जुने गणेशोत्सव भाग ४ - कलाकृति
प्रस्थापित किंवा हौशी अशा बहुतेक चित्रकारांना गणपतीच्या आकृतीचे आकर्षण असते आणि तिला आपल्या प्रतिभेचे पंख लावून सजवावेसे वाटते. लहान मुलांनासुध्दा गणपतीचे चित्र काढावे असे उत्स्फूर्तपणे वाटते आणि ते ब-यापैकी ओळखण्याइतपत जमते. गणेश ही कलेची देवता आहेच. याबद्दल मी पूर्वी लिहिलेला लेख नव्या चित्रांसह खाली दिला आहे. वर दिलेले सुंदर चित्र माझे कलाकार आणि कलाप्रेमी स्नेही श्री.यशवंत केळकर यांनी चितारले आहे.
कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ४
मागच्या भागांतली दुकानांत विक्रीसाठी ठेवलेली चित्रे व मूर्ती या गोष्टी अज्ञात कलाकारांनी बनवलेल्या असतात, त्यातील कांही वस्तु मोठ्या संख्येने कारखान्यांत यंत्राद्वारे निर्माण झालेल्या असतात. त्यांचे मूळ डिझाईन कोणी केले ही माहिती सहसा उपलब्ध नसते. खेड्यापाड्यातील हस्तकला पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पध्दतीने घडवली जात असते तशीच नवनव्या सामुग्रीचा व तंत्रांचा उपयोग करीत विकसित होत असते. व्यक्तिगत हस्तकौशल्यानुसार त्यात नवनवीन सौंदर्यस्थाने निर्माण होत असतात. कधी कधी ग्राहकांच्या मागणीनुसार सुध्दा त्यांत सुधारणा होतात. यामुळेच नवनवीन कल्पनांचे आविष्कार होत असतांना व बाजारांत नित्य नव्या वस्तु येतांना दिसतात.
प्रथितयश चित्रकार व मूर्तीकारांना सुध्दा गणेशाच्या रूपाचे मोठे आकर्षण वाटते. आपल्या असामान्य कलाविष्काराने आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त श्री.वासुदेव कामत यांचे नांव सर्वांनीच ऐकले असेल. जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीचित्रकार म्हणून त्यांची निवड होऊन नुकताच अमेरिकेत त्यांचा सन्मान करण्यात आला. मॉडर्न आर्टच्या जमान्यात व छायाचित्रांच्या स्पर्धेत वस्तुनिष्ठ व्यक्तीचित्रणाला त्यांनी उच्च स्थान मिळवून दिले आहे. अशा थोर चित्रकाराने गणेशाच्या सहजसुंदर रूपावर सुंदर लेख लिहिला आहे. ते लिहितात की "कलाक्षेत्रातील सर्व कलाकारांचे गणपती हे एक आवडते दैवत आहे. कुणीही कसेही काढले तरी सुंदर दिसणारे एकमैव दैवत. या भारतवर्षात असा एकही चित्रकार, शिल्पकार झाला नसावा, की ज्याने गजाननाचे चित्र साकारले नसेल." श्री कामतांनी स्वतः तर अगदी लहानपणी मातीचे गणपती बनवण्यापासून आपल्या कलासाधनेला सुरुवात केली. त्यांनी काढलेली द्विहस्त गजाननाची चित्रे अत्यंत सुंदर, प्रसिध्द व लोकप्रिय आहेत.
श्री अरुण दाभोळकरांची सर्व प्रकारची मनोहर चित्रे नांवाजली गेली आहेत. उपयोजित कलेचा मोठा उद्योग त्यांनी उभारला आहे. पण ते गणपतीवाले दाभोळकर म्हणूनच प्रसिध्द झाले. ते सांगतात की कलाकाराच्या दृष्टीने इतका बेसिक आणि तितकाच अलंकृत असा इतका मोठा आवाका फक्त गणपतीचाच आहे. एकाद्या कलाकाराची कला, ऊर्मी, चैतन्य व संकल्पना या सा-या गोष्टी एका मंगल क्षणी एकत्र एकत्र येऊन कागदावर उमटतात व गणपतीची कलाकृती साकारते. श्री.अच्युत पालव यांनी तर गणपतीच्या विविध नांवांची अक्षरे विशिष्ट प्रकाराने लिहून त्यामधून नांवाला समर्पक अशा आकृत्या तयार केल्या आहेत.
