Thursday, January 16, 2020

लॉस एंजेलिसची ग्रिफिथ ऑब्झर्व्हेटरी


पूर्वीच्या काळी म्यूजियम या शब्दाचा अर्थ पुराणवस्तूसंग्रहालय असाच घेतला जात असे आणि काहीशेहे किंवा काही हजार वर्षांपूर्वीच्या म्हणून किंवा कुठल्याशा विभूतीच्या स्पर्शाने पावन झालेल्या म्हणून महत्व प्राप्त झालेल्या अशा अनेक पुरातन सामान्य वस्तू त्या ठिकाणी अस्ताव्यस्त मांडून ठेवलेल्या असत. अशी अनेक संग्रहालये मी ठिकठिकाणी पाहिली आहेत. काही अपवादास्पद जागी जुन्या काळातली अप्रतिम चित्रे, मूर्ती किंवा पुतळेसुद्धा दिसतात, पण ते संख्येने तसे कमीच असतात. त्यातल्या मोनालिसासारख्या अतिप्रसिद्ध कलाकृतीच्या तर इतक्या हुबेहूब प्रतिकृती मी आधीच पाहिल्या होत्या की जेंव्हा मी दोन तास खर्च करून ती मूळ कलाकृती पाहिली तेंव्हा त्या सौंदर्याने थक्क होणे वगैरे काही झालेच नाही. अलीकडच्या काळात मुंबई, पुणे, बंगळूरु वगैरे शहरांमध्ये सायन्स म्यूजियम्स स्थापन झाली आहेत. तिथे बऱ्याच नव्या आणि आकर्षक वस्तू पहायला मिळतात. ही म्यूजियम्स मुख्यतः शाळकरी मुलांसाठी स्थापन केलेली असतात, पण मोठ्या माणसांनासुद्धा ती मनोरंजक वाटतात.

कुठल्याही गोष्टींचे अत्यंत मनोवेधक असे प्रदर्शन करण्याची कला अमेरिकन लोकांना चांगली साधली आहे.  गेल्या वेळी मी अमेरिकेला आलो होतो तेंव्हा कोकाकोलाचे म्यूजियम, कॉर्निंगचे कांचेचे म्यूजियम यासारखी अनोखी आणि अप्रतिम संग्रहालये पाहिली होती. या वेळी लॉस एंजेलिस इथले गेट्टीज सेंटर हे मध्ययुगातल्या सुंदर कलाकृतींचे प्रदर्शन पाहिले, त्यानंतर ग्रिफिथ ऑब्झर्व्हेटरीला भेट दिली.  ऑब्झर्व्हेटरी या नावावरून तिथे काही दुर्बिणी असतील आणि त्यातून आकाशातल्या ग्रहताऱ्यांचे दर्शन घडवत असतील असे मला वाटले होते आणि इथे ते तर आहेच, त्याशिवाय एक अप्रतिम असे खगोलविज्ञानविषयक प्रदर्शनही आहे.

ही ऑब्झर्व्हेटरी हॉलिवुडजवळच्या एका डोंगराच्या माथ्यावर उभारलेली आहे. मी माझ्या मुलाबरोबर एका रविवारी लॉसएंजेलिस शहरातला डाऊनटाऊन हा मुख्य भाग पाहून झाल्यानंतर संध्याकाळी हे ठिकाण पहायला गेलो होतो तेंव्हा 'पार्किंग स्पेसमध्ये जागा शिल्लक नाही' अशी पाटी त्या डोंगराच्या पायथ्याशीच लावली होती, पण तरीही त्या ठिकाणचे सृष्टीसौंदर्य पहात पहात आम्ही वळणावळणाच्या रस्त्याने तो डोंगर चढून वर गेलो. पण ऑब्झर्व्हेटरीच्या जवळ आल्यावर आधीच्या चौकातच उभे असलेले गार्ड कुठल्याही गाडीला त्या दिशेनेही जाऊ देत नव्हते आणि सर्वांना डोंगराच्या पलीकडल्या बाजूच्या उतारावर पाठवत होते. तोपर्यंत तिकडेही चांगली मैलभर लांब रांग लागली होती. इतक्या दूर जाऊन गाडी उभी करून तो डोंगर पायी चढून येण्याइतका उत्साह माझ्यात शिल्लक नसल्यमुळे आम्ही वाटेतच जिथे जागा मिळाली तिथे रिव्हर्स घेऊन परत फिरलो.

