Wednesday, December 08, 2021

शाकाहार आणि मांसाहार

 शाकाहार मांसाहार

माणसाने शाकाहार करावा की मांसाहार करावा ? आपल्याकडे या विषयावर अधूनमधून चर्चा, वादविवाद वगैरे होत असतात. युरोप, अमेरिका किंवा चीनजपानमधले सगळेच लोक जन्मजात पक्के मांसाहारी असतात. मांसाहार हा त्यांच्या रोजच्या जीवनातला भाग असतो. तिकडच्या रेस्तरांमध्ये 'व्हेजिटेरियन' म्हणून विचारले तर ते वेटरना समजतही नाही असा माझा आणि माझ्या मित्रांचा अनुभव आहे. आजकाल तिकडचे काही तुरळक लोक मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून स्वखुशीने शाकाहार करायला लागले आहेत. काही लोक तर 'व्हेगन' झाले आहेत, ते दूध आणि दुग्धजन्य पदार्थसुद्धा वर्ज्य मानतात. पण ती त्यांची वैयक्तिक निवड असते.


भारतातल्या काही विशिष्ट जातीजमाती, समाजांमध्ये गेल्या कित्येक पिढ्यांपासून शाकाहार पाळला जात आला आहे. काही लोक मासे खातात, पण मटण चिकन खात नाहीत, काही लोकांना अंडे चालते. असे लोक सोडल्यास इतर बहुजनसमाजाला मांसाहार चालतो किंवा आवडतो, पण इथे रोजच्या जेवणात मांसाहार घेणे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासाखे नाही. त्यामुळे इथली बहुसंख्य जनता मुख्यतः शाकाहारी आहे आणि रुचिपालट किंवा चैन म्हणून कधी तरी मांसाहार घेते. पण ते मांसाहारीच समजले जातात.  हे अंशतः मांसाहारी आणि शुद्ध शाकाहारी यांच्यातच झाले तर थोडेसे वादविवाद होतात. भारतातही काही राज्यांमध्ये गोहत्येवर बंदी आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या हत्येलाही सगळीकडे बंदी आहे. काही धर्मांचे लोक डुकराचे मांस खात नाहीत आणि इतरांनाही ते फारसे आवडत नाही. त्यामुळे बीफ आणि पोर्क हे अमेरिकेत सर्वात जास्त खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ भारतात सहसा कुठे विकले जात नाहीत. पूर्वी मटण हा इथला मुख्य मांसाहार होता, पण आता त्या मानाने चिकन स्वस्त मिळत असल्यामुळे चिकनवर जास्त भर दिला जातो.    


शाकाहारी लोकांचे असे म्हणणे असते की माणसाच्या शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक द्रव्ये शाकाहारातून मिळतात हे पिढ्या न् पिढ्यांच्या अनुभवावरून सिद्ध झालेले आहे. मग त्यासाठी मुक्या प्राण्यांची हत्या करायची काय गरज आहे ? ते पाप आहे. "पापाय परपीडनम्।, अहिंसा परमो धर्मः।" यासारखी संस्कृत वचने ते सांगतात. तर मांसाहार करणाऱ्या लोकांच्या मते काही अपवाद वगळता निसर्गातले सगळेच पशू, पक्षी, कीटक वगैरे जीव इतर जीवांना खाऊन त्यावर जगतात. "जीवो जीवस्य जीवनम्। " अशी एक संस्कृत श्लोकातली ओळ तेही दाखवतात. शिवाय ते असेही म्हणतात की वनस्पतीसुद्धा सजीवच असतात, मग त्यांना मारण्यामध्ये सुद्धा हत्या होतच असते. त्यामुळे तसे पाहता  शाकाहारही अहिंसक नाहीच, त्यातही वनस्पतींना पीडा तर होतेच, काहींचा जीवही जातो.


