Friday, January 23, 2015

तेथे कर माझे जुळती - भाग १७ - स्व.भाऊसाहेब भुस्कुटे (उत्तरार्ध)


भाऊसाहेबांनी आपले संपूर्ण जीवन संघकार्याला वाहून घेतले होते. त्यांची कुशाग्र बुद्धीमत्ता, अभ्यासू वृत्ती, कार्यकुशलता, जनसंग्रह, कर्तृत्व आदि गुणांच्या आधारे त्यांना तिथेही पदोन्नति मिळत गेली आणि एक एक पाय-या चढत ते सर्वात वरच्या स्तरापर्यंत जाऊन पोचले होते. ते संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य झाले होते. समाजसेवा, शिक्षण आदि निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या संघपरिवारातल्या अनेक संस्थांशी ते संलग्न झाले होते. त्या संस्थांच्या उपक्रमांचे नियोजन, त्यांच्या कामाची पाहणी करणे, तसेच समित्या, उपसमित्यांच्या बैठका, शिबिरे, समारंभ यांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे वगैरें कामांसाठी त्यांना नेहमी दौ-यावर जावे लागत असे आणि त्यामुळे बराचसा काळ ते बाहेरगावी गेलेले असत. जेंव्हा ते घरी असत तेंव्हाही त्यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांची रीघ लागलेली असायची. काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी मुक्कामाला थांबत असत तेंव्हा त्यांच्या जेवणखाण्याची आणि राहण्याची व्यवस्था वाड्यावरच होत असे.

भाऊसाहेबांच्या वाड्यातल्या एका सोप्यात ओळीने खुर्च्या आणि सोफे मांडून दहा बारा लोकांच्या बसण्याची व्यवस्था केलेली होती. त्यांच्याकडचे पाहुणे आणि त्यांना भेटायला आलेली मंडळी तिथे बसून वर्तमानपत्रे चाळवीत किंवा चहाचे घोट घेत गप्पागोष्टी करत बसत. भाऊसाहेबांना त्यांच्या कामाच्या व्यापातून थोडा निवांत वेळ मिळाला की त्या सोप्याच्या एका बाजूला टांगलेल्या झोपाळ्यावर ते येऊन बसत, समोर बसलेल्या व्यक्तींची आपुलकीने विचारपूस करत असत आणि त्यांच्या गप्पांमध्ये सामील होत असत. तो एक प्रकारचा छोटासा दरबारच असायचा. त्यात अनेक विषयांवर गप्पागोष्टी, संभाषण, चर्चा वगैरे चाललेल्या असायच्या. काही कारणानुळे मी त्यांच्या समोरून जात असलो तर ते मलाही हाक मारून बोलवायचे आणि समोर बसायला सांगायचे. आपल्यालाही ज्ञानामृताचे काही कण मिळतील म्हणून मी तत्परतेने तिथे बसून घेत असे.

या संभाषणांमधून मला निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे अनुभव ऐकायला मिळत होते, कोणत्या प्रसंगी कसे वागावे किंवा वागू नये आणि प्रत्यक्षात लोक कसे वागतात वगैरे ऐकणे मला खूप इंटरेस्टिंग वाटत असे. मला आधी ठाऊक नसलेल्या काही बातम्या त्या ठिकाणी समजत होत्याच, शिवाय काही घटनांना प्रसारमाध्यमांमध्ये कशी प्रसिद्धी मिळते आणि वास्तविक कशी वेगळी परिस्थिती असते हे ऐकायला मिळत असे. एकच घटना वेगवेगळ्या अँगल्समधून पाहता ती कशी वेगळी दिसते हे त्यातून समजत होते. त्या मैफलींमधले बहुतेक संभाषण तात्कालिक घडामोडींविषयी होत असले तरी त्या संदर्भात काही इतिहासकालीन किंवा पुराणातले दाखले ऐकायला मिळत. आपला अभिप्राय व्यक्त करतांना भाऊसाहेब गीतेमधले श्लोक किंवा संस्कृत सुभाषिते वगैरे अधून मधून सांगत असत. माझ्या दृष्टीने तो अनुभव एकंदरीत चांगला असायचा पण तो जरा एकांगी आहे, त्यात दुस-या बाजूचा पुरेसा विचार केला जात नाही असे मात्र मला कधी कधी वाटायचे एवढेच

आयुर्विमा, बँका, रेल्वे आदींच्या काँप्यूटरायझेशनला सुरुवात झाली त्या काळात बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला होता. त्याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये येत असत. त्या काळात सर्वसामान्य लोकांना या विषयाची फारशी जाण नव्हती. एकदा मी भाऊसाहेबांच्या दरबारात बसलेलो असतांना "ये काँप्यूटर क्या होता है?" असे कुणीतरी कुतूहल म्हणून विचारले. एकाद्या अनभिज्ञ माणसाला ते समजावून सांगण्यासाठी कुठून सुरुवात करावी याचा मी विचार करत होतो. पण भाऊसाहेबांनी आपल्या इंग्रजी भाषेच्या ज्ञानामधून असा तर्क केला असावा की काँप्यूट म्हणजे कॅल्क्युलेट तसेच काँप्यूटर म्हणजे कॅल्क्युलेटर असेल आणि त्यांनी तो अर्थ सांगूनही टाकला. अत्यंत गुंतागुंतीची आणि प्रचंड आकडेमोड सुद्धा काँप्यूटरद्वारे चुटकीसरशी करता येते. या अर्थाने हे उत्तरही बरोबरच असले तरी हा त्याचा फक्त एक उपयोग आहे. काँप्यूटरच्या सहाय्याने त्याखेरीज इतर अनेक कामे सुलभपणे करता येत असल्यामुळे "काँप्यूटर म्हणजे फक्त एक मोठा कॅल्क्युलेटर" असे म्हणता येणार नाही. एकादा माणूस कितीही मोठा विद्वान असला तरी तो सर्वज्ञ होऊ शकत नाही, पण त्याच्याकडून लोकांची तशी अपेक्षा असली तर त्यामुळे कधीकधी असे प्रसंग घडू शकतात.

"हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारता जो घणी।। तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा।।" असे संत तुकाराम महाराजांनी संतांबद्दल म्हंटले आहे. असामान्य माणूस सर्वसामान्यांपेक्षा कसा वेगळा असतो हे कठीण प्रसंगीच कळते. भाऊसाहेब असेच असामान्य पुरुष होते. आणीबाणीच्या काळात त्यांना बंदीवासात ठेवले गेले होते. त्याच काळात त्यांच्या मुलीचे लग्न ठरले. आम्ही त्या समारंभासाठी नागपूरला गेलो होतो. या कारणासाठी तरी त्यांना नक्कीच मुक्त केले जाईल असे आम्हाला वाटत होते, पण लग्नाच्या व-हाडासोबत ते आलेले नव्हतेच, लग्नाच्या आदले दिवशी संध्याकाळपर्यंत कार्यस्थळी येऊन पोचले नव्हते. जेलच्या नियमांनुसार त्यांना सोडण्यासाठी त्यांनी काही कागदांवर सह्या करणे आवश्यक असावे. सुटकेसाठी अर्ज, विनंती, पुन्हा परत येण्याची हमी वगैरे त्यांच्याकडून मागितले गेले असणार, पण असे समजले की त्यांनी याला सपशेल नकार दिला होता. आपली काहीच चूक नसतांना ज्या लोकांनी आपल्याला (अन्यायाने) डांबून ठेवले होते, त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांची मनधरणी करणे भाऊसाहेबांना अजीबात मान्य नव्हते असे समजले. त्यांच्याबद्दल असलेला आदर शतपटीने वाढला, पण या मंगल प्रसंगी त्यांची उपस्थिती नसल्यामुळे वाईटही वाटत होते. जड अंतःकरणाने सगळे धार्मिक विधी पार पाडले जात असले तरी कोणाला त्यात उत्साह वाटत नव्हता. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर "भाऊसाहेब आले." असा अचानक गलबला झाला आणि सगळे पाहुणे जागे होऊन हॉलमध्ये आले. खरोखरच भाऊसाहेब प्रवेश करत होते. कदाचित त्यांच्या नावाचा इतका दबदबा होता की त्यांच्या स्वाभिमानाला धक्का न लावता त्यांना तिथे आणून पोचवण्याची व्यवस्था झाली होती. त्यांना प्रवासाचा थकवा आलेला दिसत असला तरी नेहमीसारख्याच शांत मुद्रेने आत येऊन त्यांनी सगळ्या पाहुण्यांना प्रेमाने अभिवादन केले, हंसतमुखाने सर्वांचे स्वागत केले. क्षणार्धात सगळे वातावरण चैतन्याने भारले गेले

तो लग्नसमारंभ संपेपर्यंत ते त्यात सहभागी होत राहिले. त्या दिवसभरात त्यांनी कोणावरही कसल्याही प्रकारचा राग किंवा द्वेष व्यक्त केला नाही, तसलेही दुःख सांगितले नाही की कोणाही विरुद्ध तक्रारीचा सूर काढला नाही. तुरुंगवास भोगत असतांनासुद्धा जणू काही घडलेच नाही असे ते भासवत राहिले. इतका संयम, एवढे मनोबल एकादा योगीच बाळगू शकत असेल. भाऊसाहेब निश्चितपणे एक कर्मयोगी होते. त्यांनी "हिंदू धर्म, मानवधर्म" या नावाचे एक पुस्तक लिहून त्यात हिंदू धर्माबद्दलचे त्यांचे विचार मांडले होते. त्यातली मुख्य तत्वे त्यांनी स्वतः आचरणात आणली होती.

मला भेटलेल्या आणि वंदनीय वाटलेल्या व्यक्तींबद्दल या स्थळावर चार शब्द लिहिण्याचे काम मी गेली काही वर्षे करत आलो आहे. एकाद्या व्यक्तीचे चरित्र लिहिण्याचा हा प्रयत्न नाही, त्या व्यक्तीसंबंधीच्या माझ्या काही व्यक्तीगत आठवणी मी यात नमूद करत आलो आहे. या मालिकेतले एक पुष्प श्रद्धेय श्री भाऊसाहेबांच्या चरणी वाहण्याची संधी मी त्यांच्या शतसांवत्सरिक वर्षाच्या निमित्यांने घेत आहे. . 



No comments: