Wednesday, November 27, 2013

आरुषी तलवारची दुर्दैवी कहाणी

पाच वर्षांपूर्वीच्या उन्हाळ्यात मैसूर या थंड हवेच्या शहरात मी काही दिवस जाऊन राहिलो होतो. मी तिथे असतांना कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यांची मतमोजणी होऊन त्या राज्यात सत्तापालट झाला. त्यासंबंधीच्या बातम्या रोजच मुखपृष्ठावर ठळक मथळ्यांसह येत असत. अपघात, आत्महत्या आणि खून यासारख्या घटना जवळ जवळ रोजच कुठे ना कुठे घडत असतात आणि त्यांच्या बातम्या छापून येत असतात. बहुतेक वेळा कर्नाटक राज्याच्या मैसूरजवळच्या भागात होत असलेल्या असल्या घटनाच मुख्य पानांवर ठळक मथळ्यानिशी दिल्या जात असत. अशा घटनांसंबंधातल्या व्यक्ती किंवा ती घटनास्थळे आपल्या मुळीच परिचयाची, कधीही ऐकलेलीसुद्धा नसतील तर एरवीसुद्धा त्या बातम्या आपले फारसे लक्ष वेधून घेत नाहीत. मी त्या न वाचताच पान उलटत होतो. प्रसिध्द किंवा लोकप्रिय व्यक्तींच्या आयुष्यातल्या किरकोळ घटनांनासुद्धा त्यांच्या नांवलौकिकाच्या प्रमाणात कव्हरेज मिळते. पण या सगळ्यांशिवाय त्या महिन्याभरात घडलेल्या तीन दुर्दैवी घटनांना मुखपृष्ठावर महत्वाची जागा मिळत होती. त्या तीन घटनांबद्दल काही दिवस रोजच्या रोज काहीबाही छापून येत होते. त्यात गुंतलेल्या सगळ्या व्यक्ती अगदी अप्रसिध्द होत्या आणि त्या घटना घडल्या नसत्या तर त्यांची नांवे कानावर पडण्याची सुतराम शक्यता नव्हती आणि आतापर्यंत ती विस्मरणाच्या मार्गाला लागलीही आहेत. तरीही त्या काळात त्यांना अचानक प्रचंड प्रसिध्दी मिळाली होती.

याचे मुख्य कारण म्हणजे त्या तीन्ही घटना सुशिक्षित, सुखवस्तू किंवा श्रीमंत आणि सुसंस्कृत समजल्या जाणा-या कुटुंबात घडल्या होत्या. समाजाच्या या 'क्रीमी लेअर' मध्ये अशा भीषण घटना अपेक्षित नसतात. एकाद्या धारावाहिक कथामालिकेप्रमाणे रहस्यमय रीतीने यांचा एक एक पदर रोज उलगडत जात होता आणि अजूनही त्या पूर्णपणे खात्रीलायक वाटाव्या इतक्या स्पष्ट झालेल्या नाहीत. या तीन्ही घटनांचा लैंगिकतेशी संबंध असावा किंवा कदाचित तो जोडण्यामुळे त्या बातमीचा खप वाढेल अशी ते वृत्त छापणा-यांची समजूत असावी. त्यामुळे त्या बाजूवर जरा जास्तच भर दिला जात होता. पहिली दुर्दैवी घटना दिल्लीजवळ घडली. आरुषी नांवाच्या चौदा वर्षे वयाच्या बालिकेचा मृतदेह तिच्याच राहत्या घरी मिळाला, या प्रकरणातील बातम्यांचा ओघ यायचे थांबेपर्यंत दुसरे प्रकरण पुढे आले. मुंबईत टीव्हीसाठी मालिका तयार करणा-या एका प्रसिध्द संस्थेत काम करणारा एक होतकरू तरुण अचानक गायब झाला. नंतर त्याचा अतीशय निर्घृण खून झाला असल्याचे समजले. या घटनेच्या बातम्या प्रसिध्द होणे थांबेपर्यंत तिसरी दुर्दैवी घटना घडली. कर्नाटकाच्या किनारपट्टीमधल्या प्रदेशातून निवडून आलेले एक विधायक आपले कर्तव्यपालन करण्यासाठी बंगलोरला गेले असतांना त्यांची सुविद्य पत्नी माहेरी जाण्यासाठी आपली गाडी स्वतः चालवीत घरातून बाहेर पडली आणि अदृष्य झाली. दोन तीन दिवसांनी तिचा मृतदेह दिल्लीतल्या एका घरात पंख्याला लोंबकळलेल्या अवस्थेत सांपडल्याचे वृत्त ठळकपणे दिलेले! यातल्या तिस-या प्रकरणाचे पुढे काय झाले त्यातले काहीच कळले नाही. दुस-या प्रकरणात बरेचसे नाट्य घडले. पहिले आरुषीचे प्रकरण थंड झाले असे वाटले होते, पण त्याला कलाटणी मिळाली आणि गेले दोन दिवस त्याच्या बातम्या सर्व वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्सवर येत आहेत.

एकाद्या रहस्यमय मालिकेला लाजवेल अशा प्रकारे रोज नवा धक्का तेंव्हा आरुषीच्या संबंधातल्या बातम्यांमध्ये मिळत गेला होता. या चौदा वर्षे वयाच्या सुकोमल आणि सुरेख बालिकेचा मृतदेह दिल्लीजवळील नोइडा या पॉश वसाहतीतल्या तिच्याच राहत्या घरी तिच्याच बिछान्यावर पडलेला मिळाला, पण तिच्या मृत्यूबद्दल घरात कोणालाच कांही माहीत नव्हते. राहत्या घरी झालेल्या या हत्याकांडाचा बारीकसा आवाजसुध्दा शेजारच्या खोलीत झोपलेल्या तिच्या आईवडिलांना ऐकू आला नाही म्हणे. बाहेरचा मजबूत मुख्य दरवाजा बंद होता आणि तो जबरदस्तीने उघडून किंवा तोडून बाहेरचा कोणी आत आला असण्याची शक्यता नव्हती. त्याच वेळी त्या कुटुंबात काम करणारा चाळीशीतला त्यांचा नोकर परागंदा झाल्याचे आढळल्याने त्याचा संशय येत होता, पण त्याने घरातली कुठलीही वस्तू चोरली नव्हती, की आरुषीवर जबरदस्ती केल्याच्या खुणा नव्हत्या मग या निष्पाप जीवाला मारून त्याला काय मिळाले? तो नोकर रेल्वे स्टेशनकडे जातांना त्याला कोणीतरी पाहिल्याचे सांगितले गेले, पण तो त्याच्या गावी गेला नव्हता. तो आणखी कुठे गेला असेल याचा तपास चालला. दोन तीन दिवसानंतर त्या नोकराचा मृतदेह रहस्यमय रीत्या त्याच इमारतीच्या टेरेसवर टाकीत सापडला. त्यामुळे चित्र बदलले आणि अज्ञात हल्लेखोराचा तपास सुरू झाला. आता हे दोन खून एकाच व्यक्तीने केले होते की वेगवेगळ्या, तसेच ते एकाच वेळी झाले होते की एकानंतर एक, तसे असल्यास त्यात आधी कोणाचा आणि नंतर कोणाचा, कदाचित आधी नोकराने आरुषीला मारले आणि नंतर कोणीतरी त्या नोकराला मारले असे झाले असेल का, त्या दोन अपराधांचा एकमेकांशी संबंध असणारच, पण तो कशा प्रकारचा होता, की काही संबंधच नव्हता असे अगणित प्रश्न निर्माण झाले आणि त्यावर अनेक दिशांनी तर्ककुतर्क होत राहिले.

आरुषीच्या आईवडिलांच्या आणि वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनात त्यांच्याशी संबंधित असलेल्य़ा काही लोकांच्या चारित्र्याबद्दल संशय घेतला गेला. त्याबद्दल पसरलेल्या अफवा, संबंधित लोकांनी केलेला त्यांचा इन्कार आणि त्यामुळे झालेल्या त्यांच्या चारित्र्यहननाविरुध्द केलेल्या कारवाया यांच्या बातम्या येत गेल्या. त्यापुढे आरुषीच्या डॉक्टर वडिलांनाच दोन्ही हत्याकांडामागील संशयित म्हणून अटक झाली आणि मग अफवांचे पेवच फुटले. कोणी त्या डॉक्टरचा दुस-या एका महिला डॉक्टरबरोबर संबंध जोडला तर दोन्ही डॉक्टर दंपती गंमत म्हणून अदलाबदल करून विकृत मजा मारायची अशी आवई कोणी उठवली. पण याचा त्या दुहेरी खुनांशी काय संबंध? तर आरुषीला किंवा त्या नोकराला किंवा त्या दोघांना ही गोष्ट समजली होती, पौगंडावस्थेतील आरुषी त्याला प्रखर विरोध करत होती किंवा नोकर त्याचा बभ्रा करण्याची धमकी देऊन मालकांकडून पैसे उकळत होता आणि कदाचित त्या अजाण मुलीला ब्लॅकमेल करून तिचा गैरफायदा करून घेत होता. हे मर्यादेबाहेर जात असल्याचे दिसल्यामुळे त्यांचा कांटा काढला गेला असा एक तर्क पुढे करण्यात आला. खरे पाहता त्या दोघांपैकी एकालाच बाजूला सारायचे होते, पण दुस-याला त्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यामुळे पुरावा मागे सोडू नये एवढ्यासाठी त्यालाही संपवावे लागले असा तर्क आणखी कोणी केला. या गोंधळात दोन्ही मृत व्यक्तींचा एकमेकांशी अनैतिक संबंध जोडण्यापर्यंत अफवांची मजल गेली. आणखी थोड्या दिवसांनी दुस-या एका नोकराची जबानी घेण्यात आली, त्याची चौकशी झाली आणि खुनांचा संशय त्यानंतर आणखी तीन नोकरांवर आला. तसेच त्यांनी आणखी काही बदमाशी केल्याचा आरोपही केला गेला. ही बातमी देणा-या वृत्तसंस्थाच त्यात कांही कच्चे दुवे आहेत असेही सांगत होत्या. सर्व संबंधितांचे बोलणे खरे आहे की खोटे आहे ते ठरवणा-या चांचण्या घेण्यात आल्या. जी माहिती प्रसिध्द होत होती त्यात एवढी विसंगती दिसत होती की त्यावरून त्यातले कोणीतरी (किंवा सर्वच) असत्यभाषण करत असणार एवढे निश्चित दिसत होते.