महिनाभरानंतर पुन्हा सवड मिळाली तेंव्हा आम्ही थेट ऑब्झर्व्हेटरीला जायचे ठरवले. यावेळी आम्ही तासभर आधी पोचलो होतो तरीही  'पार्किंग स्पेसमध्ये जागा शिल्लक नाही' अशी पाटी त्या डोंगराच्या पायथ्याशीच लावली होतीच, पण वर जाण्याच्या रस्त्यावर एबीसीडी वगैरे नावाच्या काही प्रशस्त पार्किंग स्पेसेस होत्या. तिथे गाड्या उभ्या करून अनेक लोक गिर्यारोहण करत डोंगर चढत होते.  त्या रस्त्यावरून माथ्यावर जाण्यासाठी बससर्व्हिसही होती. आम्ही आमची कार पार्किंग लॉट जी मध्ये उभी केली आणि समोरच असलेल्या बस स्टॉपवरून लोकल बस घेतली. ती थेट  ऑब्झर्व्हेटरीच्या प्रांगणापर्यंत गेली.


इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील दर्शनी भागातच एक खास प्रकारचा अवाढव्य आकाराचा, (शंभर किलोहून जड) आणि खूप उंच ( १३ मीटर) दोरी असलेला फोकॉल्ट पेंडुलम (लंबक) टांगून ठेवला आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार तो लंबक एकाच प्लेनमध्ये मागेपुढे होत असतो, पण पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जमीनीवर बसवलेले वर्तुळाकार चक्र पृथ्वीबरोबरच अत्यंत मंद गतीने फिरत असते. आपल्याला मात्र तो लंबक फिरत असल्यासारखे वाटते. ते वर्तुळाकार डायल खूप मोठे असल्यामुळे आपल्याला दर काही मिनिटात त्या लंबकाचे खालचे निमूळते टोक डायलवर कोरलेला एकादा अंश पुढे सरकल्याचे जाणवते. अशा रीतीने अगदी सोप्या प्रयोगातून पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे दाखवले आहे.


आत शिरल्यानंतर दोन्ही बाजूंना लांबलचक कॉरीडॉरसारखे हॉल आहेत. त्यांना हॉल ऑफ द आय आणि हॉल ऑप द स्काय अशी नावे आहेत. त्यांमध्ये अगदी सोप्या शब्दांमध्ये आणि उदाहरणांसह विविध शास्त्रीय माहिती देणारी अनेक आकर्षक चित्रे आणि सुरेख मॉडेल्स मांडून ठेवली आहेत. प्राचीन काळापासून जगाच्या निरनिराळ्या भागातले विद्वान आकाशाचे निरीक्षण करत आले आहेत. आकाशातल्या सूर्याच्या उजेडामुळे दिवस व रात्र होतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळही सूर्याच्या आकाशातल्या ठिकाणांवरूनच ठरतात. रात्रीची सुरुवात, मध्य आणि उत्तररात्र वगैरे वेळा आकाशातला चंद्र आणि तारे यांना पाहून समजतात. चंद्राच्या कला पाहून महिनाभराचा काळ समजतो आणि सूर्याच्या स्थानावरून ऋतू समजतात. ही सगळी कालगणना आपल्या पूर्वजांनी आकाशातील तारे आणि ग्रहांचे निरीक्षण करूनच तयार केली.  त्यासाठी त्या लोकांनी कोणकोणती उपकरणे वापरली आणि त्यांनी काय काय पाहून ठेवले वगैरे गोष्टी या दालनांमध्ये दाखवल्या आहेत.

इथे 'गॅलीलियोचा टेलिस्कोप' असे लेबल असलेले एक पितळेचे नळकांडेही आहे. इथे ठेवण्यासाठी ही जनी दुर्बीण मुद्दाम युरोपातून आणली गेली होती की ही त्या मूळ दुर्बिणीची कलात्मक प्रतिकृती आहे अशी शंका माझ्या मनात आली. त्यानंतर चारशे वर्षांमध्ये तयार केल्या गेलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या दुर्बिणींची रचना आणि सविस्तर माहिती आणि त्यांचे काही नमूने इथे मांडून ठेवले आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तो भास्कर कोणत्या मार्गाने आकाशातला प्रवास करतो आणि त्याचा मार्ग ऋतूंप्रमाणे कसा बदलत जातो हे सुंदर चित्रांमधून दाखवले आहे. चंद्राच्या कला आणि समुद्राची भरतीओहोटी दाखवली आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्राची लहानशी सावली कशी पृथ्वीवर सरकत जाते ते दाखवले आहे. निरनिराळ्या तारकापुंजांची माहिती दाखवली आहे. तेजस्वी तारा (ब्राइट स्टार), मंद तारा, शुभ्र बटू (व्हाइट ड्वार्फ), रेड जायंट, कृष्णविवर (ब्लॅकहोल) इत्यादि ताऱ्यांचे प्रकार, विश्वामधील ताऱ्यांची आकारमाने, ताऱ्याच्या अब्जावधी वर्षांच्या आयुष्यातला जीवनक्रम वगैरे सगळे चित्रांमधून दाखवले आहे. या मोठ्या भोपळ्यांसारख्या महाकाय ताऱ्यांच्या गर्दीत आपला मध्यम आकाराचा सूर्य एकाद्या लिंबाएवढा खूपच छोटा दिसतो पण त्याच्याहून खूप लहान अगदी टिंबाएवढेही तारे या विश्वात आहेत.  एका भागात सर्व मूलद्रव्यांची (एलेमेंट्स) इत्थंभूत माहिती दिली आहेच, ही मूलद्रव्ये सुपरनोव्हा ताऱ्यांच्या स्फोटांमधून कशी तयार झाली हे दाखवले आहे. मेंडेलीव्हच्या पीरिऑडिक टेबलच्या मोठ्या आकृतीत प्रत्येक मूलद्रव्याची मुख्य माहिती दिली आहेच, त्यातील बहुतेक मूलद्रव्यांचे  नमूने बाटल्यांमध्ये मांडून ठेवलेले पहायला मिळतात. माणसाच्या शरीरात कोणकोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात असतात आणि त्यांचे कार्य वगैरे दाखवले आहे. अशा खूप खगोलीय आणि शास्त्रीय माहितीचा खजिना इथे मांडून ठेवला आहे. त्यात एक टेस्ला कॉइल आणि कॅमेरा ऑब्स्क्यूराही आहेत.


तळमजल्यावर जाण्यासाठी असलेल्या कॉरिडॉरमध्ये अवकाशाची माहिती देणारी चित्रे आहेत. तळमजल्याच्या एका भागाला एज्ज ऑफ द स्पेस असे नाव आहे. त्यात बिग बँगमध्ये विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून पुढील चौदा अब्ज वर्षात गॅलॅक्सीज, तारे, ग्रह वगैरे कसे निर्माण होत गेले याची माहिती दिली आहे. मीटिरॉइट्सची माहितीही आहे आणि पृथ्वीवर पडलेल्या काही उल्काही ठेवल्या आहेत. अपोलो मोहिमेमधून आणलेले चंद्रावरील अश्म आहेतच, आकाशातून आलेले मंगळावरील दगडही आहेत. पृथ्वीवर पडलेल्या अजस्त्र उल्कांमुळे मैलोगणती आकाराचे खड्डे पडलेले आहेत. अशाच एकाद्या भयंकर स्फोटातून इतकी धूळ निघाली की सगळे आभाळ झाकून गेले आणि झालेल्या अंधारात डायनोसारससकट त्या काळातली जमीनीवरील जीवसृष्टी नष्ट झाली असावी असा अंदाज आहे.  मंगळावर आपटलेल्या मोठमोठ्या उल्कांमुळे तिथले खडक फुटून त्यांचे तुकडे इतके दूर उडाले की त्यातले काही पृथ्वीपर्यंत येऊन पोचले. जमीनीवर मिळालेले काही मेटिऑर तर शुद्ध लोखंडाचे आहेत. माणसाने लोखंड तयार करण्याचा शोध लावायच्या आधीपासून त्यांचा उपयोग करायला सुरुवात केली होती.


डेप्थ ऑप द स्पेस नावाचा दुसरा विभाग तर फारच आकर्षक आहे. इथे बुध, शुक्रापासून प्ल्यूटोपर्यंत सर्व ग्रहांच्या मोठमोठ्या आणि सुंदर प्रतिकृती छताला टांगून ठेवल्या आहेत. त्यांना पाहून एका नजरेत त्यांच्या आकारमानांची कल्पना येते. शिवाय प्रत्येक ग्रहाचे आकारमान, वस्तुमान, गुरुत्वाकर्षण, त्यांचेमधील रासायनिक मूलतत्वे, वातावरण, तापमान वगैरे समग्र माहिती असलेले मोठाले फलकही आहेतच. त्यांच्यासमोर खास प्रकारचे वजनाचे काटे आहेत त्यावर उभे राहिल्यावर आपले त्या ग्रहावरले वजन समजते. अर्थाच ते गुरूवर अनेक पटीने जास्त तर प्ल्यूटोवर सर्वात कमी असते. दुसऱ्या बाजूच्या भिंतीवर रात्रीच्या आकाशातल्या ताऱ्यांचे भव्य दर्शन घडते.

या वेधशाळेच्या गच्चीवरून आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी आधुनिक दुर्बिणी ठेवल्या आहेत आणि पर्यटकांनाही त्यामधून ग्रहतारे दाखवण्याची सोय आहे. पण ते सुख आमच्या नशीबात नव्हते. त्या दिवशी नेमके आभाळ भरून आले होते आणि झिमझिम पाऊसही पडत होता.त्यामुळे त्यांनी गच्चीवर जाणारी लिफ्ट आणि जिनाच बंद करून ठेवला होता. इथे एक सुंदर कृत्रिम तारांगण (प्लॅनेटोरियम) आहे, पण त्याची तिकीटे आधीपासून काढावी लागतात. मी यापूर्वी अशा प्रकारची जगातली अनेक तारांगणे पाहिली असल्याने मला त्यासाठी आणखी काही तास तिथे थांबण्याची इच्छा नव्हती. रात्र पडून गेलेली होतीच आता घरी परत जाणेच इष्ट वाटले.

लॉस एंजेलिस इथली ग्रिफिथ ऑब्झर्व्हेटरी आकारमानाने भव्य म्हणता येणार नाही, पण तीन चार तास लक्षपूर्वक पाहता येईल इतके विविध चित्रे, चलचित्रे आणि मॉडेल्स यांचा एक उत्कृष्ट संग्रह इथे आहे. मुख्य म्हणजे सगळे कसे सजवून आणि आकर्षक करून मांडून ठेवले आहे. सहज समजण्यासारखी चित्रे, सोप्या भाषेमधील वर्णन आणि अद्ययावत नवनवी माहिती यामुळे इथे येणारे पर्यटक मुग्ध होऊन ते पहात राहतात. इथे रोजच हजारोंच्या संख्येने दर्शक येतात आणि सन १९३५ पासून आतापर्यंत येऊन गेलेल्या दर्शकांची संख्या काही कोटींमध्ये गेली आहे. ती जगात सर्वात जास्त आहे असा इथल्या संचालकांचा दावा आहे. आणि गंमत म्हणजे हे प्रदर्शन पूर्णपणे फुकट आहे. फक्त तारांगणासाठी तिकीट घ्यावे लागते, कार पार्किंगचा चार्ज द्यावा लागतो आणि अर्थातच कँटनमध्ये खादाडी विकत घेऊन करावी लागते.

No comments: