पत्रे लिहिण्याची सुरुवात पुराणकालापासून झाली असेल, पण पोस्टाची सेवा सुरू झाल्यानंतरच ती मोठ्या प्रमाणात लिहिली जाऊ लागली. कांही साहित्यिक प्रवृत्तीचे लोक अजरामर वगैरे होणारी दिव्य पत्रे पाठवत असतीलही, पण सर्वसामान्य लोकांच्या घरातली पत्रे मात्र "पत्र लिहिण्यास कारण की ..." या वाक्यापासून सुरू होत असत. त्यामुळे आमच्याकडे आलेल्या बहुतेक पत्रांमध्ये एकादी बातमी तरी असे किंवा आमंत्रण. त्या काळात आमचे बहुतेक सगळे जवळचे आप्त गांवातच रहायचे आणि कांही प्रयोजन असले तरच पत्र लिहिले जात असल्यामुळे पत्रांची संख्या फार मोठी नसायची. आमच्या घरी लोखंडाची एक जाड तार वाकवून एका खुंटीला टांगून ठेवली होती. पोस्टमनने आणून दिलेले पत्र एकदा वाचून झाले की त्याला भोक पाडून त्या तारेमध्ये अडकवले जायचे. मला कळायला लागल्यापासून मी कॉलेजला जाईपर्यंतच्या दहा वर्षांमध्ये आलेली बहुतेक सगळी पत्रे त्या एकाच वाकड्या तारेने धरून ठेवली होती. मी हॉस्टेलमध्ये रहायला लागल्यानंतर मला आलेली पत्रे मित्रांनी वाचून त्यावरून माझी खिल्ली उडवण्याची शक्यता किंवा भीती होती. यामुळे पत्रांमध्ये कांही महत्वाची माहिती असली तर ती वेगळ्या जागी नोंदवून मी ते पत्र फाडून टाकत असे. दुर्दैवाने माझे वडील त्या काळात अचानक निधन पावले आणि त्यांनी मला लिहिलेले एकसुद्धा पत्र माझ्याकडे राहिले नाही याची सल मात्र माझ्या मनाला आयुष्यभर टोचत राहिली.
घरगृहस्थी सुरू केल्यानंतर मी पत्रांच्या बाबतीत सुसंगत असे धोरण ठेवले नव्हते. त्यानंतर मला आलेली महत्वाची पत्रे तेवढी मी जपून ठेवली, कांही पत्रे कपाटात अशीच पडून राहिली आणि बाकीची या ना त्या प्रकाराने नष्ट झाली. अनेक वर्षांनंतर एकादे जुने पत्र अचानक हाती लागले तर कां कोणास ठाऊक पण मला खूप आनंद व्हायचा. त्यावर बराच काळ विचार करतांना माझ्या लक्षात आले की आपली पत्रे म्हणजे साधे कागद नसतात. ज्या आप्तांनी ती लिहिली असतात त्यांच्या हातांचा स्पर्श त्या कागदांना झालेला असतो, पत्र लिहित असतांना त्यांच्या मनात ज्या भावना असतील, प्रेम, माया, काळजी, आशा, निराशा, रुसवा, राग यातले जे कांही असेल ते त्यांनी कांही वेळा प्रत्यक्ष शब्दांमध्ये व्यक्त केलेले असते आणि नसले तरी एकाद्या शब्दात किंवा वाक्यात त्यांच्या नकळत ते पाझरलेले असते. मी हस्ताक्षरांचा तज्ज्ञ नाही, पण मनातल्या भावनांचा हस्ताक्षरावर परिणाम होतो असे मला वाटते. अशा कांही शब्दांच्या पलीकडल्या अव्यक्त गोष्टीसुद्धा त्यात असतात. कांही लोकांची लेखनशैली मजेदार असते तर कुणाचे हस्ताक्षर मोत्यासारखे टपोरे आणि वळणदार असते. अशी पत्रे पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. अशा अनेक कारणांमुळे हस्तलिखित पत्रे ही सुद्धा संग्रह करून ठेवण्यासारखी गोष्ट असते हे माझ्या जरा उशीराने ध्यानात आले.