निसर्गाने जी योजना केलेली आहे त्यात कुठलाही प्राणी फक्त दगडमाती, हवापाणी यावर जास्त काळ जगू शकत नाही. वनस्पती मात्र त्यांच्यापासून स्वतः अन्न तयार करतात आणि ते साठवून ठेवतात. असे वनस्पतींनी तयार केलेले अन्न शाकाहारी प्राणी खातात आणि  हिंस्र पशू त्या प्राण्यांना मारून खातात. भागवतपुराणासारख्या धार्मिक ग्रंथात असे सांगितले आहे.  

अहस्तानि सहस्तानाम् अपदानि चतुष्पदाम् |

फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम् ||भागवत-1/13/46||

हात नसलेले जीव हात असलेल्यांना (माणसांना), पाय नसलेले (न चालणारे किंवा वनस्पती) चार पायांच्या प्राण्यांना, लहान जीव मोठ्या जीवांना जगवतात. यात "खातात" असे स्पष्टपणे सांगितले नसले तरी तसा अर्थ त्यातून काढला जातो.


दगडमाती हे अचेतन पदार्थ असतात, वनस्पती सचेतन म्हणजे जीवंत असल्या तरी त्या अचर असतात, एका जागी खिळलेल्या असतात. असे त्यांचे वेगळे वर्गीकरण केले आहे. भागवतामध्ये माणसाला सहस्त म्हणजे हात असलेला असे म्हंटले आहे. निसर्गाने माणसाचे वेगळे वर्गीकरण केलेले नाही. त्याचा समावेश पाठीचा कणा असलेल्या सस्तन प्राण्यांमध्ये होतो. उत्क्रांती होत असतांना माणसाला ज्या प्रकारचे दात मिळाले त्यांनी तो पाने, फळे, मुळे, मांस वगैरे निरनिराळ्या प्रकारचे अन्न खाऊ शकतो आणि त्याची पचनसंस्था या सगळ्यांना पचवू शकते. यामुळे आदिमानव त्याला यातले जे मिळेल ते खात होता. राक्षस किंवा नरभक्षक लोक तर इतर माणसांनाही मारून खात असत. पण माणूस हा एक समूह करून राहणारा प्राणी आहे. संरक्षणासाठी ते सोयीचे किंबहुना आवश्यक होते. कदाचित त्यामुळे त्यांनी एकमेकांना खाणे बंद केले.


अन्नाच्या शोधात रानावनात भटकत राहणारा माणूस शेती करायला लागला, घर बांधून रहायला लागला, आगीचा उपयोग करून घ्यायला लागला. त्यानंतर त्याचे जीवन सर्वांगाने बदलत गेले. तो आता कच्चे मांस तर खात नाहीच, धान्य आणि पालेभाज्यासुद्धा शक्यतो भाजून किंवा शिजवून खातो. त्याअर्थी तो निसर्गापासून दूरच गेलेला आहे.  त्याने भाषा निर्माण केल्या आणि मनात आलेले विचार सांगायची तसेच लिहायची सोय करून घेतली. त्यातून काव्य आणि साहित्य निर्माण झाले. प्राचीन काळातल्या विद्वान आणि विचारवंत ऋषीमुनींनी सर्व लोकांच्या कल्याणासाठी निरनिराळे नीतीनियम सांगितले. गीता, भागवत, उपनिषदे यासारख्या वाङमयातून त्यांचा प्रचार केला गेला. संस्कृतमधल्या या ग्रंथांमधला मजकूर आधी प्रत्यक्ष देवानेच सांगितला आहे असेही समजले जाते आणि त्याला आव्हान देण्याचे धाडस सहसा कुणी करत नाही. 


प्राचीन काळात कदाचित सर्व लोक मांसाहार करत असतील. पण त्या काळातल्या भारतातल्या लोकजीवनात गायीला खूप महत्व होते. तिला साक्षात देवतेचा आणि मातेचा दर्जा दिला गेला होता. त्यामुळे गायीला मारून खाणे हे खूप मोठे पाप मानले गेले आणि हिंदू धर्मीयांमध्ये त्यावर बंदी आली. इतर पशूंनाही चैनीसाठी मारण्याला आळा बसावा म्हणून फक्त यज्ञासाठी किंवा देवाला बळी दिलेल्या पशूंचेच मांस खावे असेही सांगितले गेले. धार्मिक कृत्ये करणाऱ्या वर्गाला पशूहत्या हे पापकर्म वाटायला लागले असेल आणि म्हणून त्यांनी मांसाहार करणे सोडले असेल किंवा त्यांचे वेगळेपण टिकवण्यासाठी त्यांना तसे सांगितले गेले असेल. त्या वर्गाला पूर्वीच्या काळी जास्त मान दिला जात असे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत तो मान नाहीसा झाल्यानंतर त्यासाठी शाकाहारी राहण्याची गरज उरली नाही.  


हिंदू धर्मामधील शास्त्रांमध्ये, मुख्यतः गीतेमध्ये कर्मसिध्दांत आणि पुनर्जन्म याबद्दल असे सांगितले आहे की माणसाने त्याच्या आयुष्यात केलेली पापे आणि कमावलेले पुण्य यांची फळे त्याला या जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावीच लागतात. पुढचा जन्म कुठल्या योनीमध्ये मिळेल हेसुद्धा या जन्मातल्या पापपुण्यावर ठरते. प्राण्यांची हत्या करणे हे पाप आहे म्हंटले तर त्याचे वाईट परिणाम त्याला भोगावे लागतील अशी भीती दाखवली जाते. शाकाहारी जातीच्या कुटुंबातल्या एकाद्या माणसाने मांसाहार केला तर त्याला घरातून बाहेर काढणे, त्याच्या कुटुंबावरच त्या जातीच्या इतर लोकांनी बहिष्कार टाकणे अशा प्रकारची कठोर उपाययोजना केली जात असे. या कारणांमुळे या जातींमधले लोक पिढ्यान् पिढ्या शुद्ध शाकाहार करत राहिले. पण गेल्या साठ सत्तर वर्षात सामाजिक जीवनात अनेक बदल झाले आहेत. शिक्षण, नोकरी, धंदा वगैरेंसाठी अनेक लोक आपण होऊनच घर सोडून परगावी, परप्रांतात किंवा परदेशी गेले आणि तिथल्या वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर पडला. एकत्र कुटुंबपद्धत राहिली नाही. प्रत्येकजण स्वतंत्र रहायला लागला. त्यामुळे समाजाची किंवा कौटुंबिक बंधने शिथील झाली. पुनर्जन्म, परलोक वगैरेंवर लोकांचा विश्वास राहिला नाही. यामुळे पुढल्या पिढ्यांमधले अनेक लोक आता मांसाहार वाईट मानत नाहीत आणि हौसेने करतात. पण त्या लोकांनाही स्वतःच्या हाताने एकाद्या प्राण्याला मारणे शक्य नसते. ते लोक प्रत्यक्ष हत्या करत नाहीत. त्यामुळे त्यांचा मांसाहार थोडा सौम्य म्हणता येईल.


जैन धर्मामधील शास्त्रांमध्ये सजीवांचे वर्गीकरण असे केले आहे.

एकेंद्रिय जीव  - याना फक्त स्पर्शेंद्रिय असते . ( यात वनस्पती आल्या . ) 

दोन इंद्रिय असलेले जीव - यांना स्पर्श आणि चव अशी दोन इंद्रिये असतात .

तीन इंद्रिये असलेले जीव - यांना वासाचे आणखी एक इंद्रिय असते .

चार इंद्रिये असलेले जीव - यांना चक्षू ही असतात .

पांच इंद्रिये असलेले जीव - यांना कान ही असतात 

आणि 

माणूस - पंचेंद्रिये असलेला आणि खूप विकसित मन असलेला .

मग साधकाचा सर्वात उत्तम आहार कोणता ? एकेंद्रिय जीवांचा आहार घेतल्याशिवाय सुटका नाही आणि थोडीफार हिंसा अटळ आहे. एकेंद्रिय जीवच आपला सर्वोत्तम आहार आहे . एकेंद्रिय जीव हे त्रस जीव ( ज्याना त्रास / यातना होतो असे जीव ) नाहीत. झाडालाही भावना असल्या तरी त्यांचे रडणे, ओरडणे आपल्याला समजत नाही.  हे जीव खाण्यात कमीतकमी हिंसा आहे. त्यामुळे जे काही थोडेसे पाप लागेल त्याची भरपाई माणसाच्या इतर पुण्यकर्मातून होईल.

जैन धर्मामध्ये अहिंसेवर जास्त भर असल्यामुळे अन्नपदार्थ गोळा करतांनाही हिंसा होऊ नये म्हणून ते लोक जमीनीखाली लागणारे कांदा, लसूण, बटाटे वगैरे पदार्थही खात नाहीत. शिक्षण आणि सुबत्ता यांचा त्यांच्या विचारसरणीवर कमी प्रभाव पडला असावा. आजकाल खास 'जैन फूड' नावाचा खाद्यपदार्थांचा वेगळा विभाग निघाला आहे.


मी एकदा एका लग्नाला गेलो होतो. एका काउंटरवरून मी काही विशिष्ट खाद्यपदार्थ वाढून घेतले, वरण भात, भाजी, चपाती वगैरे मिळणाऱ्या जनरल काउंटरवर खूप गर्दी होती, पण एक काउंटर रिकामा दिसत होता म्हणून मी तिथे गेलो. तिथल्या सेवकाने मला सांगितले "हा जैन फूड काउंटर आहे." मी म्हंटले "मला चालेल". पण माझ्या प्लेटमधले पदार्थ पाहून तो म्हणाला, "तुम्ही हे खात असाल तर तुम्ही जैन नाही. हा काउंटर फक्त जैनांसाठी ठेवला आहे. चला निघा इथून."


माझा एक शाकाहारी मित्र एका कॉन्फरन्ससाठी जपानला गेला होता. तिथे पोचल्यावर संध्याकाळच्या भोजनासाठी एका रेस्तराँमध्ये गेला. तिथले मेनूकार्ड पूर्णपणे जपानी भाषेत होते. तिथल्या वेटरला 'व्हेजिटेरियन' हा शब्द समजला नाही. मग त्याने सांगितले, "नो चिकन, नो मटन, नो बीफ, नो पोर्क, नो फिश". वेटरने त्याला एक डिश आणून दिली. त्याने चाखून पाहिली. ती चंव थोडी विचित्र वाटली. कुतूहल म्हणून त्याने त्या पदार्थाचे जपानी भाषेतले नाव लिहून द्यायला वेटरला सांगितले. दुसरे दिवशी कॉन्फरन्समध्ये भेटलेल्या एका इंग्लिश बोलणाऱ्या जपानी माणसाला दाखवून हे काय आहे असे विचारले. तो म्हणाला, "ऑक्टोपस."     

अलीकडच्या काळात शाकाहाराचा पुरस्कार करण्यासाठी एक नवा मुद्दा मांडला जात आहे. कुठल्या कामासाठी किती ऊर्जा खर्च केली जाते याचा कुणीतरी अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की पाळीव पशुपक्ष्यांना अन्नपाणी खायला देऊन नंतर त्यांना मारून खाण्यामध्ये खूप जास्त ऊर्जा खर्च होते, त्याऐवजी माणसांना अन्नपाणी दिले तर तितक्या ऊर्जेत किती तरी जास्त मणसांचे पोट भरेल. त्यामुळे मांसाहार करण्यामुळे पर्यावरणाचा जास्त ऱ्हास होत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाकाहार उपकारक आहे. आता किती लोक याचा विचार करून शाकाहाराकडे वळतील याची मला शंकाच वाटते.

अशा प्रकारे शाकाहार- मांसाहाराला अनेक बाजू आहेत. त्या थोडक्यात दाखायचा हा एक प्रयत्न आहे.


माझे मित्र श्री. श्यामसुंदर केळकर यांनी या विषयावर लिहिलेले लेख मी या ठिकाणी दिले आहेत.    https://anandghare.wordpress.com/2021/12/06/%e0%a4%85%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0/

   

    

No comments: