दर वर्षी २१ मार्च हा दिवस जागतिक हॅपिनेस डे या नावाने साजरा केला जातो. म्हणजे कुठेही तसा कसलाही उत्सव नसतो, पण या दिवशी UN World Happiness Report या नावाचा एक जागतिक अहवाल प्रसिद्ध केला जातो. त्यात जगातील अनेक देशांची क्रमवार यादी प्रसिद्ध केली जाते. UN Sustainable Development Solutions Network नावाची आंतरराष्ट्रीय संस्था हा उद्योग करते आणि ते रँकिंग जगभर मान्य केले जाते असे काही लोक सांगतात किंवा समजतात.
या वर्षी प्रसिद्ध झालेल्या अहवालाप्रमाणे भारताचा क्रमांक १४९ देशांमध्ये जवळजवळ तळाशी म्हणजे १३९वा लागतो. याचा अर्थ भारतातले बहुसंख्य लोक दुःखीकष्टी आहेत असा कदाचित होईल. जगातील उरलेल्या अनेक देशांमध्ये बहुधा हा सर्व्हे झाला नसावा आणि त्याची आकडेवारी मिळाली नसावी. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही उत्तर युरोपातील फिनलंड या लहानशा देशाचा पहिला नंबर लागला आहे. त्यांच्यानंतर डेन्मार्क, स्विट्झर्लंड आणि आइसलंड हे आणखी काही लहान देश येतात. यू एस ए, यू के, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आदि बडी राष्ट्रे आणि इटली, ऑस्ट्रिया यांच्यासारखी काही इतर युरोपियन राष्ट्रे पहिल्या वीस पंचवीस क्रमांकावर आहेत. उरलेली पाश्चिमात्य राष्ट्रे त्यानंतर येतात. चीन, जपान, कोरिया, ब्राझील, मेक्सिको आदि पुढारलेले आशीयाई किंवा अमेरिकेतले देश कुठे तरी मध्यभागी आहेत आणि भारतासह इतर गरीब आशियाई देश तसेच आफ्रिकेतले बहुतेक सगळे दरिद्री देश तळाशी आहेत. यावरून असे दिसते की युरोप अमेरिकेत ज्या देशात सुबत्ता आहे तेच अग्रक्रमांकावर आहेत. ज्यांच्याकडे तितकीशी आर्थिक संपन्नता नाही ते मागे आहेत.
हे सगळे कुणी ठरवले ? हा सर्व्हे त्या देशातल्या लोकांना प्रश्न विचारून मिळालेल्या उत्तरांवरून केला जातो असे म्हणतात,. ही संस्था अनेक देशांमधल्या नागरिकांना एक प्रश्नावलि पाठवते आणि त्यांची उत्तरे मागवते, काही लोकांच्या टेलीफोनवरून मुलाखती घेते आणि त्यांना मिळालेल्या उत्तरांची सांगड जीडीपी आणि सोशल सिक्यूरिटी यासारख्या विषयांबरोबर घालून हा आकडा काढते. दहा वर्षांपूर्वी भूतानने पुढाकार घेऊन या इंडेक्सची सुरुवात केली होती. त्यावेळी बहुधा देशातले किती लोक स्वतःला सुखी समजतात यावर मुख्य भर दिला गेला होता आणि कमी उत्पन्न आणि चैनीची साधने असूनसुद्धा आनंदात समाधानी जीवन जगणाऱ्या भूतानच्या लोकांचा पहिला क्रमांक आला होता असे मला आठवते. पण नंतर हे काम पाश्चात्य लोकांकडे गेले आणि त्यांनी निकष बदलले असावेत. या वर्षी भूतानने या स्पर्धेत भागच घेतला नाही असे दिसते.
भारतातले लोक फारच असंतुष्ट आहेत असे कदाचित या वर्षीच्या अहवालावरून म्हणता येईल. पण आपले लोक बहुधा 'सुख पाहता जिवापाडे दुःख पर्वताएवढे' असा विचार करत असावेत. "तू कसा आहेस?" असे इथे कुणालाही विचारले तर बहुतेक लोक "ठीक आहे" असेच उत्तर देतात. "मी खूप आनंदात आहे" असे सांगणारे कमीच मिळतील. पाश्चिमात्य लोक कदाचित आपण मजेत असल्याचे सांगायला जास्त उत्सुक असतील.
या वर्षी पहिल्या क्रमांकावरील फिनलंडचा इंडेक्स ७६४२ इतका आहे आणि भारताचा आकडा ३८१९ इतका आहे. मध्यावर (क्र.७५) असलेल्या बेलारूसचा ५५३४ इतका आहे. म्हणजे असेही म्हणता येईल की जगातील सर्वात सुखी देशातले लोक आपल्या (फक्त) दुप्पट सुखी आहेत आणि जगाची सरासरी दीडपटच्या आसपास असेल. 'जगी सर्वसूखी' असा मात्र कुठलाच देश नाही. मागल्या वर्षाच्या मानाने या वर्षी सुखामध्ये किती टक्के फरक पडला याचीही आकडे वारी आली आहे. ती पाहता असे दिसते की बहुतेक सगळ्या देशांना फारसा फरक पडला नाही, काही जणांच्या सुखात घटही झाली आहे. गेल्या वर्षीची सगळी कठीण परिस्थिती पाहता ती अपेक्षितही आहे. पण भारतातल्या लोकांच्या सुखीपणामध्ये मात्र चांगली घसघशीत सहा टक्क्याने वाढ झाली आहे. कठीण परिस्थितीतसुद्धा आपल्या लोकांनी तिचा विशेष खेद मानला नाही, जे आहे त्यात आनंद मानला असे समजायचे का?
No comments:
Post a Comment