तोंपर्यंत एकंदरीतच पत्रव्यवहाराची उतरंड सुरू झाली होती. तरीही त्यानंतर मला मिळतील तेवढी पत्रे मिळेल त्या पाकिटांमध्ये घालून मी साठवून ठेवायला लागलो. त्यासाठी एक ठराविक जागा केलेली नसल्यामुळे ती पुन्हा पुन्हा इकडे तिकडे जात आणि सापडत राहिली. त्यातच दोनदा घर बदलतांना सगळे सामान अस्ताव्यस्त झाले. पण अखेरीस मी मिळतील तेवढी पत्रे गोळा केली. आता त्यांची वर्गवारी करून आणि पत्रलेखकाशी असलेला नातेसंबंध आणि पत्र लिहिण्याची तारीख या गोष्टी लक्षात घेऊन मी त्यांचा एक आल्बम करायचे काम हातात घेतले आहे. ही सगळी पत्रे व्यक्तीगत असल्यामुळे दुसऱ्या कुणाला त्यात रस वाटणार नाही, पण मला ते काम करतांनाच पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत आहेच आणि नंतरही अधून मधून विरंगुळा म्हणून ती वाचता येतील. जुनी पत्रे वाचतांना आपण कुठकुठल्या परिस्थितीमधून गेलो होतो आणि तेंव्हा कसा विचार केला होता वगैरेंची आठवण येते आणि कधी कधी त्यावर हंसू पण येते.
---------------------------------------------------------------------------------------------------
अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड यासारख्या दूरदूरच्या देशात राहणारी, कधीही एकमेकांना ना भेटलेली, ना भेटू शकणारी कांही मुले एकमेकांना पोस्टाने पत्रे पाठवतात आणि त्यातून त्यांची घनिष्ठ मैत्री होते असे मी लहानपणी कुठेतरी वाचले तेंव्हा मला त्यांचे कौतुक वाटलेच, आपल्यालाही असे मित्र असावेत असेही वाटले. पण काय करणार ? मला अशा कुणा परदेशी मुलांची नावेसुद्धा माहीत नव्हती, त्यांचे पत्ते कुठून मिळणार ? त्यांच्यातल्याही कुणीसुद्धा माझा पत्ता मिळवून मला एकादे पत्र पाठवले नाही. त्यामुळे मनातली ती सुप्त इच्छा दबून गेली. मला जीवनात भेटलेले सगळे खरे खुरे मित्र माझ्यासारखेच महाआळशी निघाले. कधी तरी मला एक साधे पोस्टकार्ड पाठवायची सद्बुद्धीसुद्धा त्यातल्या कुणालाही कधीच झाली नाही. त्यामुळे माझ्याकडे जमा झालेल्या शंभर दोनशे पत्रांमध्ये एकसुद्धा कोणा मित्राचे नाही. त्यांच्यातल्या कुणाच्याही हस्ताक्षराचा नमूना माझ्याकडे नाही. "Out of sight, out of mind" डोळ्याआड गेले की ते मनातूनही जाते असा एक इंग्रजी वाक्प्रचार आहे. त्यामुळे माझे हे सगळे मित्र मला पार विसरून गेले की काय ? या विचाराने मी थोडा अस्वस्थ होत असे, पण तसे झाले नव्हते.
पंधरा वीस वर्षांपूर्वी इंटरनेट आल्यानंतर शब्बीर भाटियाने हॉटमेल सुरू केले. पुढे याहू आणि गूगलसारख्या बड्या कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश करून ते काबीज केले. पोस्टाच्या मंदगतीवर विसंबून न राहता तारेपेक्षाही जास्त वेगाने संदेश पाठवणे शक्य झाले आणि आधी क्वचितच पत्र लिहिणारे माझ्यासारखे लोक सर्रास ई मेल पाठवायला लागले. आधी हौस म्हणून, नंतर गरजेपुरते आणि पुढे कांही तरी सांगावे असे मनात आले म्हणून ही मेल्स पाठवता पाठवता मला कधी त्याचे व्यसन लागले ते समजलेच नाही.
