Tuesday, March 26, 2013

इंद्रदेवा.. रे देवा

या महिन्यात जागतिक महिला दिवस येऊन गेला. त्या वेळी पृथ्वीवर केली गेलेली वक्तव्ये स्वर्गामधल्या देवांचा राजा इन्द्र याच्या दरबारापर्यंत जाऊन पोचली आणि मग तिथे काय झाले? उद्या होळी आहे. या निमित्याने थोडे हलके फुलके वगनाट्य.

इंद्रमहाराज आपल्या प्रधानाची वाट पहात आहेत. धावत पळत आणि घाम पुसत प्रधानजी प्रवेश करतात.
इंद्रदेवः अहो प्रधानजी, मी केंव्हाची तुमची वाट पहातो आहे, इतका वेळ न सांगता कुठं गेला होतात?
प्रधानः महाराज, मी त्या आधारकार्डाच्या रांगेत उभा होतो तेंव्हा नारदमुनीचा अर्जंट टेक्स्ट मेसेज आला, त्यामुळे मला रांगेतला नंबर सोडून 'शाडा'कडे धावावं लागलं.
इंद्रदेवः कुठं?
प्रधानः अहो स्वर्गलोक हाउसिंग ...
इंद्रदेवः कशाला?
प्रधानः त्यांच्या फ्लॅट्सची उद्या सोडत आहे ना? तुमचं नाव त्यांच्या यादीत घुसवायचं होतं.
इंद्रदेवः का?
प्रधानः तुम्ही सांगा, इतकी वर्षं इंद्रपद सांभाळलंत, स्वतःचा एकादा तरी बंगला, फार्महाउस नाही तर पेंटहाउस बांधून ठेवलंय्त?
इंद्रदेवः नाही.
प्रधानः निदान बटाट्याच्या चाळीतली खोली?
इंद्रदेवः कुठली?
प्रधानः अरे हो, ती चाळ तर पाडून टाकलीय् नाही का, पण तिथं बांधलेल्या खिरानंदानी टॉवर्समध्ये फ्लॅट घेतलाय्त?
इंद्रदेवः अहो, त्यातले काही नाही. पण मी त्या शाडाच्या गळत्या छप्परांखाली रहायला जाणार आहे का?
प्रधानः मग कुठं जाणार आहात?
इंद्रदेवः का? आपला इतका मोठा इंद्रमहाल असतांना आणखी कुठे कशाला जायचं?
प्रधानः आज आहे, पण उद्या तो तुमचा असणार नाही.
इंद्रदेवः का?
प्रधानः महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आता इंद्रपदालाही लागू होणार आहे. हीच बातमी नारदमुनींनी मला तातडीने कळवली होती. उद्या तुमची सध्याची टर्म संपली की पुढची पाच युगे हे स्थान महिलांसाठी आरक्षित राहणार आहे.
इंद्रदेवः का रे, पृथ्वीवरच्या सगळ्या स्त्रीमुक्तीवाल्या एकदम स्वर्गवासी झाल्या का?
प्रधानः नाही, तिथे त्यांचा लढा चालूच आहे, पण त्यांच्या लाटण्यांचा खणखणाट आता गगनाला भेदून स्वर्गापर्यंत येऊन पोचला आहे.
इंद्रदेवः काय म्हणतोस?
प्रधानः अहो, पृथ्वीवरच्या प्रदूषणामुळे आकाशाला भोकं पडून त्याची नुसती चाळण झाली आहे. आपला स्वर्गलोक आता मुळीसुध्दा साउंडप्रूफ राहिलेला नाही.
इंद्रदेवः हो!
प्रधानः शिवाय ती रोहिणी आपल्या प्रत्येक उड्डाणात गुपचुपपणे स्वर्गामध्ये लाटणी पाठवत आली आहे. ती सुनीताबाई परवाच आपल्या यानात बसून इकडची पाहणी करून गेली आणि नव्या यानामधून तिनं आता अद्ययावत लाटण्यांचं मोठं कन्साइनमेंट इकडं पाठवलं आहे.
