Monday, March 10, 2014

जानेवारी, फेब्रूवारी, हॉस्पिटलवारी

मी शाळेत शिकत असतांना म्हणजे सुमारे साठ वर्षांपूर्वीच्या काळात आमचे जीवन पंचांगानुसार चालायचे. आपले सणवार, उत्सव, जत्रा वगैरे तर तिथीनुसारच ठरतात, पण घरातल्या मुलांचे वाढदिवस आणि दिवंगत व्यक्तींचे स्मृतीदिवसही तिथीनुसारच येत असत. इंग्रजी महिना किंवा तारीख पहायची कधी गरज पडली तर ती माहितीदेखिल पंचांगांमध्ये दिलेली असे. घरात एकादे कॅलेंडर असलेच तर त्यावर असलेल्या मोहक चित्राने भिंतीला सजवण्यासाठी ते खिळ्याला टांगलेले असायचे. वर्ष संपून गेले तरी ते चित्र मळेपर्यंत वा फाटेपर्यंत किंवा दुसरे जास्त चांगले चित्र असलेले कॅलेंडर मिळेपर्यंत जुने कॅलेंडर भिंतीची शोभा वाढवतच असे. १ जानेवारीला सुरू होणा-या इंग्रजी नववर्षाची घरात तरी कसलीच खास दखल घेतली जात नसे. त्याच्या आदल्या रात्री मध्यरात्र होईपर्यंत जागे राहून बाराच्या ठोक्याला एकमेकांना मिठ्या मारायच्या असतात आणि एकमेकांच्या कानात "हॅप्पीन्यूइय्यर" असे किंचाळायचे असते हे आमच्या घरातच काय पण गावातही कुणाला ठाऊक नव्हते. गुढी पाडव्याच्या दिवशी मात्र पहाटे उठून उंच गुढी उभारायची, नव्या पंचांगावरच्या गणपतीच्या चित्राला फुले वाहून ते वाचायला सुरुवात करायची, नवे कपडे घालून देवबाप्पाला साष्टांग नमस्कार घालायचा आणि घरातल्या सगळ्या वडीलधारी मंडळींच्या पाया पडून त्यांचे भरघोस आशीर्वाद घ्यायचे हे मात्र ठरलेले होते. "मोठा हो, शहाणा हो" अशा स्वरूपाच्या त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपण मोठेपणी शहाणे होणार आहोत अशी भाबडी समजूत असायची.

आजकालसुद्धा एकाद्या व्यक्तीचा अभिनंदन किंवा सत्कारसोहळा होतो तेंव्हा त्याला उत्तर देतांना "मला जे काही प्राप्त झाले ते सगळे थोरामोठ्यांच्या आशीर्वादामुळे." हे वाक्य हमखास म्हंटले जाते. त्या बोलण्यातला खोटा विनय दिसत असला तरी त्यात काही वेळा एकदोन टक्के खरेपणाही जाणवतो. आपल्या नशीबावर आशीर्वादांचा अदृष्य असा थोडासा परिणाम अप्रत्यक्षपणे होत असावा असे अनेक लोकांना वाटते. वाढदिवस आणि नववर्षाला मिळणा-या शुभेच्छांबद्दल मात्र तसे काही सांगता येणार नाही. जास्त शुभेच्छा मिळाल्या तर जास्त भरभराट असे समीकरण तर मुळीच दिसत नाही. हिंदीभाषिक लोक "आपकी दुवा है।" वगैरे म्हणत असतात, मराठीभाषिकात तशी परंपरा नाही.