बहुतेक सर्व प्रसिध्द कलाकारांनी आपापल्या शैलीमध्ये गणपतीची चित्रे वा शिल्पे बनवलेली आहेत. त्याचा आकार कुठल्याही कलावंताच्या प्रतिभेला आवाहन करीत असतो व सर्जनशीलतेला एक आव्हान असते. बहुतेक प्रदर्शनात कोठेतरी एकादा गणपती दिसतोच. एका मोठ्या कंपनीच्या विश्रामगृहाच्या प्रशस्त दालनाच्या चारही भिंती जगप्रसिध्द तसेच विवादास्पद चित्रकार एम्. एफ्. हुसेन यांच्या अनेकविध गणेशप्रतिमांनी सजवलेल्या दिसल्या. त्यात कुणाला कांही वावगे दिसले नाही. या व्यतिरिक्त त्यांच्या इतर अनेक चित्रांत गजाननाची प्रतिमा डोकावतांना दिसते.
कशाही पध्दतीने काढले तरी सुंदर दिसणे हे एक गणेशाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा आकार म्हंटले तर मूर्त आणि म्हंटले तर अमूर्त असा आहे. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही शैलीमध्ये काम करणा-या कलावंतांना त्याचे आकर्षण वाटते. त्याला कांहीही शोभूनच दिसते. धनुर्धारी रामाला कोणी लष्करी पोषाख चढवून त्याच्या हातात एके ४७ रायफल दिली तर कुणाला आवडेल? त्या कृतीचा निषेध सुध्दा होईल. पण गणपतीला आपण कुठल्याही रूपांत प्रेमाने पाहतो. प्रभू रामचंद्राच्या आकृतीने हत्तीचे मस्तक धारण केले तर आपण ते गणपतीचे एक रूपच म्हणू, श्रीरामाचे म्हणणार नाही. अशा प्रकारे दत्तात्रेय, व्यंकटेश, श्रीनाथजी, गोपाळकृष्ण वगैरे विविध रूपातील गणपतींच्या मूर्ती बनवल्या जातात. कोणी कलाकार बालगणपतीला लडिवाळपणे साईबाबांच्या मांडीवर बसवतो तर कोणी साईबाबांनाच गणपतीचा चेहेरा देतो.
अशा नाना प्रकाराने गुणवंत कलाकार आपापल्या प्रतिभेचे आविष्कार गणपतीच्या विविध रूपांना नटवून दाखवत असतात. अशा अनेक सुंदर प्रतिमा या लिंकवर पहायला मिळतील.
https://www.artzolo.com/ganesha-paintings
http://www.fizdi.com/ganesha-paintings/
---------------------------------------------------------------------------------------------
भाग ५ - गणपतीची आरास
(कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ५ आणि इतर कांही लेखांवरून )
गणपती म्हंटल्यावर एक उत्साहाने ओतप्रोत भरलेली उत्सवमूर्ती डोळ्यापुढे उभी राहते. कुठल्याही कार्याचा शुभारंभ आपण श्रीगणेशायनमः असे म्हणून गणेशाला वंदन करून करतो. नव्या निवासात प्रवेश केल्यावर आधी त्याची पूजा करून सारे कांही सुरळीत होवो अशी प्रार्थना करतो. सर्व विघ्नांचा नाश करणारा आणि सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी तत्पर असा आपला पाठीराखा अशी त्याची प्रतिमा आहे. प्रत्येक समारंभाचे पहिले निमंत्रण आपण त्याला देतो आणि कार्यक्रमामध्ये त्यालाच अग्रपूजेचा मान देतो. मग त्याचा स्वतःचाच उत्सव म्हंटल्यावर उत्साहाला किती उधाण येईल कांही विचारायलाच नको.
इतर वेळेस आपल्या देवघरांतील देवाच्या मूर्ती थोड्या घासून पुसून चमकवून पूजाविधीसाठी घेतात व पूजाविधी संपल्यावर पुन्हा आपल्या जागेवर नेऊन ठेवतात. पण गणपती उत्सवाला मात्र दरवेळी मूर्ती सुध्दा नवीनच हवी. ही मूर्ती कच्च्या मातीपासून तयार केली जात असे आणि हवेतला दमटपणा, धूळ, उंदीर, कीटक वगैरेंमुळे तिचे स्वरूप विद्रूप होण्याची शक्यता असायची. उत्सव संपल्यानंतर तिने कुठेतरी अडगळीत जाऊन पडून तसे होऊ नये म्हणून लगेच तिचे साग्रसंगीत विसर्जन केले जाते. नवीन मूर्तीला साजेशी आकर्षक सजावट सुध्दा दरवर्षी उत्साहाने नव्याने केली जाते. या सगळ्या खटाटोपामध्ये किती श्रम व पैसे वाया जातात अशी टीका कांही लोक करतात पण ती गोष्ट तर सा-याच समारंभांना व उत्सवांना लागू पडते. माणसाला समारंभ साजरे करण्याची एक अंतःप्रेरणा असते त्याची अभिव्यक्ती या ना त्या रूपाने होतच राहणार. त्यामधून मिळणारा आनंद अनमोल असतो.
