Saturday, May 14, 2022

माझे मिसळपाववरील पहिले वर्ष

 

आपले लाडके श्री.तात्या अभ्यंकर यांना आपल्यातून जाऊन तीन वर्षे झाली तरी त्यांच्या आठवणी अजून मनात ताज्याच आहेत, इतक्या त्या खोल रुजल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर मी केलेला श्रद्धांजलींचा एक संग्रह या स्थळावर दिला आहे. https://anandghare.wordpress.com/2019/05/16/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%b0-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d/

 त्यांच्या मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल मी दहाबारा वर्षांपूर्वी लिहिलेला एक लेख त्यांच्या स्मरणार्थ खाली देत आहे. या ब्लॉगच्या वाचकांपैकी काही जुने मिपाकर असतील तर त्यांना ते कदचित दिवस आठवत असतील.   तात्यांनी मिसळपावमधून अंग काढून घेतल्यानंतर मीही मिसळपावला भेट दिलेली नाही. त्यामुळे आज तिथे काय काय चालते याची मला माहिती नाही. या लेखात फक्त खूप जुन्या आठवणी आहेत..... आनंद घारे


मिसळपाववरील पहिले वर्ष

एक वर्षापूर्वी मी मिसळपावच्या हॉटेलात पहिले पाऊल ठेवले. ते कोण चालवत असे याची त्या वेळी मला कांही कल्पना नव्हती. पण आंत आल्या आल्या तात्यासाहेबांनी जुनी ओळख दाखवून मोठ्या अगत्याने "या, बसा." असे म्हणत माझ्याकडे खुर्ची सरकवली. आजूबाजूला बसलेल्या लोकांत कांही ओळखीचे चेहेरे आणि मुखवटे पाहून मलाही आपल्या माणसांत आल्यासारखे वाटले. काउंटरवर जाऊन मी थाळी भरून घेतली. जेवण तर मस्तच होते. तेंव्हापासून मी इकडे येत राहिलो. मधील काळात कधी मला तर कधी माझ्या संगणकाला विषाणूंची बाधा झाली, कधी मी परगांवी गेलो वगैरे कारणांमुळे मला अवकाशाशी जडलेले नाते राखता आले नाही. ते पुन्हा जुळेपर्यंत पोस्टाच्या पेटीत पत्रांचा ढिगारा सांचलेला असायचा. माझ्या ढाब्यावरसुध्दा पूर्वी चार माणसे यायची, त्यांची संख्या आता पांच सहा (आंकड्या)वर गेली आहे. त्यांना काय हवे नको ते पहायचे असते. त्या व्यापातून वेळ काढून अगदी रोजच्या रोज मिसळपाववर यायला जमले नाही आणि त्यामुळे कांही छान पदार्थांची ताजी चव घेता आली नाही. पण आपल्याला जे मिळाले नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे मिळाले त्याची कदर करावी, असे मी नेहमीच स्वतःला आणि कधी एकादा ऐकणारा भेटला तर त्याला सांगत असतो.

"तुम्हाला वाचनातून काय मिळतं हो?" असा प्रश्न आपण दहा लोकांना विचारला तर त्याची निदान वीस तरी उत्तरे मिळतील, पण त्या सर्वांची गोळाबेरीज बहुधा माहिती आणि मनोरंजन यात होईल. पुढे त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात उन्नती झाली, अनेक प्रकारचा आनंद मिळाला वगैरे त्याचे कित्येक फायदे त्यातून निघतील. मी मात्र एकादी गोष्ट समजून घेत असतांना त्या क्रियेत तल्लीन होऊन जातो आणि देहभान हरपवून टाकणारा एकादा कलाविष्कार पहात किंवा ऐकत असतांनासुध्दा त्यातून कसला तरी शोध बोध मनातल्या मनात चाललेला असतो. माहिती आणि मनोरंजन या गोष्टी मला एकमेकींपासून वेगळ्या करता येत नाहीत. मिसळपाववर मला त्या दोन्हीही मिळाल्या असे सांगता येईल. 

मिपावरच्या मेनूकार्डात कांही मुख्य विभाग आहेत. त्यातल्या प्रत्येक पदार्थाला लेखनविषय आणि लेखनप्रकार यांची लेबले लावावी लागतात. अशा चौकटी आंखून त्यात बसतील असे शब्द लिहायला मला जमत नाही. तापलेल्या तव्यावर फोडून टाकलेल्या अंड्याप्रमाणे माझे लिखाण अस्ताव्यस्त पसरत जाते. त्यामुळे मुळात मला लिहायला तरी कुठे येते? असा प्रश्न कांही लोक विचारतात, तसा तो मलाही पडतो. पण मी त्याला नजरेआड खुंटीला टांगून ठेवतो आणि सुचेल तसे कीबोर्डवर बडवून घेतो. अर्थातच इतर लोकांच्या लेखनाच्या लेबलांकडे माझे लक्ष जात नाही. मी सरळ खाली लिहिलेले वाचायला सुरुवात करून देतो.

मिपाच्या सर्व विभागात 'जनातलं, मनातलं' हे माझे मुख्य खाद्य आहे. अनेक छान छान कथा, अनुभव, प्रवासवर्णने, व्यक्तीचित्रे वगैरे मला त्या विभागात वाचायला मिळाली. कांही कथा काळजाला भिडणार्‍या होत्या तर कांही गुदगुल्या करणार्‍या, कांही क्षणाक्षणाला रहस्य वाढवत नेणार्‍या तर कांही शेवटच्या एका वाक्यातच दणका देणार्‍या अशा नाना तर्‍हा त्यात होत्या. कधी कधी कल्पितापेक्षा वास्तव जास्त अद्भुत किंवा भयानक असते याचे अनुभव कोणी लिहिले, तर कोणी आपले मजेदार किस्से सांगितले. कोणी गौरवशाली भूतकाळातली एकादी गोष्ट सांगितली तर कोणी नजिकच्या भविष्यकाळात काय घडू शकते याचा अंदाज वर्तवला. वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांवरील लेखांचा प्रवाह तर धोधो वहात असतो. वर्तमानपत्रात छापून येण्यापूर्वीच एकादी महत्वाची बातमी मला मिपावर वाचायला मिळाली असेही अनेक वेळा घडले, इतके इथले सदस्य सजग आणि तत्पर आहेत. समुद्रकिनारा ते बर्फाच्छादित पर्वतशिखरे, प्राचीन वाडे ते आलीशान पॅलेसेस, तसेच मंदिरे, चर्च, म्यूजियम वगैरे कांही निसर्गसौंदर्याने नटलेल्या तर कांही मानवाची किमया दाखवणार्‍या अशा अनेक स्थळांची सचित्र वर्णने वाचायला आणि पहायला मिळाली. कांही लेखातून मधुर गायनाचे दुवे मिळाले. अशा प्रकारे हे सदर वाचणे ही एक मेजवानी असायची. कांही चित्रकारांच्या कुंचल्यातील अप्रतिम जादू आणि छायाचित्रकारांच्या कौशल्याची कमाल वेगळ्या कलादालनात पहायला मिळाली.

काथ्याकूट या सदरात होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी संयोजकांची इच्छा आहे! त्यानुसार कधी कधी एकाद्या विषयावर मुद्देसूद चर्चा घडते. त्यातून त्या विषयाचे आपल्याला आधी माहीत नसलेले पैलू समोर येतात. "वादे वादे जायते तत्वबोधः।" या उक्तीनुसार आपल्या मनातल्या कांही अस्पष्ट संकल्पनांना आकार येतात, त्याचे रेखाचित्र असेल तर त्यात रंग भरले जातात, चित्र असेल तर त्याला उठाव येतो. पण कांही वेळा मुळात टाकलेल्या काथ्याकडे दुर्लक्ष होते आणि लोक आपापल्या सुतळ्या, दोरखंड, काड्या वगैरे त्यात घालून कुटत बसतात. अशा काथ्याकुटासाठी काथ्यांचे वेगवेगळे धागे न टाकता एक खलबत्ताउखळमुसळ यंत्र अखंड चालत ठेवले आणि ज्यांना जे पाहिजे ते जितके हवे तितके बारीक किंवा भरड कुटू दिले तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र त्याचा खाट सहन होत नसेल तर हातातला उंदीर तिकडे जाण्यासाठी चुळबुळ करायला लागला की आधी कीबोर्डाचे कनेक्शन काढून ठेवणे बरे असते अशी सावधगिरी बाळगण्याची सूचना करावी असे वाटते.

आजची खादाडी हा तर मिसळपावचा लाडका विषय असायलाच पाहिजे. मुखपृष्ठावरच मुळी इतके छान छान फोटो टाकलेले असतात की ते पाहतांना तोंडाला पाणी सुटते. इतर विभागातले लाक्षणिक अर्थाने 'पदार्थ' वाचून मन तृप्त होते, पण पाककृती मात्र प्रत्यक्ष करून आणि जिभेने चाखून पहाव्याशा वाटतात. आमच्या किचनलँडचा फक्त टूरिस्ट व्हिसा मला मिळालेला असल्यामुळे तिथे गेल्यावर लुडबूड करता येत नाही. शिवाय गोड, तिखट, खारट, आंबट, तेलकट, तुपकट वगैरे सगळ्या चविष्ट पदार्थांच्या आणि उत्तेजक पेयांच्या सेवनावर नतद्रष्ट डॉक्टरांनी नियंत्रण घालून ठेवले आहे. इंटरनेटमधून जशी छान चित्रे पहायला मिळतात, सुरेल संगीत ऐकायला मिळते त्याचप्रमणे खाद्यपदार्थ तयार होतांना पसरणारा घमघमाट आणि तयार झाल्यावर त्याला आलेली चव यांचा आस्वाद दुरून घेता येण्याची सोय कधी तरी होईल असे मनातले मांडे मी मनात खात असतो.

"जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हणतात. त्याप्रमाणे जिथे सूर्याचा प्रवेश होत नाही अशा आभाळात हे महानुभाव आपल्या कल्पकतेचे पंख लावून स्वैर भ्रमण करत असतात. त्यांचे शेपूट धरून त्यांच्याबरोबर जायला मिळाले तर आपल्याला सुध्दा त्याचे नेत्रदीपक दर्शन घडू शकते. पण कधी कधी जे कवीला दिसते ते पाहण्याइतकी क्षमता आपल्या दृष्टीत नसते किंवा आपल्या पंखातले बळ कमी पडते आणि आपण जमीनीवरच खुरडत राहतो. कधी तर आपण त्यांच्या सोबतीने आकाशात उडण्याऐवजी पार पाताळात जाऊन पोचलो आणि कवीला न दिसलेले आपल्याला दिसायला लागले तर पंचाईत होते. अशा अमूर्त अगम्य गोष्टींविषयी मला फारसे आकर्षण वाटत नसल्यामुळे त्या प्रांतात मी क्वचितच जातो. त्यातला विडंबन हा प्रकार समजायला सोपा आणि मजेदार वाटतो. मूळ कविता आपल्या ओळखीची असेल, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे विडंबन करणार्‍याला ती पूर्ण समजली असेल, त्यातले वृत्त, छंद वगैरे व्यवस्थितपणे सांभाळले गेले असेल आणि मूळ कवितेची आठवण करून देणारे महत्वाचे शब्द किंवा ते ध्वनित करणारे तत्सम शब्द वारंवार येत राहिले तर ते विडंबन मस्त वाटते. नुसतेच एका गाण्याच्या चालीवर दुसरे गाणे रचले तर ते विडंबन न वाटता एक स्वतंत्र काव्य होते आणि त्यातल्या काव्यगुणांप्रमाणे त्याचे मूल्यमापन होते.

प्रत्यक्षातील बहुतेक हॉटेलांत ग्राहकांनी मागवलेले पदार्थ वेटर आणून देतो तर बर्‍याचशा कँटीन, कॅफेटेरिया वगैरेंमध्ये स्वयंसेवा असते. मिसळपावच्या हॉटेलात वाढपी तर नाहीतच, स्वैपाकीसुध्दा नाहीत. एक अद्ययावत साधनांनी युक्त असे स्वयंपाकघर आहे. इथे येणारे ग्राहकच आपापला शिधा घेऊन येतात, वाटल्यास इतर ग्राहकांकडून कांही वस्तू मागून घेतात किंवा ढापतात आणि पाकसिध्दी करून पदार्थ तयार झाल्यावर ते काउंटरवर आणून ठेवतात. इतर सदस्य आणि पाहुणे त्याचा मुक्तपणे आस्वाद घेतात. कांही ग्राहकांचे इतरांवर बारीक लक्ष असते आणि ते त्यांना परोपरीने मदत करत असतात. माझ्यासारख्या नवशिक्याने केलेला पदार्थ धांदरटपणामुळे अर्धाकच्चा राहिला तर तो खरपूस भाजून देतात, त्यात ढेकळे राहिली तर ती फोडून त्यांचा चकणाचूर करतात, दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या कांही एक्स्पर्ट लोकांना चुकून आलेले खडे आणि न शिजलेले गणंग पटकन दिसतात, कांही सज्जन खोवलेला नारळ, चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव वगैरे त्यावर पसरतात आणि बाजूला लिंबाची फोड, टोमॅटोचे काप वगैरे ठेऊन छान सजवून देतात. इथली संचालक मंडळीसुध्दा जसा पदार्थ असेल त्याप्रमाणे त्यावर खमंग फोडणी देऊन, तुपाची धार धरून किंवा पिठीसाखर पसरून त्याची गोडी वाढवतात. अधून मधून ते ग्राहकाचा वेष धारण करून येतात आणि ठेवणीतले चमचमीत पदार्थ तयार करून हॉटेलाचे स्टँडर्ड उंचावतात. 