मी शाळेत असेपर्यंत ग्रीटिंग किंवा शुभेच्छा हे शब्दच ऐकले नव्हते. नोकरीला लागल्यानंतर थोड्याच दिवसात ऑफिसातल्या वीस पंचवीस सहका-यांबरोबर मैत्रीचे संबंध जडले होते. त्यानंतर आलेल्या १ जानेवारीच्या दिवशी ऑफिसात आल्याआल्या त्या सगळ्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करून "हॅपी न्यू ईयर, नया साल मुबारक" वगैरे ग्रीटिंग्ज, बधाइय़ाँ, शुभकामना, शुभेच्छा वगैरेंचे आदानप्रदान केले आणि सगळे आपापल्या कामाला लागले. नंतरच्या काळात त्यात गुणात्मक आणि संख्यात्मक (क्वालिटेटिव्ह व क्वांटिटेटिव्ह) वाढ होत गेली. मी रिटायर झालो त्या वर्षी माझ्या टेबलावर शंभर सव्वाशे ग्रीटिंग कार्ड्स येऊन पडली होती आणि त्याहून जास्त लोकांनी प्रत्यक्ष भेटून मला शुभेच्छा दिल्या. बिल्डिंगमधले, सकाळच्या मॉर्निंग वॉकमध्ये आणि संध्याकाळी बाजारात भेटलेले शुभेच्छार्थीही तितकेच असतील. घरात तसेच ऑफिसमधल्या फोनवर शुभेच्छा देणे सतत चाललेले होतेच. फारच अत्यावश्यक अशी कामे आणि सेवा वगळता इतर कोणी त्या दिवशीची ऑफिसातली नेहमीची कामे करतांना दिसले नाहीत. माझ्या आयुष्यातल्या नववर्षाच्या सर्वाधिक शुभेच्छा त्या वर्षी मला मिळाल्या होत्या, पण त्याचे रूपांतर सर्वोत्तम वर्षात झाले असे काही वाटले नाही.

नोकरीबरोबरच राहती जागाही सोडावी लागली होती. नव्या जागी अजूनही फारशा नव्या ओळखी झाल्या नाहीत. त्यामुळे या वर्षातल्या १ जानेवारीच्या दिवशी आम्हाला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणा-यांची संख्या खूप कमी झाली होती. गुळगुळीत छापील कार्डे पाठवण्याचा रिवाज कमी कमी होत लुप्त व्हायला आला असावा. त्या दिवशी लँडलाइन आणि सेलफोनवर मात्र खूप बोलणे झाले. माझ्याकडे जितक्या लोकांचे टेलिफोन नंबर आहेत त्यातल्या बहुतेकांचे आम्हाला फोन आले किंवा आम्ही त्यांना फोन करून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि घेतल्या. एसएमएस, ईमेल आणि फेसबुकवर तर त्यांचा पाऊस पडला.

"नवीन वर्षामध्ये आपणास सुख, समाधान. आनंद, यश, संपत्ती, कीर्ती, आयुरारोग्य वगैरे भरभरून मिळोत" असा आशय या सगळ्या शुभेच्छांमध्ये असतो. त्यातले सुख, समाधान. आनंद वगैरे गोष्टी मानण्यावर असतात आणि त्या मनाला आतून जाणवतात हे तत्वज्ञान ऐकून ऐकून मला तोंडपाठ झाले आहे. माझ्या पात्रतेनुसार मला जितके यश, संपत्ती, कीर्ती वगैरे मिळायची होती तेवढी पूर्वीच मिळालेली आहे. त्याबाबतीत माझी काही तक्रार नाही. कुणाच्या शुभेच्छांमुळे त्यात आता आणखी भर पडणारी नाही, माझी तशी अपेक्षाही नाही आणि त्यासाठी मी कसले प्रयत्नही करत नाही. त्यामुळे राहता राहिले आयुरारोग्य! उर्वरित आयुष्यातले जास्तीत जास्त दिवस छान मौजमजेत घालवायचे असतील तर त्यासाठी आपले आरोग्य सांभाळणे मात्र आवश्यक आहे.

आमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जी यंत्रणा आहे त्यात डॉक्टरांनी घरी येऊन तपासणे हा भाग अस्तित्वात नाही. आमच्या घराजवळ म्हणजे एक किलोमीटरच्या अंतरावर आमची डिस्पेन्सरी आहे. ती ऑफिससारखी दिवसातले काही तास चालते. त्या वेळात आलेल्या रुग्णांना तपासून औषधे दिली जातात. कुठल्याही प्रकारची तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया वगैरेची गरज असेल किंवा अनुभवी वरिष्ठ डॉक्टरांना तब्येत दाखवून त्यांचा सल्ला घ्यायचा असेल तर दहा किलोमीटर दूर असलेल्या आमच्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगतात. तिथल्या निरनिराळ्या ओपीडीसुद्धा ऑफिसप्रमाणे दिवसातले काही तासच उघड्या असतात आणि तिथे जायचे असल्यास आगाऊ अॅपॉइंटमेंट घ्यावी लागते. काही विशिष्ट तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया करायची सोय तिथे नसेल किंवा मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवायचे असेल तर जसलोक किंवा नानावटीसारख्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगतात. बाहेरचे काही तज्ज्ञ डॉक्टर्स आठवड्यातून एक दोन वेळा आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन ओपीडी आणि वॉर्डमध्ये पेशंट्सना बघतात. कुठल्या पेशंटला यासाठी कुणाकडे कधी पाठवायचे आणि त्याने तिथे जाऊन आल्यावर पुढे काय उपाययोजना करायची याचे निर्णय घेण्याचे अधिकार काही वरिष्ठ डॉक्टरांनाच आहेत. गंभीर अवस्थेतल्या (सीरियस) आणि अतिमहत्वाच्या (व्हीआयपी) पेशंट्सकडे ताबडतोब आणि जास्त बारकाईने लक्ष देणे आवश्यक असते आणि या दवाखान्यांमध्ये एकंदरीतच अतोनात गर्दी असल्यामुळे सगळ्या पेशंट्सची अथपासून इतिपर्यंत पूर्ण हिस्टरी वाचून समजून घेण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांना पुरेसा वेळ मिळत नाही. ते काम त्यांचे सहाय्यक करतात आणि त्यावर उपचार सुचवून त्याला वरिष्टांची मंजूरी घेतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास चालत असलेला कॅज्युअल्टी विभाग आहे. डॉक्टरने एकाद्या रुग्णाला तातडीने पहायची आवश्यकता असल्यास त्याने तिथे जायचे. तिथे ड्यूटीवर असलेला डॉक्टर तपासतो आणि गरज पडल्यास ओपीडी किंवा वॉर्डमधल्या डॉक्टरांना बोलावून त्यांचा सल्ला घेतो आणि गरजेनुसार तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया वगैरेसाठी वॉर्डमध्ये अॅडमिट केले जाते. आमच्या आरोग्ययंत्रणेत असे सगळे आहे, आणि त्यातून आमचे ठीकच चालले आहे असे म्हणता येईल. कसलेच लक्षण किंवा तक्रार नसतांना पण नियमितपणे कराव्या लागणा-या रक्त तपासण्या करण्यासाठी मात्र आमच्या दूरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा जवळची पॅथॉलॉजीकल लॅबच सोयीची असते. काही कारणाने इतर काही वेळा बाहेरच्या डॉक्टरांकडे जाणेही होते.

