Friday, April 01, 2022

रावणाची सोन्याची लंका

 माझ्या लहानपणी अजून टीव्ही आला नव्हता, आमच्या घरी तर रेडिओसुद्धा नव्हता. त्या काळात इंटरनेट, फेसबुक, वॉट्सॅप अशासारख्या गोष्टींची कुणी स्वप्नातही  कल्पना केली नव्हती. दिवेलगणी झाली की कंदिलाच्या मंद उजेडात घरातल्या सगळ्यांची जेवणे उरकून घेतली जायची, पण लगेच झोप येत नसे. अशा वेळी माझी आई घरातल्या मुलांना एकत्र गोळा करून रामायण, महाभारत, भागवत वगैरेंमधल्या सुरस गोष्टी छान रंगवून सांगत असे. आमच्यासाठी यातूनच मनोरंजन, ज्ञान आणि भारतीय संस्कृतीची ओळख होत होती.

लहान मुलांना मारुतीच्या कथा फार आवडत असत. त्याने एकदा कुठल्याशा पर्वताच्या माथ्यावरून उड्डाण केले आणि थेट लंका गाठली. तिथे एक अक्राळविक्राळ राक्षसीण आ वासून त्याला गिळायला उभी होती. मारुतीने तिच्या तोंडातून तिच्या शरीरात प्रवेश केला आणि एकदम सूक्ष्म रूप धारण करून तो हळूच तिच्या कानातून की नाकातून तिच्या नकळत बाहेरही पडला. मग आकाशातून लंकेभोवती घिरट्या घालतांना त्याला अशोकवाटिकेत एका झाडाखाली बसलेली सीतामाई दिसली. 

मारुतीने तिला लगेच ओळखले आणि रामाने दिलेली खुणेची अंगठी दाखवून तिला आपली ओळख पटवून दिली. मारुती तर लगेचच सीतामाईला आपल्या खांद्यावर बसवून घेऊन रामाकडे न्यायला तयार होता, पण सीतेनेच त्याला नकार दिला आणि प्रभू श्रीरामांनी स्वतः तिथे यावे, रावणाला शिक्षा करावी आणि तिला सन्मानाने अयोध्येला घेऊन जावे असे सांगितले. एवढे मोठे उड्डाण करून आल्यामुळे मारुतीला जबरदस्त भूक लागली होती पण तिथे सीतामाई त्याला काय खायला देणार होती? तिने मारुतीला सांगितले की या बागेतल्या झाडांवर खूप फळे लागली आहेत, पण त्यांना स्पर्श न करता जेवढी फळे भूमीवर पडली असतील ती खाऊन त्याने आपली भूक भागवावी. मग  मारुतीने तिथली सगळी झाडे गदगदा हलवली आणि त्यांच्यावरची फळे खाली पाडून त्यांचा यथेच्छ फराळ केला. 

मारुतीने केलेला विध्वंस पाहून तिथले रक्षक धावून आले आणि त्यांनी मारुतीला दोरखंडांनी बांधून रावणाच्या दरबारात हजर केले. मारुतीलाही एकदा रावणाला पहायचे होतेच, म्हणून विशेष प्रतिकार न करता तो त्या रक्षकांच्या बरोबर दरबारात जाऊन दाखल झाला. तो श्रीरामाचा दूत आहे आणि महाबली आहे हे काही तिथल्या कुणाला ठाऊकही नव्हते. एक उद्दाम वानर बागेत शिरला आणि त्याने झाडांना नुकसान पोचवले एवढेच त्यांना कळले होते. त्याची चांगली खोड मोडावी म्हणून रावणाने असा हुकूम केला की त्याच्या शेपटीला आग लावा आणि मग तो कसा तडफडतो याची मजा पहा.

आता शेपटीला आग कशी लावणार ? असे म्हणून त्या सेवकांनी भरपूर चिंध्या गोळा करून त्यांना मारुतीच्या शेपटाला गुंडाळले आणि त्यावर भरपूर तेल ओतून आग लावली.  आग चांगली भडकलेली बघताच मारुतीने आपली शेपूट उचलली आणि थेट रावणाच्या तोंडांवरून फिरवली. त्याच्या दहाही तोंडांवरील दाढ्यांनी पेट घेतला. तो  अरे अरे अरे, त्याला आवरा असे म्हणेपर्यंत मारुतीने त्याला बांधलेले दोर तटतटा तोडून टाकले आणि उड्डाण घेऊन तो लंकेतल्या एका इमारतीवर जाऊन बसला. त्या इमारतीने पेट घेताच त्यांने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या घराला आग लावण्याचा सपाटा चालवला आणि कंटाळा आल्यावर समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आपली शेपटी समुद्रात बुडवून विझवली.