माझ्या लहानपणी  'बहुरंगी करमणूक' नांवाच्या पुस्तिकांची एक मालिका निघाली होती. कोड्यात दिलेल्या तीन किंवा चार व्यक्तींमधल्या कोणी नेहमीच खोटे बोलतात, कोणी नेहमी खरे बोलतात आणि उरलेल्यांचा कांही नेम नाही. अशा वेळी त्यांच्याकडून हमखास बरोबर अशी एक विशिष्ट माहिती पाहिजे असेल त्यांना कोणते प्रश्न विचारावेत अशी कोडी त्या पुस्तकांत असायची. ते कूटप्रश्न विचारून मिळालेल्या निरनिराळ्या उत्तरांवरून नेमके सत्य कसे तर्कशुध्दपणे शोधायचे हे दाखवणारी उदाहरणे त्यात दिलेली असायची. आरुषी प्रकरणाच्या बातम्या वाचतांना मला त्या पुस्तकांची आठवण झाली आणि अजूनही ती पुस्तके मिळत असतील तर वाचावीत असे तेंव्हा वाटले होते.

या गुन्ह्याचा तपास करण्याचे काम काही काळानंतर एका सरकारी खात्याकडून दुस-या खात्याकडे सोपवण्यात आले. हे कोणाच्या सांगण्यावरून किंवा मागणीमुळे घडले ते काही आता आठवत नाही. पण त्यामागे निश्चितपणे काही सबळ कारण असले पाहिजे. अशी गोष्ट सगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीत होत नसते. त्यानंतर आणखी काही लोकांना अटक आणि त्यांची चौकशी झाली. दरम्यान ही बातमी शिळी झाल्यामुळे मागे पडली आणि लोकांच्या स्मरणातूनही गेली असेल. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात काय झाले ते माहीत नाही. पण ही चौकशी बंदच करण्याची शिफारस केली गेली आहे अशी एक लहानशी बातमी दोन तीन वर्षांपूर्वी आली होती. त्याला आक्षेप घेऊन तपास चालू ठेवावा आणि गुन्हेगाराला शोधून काढून त्याला शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आरुषीच्या वडिलांनी केली असे त्यानंतर समजले. खटला भरण्याइतका भक्कम पुरावा आपल्यापाशी नसला तरी अजूनही तेच मुख्य संशयित आहेत असे स्पष्टीकरण त्यावर देण्यात आले आणि जमा झालेला परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरून हा खटला चालवणे शक्य आहे असा त्यावर निर्वाळा दिला गेला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यामुळे त्यावर कोणीही आपले मत मांडू शकत नव्हता. पण आतापर्यंत छापून आलेल्या बातम्यांमधली विसंगती पाहता नक्की काय काय घडले ते देवच जाणे असाच विचार मात्र मनात येत होता.  

आता न्यायालयाने निकाल दिला आहे आणि आरुषीचे वडीलच नव्हे तर आईसुद्धा या गुन्ह्याला जबाबदार आहे असा निर्णय देऊन दोघांनाही शिक्षा ठोठावली आहे. त्यावर ते दांपत्य उच्च न्यायालयाकडे धाव घेणार आहे हेही नक्की आहे. काल एका वाहिनीवर असे सांगितले गेले की आरुषीची आई महाराष्ट्ऱातली मराठीभाषी स्त्री आहे. ही एक नवीनच माहिती पुढे आली. ऑनर किलिंगचे प्रकार महाराष्ट्ऱातील उच्चशिक्षित वर्गात तरी कधीच दिसत नाहीत. यामुळे यातली वैचारिक गुंतागुंत आणखी वाढली आहे.  2 comments:

giaonhan247 said...

Thanks for sharing, nice post! Post really provice useful information!

Giaonhan247 chuyên dịch vụ mua hàng mỹ từ dịch vụ order hàng mỹ hay nhận mua nước hoa pháp từ website nổi tiếng hàng đầu nước Mỹ mua hàng ebay ship về VN uy tín, giá rẻ.

Anand Ghare said...

इंग्रजी शिवाय ही कोणती दुसरी भाषा आहे? त्यात जे लिहिले आहे त्याचा अर्थ काय आहे?