या वर्षी जानेवारी आणि फेब्रूवारी या दोन महिन्यांमध्ये आम्हाला या सगळ्यांची खूप गरज पडली. एवढ्याच कालावधीत आमच्या हॉस्पिटलमधल्या मेडिकल, सर्जिकल, ऑर्थोपि़डिक, अॅनेस्थेशिया, ऑप्थॉल्मॉलॉजी, सायकिअॅट्री, पॅथॉलॉजी, क्ष किरण, सोनोग्राफी, कॅज्युअल्टी इतक्या निरनिराळ्या विभागांमध्ये जावे लागले. एका भेटीत काम पूर्ण न झाल्यामुळे काही ठिकाणांना दोन तीन किंवा चार पाच भेटी द्याव्या लागल्या. बाहेरच्या इस्पितळांमध्येही कुठलीही तपासणी झाल्यानंतर रिपोर्ट आणण्यासाठी तिथे पुन्हा जावे लागते. यामुळे पाच दिवस जसलोक आणि दोन दिवस टाटा हॉस्पिटलला जाऊन आलो. हॉस्पिटलमधल्या वॉर्डमध्ये कोणाचा पेशंट अॅडमिट केलेला असेल तर दिवसातून दोन वेळा त्याला भेटायला जाणे होतेच, त्याला आयसीयूमध्ये ठेवले असल्यास दिवसाचे चोवीस तास कोणीतरी तिथे थांबणे आवश्यक असते. या कारणांमुळेही माझ्या आठ दहा येरझारा झाल्या. आमच्या हॉस्पिटलमध्ये सकाळी आठ वाजता पोचायचे असेल किंवा जसलोकला नऊ वाजता जायचे असेल तर घरातून सात वाजता निघायला हवे आणि त्यासाठी पहाटे लवकर उठून तयारी करायला हवी. आम्ही तिकडे केंव्हाही गेलो तरी डॉक्टर लोक त्यांच्या वेळेप्रमाणे येणार, आधी वॉर्डमधल्या रुग्णांना पाहणार, त्यांच्याबद्दल आपसात चर्चा, सल्लामसलत करून त्यांच्यासाठी उपाययोजना ठरवणार आणि नंतर इतर पेशंट्सना पाहणार. यामुळे तिथून परत येण्यासाठी निघायला दुपारचा एक दीड वाजला तर त्यानंतर घरी जाऊन जेवण करणे शक्यच नसायचे. त्यामुळे पुलाव, बिर्याणी, मसाला डोसा, पिझ्झा, बर्गर असे काही तरी बाहेरच खावे लागत असे. असले चित्रविचित्र पदार्थ पचवायची पोटाला संवय नसते, तसेच एअर कंडीशन्ड खोलीमधून भर उन्हात किंवा याच्या उलट असे हवामानातले बदल झाले, आमच्या हॉस्पिटलमधली स्वच्छता वाखाणण्याजोगी असली तरी जिथे शंभरावर रोगी अॅडमिट झालेले असतात आणि शेकडो लोकांची रोज ये जा होत असते तिथली हवा, पाणी, भिंती, दारे खिडक्या, जिन्यांचे कठडे, स्वच्छतागृहे वगैरे सगळेच रोगजंतूंपासून पूर्णपणे मुक्त कसे असणार? यामुळेही काही नवीन व्याधीविकार उद्भवले आणि त्यासाठी डॉक्टरांकडे जावे लागले. निरनिराळी औषधे आणण्यासाठी कित्येक वेळा विशिष्ट केमिस्ट शोधून काढून त्यांच्याकडेही जावे लागले.

या सगळ्यांची बेरीज केली तर दोन महिन्यात हॉस्पिटल, डिस्पेन्सरी, लॅबोरेटरीज वगैरेंच्या पन्नास तरी वा-या झाल्या असाव्यात. रोज सकाळी उठताच आज कुठे केंव्हा आणि कसे जायचे हाच विचार करावा लागत होता आणि काही वेळा तर आदल्या रात्री झोपायला जायच्या आधीच दुस-या दिवसाचे प्लॅनिंग करावे लागत होते. या धामधुमीतच दोन लग्नसमारंभ आणि एका बारशालाही हजेरी लावून झाली. जानेवारी आणि फेब्रूवारीतल्या या मोहिमा कमी पडल्या की काय कोण जाणे, मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातही हॉस्पिटलच्या तीन खेपा माराव्या लागल्या. या काळात घरी कुणाकुणाला कोणते प्रॉब्लेम होते आणि त्यांच्या कसकसल्या तपासण्या झाल्या वगैरेंचा तपशील वैयक्तिक स्वरूपाचा आहे आणि मेडिकल क्षेत्रातले माझे अर्धवट ज्ञान इथे पाजळण्यात काही अर्थ नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्यात चिंताजनक किंवा फार गंभीर असे काही नव्हते, पण सगळ्या तपासण्या करून त्यांचे रिझल्ट पाहून तज्ज्ञांनी तसे सांगेपर्यंत त्याबद्दल मनात थोडीशी धागधुग वाटतही होती.   

मला या नववर्षाला मिळालेल्या शुभेच्छांचा थोडा सावकाश परिणाम (डिलेड इफेक्ट) होऊन आता उरलेले वर्ष शांततेचे जावो आणि हॉस्पिटलच्या फे-या यापुढील काळात आटोक्यात राहोत अशी इच्छा, आशा आणि प्रार्थना.



No comments: