Monday, October 07, 2013

तेथे कर माझे जुळती - १६ - स्व. कमलाताई काकोडकरमाझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या काही व्यक्तीबद्दल लहानमोठे ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती एका लेखात थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. "मी सुध्दा या थोर लोकांना भेटलो आहे." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही, पण त्यांना भेटल्याचा मला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटतो. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे सोळावे पुष्प प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या मातोश्री स्व.कमलाताई काकोडकर यांना समर्पित करीत आहे. काही दिवसापूर्वी त्यांचे वृध्दापकालाने दुःखद निधन झाले. एक दुर्मीळ असे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व वर्तमानातून इतिहासात गेले! सध्या सुरू असलेल्या नवरात्राच्या दिवसात आदिशक्तीच्या आधुनिक काळामधील या रूपाचे दर्शन समयोचितच आहे.

डॉ.अनिल काकोडकर आणि मी अणुशक्तीनगर वसाहतीच्या एकाच भागात वर्षानुवर्षे रहात होतो. आमच्या क्वार्टर्स साधारणपणे एकाच प्रकारच्या होत्या, आमची मुले एकाच शाळेत शिकत होती, एकाच डिस्पेन्सरीत आम्ही वैद्यकीय कारणांसाठी जात होतो आणि रोजच्या उपयोगी वस्तू आणण्यासाठी कॉलनीमधल्या एकाच बाजारात जात होतो. इतकेच नव्हे तर आम्हाला कॉलनीच्या बाहेर कुठे जायचे असेल तर त्यासाठी आम्ही एकाच बसस्टॉपवर जात होतो. त्यामुळे अधून मधून कुठे ना कुठे आमची एकमेकांशी गाठ भेट होतच असे. काकोडकरसाहेबांच्या मातोश्री कमलाताई त्यांच्याबरोबर रहात असल्यामुळे त्यासुध्दा नेहमीच्या पहाण्यातल्या होत्या. त्यांच्या वयाचा विचार करता कॉलनीतले सगळेजण त्यांना आजीच म्हणत असत. माझे त्यांच्याशी कधीच फारसे बोलणे झाले नसले तरी माझ्या पत्नीबरोबर ते नेहमी होत असे. कमलाताईंचे वागणे बोलणे अत्यंत साधेपणाचे असायचे. कॉलनीमधल्या त्यांच्या वयाच्या इतर काही आज्या खूप बोलक्या होत्या. आपली मुले, नातवंडे वगैरेंचे कौतुक करतांना त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचत असे. त्यांच्या किरकोळ कामगिरींचे पुराणसुध्दा त्या रंगवून सांगतांना थकत नसत. पण काकोडकर आजी त्या सर्वांहून फार निराळ्या होत्या. स्वतःची किंवा आपल्या कुटुंबाची बढाई करणे त्यांच्या स्वभावात नव्हते.

खरे पाहता त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप म्हणजे खूपच होते. काकोडकरसरांनी अणुशक्तीखात्याच्या प्रशालेत प्रवेश केल्यापासूनच, किंबहुना त्याच्याही आधी इंजिनियरिंग शिकत असतांनापासून नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांची बुध्दीमत्ता, ज्ञान, कर्तृत्व, संघभावना, कामाबद्दल असलेली तळमळ, निष्ठा हे सगळेच गुण इतके उच्च स्तरावरचे होते की पहिल्या भेटीमध्येच कोणावरही त्यांची छाप पडल्याखेरीज रहात नसे. अणुशक्तीशी निगडित असलेली एकापाठोपाठ एक नवनवी आव्हानात्मक कामगिरी त्यांच्याकडे विश्वासाने सोपवली जात असे आणि ते रात्रंदिवस जिवाचे रान करून ती यशस्वीरीत्या फत्ते करून दाखवत असत. यामधून त्याच्या यशाची कमान सतत उंचावत राहिली आणि त्यांची निवड अधिकाधिक उच्च पदांवर होत गेली. डिपार्टमेंटमध्ये त्यांचे करीयर नेहमीच सुपरफास्ट ट्रॅकवर राहिले होते. काकोडकर आजींना या सर्वाचे मनापासून कौतुक आणि सार्थ अभिमान वाटत असणारच. पण तरीही त्या मितभाषीच राहल्या. मुलाच्या प्रगतीबरोबर कॉलनीमधल्या लोकांच्या मनातले त्यांचे स्थानसुध्दा उंचावत जात होतेच. अधिकाधिक लोक त्यांना जास्त मान देत होते, त्यांच्याकडे अधिक आदराने पाहिले जात होते, पण त्यांनी कधीही त्याचे भांडवल केले नाही. त्यांचे वागणे आणि बोलणे नेहमीच अत्यंत साधेपणाचे राहिले.

त्यांचे स्वतःचे जीवनसुध्दा अद्भुत किंवा कल्पनातीत वाटावे इतक्या वेगळ्या परिस्थितीमधून गेलेले होते, पण त्याबद्दल क्वचितच कुणाला माहिती झाली असेल. आजींच्या बोलण्यात त्याचा उल्लेख त्या बहुधा कधीच करत नसाव्यात किंवा जाणीवपूर्वक मुद्दाम ते टाळत असाव्यात. कॉलनीमधल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्याची पुसटशीसुध्दा कल्पना कधी आली नाही. एक सुसंस्कृत, सुस्वभावी, शांत, प्रेमळ आणि कर्तबगार मध्यमवर्गीय आजी एवढेच त्यांचे व्यक्तीचित्र माझ्या मनात तयार झाले होते. याच्या पलीकडे मला त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हती. त्यांनी खूप कष्ट सोसून आपल्या मुलांचा सांभाळ केला आणि त्यांना जीवनात इतक्या उंचीवर नेऊन पोचवले वगैरे अस्पष्ट कुणकुण कधी तरी कानावर आली असेल, पण त्याचा जास्त तपशील कधी समजला नव्हता. माझ्या पिढीमधल्या मध्यमवर्गातल्या, विशेषतः ग्रामीण भागातल्या अनेक मुलांनी अनेक अडचणींना सामोरे जाऊन, धडपड करून उच्च शिक्षण घेतले होते आणि त्यात त्यांच्या कुटुंबीयांनीही खस्ता खाल्ल्या होत्या हे सर्वांना माहीत असल्यामुळे कदाचित त्याला त्या वेळी फार मोठे महत्व दिले गेले नसेल.

डॉ.काकोडकर अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर अणुशक्तीनगर सोडून मलबारहिलवरील निवासस्थानी रहायला गेले आणि आजीही तिकडे गेल्यानंतर त्यांचे दर्शन होईनासे झाले. ऑफीसातल्या वाढत्या कामाचे आणि वाढत असलेल्या कुटुंबातले इतर व्यापही वाढत गेल्यामुळे माझ्या स्मरणातून त्या जवळ जवळ बाहेर गेल्या होत्या. कमलाताई काकोडकर यांनी एक आत्मचरित्र लिहिले आहे असे अचानक मला कुणाकडून तरी समजले आणि त्या इतक्या मोठ्या व्यक्ती होत्या हे मला इतके दिवस कसे कळले नव्हते याचे नवल वाटले. त्या पुस्तकाचे नाव त्यांनी एक धागा सुताचा असे का ठेवले आहे याचा काही उलगडा लागत नव्हता.. या पुस्तकाच्या प्रकाशनाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाल्यावर मी त्याबद्दल चौकशी केली. ती ऐकून मी केवढा आश्चर्यचकित झालो ते सांगता येणार नाही. या पुस्तकाच्या प्रकाशनसमारंभाला उपस्थित रहाण्याचे भाग्यही मला मिळाले.   

सुप्रसिध्द गांधीवादी नेते कै.दादा धर्माधिकारी यांचे सुपुत्र आणि सुप्रसिध्द निवृत्त न्यायमूर्ती श्री.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले. त्यांनी खूप वर्षांपूर्वीपासून कमलाताईंना जवळून पाहिले होते. त्या काळातल्या आठवणी त्यांनी सांगितल्या. कमलाताईंचे शिक्षण महात्मा गांधीजींच्या वर्धा येथील सेवाग्राममधील महिलाश्रमात झाले. स्वतः गांधीजी आणि स्व.कस्तुरबा यांचा सहवास त्यांना लाभला आणि देशभक्तीबरोबरच सेवा, संग्राम, सहनशीलता वगैरेंचे जे संस्कार त्या कालावधीत त्यांच्या मनावर बिंबले गेले ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवले आणि पुढच्या पिढीला दिले. त्या नेहमी खादीची साधी सुती वस्त्रेच वापरत राहिल्या. सन १९४२च्या चले जाव आंदोलनात त्यांनी भूमिगत होऊन सक्रिय भाग घेतला. त्यांचे पती स्व.पुरुषोत्तम काकोडकर यांना दीर्घकाल पोर्तुगीजांच्या बंदिवासात रहावे लागल्यानंतर कमलाताईंनी मध्यप्रदेशातल्या एका लहानशा गावात आधी शिशुवर्ग सुरू करून ती शाळा वाढवत नेली आणि नावारूपाला आणली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी ती सोडून त्या मुंबईत आल्या आणि खादी ग्रामोद्योग केंद्रात काम करत राहिल्या. ज्या काळातल्या सर्वसामान्य स्त्रिया कोणाच्या सोबतीशिवाय घराचा उंबरठासुध्दा ओलांडायला घाबरत असत त्या कालखंडातला हा कमलाताईंचा खडतर जीवनप्रवास त्यांनी ज्या धैर्याने आणि जिद्दीने केला त्याला तोड नाही. कमलाताईंच्या आयुष्याचा धागा उलगडताना स्त्री जन्माची एक वेगळीच कहाणी पाहायला मिळाल्याचे चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. त्या काळातील मोठ्या माणसांच्या सहवासानंतर आताची माणसे पिग्मी वाटतात, अशी खंतही त्यांनी त्या प्रसंगी व्यक्त केली होती.

स्वत: कमलाताईंनी त्यांच्या जीवनाचा हा एक धागा सुखाचा नसून सुताचा का हे सांगताना जीवनातील चरख्याचे माहात्म्य सांगितले. स्वराज्याचा सूर्य उगवला, पण सुराज्य आले नाही, नवकोट नारायण भरपूर झाले पण गरीब माणसाचे भले झाले नाही, अशी खंत व्यक्त करतानाच कमलाताईंनी आम्ही कसे जगलो याविषयी येणाऱ्या पिढीला प्रश्न् पडू नयेत म्हणून हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले. स्वातंत्र्य ते आणीबाणी, आणीबाणी ते टेलिकॉम क्रांती, टेलिकॉम क्रांती ते आजचे जागतिकीकरण असा सगळा प्रवास सजगपणे करणारी आणि त्याविषयी कसोशीने बोलण्याची इच्छा असणारी व्यक्ती म्हणजे कमलाताई असल्याचे पुस्तकाचे शब्दांकन करणारे पत्रकार चंदशेखर कुलकर्णी यांनी सांगितले. वयोमानानुसार स्वतः सगळे लिहून काढणे कदाचित कमलाताईंना आता अवघड झाले असल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या हकीकती कुलकर्णी यांनी व्यवस्थितपणे लिहून दिल्या असाव्यात.

डॉ.अंजली कुलकर्णी आणि डॉ.अनुराधा हरकरे या दोन भगिनींनी मिळून फुलाला सुगंध मातीचा या नावाचे एक सुरेख पुस्तक लिहिले आहे. यात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये शिखरावर जाऊन पोचलेल्या पाच प्रसिध्द व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या मुलाखतींमधून त्यांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येते. या पुस्तकातला पहिलाच लेख स्व.कमलाताई आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यालाही मी उपस्थित राहिलो होतो. या पुस्तकाच्या लेखिकांना मुलाखत देतांना काकोडकर आजींनी सांगितले होते, "प्रत्येक आईला आपलं मूल खूप मोठं व्हावं, यशस्वी व्हावं असं वाटतं. परंतु त्यासाठी योग्यरीत्या पालकत्व निभावणं आवश्यक असतं. पालकांनी मुलांसमोर आदर्श ठेवणं, गरज पडल्यास स्वतःवरही वागणुकीची बंधनं घालणं गरजेचं असतं ..."  त्यांनी तरुण पिढीला असा संदेश दिला आहे, "रोज एक तरी काम स्वतःच्या कुटुंबासाठी सोडून दुस-या कुणासाठी तरी करून बघा, प्रत्येकाने असे ठरवले तर आपल्यासोबत दुस-याचा, पर्यायाने हळूहळू देशाचा विकास होईल."

दुनिया गोल आहे. यामुळे आपल्याला कोण कुठे आणि केंव्हा अकल्पितपणे भेटेल हे सांगता येणार नाही. माझ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर काही काळाने आम्हाला समजले की आमच्या सुनेच्या आईचे (मंगलाताईंचे) माहेर खरगोणला कमलाताई काकोडकरांच्या घराजवळ होते आणि त्यांनी म्हणजे आमच्या विहीणबाईंनी त्यांच्या लहानपणी काकोडकर आजींना खूप जवळून पाहिले होते. तेंव्हाच त्या गोष्टीला निदान वीस पंचवीस वर्षे उलटून गेली होती, पण त्याचा तपशील त्यांच्या चांगला लक्षात होता. ही गोष्ट आम्ही आजींना भेटल्यावर सांगितली तेंव्हा त्यांनाही ही जुनी ओळख लगेच आठवली. त्यानंतर जेंव्हा जेंव्हा आमची भेट झाली तेंव्हा त्यांनी "आमची मंगला कशी आहे.." याची जरूर चौकशी केली. दोन तीन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या दूरच्या नात्यातल्या एका मुलीच्या लग्नाला ठाण्याला गेलो होतो, तिथे काकोडकर आजी सौ.काकोडकरांना घेऊन आल्या होत्या. त्या दोघी नव-या मुलाकडच्या बाजूने आल्या होत्या. आपण कोणी व्हीआयपी आहोत असा कसलाही आभास त्यांच्या वागण्यात नव्हता. ही गोष्ट आधीपासून ठाऊक नसली तर कुणाला तसे मुळीसुध्दा वाटले नसते. भोजन संपल्यावर त्यांनी आम्हाला थोडा वेळ जवळ बसवून घेतले, अत्यंत आपुलकीने आमची चौकशी केली. तिथून आम्हाला ठाण्यातच दुस-या एका आप्तांना भेटायला जायचे होते हे आमच्या बोलण्यात येऊन गेल्यावर त्या घरी परत जातांना वाटेत आम्हालाही त्यांच्या गाडीने सोडतील अशी नुसती ऑफर दिली नाही तर आम्ही ती स्वीकारावी असा प्रेमळ आग्रह केला. पण ठाण्यातले त्यांचे घर आणि आम्हाला जायचे असल्याची जागा मंगल कार्यालयाच्या भिन्न दिशांना आहेत आणि दिवसा उजेडी आम्हाला तिथे रिक्शेने जायला कसलाही त्रास नाही वगैरे सांगून कसेबसे त्यांना ते पटवून दिले. दुस-यासाठी शक्यतो काही तरी करायला हवे असा त्यांनी नुसता संदेश दिला नव्हता, अखेरपर्यंत त्या स्वतः तसा विचार आणि आचरण करीत होत्या हे अशा छोट्या उदाहरणातून सहज लक्षात येते..

ती भेटच आमची काकोडकर आजींबरोबर झालेली अखेरची भेट ठरली. मागच्या महिन्यात त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि क्षणभर मन सुन्न होऊन गेले. स्त्रीला आदिशक्तीचे रूप का म्हणतात याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे स्व.कमलाताई काकोडकर. आम्हाला ते पहायला मिळाले, त्यांच्याकडून प्रेमाचे चार शब्द आणि शब्दाविना मिळालेली अदम्य स्फूर्ती, जीवन कसे जगावे याचा न सांगता आपल्या आचरणामधून दिलेला वस्तुपाठ मिळाला हे आमचे भाग्य.

1 comment:

Unknown said...

Aaine Tharavala tar tila hya jagat kahich ashakya nahi he tumcha post madhum kalta...

Thanks
Rajesh