चितळे बंधूंची आंबा बर्फी किंवा बाकरवडी, हलदीरामची सोनपापडी, आलू भुजिया यासारखे सुप्रसिध्द खाद्यपदार्थ किंवा घरी भेट म्हणून आलेले मिठाईचे पुडे इकडे घेऊन यावे असेही कोणाला वाटते. कांही लोक दुसर्‍या चांगल्या हॉटेलातून तिथल्या खाद्यपदार्थांचे पार्सल बांधून आणण्याचा विचार करतात. हे सारे पदार्थ चविष्ट असले तरी मिपाच्या योग्य अशा धोरणाप्रमाणे बाहेरचे खाद्यपदार्थ इथे आणणे वर्ज्य आहे. तसा रीतसर बोर्डसुध्दा लावलेला आहे. पण उत्साहाच्या भरात तिकडे लक्ष न गेल्यामुळे किंवा ते न दिल्यामुळे क्वचित कांही लोक तसे करतात. ते उघडकीला आल्यावर कांही लोक सौम्य शब्दात त्याची जाणीव करून देतात, तर कांही लोक "परवा आम्हाला नाही म्हंटलं होते, आज यांनी केलेलं कसं चालतं ?" वगैरे अवघड प्रश्न विचारून त्यावर वाद घालतात. माझ्यासारखे कांही सदस्य आपापले वेगळे ठेलेसुद्धा चालवतात. त्यात एकादा चांगला पदार्थ बनून गेला तर त्याची चव इतर लोकांनी चाखून पहावी यासाठी कधी कधी ते सदस्य तो पदार्थ  इथे तसेच दुसर्‍या कांही ठिकाणीसुध्दा मांडतात. स्वतः तयार केलेला पदार्थ इथे आणून मांडायला इथल्या नियमांप्रमाणे परवानगी आहे आणि मला त्यात कांही गैर वाटत नाही. पण "आपले उष्टे खरकटे पदार्थ इथे आणून ठेवायला या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत ?" असा ओरडा जेंव्हा आंतल्या गोटातून एकदा झाला तेंव्हा मात्र मी चपापलो. त्यानंतर त्याचा ऑफीशिअली खुलासा झाला असला तरी त्यावरून समजायचे ते समजून घेऊन मी आपल्यापुरता एक निर्णय मनाशी घेतला होता. पण ती कांही भीष्मप्रतिज्ञा नव्हती की ते जाहीर आश्वासन नव्हते, त्यामुळे नंतर ते विसरून गेलो. आज सिंहावलोकन करतांना त्याची आठवण झाली. हा लेख मात्र खास मिसळपावासाठीच लिहिला गेला आहे याची ग्वाही द्यायला हरकत नाही. 

बहुतेक उडप्यांच्या हॉटेलात दारापाशीच एका चांदीच्या चकाकणार्‍या देव्हार्‍यात एक सुंदर मूर्ती ठेवलेली असते किंवा एका स्वामीचा फोटो लावून त्याला ताज्या फुलांचा हार भक्तीभावाने घातलेला दिसतो. मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते. पण मधूनच कोणी भाबडा (वाटणारा) भक्त एका जगद्वंद्य महात्म्याचा फोटो एका भिंतीला चिकटवून त्याला उदबत्ती ओवाळतो. त्यानंतर दोघेतीघे येतात आणि हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेचा घोळ, हॉट अँड सॉवर सॉस वगैरेमध्ये बुडवलेली बोटे त्या चित्राला पुसतात. ते पहायलाही कांही लोकांना मजा वाटते. "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" असे म्हणतात ना!

मिसळपावाच्या हॉटेलातल्या ग्राहकांना एकेक खण देऊन ठेवले आहेत. एकादा खास पदार्थ करून त्यातल्या कोणाच्याही खणात ठेवलेल्या बशीत घालायची सोय केलेली आहे. कांही ग्राहक त्याचा फायदा रोज घेत असतात. मध्यंतरी एकदा एका सदस्याने भरून ठेवलेल्या अमृतकुंभाचे रेखाचित्र दुसर्‍या एका ग्राहकाने त्याला न विचारता काढले, त्यातल्या अ या अक्षरावर फुली मारली आणि त्याच्या चारी बाजूंना काळ्या रंगाची चौकट काढून ते चित्र आपल्या खणात लावून ठेवले. ते पाहून पहिल्या सदस्याच्या अंगाचा तिळपापड झाला आणि या दोन सदस्यात कांही तिखट व कडू पदार्थांची देवाणघेवाण झाली म्हणे. त्याची कुणकुण कानावर आल्यामुळे अशा प्रकारच्या समांतर चर्चा इथे चालतात हे मला समजले. आपल्या बशीत पडलेले पण न आवडलेले पदार्थ काढून कचर्‍याच्या पेटीत टाकायची सोय आहे. "आज आपण आपली बशी साफ केलीत कां?" अशी आठवण एक सन्मान्य सदस्य सर्वांना रोज करून देत असतो. काउंटरवर ठेवलेले सगळे सुग्रास पदार्थ घ्यायलाच मला वेळ पुरत नाही. त्यामुळे इतर कोणाचे बंद खण उघडून त्यातल्या बशांत काय पडले आहे हे पहाण्याचा प्रयत्न मी कधी करत नाही. 

जिवश्चकंठश्च मैत्री असलेले कांही ग्राहक एकमेकांना भेटण्यासाठी या हॉटेलात नेहमी येतात. अर्थातच त्यांच्या गप्पागोष्टी, थट्टामस्करी, उखाळ्यापाखाळ्या वगैरे मस्त रंगतात. या गुजगोष्टी आपापसात करण्यासाठी स्पेशल फॅमिली रूम नसल्यामुळे ते सर्वांसमक्षच चालते. जुन्या काळातल्या इंग्रजी किंवा हिंदी सिनेमातला एक सीन ते पाहतांना माझ्या डोळ्यासमोर येतो. एक जंगी पार्टी चाललेली असते, सारी माणसे छान छान पोशाख करून तिथे आलेली असतात, अचानक त्यातला एकजण हातातला केक दुसर्‍याच्या तोंडावर मारतो, ते पाहून तिसरा चौथ्याकडे फेकतो, पण तो हा हल्ला चुकवतो त्यामुळे तो पांचव्याला लागतो. त्यानंतर सहावा, सातवा, आठवा असे करत पार्टीतले सारेच लोक या खेळात सामील होतात. मधूनच एकादा चार्ली चॅपलिन किंवा राजेंद्रनाथ गालाला लागलेले क्रीम बोटांनी पुसून चाटून घेतो. ते दृष्य पाहतांना सर्व प्रेक्षकांची हंसून हंसून मुरकुंडी वळते.

अशा अनेक गंमतीजंमती मिपावर चाललेल्या असतात. तिथे आज आलेला लेख उद्या इतिहासकाळात जातो आणि परवा तो मुद्दाम शोधून काढावा लागतो इतक्या प्रचंड गतीने ते येत असतात. त्यातले सारेच वाचणे जमत नाही. पण आपल्या आवडीनुसार हवे ते निवडता येते. एकंदरीत पाहता मला हे स्थळ आवडले, शक्य तितक्या वेळा इथे यावे असे वाटले आणि पुढेसुध्दा मी इथे येत रहाणारच आहे असे म्हणतो.

- आनंद घारे

मी हा लेख तीन वर्षांपूर्वी तात्या चालवत असलेल्या शिळोप्याच्या ओसरीवर दिला असावा. त्यावेळी आलेला एक प्रतिसाद.

नरेंद्र गोळे 

मनोगत डॉट कॉमवर आंतरजालीय, अनिर्बंध सत्वर प्रतिसाद चर्चा, देवनागरीत प्रथमच शक्य झाली होती. त्याचा आनंद आम्ही सारेच घेत होतो. क्वचित स्वातंत्र्याचा गैरवापरही व्यक्तिगत टीकेकरता होऊ लागला. मग तेथील प्रशासक श्री. महेश वेलणकर ह्यांनी प्रत्येक नोंदीवर प्रकाशनपूर्व निर्बंध घातले. त्याचा निषेध करण्यासाठी मग मनोगत कट्टा झाला. आयोजकांत एक होते तात्या. मी त्यांना म्हटले की प्रशासकांवर टीका करण्यापेक्षा ’मनोगता’ला उत्तर देण्याकरता तुम्ही ’जनोगत’ काढा आणि चालवून दाखवा ना! त्याला तात्यांनी मिसळपाव डॉट कॉम काढून उत्तर दिले. त्या सर्व जालसंजीवित आठवणींचा गुच्छच ह्या फोटोत दडलेला आहे. मात्र तात्या आज नाहीत. काल होते. आज नाहीत. तात्यांना ईश्वर सद्गती देवो.