इंद्रदेवः बापरे!
प्रधानः अहो सगळ्या गोपिका आता दांडिया आणि गरबा नृत्याऐवजी लाटणीडान्स करायला लागल्या आहेत. राधा ही बावरी राहिली नाहीय्, तीच त्यांना कोरिओग्राफी करून देते आहे.
इंद्रदेवः हो! त्यांची समजूत घालायला आपल्या मेनका रंभांना सांगा.
प्रधानः अहो, तुमच्या मनोरंजनासाठी भरणारी इंद्रसभा आता यापुढे भरणार नाही, म्हणून मेनका, रंभा, ऊर्वशी वगैरे सर्व अप्सरा आता जुडो, कराटे, ताय्केवान्डो वगैरे मार्शल आर्ट्सची प्रॅक्टिस करताहेत. स्वर्गलोकातल्या महिलांना त्या सेल्फडिफेन्सचे ट्रेनिंग देणार आहेत.
इंद्रदेवः खरं सांगताहात?
प्रधानः आणखीही जय्यत तयारी चालली आहे, हेमा, रेखा, जया और सुषमा यांनी निरमाची पोतीच्या पोती स्वर्गात धाडली आहेत. उद्यापासून स्वर्गलोकात साचलेला सगळा मळ काढून त्याला स्वच्छ करायला सुरुवात होणार आहे.
इंद्रदेवः अरे, एवढी कशाला काळजी करतोय्स, महिलांना आरक्षण पाहिजे असेल तर आपल्या इंद्राणीला माझ्या सिंहासनावर बसवून देऊ. त्यात आहे काय आणि नाही काय?
प्रधानः ते चालणार नाही. आता अहिल्या, द्रौपदी, सीता यासारख्या शोषित महिलेलाच इंद्रपद मिळावे असे ठरवले जात आहे. त्यात अहिल्येला मिळाले तर तुमचं काही खरं नाही. मग तुम्हाला शाडातसुध्दा जागा मिळणार नाही, डायरेक्ट पर्णकुटी बांधून त्यात रहावे लागेल.
इंद्रदेवः इंद्राणीदेवींना पण?
प्रधानः त्यांनी जर तुमच्या बारा मुलांना जन्म दिला असता, तर तुमची गादी सांभाळण्यासाठी शोषित म्हणून कदाचित त्यांचाही विचार केला गेला असता, पण त्यांना तर नटून थटून सगळीकडे पुढे पुढे करायची हौस आहेना? कुणाला त्याची कणव वाटेल? 
इंद्रदेवः हे फारच गंभीर प्रकरण दिसते आहे. मला लगेच ब्रह्माविष्णूमहेशांची भेट घ्यायला हवी.
प्रधानः काही उपयोग नाही, यापुढे व्हीआरएस घेऊन आणि ध्यानमग्न होऊन काही युगे चिंतन करायचे त्या तीघांनी ठरवले आहे.
इंद्रदेवः कसले?
प्रधानः ब्रह्मदेवांच्या चार वेदांना आता फारसे महत्व राहिले नाही, अनेक लोकांनी वैदिक वैदिक या नावाखाली इतक्या गोष्टींचं मार्केटिंग करून पाहिलं, पण त्यांच्या मालाला उठावच मिळत नाहीय्. त्यामुळे आता एकदम दहा नवे कोरे वेद लिहायचे त्यांनी ठरवले आहे. ते तर नेहमीच पद्मासन घालून बसलेले असतात. त्याच अवस्थेत ते आता ध्यानमग्न होणार आहेत.
इंद्रदेवः विष्णू भगवान?
प्रधानः त्यांनी तयार केलेली या विश्वाची ऑपरेटिंग सिस्टिम आता ऑब्सोलेट आणि करप्ट झाली आहे आणि त्यात इतके बग्ज निर्माण झाले आहेत की जागोजागी त्यात एरर दिसायला लागले आहेत. त्यामुळे आता त्यांना एक वेगळी व्हायरसप्रूफ ऑपरेटिंग सिस्टिम बनवायची आहे. तिचे व्ही अँड व्ही वगैरे करायला काही युगे तरी त्यांना हवी आहेत. तोवर ते आपल्या शेषनागाच्या स्पायरल गॅलेक्सीवरच अनअॅप्रेचेबल राहणार आहेत.
इंद्रदेवः आणि महेशांचा काय विचार आहे?
प्रधानः त्यांच्यासमोर तर खूप प्रश्न आहेत. नरकासूर, तारकासूर, भस्मासूर, रावण वगैरे सर्वांनी निरनिराळ्या रूपांमध्ये पृथ्वीवर अवतार घेऊन लोकांना छळायला सुरुवात केली आहे. हे सगळेजण तपश्चर्या करून आपल्याकडे वरदान मागायला आले तर त्यांना डिप्लोमॅटिकली कसा नकार द्यावा यावर मॅनेजमेंट गुरूंनी लिहिलेल्या पुस्तकांचा त्यांना अभ्यास करायचा आहे. त्यांनी मदनाला जाळून टाकल्यावर त्या राखेमधून तो फिनिक्स पक्ष्यासारखा पुन्हा जीवंत झाला आणि आता तर त्याने माणसांमध्ये नुसता कहर माजवला आहे. त्याला पुन्हा भस्म करायसाठी आपल्या तिस-या डोळ्याची पॉवर कशी वाढवायची यावर त्यांना चिंतन करायचे आहे.
इंद्रदेवः आणखी?
प्रधानः त्या शिवमणीच्या तालवाद्यांवर प्रभुदेवाचा डान्स पाहून त्यातल्या कोणत्या स्टेप्स आपल्या पुढल्या डमरूवादन आणि तांडवनृत्यात घालाव्यात यावर ते विचार करताहेत.
इंद्रदेवः म्हणजे यातले सगळे बाजूला झाल्यानंतर मग हे जग कसे चालणार आहे?
प्रधानः का? आपल्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती आहेत ना! विश्वाचा सगळा कारभार त्यांच्याकडे सोपवायचे ब्रह्माविष्णूमहेशांनी ठरवले आहे.
इंद्रदेवः त्यांनाही आपले नारदमुनी तरी लागतीलच ना?
प्रधानः त्यांची काही गरज नाही. पृथ्वीवरच्या टेलीव्हिजनवरच्या सीरियल पाहिल्यात तर प्रत्येकींमध्ये एक दोन तरी कळलावी स्त्री पात्रं हमखास असतात. कुठेही, कोणीही आणि काहीही बोलत असलं तरी त्यावेळी त्याजागी या साळकाया माळकाया नेमक्या हजर असतात आणि ते बोलणं ऐकून इकडचं तिकडे करत असतात. टायमिंगच्या बाबतीतलं त्यांच्या इतकं परफेक्शन नारदमुनींनाही जमलं नसतं. त्यांनीही आता कुठल्या तरी अरण्यात जाऊन तपश्चर्या आणि चिंतन करायचे दिवस आले आहेत. 
इंद्रदेवः मग तुम्ही काय करायचं ठरवलंय?
प्रधानः ते पहायचंय्. महिलांच्या राज्यात माझे प्रधानपद तर राहणार नाही, मंत्रीणबाईंचा स्टेनो वगैरेची नोकरी मिळेल का ते पहायचंय्. टायपिंग, शॉर्टहँड, काँप्यूटर डेटाएन्ट्री, इंटरनेट वगैरे सगळ्यांचा एक कम्बाइंड क्रॅश कोर्स मी आजच जॉइन केला आहे.
इंद्रदेवः अरे देवाधिदेवा! 

2 comments:

tanu said...

khupch chan kalpanashakti ahe.mast lihiliy.

Anand Ghare said...

धन्यवाद.