रावणाची ही लंका सोन्याची होती असेही म्हणतात. आधी देवांचा खजिनदार कुबेर याने ती स्वतःसाठी बांधून घेतली होती, त्याच्याकडे सोन्याचा काही तुटवडा तर नव्हताच आणि त्या काळातला सर्वश्रेष्ठ अभियंता असलेल्या मयासुराने आपले सगळे कौशल्य वापरून तिची उभारणी केली होती.  पुढे कुबेराचा सावत्र भाऊ असलेल्या रावणाने त्याला तिथून हुसकून लावले आणि आयत्या बिळात नागोबा होऊन ती सोन्याची लंका बळकावली. रावण हासुद्धा महापराक्रमी होता, तसेच विद्वानही होता. त्याने खडतर तपश्चर्या करून श्रीशंकराला प्रसन्न करून त्याच्याकडून अनेक वरदान घेतले होते. देवादिकांचा पराभव करून त्यांना आपल्या राजवाड्यात नोकर चाकर म्हणून ठेवले होते. एकंदरीत पाहता त्याची प्रजा सुखात रहात असावी असे दिसते. मारुतीने लावलेल्या आगीनंतरसुद्धा ती सोन्याची लंका वैभवसंपन्नच राहिली होती. श्रीरामाने रावणकुंभकर्णांचा वध करून ही लंका जिंकून घेतल्यानंतर त्याने असे उद्गार काढले आहेत, "अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥" ही लंका जरी सोन्याची असली तर मला तिच्यात स्वारस्य नाही, आपली मातृभूमी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. म्हणून श्रीरामाने बिभीषणाला लंकेचे राज्य देऊन टाकले आणि तो अयोध्येला परत गेला.

रामायणावर काढलेल्या एका मराठी चित्रपटात "रम्य ही स्वर्गाहुनि लंका । जिच्या कीर्तिचा सागरलहरी वाजविती डंका ।।" अशा शब्दांमध्ये प्रत्यक्ष रावणानेच लंकेचे सुरेख वर्णन केले आहे. अशा प्रकारे लहानपणापासूनच गोष्टी, महाकाव्ये, कविता, चित्रपट अशा सगळ्या माध्यमांमधून लंकेचे एक अद्भुत असे चित्र मनात तयार झाले होते. ती प्रत्यक्षात कशी निसर्गरम्य आहे याची प्रवासवर्णनेही मी वाचली होती. भारतातल्या लोकांना ती इतकी आकर्षक वाटते तर तिथले लोक तर तिच्यावर किती फिदा असतील? तिथल्या लोकांच्या रावणाबद्दल काय भावना असतील? तो त्यांचा कथानायक असेल का ?  असे विचार मनात येत होते.

महिनाभरापूर्वी माझा एक गिर्यारोहक मित्र श्रीलंकेचा दौरा करून आला. हा मित्र इतर पर्यटकांप्रमाणे गाइडेड टूरमध्ये जाऊन आणि हॉटेलांमध्ये राहून तिकडचा भाग वरवर पाहून येत नाही. तो जिथे जातो त्या देशातल्या सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून राहतो आणि पायी चालत चालत आपली गिरिशिखरांमधली भ्रमंति करतो. त्यामुळे त्याला आलेले अनुभव खूप खरे असतात आणि प्रसारमाध्यमांमध्ये छापून येणाऱ्या ठोकळेबाज लेखांपेक्षा वेगळे असतात.

तर त्याला असे दिसून आले की सर्वसामान्य सिंहली लोकांच्या संस्कृतीत रामायणाला काही स्थानच नाही. ते सगळे बौद्ध धर्मीय असल्यामुळे रामाची उपासना करतच नाहीत, तशी रावणाचीही करत नाहीत. तिकडे आजकाल 'रामायणा टूर' नावाची सहल काढली जाते, त्यात सगळे भारतीय पर्यटक येतात आणि भरपूर पैसे खर्च करतात. त्यामुळे सिंहली लोक त्याच्याकडे फक्त उत्पन्नाचे एक साधन म्हणूनच पाहतात. त्यांच्या मनातून राम, लक्ष्मण, रावण, कुंभकर्ण, बिभीषण वगैरेंबद्दल काहीच भावनांचे बंध नसतात. कोरोनाच्या काळात पर्यटन क्षेत्रावर गदा आल्यामुळे त्यांचे खूप आर्थिक नुकसन झाले आहे. तिथल्या सरकारच्या काही आर्थिक धोरणांचाही फटका तिथल्या अर्थव्यवस्थेला बसून त्राही त्राही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे विदारक चित्र भारतातल्या प्रसारमाध्यमांमध्ये  रंगवले जात आहे. त्याबद्दल बोलतांनाही त्याने सांगितले की त्याला तरी सर्वसामान्य लोक तसे ठीक दिसले. तो जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याला खायलाप्यायला मिळत गेले. काही गोष्टींचा तुटवडा असला तरी तिथले लोक शिस्त पाळून रांगा लावून त्या गोष्टी मिळवत आहेत.  अर्थातच इतिहासकाळातही ती कधीच सोन्याची लंका नव्हती आणि आताही नाही, पण दक्षिण आशियातल्या इतर देशांच्या माने तिची परिस्थिति फार बिकट आहे असे त्याला तरी शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात दिसले नाही. कोरावर वाचलेल्या काही प्रतिक्रियाही तशाच दिसतात.

. . . 

श्रीलंकेतल्या लोकांना रावणाविषयी काय वाटत असेल याची मला उत्सुकता होती, पण तो तर त्यांच्या खिजगणतीत नाहीच हे ऐकून थोडे आश्चर्य वाटले. पण भारतातले, त्यातही महाराष्ट्रातले काही विद्वान लोक रावणाचे भक्त आहेत हे समजल्यावर मात्र महदाश्चर्य वाटले. शरद तांदळे नावाच्या लेखकाने  'रावण राजा राक्षसांचा' या नावाची कादंबरी लिहिली आहे. साम्यवाद, समाजवाद वगैरेंच्या प्रसाराबरोबर साहित्यात बदल होत गेले. समाजातील उपेक्षित, वंचित, दलित, दीनदुबळे वगैरे लोकांवर उच्चभ्रू समाजाकडून कसे आणि किती अन्याय केले गेले याचे दारुण वर्णन करणारी पुस्तके हा मराठी साहित्याचा मोठा भाग झाला. ही एक तशीच कादंबरी दिसते. रावण हा असाच एक उपेक्षित बिचारा होता असा शोध या लेखकाने लावला आहे. कारण काय तर त्याची आई अनार्यकुळातली असल्यामुळे आर्यांनी त्याला आपल्यात घेतले नाही. बापानेही त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आर्य आईच्या पोटी जन्माला आलेल्या त्याच्या सावत्र भावाला म्हणजे कुबेराला महत्व दिले. मग यामुळे दुखावलेल्या रावणाने प्रखर तपश्चर्या करून प्रचंड सामर्थ्य प्राप्त केले आणि कुबेराला लंकेमधून हुसकून लावून तो लंकाधीश झाला. त्याने तिथे आदर्श अशी राजवट स्थापन केली, तिला समृद्ध करून सोन्याने मढवली. प्रजाजनांना अत्यंत सुखात ठेवले. अर्थातच रावणाचे साथी असलेले सगळे राक्षस कसे सद्गुणाचे पुतळे होते आणि त्याच्यावर जुलूम करणारे आर्य कसे स्वार्थी, मतलबी, कपटी, दगाबाज होते याचे रसभरीत वर्णन या कादंबरीत केले आहे. रावणाचा भाऊ बिभीषणाने केलेल्या फितुरीमुळे त्याचा घात झाला तरीही त्याने आपल्या या दगलबाज भावाला शिक्षा केली नाही यावरून तो किती उदार आणि क्षमाशील होता हे दिसून येते वगैरे दाखवले आहे. हजारो वर्षांनंतर कुणीतरी रावणालाही महानायक ठरवले आहे. 

No comments: