मी हा भाग गणेशचतुर्थीच्या दिवशी सुरू करून दिला . पुढे त्यात जमेल तशी थोडी थोडी भर घालत जाऊन हे काम गणेशोत्सव होत असेपर्यंत टप्प्याटप्याने पूर्ण केले.
आज गणेशचतुर्थी आहे. जगभरात जिथे जिथे मराठी माणसे राहतात त्या सगळ्या ठिकाणी या वर्षीचा गणेशोत्सवही ते सगळे लोक मोठ्या उत्साहाने आणि मनःपूर्वक भक्तीसह साजरा करत असल्याच्या बातम्या येत आहेत. मी हा ब्लॉग सुरू केला त्या वर्षी श्रीगजाननाच्या प्रेरणेने त्याची कोटी कोटी रूपे थोडक्यात दाखवण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला होता. त्यानंतरही बहुतेक दर वर्षी या उत्सवाच्या काळात श्रीगणपती देवता किंवा त्याची उपासना, उत्सव वगैरेंबद्दल माझ्या मतीने चार शब्द लिहिण्याचा प्रयत्न मी केला आहे. तसा करण्याची मनिषा या वर्षीसुद्धा आहे. ती पूर्ण करण्याची शक्ती त्या कर्ताकरविता, सुखकर्तादुखहर्ता गणरायाने मला प्रदान करावी अशी नम्र विनंति करून मी हा भाग सुरू करीत आहे.
मी हॉस्टेलमध्ये घालवलेला काळ वगळला तर मला कळायला लागल्यापासून मी नियमितपणे हा उत्सव घरीच साजरा केला आहे. या वर्षीसुध्दा माझ्या मुलाकडे म्हणजे आपल्या घरीच पण सातासमुद्रापलीकडे अमेरिकेतल्या लॉसएंजेलिस शहराजवळच्या टॉरेन्स या गावी आलो आहे. आम्ही इथे ३१ ऑगस्टला घरी येऊन पोचलो तेंव्हा तो दिवस जवळजवळ संपत आला होता तसेच अंगात फारसे त्राणही उरले नव्हते. त्यानंतरचा कालचा दिवसही प्रवासाचा शीण घालवणे आणि जेटलॅगमधून बाहेर निघणे अशा कामांमध्ये गेला आणि आजचा गणेशचतुर्थीचा दिवस उजाडलासुध्दा.
आमच्या वाड्यातल्या सोप्याच्या मधोमध एक मोठा 'गणपतीचा' कोनाडा होता. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आम्ही त्या कोनाड्यातच गणपतीची प्रतिष्ठापना करत होतो. त्याच्या अंवतीभंवती पुठ्ठा आणि रंगीबेरंगी कागदाची कमान, मखर, आरास वगैरे करायचे काम संपूर्णपणे घरातल्या मुलांचे असायचे. माझे मोठे भाऊ शिक्षणासाठी परगावी गेल्यावर ती जबाबदारी माझ्यावर आली आणि मी अत्यंत उत्साहाने मनापासून त्यातला आनंद घेतला. लग्न करून संसार थाटल्यानंतर आम्ही घरी गणेशोत्सव साजरा करायला लागलो. आधी एका कोनाड्यातच मूर्ती ठेवून आरास करत होतो, काही काळानंतर हॉलमध्ये टेबलावर मांडायला सुरुवात केली. त्या काळात लाकडाच्या पट्ट्या आणि पुठ्ठा यापासून मखर तयार करत होतो, थर्मेकोल नावाचा अद्भुत पदार्थ उपलब्ध होऊ लागल्यानंतर त्यातून अनेक प्रकारचे मनमोहक देखावे करू लागलो. वयपरत्वे शरीराची दुखणी सुरू झाली, अंगातले बळ आणि मनाची उभारीही कमी झाली आणि मुख्य म्हणजे वाशीला आमच्या घराच्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये अत्यंत सुंदर अशी तयार मखरे मिळत असल्यामुळे काही वर्षे ती आणली. पुढे थर्मोकोलच्या विरोधात जोराची मोहीम सुरू झाल्यामुळे उगाच आमच्याकडून पर्यावरणाला काही धोका व्हायला नको म्हणून ते कटाप केले.
या वर्षी तर मी आणि माझा मुलगा दोघेही अगदी आयत्या वेळी अमेरिकेत जाऊन पोचलो होतो. सजावट करायला घरात काही कच्चा मालही नव्हता आणि त्याला आकार देण्यासाठी आवश्यक असलेली साधनेही नव्हती. इंटरनेटवर अनेक प्रकारच्या सजावटी पाहिल्या आणि आपल्याला झटपट काय काय करणे शक्य आहे याचा अंदाज घेतला. पुण्यामुंबईच्या बाजारपेठा शोभेच्या व सजावटीच्या वस्तूंनी दुथडी वहात असल्या तरी इथल्या अमेरिकनांना त्याचा गंधही नव्हता. त्यातल्या त्यात काही वस्तू आणून त्या एका टेबलावर मांडल्या आणि आमच्या बाप्पाची अशी सजावट केली.
आमच्या लहानपणी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आमचे गावाकडचे बापटगुरूजी (भटजी) येत असत आणि सर्व मंत्रोच्चारांसह ती साग्रसंगीतपणे केली जात असे. त्या काळात घरोघरी तशीच पध्दत होती. माझ्या पिढीतल्या कुणालाच मी तसे काही करतांना पाहिले नाही आणि मीसुध्दा त्यातल्या पारंपरिक कर्मकांडाला फाटा दिला. या वर्षी आम्ही पुण्याहून येतांनाच गणपतीची एक सुबक मूर्ती घेऊन आलो होतो. तिला तबकात ठेवून घराच्या दारापलीकडे नेली आणि "गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया"च्या (दबक्या आवाजात केलेल्या) गजरात घरी आणली. उंबऱ्यातच तिचे औक्षण करून स्वागत केले आणि घरात सजवून ठेवलेल्या टेबलावरील आसनावर स्थानापन्न केली. हळदकुंकू, फुले, दुर्वा वाहून पूजा केली. मोदक, पेढे, फळे वगैरेंचा नैवेद्य दाखवला आणि आरती केली. माझ्या पुण्यात रहात असलेल्या मुलानेसुध्दा हेच सगळे विधि त्याच्या फ्लॅटमध्ये आधीच केले होते आणि त्याचे फोटो पाठवले होते. अमेरिका भारताच्या ११-१२ तास मागे असल्यामुळे आमचा सकाळच्या पूजेचा कार्यक्रम होईपर्यंत तिकडे संध्याकाळची आरतीही झाली होती.
माझी दोन्ही मुले १०-१२ वर्षे परदेशांमध्ये राहिलेली असली तरी त्यांनी तिथेसुध्दा गणेशोत्सव साजरा केला आहे. मी लहानपणी जे शिकलो त्यातला कर्मकांडाचा कर्मठ भाग सोडला तरी पूजा आरती वगैरे जेवढे आम्ही आमच्या घरी करत होतो ते सगळे या मुलांनी पाहिले होते आणि तंतोतंत उचलले होते. आता त्यांची मुले ते विधि पहात आणि शिकत होती. या बाबतीत माझ्या पत्नीने मला मनापासून, किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त उत्साहाने साथ दिली होती. त्यासाठी आवश्यक असलेली सगळी जमवाजमव आणि तयारी तर तीच करून देत होती. तिच्या तालमीत तिने आमच्या सुनांनाही तयार केले होते आणि त्यासुध्दा मनापासून उत्साहाने सगळी कामे करत होत्या. पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेऊन पोचवण्याची जी जबाबदारी आमच्या पिढीवर होती ती आम्ही काही अंशी तरी पार पाडली याचे मला समाधान आहे.
असल्या रूढी आणि परंपरा जपण्याला काही अर्थ आहे का? हा जरा वादाचा विषय आहे. त्या करण्यामधून खरोखर काही साध्य होते का? असा प्रश्न विचारला जातो. पण ज्या गोष्टीपासून दुसऱ्यांना उपद्रव होत नाही आणि स्वतःला आनंद किंवा समाधान मिळत असेल तर त्या गोष्टी करायला काय हरकत आहे? असा विचार मी करत आलो आहे. प्रत्यक्ष काही फलप्राप्ती होवो किंवा न होवो, पण यातून एक आयडेंटिटी तर नक्की तयार होते. आणि ती गोष्ट बहुतेक लोकांना आवडते असे दिसते.