गणपतीच्या आकारांमध्येच खूप आगळेपणा आहे, त्यात मूर्त आणि अमूर्त या दोन्हींचा समावेश होतो. सर्वसामान्य लोक निर्गुण रूपापेक्षा सगुण रूपच अधिक पसंत करतात. उत्सवांसाठी ज्या मूर्ती बनवतात त्यातसुध्दा पराकाष्ठेची विविधता येणारच. पहायला गेल्यास मनुष्याकृतीला चार हात व हत्तीचे मुख जोडणे हे फारसे वस्तुनिष्ठ नाहीच, शिवाय प्रतिभेचे पंख लाभलेले कलाकार साध्या आकृतीला सुध्दा कल्पकतेने अनेक प्रकारची वळणे देतात. वेगवेगळ्या मुद्रा, रंगीबेरंगी वस्त्रालंकार, त-हेत-हेची आभूषणे यांनी त्या आकारांना मनसोक्त नटवतात. ही विविध रूपे दाखवण्याचाच प्रयत्न मी या लेखमालिकेत करणार आहे. गजाननाची ही उत्सवमूर्ती फक्त थोड्याच दिवसांसाठी बनवायची असल्यामुळे तिच्यात जास्त टिकाऊपणा आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. सहज सुलभ मिळणारा कच्चा माल व कलाकुसरीचे सामान यांचा उपयोग सुध्दा करता येतो. त्यामुळे कलाविष्काराच्या मर्यादा अधिकच रुंदावतात. उत्सव खाजगी, व्यक्तिगत स्वरूपाचा आहे की सार्वजनिक यावरून त्याचे बजेट ठरते व त्याप्रमाणे मूर्तीचे व सजावटीचे आकारमान.
घरगुती उत्सवात एक माणूस सहजपणे उचलू शकेल, घरातील एकाद्या खोलीत ठेवू शकेल इतपत आकाराची, बहुधा पारंपरिक मुद्रा धारण केलेली मूर्ती पसंत केली जाते. त्यासाठी मखर, सिंहासन, पालकी, रथ, झोपाळा किंवा नुसतीच कोनाड्याची चौकट अशी साधी सजावट करतात. तयार केलेल्या सजावटी सुध्दा बाजारात मिळतात, पण निर्मितीचा आनंद घेण्यासाठी बहुतेक उत्साही लोक शक्यतोंवर स्वतःच सजावट निर्माण करतात. काही निर्मितिक्षम (क्रिएटिव्ह) लोक एकादा विषय (थीम) घेऊन त्यानुसार देखावा निर्माण करतात. विविध आकारातील थर्मोकोलच्या वस्तु व शीट्स, पुठ्टे, रंगीबेरंगी कागद, रंग वगैरे अनेक गोष्टी या कामासाठी बाजारात मिळतात. त्यांना उठाव आणण्यासाठी त-हेत-हेच्या माळा, पताका, तोरणे, झुंबर, कळस, कृत्रिम फुले वगैरे सुध्दा मिळतात. आजकाल विजेच्या रोषणाईचे सुध्दा अनेक प्रकार निघाले आहेत. या सगळ्यांची पहाणी करून निवड करण्यांत, आपल्या परीने नवनवीन आकृत्या बनवून त्यांची जुळवाजुळव करून एक कलाकृती तयार करण्यांत अद्भुत आनंद मिळतो आणि गणरायाच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यासाठी प्रेरणा मिळते. या काळात बाजारात सहज फेरफटका मारतांनासुध्दा किती तरी सुंदर कलापूर्ण वस्तू दिसतात.
गणपतीची आरास आणि इतर तयारी करण्यात बराच वेळ खर्च केला जातो, सजावट करण्यात हौसेने कलाकुसरत केली जाते, नवनवीन कल्पनांना आकार दिला जातो. गावातली मित्र मंडळी, नातेवाईक वगैरे लोक या निमित्याने भेटायला येतात. चार लोकांनी येऊन आपले कलाकौशल्याचे काम पहावे, त्याचे कौतुक करावे असे वाटत असतेच. आपणही इतरांनी केलेली आरास पहात असतो. यामधून नवीन कल्पना सुचतात, सुरेख असे काही तरी करून पहाण्याची प्रेरणा मिळते. क्रिएटिव्ह असे काही तरी करण्याची हौस भागवून घेता येते. मी पूर्वी जमतील तसे केलेले काही देखावे आणि बाजारातून आणलेली मखरे यांची काही चित्रे या लेखासोबत दिली आहेत.
--------------------------------------------------------------------------------
भाग ६ - सार्वजनिक गणेशोत्सव
कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ६ चा विस्तार)
समाजातील सर्वसामान्य लोकांनी उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून एकत्र यावे, करमणुकीच्या निमित्ताने त्यांचे सामाजिक तसेच राजकीय प्रबोधन करावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे आतापर्यंत मानले जात होते. त्याला शंभरावर वर्षे होऊन गेली. इतर अनेक प्रसारण माध्यमे आल्यानंतर या उत्सवातल्या प्रबोधनाला फारसे महत्व राहिले नाही पण लोकांनी एकत्र येणे मात्र सहस्रावधी पटीने वाढत गेले. गणेशोत्सवापूर्वी गोकुळाष्टमीला गोविंदा, नंतर नवरात्रात शारदोत्सव, गरबा व दुर्गापूजा, त्याशिवाय नारळी पौर्णिमा, होली, ईद, ख्रिसमस, छटपूजा, नववर्षदिन, महानिर्वाणदिन, अय्यप्पा उत्सव वगैरेसारखे अनेक सण हल्ली मोठ्या प्रमाणात सामुदायिक रीत्या साजरे होतात. स्वातंत्र्यदिन व गणतंत्रदिन हे राष्ट्रीय दिनही धूमधडाक्याने साजरे केले जातात, त्या दिवशी प्रशासनातर्फे सजवलेले चित्ररथसुध्दा निघतात. सा-याच समारंभांमध्ये प्रेक्षणीय आतिशबाजी, नेत्रदीपक रोषणाई वगैरे असतेच. पण महाराष्ट्रात तरी गणपतीच्या उत्सवाचा आवाकाच इतका प्रचंड असतो की त्याची सर मात्र दुस-या कशालाही येत नाही.
जसजशी लोकसंख्या वाढली आणि लोकांची आर्थिक स्थिती सुधारली तसतशी गणेशोत्सवाच्या आयोजनाची भव्यता वाढत गेली. बरीचशी सभागृहे त्याने व्यापलेली असतातच. भरस्त्यात तसेच दोन बिल्डिंगमधील रिकामी जागा, ओसाड पडलेल्या जागा, मोकळी मैदाने वगैरे मिळेल त्या जागेवर मांडव घालून श्रींची स्थापना होते. गणेशमूर्तींची भव्यता व देखाव्याचा देखणेपणा यांत वेगवेगळ्या मंडळांमध्ये चांगलीच चुरस लागलेली दिसते. पूर्ण मनुष्याकृती प्रतिमा तर सर्वसामान्य होऊन गेल्या. आता वीस, पंचवीस फुटांचा प्रचंड आकार सर्रास दिसू लागला आहे. गणपतीच्या आजूबाजूला कलात्मक सजावट करण्याशिवाय प्रसिध्द स्थळांची व मोठ्या इमारतींची प्रतिकृती बनवून किंवा ऐतिहासिक, पौराणिक वा सामाजिक प्रसंगांचे दृष्य उभे करून एक तात्पुरती प्रतिसृष्टी निर्माण करण्याकडे कल दिसत आहे. तांत्रिक प्रगतीमुळे चालत्या बोलत्या चलनशील पुतळ्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे महत्वाचे प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुध्दा अनेक जागी होतो.
