून खाल्ली. रात्रीच्या  क्षुधाशांतीसाठी तेवढे जेवण पुरेसे होते. 



दुसऱ्या दिवशी दूधसागरचा प्रसिद्ध धबधबा पहायला जायचा विचार आम्ही केला होता. चेन्नै एक्सप्रेसमध्ये तिथले सीन पाहिल्यानंतर आमची उत्सुकता वाढली होती. आम्ही चार वर्षांपूर्वी गोव्याला गेलो होतो तेंव्हा आम्हाला तो पहायला वेळ मिळाला नव्हता. या वेळी आम्ही त्यासाठी एक पूर्ण दिवस ठेवला होता आणि आमचे स्वतंत्र वाहन आणले होते.  पण ड्रायव्हरला तिकडे गाडी न्यायला सांगितले तर त्याने स्पष्ट नकार दिला आणि आपली गाडी तिथे जाऊ शकत नाही असे सांगितले. आमच्यासाठी हा एक लहानसा धक्काच होता. इंटरनेटवर थोडी चौकशी केल्यावर असे कळले की फक्त गोवा टूरिझमने आयोजित केलेल्या सहलीतून तिथे जाता येते. बहुतेक टूरिस्ट कंपन्या अगोदरपासून हे रिझर्व्हेशन घेऊन ठेवतात. तिथे असे आयत्या वेळी ठरवून जाता येत नाही.  त्यामुळे आणखी काय पहाता येईल हे गूगलवरच शोधले. मंगेशी, शांतादुर्गा, ऑल्ड गोव्यामधले जुने कॅथेड्रल, दोना पावला, मीरामार, फोर्ट अॅग्वाडा वगैरे नेहमीच्या जागा आम्ही सगळ्यांनीच  पाहिलेल्या असल्यामुळे त्यांचे जास्त आकर्षण नव्हते. त्यापेक्षा वेगळी अशी नवी जागा पहायचे आम्ही ठरवले. त्याचे नाव होते रीस मागोस फोर्ट.   

------------------------

भाग  - ८



जीपीएस वर 'रीस मॅगोट फोर्ट' असे 'गंतव्य स्थान' टाकून आम्ही गाडी सुरु केली. उत्तर गोव्याच्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांवरून आमचा प्रवास चालला होता. हा भाग तर अतीशय रमणीय होता ही निसर्गाची देणगी आणि रस्तेही चांगले होते ही गोवा शासनाची कृपा. काय ते डोंगार? काय ती झाडी? काय ती हिरवाळ? काय त्या खाड्या? सगळं एकदम ओक्केमधीच व्हतं की! त्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत आम्ही त्या किल्ल्यापर्यंत जाऊन पोचलो, पण तिथे आत जायला प्रवेश कुठून आहे हे बहुधा जीपीएसला माहीत नसावे. एका बाजूला रम्य मांडवी नदी आणि दुसऱ्या बाजूला त्या किल्ल्याची तटबंदी पहात पुढे जातांना आम्हाला शंका आली म्हणून थांबून चौकशी केली तेंव्हा आम्ही थोडेसे पुढे आल्याचे समजले. मागे जाऊन शोध घेतल्यावर एकाद्या खेड्यातल्या पोस्ट ऑफीस किंवा चावडीसारखे एक पिटुकले ऑफीस दिसले.  त्यावेळी तर तिथे कोणीच व्हिजिटरही नव्हते. नुसताच एक रिकामा काउंटर होता. कदाचित यामुळेच ते ऑफिस आधी आमच्या लक्षात आले नव्हते.



पुन्हा थोडे पुढे जाऊन नदीकाठी गाडी पार्क केली आणि ऑफिसात गेलो. त्यांनी सांगितले की किल्ला पहायचा असेल तर 'मास्क जरूरी ' आहे. त्या वेळी गोव्यात सगळे बिनामास्कचे हिंडत असले तरी आम्ही आमच्याबरोबर मास्क आणले होते. तसे ते ऑफिससमोरच्या चहाच्या टपरीवरही मिळत होते. आम्ही दोन तीन पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि तिकीटे काढून दुर्गदर्शनाला सुरुवात केली.



पंधराव्या शतकात जेंव्हा आदिलशहा बहामनी साम्राज्यात सरदार होता तेंव्हा त्याने गोवा जिंकून या डोंगरावर एक किल्ला बांधला होता.  पुढे आदिलशाही वेगळी झाल्यावर हा भाग त्यांच्या राज्यात आला. पोर्तुगीजांनी गोव्यात जम बसवल्यावर या किल्ल्याला आणखी मजबूत केले. पुढे छत्रपती संभाजी राजांनी आपल्या गोमंतकाच्या मोहिमेत हा किल्लाही जिंकून घेतला, मोंगल शिरजोर झाल्यावर त्यांनीही हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यांनी दक्षिणेचा नाद सोडून दिल्यावर पोर्तुगीजांनी पुन्हा गोवा जिंकून घेतले आणि ते भारताने स्वतंत्र करेपर्यंत आपल्या ताब्यात ठेवले. हा सगळा चित्रमय इतिहास दाखवणारे एक माहितीपूर्ण प्रदर्शन या रीस मागोस किल्ल्यावरच आहे.



तिथे सुरुवातीला एक चढाव असलेला फरशा बसवलेला रस्ताआहे.अर्धा टप्पा चढून वर गेल्यावर एका पुरातन कालीन वटवृक्षाखाली बसून विसाला घ्यायला जागा आहे. त्यानंतर पुढे पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण किल्ल्याच्या माथ्यावर येतो. इथे एक माणूस तिकीटे पाहून आत सोडतो. तसा हा किल्ला आकाराने लहानसा आहे, पण सगळीकडे फरशा बसवल्या आहेत. आधी पोर्तुगीजांच्या संरक्षण खात्याने आणि नंतर गोवा राज्याच्या पुरातत्व खात्याने त्याची इतकी उत्तम डागडुजी केलेली आहे की कुठेही एकही दगड ढळलेला आहे किंवा सैल झाला आहे असे दिसले नाही. सगळ्या फरशा आणि भिती  कोकणातल्या लाल दगडांनी सुबकपणे बांधलेल्या आहेत. या किल्ल्यावर सात आठ कोठड्या आणि तळघरे आहेत. पूर्वीच्या काळी त्यात खजिना किंवा दारूगोळा वगैरे साठवून ठेवत असत. गोवामुक्तीच्या लढ्यात कैद केलेल्या देशभक्तांनाही इथल्या अंधारकोठड्यांमध्ये कोंडून ठेवले जात असे. किल्ल्याच्या माथ्यावर दोन मोठी दालने आहेत. एका दालनात गोव्याचा अथपासून इतिपर्यंत इतिहास दाखवणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन आहे, तर दुसऱ्या दालनात सुप्रसिद्ध गोमंतकीय व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा याच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आहे. हा माझासुद्धा आवडता व्यंगचित्रकार आहे आणि त्याची अनेक कारटून्स माझ्या संग्रहात आहेत. यामुळे मी हे प्रदर्शनही आवडीने पाहून घेतले. 



या किल्ल्यावर चढतांना तसेच चढून वर गेल्यावर ठिकठिकाणाहून खाली वहात असलेल्या मांडवी नदीचे सुंदर दृष्य दिसते. एकंदरीत हा किल्ला पहायला मजा आली.


---------------




भाग  - ९

रीस मॅगोस किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यातल्या विजेच्या सगळ्या खांबांवर गोवा म्यूजियमच्या आकर्षक जाहिराती लावलेल्या होत्या. त्या पाहून आम्हालाही ते वस्तुसंग्रहालय जवळच असले तर पाहून घ्यावे असे वाटायला लागले.  किल्ल्यावर जातांना बराच वेळ उन्हात चढउतार केली होती. आता सावलीत बसून जेवण करावे आणि सावलीतच म्यूजियममध्ये वेळ घालवावा असा विचार केला. पण ते म्यूजियम जवळ म्हंटले तरी वळणावळणाच्या रस्त्याने तिथपर्यंत पोचायला बराच वेळ लागला. तिथे आजूबाजूला कुठे क्षुधाशांतीचीही काही सोय दिसली नाही. चौकशी केल्यावर असे समजले की ते म्यूजियम त्या इमारतीच्या तीन मजल्यांवर पसरले आहे आणि ते पहाण्यासाठी माणशी तीनचारशेहे रुपये इतके तिकीट आहे. सगळ्यांना भूकही लागली होती. त्यामुळे त्या वेळी कुणाला वस्तुसंग्रहालय पहाण्यात रुचि नव्हती.



गूगलवर शोध केल्यावर हाउस ऑफ लॉइड्स नावाचे रेस्टॉरेंट सर्वात जवळ दिसले. तिथल्या इंडस्ट्रियल एरियातले अनेक लहान लहान कारखाने आणि गोडाउन्समधून वाट काढत काढत दोन तीन किलोमीटर गेल्यावर ती जागा एकदाची सापडली. एका जुन्या बंगल्यामध्ये हे हॉटेल थाटले होते. त्यामुळे ते बाहेरून गोवन स्टाइलचे 'हाउस'च वाटत होते. गेटमधून आत जाताच थोडी फुलझाडे होती, बंगल्यात शिरताच पोर्चमध्ये जॉनी वॉकरचा सात आठ फूट उंच पुतळा स्टाइलमध्ये उभा होता. तांब्यापितळेसारखे दिसणारे मातीचे मोठमोठे माठ शोभेसाठी मांडून ठेवले होते. आतमध्ये सुद्धा असेच एथ्निक डेकोरेशन होते. काचेच्या कपाटांमध्ये निरनिराळ्या मद्यांच्या बाटल्या भरल्या होत्या. हॉटेलात इतका मंद प्रकाश होता की आम्हाला उन्हातून आत आल्यावर आधी तर ते हॉटेल सुरू आहे की नाही अशीच शंका आली. 



टेबलावर बसताच मेनूकार्ड आले. इथेही मी एक पान उलगडून पाहिले, पण त्यात कुठलाच माझ्या ओळखीचा पदार्थ नसल्यामुळे ते मुलाला देऊन टाकले. मात्र इथे पदार्थांच्या किंमती अवाच्या सव्वा आहेत एवढे माझ्याही लक्षात आले. आम्ही सुरुवातीला काही ड्रिन्क्स आणि स्टार्टर्स मागवू अशा अपेक्षेने त्यांनी लहान प्लेट्स मांडायला सुरुवात केली होती, पण किंमती पाहता आम्ही एकदम मेन कोर्सवरच आलो आणि विचित्र युरोपियन नावे असलेले चार पाच पदार्थ मागवले. मग वेटर्सनी आधी ठेवलेल्या प्लेट्स उचलून नेल्या आणि मोठ्या प्लेट्स आणल्या. भरपूर बटर आणि चीज वगैरे घातले असल्यामुळे ते पदार्थ रुचकर होते आणि आम्ही चाटून पुसून फस्त केले. 



-------           

भाग  - १०



आम्ही त्या रिसॉर्टमध्ये अपरात्री जाऊन पोचलो होतो तेंव्हा कुठल्याही चेकइन फॉर्मॅलिटीज झाल्या नव्हत्याच, नंतरही त्या झाल्या नाहीत. मला तरी तिथे रिसेप्शन ऑफिस दिसले नाही. दुसरे दिवशी सकाळी एक माणूस उंच काठीला बांधलेल्या केरसुणीने आमच्या इमारतीचे अंगण झाडतांना दिसला. तोच तिथला रखवालदारही होता आणि बहुधा केअरटेकरही असावा. गोव्यात कुठे तरी त्याच्या कंपनीचे ऑफिस आहे असे त्यानेच सांगितले. तिथे येणाऱ्या प्रवाशांच्या बुकिंगचे रेकॉर्ड्स तिथे ठेवत असतील. पैशाचे व्यवहार तर इलेक्ट्रॉनिकलीच होत होते. आमच्या इमारतीवर कसलाच बोर्ड नव्हता. या रिसॉर्टच्या नावाखाली अशा आणखी किती इमारती असतील ? या इमारतींच्या इतर खोल्यांमध्ये कोण उतरले असेल ? त्या मालकाकडे किंवा मॅनेजमेंटकडे अशी किती रिसॉर्ट्स असतील ? कोण जाणे ! अरंबोळ बीचवर तर पर्यटकांची काहीच गर्दी दिसत नव्हती. झोपायला वातानुकूलित बेडरूम्स, त्यात गुबगुबीत गाद्यांसह प्रशस्त पलंग, स्वच्छ स्वच्छतागृहे आणि हाकेच्या अंतरावर सागरकिनारा या आमच्या प्राथमिक गरजा इथे भागवल्या गेल्या होत्या, शिवाय वाय फाय उपलब्ध होते, मग हाक मारताच किंवा बेल वाजवताच धावून येणारे नोकर चाकर नसले तरी त्यांच्यावाचून आमचे काही अडले नाही. सुरुवातीला पत्ता शोधायला झालेला त्रास सोडला तर नंतर आम्हाला सुदैवाने इतर काही प्रॉब्लेम आला नाही.



आम्ही ज्या हॉटेलात जेवायला जात होतो तिथे पहिल्याच दिवशी मला दाढी आणि अस्ताव्यस्त जटा वाढवलेला एक कळकट माणूस एका कोपऱ्यात बसलेला दिसला. त्याने अंगात तोकडी आणि मळलेली भगवी कफनी घातली होती आणि गळ्यात रुद्राक्षासारख्या दिसणाऱ्या जाडजूड माळा घातल्या होत्या. प्रथमदर्शनी मला तो एक संन्याशी वाटला आणि इथे काय करतोय् याचे नवल वाटले. पण थोड्याच वेळात तो उठला, त्याने तोंडात एक सिगरेट ऐटीत धरून लायटरने शिलगावली आणि झुरके मारत तो इतर दोन परदेशी नागरिकांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायला लागला. तेंव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो हिमालयातला तपस्वी संन्यासी नसून फॅशनेबल विदेशी, कदाचित हिप्पी  होता.



गोव्याला जाणारे बहुतेक सगळे पर्यटक तिथले जगप्रसिद्ध समुद्रकिनारे, मंदिरे, चर्चेस, किल्ले आणि सिनेमांमध्ये दाखवलेली प्रेक्षणीय स्थळे पाहून येतात. मीसुद्धा पहिल्या एक दोन ट्रिप्समध्ये हेच केले होते. पण तिथे जास्त दिवस राहणे आपल्या खिशाला परवडत नाही आणि दोन तीन दिवसात हे सगळे पहाण्यात खूप धावपळ आणि दमणूक होते. त्यात नुसतेच या त्या भोज्ज्याला शिवणे होते, "आम्ही पण हे पाहिले आहे" असे लोकांना सांगायची सोय होते, पण कुठेतरी त्यातली मजा हरवते असे मला अलीकडे वाटायला लागले आहे. मला आता वयपरत्वे दमणूक सोसत नाही आणि इतरांनीही या सगळ्या जागा पाहिलेल्या होत्या. त्यामुळे या वेळी कसलेही टेन्शन न घेता दोन दिवस अगदी आरामात काढायचे असे आम्ही ठरवले होते आणि जो बीच निवडला होता तो मुंबईपुण्याच्या गजबजाटापासून तर दूर होताच, पण पणजी किंवा मडगावसारख्या गोव्यातल्या बाजारपेठांपासूनही दूर विजनवासात होता. आम्ही जेवढ्या भागातून फिरून आलो तो सगळा निसर्गसौंदर्याने नटलेला पूर्णपणे ग्रामीण भाग होता. अशी आमची ही एक जराशा वेगळ्या प्रकारची गोव्याची सहल झाली.

------------------------------ 

भाग  - ११



गोव्याहून परत येतांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन यायचे हे आधीपासून ठरलेलेच होते. त्याप्रमाणे आम्ही सगळे सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून तयार झालो आणि परतीच्या वाटेला लागलो. गोव्यातला आणि तळकोकणातला रम्य निसर्ग आमच्या साथीला होताच. दोन तीन तास मजेत मार्गक्रमण केल्यानंतर न्याहारीची आठवण झाली. मुंबई गोवा महामार्गावरच असलेल्या एका बऱ्यापैकी खाद्यालयाला भेट देऊन इडली, दोसा, उत्तप्पा, उपमा वगैरे शुद्ध सात्विक शाकाहारी पदार्थांनी भरपूर उदरभरण करून घेतले.


आम्ही कोल्हापूरवरून गोव्याला जातांना सगळा घाटातला प्रवास रात्री झाला होता. त्यावेळी सह्याद्रीच्या कुशीतल्या सगळ्या वृक्षवल्ली काळोखात लपल्या होत्या. परतीचा प्रवास मात्र उजेडात असल्यमुळे आम्हाला कणकवली ते गगनबावड्यापर्यतच्या घाटातले सगळे अद्भुत निसर्गसौंदर्य पहायला मिळाले. मुंबई, पुणे, सातारा इकडल्या भागातले डोंगर उघडे बोडके वाटतात, तसे तिथे नव्हते. अधून मधून धुक्याचे झूँघट सावरत तिथली गर्द वनराई डोळ्यांना सुखावत होती. सह्याद्रीचे ते वैभव नजरेचे पारणे फेडत होते. आणखी दक्षिणेला कारवार जिल्ह्यात तर दिवसासुद्धा अंधारगुडुप वाटेल इतकी घनदाट झाडी असते.  कोल्हापूर जवळ यायला लागले तसे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाचे मळे दिसायला लागले आणि पुढेही कऱ्हाड येऊन जाईपर्यंत ते दिसत राहिले. 


रंकाळ्याच्या बाजूने आम्ही आमची गाडी सरळ अंबाबाईच्या देवळाकडे नेली. पण दोन चौक आधीच ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि प्रवासी वाहनांना  तिथून पुढे जायला बंदी असल्याचे सांगितले. त्या चौकात गाडी वळवून त्याने ती पार्क करायला नेली. पुढची दहा मिनिटे आम्ही पदयात्रेचे थोडेसे पुण्य मिळवले. दुपारची वेळ असल्यामुळे देवळात फारशी गर्दी नव्हती. आधी एका ठिकाणच्या पायऱ्या चढून काही लोक आत जात असल्याचे बघून आम्ही तिकडे गेलो, पण तिथे लांबून मुखदर्शन होत होते म्हणून खाली उतरून पुढच्या भागात लागलेल्या लहानशा रांगेकडे गेलो.  पंधरा वीस मिनिटात आम्ही देवी अंबाबाईच्या समोर जाऊन पोचलोही आणि आम्हाला त्या मानाने निवांत दर्शन घडले.  यापूर्वी मी जितक्या वेळी तिथे गेलो आहे तेंव्हा सरासरी एक तास तरी रांगेत उभे रहावे लागले होते.

दर्शन घेऊन झाल्यावर मी आणि मुले देवळाच्या कडेला असलेल्या पायऱ्यांवर सावली बघून बसून राहिलो आणि महिलामंडळ खरेदीच्या कार्यक्रमाला लागले. गोव्यात आम्हाला कुठलेच मोठे शहर न लागल्यामुळे तिथे त्यांची खरेदीची हौस भागली नव्हतीच. महालक्ष्मीच्या देवळाच्या आवारातच खूप दुकाने आहेत आणि बाहेरूनही विविध प्रकारच्या दुकानांनी गराडा घातलेला आहे.  विशेषतः अमेरिकेत राहून आलेल्या आणि नेहमी तिकडच्या मॉल्समध्ये खरेदी करणाऱ्यांना अशा प्रकारच्या बाजारात खरेदी करण्यात जास्तच गंमत वाटते.

सगळ्यांची मनसोक्त खरेदी करून झाल्यावर आम्ही पुन्हा दोन चौक ओलांडून खुणेच्या जागी आलो, ड्रायव्हरदादाला बोलावून घेतले आणि पुण्याच्या मार्गाला लागलो.

-----------------------

भाग  - १२

या सहलीच्या निमित्याने मला काही गोष्टी समजल्या किंवा त्या माझ्या नव्याने लक्षात आल्या.

१. आम्ही पुण्याहून गोव्याला आठ तासात पोचून जाऊ हा आमचा भ्रम होता. किंवा गूगलवर ठेवलेला अनाठायी विश्वास होता. आम्हाला जातांना आणि येतांना दोन्ही वेळा सुमारे बारा तास लागले. मोठा ग्रुप आणि मोठी गाडी असेल तर सावधपणे जायला इतका वेळ लागणार हे आधीपासून धरून चालायला हवे होते. 

२. जीपीएसवर विसंबून राहिल्यामुळे त्याने किंवा तिने आपल्याला कसे चुकीच्या किंवा निर्जन जागी नेऊन सोडले याचे खूप विनोदी किस्से मी ऐकले होते, पूर्वी तसा अनुभवही घेतला होता. विशेषतः नो एंट्री, वन वे वगैरेंचे सतत बदलत जाणारे नियम त्या सिस्टमला माहीत होत नसल्याने होणारा गोंधळही मी पाहिला होता. त्यामुळे माझा जीपीएसवर पूर्ण विश्वास नव्हता.  या वेळी जेंव्हा आम्हाला एका उभ्या क्रॉसपाशी आणून "तुमची गंतव्य जागा आली आहे" असे त्या बाईने अत्यंत मंजुळ आवाजात सांगितले तेंव्हा मला हसावे की रडावे ते समजेना आणि म्हणावेसे वाटले की, "बाई गं, आमचे फायनल डेस्टिनेशन कुठल्या तरी वैकुंठधामात असेल, पण आम्हाला त्याची एवढी घाई नाही आहे."  पण त्यानंतर पायी चालत जाता तिनेच अपरात्रीच्या अंधारात आम्हाला विश्रांतिस्थानापर्यत बरोबर नेऊन पोचवलेही होते. त्यामुळे संभाव्य वेळ सोडला तर अचूकतेच्या बाबतीत जीपीएसला आता तोड नाही असेच म्हणावे लागेल.

३. दूधसागर धबधब्यासंबंधी आवश्यक ती माहिती आम्ही आधी घेतली नव्हती. आपल्याकडे गाडी असेल तर जीपीएस लावून आपण कुठेही जाऊ शकतो हा आमचा आणखी एक भ्रम होता हे अगदी शेवटच्या क्षणी समजले. त्यामुळे आम्हाला हे निसर्गाचे आश्चर्य पहाता आले नाही, पण एक मानवनिर्मित सुरेख तरीही अप्रसिद्ध असा किल्ला पहायला मिळाल्याने थोडी आंशिक भरपाई झाली. 

४. समुद्रकिनाऱ्यावरले एकादे रिसॉर्ट कसे असावे याबद्दल मी पूर्वीच्या अनुभवावरून जी कल्पना केली होती आणि जसे रिसॉर्ट आमच्या पदरात पडले त्यात जमीन अस्मानाचा फरक होता. तिथे एक साधा बोर्ड नव्हता, कोणी मॅनेजर नव्हता की कुठलीही सेवा उपलब्ध नव्हती. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये असेही उदाहरण असू शकेल यावर मी विश्वास ठेवला नसता. कदाचित या काळात एवढ्या पैशात इतक्याच सोयी मिळत असतील असेही असेल. त्यामुळे आमचे बरेचसे पैसे वाचलेही असतील.  

५. मी जेंव्हा जेंव्हा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात जातो तेंव्हा तेंव्हा मला त्या देवळाचे आर्किटेक्चर जास्तच गूढ वाटत जाते. हे देऊळ बांधण्यासाठी इतके जाडजूड आणि एकमेकांच्या इतके जवळ जवळ असंख्य असे खांब का दाटीवाटीने उभे केले असतील याचा मला नेहमीच अचंभा वाटत आला आहे. मला तरी दुसऱ्या कुठल्याही देवळात इतके खांब पाहिल्याचे आठवत नाही. मी लहानपणी अशी एक दंतकथा ऐकली होती की कुणीतरी या देवळातले खांब मोजण्याचा प्रयत्न केला आणि तो आंधळा झाला म्हणे. त्यामुळे मी ते खांब मोजण्याचा कधीच प्रयत्नही केला नाही, पण पुरातत्व विभागाकडे ही माहिती उपलब्ध असावी अशी माझी कल्पना आहे.  

६. कोल्हापूरजवळील काणेरी येथील सिद्धगिरी मठामधील ग्रामजीवन वॅक्स म्यूजियमबद्दल मी खूप वर्णन ऐकले असल्यामुळे ते पहाण्याची उत्सुकता होती. तेवढ्यासाठी मुद्दाम तिथपर्यंत जाणे शक्य नाही. पण या वेळेस वेळेचे योग्य नियोजन करून ते ही पाहता आले असते असे नंतर वाटून गेले. पण अलीकडे एका दिवशी एकच काम पण नीटपणे करायचे असा नियमही मी स्वतःला घालून घेतला आहे. तो मोडला असता.

 


७. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' असलेला माझ्या खिशातला मोबाईल चक्क माझ्यावर हेरगिरी करत होता आणि गूगलने मलाच मेल पाठवून मी कुठे कुठे फिरून आलो याचा नकाशासह साद्यंत वृत्तांत पाठवून दिला. पण त्याने मी काढलेले फोटो न दाखवता त्याच्या स्टॉकमधले काही फोटो दिले होते. ते पाहतांना "अरे, आपण ही जागा तर पाहिलीच नाही !"  असेही वाटून गेले.



(समाप्त)




2 comments:

Anonymous said...

Anand you have done excellent job. Enjoyed reading

Anand Ghare said...

धन्यवाद. आपण आपले नाव खाली दिले असते तर हे कौतुक कुणाकडून आहे हे मलाही समजले असते.