माझ्या लहानपणी आमच्या हायस्कूलमध्येसुध्दा दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जात असे. गणपती हे जमखंडी संस्थानाच्या अधिपतींचे कुलदैवत असल्यामुळे संस्थानिकांच्या कारकीर्दीत तो जास्तच थाटामाटाने होत असेल. मी १९५७मध्ये या शाळेत दाखल झालो तेंव्हा संस्थाने विलीन होऊन दहा वर्षे झाली होती आणि ती शाळा शिक्षणखात्याच्या आधीन होती, पण आमचे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक जुन्या काळातलेच असल्यामुळे त्यांनी उत्सवाची परंपरा टिकवून ठेवली होती. मात्र आमचा हा उत्सव फक्त एकाच दिवसाचा असायचा. शाळेच्या सेंट्रल हॉलमध्ये सकाळी मूर्तीची स्थापना, पूजा, आरती वगैरे होत असे आणि लगेच संध्याकाळी शाळेच्या आवारातल्या विहिरीतच तिचे विसर्जनही केले जात असे.
घरातला आणि शाळेतला कार्यक्रम होऊन गेल्यानंतर उरलेला दिवस आम्ही गावभर फिरून इतर गणपतींचे दर्शन घेण्यात घालवत होतो. आमचे नातेवाईक, शेजारी, मित्र आणि मित्रांचे नातेवाईक, शेजारी वगैरेंच्या घरी जाऊन त्यांनी आणलेल्या मूर्ती आणि केलेली आरास पाहून घेत होतो. लहान गावात सगळेच सगळ्यांना ओळखत असल्यामुळे कुणाच्या घरी जायला संकोचही वाटत नसे. सगळ्यांचीच दारे दिवसभर उघडीच असायची आणि गणेशचतुर्थी किंवा दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी तर रांगोळी घालून स्वागतासाठी सज्ज केलेली असत. आम्हा तीन चार मित्रांचे टोळके एकेका घरात जायचे, गणपतीचे दर्शन घेऊन नमस्कार करायचे, हातावर पडलेला प्रसाद तोंडात घालायचा आणि पुढे जायचे अशी धावती भेट असे.
मुंबईच्या आमच्या घरात गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये जो कोणी ओळखीचा भेटेल त्याला आम्ही दर्शनासाठी यायचे आमंत्रण देत होतो. या चारपाच दिवसात अनेक नातेवाईक, शेजारी आणि मित्र येऊन भेटून जातही असत. या वेळी कुणाला आधीपासून ठरवून येण्याची गरज नसायची. जेंव्हा ज्याला वेळ मिळेल तेंव्हा त्याने यावे, वाटल्यास दोन घटका बसून गप्पा माराव्यात आणि वेळ नसल्यास पाच दहा मिनिटे थांबून परत जावे. त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी आम्हीही लाडू, चिवडा, मोदक वगैरे पदार्थ तयार ठेवत असू आणि येणाऱ्या सर्वांच्या हातात प्रसादाची प्लेट देत असू.
इथे अमेरिकेत फारशा ओळखीच झालेल्या नसल्यामुळे या गोष्टींची उणीव जाणवली. आमच्या ओळखीत किंवा वसाहतीतच दुसरा गणपती पहायला मिळाला नाही. काल इथल्या स्थानिक हनुमानाच्या मंदिरात गेलो होतो तिथे त्यांनी गणेशोत्सवाचे आयोजन केलेले दिसले. त्यासाठी एक सुंदर आणि भव्य अशी गणपतीची मूर्ती आणली होतीच, इतरही अनेक भाविकांनी आपापल्या घरातल्या मूर्ती तिथे आणून ठेवल्या होत्या. आज या सर्वांचे यॉटमधून पॅसिफिक महासागरात दूरवर जाऊन विसर्जन करण्याचा कार्यक्रम ठरला होता. आम्ही मात्र घरातच एका बादलीत पाणी भरून त्यात आमच्या घरातल्या गणेशमूर्तीचे आधीच विसर्जन केले होते.
आम्ही अणुशक्तीनगरमध्ये रहात असतांना तिथल्या कम्युनिटी सेंटरमध्ये कॉलनीचा सार्वजनिक गणेशोत्सव जंगी प्रमाणावर साजरा होत असे आणि त्यात शेकडो लोकांचा सहभाग असायचा. भव्य मूर्ती आणि सुंदर आरास तर असायचीच, नाटक, गायन, वादन वगैरे विविध गुणदर्शनाचे चांगले कार्यक्रम असायचे. त्यात कॉलनीमधल्या होतकरू कलाकारांना संधी मिळत असे, शिवाय बाहेरच्या चांगल्या व्यावसायिक कलाकारांना सुध्दा बोलावले जात असे. झंकार ऑर्केस्ट्रा, मेलडी मेकर्स, मेंदीच्या पानावर, भावसरगम यासारखे एकाहून एक चांगले कार्यक्रम यात ठेवले जात असत. ती जागा आमच्या घरापासून दीडदोन किलोमीटर लांब असली तरी आम्ही चांगल्या कार्यक्रमांना आवर्जून जात असू. वाशीला रहायला गेल्यावर तिथे बाजूच्या सेक्टरमध्ये मोठा सार्वजनिक उत्सव असायचा त्यातही करमणुकीचे कार्यक्रम होत असत. पुण्याला तर माझ्या मुलांच्या घरालगतच त्यांच्या सोसायटींच्या गणेशोत्सवाचे कार्यक्रम होत असत.
पूर्वीच्या काळातली मुले आणि मुली सुरेल गायन किंवा तबला, पेटी, बासुरी, व्हायोलिन अशासारख्या एकाद्या वाद्याचे वादन शिकत असत आणि एकत्र मिळून छानसा संगीतमय कार्यक्रम करत असत. पुढे कीबोर्ड आणि अॅक्टोपॅड यासारखी गोंगाट करणारी वाद्ये आली आणि केराओके आल्यावर तर वादकांची गरजच संपली. त्याचबरोबर ऑडिओपेक्षा व्हीडिओ टेक्नॉलॉजी कैकपटीने पुढे गेल्यामुळे संगीतातला मधुर सुरेलपणा लयाला गेला आणि गोंगाटाचे राज्य सुरू झाले. अलीकडच्या काळातले करमणुकीचे कार्यक्रम म्हणजे पोटात गोळा उठेल एवढ्या मोठ्या ढणढणाटाच्या तालावर स्टेप्सच्या नावाने वेडेवाकडे अंगविक्षेप करत घामाघूम होईपर्यंत उड्या मारत राहणे झाले आहे. तरीदेखील मागच्या वर्षीपर्यंत मी हे बदलत जाणारे कार्यक्रम पहात आलो होतो.
या वर्षी मात्र अमेरिकेतल्या ज्या टॉरेन्स गावात मी रहात आहे तिथे तर यातल्या कशाचाच मागमूसही नाही. इथल्या काही शहरांमधली महाराष्ट्र मंडळे अॅक्टिव्ह आहेत आणि ते गणेशोत्सवाच्या काळात चांगले कार्यक्रम अरेंज करतात असे मी ऐकले होते, पण ती शहरे कुठे आहेत आणि तिथे कसे जायचे याची मी चौकशीही केली नाही. आपण ज्या गावाला जाऊ शकतच नाही त्या गावाचा रस्ता तरी कशाला विचारायचा?
तर अशा प्रकारे या वर्षीचा माझा गणेशोत्सव अगदी वेगळ्या वातावरणात साजरा झाला. म्हणजे पूजाअर्चा, अथर्वशीर्षाची आवर्तने, तळलेल्या आणि उकडीच्या मोदकांचा प्रसाद यासारखे घरातले सगळे कार्यक्रम आम्ही यापूर्वी जसे करत आलो आहोत त्याच पध्दतीने इथे सातासमुद्रापलीकडेही केलेच, पण मुंबईपुण्याच्या वातावरणातला जल्लोष आणि ढोलताशांचे आवाज मात्र खूप मिस केले.
No comments:
Post a Comment