प्रचंड आकाराच्या मूर्ती बनवण्यामागे दूरवरून त्या दिसाव्यात, येणा-याजाणा-यांना दुरूनच तिचे आकर्षण वाटावे असा एक उद्देश असायचा. आता मात्र मुंबईत कित्येक जागी त्या मूर्तींना अनेक पडद्याआड झाकून ठेवतात. प्रवेश करण्यासाठी एक चिंचोळा मार्ग ठेवलेला असतो. त्यांत शिरून एखाद्या बोगद्यासारख्या अंधे-या वाटेने आजूबाजूचे इतर देखावे पहात आपण मुख्य उत्सवमूर्तीपर्यंत पोचतो. गेली काही वर्षे सुरक्षिततेसाठी सगळीकडे जास्तच कडेकोट बंदोबस्त असतो. साहजिकच यामुळे मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यात बराच वेळ जातो आणि रस्त्यांवरच दर्शनासाठी इच्छुकांच्या लांबलचक रांगा लागतात. अनेक वेळा इच्छा असूनसुध्दा प्रत्यक्ष दर्शन न घेता दूरदर्शन व वर्तमानपत्रातील वृत्तांवर समाधान मानावे लागते.
त्या मानाने पुण्याला शहराच्या मुख्य भागातल्या पेठांमधून एक फेरफटका मारला तरी अनेक ठिकाणचे सुंदर देखावे पाहिल्याचा आनंद व समाधान मिळते. या भागात देखावे पहायला येणा-यांची इतकी गर्दी उसळते की संध्याकाळनंतर सगळे रस्ते वाहतुकीला बंद ठेऊन फक्त पायी चालण्याची सोय करावी लागते. विसर्जनाच्या दिवशी रस्त्यातून जाणा-या मिरवणुकांमध्ये अनेक ठिकाणचे गणपती पहायला मिळतात. त्यातही मुंबईमध्ये विसर्जनाच्या अनेक जागा व तेथे जाणारे अनेक मार्ग असल्यामुळे गर्दीमुळे त्यातील एकादीच जागा धरून बसावे लागते. पुण्याला मात्र एका ठराविक मार्गाने आणि क्रमाने सर्व प्रमुख गणपतींची मिरवणुक निघते.
कांही लोकांना उपजतच समाजकार्याची आवड किंवा हौस असते. एकाद्या सोसायटी, वाडा किंवा गल्लीमधले असे उत्साही लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी आपला थोडा वेळ देण्याची, धडपड करण्याची आणि गरज पडली तर पदरमोड करण्याची त्यांची मनापासून तयारी असते. यानिमित्य इतर रहिवाशांना भेटून ते अल्पशी वर्गणी गोळा करतात, कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचे आवाहन करतात आणि सगळे जमवून आणतात. शंभर वर्षापासून बहुतेक जागी असे चालत आले आहे. आमच्या कॉलनीत सुरू असलेला सार्वजनिक गणेसोत्सव अशा उत्साही लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नातूनच साजरा होत आहे.
काही स्वार्थी लबाड लोक मात्र या निमित्याने आपला फायदा करून घेतात किंवा धांगडधिंगा करून घेतात. त्यांना गणपतीशी किंवा चतुर्थीशी काही देणे घेणे नसते. असे फंडगुंड नावापुरती एक समिति स्थापन करतात, तिच्या नावाने त्या भागातील रहिवाशी आणि व्यापारी यांच्याकडून खंडणी गोळा करतात आणि त्यातला काही भाग मूर्ती, आरास, कार्यक्रम वगैरेवर खर्च करून इतर पैसे चैनीवर उधळतात. या लोकांना समाजाची काही काळजी किंवा पर्वा नसल्यामुळे रस्ते अडवून स्टेज उभारणे, मोठ्या लाउडस्पीकरवर कानठळ्या बसवण्यासारखी गाणी वाजवणे यासारखे प्रकार घडतात. यांच्यामुळे आता नको तो गणेशोत्सव असे म्हणायची वेळ आजूबाजूला रहात असलेल्या लोकांवर येते.
याच्या उलट कित्येक मंडळे अजूनही या उत्सवात समाजप्रबोधनाचे काम करतात. काही तर वर्षभर सामाजिक कार्ये करत राहतात. मुंबईतल्या लालबागचा राजा आणि पुण्यातला दगडू शेठ हलवाई ट्रस्ट यासारख्या काही मंडळांचे नाव आता इतके मोठे झाले आहे की त्यांच्या उत्सवालाच तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविक लोक या गणपतींना नवस करतात आणि तो फेडायला येतात. अशा सार्वजनिक गणेशोत्सवाचे बजेट खूप मोठे असते आणि त्यांच्याकडे उत्पन्नाची अनेक साधनेही असतात.
1 comment:
मौलिक माहिती !!! http://www.marathiblogger.com
Post a Comment