सुरुवातीला मी माझ्या मित्रांना किंवा आप्तांना उद्देशून पत्रे लिहित असे. ईमेलवरील सीसी आणि बीसीसी या सोयीमुळे एकच पत्र एकाच वेळी अनेकांना पाठवले जात असल्यामुळे खूपच सोय झाली. त्यानंतर ई मेल ग्रुप तयार झाले आणि त्या ग्रुपवर एक पत्र टाकले की ते आपोआप सर्व सदस्यांना जायला लागले. मी मुद्दाम या पत्रांचा संग्रह करण्याची गरजच नव्हती. मला आलेली पत्रेच नव्हे तर मी पाठवलेली पत्रेसुद्धा माझ्या इनबॉक्स आणि औटबॉक्समध्ये आपोआप गोळा होऊ लागली. उलट मला नको असलेली पत्रे वेचून त्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकणे हेच एक मोठे काम होऊन बसले. माझ्या दृष्टीने महत्वाची वाटणारी पत्रे वेगळी जमा करण्यासाठी मी कांही वेगळे कप्पे बनवले एवढेच.
मनोगत, मिसळपाव यांच्यासारखी इंटरनेटवर जमणारी कांही मंडळे तयार झाल्यावर आधी मी उत्साहाने सगळीकडे माझे नांव नोंदवले. त्या स्थळांवर कांही खरे नांव धारण करणारे तर कांही वेगळाच काल्पनिक मुखवटा घालून फिरणारे नवे मित्र मिळाले. त्यातले बरेचसे परदेशात वास्तव्य करणारे होते. त्या साइट्सवर होणारा संवाद म्हणजे सुद्धा मायना नसलेली पत्रेच असायची. यामुळे अनोळखी लोकांशी पत्रमैत्री करण्याची लहानपणी पुरी न झालेली एक इच्छा अंशतः पूर्ण झाली. पुढे फेसबुक आणि वॉट्सअॅपवर संवाद साधणे अधिकाधिक सोपे होत गेले, तसेच जुन्या मित्रांना शोधून काढून त्यांच्याशी संपर्क साधणेही शक्य झाले. मला असेच माझ्या ऑफिसातले, कॉलेजमधले आणि शाळेतलेसुद्धा काही हरवलेले मित्र चाळीस पन्नास वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आंतर्जालावर पुन्हा भेटले. तरीही त्यांनीही मला लगेच ओळखले आणि त्यांच्याशी बोलतांना आणि पत्रापत्री करतांना माझ्या हेसुद्धा लक्षात आले की तेही पू्र्वीच्या काळातल्या सगळ्या आठवणी विसरलेले नाहीत.
आज माझे फेसबुक, वॉट्सअॅप आणि ई मेल ग्रुप्सवर मिळून सात आठशे तरी असे मित्र आहेत ज्यांना मी नावानिशी ओळखतो आणि कधी ना कधी त्यांच्याबरोबर चार घटिका सुखात घालवल्या आहेत. हे सुद्धा एक प्रकारचे कलेक्शनच झाले ना ?
----------------------------------
माझ्या लहानपणच्या काळात आप्तेष्टांमधले संबंध पारदर्शक असायचे. आमच्या घरी येणाऱ्या दहा पत्रांपैकी आठ नऊ पोस्टकार्डे आणि एक दोन अंतर्देशीय पत्रे असायची आणि घरातले कोणीही ती पत्रे उघडपणे वाचत असे. एकादेही पत्र बंद पाकिटातून आल्याचे मला आठवत नाही. पोस्टाचे स्टँप लावलेले आणि महत्वाची कागदपत्रे असलेले एकादे रजिस्टर पोस्ट क्वचित कधी आलेच तर ते पाकिटासकट जपून ठेवले जात असे. परगावातल्या नातेवाइकांकडून लग्नमुंजीसारख्या मंगल कार्यांच्या आमंत्रणपत्रिका आणि कल्याण नावाच्या मासिकाचे अंक तेवढे बुकपोस्टने यायचे आणि शेवटी शेवटी दिवाळी किंवा नववर्षासाठी ग्रीटिंग्ज यायला लागली. त्यांना लावलेली तिकीटे मी अलगदपणे काढून एकाद्या काडेपेटीत घालून ठेवत असे, पण बहुतेक वेळा ती तिकीटे काडेपेटीसकट गायब होऊन जात असत. ती तिकीटे आधीच शिक्के मारून विद्रूप केलेली असल्यामुळे मलाही त्यांचे विशेष प्रेम वाटत नसे आणि ती हरवून गेल्याचे जास्त दुःखही होत नसे.
आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलमधला एक मुलगा फिलॅटेलिस्ट होता, म्हणजे त्यानेच असे सांगितले आणि त्या अनोळखी शब्दाचा अर्थ सांगितला म्हणून मला ते समजले. तो मित्र पोस्टखात्याच्या संपर्कात असायचा आणि नवीन तिकीटाच्या प्रसारणाच्या दिवशी सिटी पोस्टात जाऊन ते तिकीट आणि फर्स्ट डे कव्हर घेऊन यायचा. त्याच्या नादाने मी सुद्धा मला आलेली पत्रे फाडून टाकून देण्याआधी आठवण झाली आणि त्यांच्यावर तिकीटे लावलेली असलीच तर ती काढून ठेवायला लागलो. पुढे मला घरच्या किंवा ऑफिसच्या पत्त्यावर येत असलेल्या पत्रांची संख्या वाढत गेली. त्यात नोटिसा, बिले, ग्रीटिंग्ज वगैरेंची भर पडत गेली. भारत सरकारचे पोस्टखाते नवी नवी तिकीटे काढत गेले आणि ती जमवून ठेवण्यातला आनंद वाढत गेला. कांही मित्र आणि नातेवाईक परदेशी गेले आणि त्यांच्या पत्रांबरोबर तिकडची तिकीटे यायला लागली.
जेंव्हा माझ्याकडचा तिकीटांचा साठा बऱ्यापैकी वाढला तेंव्हा मीही एक स्टँपआल्बमचे पुस्तक आणले आणि ती तिकीटे वर्गवारी करून त्यात चिकटवून ठेवू लागलो. ते पाहून माझ्या मुलालाही थोडी स्फूर्ती आली आणि तोसुद्धा त्याला मिळेल ते तिकीट एका डायरीत चिकटवून ठेवायला लागला. त्यानंतर मी त्यालाच जास्त प्रोत्साहन दिले. एकदा तर त्याच्यासाठी बाजारातून एक तिकीटांचे पॅकेटसुद्धा विकत आणले, पण मला त्यातली तिकिटे कुठल्याही पोस्टांमधून निघाली नसून ती एकाद्या छापखान्यात छापली गेली असल्याची जास्त शक्यता वाटली. मुलाच्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून मी ही गोष्ट त्याला सांगितली नाही, पण पुन्हा बाजारातून तिकीटे विकत आणायची नाहीत एवढे बजावले.
जेंव्हा गांवोगांवी आणि घरोघरी टेलिफोन आले आणि एसटीडीचे रेट आंवाक्यात आले तेंव्हा प्रत्यक्ष बोलणे होऊ लागले. त्याच काळात ई मेल सुरू झाल्यानंतर तर हाताने पत्रे लिहून ती पोस्टाने पाठवणे कमी कमी होत पार बंद झाले. स्मार्ट मोबाइल फोन आल्यानंतर त्यावरून फोटो आणि डॉक्युमेंट्ससुद्धा पटकन पाठवण्याची सोय झाली. फ्रँकिंगची सोय झाल्यानंतर पाकिटांवर तिकीटे लावायची गरज राहिली नाही. अशा सगळ्या कारणांनी घरबसल्या पोस्टाची तिकीटे मिळण्याचे स्रोतच शिल्लक राहिले नाहीत. घर बदलतांना माझे स्टँप आल्बम कुठे तरी गहाळ झाले आणि मी तेसुद्धा विसरून गेलो होतो. कधी तरी ते घरातल्या सामानातच अचानक सापडल्यानंतर मात्र मी ते जपून ठेवले आणि मुलाच्या स्वाधीन केले. कोणे एके काळी पोस्टाची तिकीटे या नावाचे कांही अस्तित्वात होते आणि त्यात इतके वैविध्य होते हे भविष्यकाळातल्या पिढीला कळावे यासाठी त्याचा एक अँटिक म्हणून भविष्यकाळात कदाचित उपयोग होईल अशी आशा आहे.
---------------

No comments:
Post a Comment